Sunday, March 25, 2018

साहसवादातून आर्थिक अडाणी निर्णय

साहसवादातून आर्थिक अडाणी निर्णय

खुली बाजारपेठ आणि जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत संपूर्ण जग असताना आपलीच बाजारपेठ संरक्षित करण्याच्या नादात ट्रम्प हे एकुणातील अर्थव्यवस्थेचे चाक उलटे फिरवत आहेत. अशामुळे व्यापारी तूट कमी होईल आणि अमेरिकी उद्योगांना संरक्षण मिळेल व उत्पादने वाढून रोजगार वाढेल हा ट्रम्प यांचा निव्वळ भ्रम आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक चिनी उत्पादनांच्या आयात शुल्कात वाढ करून जागतिक व्यापारविश्वाला जबरदस्त हादरा दिला आहे. जवळपास ६० अब्ज डॉलर्सची ही शुल्कवाढ प्रामुख्याने चीनमधून होणारी आयात रोखेल आणि अमेरिकन उत्पादनात वाढ होऊन रोजगार वाढेल असा ट्रम्प यांचा तर्क आहे. यामुळे अमेरिकी कंपन्यांना चीनमधील उत्पादक भागीदारांना करावे लागणारे तंत्रज्ञानाचेही हस्तांतर रोखले जाईल, असेही ट्रम्प यांना वाटते. खुल्या बाजारपेठेकडून संरक्षित बाजारपेठेकडे जाऊ लागलेल्या अमेरिकेवर याचे काय गंभीर परिणाम होतील, याचा ट्रम्प यांनी विचार केलेला दिसत नाही.

चीननेही प्रत्युत्तरादाखल अमेरिकेतून आयात होणाऱ्या काही उत्पादनांवर ३ अब्ज डॉलर्सनी शुल्क वाढवले आहे. चीनची प्रतिक्रिया अमेरिकेच्या दादागिरीच्या मानाने सौम्य असली तरी ज्या पद्धतीने चिनी मुत्सद्दी व्यूहरचना करीत आहेत ती पाहता हे व्यापारयुद्ध जागतिक व्यापाराला, म्हणजेच अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांना झळ पोहोचवेल या भयाने जगभरच्या शेअर बाजारांनी गटांगळी खाल्ली आहे. भारताचा जागतिक व्यापार तुलनेने नगण्य असला तरी भारताच्या आधीच नाजूक बनलेल्या अर्थव्यवस्थेला अप्रत्यक्षपणे बसणारा हादरा पेलवणे शक्य नाही हे उघड आहे. एका परीने मोदींचा नोटबंदीचा आततायी निर्णय आणि ट्रम्प यांनी सुरू केलेले व्यापारयुद्ध यात कमालीचे साम्य आहे. भलत्या साहसवादातून असे आर्थिक अडाणी निर्णय घेतले जातात आणि त्याचा विपरीत परिणाम अर्थव्यवस्थांवर होतो.

चीनच्या स्वस्त निर्यातीमुळे अमेरिकेतील साठ हजार कारखाने बंद पडले आणि जवळपास साठ लाख रोजगार गेले. चीनच्या अनैतिक व्यापार पद्धतीमुळे अमेरिकेच्या चीनशी असणाऱ्या व्यापारात ३७५ अब्ज डॉलर्सची व्यापारी तूट अमेरिकेला सहन करावी लागत आहे, असा दावा ट्रम्प यांनी ही शुल्कवाढ करताना केला. देशी उत्पादक/व्यापाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी ट्रम्प यांनी हे धोरण आखले असले तरी या धोरणाने अमेरिकेचेच नुकसान होईल, असे अर्थतज्ज्ञ म्हणू लागले आहेत. त्याला अनेक ऐतिहासिक संदर्भही आहेत. उदाहरणार्थ २००२ मध्ये अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी स्टीलच्या आयातीवरील शुल्क वाढवले होते. त्याची परिणती म्हणून जीडीपीत तीन कोटी डॉलर्सची घट तर झालीच, पण अमेरिकेतील दोन लाख रोजगार गेले. त्या वेळी जागतिक व्यापार संघटनेनेही बुश यांच्या आयात शुल्कवाढीला बेकायदा ठरवले होते. हा इतिहास असताना ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला आहे.

जागतिक व्यापारात चीन हा अमेरिकेचा बलाढ्य स्पर्धक बनलेला आहे. स्थानिक भागीदार घेतल्याखेरीज आणि तंत्रज्ञानाचे हस्तांतर केल्याखेरीज चीन कोणालाही चीनमध्ये प्रवेश देत नाही. यातून बौद्धिक स्वामित्व अधिकार धोक्यात येतात आणि तंत्रज्ञानाची चोरी होते, असा ट्रम्प यांचा आरोप आहे. त्यात तथ्य नाही असे नाही. चीन आणि नैतिकता यांचा परस्परसंबंध नाही. चीनचे धोरण व्यापारातही असेच विस्तारवादी राहिलेले आहे. खुद्द चिनी मेकची उत्पादने तर स्वस्त आहेतच; पण चीनमध्ये उत्पादन करणेही स्वस्त पडत असल्याने अनेक अमेरिकीच नव्हे तर अनेक देशांतील उद्योगसमूहांनी चीनमध्ये आपली उत्पादन केंद्रे वसवलेली आहेत. चीनच्या प्रगतीत या उद्योगसमूहांचा मोठा वाटा आहे. आता ट्रम्प यांच्या धोरणामुळे चीनमध्ये उत्पादन केंद्रे वसवलेल्या अमेरिकी उद्योगसमूहांतही चिंतेचे वातावरण पसरले आहे.

याचा परिणाम असा होणार आहे की अमेरिकी ग्राहकांना आजवर स्वस्तात मिळणारी चिनी उत्पादने महागात तर मिळतीलच; पण कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याने खुद्द अमेरिकेत होणाऱ्या उत्पादनांचीही किंमत वाढेल. याचे कारण म्हणजे अनेक कारखान्यांना पोलाद, अॅल्युमिनियमसारखी उत्पादने स्वत: बनवण्यापेक्षा आयात करणे परवडते. आता ते शक्य होणार नाही. या धातूंचे चीनमधून आयात स्वस्त पडते कारण चीनने या उद्योगांना स्वस्त कर्जे उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील चीनची उत्पादनक्षमताही प्रचंड वाढली आणि अन्य स्पर्धकांपेक्षा उत्पादन स्वस्त झाले. चीनने आपली ही वित्तीय धोरणे बदलावीत यासाठी भारतासहित अन्य राष्ट्रांनीही चीनवर दबाव वाढवावा, अशी अपेक्षा जगातील अनेक अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली असली तरी तसे प्रयत्न झालेले नाहीत. चीन कोणाचे ऐकेल अशी स्थिती नाही.

चीनने अमेरिकेला अजून प्रखर प्रतिक्रिया दिली नसली तरी अमेरिकी उत्पादनांना तेही याच पद्धतीने रोखू शकतील. यामुळे एकंदरीत सर्वच आंतरराष्ट्रीय व्यापारांची गणिते बदलण्याची शक्यता आहे. चीन ही अमेरिकेसाठी फार मोठी बाजारपेठ आहे. ती गमावणे अमेरिकेला परवडेल काय हा गंभीर प्रश्न यामुळे उभा राहतो. शिवाय या व्यापारयुद्धातील तणावामुळे अन्य राष्ट्रांतील उत्पादकही आपल्या किमती वाढवण्याची शक्यता अमेरिकेतील अर्थतज्ज्ञ बोलून दाखवत आहे. यामुळे महागाई कळसाला पोहोचून उलट अमेरिकन उत्पादन व रोजगारात घटच होण्याची शक्यता आहे. या निर्णयाचा परिणाम एकट्या चीन व अमेरिकेवरच होणार नसून त्याचे जागतिक व्यापारावरच परिणाम होणार असल्याने ट्रम्प यांचा हा निर्णय आत्मघातकी आहे आणि तो अमेरिकेवरच उलटेल, असे तज्ज्ञांना वाटते.

भारताची अमेरिकेला होणारी निर्यात नगण्य आहे. किंबहुना अमेरिकेला निर्यात करणाऱ्या देशांत भारताचे स्थान नववे आहे. त्यामुळे भारताला या व्यापारयुद्धाचा प्रत्यक्ष परिणाम विशेष भोगावा लागणार नसला तरी आंतरराष्ट्रीय जागतिक व्यापाराचा समतोल ढासळल्यामुळे अप्रत्यक्षपणे ती झळ भारताला बसणारच आहे. भारताची आधीच नाजूक बनलेली अर्थव्यवस्था ही झळ सहन करू शकेल काय, हा प्रश्नच आहे. अमेरिकी कंपन्यांसाठी चीनला पर्यायी उत्पादक राष्ट्र म्हणून उभे करण्याची धोरणात्मक आखणी भारताने केलेलीच नसल्याने या स्थितीचा जो फायदा घेता येणे शक्य होते तशीही स्थिती नाही. अमेरिकेत बेरोजगारी वाढणे याचा अर्थ रोजगारासाठी, विशेषत: आयटी क्षेत्रात, अमेरिकेत गेलेल्या मंडळींवरही बेरोजगारीचे संकट आहेच. तुलनेने अत्यंत अल्प असली तरी भारतात येणाऱ्या अमेरिकी गुंतवणुकीतही घट होण्याची शक्यता स्पष्ट दिसत असताना भारताला या व्यापारयुद्धापासुन सुरक्षित बचाव करणे अवघड जाणार आहे.

