Monday, March 18, 2024

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम



एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हते. वैदिक धर्मात मात्र वर्णव्यवस्था जन्मसिद्ध असून ही व्यवस्था उतरंडीची होती. वैदिक धर्माला सामाजिक समतेचे तत्व तर मान्य नाहीच स्त्रियांनाही दुय्यम स्थान असणे हे अव्यवच्छेदक लक्षण होते. शिव-शक्ती हे हिंदू धर्माचे आध्रास्तंभ समान स्तरावर वावरतात पण वैदिक धर्मातील लक्ष्मी ही विष्णूचे पाय चेपत बसलेली असते. केवळ या दैवत संकल्पनांवरून दोन्ही धर्मातले तत्वज्ञान कसे वेगळे आहे हे दिसून येईल. वैदिक व हिंदू धर्म वेगळे आहेत याची जाण विद्वांनांना देखील होती. उदा डॉ. रा. ना. दांडेकर म्हणतात, “बहुतेक सर्व सारभूत विशेषांच्या दृष्टीने इतिहासपूर्व भारतीय धर्म (हिंदू धर्म) वैदिक आर्य धर्माहून अत्यंत भिन्न होता आणि त्या सिंधूधर्माचे ऐतिहासिक शैवप्रधान हिंदू धर्माशी असलेले सादृश्य अगदी संशयातीत आहे. हिंदू धर्माच्या इतिहासाच्या दृष्टीने वैदिक आर्यांचा कालखंड हा मध्योत्गत घटनेच्या स्वरुपाचा आहे. त्या कालखंडातील धार्मिक विचारप्रणालीने ऐतिहासिक हिंदू धर्माच्या रचनेवर व स्वरुपावर प्राणभूत व दूरगामी प्रभाव निश्चितपणे पाडलेला नाही." (हिंदू धर्म:इतिहास आणि आशय)

असे असूनही चवथ्या शतकानंतर हिंदू धर्मातून धर्मांतर केलेल्या वैदिक धर्मियांनी पुरातन पुराणे, सांख्य-वैशिशिकांसारख्या तत्वाद्न्यानावर आणि उपनिषदांवर कब्जा मारून ती वेदाचाच भाग आहेत असे घोषित करायला सुरुवात केली. हिंदू तंत्रातील विद्वानांनी या प्रचाराला हिरीरीने विरोध केला पण दहाव्या शतकानंतर देशावर कोसळलेल्या दुष्काळ व परकीय आक्रमणामुळे त्यांच्या विरोधाची गती क्षीण होत गेली. तरीही नाथ, सिद्ध संप्रदायांनी देशभर वैदिक तत्वद्न्यानाला विरोध केला. तंत्रशास्त्रावर आधारित हजारोंनी ग्रंथ लिहिले गेले. तोवर बौद्ध धर्म भारतात नाममात्र उरला होता तर जैन धर्मीय तडजोडी करत आपले अस्तित्व कसेबसे टिकवून ठेवत राहिले. आधी जैन धर्माला समर्थन देणारे यादव घराणेही वैदिकाश्रयी झाले आणि नंतर आपले अस्तित्व हरपून बसले. राजाश्रयासाठी वैदिक धर्मियांनी अनेक क्लुप्ती वापरल्या. क्षत्रीय वर्णाचे वाढवलेले अतोनात स्तोम त्यांच्या कामी आले व ते राजांना पौराणिक कोणत्यातरी वंशाशी जोडत क्षत्रियत्व बहाल करू लागले. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अशीच गोष्ट घडली हे सारे जाणतात. या अश्या क्लुप्त्यामुळे त्यांना राजाश्रय व राजाची सल्लागारपदे मिळवणे सोपे गेले. यामुळे देशात समतेचे तत्वही धुळीला मिळाले.

‘मध्ययुगीन धर्मसंकल्पनांचा विकास: तंत्रयोग आणि भक्ती’ या ग्रंथात डॉ. सुधाकर देशमुख म्हणतात कि,
"समाज जेव्हा जेव्हा स्वत:ला असुरक्षित असल्याचे अनुभवतोतेव्हा तेव्हा तो मूलतत्ववादाकडे वळतो. दहाव्या शतकानंतर जवळजवळ १४ व्या ते १५ व्या शतकापर्यंत भारतात वैदिक धर्मीयांनी पुन्हा एकदा आपला धर्म शुद्ध रहावा म्हणून वर्णाश्रमधर्मयज्ञविधी आणि कर्मकांड यांचे तसेच वैदिक श्रुती आणि स्मृती यांचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न केला. ...... वैदिक स्मृतींवर अनेकांनी टीका लिहिल्या,.....या निबंधकारांनी मूलतत्ववादाकडे प्रवास केल्याने तंत्र आणि नाथपंथ यांच्यामुळे जी स्वातंत्र्य आणि समतेची झुळूक जाणवत होतीतीही लुप्त झाली." दहाव्या शतकानंतर व्यावासायाधीश्ठीत सैल जातीसंस्था कठोर बनली ती वैदिक अनुकरणातूनच.

