Saturday, April 17, 2021

सिनौलीचे अवशेष छकड्यांचे कि वैदिक रथांचे?

 


 

 

सिनौली येथे झालेल्या उत्खनानामुळे आर्यांचा प्रश्न निकालात निघाला असून वैदिक संस्कृती येथे सनपूर्व २२०० पासून असल्याचे सिद्ध झाले तर आहेच, सिनौली येथे सापडलेले रथांचे अवशेष आणि शस्त्रास्त्रे महाभारत युध्द खरेच घडले असावे याचा पुरावा आहेत असे दावे केल्याचे आपण ऐकत असतो. आता तर डिस्कवरी वाहिनिवर दावे खरे मानून सिक्रेट्स ऑफ सिनौलीही डॉक्यूमेंटरी बनवण्यात आली जिने वरील दाव्यांना बळकट करायला बराच हातभार लावला. खरे तर पुरातत्व खाते ज्ञानात निष्पक्ष भर घालण्यासाठी असते याचा विसर २०१४ पासून पुरातत्व खात्याला पडला आहे हे राखीगढी येथे झालेल्या उत्खननापासून ते घग्गर नदीला सरस्वती घोषित करण्यापर्यंतच्या उपद्व्यापातून आपण पाहू शकतो. सिनौली येथील उत्खनन आणि त्यावरून काढले गेलेले अशास्त्रीय निष्कर्ष यावरून तीच बाब पुन्हा सिद्ध होते.

 

गंगा-यमुनेच्या दोआबातील बागपतजवळील सिनौली येथे २००५-६ साली झालेल्या उत्खननात इसपु २२०० ते इसपू १८०० या दरम्यानची दफनभूमी सापडली होती. त्यात शंभराहून अधिक  दफने मिळाली. दफनात मृतांसोबत मृद्भांडी, तांब्याच्या बांगड्या, मृण्मयी प्रतिमा, तांब्याच्या दोन तलवारी, सोन्याचे काही दागिने इ. वस्तू मिळून आल्या.  दफनभूमीला घेरणा-या भाजलेल्या विटांच्या भिंतीचेही अवशेष मिळाले. या दफनांचे हडप्पा येथे मिळून आलेल्या उत्तरकालीन दफनांशी साधर्म्य असल्याचे पुरातत्व खात्याचे सिनौली उत्खननाचे प्रमुख डी. व्ही. शर्मा यांनी घोषित केले. नंतर बराच काळ सिनौली येथे नवे उत्खनन झाले नाही.

 

२०१८ मध्ये या प्राचीन दफनभूमीजवळच उत्खननाचा दुसरा टप्पा संजय मंजुळ या पुरातत्व खात्याच्या अधिका-याच्या नेतृत्वाखाली सुरु झाला. या उत्खननात तांब्याच्या नक्षीदार पत्र्याने आच्छादित केलेल्या लाकडी शवपेट्यातील तीन दफने मिळाली तसेच मृतांसोबत पुरलेल्या छकडेसदृश गाड्यांचेही अवशेष मिळाले. एका शवपेटीवरील तांब्याच्या पत्र्यावर पिंपळपान आणि बैलाच्या शिंगांचे शिरस्त्राण-सदृश अथवा बैलाचे मस्तक सूचित करणारी आकृती कोरलेली मिळाली. एका शवपेटीत स्त्रीचे शव पुरलेले असून तिच्या हातावर गोमेद जडवलेला बाजूबंद सापडला.

 

जे गाड्यांचे अवशेष आहेत त्यांना तांब्याची त्रिकोण ठोकलेली नक्षीदार पण भरीव लाकडी चाके आहेत. गाडीचा कणा लाकडाचा असून तोही तांब्याच्या पत्र्याने मढवलेला आहे. या दफनांचा काळ ताम्रयुगातील  सनपूर्व २००० ते सनपूर्व १८०० असल्याचे अनुमानित करण्यात आले आहे. यावरून मंजुळ यांनी लगेचच दक्षिण आशियात एवढ्या जुन्या काळातील आर्य तंत्रज्ञानाने बनवलेले रथ प्रथमच आढळून आले असून दफनेही वैदिक विधीविधानानुसारच असून हे अवशेष महाभारतकाळातील असू शकतील अशी विधाने केली. रथ सापडल्याने एवढ्या जुन्या काळात भारतात घोडेही होते हे सिद्ध होत असल्याने आर्य स्थलांतर सिद्धांत बाद ठरतो असे दावेही काही विद्वानांनी केले. शिवाय बागपत, सोनपत आदि ठिकाणे महाभारत युद्धाशी संबंधीत असल्याने ही शाही दफने लढवैय्या लोकांची (म्हणजेच क्षत्रियांची) असू शकतील हा दावाही सोबत केला गेलाच. आपण आता वस्तुस्थिती पाहू.

 

पहिली बाब म्हणजे दफनपेटीवर  बैलाच्या मस्तकाचे चिन्ह आहे, घोड्याचे नाही. म्हणजेच सिनौलीतील लोकांना बैल माहित होते, घोडे नाहीत. आणि रथ घोडे ओढतात, बैल नाही. आर्यांच्या दफनांत प्रेतासोबत रथ व त्याला जुंपलेले घोडेही दफन केले जात असे पुरावे अन्द्रोनोवो, सिंथास्ता संस्कृती व लुयोंग येथील आर्य दफनांत मिळाले आहेत. या दफनांत प्रेते ही रथाच्या बैठकीच्या जागेवर ठेवलेली असून त्यात शवपेट्यांचा वापर नाही. ही सर्व स्थाने मध्य आशियात मोडतात जेथून इंडो-युरोपियन म्हणजे आर्य इराणमध्ये व तेथून भारतात आले असे मानले जाते. ही दफने इसपू दोन हजार नंतरची आहेत.

