समाजकेंद्री प्रशासिका
Monday, May 31, 2021
समाजकेंद्री प्रशासिका
Monday, May 17, 2021
“सकारात्मक”
केंद्र सरकार क्रूर, अमानुष, हिंस्त्र आहे
Saturday, May 15, 2021
"अंगविज्जा" - कुशाणकालीन समाजव्यवस्था
भारतीय
संस्कृतीचा इतिहास शोधत असतांना आपल्या इतिहासकारांनी वैदिक साधने हीच प्रमाण
मानून सामाजिक इतिहासाचे चित्रण केले आहे. त्यामुळे त्या इतिहासात प्रचंड
विरोधाभास आहे. वास्तव व काल्पनिकतेची सरमिसळ आहे. पण प्राकृत-पाली साधने वापरली तर तुलनात्मक
अभ्यास करून सत्यापर्यंत जायला मदत होते. वैदिक साधनांत येणारा इतिहास
स्वाभाविकपणेच वैदिक संस्कृतीचा असल्याने व अन्य संस्कृतींना त्यात दुय्यम आणि कधी
तिरस्करणीय मानले असल्याने त्याची जीही माहिती येते ती बव्हंशी दुषित असते.
कुशाणकाळात
(इसवी सनाच्या पहिल्या शतकात) लिहिला गेलेला “अंगविज्जा” नावाचा तत्कालीन सामाजिक
स्थितीबाबत माहिती देणारा एक ग्रंथ आहे. या ग्रंथामुळे आपला समाजेतिहास नव्याने उलगडतो आणि अनेक
कुटप्रश्नांवर प्रकाश टाकतो हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे.
अंगविज्जावरून प्रतीत
होणारी सर्वात महत्वाची बाब म्हणजे जन्माधारित जातीव्यवस्था कुशाणकाळापर्यंतही
जन्माला आलेली नव्हती. ग्रंथकार असंख्य व्यवसायांची कोशाप्रमाणे जंत्रीच देतो, पण त्यांना "जात" हा शब्द कोठेही वापरत नाही किंवा व्यवसाय
जन्माधारित होते असे कोठे सुचवतसुद्धा नाही. जन्माधारित व्यवस्थेचे समर्थक वैदिक.
त्यांच्या ग्रंथांत मात्र सर्वत्र तशीच समाजव्यवस्था होती असे ठासून लिहिलेले
असते. अंगविज्जेत "गृहपती" (प्राकृत-
गहवई) या संज्ञेने हिंदू धरातील (वैदिक ज्यांना शुद्र म्हणत त्या) प्रतिष्ठितांची
ओळख मिळते. हाल सातवाहनाच्या गाथा सप्तशती या त्याच काळातील काव्यग्रंथात गहवई
(गृहपती) ही उपाधी वारंवार येते. वैदिक विद्वानांनी या उपाधीचा नेमका अर्थ काय
यावर काथ्याकुट केला आहे कारण ही उपाधी वैदिक साहित्यातून गायब आहे. शुद्रांत
प्रतिष्ठित वर्ग असायचा हेच वैदिकांना अमान्य होते याचे हे लक्षण.