खरे तर मनुस्मृती हिंदूंसाठी लिहिली गेलेली नव्हतीच किंवा तिचे पालन करणे हिंदू धर्मियांवर कधीही बंधनकारक नव्हते. या स्मृतीने धर्माची केलेली व्याख्या "वेदस्मृतीस्वधर्मीय सज्जनांचा आचार आणि स्वत:च्या आत्म्याचे समाधान या चतुर्विध बाबी साध्य करतो तो धर्म" अशी आहे. (मनू: २:१२). वेद हा या धर्माचा प्रमुख आधार असल्याने त्याला आपण "वैदिक धर्म" असे म्हटले जाते. त्याच वेळीस वेदांशी कसलाही संबंध नसलेल्यांचा मूर्तीपुजकांचाही ही धर्म होताच ज्याचा मनुस्मृती निषेध करते. मनुस्मृतीत वारंवार वेदविरोधी तत्वज्ञाने व आचारसंहिता याबाबत विरोध दाखवला आहेच. शिवशक्तीप्रधान धर्म व समण धर्म अगदी वेदांचीही निर्मिती झाली नव्हती त्या काळापासूनम्हणजे सिंधू काळापासूनभारतात अस्तित्वात होता हे प्रत्यक्ष पुराव्यांनीच सिद्ध झाले आहे. असे असतांना संपुर्ण भारतियांचे ऐहिक व पारलौकिक नियमन ही स्मृती कशी करेल?

वैदिक मनुस्मृती हिंदुंवर लागु होती म्हणावे तर मध्ययुगातच अहिल्याबाईताराराणी अशा विधवा महिला सत्ताधारी तर होतातच पण महादजी शिंदेंच्या विधवांच्या रुपाने त्या वारसा हक्काची युद्धेही लढतांना दिसतात आणि काही केल्या त्यांचे वर्तन "स्मृती"मान्य नाही. सातवाहन ते तत्कालीन असंख्य राजे हे वैदिकांच्या दृष्टीने शूद्रच होते. पण नायनिकासारख्या नागवंशीय राणीने स्वत:ची नाणी पाडली जे मनुस्मृतीचा अंमल हिंदुंवर असता तर अशक्यच होते. एवढेच नव्हे तर गाथा सप्तशतीत २८ महिलांची काव्ये ग्रथित आहेतहेही झाले नसते. नंतरच्या महिला संत आणि राज्यकर्त्याही घडल्या नसत्या. मनुस्मृती किंवा अन्य स्मृत्या हिंदुंवर लागू नव्हत्या कारण हिंदूंनी त्या मान्य करण्याचा प्रश्नच नव्हता. तरीही मनुस्मृती हिंदुंवर लागू केली गेली ती ब्रिटीश काळात. हिंदू कायदे बनवतांना वारेन हेस्टीगने भारतीय समाजव्यवस्थेबद्दलाच्या घोर अज्ञानाने ब्राह्मण पंडितांच्या सांगण्यावरून मनुस्मृतीचा आधार घेत हिंदू कायदे बनवले. हा सांस्कृतिक व धार्मिक अनर्थच होता. पण राजाश्रय काय करू शकतो हे या उदाहरणामुळे प्रकर्षाने लक्षात यावे. एरवी अगदी पेशवेही राज्य करत असताना हिंदुंवर मनुस्मृती लागू नव्हती याची शेकडो उदाहरणे इतिहासात मिळतात. ब्रिटीश काळाने मात्र हा अनर्थ केला आणि त्याची परिणती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या मनुस्मृती दहनात झाली.

 

देशातील आजचे बहुतेक वैदिक धर्मीय मुळचे येथलेच असून त्यांतील बहुसंख्यांनी इतिहासकाळात, विशेषता: गुप्त काळात, धर्मांतर केले आहे. वैदिक धर्मात स्थान मिळवण्यासाठी अनेकदा खोटारडेपणाही केलेला आहे हे जी.एस.घुर्येसारख्या विद्वानानेही दाखवून दिले आहे. या धर्मांतराची कारणे होती जगणे विनासायास सोपे करणे, दाने व अग्रहार प्राप्त करणे आणि राजसत्तेच्या आश्रयाने लोकांवर नियंत्रण ठेवणे. आजही हे कार्य होत नाही असे म्हणणे फार धाडसाचे होईल. अफगाणिस्तानमध्ये उदयाला आलेला हा धर्म धर्मांतरांनी पसरला आणि भारतीय सास्न्कृतीक संरचनेवर मोठा प्रभाव टाकू शकला याचे सविस्तर वर्णन मी माझ्या “हिंदू आणि वैदिक धर्माचा इतिहास” व “हिंदू धर्म” या पुस्तकांत केलेला आहेच. ब्रिटीश काळापर्यंत स्वत:ला हिंदू न मानणारे वैदिक धर्मीय स्वत:ला हिंदू म्हणवू लागले. त्यातून झालेला गोंधळ तर अजूनही संपलेला नाही. त्याचे निराकरण सुसंस्कृत आणि प्रगल्भ समाज भविष्यात करेल अशी आशा आहे. परंतु मुलानिवासीवादी वैदिक आर्यांना परकीय समजून जे हल्ले करतात तेही निषेधार्ह आहेत हे मी आवर्जून नमूद करू इच्छितो.

 

-संजय सोनवणी

 

Tuesday, March 5, 2024

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज आणि व्यापारी मार्ग!

