खंडेरावांनी मल्हाररावांसोबत जशा स्वा-या केल्या तशाच स्वतंत्रपणेही केलेल्या आहेत हे आधी लक्षात घेतले पाहिजे. १७४३ साली सवाई जयसिंगाचा मृत्यू झाल्यानंतर वारसाचा वाद निर्माण होऊन संघर्ष पेटला होता. या वादात युद्ध अटळ बनले तेंव्हा महाराणा ईश्वरसिंगाने मल्हाररावांकडे मदत मागितली. मल्हाररावांनी खंडेरावांच्या नेतृत्वाखाली फौज देऊन त्यांना मोहिमेवर पाठवले.यावेळीस खंडेराव ऐन तारुण्यात होते. खंडेरावांनी राजमहल येथे युद्ध केले व महाराणाची मदत केली. खंडेराव बेजबाबदार असते तर मल्हाररावांनी महत्वाची मोहिम त्यांच्यावर न सोपवता आपल्या अन्य सरदारांवर सोपवली असती. उदयपुरच्या महाराणाशी झालेला खंडेरावांचा पत्रव्यवहार उपलब्ध आहे व त्यातून खंडेराव रजपुतांशी मैत्र ठेऊन होते हे जसे सिद्ध होते तशीच त्यांची राजकीय समजही.
१४ मार्च १७५१ ते एप्रिल १७५२ या काळात खंडेराव होळकर सफदरजंगाला सहाय्य करण्यासाठी बंगश व रोहिल्यंविरुद्धच्या मोहिमेत सामील झाले होते. फतेहगढ आणि फारुकाबादच्या युद्धांत बंगश व रोहिल्यांचा पराभव करण्यात आला. त्यांच्या बहुतेक मोहिमा,तुकोजीराजांप्रमानेच, मल्हाररावांसोबत झाल्याने मल्हाररावांच्या विजयांत त्यांचा सहभाग होता, परंतू त्यांचे स्वतंत्र वृत्तांत उपलब्ध नाहीत. पण महत्वाचा वृत्तांत गो. स. सरदेसाई देतात. ते आपल्या New History of the Marathas: The Expansion of Maratha Power, 1707-1772 या ग्रंथात खंडेरावास दिलेल्या स्वतंत्र व महत्वाच्या मोहिमेची माहिती देतात. सुरजमल जाटाने दिल्लीवर स्वारी करुन १० मे १७५३ रोजी दिल्ली ताब्यात घेतली. सफदरजंगाला वजीरीवरुन हटवत इंतिजामला वजीरी दिली. मीरबक्षीही बदलला. यामुळे दिल्लीचे राजकीय वातावरण पुर्ण ढवळून निघाले. यावेळीस मल्हारराव व जयाप्पा शिंदे पुण्याकडे गेलेले होते. मग २१ नोव्हेंबर १७५३ खंडेराव दिल्लीत ४००० सैन्यासह आले. खंडेरावाने जाटावर चालून जावे अशा विनवण्या पातशहाने सुरु केल्या. खंडेरावाने त्या बदल्यात आग्रा सुभा मागितला. पातशहा आग्रा गमवायला तयार नव्हता पण त्याने खंडेरावाची मनधरणी गाजीउद्दिनमार्फत सुरु ठेवली. भेटवस्तू व मानाची वस्त्रेही (खिल्लत) दिली पण ती न घेताच आपल्या छावणीत गाजीउद्दिनसह परतले.
पण, बहुदा मल्हाररावांकडून पुण्याहून सुचना आल्याने खंडेरावांनी जाटांची मोहिम हाती घेतली. भरतपुरच्या परिसरात हल्ले सुरु केले. पलवालजवळची जाट खेडी उध्वस्त करुन टाकली. फेब्रुवारी १७५४ पर्यंत खंडेराव भरतपुरचा आसपासचा परिसर लुटत होते. सुरजमल जाट कुंभेरीच्या अभेद्य किल्ल्यात लपून बसला होता. खंडेरावांना तहाचे निमंत्रण देऊनही खंडेराव गप्प बसेना तेंव्हा त्याने मल्हाररावांकडे आपला वकील रुपराम चौधरी पाठवला व चाळीस लाखाची खंडणी द्यायला तयार झाला. मल्हारराव,राघोबादादा व जयाप्पा पुण्याहून निघून जाट मुलखात आले. खंडेराव त्यांना तेथे सामील झाला व येथेच कुंभेरीचा वेढा सुरु झाला.
याच युद्धात आघाडीवर लढत असतांना तोफेचा गोळा लागुन खंडेरावांचा मृत्यू झाला.
वरील वृत्तांत पाहिल्यानंतर खंडेराव व्यसनी होते, नशेत बेधुंद असतांना झोकांड्या खात आघाडीवर आले असता गोळा लागुन ठार झाले हे इतिहासकारांचे विधान कोणाला मान्य होईल? मल्हाररावांनी आपल्या अनुपस्थितीत खंडेरावांना उत्तरेची जबाबदारी सोपवली होती. ती त्यांनी पार पाडली. जाटासारख्या, ज्याने दिल्लीही जिंकली होती, योध्याला एकट्याच्या जीवावर सळो-कि-पळो करुन सोडणा-या खंडेरावाला व्यसन करायला फुरसत कधी होती? पातशहाही त्याची मनधरणी करतो ती तशी योग्यता असल्याखेरीज काय? दिल्लीचे अन्य राजकीय मुत्सद्दी त्यांच्या सोबत असत. पातशहाच्या भेटवस्तू नाकारण्याचा बाणेदारपणा त्यांच्यात होता.
बरे जाटाविरुद्धची लढाई त्यांनीच आधी सुरु केली होती. मल्हारराव व अन्य सेनानी नंतर आले. अशा वेळीस खंडेराव नशेच्या अंमलाखाली आघाडीवर आला या इतिहासकारांच्या समजात खोट आहे हे उघड आहे. खरे तर खंडेरावाने जाटाच्या प्रदेशाची धुळधान केल्याने जाटाचा त्याच्यावर राग असणे स्वाभाविक आहे. जाट सैन्याने आघाडीवर असलेल्या खंडेरावाला मुद्दाम नेम धरुन टिपायचा प्रयत्न करणे स्वाभाविक आहे. हा मृत्यू अपघात नव्हता हे लक्षात घ्यायला हवे. एक भविष्यातील उमदा योद्धा व मुत्सद्दी आपण गमावला. यामुळेच मल्हाररावांचा प्रचंड क्रोध झाला. "सुरजमल्लाचा शिरच्छेद करुन कुंभेरीची माती यमुनेत टाकीन!" अशी घोर प्रतिज्ञा मल्हाररावांनी संतापाच्या भरात केली होती. पण जयाप्पा शिंदेंनी जाटाशी परस्पर तह करुन त्यावर पाणी फिरवले हे येथे लक्षात घ्यायला हवे.