Thursday, September 26, 2013

ही मेघभरली

ही मेघभरली प्रशांत सायंकाळ
अन ओलेती वाट मिठीत गवताळ
चुंबनांची करीत वर्षा वाहतो वारा
हृदयात गुंजवत सूक्त प्रितीचे हळुवार...

हा ऋतुच असला स्नेहल नि लडिवाळ
देत निमंत्रण प्रणयाचे असे ओढाळ...!

Monday, September 23, 2013

साहित्य संमेलनांकडून नेमके हवे तरी काय?


"साहित्य संमेलनांकडून नेमके काय हवे?" हा प्रश्न खरे तर निरर्थक वाटावा अशी परिस्थिती गेल्या काही साहित्य संमेलनांमुळे निर्माण झाली आहे. साहित्यिक (साहित्यासंदर्भात...व्यक्तिगत नव्हे) वाद-विवाद, साहित्यसंकल्पनांबद्दल घनघोर चर्चा, सामाजिक प्रश्नांना साहित्यविश्वाशी जोडत चिंतनात्मक मंथन साहित्य संमेलनामुळे घडावे अशी अपेक्षा ठेवावी अशी आजकाल परिस्थिती उरलेली नाही. उलट साहित्यबाह्य कारणांनीच साहित्य संमेलने गाजत आली आहेत. साहित्य जाणीवा त्या वादांत वाहून गेलेल्या दिसत आहेत. तरीही यंदाचे संमेलन सर्वच उमेदवारांच्या समजुतदारपणामुळे आतापर्यंत तरी कसल्याही वादाच्या भोव-यात सापडलेले नाही हे नक्कीच अभिनंदनीय आहे.

असे असले तरी साहित्य संमेलनाकडूनच्या अपेक्षा उरतातच. या निवडणुकीच्या निमित्ताने मी जेवढ्या मतदारांशी आणि वाचकांशी संपर्क साधू शकलो त्यावरून साहित्य संमेलनांबाबत केवळ वाचकच नव्हे तर अनेक मतदारच उदासीन असल्याचे चित्र दिसून आले आणि याचे कारण ज्यासाठी म्हणून संमेलन हवे तेच संमेलनात नेमके होत नाही असा त्यांचा आक्षेप आहे. यातील सर्वात चिंतीत करणारी बाब म्हणजे तरुणांना तर साहित्य संमेलनाचे कसलेही आकर्षन उरलेले दिसत नाही. एक तर त्यांच्या अभिव्यक्तीला पुरेसे अवकाश सम्मेलन उपलब्ध करून देवू शकलेले नाही. ते नसेल तर नसो पण किमान युवा साहित्यिकांच्या प्रेरणांना, नवनवीन साहित्य प्रवाहांना सामावून घेण्याचे व त्यावर व्यापक चर्चा घडवण्यातही संमेलन आजवर पुढाकार घेवू शकलेले नाही. साहित्य संमेलनातून काहीतरी दिशादर्शक प्रेरणा मिळाव्यात अशा लेखकांच्या अपेक्षा असतील तर त्यांना वावगे कसे म्हणता येईल?

आणि तरुण लेखकच जर साहित्य संमेलनापासून काही मिळू शकण्याच्या स्थितीत नसतील तर ते तिकडे का फिरकतील?

आज आपण पाहतो कि सर्वशिक्षण अभियानामुळे शिक्षितांचे प्रमाण जवळपास सर्वच समाजघटकांत वाढू लागले आहे. या समाजांतील सर्जनशील प्रतिभा लिहू लागल्या आहेत, अभिव्यक्त होवू लागल्या आहेत. एका अर्थाने हे नवजागृतीचे वारे आहे. स्वागतार्ह आहे. आजच्या जागतिकीकरणाच्या काळात सर्वच समाजघटकांच्या जगण्याचे संदर्भ बदलत असलेले आपल्याला ठळकपणे दिसते. त्यातून निर्माण होत असलेल्या आजवर अपरिचित असलेल्या समस्याही डोके वर काढू लागल्या आहेत. त्यांवर उत्तर शोधणे हे सर्वच प्रतिभाशालींचे काम आहे. त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे नवप्रतिभांना जातीय अथवा वर्गीय चौकटीत न अडकावणे यासाठी संपुर्ण साहित्यविश्वानेच सजग रहायला हवे. परंतू आपण पाहतो कि दुर्दैवाने या दिशेने आजवर प्रयत्न झालेले नाहीत. त्यामुळे एकुणातील साहित्य विश्व (वैचारिक/तात्विक मतभेदांसहित) किमान साहित्यएकतेच्या मूल्यावर एकसूत्रात येणे शक्य झालेले नाही. उलट आज बहुतेक जाती/समाजांची स्वतंत्र साहित्य संमेलने भरत आहेत. शहर/प्रांतनिहाय साहित्य संमेलनांना प्रोत्साहन दिले पाहिजे हे खरे पण जातीय साहित्य संमेलने ही पुरोगामी महाराष्ट्राचे कोणते चित्र स्पष्ट करते?

मराठीत एके काळी उच्चभ्रू साहित्य, दलित साहित्य, ग्रामीण साहित्य, आदिवासी साहित्य इ. अशी एक विभागणी नकळत का होईना पण झाली होती. एका अर्थाने साहित्य क्षेत्रातही वर्णव्यवस्थेने प्रवेश केल्याचे ते एक दर्शन होते. पण ही विभागणी पुढे धुसर होण्याऐवजी अधिक कठोर कप्पेबंद होत गेल्याचे विदारक चित्र आपल्याला दिसते. साहित्य हे निखळ साहित्य असून त्यात असे भेदाभेद करून मग त्याचे मूल्यमापण करू नये याबाबत अनेक साहित्यिक/समिक्षक आग्रही असतात. असे असले तरी प्रत्यक्षात ही विभागणी एकुणातच मराठी साहित्याला हानीकारक आहे याबाबत दुमत नसावे. त्या आधारावरच साहित्यिकाचा दर्जा ठरवणे हे तर अधिक हानीकारक आहे. पण यावर जी चर्चा साहित्य संमेलनांतील एखाद्यातरी चर्चासत्रांतून गंभीरपणे केली जायला हवी होती तशी झालेली नाही, हे दुर्दैव नव्हे काय?

बरे, हे येथेच थांबत नाही. साहित्यिकांची जात व प्रांतही साहित्य संमेलनात अनेकदा कळीचा मुद्दा बनत आले आहेत. हे मुद्दे जिंकतातच असे नसले तरी ते रेटले जातात हा सर्वांचाच अनुभव आहे. साहित्याला जात/धर्म/प्रांत नसेल तर साहित्यिकाला हे मुद्दे का लागू व्हावेत? परंतू ते अनेकदा फायद्याचेच जात असल्याने ते वापरले जातातच हेही एक दुर्दैवी वास्तव आहे. यातून साहित्याचे आणि अनेक साहित्यिकांचे एकुणात किती नुकसान होते याचा लेखाजोखा साहित्यिकांनीच मांडायला हवा. पण त्यासाठी जरा निरपेक्ष बनावे लागेल. ते आजच्या परिस्थितीत शक्य आहे कि नाही? मला वाटते शक्य आहे. हे फक्त निवडणुकीच्या संदर्भात नाही हे येथे लक्षात घेतले पाहिजे.

उदाहरणार्थ विदर्भातील लेखकांना पुणे सहजी जवळ करत नाही अशी वैदर्भियांची, मराठवाडियांची तसेच खानदेशी लेखकांचीही तक्रार असते. जे डोक्यावर घेतले गेले ते त्यांच्या अथक प्रयत्न आणि साहित्यनिष्ठेमुळे. पण अनेकजण प्रतिसादांच्या अभावी मधेच गळून पडतात ती संख्या मोठी आहे. त्यामुळे मराठी साहित्यविश्वाची एकुणातच हानी होतेय याकडे साहित्य संमेलनांनी लक्ष द्यायला हवे अशी मागणी असंख्य युवा-साहित्यिकांची आहे.