 


संत तुकाराम सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात होऊन गेले अशी मान्यता आहे. तुकाराम महाराजांच्या अभंगात जी व्यापक जीवनदृष्टी दिसते तिचे नेमके मर्म कशात असावे याबद्दल विद्वानांतही कुतूहल असून प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने त्यावर विवेचन केले आहे. तुकोबाराय हे बहुश्रुत होते याबाबत कोणाचाही मतभेद नाही. त्यांच्या अभंगात येणारे सामाजिक, अध्यात्मिक जीवन स्थानिक नाही. स्थानिकतेमुळे येणारी संकुचितता त्यामुळेच त्यांच्या अभंगांत दिसूनही येत नाही. त्यांच्या अनुभवविश्वातच एक उदार व्यापकता आहे हे त्यांच्या सर्व अभंगाचे परिशीलन केल्यानंतर लक्षात येते आणि अगदी सामान्य वाचकही थक्क होऊन जातो. ते नुसते विठ्ठलभक्त व स्वकेंद्री आध्यात्मिक नव्हते त्यामुळे त्यांच्या अभंगात “बुडती हे जन देखवे ना डोळा” अशी व्यापक समाजकेंद्री अध्यात्मिकता होती. रोकड्या व्यवहाराबद्दलही ते आग्रही होते. देहूसारख्या तत्कालीन छोट्या गावात राहणा-या व्यक्तीत हे सामाजिक व्यापक भान कसे आले असावे हा प्रश्न पडणे त्यामुळेच स्वाभाविक आहे. आणि याचे उत्तर मिळते ते त्यांच्या जीवनात त्यांनी घेतलेल्या अनुभवांत आणि त्यानिमित्त केलेल्या भ्रमंतीत. एका अभंगात ते म्हणतात-

“बरवे दुकानीं बैसावें । श्रवण मनन असावें ॥1
 
सारासाराचीं पोतीं । ग्राहिक पाहोनि करा रितीं ॥ध्रु.॥
 
उगे चि फुगों नका गाल । पूर्ण सांठवावा माल ॥2
 
सत्य तराजू पैं धरा । नका कुडत्रिम विकरा ॥3
 
तुका जाला वाणी । चुकवुनि चौ-†यासीच्या खाणी ॥4॥“

तुकाराम महाराज वाणी होते. धान्य ते किराणामाल विकणे हा त्यांचा पिढीजात व्यवसाय होता. ते सावकारीही करत होते. देहूच्या एका वाण्याने एवढे अनुभवधन कसे जमा केले असावे हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. त्यांचे ऐतिहासिक जीवनचरित्र आज आपल्याला पूर्णपणे उपलब्ध नाही. जे आहे ते विसंगती, चमत्कार आणि दंतकथांनी भरलेले आहे. तुकोबांनी स्वत:बद्दल क्वचित निर्देश केले असले तरी ते आपला मुद्दा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. स्वकेंद्रित दृष्टी नसल्याने व आत्मचरित्रात्मक लिहावे एवढा अहंभावही नसल्याने हे स्वाभाविकच म्हणावे लागेल. त्यात इतर संतांप्रमाणे इतिहास घातक स्वार्थी लोकांनी त्यांच्याहे अभंगांत अनेक प्रक्षेप करून ठेवले असल्याने त्यांचे अभंग तारताम्यानेच निवडावे लागतात. स्वत:च्याच तत्वद्न्यानाला कोणी छेद देत नसतो किंवा भाषा नि कथनशैलीतही फरक पडत नसतो त्यामुळे जेथेही असे स्वभाव-विसंगत व काल-विसंगत अभंग समोर येतात ते प्रक्षिप्त मानण्याची प्रथा आहे आणि ती योग्यच होय.

तुकोबांनी आपण वाणी असल्याचा उल्लेख केलाय तो “वाणी”पण एक आध्यात्मिक रूपक बनवण्यासाठी, स्व-महती सांगण्यासाठी नाही हे उपरोक्त अभंगातूनच स्पष्ट होते. वाणी असताना आलेले व्यक्तिगत अनुभव मात्र ते कोठेही देत नाहीत. ती त्यांचे स्वभावप्रकृतीही नाही. किंबहुना सर्वच भारतीय साहित्यीकांमधली ती एक परंपराच होती कि काय नकळे. पण त्यामुळे लेखकांचा जीवनकाळ व त्याचे जीवनानुभव व त्यांचा लेखनावर झालेला परिणाम समजावून घेण्यात अडचणी येतात व तर्क आणि कल्पनाशक्तीवर विसंबावे लागते. तुकोबाच्या अनुभवविश्वाचे मुळ शोधताना आपल्याला तत्कालीन वाणी, व्यापारी, सावकार यांचा विचार करून तुकोबारायांच्या व्यावहारिक जीवनाचा वेध घेत त्यांच्या अनुभव विश्वात सुसंगती आणावी लागते.

तुकाराम महाराज वाणी (व्यापारी) होते हे त्यांच्या जीवनातील (तपशील फारसा माहित नसला तरी) सत्य होते हे मान्य करून या लेखाची योजना केली आहे.

