Saturday, May 13, 2023

माझी धर्मदृष्टी

माझी धर्मदृष्टी

संजय सोनवणी

 (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या “परामर्श” या विशेषांकात प्रकाशित)

धर्माकडे पाहण्याचे माझे दृष्टीकोन हे विकसनशील राहत आजच्या टप्प्यापर्यंत येऊन पोचले आहेत. हे विश्व कसे निर्माण झाले या प्रश्नातून भौतिकीबरोबरच धर्मविषयक अभ्यास सुरु झाला. मी १९८५ साली “An ancient Aryans Thought on Religion” हा प्रबंध लिहिला होता. त्यात मी धर्माची व्याख्या केली होती कि, “धर्म हा विविध श्रद्धासमूहांचा संग्रह असून तो सैलपणे एकमेकांशी बांधलेला आणि प्रवाही असतो. कालानुसार परिवर्तने स्वीकारत जात, मानवी संबंध हे अधिकाधिक सुसंगत आणि स्नेहमय करत जात अंतता: सर्वांचेच कल्याण करण्याच्या आदर्शाच्या दिशेने जात राहतो.” मी हा प्रबंध लिहिला तेंव्हा २१ वर्षांचा होतो. मराठी अनुवाद पुढच्याच वर्षी गूढविद्या दीपावली अंकात प्रकाशित झाला होता. त्याही पूर्वी मी नववीत असताना अस्तित्वात असलेल्या सर्व धर्मांना नाकारत स्वतंत्र धर्मही स्थापन केला होता. त्याचे नाव “जीवन धर्म”. येथे जीवन म्हणजे पाणी हा अर्थ अभिप्रेत आहे. आद्य जीव पाण्यातच जन्माला आल्यामुळे पाणी हेच सर्वश्रेष्ठ एकमेवाद्वितीय तत्व आहे अशी तेंव्हा माझी भाबडी समजूत झाली होती. मी चक्क माझ्या धर्माची तत्वे सांगणारा ग्रंथही लिहायला सुरुवात केली होती. अकरावी पर्यंत १३ अनुयायी झाल्यानंतर का नकळे मी त्या धर्माचाही पाठपुरावा सोडला. अर्थात तो पोरकट प्रयत्न समजून त्याची संभावना करता आली तरी धर्माकडे पहाण्याची दृष्टी शालेय जीवनातच विकसित होऊ लागली होती आणि सोबतच चिकित्सक वा बंडखोर वृत्ती असल्याने मी तत्कालीन सर्व धर्म नाकारत नवा धर्म स्थापन केला होता एवढाच त्याचा मतितार्थ.

      प्रबंध लिहिल्यानंतर पुढे मी आधी “ब्रह्मसूत्र रहस्य” आणि “नीतिशास्त्र” ही पुस्तके तर लिहिलीच पण विश्वनिर्मितीचा स्वतंत्र सिद्धांतही आधुनिक विज्ञानाच्या परिप्रेक्षात मांडला. त्यानंतर मी ‘हिंदू धर्माचे शैव रहस्य’ आणि ‘हिंदू धर्म आणि वैदिक धर्माचा इतिहास’ ही संशोधनात्मक पुस्तकेही लिहिली. जातीसंस्थेचा इतिहास लिहून वैदिक धर्म आणि हिंदू धर्म हे पूर्णतया स्वतंत्र असून जाती व वर्णसंस्था यात संबंध नाही हे सप्रमाण सिद्ध केले होते. प्रत्येक पुस्तकात माझे धर्मसंबंधी आकलन आणि विवेचन हे विकसनशील राहिले. मी आज जेंव्हा धर्माचा विचार करतो तेंव्हा मला नेमके काय वाटते हा महत्वाचा मुद्दा आहे आणि त्याचेच विवेचन येथे करीत आहे.

      धर्म एका व्याख्येत बसवता येईल काय कि तो अव्याख्येय आहे? ती सामुदायिक घटना आहे कि व्यक्तिपरत्वे बदलत जाणारी सम-संवेदी धारणा आहे? धर्माचे तत्वज्ञान असते का आणि असले तर ते असावे का कि दोहोंचा परस्पर संबंध नाही? धर्म नितीमुल्ये ठरवू शकतो काय किंवा धर्म आदेशात्मक नैतिक तत्वांचा एक समुच्चय असतो आणि विशिष्ट श्रद्ध्येयाचा आणि श्रद्धांचाच आग्रह धरतो? धर्म हा व्यक्तीस्थापित असतो कि तो समाजाच्या एकूण मानसिकतेतून निर्माण झालेला लोकधर्म असतो? धर्म आणि धार्मिक कर्मकांडे यांचा परस्परसंबंध कशातून निर्माण होतो? धर्म समाजव्यवस्था घडवतो कि समाजव्यवस्थाच धर्माचे कारण ठरते? कि ती एक सामुदायिक परस्परावलंबी मानसिकता आहे जी आपसूक प्रेरणांनी श्रध्येय आणि त्याभोवती धर्म निर्माण करते? सामुदायिक मानसिकता हा प्रकार कोठून आणि कसा अवतरीत होतो? धर्म आणि समाज-मानसिकता याचे परस्पर संबंध बदलत राहतात का कि ते अपरिवर्तनीय असतात? आणि महत्वाचा प्रश्न म्हणजे धर्माची निर्मितीच मुळातून आदिम भयातून झाली आहे कि काय? असे अनेक काही प्रश्न आहेत ज्यावर विचार करत राहणे आणि उत्तरे मिळवणे मला आज महत्वाचे वाटते.  

      आजचे बव्हंशी धर्म हे पारलौकिक जगाशी संबद्ध आणि म्हणून अनेकदा गुढवादी होत जातात. धर्माचे म्हणून जे काही तत्वज्ञान आहे ते ढोबळ आणि केवळ प्राथमिक पायरीवरील मनुष्यास कोठेतरी श्रद्धा ठेवण्यासाठी पुरेसे असे असते. पण निखळ तत्वज्ञान जेंव्हा येते तेंव्हा ते अधिकाधिक सूक्ष्म आणि तत्वज्ञपरत्वे बदलते आणि अनेकदा परस्परविरोधी होऊ लागते. जीवनविषयक समस्यांची सोडवणूक व मनुष्याचे अंतिम लक्ष्य याबाबत जगात आज इतक्या विचारांचा गलबला आहे कि एखादा गोंधळूनच जावा. शेवटी स्व-प्रवृत्तीस मानवणारे व त्यात भर टाकू शकता येणारे तत्वज्ञान सापडले कि माणसे त्या विशिष्ट तत्वद्न्यानाकडे वळतात. तत्वज्ञानात विविध स्कूल्स बनतात ती अशी. पण हेही येथेच थांबत नाही. तात्विक स्कूल्सनीच अनेक धर्मांची निर्मिती केलेली आहे आणि मुक्तत्वाचा मार्ग अंतता: बंधकतेत बंदिस्त केला आहे असेही आपल्याला दिसून येते. भारतातील बौद्ध, जैन, आजीवक यासारखे धर्म हे याच प्रकारात मोडतात. मूळ स्वरूपात या एकाच समन विचारपरंपरेतील वेगवेगळ्या विकसनशील तत्वधारा होत्या. समन तत्वधारेचा इतिहास खूप मागे जातो. यात अनेक उप-तत्वधारा होत्या व अनेकदा त्या परस्परविरोधीही असल्या तरी तो स्वतंत्र तत्वज्ञानांचा आविष्कार होता, पण सर्वांचेच धर्म बनले नाहीत. पण पुढे धर्म स्थापन होऊ शकतो अशी मुलतत्वे बुद्ध आणि महावीराच्या तत्वज्ञानात व संघटनेत असल्याने त्यांचे स्वतंत्र धर्म बनले. मक्खली गोशालाच्या नियतीवादी तत्वज्ञानावर बनलेला आजीवक धर्म तर मध्ययुगापर्यंत कसा बसा का होईना, पण टिकला व काळाच्या उदरात सामावून गेला. पुरण कस्सप, अजित केशकंबली, संजय वेलट्ठिपुत्त और पुकुद कात्यायन हेही समन विचारधारेत स्वतंत्र भर घालणारे तत्ववेत्ते, पण त्यांचे तत्वज्ञान मात्र धर्मात परिवर्तीत झाले नाही. असे अनेक थोर तत्ववेत्ते इतिहासात घडून गेले असतील. पण त्यांनी त्यांच्या तत्वज्ञानाला कसलीही आचारसंहिता वा कर्मकांड न दिल्याने त्यांचे रुपांतर धर्मात झाले नाही असेही असू शकेल. पण शेवटी हीच अमुक व्यक्ती अंतिम ज्ञानवंत असे ठरवण्यासाठी मुळात कोणताही ठोस आधार वा मापदंड नसतांना हे घडू शकले यामागे श्रद्धाभाव व तत्कालीन समाजधारणा कारणीभूत असू शकतील. पण महावीर आणि बुद्ध किंवा त्यांचे समकालीन तत्वज्ञ नेमक्या कोणत्या शब्दात त्यांचे तत्वज्ञान मांडत होते हे आज दुर्दैवाने आपल्याला माहित नाही कारण ते ग्रथित केले गेले ते स्मृतींतून आणि काही शतकांच्या कालांतराने.  त्यामुळे ते जसेच्या तसे असणे शक्य नाही. त्यावर ग्रथित करणा-याच्या विचार व समकालीन समाज व श्रद्धांचाही प्रभाव असणार हे नक्कीच आहे. सोयीचे तत्वज्ञान ठेवत गैरसोयीचे वगळायचे ही प्रवृत्ती अनुयायांमध्ये थोड्या-फार प्रमाणात असतेच. उदा. स्त्रियांना संघात प्रवेश द्यायचा कि नाही याबाबत किंवा तेविज्जासुत्तमध्ये आलेले वैदिक धर्म व ब्राह्मण याबाबत आलेले गौतम बुद्धाचे विचार त्यांचेच असतील असेही मानायचे कारण नाही. मुळात बौद्ध आणि जैन धर्म हे वैदिक धर्माविरुद्धची प्रतिक्रिया होती हेच विधान अनैतिहासिक आहे. तसे सिद्ध करणारे सबळ पुरावे अस्तित्वात नाहीत. असे आपण अनेक बाबतीत सर्वच भारतीय प्राचीन तत्ववेत्त्यांच्या बाबतीत पाहू शकतो.  उदा. चार्वाकांचे तत्वज्ञान आज जे उपलब्ध आहे ते इतरांनी दिलेल्या उद्घ्रुतांतून. त्याची संगतवार मांडणी करणारे प्राचीन ग्रंथ अस्तित्वात नाहीत किंवा ते कधी लिहिलेच गेले नाहीत.