परप्रांतातील मराठी भाषक आणि लेखकांची समस्या तर याहून गंभीर आहे. १९३८ साली "मध्यभारतीय मराठी वाड:मय" या कै. कृष्णाजी गंगाधर कवचाळे यांच्या ग्रंथाला लिहिलेल्या प्रस्तावनेत  कै. नरहर रहाळकरांनी म्हटले होते, "येथे नको असलेल्या अप्रिय गोष्टीचाही निर्देश करने काही कारणांमुळे आम्हास आवश्य वाटते. ती गोष्ट म्हणजे आपल्या धाकट्या मालव बंधूंविषयी ज्येष्ठ महाराष्ट्रीय बंधूंना वाटणारी अनास्था ही होय......इकडील साहित्यिकांची सदाच कुचंबणा होत राहून त्यांना आपला लेखनरुपी माल वाचकांपुढे मांडण्यास आपल्या ज्येष्ठ महाराष्टीय बंधूकडे धावावे लागते व त्यात अधिकत: निराशाच त्यांच्या पदरी येते." (संदर्भ: अनुबंध, मराठी साहित्य मंडळ, गुलबर्गा प्रकाशित त्रैमासिक-२०१२)

यातील खंत आजही दूर झालेली नाही. किंबहूना परिस्थिती अधिकच बिघडली आहे. परप्रांतांत मराठी भाषकांसाठी (गोवा अपवाद) एकाही मराठी साहित्य मंडळाचे सम्मृद्ध ग्रंथालय नाही. इमारतींची तर बाबच दुर्मिळ. बडोद्याला कुसुमाग्रज प्रतिष्ठानकडून येणारे फिरते पेटी ग्रंथालय सोडले तर काही सुविधा नाही. तीच बाब छत्तीसगढची. येथे भाड्याच्या खोलीत मराठी साहित्य परिषदेचा कारभार चालतो. गुलबर्ग्याच्या ग्रंथालयात ५०-६० ग्रंथ आहेत. खरे तर महाराष्ट्र ग्रंथ संचालनालय दरवर्षी ३-४०० ग्रंथांच्या जवळपास तेवढ्याच प्रती विकत घेऊन महाराष्ट्रातील ग्रंथालयांना वातते. त्यात परप्रांतीय ग्रंथालयांचाही समावेश करने अशक्य आहे काय? मराठी साहित्य संस्कृती मंडळामार्फत नवलेखकांना अनुदान देतांना परप्रांतीय मराठी लेखकांना प्राधान्यक्रमाने प्रथम पुस्तक प्रकाशनासाठी अनुदान देता येणे अशक्य आहे काय? ग्रंथालयांसाठी सुसज्ज इमारती देणेही अशक्य नाही. पण त्यासाठी मराठी भाषेच्या वृद्धीची तळमळ व कळकळ लागते. ती आजवर तरी दिसलेली नाही.

हे असे चित्र असेल तर मग परप्रांतांतील मराठी भाषकांच्या गळचेपीबद्दल काय बोलावे? गोव्याची राजभाषा मराठी व्हावी यासाठी गोवेकर मराठी बांधव संघर्ष करीत आहेत. पण त्याबाबत मराठी भाषक व महाराष्ट्र सरकार तर उदासीन आहेच, पण खुद्द अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनही उदासीन असावे हे मात्र अनाकलनीय व मराठीच्या एकुणातील विकासासाठी हानीकारक आहे. बेळगांव-निपाणीबाबत एवढी वर्ष नियमीत ठराव केले जातात....काय झाले त्यांचे?

थोडक्यात मराठीचे व मराठी साहित्यविश्वाशी निगडित असंख्य प्रश्न आहेत. ते चर्चेत आणने संबंधितांना खरे तर अडचणीचे ठरणारे नसून ते सतत चर्चेत ठेवले तर मराठीच्या एकुणातील संवर्धनासाठी उपयोगाचेच होईल. पण तसेही होतांना आपल्याला दिसत नाही. आजच्या प्रत्यक्ष समस्यांबाबत साहित्य संमेलनांची अशी उदासीनता असेल तर मग मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याबाबत मराठी साहित्य संमेलन काय भूमिका घेणार आहे? मराठीचा जागर देश-विदेशात व्हावा ही सर्व साहित्यप्रेमी मराठी भाषकांची वाजवी अपेक्षा आहे. पण जेथून चिंतनाचे आणि परिवर्तनाचे धुमरे फुटावेत ते साहित्य संमेलनच त्याबाबत उदासीन असेल तर साहित्य संमेलन म्हणजे तीन दिवसांची जत्रा आणि या संमेलनाचा अध्यक्ष म्हणजे तीन दिवसांचा गणपती ही जनधारणा नुसती ठळक होत जाणार नाही तर एक दिवस ती सर्वस्वी बाद ठरतील.

तसे होऊ नये. ते मराठी भाषेच्या, साहित्याच्या आणि समाज-स्पंदनांना जाणवून घेत अभिव्यक्त होत राहणा-या प्रतिभावंतांच्या हिताचे नाही. साहित्य संमेलन हे मुठभरांचे असते या भ्रमातून सर्वच मराठी रसिकांनी बाहेर यायला हवे आणि त्यात कालानुरुप बदल घडवण्यात हातभार लावला पाहिजे. हे खरेच "अखिल भारतीय" आणि "सर्व मराठी साहित्य-रसिकांचे चिंतन-शिबीर" व्हावे यासाठी हातभार लावला पाहिजे.

-संजय सोनवणी


Saturday, September 21, 2013

ही रात अशी ओढाळ

ही रात अशी ओढाळ
ही रात अशी लडिवाळ
क्षितिजांच्या ओठांतून गाते
चांदणे प्रितीचे हळुवार!

तिच्या दिठीत घुमते वारे
तिच्या दिठीत चांद अन तारे
तिच्या दिठीत अलवार सुस्कारे
तिच्या दिठीत रोमांचित जगणे

ही रात्र अशी ही लहरी
ही रात्र अशी ही चिंतनवेडी
स्मशानांत जागुनी बघते
जीवनाची अंतिम फेरी..!

तुच प्रिय प्रियतमे...

चौकटीतील दु:खे तुझी 
मला पाहवत नाहीत
चौकटीतील बंदिस्त तुझी
हास्ये मला पाहवत नाहीत

या जरा माळरानावर ये
हसरी रहा..मूक्त रहा...गंभीर रहा...सैरभैर रहा
कशीही रहा
पण जरा मूक्त झेप घे
तुझ्यातले तुझे रूप घे...

चौकटीबाहेरची तु मला
तुच प्रिय प्रियतमे...

