श्रेणी, कुल, पुग व गण या व्यावसायिक, उत्पादक, शेतकरी आणि पशुपालक समाजांच्या आपापल्या व्यवसायानुसार स्थापन झालेल्या संस्था हा भारतातील आर्थिक इतिहासाचे प्रदिर्घ पर्व आहे. चर्मकार, बुरुड, स्वर्णकार असे असंख्य व्यवसाय व व्यापारी यांच्या श्रेण्या सिंधु काळापासुन स्थापन झालेल्या होत्या. आपापल्या व्यवसायांचे नियमन करणे, नवागतांना प्रशिक्षित करणे, उत्पादित मालाचा अथवा सेवेचा दर्जा राखणे, किंमती नियमीत करणे व करांच्या संदर्भात राजदरबारी प्रतिनिधितव करणे हे काम या श्रेण्या, कुले तर करतच पण त्यांना ठेवी स्विकारणे ते कर्ज देणे आणि नाणी पाडण्याचेही अधिकार होते. इसवी सनाच्या तिसऱ्या शतकापर्यंत आपल्याला श्रेण्यांनी पाडलेली नाणी मिळून येतात.
Wednesday, December 20, 2023
श्रेणी, कुल, पुग व गण
सिंध-गांधार भागात श्रेणीला निगम अथवा नेकम म्हणत असत. सिंधु काळापासुन भारताने आर्थिक भरभराट पाहिली ती या स्वातंत्र्य असलेल्या व्यावसायिक श्रेण्यांमुळे. या श्रेण्यांचे व्यापार देश-विदेशात चालत. बौद्ध जातकांत या अशा श्रेण्यांच्या वैभवाचे चित्रण तर मिळतेच पण विविध दानलेखांतुन सातवाहन काळापर्यंत ते किती वैभवशाली होते हेही आपल्याल समजते. श्रेण्या आपल्या व्यवसायात येवू इच्छिणा ऱ्या उमेदवारांसाठी प्रशिक्षणाचीही सोय करत. नवीन व्यवसाय निर्माण झाले की त्याच्याही श्रेण्या बनत. मागणीप्रमाणे लोक एका व्यवसायातून दुस ऱ्या व्यवसायात सहजपणे जात. लोकही आपले ओळख आपण करत असलेल्या व्यवसायानुसार देत.
या श्रेण्यांचे सदस्य मतदानाने आपला अध्यक्ष निवडत. त्याला सेठ्ठी (श्रेष्ठी) असे म्हटले जाई. हे पद वंशपरंपरागत नसे. या सेट्ठींना, मग ते वीणकर श्रेण्यांचे असो की चर्मकारांच्या श्रेण्यांचे, समाजात व राजदरबारी त्यांना मोठा मान असे. प्रत्येक श्रेंण्यांची, कुलांची स्वतंत्र न्यायालयेही असत व आपल्या दोषी सदस्यांवर कारवाया करण्याचे अधिकारही त्यांनाच असत. गुप्त काळात वैदिक धर्माला राजाश्रय मिळाल्यानंतर मात्र परिस्थिती पालटली. नाणी पाडण्यासकटचे श्रेण्यांचे अनेक अधिकार काढून घेण्यात आले. वस्त्रोद्योग ते खाण उद्योग सरकारी नियंत्रणाखाली व मालकीखाली आणले गेले.
गुप्तांच्या पतनानंतर देशात सामंतशाहीने प्राबल्य गाजवायला सुरुवात केल्यानंतर तर श्रेण्यांचे अधिकच पतन झाले. वारंवारच्या युद्धांमुळे व अस्थिर राजकीय स्थितीमुळे व्यापारावर बरीच बंधने आली. असे असले तरी अकराव्या शतकापर्यंत ही व्यवस्था कायम राहिली. सन १०२२ पासून देशात दुष्काळांची रांग लागली आणि केंद्रीभूत झालेली उत्पादन/सेवा विस्कळीत झाली. अर्थव्यवस्था ढासळल्याने व सातत्याने होत असलेल्या परकीय आक्रमणांमुळे उत्पादक व सेवा पुरवठादार गाव पातळीवर विखुरले. बलुतेदारी अथवा रयत पद्धतीचा उगम त्यातुनच झाला. परकीय सत्तांनी स्वधर्मीय सोडून इतरांवर अधिकचे कर तर लादलेच पण विदेश व्यापारही आपल्या हातात घेतला. परिणामी आहे ते व्यवसाय स्थानिक गरजांपुरते सीमित झाले. स्पर्धा नको म्हणून आपल्या व्यवसायात इतरांना प्रवेश देणे थांबले. आजची जातीव्यवस्था याच विपरित आर्थिक व राजकीय स्थितीतून निर्मांण झाली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Linguistic Theories
The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...
-
इतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...
-
आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...
-
(माझा खालील लेख "संभाजी...मृत्युंजय पण हतबल" या शिर्षकाखाली किस्त्रीमच्या यंदाच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला आहे. जिज्ञासू वा...
No comments:
Post a Comment