बुद्ध-महावीराच्या काळातच अज्ञानवाद नावाचा एक वैचारिक संप्रदाय निर्माण झाला होता असे नंतरच्या काही जैन साहित्यात आलेले आहे. हे तत्वज्ञान त्याच काळातले कदाचित नसेल पण हेही एक तत्वज्ञान होते आणि या परिप्रेक्षात ते पाहणे रंजक आहे. "अज्ञानवाद" म्हणजे ज्ञान तुच्छ असून अज्ञानातच मोक्ष व मूक्ती आहे असे मानणारा हा पंथ होता. हा पंथ अल्पावधीत एवढा लोकप्रिय झाला कि त्याचे पुढे ६७ उपपंथ पडले. जैन साहित्यात या पंथाची माहिती मिळते. या पंथाचे तात्विक म्हणणे होते कि,  दोन भिन्न व्यक्तींचे ज्ञान भिन्न असू शकते. या दोन व्यक्तींमधील ज्ञानाच्या चर्चा, कोणाचे बरोबर याबाबतचे वाद यामुळे ज्ञानाबद्दलच शंका निर्माण होतात. मने कलुषित होतात ते वेगळेच! मुमुक्षूने अज्ञानात राहणे कधीही चांगले. मोक्षासाठी ज्ञान आवश्यक आहे असे जे म्हणतात त्यांना तरी खरे ज्ञान म्हणजे नेमके काय हे कोठे माहित असते? प्रत्येक तत्वज्ञानी पुरुषाचे ज्ञान निराळे असते. अमुकचेच खरे कि खोटे हे ठरवण्यातच वेळ वाया जाईल. महावीर अथवा संबुद्ध म्हणतात की "मला दिव्य ज्ञान झाले आहे." पण याला प्रमाण काय? ते खरे मानायचे निकष कोणते? आणि ते कोणी ठरवायचे? थोडक्यात ज्ञानाच्या संबंधात कोणत्याही विधानावर प्रमानावाचून विश्वास ठेवता येत नाही. मग हे उपद्व्याप करण्यात, प्रमाणे गोळा करण्यात वेळ घालवण्यापेक्षा अज्ञानात राहणे काय वाईट?

      पण कोण ज्ञानी आणि कोण अज्ञानी हे ठरवण्याचे प्रमाण म्हणजे मानवी विश्वास अथवा श्रद्धा. त्याचे काय करायचे? पण निखळ तत्वज्ञान तर श्रद्धा नाकारते. धर्माचे तत्वज्ञान आणि तत्वद्न्यानातून धर्म अशीही स्थिती समकाळात अस्तित्वात येऊ लागते. त्यातून निर्माण होणारे संघर्ष मग फक्त तात्विक राहत नाहीत तर ते स्वधर्मवृद्धीसाठी अथवा रक्षणासाठी कोणतेही टोक गाठू लागतात. शिवाय पुढील पिढ्या मूळ तत्वद्न्यानाकडे स्व-सापेक्ष व समाज-सापेक्ष दृष्टीने पाहत गेल्याने तत्वधारेत तत्वधारा असा प्रकार दिसू लागतो. बाह्य प्रभावही यात कारणीभूत ठरतात. जैनांचे श्वेतांबर-दिगंबर, बौद्धांचे हीनयान-महायान असे पंथभेद निर्माण होतात ते याच मानवी प्रवृत्तीतून. जगभरच्या धर्मात, मग ते परलोकवादी असोत कि तत्ववादी, त्यांच्यात कालौघात पंथोपपंथ निर्माण झालेले दिसून येतात.

      धर्म ही मुळात समाजाला बांधणारी, समान श्रद्धा, समान जीवनपद्धती, समान आराधनापद्धती व सरासरी समान विचारधारा असणारी बाब आहे असे मानले जाते. पुरातन काळात टोळीजीवनात टोळ्यांना एका धाग्यात बांधण्यासाठी जशी आदिम धर्माची निर्मिती झाली तशीच ती जीवनाची गुढे उलगडण्यासाठीही झाली. समान भूगोल असलेल्या प्रादेशिक भागांत भूगर्भशास्त्रीय समानतेमुळे सरासरी समान सामाजिक मानसिकता असल्याचे आपण पाहतो.  त्याचे प्रतिबिंब मानवी विचारपद्धती व व्यवहारांवर पडल्याचेही आपल्याला दिसते.  भाषा, धर्मकल्पना , समाजव्यवस्था, वास्तुरचना इत्यादी बाबी भौगोलिक परिप्रेक्षात  आपल्याला बदलतांना दिसतात त्या यामुळेच. अगदी एका छत्रीखाली असलेल्या धर्माच्या लोकांचेही मानसिक आविष्कार व वर्तन प्रादेशिक भौगोलिक परिप्रेक्षात वेगवेगळे असते ही अनुभवाला येणारी बाब आहे. हा अनुभव यायला कारण मात्र शास्त्रीय आहे.

      जगात अनेक धर्म प्रेषितप्रणीत आहेत. म्हणजे त्या प्रेषिताकडे असे स्वत:चे कोणतेही तत्वज्ञान असतेच असे नाही किंवा असले तरी ते तत्वज्ञान ईश्वरी आज्ञा म्हणून प्रचारित करण्यात, त्याला दैवी अधिष्ठान देण्यात ते प्रेषित यशस्वी होतात. अयशस्वी ठरलेल्या प्रेषिताची संख्या तर उदंड आहे. झोरोस्त्रीयन (पारशी) हा जगातील ज्ञात असा पहिला प्रेषितप्रणीत धर्म.  प्रेषितप्रणीत धर्म नेहमीच आहे त्या अस्तित्वातील धर्मांच्या विरुद्ध क्रांती करणारे म्हणून पेश केले जातात. इसपू १५०० च्या आसपास या धर्माची स्थापना झरथुष्ट्राने केली व अहुर माझ्दा या एकेश्वरी तत्वाभोवती केंद्रित धर्माची सुरुवात केली. त्याचे कारण नमूद आहे व ते म्हणजे तत्कालीन  प्रजेत अंधाधुंदी असून भोळसट धार्मिक कल्पना व अंधश्रद्धामूलक तामसी विचारांना ऊत आला होता. धर्माच्या नावाखाली अधर्माचे प्राबल्य माजले होते. पुरोहित वर्गाचाच जनतेवर पगडा बसला होता. इराणी जनतेचे अध:पतन झाले होते. अशा वेळी झरथुष्ट्राला पुरोहितवर्गाचा विरोध सहन करून ख-या धर्माचे बीजारोपण करावयाचे होते. त्यामुळे त्याचा छळ होऊनही त्याने इराणी प्रजेस एकेश्वरवादाची शिकवण दिली; सदाचार, सुविचार आणि सत्कृती यांचे पालन करण्याची प्रेरणा दिली. त्याने अहुर मज्द हाच सर्व शक्तिमान परमेश्वर मानला आणि त्यापासून ज्ञान व प्रेरणा घेण्यासाठी आरंभीची काही वर्षे आत्मचिंतनात व्यतीत केली. त्याची कृपा संपादन करून त्याने आत्मोद्धार साधला आणि दैवी प्रेरणेनुसार लोकोद्धाराच्या कार्यास प्रारंभ केला. त्याचे विचार गाथारूपात अवेस्तात आढळतात. अशा रितीने पहिला ज्ञात प्रेषित अथवा संदेष्टा अवतरला. पुढील प्रेषितही जवळपास याच पद्धतीने अवतरल्याचे आपल्यास दिसून येईल. येथे व्यक्तीचे म्हणणे काय आहे यापेक्षा ईश्वर त्याच्या माध्यमातून काय सांगतो आणि त्या सांगण्यावर लोकांचा विश्वास बसण्यासाठी तो किती चमत्कार करतो यालाच अधिक महत्व प्राप्त होते. असा धर्म आदेशात्मक व बंधनात्मक बनत जातो. श्रध्येये आणि निषिद्धे निश्चित केली जातात आणि त्या चौकटीतच सर्वांच्या श्रद्धा असाव्यात यासाठी आटोकाट प्रयत्न केला जातो. जुन्या धर्मातील काही गोष्टी समाज-अनुनयासाठी स्वीकारल्या तरी शक्यतो पुरातनाचा निषेध करण्याची प्रवृत्ती अधिक असते. झरथुष्ट्राने अहुर (संस्कृत- असुर) ही आधी अस्तित्वात असलेली सर्वमान्य कल्पना स्वीकारलीच पण तिला नवीन व्याख्येत बांधत नव्या स्वरूपात अभिव्यक्त करत एकमेव पवित्र शक्ती असे स्थान दिले. प्रचलित लोकधर्मातील अन्य देवतांना स्वीकारले पण दुय्यम स्वरूपात. ज्यू, ख्रिस्ती किंवा इस्लाममध्येही अनेक पेगन (प्राचीन लोकधर्म) संकल्पनांना अथवा देवतांना नवे अर्थ देत स्थान दिले गेलेच. समाजमानसिकतेशी नाळ कायम ठेवत नव्या श्रद्धा लादण्याचे प्रयत्न जगात नवे नाहीत. त्यासाठी कोणत्याही थराला जायची प्रेषित ते अनुयायी यांची तयारी असते.