व्यापाराचा इतिहास पुरातन आहे. जेंव्हा शेतीचा शोधही लागला नव्हता तेंव्हापासून प्रदेशविशिष्ठ नैसर्गिक साधने ते पशु खरेदी-विक्री या व्यापारातील मुलभूत गोष्टीची सुरुवात झाली. अतिरिक्त वस्तूंची विक्री व ज्याची कमतरता आहे त्याची खरेदी करणे हा प्राथमिक व्यवसाय माणसाने सुरु केला त्याला किमान दीड लाख वर्ष होऊन गेलीत. शेतीच्या शोधाने व्यापारात अनेक गोष्टींचा समावेश होत गेला व बाजारपेठा विस्तारत गेल्या. सिंधू काळात तर इजिप्त, सुमेरिया ते मध्य आशियापर्यंत व्यापारी येत जात असत. व्यापारामुळे सांस्कृतिक आदानप्रदानही झाले आणि एक जागतिक संस्कृती बनू शकली हे न टाळता येणारे वास्तव आहे. व्यापा-यांनी प्राचीन काळात जीवावरचे धोके पत्करत व्यापारासाठी मार्गक्रमण केले तो इतिहास मानवजातीच्या इतिहासातील सर्वात रोमहर्षक आणि माणसाला ख-या अर्थाने जागतिक आणि मानवतावादी बनवणारा उज्ज्वल इतिहास आहे. समुद्रमार्गाने जहाजे हाकारून व्यापार करण्याची सर्वात धाडसी कला माणूस शिकला आणि तिने माणसाचे मानसिक क्षितीज अजून विस्तारत नेले. भारताला किमान सन बाराशेपर्यंत समृद्धी आणली ती केवळ कुशल उत्पादक आणि राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय व्यापारामुळे.  वैदिक धर्मियांनी जरी त्यांच्या धर्मातल्या लोकांवर समुद्रबंदी लादली असली तरी ती हिंदूंनी (बहुजन) कधीच मानली नाही. देशभरातील बंदरे देशी-विदेशी जहाजांनी गजबजलेली असत आणि याचे वर्णन विदेशी प्रवाशांनीही करून ठेवलेले आहे. प्राचीन व्यापारी मार्ग हा अनंत कुतूहलाचा आजही विषय असून रेशीम मार्गावर आजही प्रचंड संशोधन होते आहे. भारतातून बाहेर जाणा-या व्यापारी मार्गांवरील संशोधन नुकतेच माझ्या माध्यमातून सुरु झालेले आहे आणि त्यावर अजून खूप काही होण्याची आवश्यकता आहे.

वैदिक धर्मियांनी त्यांचे महत्ता वाढवण्यासाठी वैदिकेतर (म्हणजे शुद्र) लोकांवर अनेक बंधने सांगितली असली तरी ती हिंदूंनी मानली असल्याचे इतिहासावरून सिद्ध होत नाही. स्मृतीमध्ये जे काही बंधन शूद्रांवर घालण्यात आले ते बंधन सरसकटपणे शूद्रांनी पायतळी तुडवले असल्याचे दिसते. वैदिक धर्माप्रमाणे पहावे तर व्यापार-सावकारी हा उद्योग केवळ वैश्य वर्णासाठी राखून ठेवला आहे, शूद्रांना हा व्यवसाय निषिद्ध आहे, पण त्याची पत्रास तुकोबाराय अथवा त्यांच्या पूर्वजांनी बाळगली असल्याचे दिसत नाही. किंबहुना ही बंधने हिंदूंसाठी नव्हती हे ज्ञान त्यांना असल्याचे दिसून येते. प्राचीन कालापासून (जेंव्हा वैदिक धर्म स्थापनही झालेला नव्हता) सर्वसामान्य भारतीय सर्व प्रकारच्या व्यवसायांत तर होतेच पण ते राजेही असत. नंद, सातवाहन, यादव ते शिवाजी महाराज त्याचे पुरावे आहेत.

प्राचीन काळी व्यापारी व उत्पादकांच्या श्रेण्या असत. श्रेणी म्हणजे आजच्या चेम्बर ऑफ कॉमर्स सारख्या संस्था. लोकशाही सिद्धांतातुन निर्माण झालेली श्रेणी, कुल, पुग व गण या व्यावसायिक, उत्पादक, शेतकरी आणि पशुपालक समाजांच्या आपापल्या व्यवसायानुसार स्थापन झालेल्या या संस्था.  हा भारतातील आर्थिक इतिहासाचे मनोहर पर्व आहे. चर्मकार, बुरुड, स्वर्णकार असे असंख्य व्यवसाय व व्यापारी यांच्या श्रेण्या सिंधु काळापासुन स्थापन झालेल्या होत्या. आपापल्या व्यवसायांचे नियमन करणे, नवागतांना प्रशिक्षित करणे, मालाचा अथवा सेवेचा दर्जा राखने, किंमती नियमीत करणे व करांच्या संदर्भात राजदरबारी प्रतिनिधितव करणे हे काम या श्रेण्या, कुले तर करतच पण त्यांना  ठेवी स्विकारणे ते कर्ज देणे आणि नाणे पाडण्याचेही अधिकार होते. सिंधु काळापासुन भारताने आर्थिक भरभराट पाहिली ती या स्वातंत्र्य असलेल्या व्यावसायिक श्रेण्यांमुळे. या श्रेण्यांचे व्यापार देश-विदेशात चालत. बौद्ध जातकांत या अशा श्रेण्यांच्या वैभवाचे चित्रण तर मिळतेच पण दानलेखांतुन सातवाहन काळापर्यंत ते किती वैभवशाली होते हेही आपल्याल समजते. 

