भारतीय उपखंडावर आजवर झालेल्या ज्ञात आक्रमणांचा आणि सत्ताविस्ताराचा वेध घेत असताना आपण त्याचा भारतीय संस्कृतीवर झालेल्या ब-या वाईट परिणामांचीही चर्चा करत आहोत. भारत ही नेहमीच आक्रमकांना आकर्षित करणारी सुवर्णभूमी होती. इराण आणि मध्य आशिया हा तुलनेने अविकसित आणि रानटी व भटक्या टोळ्यांनी व्यापलेला होता. भारतातील समृद्धीमुळे त्यांचे लक्ष इकडे वळाले आणि शक-कुशाण आणि नंतर हुणांनीही आक्रमणे केली, पश्चिमोत्तर भारतावर सत्ताही प्रस्थापित केल्या याचा इतिहास आपण पाहत आहोत. ग्रीस आणि इराण सांस्कृतिक आणि राजकीय दृष्ट्या प्रबळ असल्याने साम्राज्य विस्तारासाठी आणि व्यापारी मार्गांवर स्वामित्व ठेवण्यासाठी त्यांनीही भारतावर आक्रमणे केली. आपण मागील लेखांमध्ये कुशाण या मध्य आशियातील जमातीने भारतातही आपले साम्राज्य कसे पसरवले याचा इतिहास पाहिला. तोवर कुशाण वगळता पंजाबच्या पार सत्ता स्थापन करण्यात कोणालाही यश मिळालेले नव्हते.
जगाचा इतिहास पाहिला तर कोणतीही सत्ता अमरपट्टा घेऊन आलेली नसते हे आपण सहज पाहू शकतो. भारतातही मौर्य साम्राज्य बलाढ्य असतानाही ते विखंडीत होत नष्ट झाले. तत्पूर्वीचे नंद साम्राज्याही एका शतकभराच्या कालावधीत नष्ट झाले होते. कुशाणांनी स्थापन केलेली सत्ता इसवी सनाच्या ३२५च्या आसपास आकुंचित होत नष्ट झाली. एका साम्राज्याचा अस्त अनेक कारणांनी होत असला तरी अनेकदा तो अस्त नव्या बलाढ्य सत्तेच्या उदयामुळे झालेला असतो हे अनेक उदाहरणांवरुन पाहता येते. कुशाण सत्तेचा अस्त व्हायला जबाबदार झाले ते भारतात उदयाला आलेले गुप्त साम्राज्य आणि इराणमधील नव्याने उदयाला आलेले सस्सानियन (सस्सानिद) राजघराणे.
इराणमधील प्राचीन अकेमेनिड साम्राज्याच्या अस्तानंतर बराच काळ इराणमध्ये सातत्याने सत्ताबदल होत राहिले. इसवी सनाच्या २०५ मध्ये पार्थियन साम्राज्याचा अंत घडवून सस्सानियन राजघराण्याचा उदय झाला. हे पारशी धर्माचे अनुयायी असलेले घराणे. आर्देशीर (पहिला) हा या घराण्याचा संस्थापक. इस्तखर या शहरात या राज्याची स्थापना करण्यात आली. हे ठिकाण अकेमेनिड साम्राज्याची राजधानी पर्सेपोलीसपासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर होते. राज्यस्थापना केल्यानंतर बल्ख प्रांतावर पर्शियन सस्सानियनानी हल्ले सुरु केले. तेथील कुशाण सत्ता उखडून टाकण्यात आली. अर्देशीर (पहिला)चा पुत्र शापूरने या सीमा पश्चिमोत्तर भारतापर्यंत वाढवल्या. कुशाणांची उरली सुरली सत्ताही संपुष्टात आली. कुशाणांना हरवून जेथेही सत्ताविस्तार केला तेथे नेमलेल्या प्रांत अधिका-यांना त्यांनी “कुशाणशाह” असे नाव दिले. सस्सानिदांची कुशाणशाही नाणी तक्षशिला आणि त्यापारच्या भागात आढळली आहेत. त्यावर कुशाण नाण्यांच्या शैलीचा प्रभाव पहायला मिळतो. भारतात या सत्तेचा विस्तार सिंधू नदीच्या पश्चिम किना-यापर्यंत पोचला असावा असा अंदाज सापडलेल्या कुशाणशाही नाण्यांवरून बांधला जातो. अफगाणिस्तान मध्ये नंतरच्या काळात ज्या शाह्या निर्माण झाल्या त्यांची मुळे सस्सानिदांपर्यंत पोचतात ती अशी.
