Saturday, October 12, 2019

सांस्कृतिक गोंधळ माजवणारा अशास्त्रीय लेख!

Image result for indus culture


डॉ. वसंत शिंदे यांचा 'आम्ही सिंधुपुत्रच' हा ६ ऑक्टोच्या 'संवाद' पुरवणीत प्रसिद्ध झालेला लेख वाचला. या लेखात त्यांनी दहा वर्षांच्या अभ्यासानंतर आर्य येथलेच असल्याचा पुरावा संशोधकांनी शोधून काढल्याचा दावा केला आहे. यासोबतच त्यांनी सिंधु संस्कृतीबद्दल अनेक दावे केले असून सिंधू संस्कृतीचे निर्माते वैदिक आर्यच असल्याचे सुचवण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्यक्षात सेल आणि सायन्स या प्रतिष्ठित नियतकालिकांत डॉ. वसंत शिंदे सहलेखक असलेल्या शोधनिबंधांत मात्र यापेक्षा विपरीत निष्कर्ष प्रकाशित करण्यात आलेले आहेत, जे 'आम्ही सिंधुपुत्रच' या लेखातील मतांविरुद्ध जातात. डॉ. शिंदेंसारख्या पुरातत्त्वविदाने संघीय विचारधारा पुढे नेण्यासाठी पुरातत्त्वीय संशोधनाचा गैरवापर करत सांस्कृतिक गोंधळ माजवण्याचा प्रयत्न करावा, ही दुर्दैवी बाब आहे!
डॉ. शिंदे हे मुख्य लेखक असलेल्या 'सेल'मधील प्रबंधात राखीगडी येथे केलेल्या उत्खननातील ४६०० वर्षांपूर्वीच्या एका स्त्रीच्या सांगाड्यात मिळालेल्या जनुकांवरुन काय निष्कर्ष काढण्यात आले आहेत, हे आपण पाहू या. त्यानुसार प्राचीन इराण आणि सिंधू संस्कृतीत सांस्कृतिक संबंध होता, त्यांच्यात स्टेपे प्रांतातील भटक्या पशुपालकांचा आजच्या लोकांत सापडतो तसा जनुकप्रवाह आढळून आला नाही. स्टेपेतील लोक सरासरी चार ते तीन हजार वर्षांपूर्वीच्या दरम्यानच्या काळात आधी इराण व नंतर काही भारतात विस्थापित झाले. भारतातील शेतीचा शोध त्यापूर्वीच एतद्देशियांनी स्वतंत्रपणे लावला होता. या विस्थापित लोकांबरोबरच इंडो-युरोपियन भाषाही इकडे आल्या असण्याची शक्यता आहे.
हे झाले थोडक्यात निष्कर्ष. संपूर्ण प्रबंधात 'आर्य' हा शब्द कोठेही वापरला गेलेला नाही. 'आर्य' आक्रमण झाले वा विस्थापन झाले याविषयीही अवाक्षर नाही. स्टेपेमधील भटके पशुपालक लोक इंडो-युरोपियन (अथवा संस्कृत) भाषा बोलत असाही ठाम निष्कर्ष नाही, तर ती केवळ एक शक्यता असल्याचा तर्क व्यक्त केला गेलेला आहे. आणि इंडो-युरोपियन भाषा म्हणजे फक्त संस्कृत नव्हे. ४६०० वर्षांपूर्वीच्या सांगाड्यात स्टेपे-इराणी जनुकपवाह आढळूच शकत नाही, कारण तेव्हा मुळात स्टेपेमधून कोणते स्थलांतरच झालेले नव्हते; तर ते नंतर ६००-७०० वर्षांनंतर सुरू झाले. इराणमध्ये काही काळ घालवल्यानंतर ३५०० वर्षांपूर्वी ते भारतीय उपखंडात कधीतरी प्रवेशले. तोवर सिंधू संस्कृतीचा ऱ्हास होऊन गेला होता. या स्थलांतरितांचा धर्म एक नव्हता तर इराणच्याच भूमीत साडेतीन हजार वर्षांपूर्वी एकाच वेळीस अनेक धर्मांचे अस्तित्व होते, याचे पुरावे वेद व अवेस्त्याने जपून ठेवले आहेत. त्यामुळे स्थलांतरित एकाच धर्माचे होते असाही ठाम दावा करता येत नाही. शिवाय ते विविध कालखंडात टोळ्या-टोळ्यांनी आले की एकाच वेळी कोणत्या तरी अनाकलनीय कारणाने स्थलांतरित झाले हेही निश्चित नाही. पण नंतर मात्र विशेषत: उत्तर भारतातील काही लोकांत स्टेपे व इराणमधील लोकांच्या जनुकप्रवाहाचा शिरकाव झालेला दिसतो, असे या शोधनिबंधातच म्हटले आहे.
वैदिक धर्म इराणमध्येच स्थापन झाला असला, तरी तो येथे धर्मांतराच्या मार्गाने पसरला याचे ग्रांथिक पुरावे वैदिक साहित्याने जपले असल्याने वैदिक धर्म स्थापन करणारे आर्य येथलेच हे शिंदेंचे संघप्रिय मत मान्य करता येत नाही. तरीही 'आम्ही सिंधुपुत्रच' या लेखात ते सिंधु संस्कृतीचे नामकरण चक्क 'सिंधु-सरस्वती संस्कृती' असे करतात आणि आज अफगाणिस्तानात असलेली नदी सिंधु नदीच्या खोऱ्यात आणून बसवतात! तथाकथित आर्य आक्रमण सिद्धांत बनावट होता एवढेच त्यांचे मत मान्य करता येते. आक्रमण नव्हे तर स्थलांतर झाले हे जनुकांच्या अभ्यासावरुन लिहिल्या गेलेल्या व तेच सहलेखक असलेल्या शोधनिबंधात असल्याने 'आर्य येथलेच' हा दावा ते कसे करू शकतात? शिवाय स्टेपे व इराणी जनुकप्रवाह केवळ वैदिकांमुळेच येथे आला असेही मानता येत नाही. विविध धर्मीय टोळ्या येथे इराणमार्गे शिरल्या. ही परंपरा अगदी शक-कुशाण काळापर्यंत चालू असल्याचे आपल्याला दिसते. संकर होणे स्वाभाविक आहे. स्टेपेमधील लोकांची मूळ भाषा आणि धर्म काय होते हे केवळ तर्कानेच सांगता येते, कारण जनुकांवरुन कोणाची भाषा समजत नाही.
असे असूनही 'आम्ही सिंधुपुत्रच' हा दावा केवळ सांस्कृतिक वर्चस्वतावादाचा भाग म्हणून पाहिला पाहिजे. वैदिकच सिंधू संस्कृतीचे निर्माते आहेत, हे ठरवण्याचा प्रयत्न संघनिष्ठ विद्वान गेली अनेक दशके करत आहेत. त्यात आता डॉ. शिंदेचीही भर पडावी, ही बाब भारतीय संस्कृतीच्या निकोप अभ्यासासाठी विघातक आहे, असेच म्हणावे लागेल!
-संजय सोनवणी, पुणे
https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/samwad/sanjay-sonawani/articleshow/71548776.cms

जनानखान्यांचे अद्भुत विश्व!

  जनानखाना, ज्याला अंत:पूर, राणीवसा किंवा हरम असेही म्हटले जाते त्याबाबत समाजामध्ये अनेक समजुती प्रचलित आहेत. शत्रूच्या जिंकलेल्या स्त्रीय...