 

झरथुष्ट्राचा धर्म स्थापन होत होता त्याच काळात दक्षिण अफगाणिस्तानमध्ये यज्ञाभोवतीच फिरणारा अजून एक नवा धर्म स्थापित होत होता. त्याचे नाव वैदिक (पर्यायी नावे- आर्य, सनातन, याज्ञिक इ.) धर्म. हा धर्मही आधी असुरकेंद्रित होता. असिरिया ते भारत या विस्तृत प्रदेशावर असुर तत्वाची गडद छाया होती. कर्मकांडे वेगळी असली व असुर या संज्ञेचे प्रादेशिक आकलन वेगळे असले तरी त्याभोवती तत्कालीन आशियायी धर्म फिरत होते. असुर ही सद्न्या अद्याप बदनाम केली गेली नव्हती. ऋग्वेदातही आरंभी असुर सद्न्या एक आदरार्थी संबोधन म्हणून वापरली जात होती. वरूण या आद्य वैदिक देवतेला असुर या  संबोधनाने तर किमान ३६ वेळा गौरवलेले आहे. अग्नी, इंद्र, रुद्र इ. वैदिक देवतांनाही हे संबोधन वापरले गेले. इतकेच काय, सूर्य देवतेलाही असुर संबोधनाने गौरवीत केले गेले आहे. असुर म्हणजे सूर्यदेवता. किंबहुना सूर्यालाच असिरियन असुर असे म्हणत असेही स्पष्ट दिसते. असुर देवतेच्या प्रतिमांतही पंख पसरलेली सूर्य देवताच दर्शवली जाते. तो असिरियन पुराणकथांत देवांचा देव आहे, पर्वताचाही देव आहे आणि असुर शहराचाही देव आहे. याच्या सन्मानार्थ असिरियात अनेक मंदिरे बांधली गेली. अगदी ख्रिश्‍चन काळातही असिरियनांनी असुरपूजा सोडली नाही.  वैदिकही ऋग्वेदाच्या पाचव्या व दहाव्या मंडळातील काही ऋचांत सूर्याला असुर याच दुस-या नावाने संबोधतात. पहा- ऋ. 10.124.3, 10.56.6, 5.47.3 10.177.1. पुढे मात्र असुर हे संबोधन गळत गेले व नंतर दुष्ट शक्तींचे प्रतीक बनले. याचे कारण म्हणजे वैदिक व झरथुस्त्री धर्मात विस्तारासाठी होत गेलेला संघर्ष, देवासुर संघर्षाच्या वैदिक कथा याच संघर्षाच्या प्रतीकरुपात आलेल्या आहेत असे दिसते. कारण असुरकेंद्रित वैदिक धर्म हा नंतर देवकेंद्रित बनला. देव हे अवेस्तन दृष्टीने दुष्ट शक्तीच राहिल्या. सरासरी एकाच भूभागात निर्माण झाल्याने या दोन्ही धर्मात जसे भाषिक, दैवतकल्पना व कर्मकांडांबाबत साम्य आहे तसेच विभेदही अनेक आहेत. वैदिक धर्म हा कोणी एका प्रेषिताने जन्माला घातला नसला तरी वसिष्ठ व अन्य नउ ऋषीकुटुंबे या धर्माचे प्रवर्तक होते असे मात्र म्हणता येते. ऋग्वेदरचनेस लागलेला साडेतीनशे वर्षांचा काळ व नंतर झालेला स्थानबदल यामुळे वैदिक दैवतसंकल्पना व धर्मतत्वज्ञानात बदल होत गेलेला आपल्याला दिसतो. अनेक नव्या देवता उदयाला आलेल्या दिसतात तर अनेक देवता एकत्र मुळ स्थान हरपून बसलेल्या वा गायब झालेल्या दिसतात त्या यामुळेच. खरे तर एकाच धर्मात कालप्रभावात व बदलत्या स्थानप्रभावात कसे बदल होत जातात याचे ऋग्वेद हे उत्कृष्ठ उदाहरण आहे.

पण वैदिक धर्म हा एक-प्रेषित धर्म नव्हे. फार तर त्याला बहु-प्रेषित प्रवर्तित धर्म म्हणता येईल. हे सर्व धर्म प्रस्थापित परंपरेतूनच विरोध वा प्रस्थापित संकल्पनांना नव्य अर्थ प्रदान करत निर्माण झाले असे आपण ढोबळमानाने म्हणू शकतो. त्यामुळे कोणताही धर्म हा अपरिवर्तनीय आणि चिरंतन आहे असे म्हणता येत नाही. दैवतेही काळाच्या ओघात बदलत जातात. इसवी सणाच्या पहिल्या शतकाच्या दरम्यान जी दैवते लोकांनी डोक्यावर घेतली होती ती आज कोणाला आठवतही नाहीत. धर्मग्रंथांचेही असेच होते. बायबलचे वेगळे वेगळे अर्थ लावले जातात वा मूळ संहितेत छेडखाणी केली जाते. पैगम्बरानी नेमके काय म्हटले याचे, कधी कधी, अगदी  परस्परविरोधी अर्थ लावले जातात. “आम्ही काढला तोच अर्थ खरा” असे मानत त्या अर्थाधारीत नवे पंथ निर्माण होतात.

पण हे झाले इसपू दीड हजार वर्षानंतर स्थापित झालेल्या धर्मांबाबत. पण धर्माचा इतिहास मानवाच्या या धरतीवर उदय होण्याच्या काळाइतका मागे जातो. होमो-सेपियन या आजच्या मानवी प्रजातीचा दीड लाख वर्षांपूर्वी उदय होण्याआधी येथे पाच-साडेपाच लाख वर्षांपूर्वी पासून निएन्दरथल या मानव प्रजातीचे अस्तित्व होते. या मानवाचीही काही भाषा असावी असा तर्क त्याच्या विकसित झालेल्या स्वरयंत्रावरून काढला जातो. हा मानवही ज्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने मृतांचे दफन करायचा त्यावरून या मानवाच्याही मृत्योत्तर जीवनाबद्दल काही कल्पना होत्या असे अनुमान करायला वाव आहे. जनन आणि मृत्यू या जीवनातील महत्वाच्या घटना व जीवनातील नैसर्गिक आपत्ती व एकंदरीतच अनिश्चिततेचे आदिम भय यातून आद्य धर्माच्या कल्पनेचा उदय झाला, किंबहुना, भय हेच धर्मोत्पत्तीचे आद्य कारण होय असे म्हटल्यास काहीही वावगे ठरणार नाही. निसर्गाने दिलेली अपुरी संरक्षणात्मक साधने एकीकडे आणि त्यावर मात करण्यासाठी दिलेली बुद्धी एकीकडे यातून बुद्ध्यात्मक जीवनसंघर्ष करतानाच या भयावर मात करण्यासाठी उपायात्मक संरचना म्हणून आदीम-धर्मतत्वांचा उदय झाला. पुरेसा अन्नपुरवठा, सुरक्षित जीवन आणि टोळीच्या संख्यात्मक शक्तीसाठी अधिकाधिक प्रजनन या त्याच्या स्वाभाविक गरजा होत्या. सुफलनता ही त्याची गरज बनली. स्त्री संतती देते म्हणून योनीपुजा (मातृपूजा), दफने करून नंतर पूर्वज पूजा, प्रत्यक्ष वा प्रतीकात्मक निसर्गपूजा करत किमान मानसिक का होईना पण सुरक्षा मिळवणे त्याला अत्यावश्यक वाटले असल्यास नवल नाही. यातूनच प्रकाश-अंधार, सृष्ट-दुष्ट, भुते-खेते, देव-सैतान या स्वरूपाच्या द्वंद्वात्मक संकल्पनातून आद्य दैवते व सैतान निर्माण झाले व त्यांच्या संघर्षाच्या कथा या आद्य पुराकथा बनल्या. सृष्ट-दुष्ट शक्तींची आराधना हा त्याचाच पुढील भाग बनला. आद्य पुरोहित संस्कृती (शामान) त्यातूनच अस्तित्वात आली. होमो-सेपियन प्रजातीत या संकल्पना अधिक प्रबल होत्या. निएन्दरथल मानव प्रजाती होमोसेपियनशी स्पर्धा न करू शकल्याने सरासरी ४० हजार वर्षांपूर्वी होमो-सेपियनशी थोडाबहुत संकर करून नामशेष झाली. आदिम धर्माचा अशा प्रकारे किंचित फरकांसह जगभरच उदय झालेला दिसतो.