 

या श्रेण्यांचे सदस्य मतदानाने आपला अध्यक्ष निवडत. त्याला सेठ्ठी (श्रेष्ठी) असेही म्हटले जाई. हे पद वंशपरंपरागत नसे. या सेट्ठींना, मग ते वीणकर श्रेण्यांचे असो की चर्मकारांच्या श्रेण्यांचेसमाजात व राजदरबारी त्यांना मोठा मान असे. प्रत्येक श्रेंण्यांची, कुलांची स्वतंत्र न्यायालयेही असत व आपल्या दोषी सदस्यांवर कारवाया करण्याचे अधिकारही त्यांनाच असत. गुप्त काळात वैदिक धर्माला राजाश्रय मिळाल्यानंतर मात्र परिस्थिती पालटली. भारतातील गणराज्ये नाहीशी होऊ लागली. श्रेण्यांचे व कुलांचे अधिकारही कमी झाले. एकार्थाने स्वातंत्र्य व समता या तत्वांचा संकोच होऊ लागला.  श्रेण्यांची आर्थिक शक्ती कमी झाली आणि वैष्णव मंदिरांची वाढली. तिस-या शतकातच योधेयांचेही गणराज्य कोसळले. लोकशाहीचे सामाजिक तत्वज्ञान नष्ट होऊ लागले. पंचायतींच्या रुपाने काही प्रमाणात लोकशाही जीवंत राहिली असली तरी तिने मुळचे समतावादी धेय बदलले. व्यावसायिक श्रेण्या कोसळल्याने त्यांची जागा व्यावसायिक जातींच्या पंचायतींनी घेतली. पण या पंचायती प्राय: अन्यायीच राहिल्याचे चित्र आपल्याला दिसते. वैदिक धर्मियांनी याच काळात उचल खाल्ल्याचे आपल्याला दिसते.

 

पण या श्रेणीव्यवस्थेमुळे भारताचे आर्थिक सामर्थ्य वाढत गेले होते हे विद्वानांनी मान्य केले आहे. श्रेणी’

संस्थेचा –हास ही सामाजिक-राजकीय अव्यवस्थेमुळे झाला. दुष्काळही त्याला कारणीभूत ठरले. सन १०२२ पासून भारतात राष्ट्रव्यापी दुष्काळांची रांग लागलेली दिसते. सन १०२२, १०३३ व १०५२ असे सलग तीन भिषण राष्ट्रव्यापी दु:ष्काळ भारतात पडल्याची नोंद आहे. या दु:ष्काळाने अन्न-पाण्याच्या शोधात फार मोठ्या प्रमाणावर विस्थापन तर झालेच परंतु लक्षावधी माणसे व जनावरे मरण पावली. मुख्य उत्पादन अन्नधान्याचे...तेही पुरते ठप्प झाले. मोठ्या प्रमाणात पशू संहार झाल्याने धनगर-गोपालही अवनतीला पोहोचले. अन्य उत्पादनांची मागणीही अर्थातच पुरती घटली. अन्न विकत घ्यायला पैसा नाही, पैसे असले तरी अन्न उपलब्ध नाही तेथे अन्य उत्पादनांना कोण विचारतो? त्यामुळे उत्पादनकेंद्रेही ओस पडणे स्वाभाविक होते. व्यवसाय संस्था जातीसंस्थेत बदलले व कठोरही झाली, आणि त्याला उच्च-निच्चतेचे ग्रहण वैदिकांमुळे लागले. हा भारतीय सामाजिक इतिहासातील एक दुर्दैवी अध्याय आहे.

 

दुष्काळांचे सत्र येथेच थांबले नाही. बारावे शतक ते १६३० पर्यंत जवळपास २५० पेक्षा अधिक प्रदेशनिहाय दुष्काळ भारतात पडले याची नोंद डच व्यापारी व्हॅन ट्विस्टने करुन ठेवली आहे. मृत प्राणी...कधी मृत माणसेही खावून जगायची वेळ या दुष्काळांनी आणली होती. त्यात १३९६ ते १४०७ या काळात पडलेल्या दुर्गादेवीच्या भयंकर दुष्काळाची नोंद जागतीक पातळीवर घेतली गेली, एवढा तो प्रलयंकारी होता. समग्र अर्थव्यवस्था भुईसपाट करणा-या या दुष्काळाने निर्माणकर्त्यांना रस्त्यावर आणुन सोडले नसले तरच नवल! १६३० चा दुष्काळ तर तुकोबारायांच्या हयातीत पडला आणि त्याचे हृदयद्रावक वर्णन तुकोबांनी करून ठेवले आहे. सामाजिक व आर्थिक वीण उध्वस्त व्हायला या दुष्कालांनी मोठाच हातभार लावला असे म्हणता येते. तुकोबांचा वाण्याचा व्यवसाय याने बसणे स्वाभाविक होते. लोकांची पीडा पाहून कळवळलेल्या तुकोबांनी कर्जाच्या वह्या इंद्रायणीला समर्पित केल्या. त्यांचे दिवाळे निघाले. तरीही स्थिरचित्त तुकोबांनी निर्लेप मनाने लिहिले,

