Sunday, January 13, 2019

वेडगळ जिद्दीला कवटाळणारा नेता!




राष्ट्रवादी उन्मादाची परिसीमा गाठली गेल्यावर शहाणपणाला तिलांजली देत काय घडवता येऊ शकते हे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच दाखवून दिले आहे. आपल्या लाडक्या पण तशा निरुपयोगी प्रकल्पासाठी अमेरिकन काँग्रेसने निधी मंजूर न केल्यामुळे त्यांनी अर्थविधेयकावर सही करणे नाकारले. परिणामी अमेरिकी सरकारच्या महत्त्वाच्या खात्यांतील कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठीही निधी मंजूर झाला नाही. अनेक खात्यांच्या चार लाख कर्मचाऱ्यांना घरी पाठवावे लागले आणि उर्वरित चार लाख कर्मचाऱ्यांना सध्या विनावेतन काम करावे लागते आहे. गेले तीन आठवडे अंशत: "सरकार-बंद" अशी स्थिती निर्माण झाली आहे. जर काँग्रेसने आपल्याला हवा तो निधी मंजूर केला नाही तर आपण आपल्या अधिकारात आणीबाणी घोषित करू आणि आपला प्रकल्प पूर्ण करू, अशी धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. ट्रम्प यांच्या प्रकल्पाला बहुतांश सदस्यांचा विरोध असल्याने ते निधी मंजूर करणार नाहीत. त्यामुळे ट्रम्प खरोखरच आणीबाणी घोषित करू शकतात आणि त्या काळात हाती येणाऱ्या अमर्याद अधिकारांमुळे ते आपला अजेंडा रेटू शकतात, अशी भीती निर्माण झाली आहे.

काय आहे हा ट्रम्प यांचा प्रकल्प हे आधी पाहूयात. अमेरिका आणि मेक्सिकोदरम्यान जवळपास दोन हजार मैल लांबीची सीमा आहे. या सीमेवरून आजवर जवळपास ६५ लाख मेक्सिकोतील नागरिक बेकायदा अमेरिकेत घुसले आहेत. या घुसखोरांमुळे अमेरिकेत हिंसक गुन्ह्यांत वाढ तर झालीच आहे, पण अमली पदार्थांची तस्करी करण्यात हे मेक्सिकोचे नागरिक आघाडीवर असल्याने अमेरिकन युवकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. या घुसखोरांमुळे अमेरिकी नागरिकांचा रोजगारही हिरावला जात आहे, असे आरोप करत ही घुसखोरी रोखण्यासाठी मेक्सिको-अमेरिकेच्या सीमेवर तीस फूट रुंद, तीस फूट उंच आणि दोन हजार मैल लांबीची भिंत बांधायची त्यांची योजना आहे. २०१६ च्या आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात ट्रम्प यांनी अशी भिंत बांधायचे आश्वासन दिले होते. ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी काँग्रेसकडे ५ अब्ज ७० कोटी डॉलर्सचा निधी मागितला होता. ही मागणी फेटाळली गेल्याने त्यासोबतच अनेक विभागांचे वेतननिधीचे विधेयकही नामंजूर केले गेले आणि खुद्द तेथील सरकारी कर्मचाऱ्यावर तात्पुरती का होईना पण बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. हा अमेरिकेच्या इतिहासात सर्वाधिक काळ झालेला 'शट-डाऊन' आहे. हा पुढे वर्षभर चालला तरी पर्वा नाही, पण मी हा सीमा भिंतीचा प्रकल्प पूर्ण करणारच असा हेकेखोरपणा करत प्रसंगी आपण आणीबाणीही आणू, अशी धमकी ट्रम्प यांनी दिली आहे.

ट्रम्प यांचे राष्ट्रवादी धोरण नवे नाही. अमेरिकी मालाला चीन व अन्य देश स्पर्धा करतात म्हणून त्यांनी आयात मालावरचे कर भरमसाट वाढवल्याने आंतरराष्ट्रीय व्यापारयुद्ध सुरू झाले. भारतासह सर्व देशांच्या अर्थव्यवस्थेवर या व्यापारयुद्धाने विपरीत परिणाम केला. अजूनही त्यावर तोडगा निघालेला नाही. बरे, यामुळे अमेरिकन उत्पादनांना फायदा झाला असेही चित्र नाही. उलट अमेरिकेतील रोजगारात घटच झाली. किंबहुना स्वदेशीसारख्या राष्ट्रवादी संकल्पनांनी जगातील कोणत्याही राष्ट्राचे भले केलेले नाही. जग अधिकाधिक खुल्या स्पर्धेचे होत चालले असताना दर्जा आणि वाजवी किंमत या तत्त्वावर जाणारेच जागतिक बाजारपेठेवर स्वामित्व गाजवतात. सरकारचे काम आपल्या उत्पादन आणि सेवा क्षेत्राला अधिकाधिक कार्यक्षम बनवण्यासाठी योग्य आणि खुले वातावरण निर्माण करणे एवढेच असते, प्रत्यक्ष बाजारपेठेत लुडबुड करण्याचे नाही हे ट्रम्प यांच्या गावीही नाही. त्यांनी व्यापारयुद्ध सुरू केले आणि त्याचा फटका आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेला बसताना दिसत आहे.