हे धर्म व्यक्तीप्रणीत नव्हते. सामुहिक मानसिकतेतून या धर्मभावनांचा उदय झाला. किंबहुना तो मानवाचा एकत्रित भावात्मक उद्गार होता. जीवनातील अनिश्चितता व मृत्यूचे भय हे या धर्मनिर्मितीमागील प्रधान मानसिक कारण होते. त्या अर्थाने जगातील सर्वच आदिम धर्मांना “लोकधर्म” असे म्हणू शकतो. आपल्या धर्माला कोणतेतरी नाव असावे याची त्यांना गरजही वाटली नाही. प्रत्येक भूभागातील टोळीपरत्वे धर्म बदलत असे. धर्म हा टोळीजीवनातील कडव्या अस्मितेचेही कारण बनला. “आमचा देव श्रेष्ठ” ही कल्पना त्यांच्या मनावर राज्य करू लागली.

भारतातही वेगळे घडले नाही. सोन नदीच्या खो-यात बाघोर येथे ११ हजार वर्षांपूर्वीची (आजही कोल व बैगा आदिवासी “माई” या संबोधनाने ही योनीपुजा करतात.) योनीप्रतिमा मिळाली आहे. स्त्रीचे जननेन्द्रिय संतती प्रसवते म्हणून त्यालाच आद्य दैवतसन्मान मिळणे स्वाभाविक होते. लिंगपूजा ही कृषी संस्कृती उदयाला आल्यावर सुरु झाली कारण तोवर मानवाला संतती जन्मात पुरुषाचाही वाटा असतो हे कळू लागले होते. लिंगपुजेचेही पुरावे आता सिंधू संस्कृतीत मिळाले आहेत. पण तोवर योनी आणि लिंगाच्या स्वतंत्र पूजा होत असत पण काही शतके उलटल्यावर भारतात तरी योनी-लिंग एकत्र करत सृजनाचे नवप्रतीक बनवले गेले व त्याची पूजा सुरु झाली. असे साडेपाच हजार वर्ष जुने शिवलिंग (आज पुजले जाते तसेच) कालीबंगन येथे मिळाले आहे. दोन्ही तत्वांना एकाकार मानायच्या सृजनात्मक उर्मीतून ही प्रतीकात्मक निर्मिती झाली. पण त्याच बरोबर यक्ष, वृक्ष, नाग, मोर इ. पूजाही देवक स्वरूपात सुरूच होत्या. किंबहुना टोळ्यांची पूजनीय प्रतीके म्हणून अशा प्राणी-पक्षांचा प्रतिमात्मक उपयोग करण्यात आला. टोळी अथवा गणजीवनातून मनुष्य जसा व्यापक समाजव्यवस्थेत आला तशी टोळ्यांची स्वतंत्र ओळख व्यापक ओळखीत विलीन होत गेली. त्यांच्या श्रद्धांचेही तेच झाले पण कुलदेवता, देवक या स्वरूपात त्यांचे अस्तित्व राहिलेच.

असिरिया, इजिप्त, चीन इत्यादी भागांत प्राचीन काळी उदयाला आलेले लोकधर्मच होते त्यामुळे त्यांना ना विशिष्ट धर्मग्रंथ होता ना कोणी प्रेषित. धर्मांना नावही नव्हते. प्रादेशिक नावानेच ते धर्म ओळखले जात. असिरीयन धर्म, इजिप्शियन धर्म इत्यादी. बव्हंशी लोकधर्म मात्र ख्रिस्ती, इस्लामच्या झंझावातात नष्ट झाले. म्हणून जगाचे काही बिघडले वा चांगले झाले असे म्हणता येत नाही. भारतातील लोकधर्मालाही नाव नव्हतेच. जे सिंधू नदीपारच्या अज्ञात प्रदेशाला नदीनावावरून प्रादेशिक नाव दिले ते भारताबाहेरील लोकांनी. त्यालाच आपण आज हिंदू धर्म म्हणून आणि भूभागाला हिंदुस्तान (इंडस- इंडिया) नावाने ओळखतो. किंबहुना जगात टिकून राहिलेला हा एकमेव मोठा लोकधर्म होय. 

मनुष्य जसा प्रगत होत गेला तशा त्याने आपल्या इष्ट देवतांभोवती अत्याधुनिक रूपके चढवायला सुरुवात केली. योनीपूजेला प्राचीन काळी “शक्तीपूजा” म्हणत असल्याचे मुळीच शक्यता नाही तसेच लिंगालाही शिव म्हणत असण्याची शक्यता नाही. ती फक्त मातृ-पितृ दर्शक प्रतीके होती व त्यांचे पूजा केल्याने विपुल संतती होईल ही श्रद्धा होती. शेती किंवा अन्य समृद्धीसाठी यक्ष-यक्षिणी सारख्या तशा पाषाणरूपातील अमूर्त देवता होत्याच. पण सांस्कृतिक विकासाबरोबरच दैवत संकल्पनेताही विकास होणे स्वाभाविकच होते. कालौघात लिंग हे पुढे (सीब) शिव (महादेव, शंकर,) बनले तर योनी हे शक्ती (पार्वती, उमा, सती) बनले व त्यांना केवळ लिंगरुपात न पाहता व्यक्तीरुपात पाहत असंख्य कथा रचल्या गेल्या. त्यांना आद्य दाम्पत्य ठरवून तशा कथा निर्माण केल्या गेल्या. त्या कथांत प्रक्षेप होत विकृतीकरणही झाले. त्या व्यक्तीरुपाशी अनेक स्वतंत्रपने पूजली जाणारी नाग, वृषभ सारखी प्रतीके जोडण्यात आली. आणि अद्वैतवादाचे मूळ मानत  अनेक तात्विक संकल्पनाही त्या प्रतीकाभोवती बेमालूम गुंफल्या गेल्या. सांख्य तत्वज्ञानात प्रकृती आणि पुरुष या दोन तत्वांत शिव-पार्वती संकल्पनेचाच तात्विक विस्तार केला गेला. शिव-पार्वती युग्माच्या दिव्य समागमातून विश्व जन्म पावले ही विश्वनिर्मितीची आद्य संकल्पना त्यातूनच जन्माला आली.

सिंधू नदीपल्याडच्या लोकांना सिंधू (पर्शियन-हिंदू) हे नाव जसे कायम झाले तसेच तेथील लोकधर्मांनाही. खरे म्हणजे भारतातील सर्वच प्रांत जरी सुफलनताकेंद्रित प्रतीक-पूजेचा धर्म पाळत असले तरी त्याच्यात प्रादेशिक भेद होतेच. उत्तर आणि दक्षिण तसेच उत्तर आणि पूर्व यात साम्य असण्याची शक्यता नाही. प्रतीक साम्ये असली तरी त्यामागील कल्पना समान असू शकत नव्हत्या. स्थानिक देवताही वेगवेगळ्या होत्या. संस्कृती व भाषाही वेगळी होती. पण जसजसे उत्तर आणि दक्षिण यांच्यात दळण-वळण वाढले, व्यापार वाढला व राज्यांनीही उत्तर-दक्षिणेत विस्तार केला तसतशा सांस्कृतिक व धार्मिक कल्पनाही सरमिसळ होत गेल्या. मुळात लोकधर्म असल्याने त्याचे वर्तमान स्वरूपही लोकच ठरवणार हे उघड होते. धर्माला एकच एक नाव स्वीकारलेही गेलेले नव्हते. शैव मत, शाक्त मत, बौद्ध मत, जैन मत...याप्रकारे विविध मतांमध्ये भेद दाखवले गेले तरी ते धर्म आहेत याची जाणीव पुरेसी विकसित झालेली नव्हती. खरे तर धर्म हा व्यक्तीचा व त्याच्यापुरता मर्यादित हाच अर्थ घेऊन होता. त्यामुळे नंतरच्या काळात शैव-शाक्त तंत्रे बौद्ध व जैनांतही अनायास घुसू शकली. शिव व देवीरुपेही त्यासोबत कोणत्या ना कोणत्या रूपाने त्या धर्मात शिरली. आत्मसात केली गेली. तत्वज्ञानाचाही प्रभाव एकमेकांच्या मतांवर पडला. योग सर्वांनी स्वीकारला. त्याची तात्विक मांडणी जरी आपापल्या पद्धतीने केली असली तरी योगमुद्रा सर्व धर्मात महत्वाचे लक्षण बनली. शिवाला आदीयोगी जसे मानले जाऊ लागले तसेच योगाचा निर्माता म्हणून ऋषभनाथही मानले गेले. ही देवानघेवाण होती. जैन-बौद्ध मते ही मुळात लोकधर्मातून निर्माण झालेल्या समण वैचारिक परंपरेतूनच आलेली असल्याने टोकाच्या विरोधाचा प्रश्नही नव्हता.

