Sunday, January 26, 2020

साहित्यिकांचे चुकते कोठे?



साहित्य संमेलन म्हणजे आपल्या जीवन विषयकच्या धारणांचा जागर असतो. समग्र मानवी जगण्याचे चित्रण करत मनुष्याला त्याचा आरसा दाखवत भविष्याचे दिशादिग्दर्शन करणे हा साहित्याचा मुख्य हेतू असतो. हेतुशिवाय लिहिले गेलेले साहित्यही अप्रत्यक्षरित्या हेच हेतुबद्ध कार्य करत असते. त्यामुळे साहित्याचे प्रयोजन काय हा प्रश्न तसा निरर्थकच ठरतो. प्रत्येक लेखकाचे साहित्य हे त्या लेखकाचे समाजविषयकचे, स्वत:बद्दलचे आकलन याचा कलात्मक आविष्कार स्वरुपात असल्याने त्यातच त्याचे साहित्य विषयकचे प्रयोजन स्वयंसिद्ध असते. त्याचा दर्जा काय हे वाचक आणि समीक्षक ठरवतील, पण प्रत्येक साहित्यकृतीचे व साहित्त्यिकाचे लेखनकार्य सूप्त अथवा जागृत स्वरुपात काही ना काही प्रयोजन घेऊनच होत असते असे मला वाटते. असे असले तरी आज मराठी साहित्याचे प्रयोजन आजच्या सहित्यातून काय दिसते हे पाहिले तर एकुणच साहित्यिकांच्या आकलन-मर्यादांची प्रकर्षाने जाणीव होते हे मान्य करावेच लागेल.
उदाहणार्थ आज मराठी जागतिकीकरणाच्या वेढ्यात सापडलेली आहे. १९९१ नंतर जगण्याचे संदर्भ एवढ्या झपाट्याने बदलले आहेत की त्यापुर्वीचे जीवन अनोळखी वाटावे. नातेसंबंधातही झपाट्याने बदल होत गेले. समाजाच्या अशा-आकांक्षा आणि जीवनस्वप्नांतही झपाट्याने बदल होत गेला. तंत्रज्ञानाने माणसाला अत्याधुनिक केले. जगण्याच्या अनेक गोष्टी सोप्या केल्या. शेतकरीही बदलला. त्याची मानसिकता बदलली. त्याचीही स्वप्ने बदलली. मध्यमवर्ग तर नव्या लाटेवर हिरीरीने आरुढ झाला. नवश्रीमंतांची लाट आली. पण मानसशास्त्रज्ञ सांगतात की भारतात मनोरोगांचीही मोठी लाट आली. मानसोपचार तज्ञांच्या दारात रांगा लागू लागल्या. जीवनात एक तुटले-पण आले. भारतात आज मितीला फक्त पाच हजार मनोरोगतज्ञ आहेत पण आज त्यंची गरज दहा लाखांपेक्षा अधिक आहे असे सरकारच सांगू लागले. शालेय वयापासुनच कोणत्या ना कोणत्या मनोरोगाची लागण आता नित्याची बाब झाली आहे. स्वप्ने आणि वास्तव यात पडत चाललेली दरी यामागचे खरे कारण आहे असे मनोरोग तज्ञ म्हणतात. ही मानसिक आजारांची लाट आली त्याला आधुनिक जीवनशैली पचवता न येणे हे जसे कारण आहे तसेच बदलत्या काळाला जुळवुन घेण्यासाठी जे नवे समाजिक तत्वज्ञान तयार व्हायला हवे होते ते न बनल्यामुळे हे भरकटलेपण आले आहे असे आपल्याला दिसेल. आणि हे तत्वज्ञान देण्याची जबाबदारी तत्वज्ञ, विचारवंत आणि साहित्यिकांची होती. ते यात अपयशी ठरल्याचे चित्र आहे. म्हणजे साहित्याचे प्रयोजनच येथे निरर्थक ठरले आहे की काय असा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे.
खरे म्हणजे जगण्याला तात्विक आणि भावनात्मक आधार दिला जाणे आवश्यक होते. एकुणातील जगण्याच्या बदलत्या प्रयोजनाची नव्याने व्याख्या व्हायला हवी होती. बदलत्या नितीनियमांतील योग्य काय अयोग्य काय यावर कलात्मक दृष्ट्या व्यापक चर्चा व्हायला हवी होती. बदलत्या राजकीय संदर्भांचीही तेवढ्याच ताकदीने मिमांसा व्हायला हवी होती. आपले अर्थजीवन आणि आर्थिक धोरणे याचेही सशक्त प्रतिबिंब आपल्या साहित्यात पडणे आवश्यक होते. वस्तुस्थिती अशी आहे की आजच्या समाजाला आपले प्रतिबिंब दिसेल असे साहित्य मराठीत अभावानेच आले. कंपुशाही करुन अनेक कादंब-या गाजवण्यात आल्या हे तर सत्यच आहे. पण गाजणे म्हणजे जीवनार्थ देता येणे असा अर्थ मात्र घेता येत नाही. समाज मन घडण्यासाठी, त्याचे प्रतिबिंब बनण्यासाठी आणि समाजाची मानसिक कुंठा मोकळी होण्यासाठी साहित्यात काहीच नसेल तर ते साहित्य म्हणजे निव्वळ कागदांची नासाडी करणारा धंदा झाला आहे असे खुशाल समजून चालले पाहिजे.