 

सिनौली येथे दफनासोबत छकडा आहे पण घोडा (अथवा बैलही) पुरलेला नाही. आणि महत्वाची बाब म्हणजे मध्य आशियातील दफनांतील रथांची संरचना सिनौलीच्या छकड्यांप्रमाणे नसून सर्वस्वी वेगळी तर आहेच पण चाकेही भरीव नसून आरे असलेली आहेत. भरीव चाकांचे रथ जगात कोठेही नसतात कारण वजन वाढते. त्यामुळे सिनौली येथील सापडलेल्या भरीव चाकाच्या गाड्यांना युद्धात वापरले जाणारे वेगवान रथ ठरवायचा प्रयत्न करणे हा सामान्य ज्ञानाचाही भाग नसल्याचे चिन्ह आहे.

 

मंजुळ मात्र ठासून सांगतात कि सिनौली येथील दफने वैदिक पद्धतीची आहेत. हेही धादांत असत्य यासाठी आहे कि शवपेटीत दफन करण्याचा एकही उल्लेख वैदिक साहित्यात नाही. पण उत्तरसिंधू काळात मात्र अशी दफने आढळलेली आहेत. ऋग्वेदात रथांचे जेही उल्लेख आहेत ते आ-यांच्या चाकांच्या रथांचे आहेत, भरीव चाकांचे नाहीत. सिंधू संस्कृतीत इसपू ३१०० पासून भरीव चाकांच्या बैलगाड्यांचाच वापर होत असल्याचेही पुरावे उपलब्ध आहेत. शिवाय सिनौली येथे जी मृद्भांडी, अलंकार, बैलाचे मस्तक  व पिंपळपानाच्या आकृती मिळाल्या आहेत त्याही सिंधू संस्कृतीत मिळणा-या अवशेषांशी मेळ खातात. म्हणजेच सिंधू संस्कृतीचा विस्तार गंगेच्या खो-यापर्यंत झाल्याचा पुरावा सिनौली येथील अवशेष देतात. वैदिक संस्कृती तेथे अस्तित्वात असल्याचा नाही हे येथे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

 

दुसरी बाब म्हणजे सिनौली येथील मृतांचा महाभारत युद्धाशी संबंध असल्याबद्दलचा दावा. हे अवशेष सापडले तो परिसर कुरुक्षेत्राचा भाग मानला जातो. आता महाकाव्यातील युद्धाची आणि या अवशेषांची सांगड घालून युद्ध तर खरेच झाले पण ही क्षत्रियांची शाही दफने आहेत असा दावा वैदिक धर्माभिमान्यांनी करणे स्वाभाविक मानले तरी ते हे विसरतात कि या दफनांतील सांगाडे हे युद्धात मेलेल्यांचे नसून नैसर्गिक मरण आलेल्यांचे आहेत. या दफनांत एक वर्षाच्या मुलापासून ते वृद्ध स्त्री-पुरुषांचेही सांगाडे सामाविष्ट आहेत. दुसरे म्हणजे दफनात तलवारी वगैरे शस्त्रे सापडली असली तरी धनुष्यबाणाचा एकही पुरावा सापडलेला नाही. भारतयुद्धात तर धनुष्य हेच मुख्य साधन वापरल्याचे उल्लेख आहेत. मग त्या मृतांचा संबंध महाभारत युद्धातील मृतांशी कसा लावता येईल?

 

सिनौली येथील दफनभूमी ही ताम्रयुगीन आहे. लोखंडाचा शोध तोवर लागलेलाच नव्हता. पण ऋग्वेदाला लोखंड माहित होते म्हणजे ऋग्वेद लोहयुगात, (इसपू १५०० नंतर) लिहिला गेला.  तरीही सिनौली येथील अवशेषांचा संबंध वैदिक आर्यांशी जोडत त्यांना येथलेच ठरवायचा प्रयत्न करणे अशास्त्रीय व वर्चस्वतावादी धोरणाचा परिपाक आहे.

 

उलट सिनौली येथील अवशेष आपल्याला ओरडून सांगत आहेत कि सिंधू संस्कृतीचा विस्तार समजला जातो तेवढाच नसून ती गंगा-यमुनेच्या खो-यापर्यंत किंवा त्याही पार पसरलेला होता. तीत काही स्थानिक वैशिष्ट्येही होती. गंगा-यमुनेच्या दोआबात राहणा-या पुरातन जमातींनी ती आपली स्वतंत्र वैशिष्ट्ये आपल्या दफनपद्धतीत कायम ठेवली. त्या काळात जगभरातील सर्व जमातींना संरक्षण-आक्रमणासाठी युद्धसज्ज रहावेच लागे. किंबहुना तो त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न असे. दफनांत  शस्त्रे सापडली म्हणून त्यांना लगेच वैदिक क्षत्रीय ठरवायचा बादरायणी प्रयत्न संघीय विद्वान करू धजत असले तरी तज्ञांनी तसे करणे अक्षम्य आहे. यामुळे सिनौलीच्या अवशेषांचा खरा अन्वयार्थ समजून घेतला जाणार नाही. आपले प्राचीन पूर्वज आणि त्यांच्या जगण्याच्या पद्धतीवर खरा प्रकाश पडणार नाही. लबाड्या करून वर्चस्ववादी बनता येईल पण ज्ञानपरंपरेची अक्षम्य हानी होईल!