सनपूर्व १२०० ते सनपूर्व १००० या काळात भारतात वैदिक धर्मियांचा प्रवेश झाला. त्यांनी सुरुवातीला धर्म पसरवण्यासाठी मिशनरी पद्धत वापरत उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर धर्म पसरवला. ही वैदिक धर्मतत्वे येथील लोकांना सर्वस्वी नवीन होती. याज्ञिक कर्मकांड अधिक विस्तारून त्याचे स्वरूप अधिक गुढवादी केले गेल्याने यद्न्याच्या कर्मकांडाचे आणि त्यांच्या वर्णव्यवस्थेचे आकर्षण वाटणारे कमी नव्हते. स्थानिक धर्म हा घरगुती प्रतीकपुजेशी संबंधित होता. त्यात अवडंबर नव्हते. लोकोत्सव होत पण ते उत्स्फूर्तपणे. पूजा हे सामुहिक कर्मकांड नव्हते. पण वैदिक धर्माच्या आगमनाने स्थिती बदलली. सुरुवातीला (किमान इसपूच्या पाचव्या शतकापर्यंत) हा धर्म कुरु-पांचाल-मत्स्य-शूरसेन राज्यांपर्यंत सीमित होता.  त्यांना येथील भूगोल या प्रदेशापार जवळपास अज्ञात वा ऐकीव माहित होता हे ब्राह्मणे व मनुस्मृतीवरूनच स्पष्ट दिसते. मगधात काही ब्राह्मण असले तरी लोकजीवनावर प्रभाव टाकेल एवढे त्याचे प्रभावी अस्तित्व नव्हते. त्यामुळे बुद्ध-महावीर हे वैदिक धर्माच्या प्रतिकारार्थ उभे ठाकले हे मत ऐतिहासिक तथ्यांवर टिकत नाही. प्रसिद्ध अभ्यासक जोहान्स ब्रोंकहोर्स्ट म्हणतात कि, जैन व बौद्ध धर्म हे वैदिक धर्माच्याच शाखा आहेत अशी मान्यता असली तरी ते खरे नाही. हे दोन्ही धर्म वैदिक धर्माच्या प्रभावक्षेत्रापासून दूर असलेल्या भागात जन्माला आले. वैदिक तत्वज्ञानाचा आधार आणि जैन-बौद्धांच्या तत्वद्न्यानाचा आधार परस्परविरोधी आहे. ( Brahmanism: Its place in ancient Indian society by Johannes Bronkhorst, p. 362,) खरे तर वैदिक काळ म्हणता येईल असा कोणताही प्रभावी काळ भारतात नव्हता. भाषेबद्दल बोलावे तर संस्कृत अथवा वैदिक भाषेचे लिखित अथवा शिलालेखीय पुरावे इसवी सनाच्या पहिल्या शतकानंतरच मिळतात. वैदिक भाषेवर प्राकृत भाषेचा अवेस्तन भाषेप्रमाणेच मोठा प्रभाव आहे व ऋग्वेदावर पाणीनीच्या काळापासून ज्ञात भाषिक तसेच रचनात्मक संपादकीय संस्कार होत गेले असे आता भाषाविद म्हणतात. वैदिक भाषाच मुळात स्वतंत्र नाही. अगदी श्रौत यज्ञ केल्याचे इसपू पहिल्या शतकातील शिलालेख आहेत तेही प्राकृतात आहेत, वैदिक (छांदसी) वा संस्कृत भाषेत नाहीत. अगदी इसपू सहावे शतक ते इसवीसनाचे तिसरे शतक या प्रदीर्घ काळात नाण्यांवरही कोठे वैदिक चिन्ह मिळत नाही कि लिप्यांकित नाण्यांवर वैदिक भाषेचे पुसटसेही दर्शन मिळत नाही. प्राकृत भाषेचे लिखित पुरावे किमान इसपू सहावे शतक एवढे मागे जातात. सिंधू संस्कृतीची भाषाही पुरा-प्राकृत असावी या निष्कर्षाला विद्वान आलेले आहेत. तरीही वेद आणि वेदकाळ याबाबत एवढे गारुड निर्माण झालेले असावे अथवा केले गेले असावे ही आश्चर्याचीच बाब होय! खरे तर इतिहासाची कालक्रमरेखा जी आज आखण्यात आलेली आहे ती प्रत्यक्ष पुराव्यांवर टिकत नाही. तरीही वेदकाळाचे गारुड फार मोठे आहे पण हा काळ नेमका कधी होता हे पुराव्यांच्या आधारावर कोणी सांगू शकत नाही. उलट वैदिक धर्माने स्थानिक संस्कृतीशी नाळ जोडण्यासाठी एतद्देशीय प्रतीके व देवता आणि तात्विक संकल्पना वैदिक कलमे करत स्वीकारल्या. लिंगपूजेचा वेदात निषेध असला तरी शिवाला त्यांनी वैदिक रुद्राशी जोडले. उपनिषदे ही बव्हंशी वैदिक तत्वज्ञानाला छेद देतात. एतद्देशीय निर्मिती असलेली सांख्य, वैशेषिक, योग इत्यादी तत्वद्न्याने त्यांनी आत्मसात केली वा नवधर्मांतरीतांनी त्यासाठी सहाय्य केले.  वेदांना अमान्य असलेली मूर्ती/प्रतिमा पूजाही त्यांनी स्वीकारली. त्यातूनच वैदिक धर्मात श्रौत व स्मार्त हे दोन संप्रदाय निर्माण झाले. मुळात संन्यास वैदिक धर्मात नव्हता पण तो चवथ्या वानप्रस्थाश्रमाच्या रुपात स्वीकारला. वैदिकांनी स्थानिक धर्मियांशी जुळवून घेण्यासाठी तडजोडी केल्या असल्या तरी त्यांचे देव मात्र लोकधर्मियांनी स्वीकारले नाहीत. जैन व बौद्ध वाड्मयात इंद्रादी देव अवतरतात पण ते  सर्वस्वी दुय्यम स्वरूपात व तेही मुळ चरित्र बदलून. नवा धर्म व तोही अत्यल्पसंख्याकांचा असल्याने वैदिकांना ही तडजोड करणे भाग असले तरी आपण तडजोडी केल्याचे त्यांनी मान्य केले नाही. अवतार संकल्पनेला जन्म देत येथील महामानवांचे अपहरण करत वैदिकीकरण केले. खरे तर व्यावसायिक आणि परिवर्तनीय सैल जातीसंस्था आणि अपरिवर्तनीय व उतरंडीची वर्णसंस्था यांचा काहीएक संबंध नसतांना तो संबंध जोडायचा प्रयत्न झाला. या संदर्भात डॉ. अजय मित्र शास्त्री म्हणतात कि जाती या व्यवसायातूनच निर्माण झाल्या. अनेक व्यवसाय वंशपरंपरागत झाले. या विविध जातींना वर्णसंस्थेत सामावून घेण्यासाठी स्मृतीकारांनी “अनुलोम-प्रतिलोम” संकाराची कल्पना लढवली. पण विविध दानलेखांत दानकर्त्यांनी आपापल्या व्यावसायिक जातींचाच उल्लेख केला असल्याने ही वैदिक योजना असफल झाली. ज्ञात इतिहासातील सर्व राजे हे वैदिकांच्या दृष्टीने तथाकथित शुद्र वर्नाचेच (म्हनाज्वे अनार्य)  होते हेही आपण पाहू शकतो. वैदिक स्मृतींच्या हे विरोधात होते. पण वैदिकांनी विरोध केला नाही कारण धर्मात भेद आहे याची स्पष्ट जाण त्यांना होती. असे असूनही वैदिक प्रभाव निर्माण करण्यासाठी ग्रंथांमध्ये तर किती वैदिक कलमे केली गेली याला सीमा नाही.

जोहान्स ब्रोंकहोर्स्ट म्हणतात, "आपल्या पतन काळात भोवतालच्या धार्मिक आणि राजकीय वातावरणात तगुन राहण्यासाठी वैदिक धर्मियांनी कर्म आणि पुनर्जन्म अशा अनेक तात्विक सिद्धांताची स्थानिक धर्मातुन उसनवारी केली आणि वैदिक धर्माची पुनर्मांडणी करायला सुरुवात केली. आधीच्या सामुहिक यज्ञांची जागा व्यक्तीगत यज्ञांनी घेतली. याच काळात (इसपू दुसरे शतक ते इसवी सनाचे पहिले शतक) स्थानिक तंत्रांतुनच उसनवारी करुन अथर्ववेदाची रचना करुन अथर्वन ब्राह्मणांना प्रतिष्ठा प्राप्त करुन देण्याचा आणि तेच मुळचे, अतिप्राचीन आहे असे दाखवण्याचा प्रयत्न केला. एका अर्थाने वैदिक धर्माने केलेली ही तडजोड होती आणि त्यातून वैदिक धर्माचेही रुप बदलले. पण आपण उसणवारी केली आहे हे वदिक धर्मियांनी कधीही मान्य केले नाही. उलट बौद्ध व जैन धर्म हे वेदांमधुनच कसे निर्माण झाले आणि वेदानुकुल आहेत हे दर्शवण्यात त्यांनी धन्यता मानली. उपनिषदांवर योग, तंत्र आणि श्रमण संस्कृतीचा पगडा स्पष्ट दिसत असतांनाही उपनिषदांची मालकी "वेदांगे" म्हणत स्वत:कडे घेतली. हे होण्याला कारणीहूत झाले त्यांनी वैदिक कर्मकांड (उदा. अश्वमेध, राजसुय) यज्ञांबद्दल राजेलोकांत निर्माण केलेले अनावर आकर्षण आणि त्यांना राजव्यवहारात प्राप्त झालेल्या अधिकाराच्या संधी. धर्मांतरीत वैदिकांचीही त्यांना यात मोठी मदत झाली. चवथ्या शतकापासून भारतात वैदिक धर्माने अन्य धर्मांना दुय्यम बनवण्यात तर कोठे त्या धर्मांत शिरुन त्या धर्मांचा पाया खिळखिळा करण्यात यश मिळवले". (Brahmanism: Its place in ancient Indian society, Johannes Bronkhorst, Contributions to Indian Sociology 51, 3 (2017))