जे ताटात वाढले गेलेय त्यालाच साहित्य समजणे आणि कोणीतरी ते श्रेष्ठ आहे असे ठरवते ते गोड मानून घेणे ही आपल्याकडॆ एक विघातक साहित्य-प्रथा बनत चालली आहे. हे काही साहित्यासाठी चांगले घडते आहे असे म्हणता येणार नाही.
याला कारण आहे ते आपल्या साहित्यिकांची जीवनाला निर्वस्त्र भिडण्यातील साहसाचा अभाव. मर्यादित आणि आपल्या महाविद्यायीन काळातील अनुभवांच्या बाहेर पडण्याची आणि नवे अनुभव घेण्यातील उत्कट्तेची कमतरता. अभ्यासाचा अभाव. रुढीशरण होण्याची आत्मघातकी सवय. आणि यातून जीवनाला स्पर्श करणारे साहित्य घडत नाही. चाकोरीबद्ध पण वेगवेगळ्या आणि त्याही अनुकरणात्मक शैलींतून लिहिले गेलेले साहित्य भाषिक चमत्कार म्हणून श्रेष्ठही ठरतील पण त्यातील जीवनदर्शन पोकळ असले तर त्याचा काय उपयोग? बरे हे अनुकरण बहुदाकरुण पाश्यात्यांच्या शैलींचे तर असतेच पण त्यांच्या अनुकरणांचेही भ्रष्ट अनुकरण केले जात असेल तर "साहित्यिकांची जात चोरट्यांची" असा आरोप कोणी केला तर त्याला कोणी दोष द्यायचा? चोरी ही कथावस्तुंचीच नसते तर शैलीचीही असते. पण कंपुबद्ध साहित्यिक आणि समीक्षक त्यांची चर्चा करायला सहसा धजावत नाहीत हे आपल्या साहित्य विश्वाचे एक अव्यवच्छेदक लक्षण बनलेले आहे आणि त्यावर तातडीने सर्वांनी गंभीरपणे विचार केला पाहिजे. नाहीतर नवे साहित्यिकही याच ढाच्यात घडतील आणि साहित्याच्या प्रयोजनाचा समूळ पराभव करतील हे पक्के समजून चालायला हवे.
खरे तर साहित्यिक हा साहसी असला पाहिजे. त्याने आपल्या अभिव्यक्तीआड राजकारण, समाजकारण, धर्मकारण येऊ देता कामा नये. पण काय लिहिले तर कोणत्या घटकाची काय प्रतिक्रिया असेल हे आगाऊ ठरवून मग लिहिणे अथवा वाटते ते न दर्शवता वाचकानुकूल बदल करणे हा एक मोठाच दोष वर्तमानकाळात उत्पन्न हाला आहे. किंबहुना प्रकाशक मिळेल की नाही किंवा समीक्षा-लोकमान्यता मिळणार की नाही हेही यावरुनच ठरणार असल्याने असले प्रकार होऊ लागले आहेत. वाद होऊ नयेत या भितीने नायक-नायिकांची आणि खलनायक-खलनायिकांची आडनांवेही काय ठेवावीत असा प्रश्न लेखकासमोर उभा ठाकू लागला असेल तर तो समाजाचा घोर अपराध तर आहेच पण लेखकाचा अधिक आहे कारण तो मुळात आपल्या साहित्य प्रेरणांची हत्या करत असतो. आणि त्याच वेळीस मुद्दामहून एखादा समाज दुष्ट/धर्मांध ठरवून त्यांनाच खलनायकत्व बहाल करण्याचेही पाप करणे हा आज काही साहित्यिकांचा जातीय धंदा बनू लागला आहे आणि त्याचीही चिंता आम्ही करायला हवी. असे केले तर ते वास्तव चित्रण कसे होईल? ते साहित्य कसे असेल?
साहित्य राजकारणची दिशा ठरवण्यात मदत करु शकते पण ते राजकारणाचे हत्यार बनू शकत नाही. ते अभिप्रेतही नाह्वी. पण आजकाल तेही घडत आहे. ते प्रमाण वाढत आहे. मग समाजाचे काय? सामाजिक मानसिकतेचे काय? समाज साहित्यातून कोणत्या जीवनप्रेरणा घेईल? ते घेऊ शकत नाही म्हणून पुस्तकांचा खप वाढत जाण्याऐवजी घटत चालला आहे. दोन-तीन कोटींची विक्री एखाद्या संम्मेलनात झाली अशा चौकटी वृत्तपत्रात येतात. पण कोणत्या प्रकारच्या पुस्तकांची विकी झाली हे मात्र सांगितले जात नाही. पाककला, मोटिवेशन, धार्मिक, माहितीपर...ज्ञानपुर्वक नव्हे अशाच पुस्तकांच्या विक्रीचे प्रमाण साठ-सत्तर टक्के असेल तर साहित्यिकांनाच मिरवून घेण्यापेक्षा फुटपाथवर येत किंवा राना-वनात हिंडणा-या भटक्यांच्या पावलांशी बसून जीवनप्रेरणांचा शोध नव्याने घेतला पाहिजे. हे करता येत नसेल तर लेखनाला रामराम अथवा खुदा हाफिज म्हणत जमेल तसे चाकोरीतील जीवन जगले पाहिजे.