शापूर हा पराक्रमी राजा होता. त्याने भारतातील तक्षशिलाच नव्हे तर रोमनांचाही पराभव करून आपली सत्ता एन्टीओकपर्यंत वाढवली. रोमन सम्राट व्ह्यलेरिअन याला त्याने पकडून जन्मभर आपल्या कैदेत ठेवले. अनातोलियापर्यंत त्याने झेप घेतली. अनातोलिया हा प्रांत आताच्या पश्चिम आशियातील टर्की देशाचा भाग आहे. थोडक्यात भारतापासून ते पश्चिम आशियाच्या टोकापर्यंत हे साम्राज्य पसरले होते. पण नंतरचा शासक दुस-या बेहरामच्या काळात सिस्तन (शकस्तान) प्रांताचा शहा ओम्रीज्दने बंड पुकारले व ‘राजांचा राजा’ असे बिरूद घेत स्वातंत्र्य घोषित केले. तक्षशिला (गांधार) प्रांतही त्याच्याच अखत्यारीत होता. त्याच्या बंडाला आता सत्ताच्युत झालेल्या कुशाणांनीही पाठींबा दिला. पण हे बंड दीर्घकाळ टिकले नाही. बेहराम (दुसरा) याने पूर्ण शक्तीनिशी बंड चिरडून टाकले. ओम्रीझ्दच्या दुस-या बेहरामने केलेल्या पराभवाचे भित्तीचित्र नक्ष-ए-रुस्तुम या ठिकाणी कोरले गेलेले आहे. बेहरामने स्वत:च्या पुत्राला शकस्तान प्रांताचा शहा घोषित केले. सस्सानियन सत्ता पुन्हा स्थापित झाली.
या सस्सानीद प्रांत-अधिका-यांनी कुशाणशहा हे नुसते नाव घेतले नाही तर त्यांच्या वेशभूषेवरही कुशाणांचाच प्रभाव राहिला हे त्यांनी पाडलेल्या नाण्यांवरील चित्रणावरून लक्षात येते. कुशाणही पारशी धर्माचे अनुयायी असल्याने त्यांना हे अनुकरण जड गेले नसावे. नाना देवतेचे प्रतीकही त्यांनी शिरोभूषणात अभिमानाने मिरवले. थोडक्यात भारतातील सस्सानीद सत्ता ही एक प्रकारे कुशाण सत्तेचाच विस्तारित भाग होता असे म्हणता येईल.
अर्थात याही साम्राज्याचा नाश होणे नियत होते. या साम्राज्याच्या विनाशाला कारण झाले ते मंगोलिया प्रांतातून मध्य आशियात विस्थापित झालेली एक उपद्रवी भटकी पण लढाऊ जमात. यांचा उल्लेख चिनी कागदपत्रात झ्वांग-नु असा येतो, तेच हे हूण. त्यांनी सस्सानियन साम्राज्यावर हल्ले करायला सुरुवात केली. सुरुवातीचे अनेक हल्ले त्यावेळचा सम्राट दुसरा यझ्देगर्दने परतवण्यात यश मिळवले आणि त्यांना ऑक्सस नदीच्या पल्याड हुसकावून लावले. तरी हूण पुन्हा एकत्र झाले आणि त्यांनी पाचव्या शतकाच्या अंतिम चरणात इराणवर सर्वशक्तीनिशी हल्ला केला. प्रचंड लुटपाट आणि जाळपोळ करण्यात आली. त्यामुळे सस्सानिद साम्राज्य कोलमडले. अस्थिरता निर्माण झाली. सम्राट फिरोजने तरीही एकवार पुन्हा हुणांशी उरल्या-सुरल्या शक्तीनिशी बल्खजवळ झुंज दिली. हुणांनी यावेळेस अत्यंत हिस्त्र पद्धतीने युद्ध केले. या भीषण युद्धात फिरोज ठार मारला गेला. त्याची सेना तर नष्ट झालीच पण फिरोजचे शवही मिळाले नाही. त्याचे चार पुत्र आणि भाऊही मारले गेले. पुढचे सस्सानिद राजे हे मांडलीकाच्या दर्जाला पोचवले गेले. भारतावरील त्यांची सत्ता नष्ट झाली. हे साम्राज्य सातव्या शतकापर्यंत कसेबसे टिकून राहिले असले तरी त्याचा प्रभाव मात्र ओसरलेला होता. अरब मुस्लिमांनी या साम्राज्याच्या शवपेटीवर शेवटचा खिळा ठोकला.
या सत्तेने पश्चिमोत्तर भारतावर फारसा वेगळा प्रभाव टाकण्यात यश मिळवले नाही. त्यांचा सांस्कृतिक ठसाही उमटला नाही. गुप्त साम्राज्याचा विस्तार या काळात होत असला तरी त्यांनी सस्सानिदांची सत्ता उखडून फेकण्याचा प्रयत्न केल्याचेही दिसून येत नाही. सस्स्सानिद साम्राज्याचा अंत घडवल्यानंतर दुस-या हूण टोळीने भारतावर आक्रमण करून गांधार (पेशावर प्रदेश) काबीज केला. पुढील आक्रमणाला गुप्त सम्राट स्कंदगुप्त (४५५–६७) याने निकराने प्रतिकार केला. ४५८ च्या पूर्वी झालेल्या या घनघोर लढाईचे वर्णन ‘हूणैर्यस्य समागतस्य समरे दोर्भ्यां धरा कम्पिता’ (स्कंदगुप्त आपल्या बाहुबलाने हूणांबरोबर युद्ध करीत असता, पृथ्वी कंपित झाली) या शब्दांत कोरीव लेखात केले आहे. यानंतर जवळजवळ ४० वर्षांपर्यंत हूणांना भारतावर आक्रमण करण्याचे धैर्य झाले नाही. ते केले तोरमान या हुण राजाने. हुणांचे आक्रमण आणि भारतात झालेल्या राजकीय उलथापालथीचा इतिहास आपण पुढील लेखात पाहू.
-संजय सोनवणी