      एके काळी मीही सर्वसामान्य हिंदूंप्रमाणेच वैदिक धर्म हा हिंदू धर्माचेच एक अविभाज्य अंग मानत होतो. हिंदू धर्माचा कोणी संस्थापक नाही, एक मान्य दैवत किंवा धर्मग्रंथ नाही. हिंदू हा धर्म नसून एक जीवनपद्धती आहे अशी अनेक परस्परविरोधी मते आहेत आणि ती त्या त्या वेळी खरीही वाटत होती. भारतात जैन आणि बौद्ध हे व्यक्तीस्थापित धर्म आहेत या मान्यतेपासून ते स्वतंत्र धर्म नसून हिंदू धर्माचेच भाग आहेत ही परस्पर विरोधी मतेही पाहिलेली होती. या समस्येचा निर्वाह करणे मला आधी आवश्यक वाटले. हिंदू धर्म हा मुळात लोकधर्म असल्याने व विकासशील राहिल्याने त्याला कोणी एक व्यक्ती संस्थापक नसली तरी वैदिक परंपरेला किमान दहा ऋषीकुटुंबांनी मिळून ऋग्वेद लिहून आरंभ केला. त्या अर्थाने या दहा ऋषी कुटुंबांना वैदिक धर्माचे संस्थापक म्हणणे योग्य राहील. वेद हे किमान त्रैवर्णीकांचे आद्य धार्मिक स्त्रोत आहेत. स्मृती या केवळ या धर्माचे नियमन करण्यासाठी आहेत. शिवाय वैदिक कर्मकांडे पूर्णतया स्वतंत्र असून ती यज्ञाधारित आणि अमूर्त देवतांना हवन करून इष्टप्राप्ती करू इच्छितात. वैदिक म्हणून आज जे तत्वज्ञान आहे ते मिश्र तत्वज्ञान आहे आणि अनेकदा वेदविरोधी जाते. या भागाला तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींसारखे विद्वान “वैदिक प्रज्ञेचा विकास वा सुधारणा” मानून या समस्येचा निर्वाह केला जातो. असे असूनही वेद अपौरुषेय आणि अंतिम आहेत असेही मानले जाते. वैदिक धर्मीय नसलेल्यांना त्यांनी सरळ शुद्र व म्लेंच्छ संज्ञेत टाकून दिले. या वर्गाला कोणताही वेदाधिकार नसतो. हा सरळ भेद असताना व बहुसंख्य हिंदू लोकधर्माचे व प्रथांचे पालन करत असताना वैदिक आणि हिंदू धर्म एक समजणे किंवा वेदापासून हिंदू धर्माची निर्मिती झाली असे मानने अनैतिहासिक आहे.

      भारतातील धार्मिक आणि सांस्कृतिक संघर्षाची उत्पत्ती ही वैदिक धर्माला हिंदू धर्माचेच एक अंग समजण्यातून झालेली आहे ही बाब आता निर्विवाद आहे. वस्तुत: वैदिक धर्म आपले पृथकत्व आजही टिकवून आहे आणि आपले वर्चस्व गाजवण्याच्या प्रयत्नात सातत्य राखतो हे सारे काही वैदिक निर्मित अशा वैदिक बोलबाल्यातून आणि वेदमाहात्म्याच्या नित्य गायनातून दिसते. त्यातून निर्माण झालेल्या सामाजिक संघर्षाचा अद्याप निर्वाह लागलेला नाही.

      धर्माचे असे एक ढोबळ का होईना पण तत्वज्ञान असते. केवळ देवता बदलल्या म्हणून धर्म वेगळा बनत नाही. चांगले आणि वाईट यातील संघर्ष हा कोणत्याही धर्मतत्वज्ञानाचा पाया असतो. लोकधर्मही या तत्वाला अपवाद नाहीत. अर्थात ही चांगल्या-वाईटाची व्याख्या अत्यंत प्राथमिक असते व जे समाज अथवा व्यक्तीला मान्य आहे किंवा हितकर आहे ते चांगले आणि जेही त्याविरोधात जाईल ते वाईट इतकी ती ढोबळ असते. पाप-पुण्य या सद्न्या यातूनच निर्माण होतात व जो जास्तीत जास्त पुण्य करेल तो स्वर्गात आणि पाप करेल तो नरकात अशी ढोबळ विभागणी आपल्याला प्रत्येक धर्मात दिसते. किंबहुना सामाजिक नितीमत्ता ही धर्म प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे नियमित करतो. पण धार्मिक नितीमत्ता सामाजिक नितीमत्तेला छेद देते तेंव्हा मात्र धर्मसंस्था आणि समाज संस्था यांच्यात संघर्ष उडू शकतो. उदा. गर्भपात हे निषिद्ध (पाप) आहे अशी कर्मठ ख्रिस्त्यांची धर्मश्रद्धा आहे. आधुनिक काळात समाज त्याला सहसा पाप अथवा चुकीचे अथवा अनैतिक मानत नाही. पण कधीकधी परंपरावादी अनेकदा वर्तमान-समाजसापेक्ष वर्तन व विचार ठेवत नाहीत. उदा. अमेरिकेतही १९७३ नंतर गर्भपात हा स्त्रीयांचा संवैधानिक अधिकार आहे असे मानत होता. पण जून २०२२ पासून अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता हा अधिकार उरलेला नाही. फाशीची शिक्षा असावी कि नसावी हा तात्विक प्रश्न जगभर चर्चेत आहे आणि अनेक देशांनी फाशी रद्द केली असले तरी तीच “न्याय्य” आहे असे वाटणारा मोठा वर्ग जगभरात आहे.

      व्यक्तीस्थापित धर्मात धार्मिक नितीतत्वे ही अपरिवर्तनीय मानण्याची साधारण प्रथा असते. लोकधर्म मात्र प्रवाही असल्याने नैतिक तत्वे तुलनेने कालानुरूप व तत्कालीन गरजांच्या परिप्रेक्षात बदलत राहतात. भारतात असे प्रवाहीपण आपण किमान दहाव्या शतकापर्यंत कायम राहिल्याचे दिसते. वैदिक स्मृतीनुसार जे जे अनैतिक होते ते ते हिंदूंनी निरलसपणे केल्याचेही आपल्याला दिसते. किंबहुना कोणतीही वैदिक स्मृती अपवादात्म एखादे उदाहरण सोडले तर हिंदुंवर लागू होती याचे पुरावे उपलब्ध नाहीत. असे असतानाही हिंदू कायद्यांचा मूलाधार स्मृती बनवल्या जाव्यात हे आश्चर्य आहे.

युरोपात जवळपास सोळाव्या शतकापर्यंत धार्मिक सत्ता ही सर्वोपरी होती. इस्लाम व ख्रिस्ती धर्म त्यात अग्रणी होते. पण फ्रेच राज्यक्रांतीने त्या दिशा बदलवल्या व एकुनातीलच तत्वद्न्यानाची आणि नैतिक मुल्यांची धर्मनिरपेक्ष मांडणी सुरु केली गेली.  चांगले-वाईट म्हणजे नेमके काय या मुलभूत प्रश्नापासून सुरुवात करीत मुळात माणसाला नैतिक मुल्यांची गरजच आहे कि नाही या प्रश्नापर्यंत नितीविद भिडले. “अधिकांचे अधिक सुख” या कल्याणकारी उद्घोषणेलाही आव्हान देत सुख किंवा सत्य म्हणजे नेमके काय आणि ते कोणी ठरवायचे यावर उहापोह केला गेला. यातून माणूस अधिक विचार-व्यापक होत गेला. कारण यात धार्मिक नितीमुल्यांत असते तशी पवित्र म्हटली गेलेली आज्ञात्मकता नव्हती तर ते व्यक्तीस्वातंत्र्याला सर्वोच्च स्थान देत स्व-विवेकावर वा बुद्धीवर विसंबून राहून वर्तनाचा व एकंदरीतच जीवनाचा अर्थ शोधण्याची पद्धती होती. ती सहेतुक अथवा बंधनात्मक नव्हती तर निखळ तत्वचर्चा होती. त्यातही अनेक वैचारिक संप्रदाय निर्माण झाले. ही व्यावहारिक नितीचर्चा राजसत्ता, कायदे, ते अगदी बाजारपेठ अशी सर्वांगीण होत मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्शणारी झाली. त्यातून आजचा आधुनिक समाज तयार झाला असला तरी ती अद्याप परिपूर्ण अवस्थेला पोचली असे कोणी म्हणणार नाही. कारण एका क्षेत्रातील नितीमुल्ये दुस-या क्षेत्रातील नैतिक मूल्यांना छेद देतात असेही घडताना दिसते. धार्मिक नीती ही व्यावहारिक किंवा मुलभूत नीती बनण्यात अनेकदा अडचणी उपस्थित होतात. विश्व हे कसे निर्माण झाले हा तात्विक प्रश्न तर सार्वकालिक आहे. प्रत्येक धर्माने आणि तत्वद्न्यानानेही या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे. मुलभूत वैद्न्यानिक संशोधन आणि मुलभूत तत्वज्ञान या बाबतीत अनेकदा हातात हात घालून जाते. सर्वसमावेशक सर्वसापेक्ष सार्वकालिक अशी कोणती नीतीतत्वे असू शकतील यावर नितीविद विचार करत आहेत. विश्वनिर्मितीचे आद्य तत्व शुन्यात्मक स्थितीत आकुंचित झालेले होते अशा एकमेवद्वितीय (पण काल्पनिक) स्थितीची आणि एकमेव ईश्वराची सांगड घालण्याचे प्रयत्न काही ईश्वरवादी करतात हे खरे पण त्यातून काही निष्पन्न होण्याची शक्यता नाही. तात्विक विचार जसजसा सूक्ष्मातीसुक्ष्म होऊ लागतो तसतसा तो विचारही निरर्थक होत जातो कारण मुलभूत तत्वज्ञानही नेहमीच बाह्य घटनांनी प्रेरित असते. ज्या घटना आंतरिक आहेत असे आपल्याला वाटते त्या घटनाही कोठे ना कोठे बाहेरील आपले नियंत्रण नसलेल्या अदृश्य प्रभावांनीच प्रेरित असतात. मुलभूत नैतिक तत्वज्ञानाचीही ही एक गम्मत आहे व तो अनेकदा बौद्धिक मनोरंजनाचा खेळ वाटतो. पण हा खेळ मानवी स्वातंत्र्याची बूज तरी राखतो. धर्म हे मानवी स्वातंत्र्याचे नेहमीच शत्रू असतात. राजकीय स्वातंत्र्याबाबत मनुष्य जेवढा सजग असतो तेवढा धार्मिक स्वातंत्र्याबाबत नाही. किंबहुना त्याला ते पारतंत्र्य हवेसे वाटत असते. 