Thursday, September 12, 2013

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोण?.....प्रा. हरी नरके

अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे पडघम वाजू लागले आहेत. विराट साहित्यिक आचार्य अत्रे यांच्या जन्मगावी सासवडला यावर्षी संमेलन होणार आहे.अध्यक्षपदाच्या रिंगणात संजय सोनवणी, प्रभा गणोरकर,अरुण गोडबोले आणि फकीरराव मुंजाजी शिंदे असे ४ साहित्यिक आहेत. १६ आ‘क्टोबरला निवडणूक निकाल घोषित होणार आहे. साहित्यबाह्य वादांमुळे ही निवडणूक गाजू नये अशी या चौघांचीही इच्छा असल्याचे त्यांनी घोषित केलेले आहे.त्यामुळे वादांची वादळे होण्याची परंपरा मोडीत निघणार की काय याची अनेकांना चिंता लागली आहे.निवडणुक प्रक्रिया सुरू झाल्यानंतरही जेव्हा काही मंडळी निवडणूक नकोच असे म्हणतात तेव्हा उत्तम विनोदाचा नमुना म्हणून त्याकडे बघायला हरकत नसावी.महामंडळाच्या घटनेप्रमाणे प्रमोद आडकर या निर्वाचन अधिकार्‍यांच्या नेतृत्वाखाली सदर प्रक्रिया सुरु होवून १ महिना झालेला आहे.
अखिल विश्वातील साडेदहा कोटी मराठी भाषकांचे प्रतिनिधीत्व करणार्‍या या संमेलनाच्या अध्यक्षांची निवड अवघे १०६९ मतदार करणार आहेत.याचा अर्थ लाखात फक्त एकाला मताचा अधिकार आहे. या मतदार यादीकडे एक नजर टाकली तर काय दिसते? १४ माजी अध्यक्ष, ९ महामंडळाच्या महाकोशाचे विश्वस्त, महाराष्ट्र साहित्य परिषद,पुणे, मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद, मुंबई मराठी साहित्य संघ, मुंबई, विदर्भ साहित्य संघ, नागपूर या चार घटक संस्थांचे प्रत्येकी १७५ याप्रमाणे ७०० प्रतिनिधी, मराठी साहित्य परिषद,हैद्राबाद, आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद, गुलबर्गा, मध्यप्रदेश मराठी साहित्य संघ, भोपाळ, गोमंतक साहित्य सेवक मंडळ, पणजी, गोवा, छत्तीसगड मराठी साहित्य परिषद, बिलासपूर, या ५ समाविष्ट साहित्य संस्थांचे प्रत्येकी ५० याप्रमाणे २५० प्रतिनिधी, मराठी वाड्मय परिषद,बडोदे या संलग्न संस्थेचे ११ प्रतिनिधी आणि सासवडच्या स्वागत मंडळाचे ८५ प्रतिनिधी असे हे १०६९ मतदार आहेत.
आजवर ८६ साहित्य संमेलने झालेली असून त्याच्या अध्यक्षपदावर कुसुमावती देशपांडे, दुर्गा भागवत, शांता शेळके आणि विजया राजाध्यक्ष या चार महिला विराजमान झालेल्या आहेत. कवी अनिल आणि कुसुमावतीबाई हे पतीपत्नी अध्यक्ष झालेले होते. यावर्षी पूर्वाध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांच्या पत्नी प्रभा गणोरकर या निवडणूक लढवित आहेत.फ.मु.शिंदे आणि श्रीमती गणोरकर यांची ओळख प्रामुख्याने कवी ही आहे. सोनवणी हे तरूणांचे प्रतिनिधी असून ते लोकप्रिय नी समिक्षकप्रिय कादंबरीकार,कवी, नाटककार, वैचारिक लेखक, संशोधक अशा बहुआयामी प्रतिभेचे धनी आहेत. ते मराठीतील सर्वाधिक लोकप्रिय ब्लोगर असून त्यांच्या ब्लोगला आजवर ३लाख,६हजार,३७१ हिट्स मिळालेल्या आहेत.मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी जनआंदोलनाचा रेटा निर्माण करण्यासाठी आपण निवडणूक लढवित आहोत.यानिमित्ताने साहित्य, तरूण आणि सोशल मिडीया याकडे लक्ष वेधण्यासाठी आपली उमेदवारी आहे ही त्यांची भुमिका विविध थरांतून उचलून धरली जात आहे.
या मतदारांमध्ये ७७% पुरुष मतदार असून महिला अवघ्या २३% म्हणजे २४४ आहेत.मराठी साहित्य परिषद,हैद्राबाद, आंध्र प्रदेश,येथील मतदारात ५०% महिला मतदार असून सर्वात कमी महिला मतदार म्हणजे अवघ्या ९% मतदार मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबादच्या आहेत. दादा गोरे आणि सुनंदा दादा गोरे तसेच डहाके आणि गणोरकर पतीपत्नी दोघेही मतदार आहेत. मराठवाड्याच्या यादीत अमेरिकेचे अरुण प्रभुणे मतदार आहेत. मतदारांचा विचार करताना साहित्य क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा विचार करायला हवा. त्यांच्या जातीधर्माचा उल्लेख गैरलागू ठरणार हे स्वाभाविकच होय. तरीही सामाजिक चित्र पाहायचे झाल्यास काय दिसते? या मतदारांत २९ कुलकर्णी आहेत तर २८ पाटील आहेत.स्वागत समितीत जगताप या आडनावाचेच १५% मतदार आहेत. टक्केवारी बघायची झाली तर आजवर साहित्य क्षेत्रात ज्या पांढरपेशा समाजाची एकहाती मक्तेदारी होती ती मोडीत काढीत सत्ताधारी समाजाने या मतदारातही जोरदार मुसंडी मारलेली आहे. फार लवकरच हे प्रमाण समसमान होईल असे चित्र आहे. मुस्लीम समाजाला मतदारात अवघा अर्धा टक्का स्थान मिळालेले आहे. मतदार यादीतील जयंत साळगावकर यांचे २०आ‘गष्ट रोजी निधन झाले आहे.
अध्यक्षपदाची निवडणुकच नको असे म्हणणारे ना.धों. महानोर आणि शिरिष पै हे दोघे अध्यक्षपदाचे मतदार मात्र आहेत. या मतदारांमधील पुर्वाध्यक्षांव्यतिरिक्त सर्वात ज्येष्ट साहित्यिक म्हणजे मंगेश पाडगावकार आहेत. आनंदाची गोष्ट म्हणजे यावेळी चक्क अनेक श्रेष्ठ साहित्यिक मतदार आहेत. साहित्याच्या क्षेत्रातील काही दिग्गज या मतदारात आहेत. आशा बगे, रावसाहेब कसबे, ह.मो.मराठे, अरुणा ढेरे, आनंद यादव, सदानंद मोरे,श्रीनिवास कुलकर्णी, सुधीर रसाळ,जनार्दन वाघमारे, राजन खान,आसाराम लोमटे, इंद्रजित भालेराव, प्रभाकर बागले, रा.रं.बोराडे, रामदास भटकळ, दिलीप माजगावकर, दिनकर गांगल, वसंत सरवटे, नीरजा, शंकर वैद्य, माधव भागवत,अशोक कोठावळे, प्रेमानंद गज्वी,अरुण टिकेकर, अंबिका सरकार, अशोक नायगावकर, वसंत दत्तात्रय गुर्जर, गंगाधर पाटील, मीना प्रभू,सतिष काळसेकर, अप्प परचुरे, प्रतिभा रानडे, नामदेव कांबळे, ही काही नावे वाणगीदाखल सांगता येतील.
मराठवाड्याची एकगठ्ठा मते औरंगाबादचे फमु घेणार तर अमरावतीच्या गणोरकर विदर्भाची मते खाणार अशा भाषेत काही मंडळी बोलतात तेव्हा साहित्याच्या क्षेत्रातही प्रांतवाद असतो असे म्हणायचे काय? भोपाळच्या मतदारांच्या यादीत अपवादालाही बहुजनातील फारसे कोणी नसावे आणि मराठवाड्याच्या यादीत बहुसंख्य नावे एकट्या सत्ताधारी जातीचीच असावीत हे दुर्दैव नाही काय? मराठवाडा सरंजामी मानसिकतेमधून बाहेर येताना कधी दिसणार असाही प्रश्न काहीजण विचारतात. १७५ मतदारांमध्ये ठालेपाटलांना १६ पेक्षा जास्त महिला मिळू नयेत हे कशाचे लक्षण आहे?
या मतदार यादीवर साहित्य क्षेत्रापेक्षा साहित्यबाह्य क्षेत्राचा ६० ते ७०% प्रभाव असावा हे बघून ही निवडणूक साहित्य संमेलनाची आहे की जिल्हा परिषदेची? असाही प्रश्न विचारता येईल. महाराष्ट्राबाहेरीलही मंडळी मराठीवर अपार प्रेम करतात.बेळगाव,निपाणीच्या सीमाभागातील लोक गेली अनेक पिढ्या मराठीसाठी संघर्ष करीत आहेत. पण त्यातले कोणीच या मतदारात का नाहीत? समाविष्ट संस्था आणि संलग्न संस्था यातील मतदारात साहित्यिक किती  आहेत? त्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकीही का नसावी?प्रश्न अनेक आहेत. तथापि प्रथमच या निवडणुकीत मतदार संख्येचा विस्तार करण्यात आला आहे, तिच्यात बर्‍याच घटकांना पहिल्यांदाच प्रतिनिधित्व मिळत आहे, याचे स्वागत करायला हवे.निवडणूक प्रक्रियेत येत असलेल्या पारदर्शकतेसाठी महामंडळाच्या अध्यक्षा माधवी वैद्य यांना धन्यवाद द्यायला हवेत.
अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? याचा निर्णय १६ आ‘क्टोबरला लागेल. गुणवत्तेवर निर्णय व्हावा, जात किंवा प्रांतीय भावनेवर नाही एव्हढीच अपेक्षा.सर्व उमेदवारांना शुभेच्छा.
.............................................................................................
---- प्रा. हरी नरके

मी निवडून येईल याचा मला ...

मी निवडून येईल याचा मला विश्वास आहेच. निवडून आल्यानंतर मी एक अनौपचारिक अशी अध्यक्षीय समिती स्थापन करणार आहे. तीत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या सर्व घटकसंस्था आणि जगभरातील बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळांतील (किंवा बाह्य) निवडक प्रतिनिधींचा समावेश करून त्यांच्या माध्यमातून खालील उपक्रम राबवणार आहे...