खुली बाजारपेठ आणि जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत संपूर्ण जग असताना आपलीच बाजारपेठ संरक्षित करण्याच्या नादात ट्रम्प हे एकुणातील अर्थव्यवस्थेचे चाक उलटे फिरवत आहेत. अशामुळे व्यापारी तूट कमी होईल आणि अमेरिकी उद्योगांना संरक्षण मिळेल व उत्पादने वाढून रोजगार वाढेल हा ट्रम्प यांचा निव्वळ भ्रम आहे. ऐतिहासिकदृष्ट्याही अशी राष्ट्रवादी संरक्षणात्मक धोरणे यशस्वी ठरलेली नाहीत. अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राने असे संरक्षणात्मक धोरण अंगीकारले की अन्य राष्ट्रांनाही त्याचे अनुकरण करणे भाग पडेल आणि मग त्यांना रोखण्याचा कसलाही नैतिक अधिकार अमेरिकेला राहणार नाही. एकुणातच जागतिक व्यापारयुद्ध होईल आणि त्याचे विपरीत परिणाम जागतिक अर्थसंरचनेवर होतील, असे सध्याचे तरी चित्र आहे.

चीनच्या व्यापार व अन्य विस्तारवादाला रोखायचेच असेल तर अमेरिकन अर्थ व सामरिक धोरणांतच सुधारणांना खूप वाव आहे. उत्पादक श्रमिकांसह कच्चा माल जेथून स्वस्तात मिळेल तेथूनच घ्यायचा प्रयत्न करणार हे उघड आहे. ग्राहकही तोच नियम पाळतात. भारतातही चिनी मालाचा सुळसुळाट झाला आहे याचे कारण तेथील उत्पादने स्वस्त तर आहेतच; पण ते मार्केटिंगही कुशलतेने करतात. भारतासमोर चिनी मालावर बंदी घालणे वा आयात कर वाढवणे हा पर्याय नसतो तर येथीलच श्रम-कौशल्य शक्ती अधिकाधिक क्षमतेने वापरत तुल्यबळ स्वस्त व दर्जेदार उत्पादने देणे हा पर्याय असतो. चीनलाही आता हे “अतिउत्पादन-स्वस्त उत्पादन’ हे धोरण आखडते घ्यावे लागेल; अन्यथा त्यांचीही अर्थव्यवस्था स्वत:च्याच ओझ्याखाली कोलमडून पडेल. व्यापारयुद्धात केवळ उभयपक्षांची अर्थहानी होण्यापलीकडे काही साध्य होणार नसते. ट्रम्प यांनी घेतलेला, वरकरणी सोपे उत्तर वाटणारा, आत्मघातकी निर्णय धोकादायक ठरतो तो यामुळेच!

(Published in Divya Marathi) 

Monday, March 19, 2018

आर्यवाद, बहुजनीय चळवळीची फलिते आणि महाराष्ट्र


(महाराष्ट्र प्रबोधिनी आयोजित राज्यस्तरीय महाराष्ट्र इतिहास परिषदेत मांडलेले विचार.)

मिथक निर्मिती आणि तिचा वापर भारतीयच करतात असे नाही. युरोपनेही प्रबोधन काळत एक वंशवादी मिथक बनवले. ते म्हणजे आर्य मिथक. आणि ते का निर्माण केले तर केवळ युरोपियनांचा तुलनेने अर्वाचीन असलेला इतिहास पार मागे नेण्यासाठी आणि आम्ही संस्कृतीचे निर्माते आहोत हे जगावर बजावण्यासाठी! या कार्यासाठी युरोपियन विद्वानांच्या पिढ्यामागून पिढ्या खपल्या. आर्य सिद्धांत वांशिक आधारावर नसला तरी भाषिक आधारावर जीवंत ठेवलेला आहे तो आहेच. या वंशिक आणि श्रेष्ठतावादात भारतातीलही तथाकथित "आर्य" अतिउत्साहाने उतरले होते आणि त्या वैदिक आर्यांचे मूळ पार आर्क्टिक प्रदेशात शोधू लागले होते. त्यातुनच मग द्रविड वंश/भाषा गट आणि मुलनिवासी हे नवी मिथके जन्माला घातली गेली. हेतू अर्थात एकच....श्रेष्ठत्वतावाद आणि वर्चस्ववाद! 

प्रबोधनकाळाने जगाला अद्वितीय गोष्टी दिल्या. ज्ञान, विज्ञान व अभिव्यक्तीची क्षितीजे अमर्याद विस्तारली पण याच काळाला एक काळीकुट्ट किनार आहे व ती म्हणजे आर्यवंश श्रेष्ठत्वता वादाचा जन्म. हितलरने याच सिद्धांताचा गैरफायदा घेत लक्षावधी ज्युंची कत्तल केल्यानंतर हाच वाद नव्या नांवाने आणला गेला व तो म्हणजे पुरा-इंडो-युरोपियन भाषा बोलणा-यांचा गट व त्यांची विस्थापने. केवळ नांव बदलले तरी अर्थ तोच राहिला. 

याचे कारण म्हणजे युरोपियनांना सेमेटिक वंश गटाशीची सांस्कृतीक मुळे तोडायची होती. जर्मनांना जर्मनांच्या सांस्कृतीक एकीकरणासाठी "जर्मननेस" शोधायची गरज होती. डॆव्हीड ह्युमसारख्या अठराव्या शतकातील श्रेष्ठ तत्वज्ञाने "गोरेतर सारेच हीण आहेत" असे स्पष्ट प्रतिपादित केले. काहींची मजल तर काळे हे युरोपियन व एप्सच्या संकरातून निर्माण झालेले निर्बुद्ध आहेत अशी मांडणी करण्यापर्यंत मजल गाठली. यात सेमिटिक नाळ तोडण्याचे प्रयत्न सुरु होतेच. भारत हीच आर्यांची मुळभुमी आहे असे मानण्याकडे या काळात कल होता. त्यासाठी व्होल्तेयरसारख्या तत्ववेत्त्याने तर चक्क भारतीय ब्रह्म आणि अब्राहमात साधर्म्य शोधत बाप्पा अब्राहम हा भारतीय होता अशी मांडणी केली. (वर्तक अथवा ओक भारतातच नसतात!)  रेनान या फ्रेंच विद्वानाने येशु ख्रिस्त हा सेमिटिक नव्हे तर "आर्य" होता असे प्रतिपादित केले. थोडक्यात एनकेनप्रकारेन युरोपातील धर्म-संस्कृतीचे मुळ मुळात सेमिटिक नाही हे त्यांना सिद्ध करायचे होते व आर्य सिद्धांत त्यासाठी आणला गेला. 

पण पुढे भारत ही आर्यांची मुळभुमी हे अमान्य करण्याची लाट आली. याला कारण ठरला आर्य संकल्पनेला वंश सिद्धांताची जोड देणारा म्यक्समुल्लर. त्याने कलकत्त्यातील रिक्षा ओढणारे आणि बंडातील शिपाई हे आर्य कसे असु शकतील असा प्रश्न उपस्थित केला. युरोपियन विद्वानांनी लगेच आर्यांचे मुळस्थान युरेशियात शोधायची मोहिम सुरु केली. हिटलरनंतर आर्य हाच शब्द धोकेदायक वाटु लागल्याने आर्यभाषा गट किंवा पुरा-इंडो-युरोपियन भाषा बोलणारे, त्यांचे मुलस्थान आणि त्यांची विस्थापने याकडे मांडणीची दिशा वळाली. भारतात टिळकांसारख्या विद्वानांनीही आर्यांना उत्तर ध्रुवाच्या निकट शोधले. आर्य सिद्धांतामुळे भारतातही मोठी उलथापालथ झाली. उत्तरेतील आर्य व दक्षीणेतील द्रविड अशी सरळ विभागणी होत त्याचे सांस्कृतीक व राजकीय पडसाद उमटले. प्रसंगी हिंसा तर विभाजनवादाचा डोंबही उसळला. आजही त्याचे निराकरण झाले नाही. याच सिद्धांतातुन मुलनिवासीवादही जन्माला आला. महात्मा फुलेंनी आर्यभट आद्य आक्रमक व त्यांनी बळीस्थानावर (भारतावर) आक्रमण केले अशी मांडनी करुन प्रतिक्रांतीचा पहिला धक्का दिला. 

मुळात आर्य नावाचा वंश पृथ्वीवर कधीही अस्तित्वात नव्हता. किंबहुना वंश सिद्धांतच अशास्त्रीय आहे असे जगातील सर्वच मानव आनुवांशिकी शास्त्रज्ञ मानतात. युनेस्कोने १९५२ साली जागतीक मानववंश शास्त्रज्ञांची बैठक घेऊन एक जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात पृथ्वीवरील समस्त मानवजाती ही होमो सेपियन या एकाच उत्क्रांत मानवी प्रजातीचे वंशज आहेत व जेही स्थानिक रंगादि भेद दिसतात ते पर्यावरणीय कारनांनी हे स्पष्ट केले. तरीही वंश सिद्धांत आर्य भाषागट सिद्धांताच्या माध्यमातून जीवंत ठेवला गेला तो आजतागायत. पण हा इंडो-युरोपियन भाषागट सिद्धांत हा विसाव्या शतकातील सर्वात मोठा फ़्राड आहे. भाषांच्या वितरणासाठी मानवी स्थलांतरांचीच आवश्यकता नसते तर भुशास्त्रीय कारणेही समान भाषा निर्मितीचे कारण असू शकतात. तरीही स्टीव्ह फार्मरसारखे विद्वान आजही आर्य स्थलांतर सिद्धांताचा पाठपुरावा करीत असतात. भारतीय सांस्कृतीक/सामाजिक/राजकीय इतिहासाची मांडणीही त्याच आधारे झाली. थोडक्यात ती खोटी व दिशाभुल करणारी मांडणी झाली. 

याची मिथकीय प्रतिक्रिया म्हणजे आधी "आक्रमक आर्य" म्हणवत गौरवाने स्वत:कडे पाहणारे वैदिक लोक युरोपियनांच्या पुढे पाऊल टाकत वैदिक आर्य हे मुळचे भारतातलेच हे सांगून लागले. सिंधू संस्कृतीचे विध्वंसक वैदिक ते सिंधू संस्कृतीचे निर्माते वैदिक आर्य असे सिद्धांत भारतात हिरिरीने जन्माला घातले जाऊ लागले. आर्य भारतातुनच (हरियानातून) पश्चिमेकडे गेले व युरोपपर्यंत जात भाषा आणि संस्कृती पसरवली असे सिद्धांत मांडु लागले. आधीचा भारतातील धार्मिक श्रेष्ठत्ववाद होताच...त्याला युरोपियन सिद्धांतनाने त्यांना बळ दिले. याही मिथकाला कोणताही शास्त्रीय आधार नव्हता तर जे पुरावे आक्रमण सिद्धांतासाठी वापरले जात होते तेच पुरावे प्रसंगी तोडमोड करत अथवा त्या पुराव्यांनाच नवा अर्थ देत "भारताबाहेर" हा सिद्धांत बनवण्यात आला. 