 

“बरे झाले देवा निघाले दिवाळे।
बरी या दुष्काळे पिडा केली॥“

 

दुष्काळाने तुकोबारायांचा संबंध व्यापाराशी सुटला असला तरी ते पूर्वजीवनात देहू गावातील एक यशस्वी व्यापारी होते. देहू हे मुळात व्यापारी मार्गावर वसलेले खेडे असल्याने व्यापारी तांड्यासोबत त्यांचा कोकणातील सागरी बंदरांपर्यंत प्रवास होत असणार हे उघड आहे. त्यासाठी आपण आधी महाराष्ट्रातील व्यापारी मार्गांची थोडक्यात माहिती घेऊ.

 

महाराष्ट्रातील बव्हंशी घाटरस्ते हे पुरातन व्यापारी मार्ग होत. जुन्नर, पैठण, तेर (तगर), पंढरपूर, कोल्हापूर इत्यादी शहरे सातवाहन काळापासून उत्पादन केंद्रे व बाजारपेठा होती. सातवाहन काळातील नाणेघाट आजही आपले महत्व अधोरेखित करतो. प्राचीन काळी व्यापारी मार्ग शक्यतो नदीच्या काठाने जात कारण जलवाहतून काही नद्यात अशक्य असली तरी दिशा समाजाने सोपे तर जायचेच पण महत्वाची गावे-शहरे नदीकाठीच वसलेली असत. जेथे नदीची साथ सोडावी लागे तेथे जुन्या पायवाटांवरच कच्चे रस्ते बनवले गेले होते. त्यामुळे व्यापारी ठीकठिकाणी थांबून आपल्या वस्तूंचा विनिमय करत व स्थानिक वैशिष्ट्याचा माल खरेदीही करत. त्यामुळे गावे-शहरेही आर्थिक दृष्ट्या समृद्ध होण्यात मदत होत असे.

 

देहू हे गाव इंद्रायणीनदीच्या काठी आहे. पैठण-देवगिरी-जुन्नरवरून येणारा मार्ग आळंदीला येऊन नदीकाठाने पश्चिमेला वळत असे. देहू हा व्यापा-यांचा आळंदीनंतरचा दुसरा थांबा होता. पुढचा थांबा लोणावळा. व्यापारी तेथून बोरघाटातून किंवा बाजूच्याच कुरवंडे घाटातून खाली कोकणात उतरून एकतर चेउल अथवा कल्याण बंदराकडे जात असत. चेउल आणि कल्याण बंदर ही महाराष्ट्रातील अतिप्राचीन बंदरे असून येथे फार मोठ्या बाजारपेठाही होत्या. सातवाहनपूर्व काळापासून जगाशी येथून व्यापार सुरु असे. येथे देशी-विदेशी मालाची रेलचेल असे. सर्वात मोठा व्यापार चाले तो मीठ आणि वस्त्रांचा.  अल मसुदी या दहाव्या शतकात येऊन गेलेल्या अरब प्रवाशाने चेउल आणि कल्याण बंदरावर चालना-या व्यापाराचे व हजारो व्यापारी तांड्यांचे प्रत्यक्ष पाहिलेले दृश्य लिहून ठेवलेले आहे.

 

व्यापारी मार्गाची दुसरे खासियत म्हणजे एका दिवसात जेवढे अंतर सरासरीने कापून होई आणि जेथे थांबा घ्यावा लागे अशा जागा. या जागा गावानजीक असत किंवा लोकवस्तीच नसेल तर खुणांचे धार्मिक अथवा स्तम्भात्मक स्तंभ अथवा बांधकामे असत. व्यापार जनावरांच्या पाठीवर सामान लादून अथवा बैलगाड्यांतून केला जात असे. हा प्रवास अर्थातच कष्टाचा आणि सावकाश चालणारा असे. महाराष्ट्रातील व्यापारी थांब्यांच्या जागीच आपल्याला खास करून लेणी खोदलेली दिसतात. या लेण्यांत व्यापारी आराम तर करताच पण येथे मौलिक वस्तूंचेच नव्हे तर राजकीय व सांस्कृतिक बाबी, कथा, गीत, संगीत, साहित्याचेही आदानप्रदान होई. स्थानिक लोकही यात सहभाग घेत. पुढचा मार्ग, त्यातील संभाव्य धोके इत्यादी माहितीही दिली जात असे. थोडक्यात लेणी (व जेथे लेणी अशक्य होते तेथील सराया) एका अर्थाने केवळ धार्मिकच नव्हे तर सांस्कृतिक सरमिसळीचे केंद्रे होती असे म्हणावे लागते. सम्राट अशोकाचे शिलालेखही व्यापारी मार्गांवरच आहेत हा योगायोग नाही कारण त्यामुळे संदेश सर्वदूर पोचायला मदत होत असे. व्यापारीही लेण्यांना (लेणी मग कोणत्याही धर्माची असोत) उदारहस्ते दान देत. कारण लेणी त्यांना नुसता थांबा देत नसत तर त्याच्या व्यापार व मनोविश्वाचेही उद्धारण करत असत. व्यापा-यांचे असे दान शिलालेख सर्वच लेण्यांत विपुल प्रमाणावर आढळून येतात ते यामुळेच. जातीभेद, वर्णभेद तसेच धर्मभेद हा व्यापा-यांच्या जीवनाचा कधीच पाया नसल्याने सर्व व्यापारी गुण्यागोविंदाने एकत्र राहत तसेच एकत्र प्रवासही करत. यात त्यांची सुरक्षितताही होती तशीच संकटकाळी मदत मिळण्याची हमीही होती.