लोकधर्म (वैदिक शुद्र अथवा
अनार्य म्हणत त्यांचा धर्म) हा विस्तृत असून ब्राह्मण, क्षत्रीय व वैश्य यांच्या
धर्माला त्या काळात एकत्रितरीत्या आर्य धर्म म्हणत. हा छोटा व एकूण समाजात नगण्य
धर्म होता. इसपू सहाव्या शतकातील भगवान महावीर व बुद्ध काळातील साहित्यातही हा
धर्म प्रबळ असल्याचे चित्रण येत नाही. दिक्षा अथवा संन्यास घेतलेल्या बौद्धांना
मुंडक म्हणत तर जैनांना समन (श्रमण) म्हणत. तत्कालीन चवथा मोठा धर्म-समूह म्हणजे
म्लेंच्छ. या म्लेंच्छात ग्रंथकाराने यवन, शक, कुशाण, क्षत्रपादि लोकांचे धर्म सामाविष्ट
केलेले आहेत. थोडक्यात जे वैदिक अथवा श्रमण. मुंडक नाहीत त्यांना शूद्र (अनार्य) अथवा
म्लेंच्छ संबोधायची तेंव्हाचीही परंपरा होती. पतंजलीच्या महाभाष्यातही अगदी हीच
मांडणी आहे. एवढेच नव्हे तर मनुस्मृतीही काही ठिकाणी म्लेंच्छांतर्गत जे वैदिक
नाहीत त्या सर्वांचा समावेश करते. अर्थात हीन स्थान देवून. परधार्मियांबाबत हा
दृष्टीकोन बव्हंशी धर्म ठेवत असल्याने यात नवल वाटायचे काही कारण नाही. महत्वाची
बाब म्हणजे वैदिक धर्म हा बौद्ध,
जैन व अनार्य शुद्रांच्या
धर्मापेक्षा वेगळा व स्वतंत्र होता याचा वेगळा स्वतंत्र पुरावा
"अंगविज्जा" देतो. असे असूनही आज वैदिक आणि हिंदू हे धर्म एकत्रच समजले
जातात यामागे सांस्कृतिक अज्ञान हे एकमेव कारण आहे.
त्या काळात देवतांमध्ये
शिव, उमा. वैश्रवण (यक्षाधिपती कुबेर), यक्ष, गंधर्व, वासुदेव, संकर्षण, स्कंद, कुमार, विशाख इत्यादिंची जनसामान्य पूजा करत असत. त्यांची मंदिरेही असत.
तीर्थंकरांची मंदिरे बनण्याची मात्र सुरुवात झालेली दिसत नाही. गिरिपूजा हे एक
जैनांचे तत्कालीन महत्वाचे अंग दिसते. त्यांचे गिरिमह नामक सणही असत व त्यात सर्वच
भाग घेत असे अंगविज्जावरुन दिसते. वैदिक लोक इंद्र, वरूण, यम यांचीही उपासना करीत. त्यांच्या घरगुती यज्ञशाळाही असत. आज जशी ग्रामदैवते आहेत तसेच
नगरांचेही यापैकीच एखादे नगरदैवत असे. काही पारशी व ग्रीक देवतांचीही पूजा कुशाण
राजवटीमुळे सुरु झालेली दिसते. अनाहिता (पारशी), ऐरादित्ती
(अफ्रोडायटी-ग्रीक देवता) यात नांव घेण्यासारख्या आहेत. कनिष्काच्या राबटक
शिलालेखातील अभिवादनात इंद्र-वरुणादि अशी एकही वैदिक दैवते येत नाहीत पण उमा, कुमार, विशाख ही नांवे तर येतातच पण
कुशाणांच्या बव्हंशी नाण्यांवर नंदीसहितची शिवप्रतिमाही आहे. काही नाण्यांवर
बुद्धाच्याही प्रतीमा आहेत. एकही वैदिक प्रतिमा नाही. खरे तर इसपुच्या सहाव्या
शतकापासून सापडणा-या एकाही नाण्यावर अथवा शिलालेखात वैदिक प्रतिमा येत नाही. अंगविज्जातही
यज्ञाचे येणारे अगदीच तुरळक उल्लेख पाहता हा धर्म तेंव्हा अत्यंत मर्यादित लोकांत
सीमित होता. समाजावर त्याचा विशेष प्रभावही नव्हता असे दिसते. त्यामुळे ऐतिहासिक
दृष्ट्या भारतात एके काळी “वैदिक काळ” होता असे विधान कोणत्या आधारावर केले जाते
हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.
तत्कालीन लोक अनेक उत्सवही
साजरे करीत. त्यांची माहिती देत असतांनाच बहुजन (शुद्र) शिवमह तर वैदिक धर्मीय रुद्रमह
आणि इंद्रमह हे उत्सव साजरे करत. सर्वांच्या उत्सवांत सारेच सामील होत. वैदिक
रुद्र व हिंदू शिव ही वेगळी दैवते आहेत याचे तत्कालीन समाजाला भान होते.