१. देशांतर्गत व बाहेरही विखुरलेल्या मराठी भाषकांच्या समस्यांना सातत्याने वाचा फोडत राहणे. सर्व मराठी भाषक साहित्यिक आणि साहित्यप्रेमींना अ.भा. मराठी साहित्य
संमेलन, भविष्यात का होईना, आपले वाटेल याची सकस पायाभरणी करणे.

२. गोव्यात मराठीला राजभाषेचा दर्जा प्राप्त व्हावा, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा आणि डा. आ. ह. साळुंखे समितीने सुचवलेल्या सांस्कृतीक धोरणावर व्यापक अंमलबजावणी व्हावी यासाठी या समितीचा व जनसामान्यांचा दबावगट निर्माण करणे. प्रसंगी ठिकठिकाणी आंदोलने करने. सीमाभागातील लेखकांना प्रोत्साहन देणे.

३. मराठीतील सर्व साहित्य प्रवाहांना किमान एकमेकांशी चांगली ओळख व्हावी, सैद्धांतिक आणि वैचारिक देवाणघेवाण व्हावी यासाठी प्रयत्न करणे. आज अनेक साहित्त्यिक-विचारवंत आपापल्या परीने महान सांस्कृतीक कार्य घडवत असतात पण त्यांना व्यापक मान्यता/प्रसिद्धी मिळत नाही...त्यासाठी माध्यमांनाही सजग करणे. चळवळींची वैचारिक व्यापकता वाढवणे.

४. परप्रांतीय/विदेशांत स्थायिक पण मराठी मातीच्या साहित्यिकांना (त्यांनी अभिव्यक्तीचे माध्यम अन्य भाषा निवडले असले तरी...उदा. आताच्या पिढीचे हर्षवर्धन देशपांडे आणि अन्य अनेक) योग्य तो मानसन्मान मिळायला हवा यासाठी प्रयत्न करणे.

५. आज ब्लोग हे अभिव्यक्तीचे तरुणाईचे महत्वाचे साधन आहे आणि अनेक मराठी ब्लोगलेखक तसेच मराठी संकेतस्थळांवर अत्यंत सातत्याने प्रगल्भ आणि अभ्यासपुर्ण लिहिणारे अनेक लेखक आहेत. छापील पुस्तके ज्यांची तेच लेखक असे मानायची प्रथा आता कालबाह्य झाली आहे. अशा सर्व लेखकांनाही मराठी साहित्य संस्कृतीत सामावून घेण्याची आणि त्यांना यथोचित सन्मान देण्याची आज गरज आहे. त्यासाठी आपण सर्वांनीच अधिक प्रयत्न करण्याची गरज आहे.

शिलालेख ते ताम्रपट ते हस्तलिखित पोथ्या ते छापील शब्द ते संगणकीय अभिव्यक्ती असा आपण प्रवास केला आहे. विज्ञान ज्या वेगाने पुढे जात आहे तो वेग पाहता सध्याच्या संगणकांची जागा क्वांटम संगणक घेतील यात शंका नाही. आपल्याला काळाबरोबरच नव्हे तर काळाच्याही पुढे रहावे लागणार आहे. आपल्याला तशी मानसिकता बनवावी लागणार आहे.

६. आज आपण विज्ञानयुगात आहोत पण अखिल भारतीय म्हणवणा-या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक जुनाट आहे. ती On-Line करावी व सर्वच वाचक/लेखक/पत्रकार/संपादकादिंना मतदान करता यावे यासाठी मी आग्रही तर आहेच पण ते प्रत्यक्षातही आणेल.

आणि हा प्रयत्न आपण सर्वांने मिळून करायचा आहे. एका रात्रीत काही होत नसते. सातत्यपूर्ण प्रयत्न आपण सर्वांनाच मिळून करावे लागतील. मी माझ्या परीने जेवढे शक्य आहे तेवढे प्रयत्न करीतच आहे आणि भविष्यातही आपणा सर्वांच्या मदतीने करीतच राहील!

साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद "जीवनगौरव" पुरस्कार नाही: सोनवणी

साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद "जीवनगौरव" पुरस्कार नाही: सोनवणी

पुणे: 11: - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद म्हणजे जीवनगौरव पुरस्कार नसून साहित्य-संस्कृतीच्या सर्व प्रवाहांना एका सूत्रात बांधत पुढील दिशादर्शक कार्य करण्यासाठी असते. साहित्य संमेलन हा केवळ उत्सव नसून व्यापक विचारमंथनाचे शिबीर आहे व ते वर्तमान व भविष्यातील साहित्यिक व साहित्यरसिकांसाठीचे एक उर्जाकेंद्र बनावे यासाठी आपण अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहोत अशी आपली भूमिका साहित्यिक संजय सोनवणी यांनी आज येथे पत्रकार परिषदेत मांडली.

कायदे केल्याने अनैतिक गुन्ह्यांची संख्या कमी होत नाही. निर्भयावर अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्यानंतर कायदे कठोर केले गेले हे खरे असले तरी महिलांवरील अत्याचार कमी न होता वाढतच आहेत. मुळात हा प्रश्न समाज-संस्कृतीचा असून समाजाच्या नैतिक धारणांना आकार देण्याचे कार्य आपल्या साहित्यिकांना करावे लागणार आहे. आज ग्रामीण भागातून स्वतंत्र प्रतिभेचे अनेक लेखक कवी लिहिते झालेले आहेत परंतू त्यांना सामावून घेणारे व्यापक व्यासपीठ नसल्याने उपेक्षेने कंटाळून हे क्षेत्र सोडणा-यांचीही संख्या वाढते आहे. त्यासाठी मराठी साहित्य परिषदेच्या सर्वच घटकसंस्थांना क्रियाशील करण्याची गरज आहे असेही सोनवणी म्हणाले.

परराज्यांत व विदेशातही मराठी माणसांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. आपल्या साहित्य व्यवहाराशी य सर्वांनाच आत्मियता वाटावी यासाठी विशेष प्रयत्न होत नाहीत. बेळगांव-निपाणी भागातील मराठी भाषकांना एवढी झळ बसत असुनही त्याचे पडसाद साहित्य जगतात उमटत नाहीत. एवढेच काय या भागातील एकही नांव साहित्य संमेलनाच्या मतदार यादीत नाही. गोवेकर मराठी भाषकांची मराठीला राजभाषेचा दर्जा मिळावा अशी जुनी मागणी आहे पण तिला महाराष्ट्रातून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. हे चित्र बदलण्यासाठी आपण अध्यक्ष झाल्यास एक अनौपचारिक अध्यक्षीय समिती स्थापन करून सर्व घटक संस्थांच्या प्रत्येकी किमान दोन प्रतिनिधींचा त्यात समावेश करून एक दबाव गट निर्माण करू. ही समिती मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा आणि शासनाने स्वीकारलेले सांस्कृतीक धोरण कटाक्षाने राबवावे यासाठीही जनांदोलन करेल असेही सोनवणी पुढे म्हणाले.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय निवडणुकीची प्रक्रिया सुलभ व व्यापक पायावर व्हावी यासाठी online मतदानाची सुविधा निर्माण करावी यासाठीही आपण प्रयत्न करणार आहोत असेही संजय सोनवणी म्हणाले.