 

-संजय सोनवणी

 

(आज दै. पुण्यनगरीत प्रसिद्ध झालेला लेख)

Sunday, April 11, 2021

दशाननाची बहुरूपे

http://product.sakaalmedia.com/portal/ST.aspx?ID=312956&fbclid=IwAR13ijrjO41tT8pi_0xji47T85luSV-O5vFBxujExoGpckPtRWRTrlpN5aM

रामायण आणि महाभारत या महाकाव्यांचा भारतीय जनमानसावर प्रचंड प्रभाव आहे. किंबहुना भारतीयांचे नैतिक जीवन या महाकाव्यांमधील पात्रांच्या वर्तन व विचारांनी प्रभावित झालेले आहे असे आपल्याला दिसून येईल. महाभारताची जटिलता, व्यामिश्रता रामायणात नाही. राम हा दैवी अवतार तर रावण ही खलप्रवृत्तीची व्यक्तिरेखा यांच्यात झालेला संघर्ष याभोवती मुख्य रामकथा फिरते. रामकथा ही मुळची वीरकाव्य स्वरूपात असुन सामान्य लोकांत ती आधीच प्रिय होती. याच मुळच्या कथाबीजावर संस्कार करत त्याचा कालौघात झालेला महाकाव्यमय आविष्कार म्हणजे आज उपलब्ध असलेले वाल्मिकी रामायण अशी मान्यता आहे. सात कांडांचे हे रामायणसुद्धा मुळात पाचच कांडांचे होते. पुढे अनेक शतकांनंतर मूळ संहितेला कोणा अनामिकाने लिहिलेले बालकांड आणि उत्तरकांड जोडण्यात आले. आपल्याकडे कालौघात पुरातन साहित्यात या ना त्या कारणाने घालघुसड करण्याची प्रवृत्ती असल्याने रामायणाची मूळ कथा नेमकी काय असावी याबाबत केवळ तर्क करावा लागतो. रावणाचे मुळ चारित्र्य व त्याच्या जन्माचा इतिहासही काय होता हे सुद्धा आपल्याला माहित नाही. सध्या जनमानसात पसरलेल्या अनेक रामकथांतून आपल्या समोर अवतरणारा रावण सीताहरणामुळे स्त्रीलंपट म्हणून बदनाम व दुर्गुणांचा पुतळा म्हणून उभा रहात असला तरी मूळ वाल्मीकी रामायणाचेच परीक्षण केले तर मात्र रावणाचे एक उदात्त चित्र उभे राहाते. राम-रावण युद्धाचे तात्कालिक कारण सीताहरण असले तरी त्या युद्धामागे दोन भिन्न संस्कृतींमधील संघर्ष हे कारण प्रधान होते हेही सहज लक्षात येण्यासारखे आहे.

याशिवाय रामायणाची अनेक सांप्रदायिक व प्रादेशिक संस्करने आहेत. त्यातील राम व रावण वेगळेच आहेत. जैन रामायनाची अनेक संस्करणे प्रसिद्ध असून यात रावण जैनांतील विशेष शक्ती असलेला विद्याधर श्रेणीचा त्रिखंडावर राज्य करणारा प्रतापी राजा आहे. तो तापसी तर आहेच पण शाकाहारीसुद्धा आहे. या रामायणानुसार रावणाची हत्या रामाहातून नव्हे तर लक्ष्मणाहातून झाली. रामाला सहकार्य करणारे वानर प्राणी नव्हे तर सभ्य माणसेच होती तर वानरमुख हे त्यांचे ध्वजावरील चिन्ह होते. एकंदरीत रावणाचे एक वेगळेच सांप्रदायिक चित्रण जैन रामकथांत आलेले आहे.

याउलट दशरथ जातकात येणा-या बौद्ध रामकथेचे आहे. या कथेतील दशरथ हा अयोध्येचा नव्हे तर बनारसचा राजा होता. रामपंडित आणि लक्ष्मणपंडित यांना वनवासात पाठवले गेले ते हिमालयात. या रामकथेत लंका नाही किंवा रावणही नाही. म्हणजेच सीताहरणही नाही.

एकाच भूमीत निर्माण झालेल्या या मुख्य तीन संस्करणात एवढे अंतर का असावे या प्रश्नावर विद्वानांनी बरीच चर्चा केलेली आहे. रामकथेचा वापर आपापल्या धर्मप्रचारासाठी करायचा असल्याने मुळ कथेत सोयीस्कर बदल केले गेले असावेत असे एकंदरीत मत व्यक्त झालेले आहे. अर्थात या तीनही संस्करणामागे सांप्रदायिक भावना प्रेरित असल्या तरी या कथेमागे मुळचा असा कोणतातरी स्त्रोत असला पाहिजे हे निश्चित. अर्थात तो आपल्याला आज ज्ञात नाही. त्यामुळे राम व रावण या व्यक्तिरेखांचे विश्लेषन उपलब्ध साधनांवरूनच करणे भाग पडते.

एवढेच नव्हे तर रामकथा मुळात भारतात घडली कि पूर्व इराणमध्ये, लंका म्हणजे आजची श्रीलंका कि रावणाची लंका छत्तीसगढ अथवा ओडीशात होती यावर रामायणाचाच आधार घेऊन विद्वानांत हिरिरीने चर्चा होत असते. रामकथा खरेच होऊन गेली असे मानणारे भाविक जसे आहेत तसेच ही कथा काल्पनिक आहे असे मानणारा वर्गही आहे. या कथेतून सांस्कृतिक इतिहास व संघर्ष शोधणारे विद्वानही कमी नाहीत. सध्याच्या रामायणातील राम-रावण संघर्ष हा आर्य आणि दक्षिणेतील अनार्यांमधील संघर्ष होय असे प्रतिपादित करणारा वर्ग जसा अस्तित्वात आहे तसाच रामाचे दक्षिणेत जाणे व रावणाशी युद्ध करणे म्हणजे आर्य संस्कृतीचे दक्षिणेतील द्रविड संकृतीवर झालेले आक्रमण असेही प्रतिपादित करणारे विद्वान आहेत. अनेक साहित्यिकसुद्धा अलीकडे रामायणातील पात्रांचे आपल्या आकलनानुसार नवे अन्वयार्थ लावत आहेत. रावण व मन्दोदरीही राम सीतेप्रमाणेच कादंबरीकारांचे आवडीचे मुख्य पात्र बनले असल्याचे आपल्या लक्षात येईल. रावणावर लिहिल्या गेलेल्या कादंब-या विक्रीचे उच्चांक मोडत आहेत. डॉ. वि. भि. कोलते यांनी तर पूर्वी “महात्मा रावण” हा ग्रंथ लिहून रावण हा रामापेक्षा कसा श्रेष्ठ होता हे वाल्मिकी रामायणाच्याच आधारे दाखवून दिले होते.