या आर्य सिद्धांताच्या झटापटीत साहजिकच अनार्यांना हीन लेखण्याचा प्रयत्न होत होता. आर्यांनीच आपले मुळ स्थान शोधावे, आपणच सर्व संस्कृती/भाषेचे जनक आहोत हे बजावून व तेही अशास्त्रीय सिद्धांतांच्या आधारे सांगावे आणि अनार्यांनी (म्हणजेच अवैदिकांनी) गप्प बसावे असे तर होऊ शकणार नव्हते. तसे झालेही नाही. मुलनिवासी सिद्धांताचा जन्म त्यातुनच झाला.  एका मिथकातून किती मिथके निर्माण होतात त्याची ही फार छोटी झलक आहे. यात ज्ञान, विज्ञान, इतिहासाचे अन्वेषन व त्या आधारित मांडनीची आवश्यकता नसते हे उघड आहे. किंबहुना छद्म विज्ञानाचाच उद्रेक यात होत जातो. मिथके मानवी भावनांना कुरवाळण्यासाठी सहायक ठरली तरी त्यांचा अतिरेक विनाशकच असतो याचे भान मानवी समाजाला आलेले आहे असे नाही. भिमा कोरेगांव सारख्या मिथकांतून आत्मभान मिळवून देणे हा हेतू असला तरी आत्मभानाची जागा सामाजिक तिढ्याने व विद्वेषाने घेतली असल्याचे आपल्याला दिसेल. मानवी वंशाचा इतिहास अर्थातच या अभिनिवेषी मिथकांतच हरवला जाणे स्वाभाविक होते! बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षात हा वांशिक नव्हे तर धार्मिक विभेदाचा संघर्ष आहे असे लक्षात आले असले तरी त्यांनी नंतर या सिद्धांताचा पाठपुरावा केला नाही.

पण वास्तव हे आहे की वैदिक धर्म भारतात येण्यापुर्वीही सिंधु काळापासुन भारतात स्वतंत्र सुफलनविधी युक्त तंत्राधारित प्रतिमापुजकांचा शैवप्रधान धर्म होताच. त्याचे विपूल पुरावे उपलब्ध आहेत. आजही हिंदू हाच धर्म पालतात. त्यांच्या धर्माचरनावर कसलाही वैदिक प्रभाव नाही. त्यांचा धर्म जसा होता तशीच समाजव्यवस्था व राज्यव्यवस्थाही होती. विदेघ माथवाच्या नेतृत्वाखाली भारतात आलेल्या मुठभर वैदिक आश्रीतांच्या येथील व्यापक संस्कृतीचा ताबा घेणे शक्यच नव्हते. भारतात आलेल्या या वैदिकांना प्रथम सिंधु नदीकाठच्या शूद्र टोळीने आश्रय दिला. या टोळीचे उल्लेख महाभारत, विष्णुपुराण ते डायोडोरससारखा अलेक्झांडरचा इतिहासकारही करतो. पुढे वैदिकांनी एका प्रथम भेटलेल्या टोळीच्या नावावरुन समस्त भारतातील जमातींना सरसकट शूद्र संबोधले. प्रत्यक्षात भारतात त्यावेळी असंख्य टोळ्या वावरत होत्या. याचे पुरावे मनुस्मृती जशी देते तसेच अंगविज्जा हा कुशानकालीन ग्रंथही देतो. जेही वैदिक धर्माचे नव्हते त्यांना शूद्र अथवा म्लेंछ म्हणायची पद्धत वैदिकांनी रुढ केली. त्यांच्या दृष्टीने शक, हुण, कुशाणही शुद्रच होते. म्हणजेच जेही वैदिक नव्हते ते शुद्र होते. म्हणजेच शुद्रांचा धर्म वेगळा होता. तो आजही आहे. यज्ञ प्रधान वैदिक धर्म येथे काही प्रमानात धर्मांतराने पसरला. दक्षीण भारतात दुस-या शतकापर्यंत या धर्माला स्थानही नव्हते. मनुस्मृती मुळात वैदिकांच्या अंतर्गत व्यवहारांचे नियमन करण्यासाठी इसफु आठवे शतक ते इसवी सनाचे चवथे शतक या विस्तृत काळात लिहिली गेली. याच काळात असंख्य शुद्र (म्हणजे अवैदिक) राजे झाले. ही स्मृती लागु असती तर असे कसे झाले असते हा साधा प्रश्न आमच्या विद्वानांना पडला नाही. पण तरीही मनुस्मृती समस्त हिंदुंसाठी लिहिली हे अजुन एक मिथक ब्रिटिश काळात जन्माला आले आणि त्याचे बळी आधुनिक हिंदू ठरले.

वर्ण ही वैदिक धर्माची व्यवस्था. ही व्यवस्था उतरंडीची व कठोर होती. जाती या मुळच्या व्यवसायाधिष्ठीत. सैल आणि परिवर्तनीय. लोखंडाचा शोध लागत नाही तर लोहार येणार कोठुन? हाच प्रश्न सर्व जातींबाबत लागु आहे. दहाव्या शतकापर्यंत तरी जातीबदल सहज होता. तो नंतर अनेक कारणांनी कठीण झाला तरी अशक्य नव्हता. वर्ण आणि जाती यांच्यात काहीएक संबंध नसता तो जोडल्यामुळे अजुन एक गोंधळ निर्माण झाला आणि हिंदुंमध्ये नव्या न्युनगंडाची सोय लावण्यात आली. हिंदू धर्माचा जो पाया त्या समताधिष्ठित तंत्रांना बदनाम करण्यात आले. सांख्यादि तत्वज्ञानावर वैदिक कलमे करीत त्यांना हिंदुंपासुन दूर नेले. आणि हे काम वैदिक धर्मात घुसलेल्या धर्मांतरीत हिंदुंनीच केले हे अधिक वाईट झाले. हिंदुंनी या धार्मिक आक्रमनाला प्रबळ विरोध केला नाही याला हे धर्मांतरीत कारण आहेत. 

आज बहुजनवादी चळवळी अपयशी ठरत आहेत कारण त्याही मिथकांत मग्न आहेत. जातीसंस्थेचे जन्मदाते, संस्कृतची निर्मिती, भारतीय संस्कृतीचे मुलस्त्रोत वगैरे महत्वाच्या बाबीच मुळात वैदिक आर्य श्रेष्ठत्वतावादी मिथकांच्या गडद धुक्यात हरवलेल्या आहेत आणि त्यामुळे अज्ञानमुलक वादांची आपल्याकडे कमतरता नाही. खोटे भ्रम. खोटे वर्चस्ववाद आणि खोटे न्युनगंड यांचीच आपल्या समाजव्यवस्थेत चलती असल्याने चळवळी आधुनिक काळात एकाही सामाजिक समस्येचे ख-या अर्थाने निर्दालन करू शकलेल्या नाहीत. ब्राह्मण-ब्राह्मणेतर अथवा आर्य-अनार्य हा वाद नसून तो सर्वस्वी धार्मिक भेदातून निर्माण झालेला वाद आहे. वैदिकांसाठी वेदोक्त आणि हिंदुंसाठी (शुद्रांसाठी) पुराणोक्त हे धार्मिक विभाजन स्पष्ट आणि उघड आहे असे असुनही दोन धर्मांना एकच समजल्याने असंख्य सामाजिक प्रश्न निर्माण झालेले आहेत. मुळात दोन धर्म व त्यांचे सामाजिक विचार वेगळे आहेत हे समजावून घेणे ही तातडीची गरज आहे. 

आर्यवाद हा भारतीयांसाठी खरे तर वैदिक वाद आहे. तो एक स्वतंत्र धर्म आहे. हा संघर्ष वांशिक नाही आणि जातीयही नाही. वेदपुर्व कालापासून चालत आलेला हिंदू धर्म आणि वैदिक धर्म यातील हा संघर्ष आहे. आणि त्याचे निराकरण धार्मिक वास्तव समजावून घेण्यानेच होईल. वर्ण व जातींचा काहीएक संबंध नसल्याने सर्व जाती समान आहेत आणि त्यांचा समतेनेच सन्मान करणे हिंदुंसाठी आवश्यक आहे. आज बहुजनीय चळवळींना आपल्या तत्वज्ञानाचा मुळापासुनच विचार करावा लागणार आहे तो यामुळेच. 