साहित्य क्षेत्रात प्रांतवाद नको

साहित्य क्षेत्रात प्रांतवाद नको
(04-09-2013 : 00:09:33)
औरंगाबाद : साहित्यामध्ये कोणीही स्पर्धक असू शकत नाही. कारण, प्रत्येकाची लेखनशैली वेगळी असते. साहित्य क्षेत्रात प्रांतवाद असता कामा नये; कारण हे क्षेत्र वैश्‍विक असण्याची गरज आहे, असे संजय सोनवणी म्हणाले. सोनवणी हे सासवड येथील नियोजित ८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठीचे उमेदवार आहेत.
३ सप्टेंबर रोजी सोनवणी येथे आले असता ‘लोकमत’ प्रतिनिधीने त्यांच्याशी संवाद साधला. अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यामागील भूमिका त्यांनी स्पष्ट केली. ते म्हणाले, आज सर्वच जातीची साहित्य संमेलने भरत आहेत. मात्र, त्यातून जातिभेद नष्ट होण्याचे स्वप्न दुभंगत आहे. त्यामुळे शक्य तेवढय़ा समाजातील साहित्याची दखल घेण्याची गरज आहे. साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद हे केवळ सन्मान मिळविण्यापुरते नाही, तर कार्य करण्यासाठीही आहे.
साहित्य संमेलन केवळ उत्सव न बनता त्यातून सामाजिकता, संस्कृती पुढे जायला हवी. साहित्य संमेलन व्यापक होण्याची गरज आहे; ते तरुण वर्गाला साहित्य चळवळीत आणण्याचे माध्यम बनले पाहिजे, असेही सोनवणी म्हणाले.
आज एका शहरातील साहित्य चळवळीविषयी दुसर्‍या शहरात ना माहिती होते ना त्याची देवाण-घेवाण. ही देवाण-घेवाण होण्याची गरज आहे. तसेच जेव्हा सांस्कृतिक, सामाजिक पडझड होते तेव्हा केवळ निषेध केला जातो.
मात्र, केवळ निषेध न करता आज नीतिमूल्ये रुजविण्याची गरज आहे, असेही सोनवणी म्हणाले. काळानुसार भाषा बदलली पाहिजे. व्यक्त होण्यासाठी जे सोपे वाटेल त्याचा वापर व्हावा. ठराविक शब्दांचा आग्रह धरण्याऐवजी सोपे शब्द वापरले जावेत, अशी सूचना त्यांनी केली.
ऑनलाईन पद्धत हवी
आज नवनवीन माध्यमे उपलब्ध झाली आहेत. अनेक ठिकाणी ऑनलाईन पद्धतीचा वापर केला जात आहे. मात्र, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक जुन्याच पद्धतीने होत आहे. त्याऐवजी यंदा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ऑनलाईन पद्धतीचा वापर व्हावा, असे ते म्हणाले.(लोकमत ब्युरो)

Sunday, September 8, 2013

प्रिये, जरा थांब...

प्रिये, जरा थांब,
अशी उतावीळ होऊ नकोस...
तृणपात्यांवर झळाळणा-या
दवबिंदुंना
तुझा स्नेहमय स्पर्श
करू नकोस
स्नेह दाखवण्याची ही रीत नव्हे
माझ्या लाडके...
क्षणिक वाटणा-या दवबिंदुंनाही
हे अवघे विश्व पाहण्याचा
नि अस्तित्व वीरेपर्यंत
जगण्याचा अधिकार आहे
जसा तुला
असेच मूग्ध हास्य करत राहण्याचा आहे
आणि मला
जसा
तुझ्या घनरात्रीसमान
केशालापात
अनंत काळापर्यंत
सूर्य उरात ठेवून
हरवून जाण्याचा आहे...

माझ्या लाडके...
आपणही चिरंतन
दवबिंदुच आहोत
विश्वाच्या
तृणपात्यांवरचे!

Saturday, September 7, 2013

गणेश यज्ञधर्मींचा... मूर्तिपूजकांचा!

MAHARASHTRA TIMES

गणेश यज्ञधर्मींचा... मूर्तिपूजकांचा!

Sep 8, 2013, 12.45AM IST  

0
kdas
संजय सोनवणी


गणपतीपूजनाचे भौतिक पुरावे आपल्याला सिंधू संस्कृतीकाळापासून मिळतात. हडप्पा येथे गणपती शीर्षाचे शिल्प मिळाले आहे. म्हणजेच भारतात गणपतीपूजन हे किमान पाच हजार वर्षं जुने आहे. अर्थात अवैदिकांचा गणपती वैदिकजनांनीही आपले धर्मसंस्कार करत स्वीकारला आणि तो जगभर पसरला. गणपती या दैवताचा विकास कालौघात कसा झाला याचा दैवतेतिहासाच्या संदर्भात घेतलेला रोचक धांडोळा...

गणपती ही मूळची वैदिकेतर देवता आहे याबाबत पाश्चात्य व भारतीय विद्वानांत जवळपास एकमत आहे व ते सिंधू संस्कृतीत गणेशाचे भौतिक अस्तित्व सापडले असल्याने यथायोग्यही आहे. काही वैदिकेतर गण (मानवसमूह) हत्ती हे आपले देवक मानत असत. टोळी नृत्य व धार्मिक कार्यक्रमांच्या प्रसंगी गजमुख असलेले मुखवटे घालण्याची चाल त्यांच्यात होती. गजमुखाची शिल्पेही देवकप्रथेतून निर्माण झाली. या गजमुखाला पुरातन काळी नरबळी दिला जात असे. पुढे ती प्रथा पशुबळीत बदलली आणि मनुष्य जसा सुसंस्कृत झाला तसे बळीप्रकरण थांबले व रक्तवर्णी शेंदुराने गणेशमुर्ती माखली जावू लागली. पूजा हा मूळचा द्राविड शब्द आहे. मूर्ती अथवा प्रतिमापूजाकांड नंतर भारतात आलेल्या वैदिक धर्मात नव्हते. 'पूजा' या शब्दाचा अर्थ आहे 'माखणे/शिंपणे.. म्हणजे मूर्तीला रक्त/तेल माखून अथवा जल शिंपूनजी केली जात होती ती 'पूजा'. हरप्पा येथील सापडलेल्या गणेशमुखाकडे बारकाईने पाहिले तर शिरोभूषणावरील शेंदुराचे अस्पष्ट अवशेष पाहता येतात. सिंधुकाळी गणेशाचे शिरोभूषण तत्कालीन प्रचलित शिरोभूषणाप्रमाणेच होते. तशी शिरोभूषणे अनेक प्रतिमांवर आढळून येतात.

गज, नाग, मूषकादि देवके असणारे भिन्न गण जसजसे सम्मिलीत होऊ लागले तसतशी ती देवकेही एकाच गणेशात सामावली गेली. म्हणजे नागबंधाच्या रूपात नाग गण, मूषकवाहनाच्या रूपात मूषक गण असे ते सम्मिलन कालौघात झाले, असे इतिहासावरून दिसते.
गणेश आणि शिव मूळचे एकच असाही विद्वानांत एक मतप्रवाह आहे. शिव जसा त्रिनेत्र व भालचंद्र आहे तसाच गणेशही आहे. शिवही गणांचा अधिपती आहे तसाच गणपतीही आहे. गणेशाला गजमुख आहे तर शिव गजचर्म नेसतो. शिवाच्या तशा असंख्य प्रतिमा कुशाणकालीन नाण्यांवर मिळतात. पुढे कालौघात गणपती ही स्वतंत्र पण शिवपुत्र असलेली देवता म्हणून जनमानसात स्थिर झाली. गणेशाच्या उत्पत्तीच्या पौराणिक भाकडकथा वगळल्या तरी त्याला अयोनिज का मानले जाते, हे यावरून लक्षात यावे.

पुरातन काळापासून वैदिक यज्ञधर्मी व अवैदिक मूर्तीपूजकांत, ज्यांना वैदिकजन 'व्रात्य' म्हणत, धार्मिक संघर्ष होता याचे अनेक पुरावे आपल्याला धर्मेतिहासातच पहायला मिळतात. गणेशाचे एक नांव 'व्रातपती' असे आहे, हे गणपत्यथर्वशीर्षातून दिसते. व्रत करत ते व्रात्य. अवैदिक लोक यज्ञविरोधक होते. ते यज्ञात व्यत्यय आणत असत. त्यामुळेच की काय, यज्ञ सुरू करण्याआधी विघ्नकर्त्या विनायकाची शांती करणारे मंत्र म्हटले जात व त्याला 'विघ्न न आणता दूर मुंजवत पर्वतावर निघून जा' अशी आवाहने केलेली आढळतात. म्हणजेच वैदिकजनांसाठी गणेश हा प्रारंभी 'विघ्नकर्ता' होता तर अवैदिकांसाठी तो 'विघ्नहर्ता' होता असे आपल्याला दिसते. वैदिक साहित्यामध्ये कार्यारंभी अथवा ग्रंथांच्या आरंभी गणेशवंदना दिसत नाही ती यामुळेच. महाभारताची सुरुवातही नारायण-सरस्वती या दैवतांना वंदन करून होते, गणेशाला नाही, हेही येथे लक्षणीय आहे. किंबहुना चारही वेदात ओंकारही येत नाही.