गुप्तकाळात पुराणांनी रुद्र व शिवाचे एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न केला. वस्तुता:
ही दोन दैवते दोन वेगळ्या धर्माची आहेत. त्या काळात मातृकांचीही पूजा होत होती.
महत्वाचे म्हणजे असूर-असूरकन्या,
राक्षस-राक्षसी, यक्ष-यक्षीणी, नाग-नागीण, गिरीदेवता यांचीही पूजा होत असे. धनिक व्यापा-यांत वेस्सवनाची (वैश्रवण)
पूजा चालत असे. दिवाळीत नंतरही दिर्घकाळ लक्ष्मीपूजन नव्हे तर वैश्रवण (कुबेर)
पूजनच होत असे तर दिवाळीला यक्षरात्री म्हणत असत. यक्ष, असूर, राक्षस, नाग आदि प्राचीन संस्कृतीचे पुजनाच्या रुपात लोकांकडून आदरात्मक भान
ठेवले गेल्याचे दिसते. वैदिकेतर सर्व धर्मात या दैवतांना कमी-अधिक प्रमाणात
महत्वाचे स्थान दिल्याचे दिसते. असूर, पिशाच्च, नाग आदिंना उच्चयोनीत गणले गेलेले आहे. सातवाहनांच्या काळातील
“पिशाच्चभद्रकी” नावाचे एक शेतच दान दिल्याचा लेख उपलब्ध आहे. पुराणांनी नंतर जरी
असूर, राक्षसादिंना बदनाम केले असले तरी
कुशाणकाळात तशी स्थिती नव्हती.
असूर-राक्षसांची प्रतिमा
जनमानसात पुर्वी चांगलीच होती हे त्यांना देवतारुपात भजले जात असल्याने सिद्ध
होते. वैदिक साहित्यात असुर-राक्षस विपरीत रंगवले गेलेले आहेत. पण समाज तसे मानत
नव्हता.
अंगविज्जात येणारा समाज हा
गाथा सप्तशतीतील समाजाप्रमाणेच मनमोकळा आहे. स्त्रीयांचे स्थान समाजात उच्चीचेच
होते. समाज व्यावसायिक श्रेणींच्या (गिल्ड्स) माध्यमातून आपापले व्यवसाय चालवतांना
दिसतो. पेयपानाबद्दलही विधीनिषेध नव्हते. अनार्यांच्या लोकधर्माबरोबरच जैन
धर्माप्रमाणे बौद्ध धर्मही या काळात सुस्थापित होता हे स्तुपांच्या वर्णनावरून
दिसते. म्हणजेच वैदिक धर्म हा त्या काळातही समाजावर वर्चस्व ठेवून होता आणि
वैदिकेतर त्यांनी दिलेल्या स्मृतींवर आधारित धर्मादेशांवर चालत होते असा जो समज
वैदिक इतिहासकारांनी करून दिलेला आहे तो केवढा चुकीचा आहे हे आपल्या लक्षात येईल.
थोडक्यात केवळ वैदिक
साहित्यातून मिळणा-या एकांगी माहितीतून
सर्वांचीच दिशाभूल झालेली आहे. प्राकृत-पाली साहित्याकडे नवीन दृष्टीकोनातून पाहत
त्या भाषांतील साहित्याचा सखोल अभ्यास करण्याची आवश्यकता त्यामुळेच प्रतीत होते.
संस्कृत आधी आणि प्राकृत नंतर या गैरसमजातून आम्हाला बाहेर पडावे लागेल. प्राकृत
साहित्याचे परिशीलन करावे लागेल. तरच आम्हाला आमचा खरा सांस्कृतिक इतिहास समजायला
मदत होईल.
-संजय सोनवणी
(दै. पुण्यनगरीत प्रसिद्ध)
Saturday, May 1, 2021
शूर सम्राटाला विसरलेला करंटा देश !
शूर सम्राटाला विसरलेला करंटा देश !
सिंधू संस्कृतीची मालकी!
सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...
-
आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...
-
मानवी इतिहासाचा एक महत्वाचा टप्पा होता व तो म्हणजे पाषाणयुग. पण मानवी संस्कृतीने "काष्ठयुगात" प्रवेशुन एक मोठीच झेप घेतली. हे ला...