पण भाविकांच्या दृष्टीने पाहिले तर सृष्ट आणि दुष्ट शक्तीमधील संघर्ष म्हणजे रामायण. राम हा सृष्ट भावनांचे प्रतीक तर रावण हे दुष्ट भावनांचे प्रतीक. दस-याला रावण दहन केले जाते. सृष्टाचा दुष्टावरील विजयोत्सव साजरा केला जातो. जनमानसासाठी हे ठीकही असेल कारण प्रकाश आणि अंधार, पवित्र आणि अपवित्र या द्वंद्वाने सर्वच मानवजातीला व्यापलेले असून मंगलाचाच विजय व्हावा अशी भावना असणे अस्वाभाविक मानता येणार नाही.

पण रावणाला अमंगल का मानावे असा प्रश्न विचारला तर समर्पक न्याय्य असे उत्तर कोणाकडे नसते हे सुद्धा एक वास्तव आहे.

आज आहे त्या वाल्मिकी रामायणातील रावणाची व्यक्तिरेखा अंतता: खलस्वरूपी दाखवली गेली असली तरी तिला अनेक पैलू आहेत. म्हणजे ती सर्वस्वी  काळ्याकुट्ट रंगात रंगवली गेलेली नाही. या कथेनुसार रावण पित्याच्या बाजूने ब्राह्मण आहे तर आईच्या बाजूने राक्षस आहे. ऐतिहासिक वास्तव पाहता असुर, राक्षस, यक्ष, नागादी संस्कृती भारतात सर्वत्र पसरलेल्या होत्या. वैदिक आर्य संस्कृतीहून या संस्कृती सर्वस्वी भिन्न होत्या. त्यांच्यात धर्मवर्चस्वासाठी युद्धेही होत असत. वाल्मिकी रामायनातील राम हा वैदिक संस्कृतीचा रक्षक म्हणून समोर येतो तर रावण हा राक्षस संस्कृतीचा प्रतिनिधी आहे. मुळात आज “राक्षस”, “असुर” हे शब्दच बदनाम झालेले असले तरी या शब्दांचे मुळचे अर्थ वेगळे होते. ‘रक्षति इति राक्षसा:’ म्हणजे रक्षण करतो तो राक्षस तर असुर म्हणजे प्राणवान वीर्यवान. पण ते आर्यांचे शत्रू असल्याने त्यांना स्वाभाविकपणे काळ्या रंगात रंगवले गेले. मूळ संबोधनांचा अर्थही उलटापालटा झाला. रावण याच सांस्कृतिक संघर्षातून दुष्ट स्वरूपात रंगवला गेला. त्यामुळेच पद्मपुराणाने रावण व कुंभकर्ण विष्णूचे पूर्वीचे शत्रू हिरण्याक्ष व हिरण्याकश्यपू या असुरांचे अवतार असल्याचे मानलेले आहे. पण आज उपलब्ध नसलेल्या मुळ रामकथेत राम हा आर्य संस्कृतीचा प्रतिनिधी असावा असे दिसत नाही कारण वाल्मिकी रामायणातील रामकथेतच अनेक विसंगती आहेत.

 रामायणाच्या उपोद्घातातच, एकदा नारदमुनी भेटायला आले असता वाल्मीकी त्यास विचारतात कि, "हे मुनिश्रेष्ठा, सांप्रत पृथ्वीवर गुणवान, पराक्रमी, धर्मज्ञ, सत्यवचनी आणि कोपला असता देवांतही भिती उत्पन्न करणारा असा गुणसंपन्न पुरुष कोण आहे?" यावर नारदमुनी म्हणतात, "इक्ष्वाकू वंशात जन्मलेला राम हा तुम्ही विचारता तसा आदर्श पुरुष आहे." वाल्मीकींच्या विनंतीवरुन नारदाने रामचरित्र सांगितले. नंतर क्रौंचवधाची घटना घडली व आदिकाव्य जन्माला आले. तदनंतर ब्रह्मदेवाच्या आज्ञेने वाल्मीकीने रामकथा लिहायला घेतली. यावरून एक बाब दिसते ती अशी कि वाल्मीकीला नारदाने सांगेपर्यंत रामकथा माहितच नव्हती. पण प्रत्यक्ष रामायणात मात्र वाल्मीकी हेही एक प्रत्यक्ष घटनांत भाग घेणारे पात्र आहे. म्हणजे वाल्मीकीला राम माहितच आहे. असे असतांनाही उपोद्घातातील कथा येते ही मोठी विसंगती आहे.  मुळच्या वाल्मीकी रामायणातही फार मोठे फेरबदल केले आहेत याचेही ही विसंगती म्हणजे निदर्शक आहे. वैदिक संस्कृतीच्या प्रसाराचे साधन म्हणून रामाचा वापर करण्याच्या नादात अनेक विसंगत कथा निर्माण केल्या गेलेल्या आहेत असे आपल्याला दिसते.  

उदा. जर रामायण हा आर्य अनार्यांतील संस्कृती संघर्ष होता असे मानले तर एक राक्षसी कैकशी आणि वैदिक ऋषी विश्रवा यांचा विवाह कसा होऊ शकला असता हा प्रश्न मौलिक आहे. एक तर हा विवाह सांकृतिक सम्मिश्रनाचे प्रतीक मानावे लागेल किंवा ही कथा प्रक्षिप्त आहे असे मानावे लागेल. शिवाय वैदिक स्मृतीन्नुसार अपत्याला जर पित्याचाच वर्ण मिळत असेल तर रावणाला राक्षस म्हणता येणार नाही. पण ज्याअर्थी तो राक्षस म्हटला गेला आहे, राक्षसांचाच राजा आहे आणि जर त्याचा सावत्र बंधू कुबेर यक्षांचा अधिपती आहे तर त्याचा पिता विश्रवा वैदिक ऋषी नव्हे तर तोसुद्धा यक्ष/राक्षस संस्कृतीचाच असला पाहिजे. मग त्याचा जन्म वैदिक-राक्षस संकरातून झाला हा वृत्तांत शंकास्पद बनून जातो. कारण राक्षस हे यज्ञविरोधीच नव्हे तर यज्ञविध्वंसक असल्याचे सध्याच्या रामायणानेच नोंदलेले आहे. रामाने या यज्ञविध्वंसक राक्षसांशी युद्धेही केलेली आहेत. खरे तर रावण वेदवेत्ता असता तर तोही यज्ञांचा रक्षक असायला हवा होता, पण ते तसे नाही.