Saturday, March 17, 2018

गुढीपाडवा....स्वातंत्र्योत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा!प्रदिर्घ काळ महाराष्ट्र व आसपासच्या राज्यांवर राज्य करणारे महाराष्ट्रातील एकमेव घराणे म्हणजे सातवाहन. आजच्या महाराष्ट्राच्या भाषा-संस्कृतीचा पाया घालणारा, तिचे वर्धन करत महाराष्ट्राची ओळख निर्माण करणारा हा राजवंश. महाराष्ट्रातील रायगड (मुळ नांव रायरी), राजमाची अशा शेकडो किल्ल्यांची मुळ उभारणी सातवाहन काळात झाली. "तिनही समुद्रांचे पाणी चाखणारे अश्व असलेले सातवाहन" अशी सार्थ बिरुदावली त्यांनी मिरवली. साडेचारशे वर्षांच्या कालावधीत शेकडो महाराष्ट्री प्राकृतातील शिलालेख, हालाच्या "गाथा सप्तशती" सारखे नितांत सुंदर काव्यसंग्रह, वररुचीच्या "प्राकृतप्रकाश" या व्याकरण ग्रंथाने माहाराष्ट्रीला समृद्धी दिली. पुर्वी रट्ठांचा समूह तो महाराष्ट्र अशी ओळख पुसून या रट्ठसमुहाला एकाच एक राजकीय पटलाखाली आणले. देशी-विदेशी व्यापारातून आर्थिक समृद्धी आणली व प्रजेला ख-या अर्थाने सुखाचे दिवस दाखवले. हालाच्या गाथांतील काव्यावरून एका आनंदी खेळकर समाजाचे दर्शन जे घडते ते त्यामुळेच.
त्यामुळे महाराष्ट्राचे संस्थापक, वर्धनकर्ते हे सातवाहन होत असे म्हणायला काहीही प्रत्यवाय नाही. संपुर्ण महाराष्ट्र आणि सातवाहनांची सत्ता असलेल्या अन्य प्रदेशांत (राज्यांत) गुढीपाडवा हा नववर्ष दिन म्हणून साजरा होतो. गौतमीपूत्र सातकर्णी या महावीराने नहपान या शक क्षत्रपावर विजय मिळवून महाराष्ट्र व आसपासचा परिसर स्वतंत्र केला तो हा स्वातंत्र्यदिन...नवीन संवत्सर सुरु करुन यादगार बनवले. आजही आपण गुढ्या उभारून हा विजयोत्सव साजरा करत असतो.
आताच्या महाराष्ट्रात उदयाला आलेले परंतु उत्तरेत गुजरात, मध्यप्रदेश ते खाली दक्षीणेत महाराष्ट्रासहित कर्नाटक, गोवा आणि आंध्रापर्यंत साडेचारशे वर्ष एवढा प्रदिर्घ काळ सत्ता गाजवणारे एकमेव घराणे झाले, ते म्हणजे सातवाहन घराणे. इसवीपुर्व २३० मद्धे हे घराणे उदयाला आले. जुन्नर ही त्यांची पहिली राजधानी होती. नंतर ती पैठण येथे नेली गेली. छिमुक सातवाहन हा या घराण्याचा संस्थापक मानला जातो. तत्कालीन काण्व राजांचा पराभव करून त्यांनी महाराष्ट्र व मध्य भारतावर आपली सत्ता कायम केली. त्याहीपुर्वी सातवाहन घराण्यातील लोक अशोकाचे मांडलिक म्हणून महाराष्ट्रावर सत्ता गाजवत असावेत असा विद्वानांचा कयास आहे. पुढे काण्व आले आणि नंतर स्वतंत्र राज्य स्थापन केली जी पुढे साडेचारशे वर्ष टिकली. भारतात एवढा प्रदिर्घ काळ सत्ता चालवणारे दुसरे घराणे झाले नाही. मध्य आणि दक्षीण भारताच्या संस्कृतीवर कधीही न पुसणारा परिणाम या घराण्याने केला.
कोण होते हे सातवाहन? पुराणांत त्यांना आंध्र असे म्हटले आहे. ते शूद्र (अवैदिक) वर्णाचे होते असाही उल्लेख पुराणे करतात. आंध्र म्हणजे ऐतरेय ब्राह्मण व महाभारतात ज्यांचा उल्लेख औंड्र असा आला आहे त्या वंशाचे. हा भारतातील पुंड्र, मुतीब, शबर ई. जमातींप्रमाणे एक अवैदिक वंश होता. हा मुळचा पशुपालक समाज. महाराष्ट्र प्राचीन काळापासुन अपवाद वगळता निमपावसाळी प्रदेश असल्याने येथे मेंढपाळी हाच मुख्य व्यवसाय होता. त्यामुळे त्याच समाजातुन राजे निर्माण होणे स्वाभाविक होते. महाभारतात औंड्रांना असूर राजा महाबळीचा पुत्र असे निर्देशिलेले आहे. औंड्र समाज हा पुंड्रांसोबत दक्षीणेत पुरातन काळापासून वावरत होता. आजचे ऒडिशा, आंध्र ही प्रदेशनामेही औंड्रांवरुनच पडलेली आहेत, यावरुन या समाजाचा व्यापक विस्तार ल्क्षात यावा. मावळालाही "आंदर मावळ" असे म्हटले जाते. "आंदर मावळ" हे नांव आंध्र अथवा औंड्र मावळवरुन बनला असावा. सातवाहनांची पहिली राजधानीही याच प्रदेशात असल्याने हा शब्दही आंध्र-औंड्र याचाच अपभ्रंश असावा असे म्हटले तर वावगे होणार नाही. सातवाहन हे सहिष्णू होते. पांचरात्र या अवैदिक संप्रदायाशी निष्ठा ठेवत त्यांनी बौद्ध लेण्यांना उदार राजाश्रय दिला तसेच अनेक यज्ञही करवून घेत वैदिकांनाही दानदक्षीणा दिल्या.
सातवाहन काळात त्यांचा व्यापार सुदूर इजिप्त, रोम, अरबस्तान ईत्यादि देशांत फैलावलेला होता. भडोच, कल्याण, चेऊल ई. पश्चिम किनारपट्टीतील बंदरांतून मोठ्या प्रमाणात आयात-निर्याती होत. यांच्याच काळात महाराष्ट्रात गिरीदुर्ग आणि लेण्यांची निर्मितीही मोठ्या प्रमाणात झाली. व्यापारासाठीचा आजही प्रसिद्ध असलेला नाणेघाट आणि त्याच घाटात असलेल्या गुंफांतील प्रदिर्घ शिलालेख आणि सातवाहनांचे प्रतिमागृह त्यांच्या वैभवाची साक्ष आहेत. केवळ हेच घराणे दक्षीणेत बळकट राहिल्याने उत्तरेत सर्वस्वी सत्ता गाजवणारे कुशाण घराणे दक्खनेत कधीच पाय रोवू शकले नाही. त्यांच्या राजकाळात साहित्य संस्कृतीने वैभवाचे टोक गाठले होते. हालाची "गाथा सप्तशती", गुणाढ्याचे "कथा सरित्सागर", वररुचीचे माहाराष्ट्री प्राकृताचे व्याकरण अशा अजरामर कृती त्यांच्याच काळात लिहिल्या गेल्या. हाल सातवाहनाच्या गाथा सप्तशतीत तत्कालीन मोकळ्या ढाकळ्या समाजाचे प्रतिबिंब पडले आहे. अनेक स्त्रीयांच्या काव्य रचना या काव्यग्रंथात सामाविष्ट केलेल्या आहेत. सातवाहन घराण्यात महिलांचे स्थान किती उच्च दर्जाचे होते हे नागणिका, बलश्री सारख्या किर्तीवंत राजनिपूण महिलांवरुनही दिसून येते.
एवढा प्रदिर्घ काळ सत्ता चालवतांना चढ-उताराचेही प्रसंगही येणे स्वाभाविक होते. गौतमीपुत्र सातकर्णी सत्तेवर आला तेंव्हा अशीच बिकट परिस्थिती होती.साडेचारशे वर्षांच्या प्रदीर्घ राजवटीत स्वाभाविकपणे चढ-उताराचेही प्रसंगही आले. नहपान हा क्षहरात घराण्यातील पश्चिमेवर राज्य करणारा एक क्षत्रप होता. मुळचे हे क्षत्रप कुशाणांचे अधिकारी, पण कुशाणांची सत्ता खिळखिळी झाल्यावर ते स्वतंत्र बनले. इ.स. ३२ मद्धे नहपान सत्तेवर आला. तो अत्यंत महत्वाकांक्षी होता. या काळातील सुंदर, चकोर वगैरे सातवाहन राजे दुर्बळ निघाले. याचा फायदा घेत त्याने सातत्याने स्वा-या करत सातवाहनांचा बहुतेक प्रदेश जिंकुन घेतला. गौतमीपुत्र सातवाहन सत्तेवर आला तेंव्हा सातारा-क-हाड एवढाच भाग त्याच्या स्वामित्वाखाली होता.
कोकण प्रदेशही नहपानाने हिरावून घेतला असल्याने तेथून चालणारा व्यापारही नहपानाच्या हाती गेला. महाराष्ट्रातील प्रजा गुलाम झाली. पराकोटीचे शोषण सुरु झाले.
परंतु गौतमीपुत्र हा अत्यंत पराक्रमी पुरुष होता. त्याने नहपानावर सलग आक्रमणे सुरू केली. जवळपास वीस वर्ष त्याने नहपानाशी संघर्ष केला. त्याला पूर्वजांनी उभारलेल्या गिरिदुर्गांचाही त्याला उपयोग झाला. त्याने शक्तीबरोबरच युक्तीचाही वापर केला. डॉ. अजय मित्र शास्त्री जैन परंपरेचा हवाला देऊन लिहितात, 'गौतमीपुत्राने शेवटी आपल्या हेरांचा वापर करुन नहपानाला विपुल दानधर्म करायला प्रोत्साहित केले व त्यामुळेच नहपानाचा विनाश करण्यात गौतमीपुत्र यशस्वी झाला ही केवळ दंतकथा मानता येत नाही.' शेवटी नाशिक जवळ अतिशय निकराचे युद्ध करुन गौतमीपुत्राने नहपानाचा समूळ पराभव केला. त्याला ठार मारले. नाशिक येथील लेण्यातील एका शिलालेखात गौतमीपुत्राबद्दक्ल अभिमानाने नोंदवले गेले... "खखरात (क्षहरात) वंस निर्वंस करस"
एका अर्थाने हा महाविजय होता. परकीय शकांच्या जवळपास तावडीत गेलेले आपले विशाल साम्राज्य गौतमीपुत्राने आपल्या नितांत पराक्रमाने परत जिंकून घेतले. पुढे दिडशे वर्ष या साम्राज्याकडे वाकड्या नजरेने पाहायचे सामर्थ्य कोणात आले नाही.
नहपानावरील हा अद्वितीय असा विजय मिळाला तो दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा होय. इसवी सनाच्या ७८ मध्ये ही क्रांती घडली. हा विजयोत्सव प्रजा गुढ्या उभारून साजरा करणे स्वाभाविक होते. तोच दिवस बनला गुढीपाडवा. अखिल दक्खनेच्या स्वातंत्र्याचा दिवस. या दिवसापासून गौतमीपुत्राने संवत्सर सुरु केले ते म्हनजे सालाहन (शालिवाहन नव्हे) शक. या विजयानंतर गौतमीपुत्राने आपले साम्राज्य एवढे बलाढ्य केले की त्याला भारतीय इतिहासात तोड नाही. 'तीन समुद्रांचे पाणी प्यायलेले घोडे ज्याच्याकडे आहेत असे ते सातवाहन' अशी सार्थ उपाधी त्यांना मिळाली.
आपल्या अनेक सणांमागे एक अद्भुत असा इतिहास दडलेला असतो. परंतू पुराणकारांनी मात्र प्रत्येक सणाचे वैदीकीकरण करण्याच्या प्रयत्नात इतिहास बाजूला ठेवून धार्मिक स्तोम तेवढे वाढवल्याचे दिसते. उदाहरणार्थ गुढीपाडव्याच्या (चैत्र शुद्ध प्रतिपदा) दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती करून कालगणनाही सुरू केली अशी कथा ब्रह्मपुराणात व व्रतराजात येते. कधी रामाचाही संबंध गुढीपाडव्याशी जोडला जातो. पण इसवी सन ७८ पासूनच शालीवाहन शकाचे पहिले वर्ष का गणले जाते यावर कोणी विचार केलेला दिसत नाही. नहपानाचा मृत्यू सन ७८ मद्धेच झाला याबाबत विद्वान इतिहासकारांनाही शंका नाही. या सणामागील मुळ उद्देश्य गौतमीपुत्र सातकर्णीने नहपान या शक (क्षत्रप) राजावर मिळवलेल्या अद्भुत विजयाचा आनंदोत्सव साजरा करणे हा आहे हे सहसा आपल्याला माहीत नसते. प्राचीन काळी अगदी एखाद्या घरातील आनंदवार्ताही घोषित करण्यासाठी गुढ्या उभारल्या जात. हा तर एक जनतेच्व्हा स्वातंत्र्योत्सव होता त्यामुळे सर्वांनीच गुढ्या उभारणे स्वाभाविक होते आणि तीच पुढे परंपरा कायम झाली.
हा धार्मिक उत्सव नसून महाराष्ट्राला स्वातंत्र्याचा मंगलदिवस आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. दुसरे महत्वाचे असे कि "शालिवाहन शक" असा मुळात शब्दच नाही. या नांवाचा कोणताही राजा होऊन गेलेला नाही. शालिवाहन हा शब्द मूळ प्राकृतातील 'सालाहन' असा आहे. प्राकृत भाषेचे संस्कृतीकरण करण्याचा अवाढव्य प्रयत्न इसवी सनाच्या दुस-या शतकात सुरू झाला. तेव्हा मूळ प्राकृत नावे, शब्द बदलण्यात आले. सातवाहनांच्या तत्कालीन शिलालेखांमध्येही "सालाहन" अशीच नोंद आहे, शालिवाहन नव्हे. परंतू संस्कृतीकरणाच्या नादात सालाहनचे "शालिवाहन" केले गेले व शालिवाहन नांवाचा कोणताही राजा झाला नसल्याने शालिवाहन शकाभोवती खोट्या कथा निर्माण करून मुळ इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला गेला ही दुर्दैवी बाब आहे.
खरे तर सातवाहनांमुळे उत्तरेकडून सतत होणा-या आक्रमणांपासून साडेचारशे वर्ष दक्षीण सुरक्षित राहिली. आपली संस्कृती भेसळीपासून सुरक्षित राहिली. शक-हुण-कुशाण अशा आक्रमकांना नर्मदेपलीकडेच ठेवण्यात यश मिळाले. गौतमीपूत्र सातकर्णीने आपल्या पराक्रमाच्या जोरावर शकांचे संकट हरण केले. नहपानासारख्या बलाढ्य शकाचा नुसता पराजयच केला नाही तर त्याला रणांगनात ठार मारून निर्वंश केले. हा आपल्या इतिहासातील पहिला स्वातंत्र्यलढा. ज्या दिवशी हा अलौकिक विजय मिळाला तो आपण गुढीपाडवा म्हनून साजरा करतो. जेथे जेथे सातवाहनांचे साम्राज्य होते बव्हंशी त्याच प्रदेशांत गुढीपाडवा साजरा केला जातो हेसुद्धा लक्षात ठेवले पाहिजे.
म्हणजे लोकांची स्मृती आपल्या एका महान सम्राटालाच दरवर्षी मानवंदना देत आलीच आहे...
पण मूळ इतिहास पुसटला गेला असतांना. त्या इतिहासाला आता जीवंत करून महाराष्ट्राच्या संस्थापकांना गुढीपाडव्याच्या निमित्ताने मानवंदना देणे आपले कर्तव्य ठरते.
दुर्दैवी भाग असा की या सणाला भलत्यांशेच जोडण्याचे काम जसे वैदिकांनी केले तसेच अलीकडे काही अतिउत्साही विद्रोही अनभ्यासी लोक या सणाचा संबंध शंभुराजांच्या हत्येशी जोडतात. ते समूळ चुकीचे आहे. अनेक संशोधक शालिवाहन शकाचे श्रेय कनिष्क वा चष्टन या कार्दमकवंशीय लहान सत्ताधाऱ्याला देण्याचा प्रयत्न करतात पण ते समूळ चुकीचे आहे. कनिष्क हा मुळात शक वंशीय नव्हता त्यामुळे तो शक संवत सुरू करण्याची शक्यता नव्हती. चष्टन हा एक सामान्य शक अधिपती होता, त्यामुळे त्याने संवत सुरू करण्याची वा उत्तर ते दक्षिणेतील लोकांनी स्वीकारण्याचीही शक्यता नव्हती. तेवढे मुळात त्याचे राज्यही नव्हते. शालिवाहन नामक कोणताही राजा भारतात कधीही झाला नसल्याने शक संवताला शालिवाहन हे काल्पनिक नांव दहाव्या-बाराव्या शतकात कधीतरी जोडले गेले हा काही विद्वानांचा दावाही निरर्थक असाच आहे. सालाहन या प्राकृत शब्दाचे कृत्रीम संस्कृतीकरण करण्याच्या नादात शालीवाहन हे रुप देऊन आणि इतिहासही भ्रष्ट करण्याच्या नादात पुराणकारांनी गौतमीपुत्राला पार अदृष्य करुन टाकले आणि या अत्यंत मंगलदायक स्वातंत्र्याच्या दिवसाला काही संबंध नसतांना ब्रह्मादेवाशी, तर कधी रामाशी भिडवून सोडले. प्राचीन इतिहासाचे हे वैदिक विकृतीकरण जेवढे निषेधार्ह आहे तेवढेच विकृतीकडे झुकलेल्या विद्रोह्यांचे वर्तनही निषेधार्ह आहे.
गुढीपाडव्याच्या, आपल्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धातील जयाच्या अनंत शुभेच्छा!