गुप्तकाळात मात्र सांस्कृतिक संमिश्रणाची सुरुवात झालेली दिसते. वैदिकजनांनीही गणपतीला त्याची लोकप्रियता पाहून विघ्नकर्ता नव्हे तर विघ्नहर्ता या रूपात नंतर स्वीकारले, असे महामहोपाध्याय पां. वा. काणे यांनी प्रतिपादित केले आहे. वैदिक ब्रह्मणस्पति आणि गणपती यांचे तादात्म्य साधण्याचे प्रयत्न झाले असले तरी गणेशाची मूळ अवैदिक रूपे मात्र पुसणे जमले नाही. गणपती अथर्वशीर्ष जरी अथर्ववेदाचा भाग मानण्याची प्रथा असली तरी ते वास्तव नाही. अथर्ववेदात गणपती आढळत नाही. अथर्वशीर्षातील 'गणानां त्वा गणपतिं हवामहे' हे मूळचे ऋग्वेदातील (ऋ. २.२३.१) आवाहन असून ते ब्रह्मणस्पतीला उद्देशून आहे, आपण पुजतो त्या गणपतीला नाही. परंतु शब्दसाधर्म्याचा उपयोग येथे करून वैदिक अपहरणाचा घाट घातलेला दिसतो.

तंत्रकाळात शिव-शक्तीप्रमाणेच गणेशही एक महत्त्वाची तांत्रिक देवता बनला. किंबहुना गणपतीला मिळालेली अनेक नावे ही तंत्रसंप्रदायाने दिलेली आहेत. 'शारदातिलक' ग्रंथात गणपतीच्या ४४० ध्यानमूर्ती वर्णिल्या असून त्यांची वेगवेगळी नावे आहेत. दुसरे महत्त्वाचे म्हणजे सर्वच्या सर्व अष्टविनायकाची स्थाने महाराष्ट्रात आहेत. येथूनच ही देवता संपूर्ण देशात व देशाबाहेर पसरली असावी, असा तर्क करायला वाव आहे. भारतात गणपतीची स्वयंभू तशीच लोकप्रसिद्ध स्थाने हजारोंनी आहेत. गणपती म्यानमार, सयाम, कंबोडिया, बाली, तुर्कस्थान, चीनमध्ये तर आढळतोच परंतु मेक्सिकोतही त्याचे अस्तित्व आढळते. महायान बौद्ध व हिंदू तंत्रमार्गीयांमुळे तंत्रगणपती जगभर पसरला. परंतु पुढे गणेशाची वाममार्गी पूजा बंद झाली. चीनमध्ये तर सम्राट चेन्त्सुंगने आज्ञापत्र काढून गणपतीची तांत्रिक पूजापद्धत बंद पाडली.

नवव्या शतकात (किंवा सहाव्या) आदि शंकराचार्यांनी पंचायतन पुजेत गणपतीला स्थान दिले. तेराव्या शतकात ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीची सुरुवात गणेशाला वंदन करून झाली. म्हणजे, तेथवर गणपती देशातील सर्वच मानवी समुदायांचा अधिपती बनल्याचे दिसते. अथर्वशीर्षाची रचना याच दरम्यान कधीतरी केली गेली. गणपती बसवण्याची प्रथा मात्र पेशवाईच्या आगेमागे चालू झाली असावी. महाराष्ट्रात ही प्रथा कोकणातून आली, असे विद्वत्मत आहे. तोवर गणपतीचे स्थान ग्रामदेवता ते गृहदेवता असे स्थायी स्वरूपाचे होते. यामागे गणपतीच्या मूळच्या 'विघ्नकर्ता' या आता धूसर झालेल्या वैदिक दृष्टीकोनात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अन्यथा स्थापना आणि विसर्जनाचा कार्यकारणभाव लागत नाही. म्हणजे विघ्नकर्ता म्हनूनच गणपती बसवून, त्याची पुजा करून त्याने विघ्न आणू नये म्हणून यथासांग पुजा करुन नंतर विसर्जित करण्याची प्रथा विनायकाला आवाहन करुन, विघ्ने आणू नयेत म्हणून हवि देत मुंजवत पर्वतावर निघून जा या विनवण्या आणि गणपतीचे विसर्जन यात मुळचा अस्पष्ट धागा असावा असे मानायला पुष्कळ वाव आहे.अन्य समाज गणपती बसवत नसत.

पेशव्यांच्या काळात भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून दशमीपर्यंत गणेशोत्सव साजरा केला जात असे. त्याचे स्वरूप धार्मिक असून, त्यात मुख्यत: कथा-कीर्तनादी कार्यक्रम केले जात. सवाई माधवरावांच्या वेळी हा उत्सव शनिवारवाड्यातील गणेशमहालात खूपच भव्य स्वरूपात होऊ लागला. त्याकाळी दशमीला फुलांनी सजविलेल्या पालखीतून गणेशमूर्तीची वाजत-गाजत मिरवणूक काढून तिचे नदीत विसर्जन केले जाई. पेशव्यांप्रमाणेच पटवर्धन, दीक्षित, मुजुमदार, इत्यादी सरदार घराण्यांमध्येही गणेशोत्सव साजरा केला जात असे. त्यात कीर्तन, प्रवचन, मंत्रजागर, गायन वगैरे कार्यक्रम होत. सवाई माधवरावांच्या वेळी हा उत्सव शनिवारवाड्यातील गणेशमहालात खूपच भव्य स्वरूपात होऊ लागला. त्याकाळी दशमीला फुलांनी सजविलेल्या पालखीतून गणेशमूर्तीची वाजत-गाजत मिरवणूक काढून तिचे नदीत विसर्जन केले जाई.

भाऊसाहेब रंगारी, गणपतराव घोटवडेकर व नानासाहेब खाजगीवाले यांनी पुण्यात प्रथम सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. त्याला १८९३ सालच्या हिंदू-मुस्लिम दंगलीची पार्श्वभूमी होती. अनंतचतुर्दशीच्या दिवशी सार्वजनिक मिरवणुकीतून विसर्जन करण्याची प्रथाही त्याच वर्षी सुरु झाली. लो. टिळकांना ही कल्पना आवडली व त्यांनी 'केसरी'त अग्रलेख लिहून या उपक्रमाचे कौतुक केले. त्यामुळे १८९४ मध्ये अनेक ठिकाणी सार्वजनिक गणपतीची स्थापना होवू लागली. स्वत: टिळकांनीही विंचुरकर वाड्यात सार्वजनिक गणपती बसवला. अशा रितीने सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली.

सिंधु काळात विनायक गणांचा अधिपती म्हणून पूजला जाणारा गणपती कालौघात विविध रुपे धारण करत गेला. अवैदिकांचा गणपती वैदिकजनांनीही आपले धर्मसंस्कार करत स्वीकारला. तंत्र गणेशामुळे तर तो जगभर पसरला.  सार्वजनिक उत्सवाच्या रूपाने राष्ट्रकार्यालाही प्रेरणा देणारा ठरला. आज मात्र गणेशोत्सवाने जे रूप धारण केले आहे ते मात्र वेदनाकारक आहे. आजही गणेशोत्सव समाज-संस्कृती-विचारक्रांतीचे साधन बनू शकतो...तसे अल्प-स्वल्प प्रयत्नही होत असतात...पण ते पुरेशे आहेत असे कोण म्हणेल? 

Wednesday, September 4, 2013

साहित्यिकांसह .....


साहित्यिकांसह सामान्यांना मतदानाचा हक्क द्या

प्रतिनिधी | Sep 04, 2013, 08:01AM IST


EmailPrintComment
साहित्यिकांसह सामान्यांना मतदानाचा हक्क द्या

औरंगाबाद - साहित्य संमेलन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मूठभर लोकांचा सहभाग असतो. बारा कोटींच्या महाराष्ट्रात साहित्यिकांसह सामान्यांनाही मतदानाचा हक्क द्यायला हवा. बदल स्वीकारून मतदान ऑनलाइन घेण्यात यावे, अशी मागणी सासवड येथील 87 व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे उमेदवार संजय सोनवणी यांनी केली.