रावण वेदवेत्ताही आहे हे रामायण सांगत असतांना तो परमशिवभक्त आहे हे गौरवाने सांगते. शिवही स्मरारी म्हणजे यज्ञविध्वंसक आहे. रावणाला शिवतांडव स्तोत्राचा लेखक मानले जाते. रावणाचे मुख्य वर्णन म्हणजे तो तंत्रशास्त्रांचा ज्ञाता आहे. तंत्रे प्राय: वेद्विरोधी असून तंत्रांचा निर्माता शिव मानला जातो. शिव ही अवैदिक देवता मानली जाते. रावण या अवैदिक शैव संस्कृतीचा प्रतिनिधी आहे. असे असतांना त्याची जी जन्मकथा दिली गेली आहे ती नंतरची विसंगतीपूर्ण भेसळ आहे हे उघड आहे.

त्यामुळे राम-रावण युद्ध हा मुळात भिन्न संस्कृतींमधील संघर्ष होता हे विद्वत्मत ग्राह्य धरावे लागते. किंबहुना राम-रावण युद्ध होण्यामागे जे तात्कालिक कारण निर्माण झाले ते या संस्कृतींमधील विचार-नितीकल्पनात असलेल्या भिन्न धारणांमुळे.

राम आणि रावणात शत्रुत्व निर्माण झाले ते शुर्पनखेमुळे. शुर्पनखा ज्या पद्धतीने राम व लक्ष्मणाला आपल्याशी विवाह करण्याचे साकडे घालते ती पद्धत स्त्रीस्वातंत्र्य असलेल्या मुक्त समाजातच शक्य आहे. राम आणि लक्ष्मण हे दुस-या बंदिस्त संस्कृतीचे प्रतिनिधी असल्याने त्यांच्या नैतिक धारणा अर्थात वेगळ्या आहेत. त्यामुळे ते काममोहित झालेल्या शुर्पनखेला नुसता नकार देत नाहीत तर तिची कुचेष्टा करत तिला विद्रूप बनवतात. स्त्रीचे वर्तन कसे असावे याबाबतच्या मान्यता वेगवेगळ्या संस्कृतीत वेगळ्या असतात. त्यामुळे तसे पाहता शूर्पणखेचे वर्तन जसे तिच्या संस्कृतीच्या दृष्टीने न्याय्य आहे तसेच राम-लक्ष्मणाचे वर्तनही त्यांच्या सांस्कृतिक परिप्रेक्षात न्याय्य आहे. रामाने सीतेची अग्निपरीक्षाही घेतली ती त्याच्या संस्कृतीच्या मान्यतांच्या परिप्रेक्षात. पण शुर्पनखेला ती तिच्या संस्कृतीने दिलेले व्यक्तिस्वातंत्र्य पाळत असतांनाही मायावी रूप देवून तिचे चरित्र काळ्या रंगात रंगवले आहे.

परंतु शुर्पनखा हा रामकथेतील निर्णायक वळण घेणारा हा टप्पा होता यात वाद नाही. तिला विद्रूप केल्याने रावण क्रोधीत झाला. त्याने राम-लक्ष्मणावर हल्ला करून सूड उगवण्याऐवजी सीतेचेच अपहरण केले. सीतेने आपल्याला वश व्हावे म्हणून प्रयत्नही केले. पण केवळ सुडासाठी तिच्यावर अत्याचार केले नाही अथवा तिला विद्रूप बनवण्याचा प्रयत्नही केला नाही. खरे तर या वैराची सुरुवात रावणाने केलेली नाही. पण राम आणि रावणातील युद्ध शुर्पनखा प्रकरण व सीताहरण यामुळे अटळ झाले एवढे मात्र खरे. यात विचार केला तर दोषी बाजू कोणती हे ठरवणे आपापल्या नैतिक मान्यतांवर अवलंबून असेल हे उघड आहे.

आणि रामायणकर्त्यांना याची जाणीव असावी. त्यामुळे का होईना रावणाचे चारित्र्य त्यांनी फक्त काळ्याकुट्ट रंगात रंगवलेले नाही. त्याचे महापराक्रमी असणे, परमशिवभक्त असणे, त्याची दहा मुखे त्याच्या दहा प्रकारच्या ज्ञानाची प्रतीके असणे, उद्धट असला तरी महान राजनितीद्न्य असणे इत्यादी गुण मुक्तकंठाने गायले आहेत. त्याने लंका बळजबरीने आपल्या ताब्यात घेतलेली असली तरी त्याच्या शासनकाळात लंका ही वैभवाच्या शिखरावर पोहोचली होती हेही मान्य केलेले आहे. हनुमानाने जेंव्हा रावणाच्या दरबारात प्रवश केला तेंव्हा हनुमान रावणाबद्द्ल आदराने उद्गारतो,

‘अहो रूपमहो धैर्यमहोत्सवमहो द्युति:।

अहो राक्षसराजस्य सर्वलक्षणयुक्तता॥‘

रामही पुढे जेंव्हा रावणाला पाहतो तेंव्हा तो मुग्ध होऊन म्हणतो, “रूप, सौंदर्य, कांती, धैर्य अशा सर्व लक्षनांनी युक्त रावणातील ‘अधर्म’ बलवान नसता तर तो देवलोकांचाही स्वामी बनला असता.”