      मानवी जीवनात धर्माचे स्थान काय असा प्रश्न जगभर चर्चेत आहे. धर्मच न मानणारा वर्गही आज झपाट्याने वाढताना दिसतो आहे. पण जीवनातील असुरक्षा भेडसावत असलेला बव्हंशी वर्ग हा कोणत्या ना कोणत्या धर्मश्रद्धांना चिकटून असतो. अनेकदा ही सुरक्षेसाठीची धर्मजाणीव कृत्रिमरीत्या बनवली गेलेली असते. बहुसंख्यांकही आपल्या धर्माचेच वर्चस्व असले पाहिजे ही भूमिका घेत जेंव्हा अल्पसंख्यांक धर्मियांबाबत दमनकारी तत्वद्न्यानाच्या आहारी जाऊ लागतात तेंव्हाही शोचनीय स्थिती निर्माण होते. धार्मिक लोक हे पुरातन काळात मानसिकदृष्ट्या जगत पुराकथांना सत्य मानत गतकालीन काल्पनिक गौरवात रममाण राहतात. तसे करणे अनेकदा धर्मवादी नेत्यांना आवश्यक वाटते. किंबहुना धर्म ही अफूची गोळी बनून जाते आणि माणसे वर्तमानातील आव्हाने पेलायची मानसिक शक्ती हरपून बसतात.

धर्म हा मानवी जीवनाचा मानसिक समाधान देणारा घटक न राहता जेंव्हा विशिष्ट हेतूंनी प्रेरित होतो व सर्व समाज त्या हेतूंच्या पूर्ततेसाठी आक्रमक होतो तेंव्हा उन्मादी अथवा रक्तपाती घटना घडणे अपरिहार्य होते. किंबहुना जागतिक इतिहासच अशा धर्म-प्रेरित युद्धांनी भरलेला आहे.  कौटुंबिक किंवा सामाजिक हिंसाचारासही अनेकदा धर्मच कारण झालेला आहे. राजकारण आणि धर्मकारण हातात हात चालू लागले कि काय होते हे आपण आज अनुभवत आहोत.

धर्माने जे दिले नाही ते विज्ञानाने दिले असे म्हटले जाते. पण अध्यात्मवादी म्हणतात कि जेथे विज्ञान संपते तेथे अध्यात्म सुरु होते! अध्यात्मवादी मानसिक शांतीच्या शोधातील लोकांना आपापल्या कळपात खेचण्यासाठी आतुरच असतात. मानसिक शांती ही मुळात मानसिक सापेक्ष संवेदना आहे व ती स्थल-काल-सापेक्ष बदलती असते हे अध्यात्मवादीच मान्य करत असतात. सुख-दु:खाचीही स्थिती तशीच आहे. पण अध्यात्माची बाजारपेठ फार मोठी आहे कारण अशांत असणे हीच नैसर्गिक मानवी प्रेरणा आहे हे कोणी लक्षात घेत नाही.

      पण धर्म आणि अध्यात्म या हातात हात घालून चालना-या बाबी आहेत असे अनेक लोक मानतात कारण अध्यात्मवादीच आपापल्या धर्माचा बोलबाला करत असतात. त्यांचे मार्केटिंग त्यामुळे होत असते. बुवा-बाबाचे पीक अमाप येते त्याचे कारण हेच आहे.

      तसे पाहिले तर प्रागैतिहासिक ते इतिहासकाळातील असंख्य धर्म आणि त्यांच्या मुख्य देवता आज अस्तित्वातही नाहीत. ते कालौघात नष्ट झाले. लोकांनी नव्या धर्मांचे कास धरली. मागचे देव विस्मृतप्राय व अपूज्य झाले. कधी गुलामीत जाऊन अथवा कधी नव्या तत्वांकडे आकर्षित होऊन. मुळात जगातील कोणताही धर्म चिरंतन अथवा “सनातन” नाही. तरीही धर्माचे प्राचीनत्व ठरवण्यासाठीच्या ज्या स्पर्धा लागतात त्या हास्यास्पद नाहेत असे कोण म्हणेल?

      मानवाला धर्माची आवश्यकता आहे काय या प्रश्नाचे उत्तर सरळ सरळ नकारार्थी आहे. धर्म ख-या अर्थाने पाहिले तर समाजाची सामुहिक सहजीवनासाठी आपसूक निर्माण होणारी संवेदना आहे. तिची कोणतीही अशी बांधील संहिता नाही. तीत देव अथवा कर्मकांडे अभिप्रेतच नाहीत. संघटना हा धर्माचा मुळात हेतूही नाही. पण असा धर्म असू शकतो हे आजच्या धर्मवादाच्या संस्कारांमध्ये वाढलेल्या समाजाला पटनारही नाही. धर्मपालन केले तर पुण्य मिळेल आणि मृत्यू हा शेवट नसून मृत्योत्तर जीवन सुंदर करण्यासाठी (स्वर्गात जाण्यासाठी) अथवा चांगला पुनर्जन्म घेण्यासाठी अथवा मोक्ष मिळवून जन्म-मरणाच्या फे-यातून सुटण्यासाठी त्याचा उपयोग होईल या धारणेचा मानवी मनावर आजही विलक्षण पगडा आहे. किंबहुना जीवनातील अनिश्चितता आणि मृत्यूचे अजरामर भय याने मानवी मानसिकता व्याप्त झालेली आहे. हे भय दूर होईल अशी व्यवस्था अजून तरी दृष्टीपथात नाही. धर्म हा मानवी मनावर एक मानसशास्त्रीय आशात्मक संस्कार करतो खरा पण म्हणून मृत्यूचे भय किंवा अनिश्चितता दूर झाल्या असे होतांना दिसतही नाही. शिवाय धर्मात राहिलो म्हणजे सामाजिक जीवन तरी सुसह्य होईल हीही एक भावना असते, पण खरे तर ती एक काल्पनिक भावना आहे. उलट धर्म-संस्कृतीच्या वल्गना करत सामाजिक/राजकीय/आर्थिक स्वार्थ साधणारे घटक मोठ्या प्रमाणावर असल्याने वर्तमान हा दुषितच केला जात असतो. खरे तर कोणतीही परंपरा स्थायी नसते. तीही सातत्याने बदलत असते पण त्याचे भान धर्मनेते व अनुयायी ठेवत नाहीत. त्यामुळे धर्माचा सांगितला जाणारा उद्देशच उध्वस्त होतो. दुखांचा नाश हे ध्येय मानावे तर मुळात तीही एक स्थल-काल-सापेक्ष बदलती मानसिक अवस्था आहे. अशी अनेक कारणे धर्म नाकारण्यासाठी असली तरीही स्वार्थलोलुप व्यवस्थाच धर्म नाकारणा-यांबाबत सहसा अनुदार असल्याने तसे वातावरण बनण्याची शक्यताही धूसर होऊन जाते.

       शेवटी सामुहिक मानसशास्त्र कसे काम करते यावरच सामाजिक विचारांच्या व संस्कृतीच्या दिशा ठरत असतात. आजही धर्माची गरज भासते आहे याचा अर्थ प्रबोधनकालापासून तरी, जरी ज्ञान-विज्ञानयुगाचे लाभ सारे जग घेत असले तरी, धर्म हेच ज्ञान-विज्ञानाचे कारण व मूलाधार आहे ही भावना दूर करण्यात जागतिक तत्ववेत्त्यांना अपयश आले आहे असे आपल्याला दिसेल. कदाचित त्यासाठी मानवी बुद्धीला पटेल-रुचेल असे सोपे पण आगळेवेगळे आणि आज्ञात्मक नसलेले तत्वज्ञान जन्माला घालावे लागेल जे माणसाला प्रागतिक व समाजसुसंगत (वा किमान विघातक नसेल असे) बनवण्यात सहाय्यकारी घटक बनेल.