मंगळवारी शहरात आले असता त्यांनी एका खासगी हॉटेलमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, निवडणुकीची पद्धत स्वीकारली असल्याने गळा काढून काहीही होणार नाही. परंतु लोकशाहीत बदलाला नेहमी वाव असतो. प्रत्येक पद्धत परिपूर्ण असतेच असे नाही. सध्याचे युग इंटरनेट असल्याने साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडतानादेखील ऑनलाइन मतदानाची सुविधा उपलब्ध करण्यात यावी. निवड ही र्मयादित न राहता व्यापक असावी. लोकांना काय वाटते ही भावना लोकशाहीमध्ये महत्त्वाची आहे. ऑनलाइन पद्धतीसाठी येणारा खर्चदेखील कमी आहे. त्यामुळे यामध्ये बदल होणे गरजेचे असल्याचे मत सोनवणी यांनी व्यक्त केले. आपल्याकडे साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद हे मानाचे समजले जाते. मात्र ते पद मानाचे नसून कार्यकर्त्या म्हणून काम करण्यासाठी असल्याची भूमिका त्यांनी मांडली.

अभिजात दर्जासाठी जनमताच्या रेट्याची गरज
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी शासन प्रयत्न करत आहे. पण जनमतांचा रेटा वाढल्याशिवाय ही मागणी पूर्ण होणार नाही. मराठी भाषा पुरातन आणि स्वतंत्र आहे. अभिजात भाषेच्या दर्जासाठी तामिळ, मल्याळम भाषिकांप्रमाणेच मराठीप्रेमींच्या जनआंदोलनाची गरज आहे. तसेच जागतिकीकरणामुळे मराठी भाषिकांचेही सामाजिक सांस्कृतिक संदर्भ वेगाने बदलत आहेत. मराठी साहित्य या दूरगामी बदलांना कवेत घेत त्याचे आव्हान पेलण्यासाठी सज्ज राहिले तरच सध्याची सांस्कृतिक गोंधळाची अवस्था दूर होईल, असे मतही या वेळी सोनवणी यांनी व्यक्त केले.

सांस्कृतिक धोरणाची अंमलबजावणी व्हावी
राज्याचे सांस्कतिक धोरण ठरवण्यासाठी राज्याने डॉ आ. ह. साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने अनेक शिफारशी केल्या असून तो अहवाल सरकारने स्वीकारला आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी करण्याच्या दिशेने विशेष प्रयत्न झालेले नाहीत. या धोरणाची अंमलबजावणी होण्यासाठी प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे मत सोनवणी यांनी व्यक्त केले. सोनवणी गेल्या 37 वर्षांपासून साहित्य क्षेत्रात असून 24 वर्षांपासून ते प्रकाशकांचे कामदेखील करत आहेत.

http://divyamarathi.bhaskar.com/article/MAH-MAR-AUR-sahitya-sammelan-election-aurangabad-4365491-NOR.html

समजेल तुला हे प्रिये?

माझ्या हास्यातून
वेदनांचे
गडगडाट होत असतात
ढगफुट्यांचे
पेव सांडत असते
छिद्राछिद्रांतून
सारी सृष्टी
आक्रोशत असते
आपल्या अनंत नेत्रांतून...

...मी हसत असतो तेंव्हा!

मी हसत असतो तेंव्हा
पुसायचे असतात मला
तुझे अश्रू
हसायला लावायचे असते तुला
सांगत दर्दभ-या
क्षणांतील
हास्यास्पद विसंगत्या
पण हसायला लावायचे असते तुला
मी आत रडत असतांना!

तू प्लीज रडू नकोस
हे आभाळ
भरू नकोस
ओलावल्या धरतीला
उमाळे आणू नकोस...

ऐक माझे हसणे
त्यात विझव
तुझे वेदनगाणे
तुही हस
मीही हसतो...

वेदना अनंत आणि अजरामर....

समजेल तुला हे प्रिये?

Sunday, September 1, 2013

सांस्कृतिक अध:पतन; आमची जबाबदारी?

जागतिकीकरणाची सुरुवात होण्यापुर्वीचा भारत आणि नंतरचा भारत याची नुसती वरवर जरी तुलना केली तरी दोन्ही कालखंड सांस्कृतीकदृष्ट्या पुर्णतया विरोधाभासी आहेत हे सहज लक्षात येईल. १९९२ नंतर भारतीय जीवनाचे आर्थिक व सांस्कृतीक संदर्भ वेगात बदलले गेले. आता त्याची गती भोवळ आणेल एवढी वाढलेली आहे. अलीकडेच झालेली नरेंद्र दाभोळकरांची हत्या, महिला पत्रकारावरील व मतीमंद मुलींवर झालेले बलात्कार आणि आता संत म्हणवणा-या आसारामबापुला अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे केल्याबद्दल झालेली कोठडी आणि आसारामबापुच्या भक्तांनी घातलेला हैदोस आपल्या सांस्कृतीक पातळीने केवढा रसातळ गाठला आहे याचे हे विदारक चित्र आहे.

धर्म हा मानवी जीवनाला एक मानसिक आधार देणारा पुरातन काळापासुनचा अपरिहार्य घटक आहे. श्रद्धेने आपण संकटांतून तारून जावू असा विश्वास नाही अशी माणसे भुतलावर अत्यंत अल्पच असतील. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांत एक अत्यंत धुसर सीमारेषा असते हेही आपल्या सहज लक्षात येईल. असे असले तरी श्रद्धांचे अवडंबर माजवले जावू लागले कि त्या भिषण अंधश्रद्धांत बदलतात आणि तेथेच धर्म नामक संकल्पनेचे अध:पतन सुरु होते. जागतिकीकरणाच्या विज्ञाननिष्ठ काळात सहजीवनाचे, सहिष्णुतेचे आणि जातीभेदातीत जागतिक समाजाचे जे विचारवंतांचे स्वप्न होते ते इतके कोसळत गेले कि १९९२ पुर्वीचा भारत गरीब व आधुनिक तंत्रज्ञानांपासून दूर असला तरी सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने अधिक बलशाली होता असेच म्हणायची वेळ आलेली आहे. सत्तर-ऐंशीच्या दशकांत मी खेड्यातच राहिलो आहे. तेंव्हा जातीभेद असले तरी सामाजिक जीवन बव्हंशी सहिष्णुच होते. एकमेकांच्या मदतीला धावून जायची प्रवृत्ती होती. इर्जिकी होत असत. आजचे ग्रामीण वास्तव एवढे बदलले आहे कि जातीच्या कुबड्यांखेरीज उभे राहणे जवळपआस अशक्य झाले आहे. जातिसंस्था नष्ट होण्याऐवजी बळकट व अत्यंत असहिष्णू झाली आहे असे चित्र आपल्याला दिसते.

बुवा-बापू-प्रवचनकार-किर्तनकार तेंव्हा नव्हते असे नाही. परंतू त्यांना ब-याच प्रमाणात नैतिकतेची चाड होती. सामाजिक ददपणही त्याला कारणीभूत होते. अगदी शिक्षकही खरोखरच निष्ठेने आपला पेशा व त्याची प्रतिष्ठा जपत असत. परंतू आताचे वास्तव पाहिले तर बुवा-बापुंचा आध्यात्मिक धंदा पुर्णतया अर्थनिष्ठ बनलेला आहे. तो एक अवाढव्य उद्योग बनलेला आहे. आध्यात्मिकतेची जागा स्वैराचार आणि नैतिक भ्रष्टाचाराने घेतली आहे. हे धर्मसम्स्कृतीचे अध:पतन नव्हे काय? आणि याला जबाबदार कोण आहेत?

"धर्म ही अफुची गोळी आहे..." असे विधान कार्ल मार्क्सने केले होते. धर्मच नव्हे तर विज्ञान व अर्थसत्ताही जेंव्हा अफुच्या गोळ्या बनू लागत मानवी जीवनाला पुरते नशेत ढकलतात तेंव्हा नैतिकतेचे मापदंड बदलणे अपरिहार्यच होते. ज्या इश्वराने विश्व बनवले असे अध्यात्मवादी-धर्मवादी मानतात त्यालाच सोन्या-चांदीचे मुकुट-सिंहासने अर्पण करणारे, दान-देणग्या देणारे वायफळ भक्त जेंव्हा निर्माण होतात तेंव्हा श्रद्धेचेच मुलार्थ बदललेले असतात. परमेश्वरालाच भिकारी करून टाकणारी हे धर्मव्यवस्था आणि भक्ती सर्वस्वी त्याज्ज्य आहे हे अशा अगणित भक्तांच्या लक्षातही येत नाही. या देवांचे प्रतिनिधी म्हणवना-यांच्या पायी आपले शील  व संपत्ती अर्पण करु पाहणा-यांतच जेंव्हा स्पर्धा निर्माण होते तेंव्हा अशा बुवा-बापुंचे अनैतिक सआहस वाढतच जाणार व त्यातून आसारामबापुकडून घदले तसे प्रकार वाढण्याची संभावनाही बळावणार हे या अंध भक्तांच्या कधीही लक्षात येत नाही. खरे तर असे भक्त हे धर्मांचे व अध्यात्मांचे मारेकरी असतात हे लक्षात घ्यायला हवे.