तीच बाब या मेक्सिकोलगतच्या सीमा-भिंत प्रकल्पाची आहे. सीमेवर भिंत बांधली म्हणजे घुसखोरी थांबेल हा बालिश तर्क आहे, असे अमेरिकेतीलच संरक्षण तज्ज्ञ म्हणतात. बरे, आजवर जरी सुमारे ६५ लाख घुसखोर अमेरिकेत घुसले अशी आकडेवारी असली तरी गेल्या काही वर्षांत घुसखोरीचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत सीमेवरील देखरेख वाढवल्यामुळे घुसखोरांना आळा बसला हे एक वास्तव आहे. त्यातच प्रभावी वाढ करत कमी खर्चात या घुसखोरांना पायबंद घालता येणे सहज शक्य आहे आणि त्यासाठी ट्रम्प यांनी निधी मागितल्यास त्याला हरकत घेतली जाणार नाही, असेही अनेक सिनेटर्स म्हणतात. भिंत बांधून सीमा पूर्ण बंद केली तरी घुसखोरांना आत शिरण्याचे समुद्रमार्गांसारखे इतरही मार्ग उपलब्ध आहेतच. त्यामुळे एवढा अवाढव्य खर्च करून भिंत बांधणे हा निव्वळ वेडगळपणा आहे हे उघड आहे. यामुळे मूळ समस्या सुटणार तर नाहीच, पण केवळ या हजारो मैल लांबीच्या देखभालीचा खर्च कायमचा बोकांडी बसेल, याचेही भान ट्रम्प यांना राहिलेले नाही.

तथापि, ट्रम्प यांनी राष्ट्रवादी भावनात्मक मुद्द्यालाच अधिक महत्त्व दिले आहे. "आठ लाख सरकारी कर्मचारी आज बेरोजगार आहेत याचे मला दु:ख नसून सीमेवरून घुसलेल्या गुन्हेगारांनी ज्या अमेरिकनांना ठार मारले त्यांच्याबद्दल मला अधिक दु:ख आहे...' असे विधान त्यांनी आणीबाणीची धमकी देताना केले आहे. शत्रुराष्ट्र, धर्म अथवा अन्य वंशाच्या लोकांबाबत भयगंड निर्माण करत राष्ट्रवादी भावनांना चेतवण्याचे उद्योग भारतासारख्या अविकसित देशातच होतात असे नाही. प्रगत अमेरिकाही अशा संकुचित आणि प्रसंगी अर्थव्यवस्थेलाही खड्ड्यात घालणाऱ्या, पण भावनात्मक मुद्द्यांच्या आहारी जात ट्रम्पसारख्यांना अध्यक्षपदी बसवू शकते हे आता सिद्ध झाले आहे.

ट्रम्प यांचा अडेलतट्टू स्वभाव पाहता ते आपल्या प्रकल्पाला स्थगिती देतील असे दिसत नाही. त्यामुळे अमेरिकेत खरेच लवकरच आणीबाणी लादली जाईल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. जर अशी आणीबाणी घोषित झालीच तर न्यायालयात धाव घेण्याची तयारीही आतापासूनच सुरू झाली आहे. मेक्सिकोतून होणारी घुसखोरी ही राष्ट्रीय आपत्ती मानून ही आणीबाणी घोषित केली जाईल. याचा विपरीत परिणाम अमेरिकेच्या व पर्यायाने जगाच्या अर्थव्यवस्थेवर होईल. म्हणजेच आधीच अर्थसंकटात सापडलेले जग या आपत्तीने होरपळून निघेल याचे भान ट्रम्प यांनी गमावलेले आहे. बरे, यात अमेरिकेचे काही माेठे अर्थहित साधले जाणार आहे, असेही नाही. आत्ताच्या सरकारी कामकाज ठप्प पडण्याच्या घटनेचा परिणाम अमेरिकेचा जीडीपी घसरण्यावर होणारच आहे; कारण मागे जे काही अल्पकालीन शट-डाऊन झाले तेव्हाचा जीडीपी घसरल्याचा अनुभव अमेरिकेच्या गाठीशी आहे. आणीबाणी घोषित केली तर ट्रम्प यांना आपल्या अधिकारातच तिजोरीतील आपत्तीनिधी तर वापरता येईलच, पण संरक्षण विभागासह अन्य खात्यांचा निधीदेखील ही भिंत बांधण्यासाठी ते वळवू शकतील. परिणामी या खात्यांना आपले अनेक प्रस्तावित प्रकल्प सोडून द्यावे लागतील. ही सीमेवरील प्रस्तावित भिंत घुसखोरी थांबवण्यासाठी परिणामकारक तर ठरणार नाहीच, पण बलाढ्य अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या गळ्याला नख लावेल. एका लोकशाही राष्ट्रात हुकूमशाही प्रवृत्तीचा नेता वेडगळ जिद्दीला कवटाळत देशाला कोणत्या ऱ्हासाकडे न्यायला तयार होऊ शकतो, हे याचे उदाहरण आहे.

भारतातही काही वेगळे घडते आहे असे नाही. राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रभक्ती यातील फरक न समजणारे नागरिकच अशी संकटे निमंत्रित करत असतात. पुतळे, मंदिरे, सर्जिकल स्ट्राइक, रस्ते-गावांची नामकरणे, गोरक्षा यातच ज्यांना राष्ट्रभक्ती दिसते ते जीवनावर प्रत्यक्ष परिणाम करणाऱ्या अविवेकी अर्थधोरणांकडे दुर्लक्ष करत जातात. त्यात देश मात्र पेचात सापडत जातो. ट्रम्प यांची आणीबाणीची धमकी ही जगातील भारतासहित सर्वच अर्थव्यवस्थांसाठी आणीबाणीचेच संकट आणणारी घटना आहे. अविवेकी नेते सत्तेवर स्थानापन्न होऊ देणे किती धोक्याचे असते याची जाणीव करून देणारी ही धमकी आहे. भारतीयांनी यावर अधिक गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे!

(Published in Divya Marathi)

No comments:

Post a Comment

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...