Monday, March 12, 2018

हे परमेशा...

परमेश्वरा
तुझा घेऊन हात हाती
चालत असतो मी
वाट दिगंताची
कोसळतो मी जेंव्हा जेंव्हा
सावरतोस तू मला
आणि मी पुसतो डोळे तुझे
जेंव्हा तुझीच सृष्टी
आक्रोशत असतांना
आकांतत असतो तू...
हे परमेशा
तू माझेच प्रतिरूप आहेस!

Sunday, March 11, 2018

संस्कृत नव्हे, मराठीच अभिजात भाषा!


संस्कृत नव्हे, मराठीच अभिजात भाषा!
रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखालील अभिजात मराठी समितीने बनवलेल्या २०१३ च्या अहवालात काही त्रुटी आहेतच आणि समितीमधील काही संस्कृतनिष्ठ विद्वानांमुळे त्या निर्माण झाल्या असाव्यात, अशी शंका यायला बरीच जागा आहे. उदाहरणार्थ वि. वा. मिराशींनीच स्पष्ट केलेले असूनही नाणेघाट शिलालेखातील ‘महारठी’ हा शब्द भाषावाचक नसून पदवाचक आहे हे समितीने लक्षात घेतलेले नाही.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून गेली पाच-सहा वर्षे मराठी भाषाप्रेमी व भाषा अभ्यासक मागणी करीत आहेत. संस्कृत हीच आर्यभाषांची जननी आहे असे मानणारे काही भाषिक वर्चस्ववादी अर्थातच या मागणीला मोठी खीळ घालत आहेत. मराठीला अभिजात दर्जा मिळावा यासाठी एक कोटीच्या वर मराठी भाषकांनी समर्थन दिले आहे. तरी अभिजाततेचा दर्जा अद्याप दृष्टिपथात नाही. कोणतीही भाषा अभिजात आहे याचा अर्थ ती प्राचीन, स्वतंत्र आणि साहित्यसंपन्न असते. अभिजाततेचा दर्जा मिळणे म्हणजे भाषिक व सांस्कृतिक न्यूनगंडापासून व दुय्यमपणापासून सुटका होणे. मराठीला संस्कृतच्याच वर्चस्वतावादी मानसिकतेत ठेवण्याचे प्रयत्न नवीन नाहीत. संत एकनाथांनीही संस्कृत भाषा देवांपासून झाली, मग प्राकृत चोरांपासून झाली का, हा रोकडा प्रश्न विचारला होता. भाषिक व म्हणूनच सांस्कृतिक न्यूनगंडास दूर हटवण्यासाठी नेमका हाच प्रश्न महत्त्वाचा होता व आहे.