 

देहू गाव नदीकाठी तर होतेच पण ते व्यापा-यांचा एक महत्वाचा थांबा होते. त्यासाठी त्यांना तेथे लेणीही उपलब्ध होती. देहू गावाजवळीलच भंडारा डोंगरावर इ.स. दुस-या शतकात खोदलेली काही लेणी आहेत. ती येणा-जाणा-या व्यापा-यांना विश्रामासाठी कामी येत असत. व्यापारी तांडा म्हणजे अनेक व्यापारी सोयीसाठी एकत्र येत इप्सित ठिकाणी जाण्यासाठी बनवलेला समूह. यात शेकडोजन सहभागी असत. म्हणजे व्यापारी, गाडीवान, हमाल, रक्षक इ. मध्ययुगापर्यंत देश-विदेश व्यापार याच पद्धतीने होत असे. तांड्याच्या प्रमुखास सार्थवाह असे म्हणत. काही लोक तर विशिष्ट उत्पादनाची वाहतूक करण्यासाठी प्रसिद्ध होते. लमाण फक्त मिठाची वाहतूक करत असत. काही धान्याची वाहतूक करत. यांची रात्री थांब्याची सोय होणे आवश्यक असे. लेणी त्यासाठी कामाला येत. व्यापा-यांच्या रक्षणासाठी अनेक किल्लेही बांधले गेलेले आहेत. लोहगडसारखे किल्ले व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी बांधले गेलेले आहेत. भंडारा डोंगरावरील काही गुंफा त्या मार्गावरून जाणा-या व्यापा-यांच्या निवासाची सोय करत असत.

 

तुकाराम महाराजांनी येथील गुम्फेतच ध्यान करत बसले असताना आत्मसाक्षात्कार झाला असे मानले जाते. येथे त्यांच्या शेकडो व्यापा-यांशी, त्यांच्या तांड्यासोबत येणा-या गाडीवान ते रक्षक यांच्याशी गप्पागोष्टी झालेल्या असणार हे उघड आहे. एवढेच नव्हे तर ते स्वत: व्यापारी असल्याने मालाची खरेदी विक्री करण्यासाठी या व्यापारी तांड्यांसोबत ते कोकणात जात असत असे मानायला पुष्कळ जागा आहे.

 

कोकणात ते पुरवठा करू शकत यातील महत्वाचे उत्पादन म्हणजे गुळ आणि गहू. तो कोकणातील बाजारपेठेत विकणे आणि मीठ, नारळ ते तांदूळ आणणे हे काम त्यांनी करणे त्यांच्या व्यवसायाला साजेसे होते. कोकणात ते बहुदा चेउल बंदरावर जात असावेत. तेथे दाक्षिणात्य व्यापा-यांचाही भरणा मोठा. त्यांची भाषा अनाकलनीय असल्याने त्यांच्याशी काय त्रेधातिरपट उडत असेल हे त्यांच्या अभंगातील “कानडीनें केला मर्‍हाटा भ्रतार । एकाचें उत्तर एका न ये ॥“ या ओळीवरून येऊ शकेल. ते कल्याणला गेले असते तर तेथे गुजराती व्यापा-यांचा भरणा जास्त. त्यांच्या साहित्यात गुजरातीचा उल्लेख कोठे आढळत नसल्याने ते चेउल येथे जात असल्याची शक्यता बळावते.

म्हणजे तुकाराम महाराज व्यापारी तांड्यासोबत देहूवरून लोणावळा व तेथील कुरवंडे घाटातून उतरत उंबरखिंड मार्गे चेउलपर्यंत जात असावेत असा अंदाज बांधण्यास पुरेपुर वाव आहे. हा प्रवास तसा सोपा नसे. त्या काळात रस्ते धड नव्हतेच. घाटात तर जास्तच दाणादाण उडे. विशेषता: घाट उतरताना तीव्र उतारामुळे गाडीवान आणि व्यापारी या सर्वांची कसोटी लागत असे. अपघातही होत. काही बैलगाड्या दरीत कोसळत. यात जीवित व अर्थहानीही होत असे. अशा वेळेस व्यापारी तांड्यात सामील असलेले प्रत्येकाचे जीवाभावाचे मित्र बनत, एकमेकांना मदत करत, एकत्र बसून खात-पीत, कारण त्याशिवाय त्यांचे जीवन अशक्य होते. तेथे जात-पात-धर्म व कर्मकांड मानत बसले असते तर व्यापार अशक्य झाला असता. तुकोबारायांच्या अभंगांत येणारी व्यापक जाण ही अशाच व्यापारी तांड्यांच्या सहवासाची निदर्शक आहे असे म्हणायला प्रत्यवाय नाही. उत्तर काळात अनेक लेखकांनी तुकोबांच्या गुरुपदी कोणालातरी बसवायचा उद्योग केलेला असला तरे तो व्यर्थ आहे. व्यापारी जीवनात दिसलेली व बाजारपेठांच्या ठिकाणी पाहिलेले भेदातीत मुक्त जग हाच तुकोबांच्या व्यापक दृष्टीकोनाला कारण ठरला असे म्हणायला काहीही हरकत नाही. या व्यापारी तांड्यात थांबा आल्यावर ते कीर्तन करून व्यापा-यांना बोध करत असावेत असा अंदाज बांधायलाही पुरेसा वाव आहे. 