      जगातील बहुतेक धर्मांनी आपल्याच धर्मतत्वान्चीही अक्षम्य हेळसांड केल्याचे इतिहासात दिसते. कालबाह्य झालेल्या धार्मिक संकल्पना समाजावर लादत “उदात्त परंपरा”  म्हणून त्यांचे गौरवगान करत अनेकदा समाजघातक कृत्ये करायला प्रेरित केले आहे. “सत्य” या सर्वधर्म तत्वाची वासलात प्रत्येक धर्माच्या नियंत्यानी लावली आहे हे इतिहासच स्पष्ट करतो. त्यासाठी सत्याच्याच सोयीस्कर व्याख्या केल्या गेल्या आहेत. एक-दुस-याच्या धर्मावर कुरघोडी करण्यासाठी वर्चस्ववादी भावनेने ग्रस्त ‘धार्मिक’ विद्वान आपली प्रतिभा लबाड्यांसाठी पणाला लावतात हे आता सिद्ध झालेले आहे. अशा स्थितीत कोणत्याही धर्माच्या वा पंथाच्या अनुयायांनी धर्म/पंथ माहात्म्याचे ओझे अजून किती काळ निरर्थक वाहत राहायचे हे ठरवावे लागेल.

 

-संजय सोनवणी  

Wednesday, May 3, 2023

तृतीय नेत्र - खिळवून ठेवणारी थरार कादंबरी

 

तृतीय नेत्र - खिळवून ठेवणारी थरार कादंबरी


image.png  

इंग्रजी भाषेत थरार, फँटसी कादंबऱ्यांचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे. स्टीफन किंग, जेके रोलिंग, अगाथा ख्रिस्ती असे कित्येक लेखक आणि त्यांच्या कादंबऱ्या जगभर प्रसिद्ध आहेत. कित्येक कादंबऱ्यांवर चित्रपट आणि वेबसिरीज आल्या आहेत आणि त्याही प्रचंड यशस्वी झाल्या आहेत. आपल्याकडे हा प्रकार तसा क्वचितच पाहायला मिळतो. सुहास शिरवळकरांचा सन्माननीय अपवाद सोडला तर हा प्रकार फारसा कोणी हाताळताना दिसत नाही. अशा लेखनाला वाचक नाही असंही नाही. आजही गावोगावच्या वाचनालयात सुशिंच्या थरार कादंबऱ्यांना सर्वात जास्ती मागणी असते. तसेच इंग्रजी लेखकांच्या थरार कादंबऱ्यांना देखील महाराष्ट्र मोठी मागणी आहे. तरीही मोजके लेखक आणि इंग्रजी भाषेतून अनुवाद सोडले तर या जॉनरचं मूळचं लिखाण कमी आहे.

थरार कादंबरी लिहिणं हा किचकट प्रकार आहे. गुंतागुंतीची कथा कुठेही रटाळ न वाटू देता त्यातला थरार कायम ठेवत पुढे नेणं हे फार कौशल्याचं काम आहे. त्यातही बाहेरच्या लेखकाची छाप न पडू देणं हे त्याहीपेक्षा अवघड काम आहे. हे अवघड काम संजय सोनवणींनी त्यांच्या पूर्वीच्या “असुरवेद” सारख्या थरार कादंब-यांप्रमाणे नुकत्याच प्रकाशित झालेल्या 'तृतीय नेत्र' या कादंबरीत अगदीच सहजपणे केलं आहे.

संजय सोनवणी हे तसे इतिहास संशोधक आणि किचकट विषयांचे अभ्यासक म्हणून आपल्या सर्वांना परिचित आहेत. असं असलं तरीही अतिशय वेगळा विषय घेऊन लिहिलेली तृतीय नेत्र ही कादंबरी क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणारी आहे. कित्येक प्रसंग वाचताना ते आपल्या डोळ्यासमोर घडतंय असंच वाटून जातं.

विजयनगरचा सम्राट राजा कृष्णदेवरायने हंपीच्या विरुपाक्ष मंदिरात एक दुर्मिळ रक्तवर्णी हिरा बसवला जो पुढे सोळाव्या शतकात रहस्यमयरित्या गायब झाला. हंपी शहर नष्ट झाल्यानंतर काळाच्या ओघात तृतीयनेत्रचा इतिहासही नाहीसा झाला. एकविसाव्या शतकात राहुल भोसले या तरुण इतिहास संशोधकाला पेशवे दफ्तरात एक कागदाचा तुकडा हाती लागतो. त्यातील अस्पष्ट मजकूर वाचून तो संभ्रमात पडतो. त्यातील मजकुराचं कोडं उलगडत असतानाच सुरु होते एक न थांबणारी खुनांची मालिका. त्या हिऱ्याच्या मागावर असलेली एक आंतराष्ट्रीय गुन्हेगारांची टोळी, त्यांचा म्होरक्या असलेला एक इतिहास तज्ज्ञ जो तो हिरा हस्तगत करण्यासाठी कोणत्याही थराला जायला आणि कितीही मुडदे पडायला तयार आहे. आणि त्याला झुंज देतोय तो आपल्या कादंबरीचा नायक राहुल आणि त्याची सहकारी कविता. त्यात त्याला वेगवेगळ्या पातळ्यांवर पोलीस, प्रशासन, गुंड इत्यादींसोबत करायला लागलेला संघर्ष अशी या कादंबरीची रूपरेषा आहे.

एखाद्या थरारपटाप्रमाणे ही कथा पुढे जाते. कथानक कुठेही रटाळ होत नाही. त्यामुळे एका बैठकीत ही ३०० पानी कादंबरी वाचून होते. आपल्या इतिहासात या कथेची मुळं असल्यामुळे ही कथा विशेष भावते. राजा कृष्णदेवराय, हंपी, शिवकाळ, सुरतेची लूट या आपल्या परिचयाच्या घटनांतून वाट काढत ही कथा पुढे जात राहते त्यामुळे आपण कथेशी भावनिकरित्या जोडलेलो राहतो. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या अठरापगड जातीच्या मावळ्यांनी त्यांच्या लोकगीतांतून पिढ्यानपिढ्या जतन केलेल्या इतिहासाचं महत्व ही कादंबरी अधोरेखित करते.

सध्याच्या काळातील सामाजिक, राजकीय आणि जातीय प्रसंग लेखकाने जागोजागी पेरल्यामुळे ही कथा आपल्याच आजूबाजूला घडत असल्याचं जाणवतं. या कथेवर कुठेही इंग्रजी थरारक कादंबऱ्यांची छाप जाणवत नाही त्याचं हे एक महत्वाचं कारण आहे.

कथेला आवश्यक असणाऱ्या पात्रांना उभं करणं त्यांचे बारकावे टिपणं यात सोनवणींचा हातखंडा आहे. कादंबरीतले छोट्यातलं छोटं पात्रही लेखक हुबेहूब आपल्यापुढे उभं करतो. त्यामुळे प्रत्येक पात्र आपल्या विशेष लक्षात राहतं. त्यातही मुख्य खलनायक असलेला इतिहास संशोधक तर सुपर व्हिलनच आहे. एखादा थंड डोक्याचा विद्वान पैशाच्या मागे लागून आपल्या बुद्धीचा गैरवापर कसा आणि किती निर्दयपणे करू शकतो हे लेखकाने एकदम खुबीने उभं केलं आहे. इतिहास संशोधक असलेले शास्त्री, पोलीस इन्स्पेक्टर शिंदे, खलनायकाची सहकारी मीनाक्षी ही पात्रंसुद्धा आपल्या डोळ्यासमोर हुबेहूब उभी राहतात.

थरार कादंबरी असूनही त्यातल्या समकालीन प्रचलित जातीय समजुतींवर केलेलं भाष्य आपल्याला विचार करायला लावतं. इतिहासाचं चाललेलं विकृतीकरण, पुराव्यांची अफरातफर, त्याचे जातीय कंगोरे, प्रशासनातील जातीयवाद या गोष्टी सद्य परिस्थितीची जाणीव करून देतात.

एकंदर या कथेचं आपल्या इतिहासात असलेलं मूळ, त्याचबरोबर त्यातली समकालीन जातीय, सामाजिक समीकरणे आणि एखाद्या वेबसिरीज प्रमाणे डोळ्यासमोरून जाणारा कथेचा उत्कंठावर्धक पट पाहता लवकरच या कादंबरीवर एखादी वेबसिरीज आली तर अजिबात नवल वाटणार नाही.

- अक्षय बिक्कड



तृतीय नेत्र

लेखक- संजय सोनवणी

प्राजक्त प्रकाशन

पृष्ठसंख्या- २९८

मूल्य- रु. ३६०/- मात्र

जनानखान्यांचे अद्भुत विश्व!

  जनानखाना, ज्याला अंत:पूर, राणीवसा किंवा हरम असेही म्हटले जाते त्याबाबत समाजामध्ये अनेक समजुती प्रचलित आहेत. शत्रूच्या जिंकलेल्या स्त्रीय...