खरे तर मराठी अथवा महाराष्ट्री प्राकृताच्या उगमाबद्दल अनेक विद्वानांनी चर्चा केलेली आहे. जे. ब्लॉख यांनी १९१४ साली लिहिलेल्या “फॉर्मेशन ऑफ मराठी लँग्वेज’ या पुस्तकात फार महत्त्वाची निरीक्षणे नोंदवलेली आहेत. थोडक्यात ती अशी : ऋग्वेदाच्या प्राचीन संपादकांनी अन्य बोलीभाषांना आत्मसात करत अथवा त्यापासून उधारी करत ऋग्वेदाची वैशिष्ट्यपूर्ण भाषा घडवली आहे. (पृ.२) मराठी ही सरळ महाराष्ट्री प्राकृताशी नाते सांगते. अन्य प्राकृत भाषांचा प्रभाव नगण्य आहे. मराठीचे ध्वनिशास्त्र गुंतागुंतीचे व अन्य आर्यभाषांपेक्षा स्वतंत्र आहे. (पृ ४५), अनेक प्राकृत घाट संस्कृतात घुसले आहेत. संस्कृत ही स्वतंत्र भाषा नसून मिश्र भाषा आहे. (पृ. ४८) हेमचंद्र ज्यांना अपभ्रंश भाषा म्हणतो त्या भाषांचा मराठीशी काहीही संबंध नाही तर मराठीचा संबंध थेट प्राचीन प्राकृताशीच आहे. (पृ. ३०-३१) प्राकृत म्हणजेच महाराष्ट्री प्राकृत. शौरसेनी, मागधी, अर्धमागधी वगैरे अन्य प्राकृत भाषा दुय्यम आहेत. मराठीचा पाया स्थानिक वैशिष्ट्यपूर्ण प्राचीन बोलींचा आहे जो अन्य भाषांत समांतरपणे आढळत नाही. (पृ.३२) सातवाहन काळात स्थानिक प्राकृत राजभाषा व साहित्यभाषा बनली व तिला वैभव आले. भारतातील कोणतीही भाषा कोणावर लादली गेल्याचे भाषाशास्त्रीय उदाहरण मिळत नाही. (पृ. ४४). मी येथे ब्लॉख यांनी दिलेली अत्यंत थोडकी उदाहरणे घेतली आहेत, पण ती मराठी भाषेच्या स्वतंत्र वास्तवावर प्रकाश टाकण्यास पुरेशी आहेत.

खुद्द ऋग्वेदात अनेक प्राकृत प्रयोग आलेले आहेत. किंबहुना प्राकृत आणि अवेस्तन शब्दांचेच सुलभ ध्वनीबदल करीत वैदिक संस्कृत व नंतरचे संस्कृत बनले आहे. अहुरऐवजी असुर, मिथ्रऐवजी मित्र अशी अवेस्तन शब्दांचे ध्वनीबदल केल्याची असंख्य उदाहरणे देता येतील. इंद्रऐवजी इंद, वृंद ऐवजी वुंद असे मूळचे प्राकृत प्रयोग ऋग्वेदात जसेच्या तसेच राहिलेले आहेत. व्याकरणाचा पायाही प्राकृतच असल्याचे अनेक उदाहरणांवरून आढळून येते. उदा. देवास:, सत्यास: ऐवजी देवा:, सत्या: इ. खरे तर ऋग्वेदाची भाषा अवेस्तन (प्राचीन पर्शियन) आणि भारतातील स्थानिक प्राकृत यांचे मिश्रण आहे. एवढेच नव्हे तर ऋग्वेदातील ६% शब्द द्रविड व मुंड भाषेतून वैदिक संस्कृतात उधार घेतलेले आहेत. “भाषेचं मूळ’ या माझ्या पुस्तकात मी संस्कृत भाषा इसपू पहिले शतक ते इसवी सनाचे दुसरे शतक या काळात कशी क्रमश: विकसित होत गेली हे ग्रांथिक, शिलालेखीय व नाणकशास्त्रीय पुराव्यांवरून साधार दाखवले आहे. त्या दृष्टीने संस्कृत हीच आधुनिक भाषा ठरत असून प्राचीन प्राकृत भाषांवर संस्कार करत ही नवी भाषा बनवलेली आहे. परंतु ती आधुनिक असूनही तिला अभिजात दर्जा आणि ज्यापासून ती बनली त्या महाराष्ट्री प्राकृताला व त्या भाषेची थेट वंशज असलेल्या मराठीला मात्र अभिजात दर्जा नाकारणे हे कर्मदरिद्रीपणाचेच नव्हे तर भाषाशास्त्रीय दृष्टिकोनही नसल्याचे निदर्शक आहे.

त्यामुळे संस्कृत भाषा अपभ्रंश स्वरूपात येऊन प्राकृत (पाअड) भाषा बनल्या हे इंडो-युरोपीय भाषा सिद्धांत मांडणाऱ्या या पाश्चात्त्य व एतद्देशीय संस्कृतनिष्ठ विद्वानांचे मत टिकत नाही. उलट मूळ प्राकृत शब्दांचेच उच्चारसुलभीकरण करीत संस्कृत विकसित होत गेली हे बुद्धिस्ट हायब्रीड संस्कृत ग्रंथ, शिलालेखीय ते नाण्यांवरील भाषेतून सिद्ध होते. महाराष्ट्री प्राकृतात हालाचा ‘गाथा सतसई’ हा अनमोल काव्यसंग्रह जसा उपलब्ध आहे तसेच ‘अंगविज्जा’ हा तत्कालीन समाजजीवनावर प्रकाश टाकणारा इसवी सनाच्या पहिल्या शतकातील गद्य ग्रंथही उपलब्ध आहे. या भाषेतील शब्द व व्याकरण पूर्णतया स्वतंत्र असून ते संस्कृताचे रूपांतरण नव्हे. समजा तसे असते तर या प्राकृत शब्दांआधीचा त्यांच्या मूळ संस्कृत स्वरूपाचा लिखित अथवा शिलालेखीय पुरावा अस्तित्वात असला असता. पण अगदी वैदिक धर्माचे आश्रयदाते असलेल्या शुंग कालातील शिलालेखही स्वच्छ प्राकृतात आहेत. ‘गाथा सप्तशती’चे संपादक स. आ. जोगळेकरांनाही सातवाहनांनी केलेल्या यज्ञांचे वर्णन प्राकृतात कसे, हा प्रश्न पडला होता व त्यांनी या ग्रंथाच्या प्रस्तावनेत तो नमूदही केला. शुंगांच्याही अश्वमेध यज्ञाचे वर्णन प्राकृतात आहे. मुळात जी भाषाच अस्तित्वात नव्हती त्या संस्कृत भाषेत त्यांचे वर्णन कसे करणार? आणि मग संस्कृत शब्दांचे अपभ्रंश म्हणजे प्राकृत असा अर्थ पुराव्यांच्या अभावात कसा काढता येईल? संस्कृत भाषा व तिचे पाणिनीकृत व्याकरण गुप्तकाळात सिद्ध झाले. तिसऱ्या शतकानंतर मात्र आधी द्वैभाषिक (प्राकृत लेख व त्याचा संस्कृतमधील अनुवाद) व नंतर संस्कृत शिलालेख/ताम्रपटांचा विस्फोट झालेला दिसतो हे येथे लक्षात घ्यायला पाहिजे. असंख्य प्राकृत ग्रंथांची भाषांतरे अथवा छाया याच काळात झाल्या. गुणाढ्याच्या ‘बृहत्कथे’चेच काय पण “प्राकृतप्रकाश” या वररुचिकृत प्राकृत व्याकरणाचेही संस्कृत अनुवाद झाले. याचे कारण संस्कृत ही ग्रंथव्यवहाराची मुख्य भाषा बनली. असे असले तरी प्राकृतातही समांतरपणे ग्रंथनिर्मिती होतच राहिली, त्यामुळे प्राकृत व्याकरणाचाही अभ्यास गरजेचा बनला.

रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखालील अभिजात मराठी समितीने बनवलेल्या २०१३ च्या अहवालात काही त्रुटी आहेतच आणि समितीमधील काही संस्कृतनिष्ठ विद्वानांमुळे त्या निर्माण झाल्या असाव्यात, अशी शंका यायला बरीच जागा आहे. उदाहरणार्थ वि. वा. मिराशींनीच स्पष्ट केलेले असूनही नाणेघाट शिलालेखातील ‘महारठी’ हा शब्द भाषावाचक नसून पदवाचक आहे हे समितीने लक्षात घेतलेले नाही. या अहवालात आधी संस्कृत शब्द व नंतर त्यांची प्राकृत रूपे दिल्याने मराठी ही संस्कृतोद्भवच आहे की काय, अशी शंका निर्माण होते. मुळात जुन्या काळातील संस्कृत हीच आद्य भाषा या समजाखाली असलेल्या विद्वानांचेच लेखन संदर्भ म्हणून वापरल्याने व अन्य उपलब्ध पुराव्यांकडे पठारे समितीतील संस्कृतनिष्ठांनी दुर्लक्ष केल्याने अशा अनेक त्रुटी निर्माण झाल्याचे दिसते. संस्कृत ही अतिप्राचीन भाषा हा समज बाळगणे काहींसाठी सोयीचे असले तरी तसे प्रत्यक्ष पुरावेच उपलब्ध नाहीत आणि स्वसंतुष्टीकरण करणारे (गैर)समज म्हणजे पुरावे नव्हेत, याचे भान ठेवले गेलेले नाही.