 

या प्रवासांत वा देहूत व्यापारी तांड्यातील लोकांशी चर्चा करून त्यांच्या माहितीतही अलौकिक भर पडली. वेद-श्रुती-श्रुती हे त्यांच्या ज्ञानाचे साधन नव्हते तर जे अनुभवाला येत होते तेच त्यांचे वेद होते. ते वैदिक धर्मी नसल्याने वेद त्यांना माहित नसले तरी वेदांचा फुकाचा उद्घोष मात्र त्यांना माहित होता. म्हणूनच त्यांनी म्हणून ठेवले-

वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा । येरांनी वाहावा भार माथा ।।

खादल्याची गोडी देखिल्यासी नाही । भार धन वाही मजुरीचे ।।

उत्पत्तिपाळण संहाराचे निज । जेणे नेले बीज त्याचे हाती ।।

तुका म्हणे आम्हा सापडले मूळ । आपणचि फळ आले हाता ।।

 

यातील “खादल्याची गोडी देखिल्यासी नाही.” हे विधान अत्यंत महत्वाचे आहे. त्यांनी पढिक पंडित होण्यापेक्षा अनुभवसंपन्न असणे महत्वाचे मानले कारण ते स्वत: ते अनुभव मुक्तपणे घेत होते. देशातील सांस्कृतिक, राजकीय आणि धार्मिक प्रवाहांचे ज्ञान त्यांना त्यातूनच होत गेले. त्यांचे विचार व्यापक बनले. जात-पात, उच्च-नीच हे वैदिक धर्मियांनी निर्माण करून ठेवलेले व समाज मनात रुजवलेले थोतांड त्यांनी नाकारले. ते ना कोणाचे गुरु झाले ना कोणाला केले कारण व्यक्ती नव्हे तर समष्टी हाच त्यांच्या चिंतनाचा मुख्य आधार बनला.

देहूच नव्हे तर पंढरपूर हेही व्यापाराचे विठ्ठलभक्तीसोबतच मोठे केंद्र असल्याने तेथून कोकणाकडे जाणा-या व्यापा-यांचाही आळंदी-देहू-लोणावळा हाही एक मार्ग होता. तुकोबा व्यावहारिक जीवनाला कंटाळले म्हणण्यापेक्षा त्यांना विरक्ती आली आणि रंजल्या-गांजल्यांप्रती त्यांची कणवबुद्धी उद्रेकून उठली. दुस्कालात झालेली लोकांची वाताहत त्यांना अस्वस्थ करून गेली. आलेल्या अनुभवांचे सार त्यांनी जीवनाला आधार देण्यासाठी खर्च केले. “आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू” अशी प्रतिज्ञा करत मराठी भावविश्व समृद्ध केले.

तुकाराम महाराज श्रेष्ठ होते कारण त्यांनी जीवनाचे उघड्या डोळ्यांनी अनुभव घेतले. ते प्रसिद्ध झाल्यावर मोकाट सुटलेल्या वैदिकांनी त्यांना नामोहरम करण्यासाठी सर्व क्लुप्त्या लढवल्या. तेही ना जमल्यावर आपल्याच गोटात ओढून घेण्याचेही अश्लाघ्य प्रयत्न केले. त्यासाठी तुकोबांच्या अभंगांत मनमुराद घालघुसड केली. तुकोबांचे तत्वज्ञान वेदांतून कसे आले हे दाखवण्यात काही विद्वानांनी आयुष्ये घालवली. त्यांचे गुरुपद संबंध नसता कोणा ना कोणाशी (पण वैदिकाशी) जोडण्याचाही प्रयत्न केला. पण तुकोबारायांनीच म्हणून ठेवले आहे, “गुरुमार्गामुळे भ्रष्ट झाले सर्वकाळ...म्हणती यातीकुळ नाही ब्रह्मी.”

तुकाराम महाराज मुळात वाणी होते. त्यांचा संपर्क स्वाभाविकपणे व्यापा-यांच्या तांड्यांशी आला आणि त्यातील जीवन अनुभवायला तर मिळालेच पण जगभरच्या गोष्टी कानावर पडल्या. ते धर्मातीत होते. दख्खनी हिंदीत त्यांनी

अल्ला देवे अल्ला दिलावे । अल्ला दारू अल्ला खिलावे ।
अल्ला बिगर नही कोय । अल्ला करे सोहि होय ।।“

अशी अनेक अल्लाची स्तुती करणारीही पदे लिहिली, याचे कारण म्हणजे ते विश्वमानव होते, खरेच आकाशाएवढे होते!

 

-संजय सोनवणी  

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...