आधुनिकतेच्या काळात आपला समाज नैतिक भ्रष्टाचाराने ग्रासलेला आहे असे चित्र दिसते. आपल्या संवेदनाही बोथट होत गेल्या आहेत असेही दिसते. याचे कारण म्हणजे अर्थप्राप्तीचे मार्ग नैतीक प्रेरणांनी प्रभावित नसून गैरमार्गांचाच अवलंब वाढलेला आहे. भ्रष्टाचा-यांना आणि अनीतिमानांना आता सामाजिक प्रतिष्ठा आहे. अशी अप्रतिष्ठा करुन घेतलेल्या समाजाला अधिकाधिक हाव असल्याने त्यासाठी अथवा आपले भ्रष्टाचार उघडकीस येवू नये यासाठी अशा बुवा-बापुंची व दैवतश्रद्धांची अधिकची निकड भासते. असे भक्तच मुळात अनीतिमान असल्याने त्यांचे आध्यात्मिक गुरुही त्याहुन अनैतिक असले-बनले तरी आश्चर्य वाटून घ्यायचे कारण नाही. आपल्या सामाजिक अध:पतनाचे ते एक प्रकट रुप आहे एवढेच.

अशी अध:पतने थांबवण्यासाठी जेंव्हा दाभोळकरांसारखे अविरत प्रयत्न करीत असतात त्यांची हत्या होणे अथवा हत्येच्या धमक्या मिळनेही तेवढेच क्रमप्राप्त होऊन जाते. प्रा. हरी नरकेंना व अण्णा हजारेंनाही "तुमचा दाभोळकर करून टाकू" अशा धमक्या अलीकडेच मिळालेल्या आहेत यावरून काय ते लक्षात घ्यावे. म्हणजे विचारांनाच मारून टाकायचा हा हिंसक उद्योग फोफावला आहे असे नाही काय? ज्या देशात गुन्हेगार सुरक्षित आहेत पण विचारवंत सुरक्षित नाहीत त्या देशाचे आणि त्या देशातील समाजांचे काय भवितव्य असणार आहे?

विचारांचा विरोध विचारांनी करावा असे म्हणने सोपे अहे परंतू जेंव्हा समाजातुन विचारच हद्दपार होतो तेंव्हा हत्येसारखी वरकरणी सोपी वाटनारी उत्तरे शोधली जातात. विचारकलहातुनच समाज अग्रगामी राहत असतो, प्रागतिक होत असतो आणि वारंवार स्वत:ला तपासत असतो. नवीन पुराव्यांच्या, संशोधनांच्या प्रकाशात आपली मते बदलत जात असतो. सामाजिक सुधारणा समाजस्वास्थ्यासाठी घडवून आणत असतो. परंतू आपली अवस्था वेगळीच आहे. जाती नष्ट व्हाव्यात असे म्हनणारेच स्वजातीच्या संघटना बांधतात. गतकाळातील स्वजातीय महनियाला पुढे आणीत आपसूक प्रस्थापित महनियांपेक्षा आमचीच महनिये कशी श्रेष्ठ होती याचे हिरीरीने दावे केले जातात. प्रसंगी इतिहासाची तोडमोडही केली जाते. स्वजातीय महनियांची चिकित्सा नाकारली जाते. असा समाज कधीही विवेकी आणि विज्ञाननिष्ठ होवू शकत नाही हे उघड आहे. अशा समाजअत बनतात त्या झुंडी. आज आपण अशा असंख्य झुंडींच्या विळख्यात सापडलेलो आहोत आणि त्याचे निराकरण कसे करायचे असा भयभीत प्रश्न यामुळे निर्माण होतो.

पण स्वजातशक्तीच्याच बळावर जेंव्हा न्याय्य हक्क मिळवावे लागतात आणि मिळतात असे वास्तव बनले असेल तर जातीय संघटनांना तरी कसा विरोध करायचा? मुळात आपली राजकीय व्यवस्था समतेच्या तत्वाचा सिद्धांत पाळते काय? न्याय्य प्रश्नांची उत्तरे जी व्यवस्था देत नाही त्या व्यवस्थेत द्वेषाचे आणि हिंसकतेचे स्तोम माजू लागले कि एक नवी अंधश्रद्धा तयार होवू लागते आणि तिचे निराकरंण करण्यासाठी राजकीय शक्तींनी जेवढे समानतेचे धोरण ठेवायला हवे ते ठेवले नाही कि जातीय अंधश्रद्धा फोफावणे स्वाभाविकच आहे. तिची परिणती अनेकदा हिंसकतेत झालेली आहे हे आपण आजवरच्या विविध सामाजिक प्रश्नांवरील आंदोलनांत पाहिली आहे.

आम्ही अर्थसत्ता आणन्यासाठी अविरत धडपडत आहोत. राजकीय सत्तेतील सहभागाचे महत्व आता नव-जागृत जाती-समाज घटकांना
समजू लागले आहे. आपल्याला एकुनातीलच व्यवस्थेत डावलले जात आहे याचेही भान येवू लागले आहे. ही अस्वस्थता कधी उद्रेकात बदलेल याचा नेम नाही. परंतू साकल्याने विचार करून कायदे करत बसण्यापेक्षा न्याय्य वाटपाचे तत्वच अवलंबले तर किती प्रश्न सुटतील? परंतू शक्य तेवढे दमनच करायचे, शक्य तेवढे शोषणच करायचे अशा प्रवृत्ती बळावल्या आहेत हे आपले एक दुर्दैवी वास्तव आहे.

एकुणात आपण सर्वच घटनांकडे तुकड्यातुकड्यात न पाहता त्यांचे समग्र आकलन करून घ्यायला हवे. आसाराम बापुला अटक झाली अथवा कोठल्या तरी बलात्कार घटनेतले आरोपी पकडले...त्यांना फासावर लटकवा वगैरे मागण्या करून आपली सामाजिक भुमिका व जबाबदारी पार पडत नाही हे आपल्याला लक्षात घ्यायला हवे. त्यासाठी आपणा सर्वांनाच आपली विवेकशक्ती वाढवावी लागेल. एकुणातीलच समाजाचे सामाजिक भान वाढवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. धर्म आणि निखळ धर्मश्रद्धा कोनाच्याही विरोधाचे विषय नाहीत. धर्माच्याच अंगाने पाहिले तरी या सर्वच घटना धर्मांनीच त्याज्ज्य ठरवलेल्या आहेत, अनीतिमान ठरवल्या आहेत हे धार्मिकांनीही लक्षात घ्यावे लागेल. ईश्वराचा कोणीही दूत, माध्यम अथवा प्रतिनिधी नसतो. असू शकत नाही. मनुष्य आणि परमेश्वर यांच्यात थेट संवाद असू शकतो...मध्यस्थाची गर नाही...असे मध्यस्थ हे भोंदूच असतात याचे भान धार्मिकांनी ठेवायला हवे. नैतीकतेचा उद्धार झाल्याखेरीज तुमच्या धर्माचा कसा उद्धार होवू शकतो?  

यावर प्रकट आणि खुल्या मनाने सर्वांनीच चिंतन केले पाहिजे अन्यथा आमच्याच पुढच्या पिढ्या सर्वार्थाने विनाशपथ चालतील याबाबत शंका बाळगायचे कारण नाही.

युरोपियनांचा वर्चस्ववाद, वैदिक धर्म आणि येथील वास्तव!

  प्राचीन  इराणमध्ये पारशी धर्माचे प्राबल्य वाढले. त्या धर्माने वैदिक धर्माचे आश्रयस्थान असलेल्या सरस्वती (हरह्वैती) नदीचे खोरेही व्यापल्य...