याचाच अर्थ वाल्मिकी रामायण रावणाचा मुख्य दुर्गुण तो अधर्मी असणे हा मानते. याचे कारण स्पष्ट आहे व ते म्हणजे रावणाने अनेक वैदिक यज्ञांचा विध्वंस केला. तो एका अर्थाने वैदिक धर्माचा विरोधक होता म्हणून वाल्मिकीने त्याला अधर्मी म्हणणे स्वाभाविक आहे. वाल्मिकीन्च्या दृष्टीने राम व लक्ष्मणाने शुर्पनखेशी जे वर्तन केले ते मात्र अधर्मी नाही कारण त्यांच्या नैतिक मान्यता ते ज्या रामाला उपास्य मानतात त्या संस्कृतीशी निगडीत आहेत.

दुसरे म्हणजे, वाल्मिकीने मंदोदरीच्या तोंडून रावणाचा सांगितलेला मोठा दोष म्हणजे त्याची स्त्रीलंपटता. त्याला मंदोदरीसहित अनेक पत्नी असल्या तरी त्याचा जनानखाना पळवून आणलेल्या वा जिंकलेल्या स्त्रियांनी भरलेला होता. पण वास्तव हे आहे कि तत्कालीन आर्य असोत कि अनार्य, सर्वच राजे बहुपत्नीकत्व पाळत असत. जनानखाने बाळगणे ही अठराव्या शतकापर्यंतची साधारण बाब होती. जर जैन रामायण गृहीत धरले तर रामाच्याही चार भार्या होत्या. देवादिकांच्या लंपटपणाने अनेक पुराणकथा सजलेल्या आहेत. त्यामुळे हा आरोप रावणाला नीतीभ्रष्ट ठरवायला पुरेसा नाही. बरे, रावण खरेच लंपट असता तरी सीतेचे हरण केल्यानंतर तिलाही जनानखान्यात डांबले असते पण रावण तसे करत नाही. रावणाला ज्या कारणांनी दुर्गुणांचा पुतळा मानले जाते त्यातील खरे तर एकही कारण समर्थनीय नाही.

मूळ कथेत फेरफार करतांना अनेकदा विसंगती निर्माण होतात आणि त्या दुर करण्यासाठी नव्या स्पष्टीकरणकथा बनवाव्या लागतात. वाल्मिकी रामायणही त्याला अपवाद नाही. मुळ राम हा वैदिक संस्कृतीचा प्रतिनिधी होता असे दिसत नाही. पण राम-कृष्ण हे विष्णूचे अवतार ठरवले गेल्यानंतर मुळ एकाच संस्कृतीत झालेल्या संघर्षाला अत्यंत वेगळे असे आर्य-अनार्य रूप दिले गेले. सध्याचे रामायण राम हा भगवंताचाच अवतार आहे अशी धारणा दृढ केल्यानंतरच्या काळात अंतिम स्वरूपात नेण्यात आले आणि रावणाचे खलनायकत्व स्वाभाविकपणे दृढ झाले असे रिचमनसारखे अनेक विद्वान म्हणतात

एका अनामिक संस्कृत कवीने म्हटले आहे कि,

“लंकापते: संकुचितं यशो यत, यत्कीर्तीपात्रंरघुराज पुत्रं I

सर्वं तदेवादिकावे: प्रभावात, न निन्दनिया: कवया: क्षितींद्रे:II

याचा अर्थ असा कि राम कीर्तीशिखरावर चढला आहे आणि लंकाधिपतीचे यश इतके कमी झाले आहे त्याला कारण आदिकवीचे सामर्थ्य. म्हणून कवीला कधी हिणवू नये कारण कवी मनात आणतील तर सामान्यालाही असामान्य बनवून टाकतील किंवा थोर पुरुषांची कीर्ती धुळीला मिळवतील. म्हणजे या संघर्षात रावण खलपुरूष आहे अशी भावना सर्व काळात अस्तित्वात नव्हती. फक्त ‘रावणायन’ लिहिणारा कोणी वाल्मिकीन्च्या सामर्थ्याचा कवी पुढे आला नाही.

वाल्मिकी रामायणावरूनच पाहिले तरी ज्याचा पुतळा जाळला पाहिजे एवढा काही रावण दुष्ट नव्हता. पण आर्य अथवा वैदिक संस्कृती आणि राक्षस संस्कृतीतील समाजधारणा अत्यंत टोकाच्या विरुद्ध असल्याने आणि हे दोन्ही नायक आपापल्या संस्कृतीशी प्रामाणिक असल्याने हा संघर्ष झाला. रामाला उपास्य मानणा-या वाल्मिकीन्नाही त्याची पुरेपूर जाण असल्याचे दिसते. त्यामुळे रावण अधर्मी (वेगळ्या धर्माचा) असल्याचे सांगत त्याला निंदत असतांनाही जेथे शक्य आहे तेथे त्यांनी रावणाची मुक्तहस्ते प्रशंसा केल्याचे दिसते. त्या अर्थाने पाहता सध्या उपलब्ध असलेल्या रामायणाचे राम व रावण हे दोन वेगवेगळ्या संस्कृतींचे प्रतिनिधित्व करणारे नायकच आहेत. त्यात खलनायक कोणाला म्हणायचे हे ज्याच्या त्याच्या सांस्कृतिक धारणांवर सोडून द्यायला पाहिजे.

बरे, भारतात रावणाची किमान सात मन्दिरे आहेत जेथे रावणाची नित्य पूजा केली जाते. महाराष्ट्रासहित अनेक राज्यांत रावण आडनाव असणारी कुटुंबे आहेत. रावण आपला मुळ पुरुष आहे असे उतर भारतातील गोंडादि अनेक आदिवासी जमाती तर मानतातच पण गुजरातेतील साचोरा ब्राह्मणही त्याला आपला पूर्वज मानतात. कनौजी ब्राह्मणही आपला रक्षणकर्ता म्हणून त्याची नित्य पूजा करतात. श्रीलंकेतील सिंहली आणि तमिळ लोक रावणाला महायोद्धा, कुशल प्रशासक आणि आदर्श पुरुष म्हणून गौरवतात. श्रीलंकेत कोन्नेश्वरम येथेही रावणाचे मंदिर आहे.  म्हणजे रावण हा खलपुरुष आहे ही मान्यताही सार्वत्रिक नाही. अनेकांसाठी रावण पूजनीय आहे. त्यांचा पूर्वज आहे. आणि आजच्या सांस्कृतिक कोलाहलाच्या काळात अनेक विचारवन्तांसाठी तो एक वैदिक संस्कृतीच्या विरोधासाठीचे प्रतीकही बनला आहे. एका सांस्कृतिक संघर्षातून निर्माण झालेली रामकथा आधुनिक युगातही वेगळे संदर्भ धारण करत आहे. रावणाच्या व्यक्तीत्वाकडे नव्या दृष्टीने पाहिले जात आहे.