मराठी भाषा दोनेक हजार वर्ष प्रगल्भ साहित्याची भाषा राहिली आहे. हालाची गाथासप्तशती जीवनाची मोहक रुपे आपल्यासमोर ठेवते. अंगविज्जासारखा एका जैनाने लिहिलेला ग्रंथ आपल्याला तत्कालीन समाज जीवनाचे धर्मनिरपेक्ष रूप दाखवतो. संतांनी मराठीला मानवी जीवनाचे भावूक रुप दिले. पण आपण एकविसाव्या शतकात येऊनही त्यांना मागे टाकू शकू असला काही पराक्रम केलेला नाही. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जाही अद्याप मिळू शकलेला नाही, त्यासाठी आम्ही कोणतीही व्यापक बांधणीही केली नाही यातच आमची भाषेबाबतची आस्था दिसून येते. ही आस्था सरकारी पदे मिळवण्यासाठी मात्र एवढ्या तीव्रपणे उफाळून येते की शरमही शरमेने मान खाली घालते.
शेवटचे पण महत्वाचे. जातीवाद आणि धर्मवाद आज साहित्यिकांचा मुलमंत्र झाला आहे. एका जातीचा साहित्यिक शक्यतो खालच्या अथवा अन्य जातींना दुय्यम तर ठेवतोच पण त्यांचे चित्रणही लौकीक फायदा दिसत नसेल तर उपहासाने करतो. त्या-त्या जाती-जमातीमधील लेखक नसला तर मग त्या जातीचे चित्रणच येत नाही. बरे, जे जातीतल्या साहित्यिकाकडून येते त्याला सहसा इतर साहित्यिक-समीक्षक अदखलपात्र मानतात. असले तर ते लेखकही आपापल्या जातीतच लोकप्रिय असतात, इतर जातींतले त्याला हिंग लावून विचारत नाहीत. याला काही एकमय साहित्यविश्व म्हणत नाहीत. यातून काही समग्र समाजाला मिळू शकत नाही. असले साहित्य-विश्व मग अरबी किंवा कोणत्याही समुद्रात बुडाले तरी समाजाचे काय बिघडणार आहे? समाज हा आपापल्या पद्धतीने पुढे जाणारच आहे. जातोही आहे. पण साहित्यविश्वाचा त्याच्या या पुढे जाण्याच्या प्रक्रियेत हातभार लावणार नसेल तर ते निरर्थकच आहे असे खुशाल समजून चालावे.
कोणतेही साहित्य संम्मेलन हे व्यापक विचारमंथनासाठी असले पाहिजे. मला हा मंच उपलब्ध करून दिला याबद्दल मी गुणीजन साहित्य संमेलनाच्या सर्व आयोजकांचे आणि ते यशस्वी करण्यासाठी झटलेल्या कार्यकर्त्यांचा आणि उपस्थितांचा मन:पुर्वक आभारी आहे. माझ्या म्हणण्यावर आपण गांभिर्याने विचार अराल, माझ्या कथनातील त्रुटीही विचारपुर्वक दाखवाल अशी आशा आहे.
धन्यवाद.

(धोंडीराम माने विकास प्रबोधिनीतर्फे भानुदास चव्हाण सभागृहात १३ वे गुणिजन साहित्य संमेलन घेण्यात आले. या वेळी अध्यक्षस्थानावरून बोलतांना मी. आमदार लहुजी कानडे, ज्येष्ठ साहित्यिक रा. रं. बोराडे, आर. के. गायकवाड, फ. मु. शिंदे, साहित्यिक रेखा बैजल, स्वागताध्यक्ष डॉ. राखी सलगर, सुनीता माने, आयोजक सुभाष माने यांची प्रमुख उपस्थिती होती.) 

Tuesday, January 21, 2020

Vedic Religion is foreign to India


By Dr. Sanjeev Sabhlok
The Vedic religion is all about fire worship. So what is the link (if any) between Vedas and Shiva and Ganesha – which have everything to do with fertility worship.

जनानखान्यांचे अद्भुत विश्व!

  जनानखाना, ज्याला अंत:पूर, राणीवसा किंवा हरम असेही म्हटले जाते त्याबाबत समाजामध्ये अनेक समजुती प्रचलित आहेत. शत्रूच्या जिंकलेल्या स्त्रीय...