पाअ पडिस्स (पाया पडतो), दिअर (दीर, हिंदीत देवर), खखरात वंस निर्वंस करस (क्षहरात वंश निर्वंश केला) असे असंख्य प्राचीन प्राकृत भाषाप्रयोग व शब्द आजतागायत नैसर्गिक ध्वनीबदल स्वीकारत पण अर्थ तोच ठेवत चालत आले आहेत. यातील एकही शब्द मूळ संस्कृतमधील नाही तर असे अनेक शब्द संस्कृतनेच ध्वनीबदल करत उधार घेतल्याचे दिसते. महाराष्ट्री प्राकृताचा प्रभाव आजच्याही भाषेवर प्रामुख्याने असून याच (व अन्य प्राकृत/द्रविड) भाषेतून संस्कृतची निर्मिती झाली असल्याने प्राकृत भाषाच संयुक्तरीत्या संस्कृतच्या जनक ठरतात. संस्कृतची निर्मिती ग्रांथिक कारणासाठी झाल्याने संस्कृत भाषेत कालौघातील अपरिहार्य असलेले कसलेही बदल दिसत नाहीत. महाराष्ट्री प्राकृत ते आजचे प्राकृत हा प्रवाहीपणा ठेवला असल्याने मराठी भाषाच तामिळप्रमाणे भारतातील खऱ्या अर्थाने अभिजात भाषा आहे, संस्कृत नव्हे, याचे भान ठेवले गेले पाहिजे. मराठी भाषकांना भाषिक व सांस्कृतिक गुलामीच्या भावनेतून बाहेर पडण्यासाठी कंबर कसावी लागेल.

(Published in Divya Marathi) 

Saturday, March 10, 2018

माणसांच्या शोधात!

माफ करा
तुम्हाला खूष करता येईल
असे मी काही दिले नाही
तुमचे अहंकार आणि
क्षणप्रेरीत आकांक्षा
यांना खोटे स्वप्नपंख
देता येतील असेही
माझ्याकडे काही नाही...
स्वप्नभूल मला कधी
उमगलीच नाही....
जे माझ्याकडे आहे
ते बस माणसांसाठी होते
जे बोलत गेलो
त्याकडे तुम्ही
अक्षय्य बरळणे समजत
दुर्लक्ष केले तरी हरकत नाही!
मी आपला आहेच
माणसांच्या शोधात!

Tuesday, March 6, 2018

स्वातंत्र्याचा उद्गार....

मी आनंदी आहे
माझ्यामागे कोणतीच
संघटना नाही
मी समाधानी आहे
माझा कोणताही कंपू नाही
मला वाट नसते कधी पहायची
कोण माझ्या बचावाला येईल
आणि कोण मला बचावाला बोलावेल
मीच माझा बचावक आहे
आणि वाटते तेंव्हा न बोलवताही
जातो बिनदिक्कत कोणाच्याही बचावासाठी
माणूसकी एकाकी पडू नये म्हणून...!

मी सर्वसुखी आहे
कारण मी कोणाला शत्रू मानत नाही
आणि मित्रांकडूनही कधी अपेक्षा ठेवत नाही
म्हणून!
मी निरंतर आक्रोशणा-या आकाशात
झेपावलेला
चिरंतन पक्षी आहे
सा-या जगाची वेदना इवल्या काळजात साठवत
स्वातंत्र्याचा उद्गार
मानवजातीच्या काळजात उमटावा
म्हणून!

Monday, March 5, 2018

लेनिनचा पुतळा!

Image result for lenin statue demolished tripura

लेनिनचा पुतळा हा प्रश्न नाही. प्रश्न हा आहे की उद्या ज्यांचीही कोणाची सत्ता येईल तेही विरोधी विचारांच्या नायकांचे पुतळे असेच उध्वस्त करत जातील. (खुद्द रशियात लेनिन-स्ट्यलिन आणि इराकमध्ये सद्दामचे पुतळे उखडले गेले आहेत.) 

मुळात द्वेषाची अशी परंपरा असावी का हा खरा प्रश्न आहे आणि त्यासाठी आमच्याकडे काय उत्तर आहे? पुतळेच असू नयेत हा वेगळा युक्तिवाद झाला. पण आज जे सुपात आहेत तेही उद्या जात्यातच असनार आणि ही दीर्घद्वेषी परंपरा सुरुच राहणार ही खरी समस्या आहे. नालंदा, तक्षशिला, अलेक्झांड्रियादिंची ग्रंथालये जाळली गेली. आताही वेगळ्या पद्धतीने तेच होत आहे. 

सत्ता ही वारांगनेसारखी असते हे सत्ताधा-यांना समजते असे नाही. उद्या त्यांचेही पुतळे उखडले जातील याचे भान त्यांना असतेच असे नाही. द्वेषातून द्वेष आणि सुडातून सुडच निर्माण होतो हे इतिहासाने वारंवार सिद्ध केलेले सत्य दुर्लक्षिण्यात सत्तेचा मद नेहमीच मोठा वाटा उचलत असतो. आणि हे पुतळ्यांच्या बागा निर्माण करणा-यांच्याही लक्षात येते असे नाही. 

मुळात स्मारके/पुतळे हे कोणालाही अजरामर ठेवण्याचे, त्यांचे विचार रुजवण्याचे साधन नाही हेच आपल्याला कळालेले नाही. प्राचीेन काळात नवे धर्म स्थापन झाल्यावर जुन्या धर्मांच्या मुर्तीही उध्वस्त केल्या गेल्या आणि ते देवही विस्मरणात गेले हेही आम्हाला समजत नाही. देवांचीच ही गत तर माणसाची काय हेच माणसाला समजत नाही. समस्या येथे आहे. आणि मदांधांना आपला विनाश अशा प्रवृत्तीतून आपणच निकट ओढतो आहोत हेही समजत नाही. 

आपल्याला चिंता करायला हवी ती आपल्याला नेमके काय हवे आहे याची!

गुलामी की स्वातंत्र्य?


Image result for freedom or slavery


किमान विचारवंतांनी तरी कोणत्याही गोटात जाऊ नये. गेले तर तो गोटच त्यांच्या विचारपद्धतीवर नकळत बंधने घालतो. ही बंधने अनेकदा क्रूर असतात. त्या बंधनाबाहेर पडले की हेत्वारोप सुरु होतात. काहींना तर संपवण्यात येते. थोडक्यात विचारवंताला परतंत्र करणे हेच काम प्रत्येक गोटाचे असते (मग त्या गोटाची विचारधारा कोणतीही का असेना.) मग विचारवंतांसाठी गोट (छावण्या) की छावण्यांसाठी विचारवंत हा प्रश्न निर्माण होत अंततोगत्वा विचारवंत हा त्या छावणीचाच गुलाम बनुन जातो. तेथे विचारच संपतात हे ओघाने आलेच.
खरे तर प्रत्येकाने स्वतंत्र विचारवंत (फ्री थिंकर) रहायला हवे. कोणत्याही गोटासाठी आपली बुद्धी खर्च करण्यापेक्षा आपापल्या स्वतंत्र विचारांत वृद्धी करण्यासाठी आणि एकुणातीलच मानवजातीच्या हितासाठी ती खर्च करावी. कोणतेही "गोट" हे शेवटी आपल्यातीलच ’माणुस’ बदलला, छावनी-विचाराला छेद देऊ लागला की आपले सुळे काढून नृशंसत्व दाखवतातच. मी अशी अनेक उदाहरणे पाहिली आहेत. तरीही अशा विचारवंतांना शहाणपण येते असे नाही. या छावणीतुन त्या छावणीत जाणारे दिसतच असतात. मग "झुंडीचे गुलाम विचारवंत" असे एकुणात त्यांना स्वरुप येते आणि यात हत्या होत असेल तर ती विचारप्रक्रियेची, नव तत्वज्ञानाची. छावण्यांचे काही बिघडत नाही कारण नवनवे विचारक बकरे त्यांना लाभतच जात असतात.
छावण्यांना नवे असे काहीही नकोच असते, मग ती छावणी प्रतिगामी असो की पुरोगामी. त्यांना प्रत्येक विचार त्यांच्याच पुर्वनिर्धारीत चौकटीतच छाटुन बसवायचा असतो. त्यांना विचार हवा असतो पण त्यांच्या ठरवलेल्या तत्वज्ञानाच्या मर्यादेत. विचारवंतांना ते दास्य स्विकारावे लागते आणि हे दास्य प्रसिद्धी अथवा पैशांच्या मोहाने ज्यांना हवे आहे त्यांना मग विचारवंत कसे म्हणता येईल?
गुलामांकडून नववैचारिकता कशी अपेक्षिता येईल? आणि मग त्यांच्यामुळे कोणतीही छावणी जिंकली तरी ती स्वतंत्र समाजाची निर्मिती कशी करू शकेल? कोणत्याही छावणीला मानवतेशी फार घेणेदेणे असते असे नाही. फार तर तोंडी लावायला शोषित, वंचित, मानवता हे शब्द कामाला येतात पण त्यांचे हित हा त्यांचा अंतिम उदेश्य असतो असे दिसलेले नाही.
पण ज्याला त्याला त्याच्या छावण्या लखलाभ असे म्हणतांना किमान विचारवंतांनी तरी गोट/छावण्यांचा मोह सोडला पाहिजे आणि आपले विचार स्वतंत्र आणि दबावविरहित ठेवायला हवेत. आणि सर्व प्रकारच्या छावण्यांच्या त्यागातुनच ते होऊ शकेल. भारतीयांना नवविचारांची गरज आहे. छावण्यांच्या मोहात न पडता सर्वच क्षेत्रांत स्वतंत्र विचारांचा परिपोष कसा होईल हे पाहणे आमचे कर्तव्य आहे. छावण्या म्हणजे शेवटी रानटी झुंडीच असतात हे प्रत्येक नव-विचारकांनी लक्षात घेतले पाहिजे.
गुलामी की स्वातंत्र्य हा निर्णय त्यांनीच करायचा आहे.