रामायणावरूनच पाहिले तर रावणाचे चारित्र्य मिश्र स्वरूपात रंगवले गेले असले तरी स्व-संस्कृतीशी असलेली त्याची निष्ठा ठायी ठायी प्रतीत होते. लोकाच्या दृष्टीने तो खलपुरूष असला तरी नेहमीच तसा राहील असे नाही.

-संजय सोनवणी

 


Saturday, April 3, 2021

ऋग्वेदातील सरस्वती नेमकी कोठे?


04 Apr 2021

 


विद्यापीठ अनुदान आयोगाने पदवीपूर्व अभ्यासक्रमात सिंधू संस्कृतीचे नामकरण 'सरस्वती संस्कृती' करण्याचे सूतोवाच केल्याने इतिहास संशोधकांमध्ये खळबळ उडाली असली तरी सरकार व सरकारी विलान मात्र या बदलामुळे संतुष्ट आहेत.

खरे तर पुरातत्त्व खात्याने २०१६ मध्येच आपल्या अहवालात पूर्वीचे सारे संकेत धुडकावून लावत घग्गर नदीला 'सरस्वती' असे संबोधले होते. अभ्यासक्रमाचे झपाट्याने वैदिकीकरण सुरू असल्याचे गेल्या काही वर्षांतील हालचालींमुळे दिसते. या लेखात आपल्याला मुळात हा सरस्वतीचा आग्रह का आणि ही नदी मुळात कोठे वाहते, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

घग्गर म्हणजे सरस्वती आहे काय, हे आधी आपण ऋग्वेदाच्याच आधारे पाहूयात. ६.६१, ७.९५ व ७९६ ही तीन सरस्वतीसुक्ते असून अन्य काही सूक्तांतही सरस्वती नदीचे उल्लेख आहेत. दुसऱ्या मंडलातील एका सूक्तात (२.४१.१६-१७) वैदिक ऋषींनी सरस्वतीला देवी व माता मानून तिची प्रार्थना केली आहे. या सूक्तात या नदीला 'नदीतमे, अम्बितमे, देवीतमे' असे संबोधले आहे. वेदांत सिंधू, सरस्वती व शरयू यांची गणना महानद्यांत केली असून सरस्वती ही सर्वश्रेष्ठ नदी आहे. ऋग्वेदातील दुसरी एक महानदी म्हणजे शरयू होय. (ऋ. १०.६४.९, ४.३०१८, ५.५३.९) ही नदी अफगाणिस्तानात आजही हरोयू अथवा हरी-रुद म्हणून वाहते. (अवेस्तन भाषेत रुद म्हणजे नदी). सरस्वती ही अवेस्त्यामध्ये या प्राचीन पारशी धर्मग्रंथामध्ये 'हरैवेती' म्हणून उल्लेखली गेलेली नदी असून आज ती हेलमंड या नावाने ओळखली जाते. याच हेलमंड नावाचे खोरे अफगाणिस्तानात प्रसिद्ध आहे. सरस्वतीप्रमाणेच शरयू नदीही हिंदुकुश पर्वतराजीत उगम पावते. गोमल नदीचेही उल्लेख ऋग्वेदात आहेत आणि ही नदीसुद्धा गुमल या नावाने आताच्या अफगाणिस्तान व पाकिस्तानातून वाहते. ऋग्+वेदाचा भूगोल सर्वस्वी दक्षिण अफगाणिस्तान आहे. सरस्वती नदी ही दक्षिण अफगाणिस्तानातून वाहते. तिथे तिला हरैवेती किंवा हरवती असं म्हणतात. भारतात या नावाची कोणतीही महानदी अस्तित्वात नाही. ज्या टोळ्यांचे उल्लेख ऋग्वेदात त्या टोळ्यासुद्धा इराणमधल्या आहेत. उदा. तुर्वसा (तुराणी), पार्थ (पार्थीयन), पख्त (पख्तून), भलानस (बलुची), परशु (पर्शियन), आर्य (इराण) इ. या जमाती आजही इराण, अफगाणिस्तान, पश्चिमोत्तर व तुर्कस्थानात अस्तित्वात आहेत.

आता अफगाणिस्तानात असलेली मूळची सरस्वती भारतात उचलून आणण्याचे कारण काय, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. याचे कारण आहे, या नदीच्या काठावर सापडलेली दीड हजारांपेक्षा अधिक सिंधू संस्कृतीकालीन अवशेष. आर्य येथलेच आणि सिंधू संस्कृतीचे निर्मातेही वैदिकच हे सिद्ध करण्याच्या नादात भूगोलच नव्हे तर भूगर्भशास्त्रसुद्धा बदलण्याचा हा अशास्त्रीय प्रयत्न आहे. महत्त्वाची बाब अशी की, पुरातत्त्वीय संशोधनांनुसार घग्गर ही संपूर्ण १७५० पूर्वी पर्जन्यमान चांगले असल्याने एक मोठी नदी असली तरी ती नेहमीच मान्सूनवर अवलंबून होती. हिमालयातून तिचा उगम होत नाही. घग्गरच्या पात्रातील गाळ व रेतीवर केलेल्या अनेक भूशास्त्रीय परीक्षणांतून हे सिद्ध झाले आहे की, इसपू दहा हजार वर्षांपासून त्यात हिमालयीन गाळाचे अवशेष मिळत नाहीत. ऋग्वेदात वर्णन केल्याप्रमाने पहाडांतून झेपा घेत खाली उतरणारी, रथसदृश वेगवान अशी घग्गर पुरातन काळातही नव्हती. इसपू १७५० नंतर सिंधू खोऱ्यात पर्जन्यमान खालावले. विदेश व्यापार ठप्प झाला. नागरी वसाहती ओस पडू लागल्या. लोकांनी जगण्याच्या पद्धती बदलल्या. घग्गर नदीचे पात्र आक्रसले, तर वाळवंटात काही ठिकाणी ही नदी रेतीखालून क्षीण वाहू लागली. पाकिस्तानात हक्रा येथे पुन्हा पात्रात आली.