Friday, March 2, 2018

शिक्षणाचे तत्वज्ञान

मुलाची शिकण्याची प्रक्रिया नेमकी काय असते हे आपण आधी समजावून घ्यायला हवे. प्रत्येक मुलाची ग्रहण क्षमता वेगळी असते हे तर आपण जाणतोच. एवढेच नव्हे तर सारख्या ग्रहणक्षमतेच्या मुलांना समान विषयांत रुची वाटेल असेही नसते. काय शिकावे वाटते याची जाणीव प्रत्येक मुलात अबोध पातळीवर वावरत असते. समाजाला भावी काळात लागणा-या मनुष्यबळाची निकड भागवण्यासाठी समाज अनेकदा आपल्या शिक्षण पद्धतीतून मुलांना विशिष्ठ साच्यातले घडवायचा प्रयत्न करतो हे आपण प्राचीन कालापासुनच्या शिक्षण पद्धतीतुनही पाहु शकतो. लष्करी प्रशिक्षण हे मुलगामी बनले होते ते त्या काळच्या युद्धखोर वातावरणांमुळे. राष्ट्रप्रेम, राज्यनिष्ठा या शिक्षणाच्या मुलभूत बाबी त्यामुळे बनल्या असल्यास नवल नाही. आजही त्याचे अस्तित्व काहे ना काही प्रमांणात आपण कायम ठेवलेले आहे. शाळांत ती सोय अल्प असली तरी काही धर्मवादी अथवा राष्ट्रवादी संघटना मुलांवर असे प्रयोग करतच असतात हेही आपण पाहतो. संघाच्या शाखा हे एक त्याचे भारतातील एक उदाहरण आहे. महाविद्यालयांतील राजकीय संघटनाही स्वानुकूल विचारसरणीचे तरुण घडवायचा प्रयत्न सातत्याने करीतच असतात. या विचारसरण्यांतील संघर्षही अधे-मधे दिसून येतो. 

एकंदरीत मुलांचा कच्चा माल म्हणून राष्ट्र व विविध विचारधारा करण्याचा प्रयत्न करीत असतात. म्हणजेच मुलांच्या नैसर्गिक आवडी-निवडींना त्यात विशेष स्थान नसून त्यांच्या नैसर्गिक गुणांना कोणत्या ना कोणत्या भावी गरजेच्या आपुर्तीसाठी विशिष्ट दिशेला नेण्यासाठी शिक्षण व्यवस्था ते समाजव्यवस्था प्रयत्न करीत असते. यात समाजाचा स्वार्थ निहित असतो हे ओघाने आलेच. शिवाय या समाज-गरजेतुनच रोजगारही निर्माण होणार असल्याने इच्छाधारित शिक्षण नव्हे तर गरजाधारित शिक्षण हे केंद्रीभूत होणे मग अपरिहार्य ठरते. त्यामुळे "भविष्यातील समाजाच्या गरजांची आपूर्ती करण्यासाठी शिक्षण" अशी शिक्षणाची एक व्याख्या नकळतपणे बनून जाते. या गरजापोटींच्या शिक्षणामुळे विद्यार्थ्यांतच एक स्पर्धा लागून जाते आणि ती स्पर्धा नैसर्गिकच राहील याची मात्र खात्री देता येत नाही. 

विद्यार्थ्यांना नैतिक शिक्षण महत्वाचे हे मानण्याचा काळ प्लेटोपासुनच सुरु होतो. पण नीति म्हणजे काय यावर अजवर एवढी चर्चा होऊनही नैतिक प्रश्न व त्यांचे निर्वाह होण्याची सोय अद्याप लागलेली नाही. किंबहुना नीतिनेच मुलांचे मानसीक बळ वाढेल असे मानले जात होते. प्लेटो म्हणत असे की ज्ञान हे उपजत असते आणि अनुभव आणि समजेच्या वाढीबरोबर ते अधिकाधिक प्रकट होऊ लागते. नंतर शैक्षणिक मानसशास्त्रात बरेच काम झाले असले तरी शिक्षण हे वर्तन, समज, समस्यांची उकल करण्यातील प्राविण्य, स्मृती आणि प्रेरणा इत्यादि बाबींभोवतीच घुटमळत राहिल्याचे आपल्या लक्षात येईल. मुलात या सर्वाचा उद्देश एवढाच की अधिकाधिक सुयोग्य नागरिक (समाजाच्या गरजेप्रमाणे) घडवता येतील अशी व्यवस्था निर्माण करणे व शिक्षणपद्धतीत तसा बदल घडवून आणने. कमजोर विद्यार्थ्यांनाही सक्षम कसे बनवता येईल याचाही विचार यात अद्याहृत आहे. 

एकंदरीत आपण आजचा शिक्षण विचार पाहिला तर आपल्या लक्षात येईल की मुलांना स्वत: जगण्यासाठी, समाजाची गरजही भागवण्यासाठी आणि समाजालाही सुरक्षित ठेवण्यासाठी शिक्षणाची रचना केली जाते. हे योग्य आहे काय याबद्दल मला शंका आहे. कारण यात मुलांचे नैसर्गिक कल व त्यांना हवे असनारे शिक्षण मात्र दुर्लक्षित राहते. शिवाय कोनते शिक्षण भविष्यात समाजाची गरज भागवू शकेल आणि कोणते कालबाह्य होईल याचा आगावू आदमास लावता आलेला असतोच असे नाही. त्यामुळे बरेच शिक्षण वाया गेलेले असते. अभ्यासक्रमातून शिकावे लागणारे अनेक विषय विद्यार्थ्याला खरेच उपयुक्त आहेत की तो किती बौद्धिक ओझे वाहू शकतो याची चाचपणी करण्यासाठी आहेत याचे उत्तर शिकवणा-यांकडेही असतातच असे नाही. किंबहुना नसतातच. उपयुक्ततावाद शिक्षणात अनाठायी आहे हे मान्य केले तरी मुलाला काय हवे आहे याची तपासनी न करता त्याच्यावर अनेक व तेही आम्हाला ते आवश्यक वाटतात म्हणून, विषय लादणे हे ज्ञानार्जनाच्या प्रक्रियेत अडथळा ठरू शकतात हे उघड आहे. 

शिक्षणाचा उद्देश माहिती गोळा करने हा आहे की ज्ञान मिळवणे हा आहे याचे उत्तर "ज्ञान" असे दिले जाते. पण भारतातील शिक्षणपद्धतीत मुळात ज्ञान म्हणजे नेमके काय आणि ते कसे मिळवले जाते आणि त्यातून अधिक प्रगल्भ ज्ञानाची निर्मिती करावी लागते हेच शिकवण्याचा पुरेपूर अभाव आहे असे आपल्या लक्षात येईल. शिक्षणाचे मानसशास्त्र जसे आहे त्यापेक्षा शिक्षणाचे तत्वज्ञान महत्वाचे आहे. आमच्याकडे असे काही तत्वज्ञान कधीही अस्तित्वात नव्हते. आताही ते तयार करण्याची गरज आहे याची जानीव आमच्या शिक्षण धुरीणांना आहे असे दिसत नाही. आम्ही आमच्या शिक्षण पद्धतीतून मुलांच्या स्मरणशक्तीचीच काय ती चाचणी घेत आहोत, आकलन व अभिव्यक्तीची नाही ही बाब माझ्या मते चिंता करावी अशीच आहे. आकलन समृद्धता वाढेल, आकलित ज्ञान/माहितीचे स्वतंत्र प्रकटीकरण होईल अशी संधी आम्ही नाकारतो. पाश्चात्य शिक्षण पद्धतीही या बाबतीत परिपुर्ण आहेत असा दावा करता येत नाही. पण शिक्षण पद्धतीचा उद्देश मात्र बदलण्याची गरज आहे यावर किमान एकमत व्हायला हरकत नाही.

समाजाच्या भावी गरजांचा विचार समाज नेहमी स्वार्थीपनातून करीत असतो. सरकारे त्याच दृष्टीने आपल्याला हवे तशा विचारांचे नागरिक घडवायचा प्रयत्न करीत असतात. म्हणजेच आम्ही मुलांचा मेंदू आम्हाला हवा तसा घडवत नेण्याच्या प्रयत्नात असतो. पण त्यातही हवे तेवढे यश लाभत नाही हे आपण पाहतोच. कारण विद्यार्थ्याचे शिक्षण फक्त शाळा-महाविद्यालयांत होत नसून भवतालच्या व्यवस्थेतुनही होत असते. या दोन पद्धतींत सुसंगती नसते आणि त्यामुळे मुले आपापले मार्ग या प्रभावांच्या रेट्यात कोणत्या ना कोणत्या बाजुला झुकत चालत जातात आणि या झुकण्यातही प्रत्येक मुल हे स्वतंत्र व्यक्तित्व असल्यामुळे एकवाक्यता नसते. 

पण यातून राहुन जाणारी बाब म्हणजे ज्ञान. कौशल्यांबद्दल आपण कितीही चर्चा केली तरी शिकवली जाणारी कौशल्ये कालसुसंगत असतात असे नाही. त्यामुळे तीही पास होण्याच्या प्रेरणेतून शिकली गेली तरी त्यांचाहे उपयोग लगोलग समाजासाठी (आणि त्याच्या जगण्यासाठीही) होईलच असे नाही. आज आपण शिकतो ते अनुकरनाच्या प्रेरणांतून व शिकले नाही तर काळामागे जाऊ किंवा भविष्यात प्रगती नाही या भितीमुळे. शिकवले जाते ते सरधोपट. ज्ञानप्राप्तीसाठी जी जिज्ञासा लागते त्याची वृद्धी करण्याची आमच्व्ह्याकडे सोय तर नाहीच पण आहे तीही जिज्ञासा कशी मारली जाईल याचीच काटेकोर काळजी व्यवस्था घेते. यातुन ज्ञानप्रेरणा वाढणे शक्य नाही हे उघड आहे. शिवाय यात व्यक्तीस्वातंत्र्यही संकुचित केले जाते. म्हणजेच समाजाच्या (किंवा राष्ट्राच्या) भावी गरजांची पुर्ती करण्यासाठी वाढवले गेलेले मशीन असे स्वरुप मुलांना दिले जाते. ही मानवीयता आहे असे कोणीही म्हणू शकणार नाही. आपल्याला आधी शिक्षणाचे तत्वज्ञानच बनवावे लागेल व ते  मानवी प्रेरणांचे वैभव वाढवणारे असायला हवे.  

युरोपियनांचा वर्चस्ववाद, वैदिक धर्म आणि येथील वास्तव!

  प्राचीन  इराणमध्ये पारशी धर्माचे प्राबल्य वाढले. त्या धर्माने वैदिक धर्माचे आश्रयस्थान असलेल्या सरस्वती (हरह्वैती) नदीचे खोरेही व्यापल्य...