घग्गर नदीच्या खोऱ्यात जपानी व ब्रिटिश संशोधकांनी केलेल्या भूशास्त्रीय संशोधनात घग्गर ही वैदिक सरस्वती असूच शकत नसल्याचे विपुल पुरावे समोर आलेले आहेत. घग्गर नदी ही गेल्या दहा हजार वर्षांपासून मान्सूनवर अवलंबून असलेली सामान्य नदी होती, हिमालयातून तिला कधीही जलपुरवठा होत नव्हता, हे आता सिद्ध झालेलं आहे. त्यामुळे ऋग्वेदातील सामर्थ्यसंपन्न देवतेसारखी 'अंबितमे' मानली गेलेली, हिमालयापासून उगम पावलेली सरस्वती घग्गर नव्हे. शिवाय वैदिक विलान 'उपग्रहीय चित्रांमुळे हरवलेली सरस्वती सापडली.' असा दावा करत होते; पण प्रत्यक्षात घग्गर नदी कधीही हरवलेली नव्हती. ती आजही मान्सूनमध्ये वाहती नदी आहे. तिला १९८८ ते २०१३ पर्यंत आठ मोठे पूरही आल्याची नोंद आहे. मग जे हरवलंच नव्हतं, गुप्तच झालेलं नव्हतं ते कसं सापडेल? उलट अवेस्त्यातील हरहवतीची वर्णनं आणि ऋग्वेदातील सरस्वतीची वर्णनं एकसारखी आहेत, हा योगायोग नाही. वैदिक विदवानांनी हिडेकू मेमेकू, गिसन, तोशिकी ओसाडा, पिटर क्लिफ्ट, संजीव गुप्ता यांसारख्या भूशास्त्रसंशोधकांनी या दशकातच केलेल्या घग्गरच्या पात्रावरील भूशास्त्रीय संशोधनं वाचायचे कष्ट घेतले पाहिजेत.

ऋग्वेदाची रचना ज्या खळाळत्या सरस्वतीकाठी झाली, ती सरस्वती भारतातली असू शकत नाही. कारण मुळात ऋग्वेदाची रचना इसपू १५०० ते इसपू १२०० या काळात सुरू होती आणि भारतातील घग्गर नदी वेदरचना सुरू होण्यापूर्वीच आटली होती हे पुरापर्यावरणाने सिद्ध केले आहे. त्यामुळे घग्गर नदीला बळजबरीने सरस्वती ठरवत एका संस्कृतीचेच नामांतर करत तिच्या निर्मितीचे नसते श्रेय घेण्याचा प्रयत्न सांस्कृतिक दहशतवादात मोडतो, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. वैदिक धर्म येथलीच निर्मिती सिद्ध करण्याचा आटापिटा भारतीय ज्ञानपरंपरेशी विसंगत आहे. सिंधू-घग्गर संस्कृती वैभवाच्या शिखरावर गेली व तिचा ऱ्हासही झाला (इसपू ७००० ते इसपू १७५०) तेव्हा वैदिक धर्माचा जन्मही झाला नव्हता. त्यामुळे सिंधू संस्कृतीशी 'वैदिक' संबंध जोडण्याचा प्रयत्न अश्लाघ्य आहे; पण हे सरकार मुळात वैदिकवादी असल्याने आणि कोणत्याही ऐतिहासिक तथ्यांशी त्याला कर्तव्य नसल्याने शिक्षणाचा खेळखंडोबा सुरू आहे.

सरस्वती नदीकाठी ऋग्वेद लिहिला गेल्याने ती नदी वैदिकांना पूज्य वाटणे स्वाभाविक आहे. सरस्वती नदीचे दैवीकरण करत तिला ज्ञानाची देवता मानणेही समर्थनीय आहे; पण संस्कृती वर्चस्ववाद निर्माण करत आपली पाळेमुळे येथीलच आहेत, हे दाखवण्याच्या केवीलवाण्या प्रयत्नांतून त्या नदीचा भूगोलच बदलून टाकणे, हे जागतिक ज्ञानक्षेत्रातही हास्यास्पद ठरते आहे आणि याचे भान सरकारला नसले तरी सर्वसामान्य जनतेला असले पाहिजे. वैदिकांनी त्यांच्या व्यक्तिगत स्तरावर काय मान्य करायचे व काय अमान्य हा त्यांचा अधिकार आहे; पण अशास्त्रीय अनैतिहासिक दावे जर अभ्यासक्रमात घुसवून धादांत खोटा इतिहास सर्वांच्या माथ्यावर मारला जाणार असेल तर मात्र त्याचा विरोध व्हायला पाहिजे. सरस्वती नदी भारतात नाही आणि वैदिकांचा सिंधू संस्कृतीशी कसलाही संबंध नाही, हे वारंवार सिद्ध झालेले ऐतिहासिक सत्य आहे, हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे.


“पउमचरिय”: रामकथेवरील आद्य महाकाव्य

          भारतीयांवरील रामकथेची मोहिनी अचाट आहे. रामकथेचे मूळ नेमक्या कोणत्या स्त्रोतात आहे हे शोधण्याचाही प्रयत्न झाला आहे. परंपरेने वाल्...