Monday, March 18, 2024

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम



एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हते. वैदिक धर्मात मात्र वर्णव्यवस्था जन्मसिद्ध असून ही व्यवस्था उतरंडीची होती. वैदिक धर्माला सामाजिक समतेचे तत्व तर मान्य नाहीच स्त्रियांनाही दुय्यम स्थान असणे हे अव्यवच्छेदक लक्षण होते. शिव-शक्ती हे हिंदू धर्माचे आध्रास्तंभ समान स्तरावर वावरतात पण वैदिक धर्मातील लक्ष्मी ही विष्णूचे पाय चेपत बसलेली असते. केवळ या दैवत संकल्पनांवरून दोन्ही धर्मातले तत्वज्ञान कसे वेगळे आहे हे दिसून येईल. वैदिक व हिंदू धर्म वेगळे आहेत याची जाण विद्वांनांना देखील होती. उदा डॉ. रा. ना. दांडेकर म्हणतात, “बहुतेक सर्व सारभूत विशेषांच्या दृष्टीने इतिहासपूर्व भारतीय धर्म (हिंदू धर्म) वैदिक आर्य धर्माहून अत्यंत भिन्न होता आणि त्या सिंधूधर्माचे ऐतिहासिक शैवप्रधान हिंदू धर्माशी असलेले सादृश्य अगदी संशयातीत आहे. हिंदू धर्माच्या इतिहासाच्या दृष्टीने वैदिक आर्यांचा कालखंड हा मध्योत्गत घटनेच्या स्वरुपाचा आहे. त्या कालखंडातील धार्मिक विचारप्रणालीने ऐतिहासिक हिंदू धर्माच्या रचनेवर व स्वरुपावर प्राणभूत व दूरगामी प्रभाव निश्चितपणे पाडलेला नाही." (हिंदू धर्म:इतिहास आणि आशय)

असे असूनही चवथ्या शतकानंतर हिंदू धर्मातून धर्मांतर केलेल्या वैदिक धर्मियांनी पुरातन पुराणे, सांख्य-वैशिशिकांसारख्या तत्वाद्न्यानावर आणि उपनिषदांवर कब्जा मारून ती वेदाचाच भाग आहेत असे घोषित करायला सुरुवात केली. हिंदू तंत्रातील विद्वानांनी या प्रचाराला हिरीरीने विरोध केला पण दहाव्या शतकानंतर देशावर कोसळलेल्या दुष्काळ व परकीय आक्रमणामुळे त्यांच्या विरोधाची गती क्षीण होत गेली. तरीही नाथ, सिद्ध संप्रदायांनी देशभर वैदिक तत्वद्न्यानाला विरोध केला. तंत्रशास्त्रावर आधारित हजारोंनी ग्रंथ लिहिले गेले. तोवर बौद्ध धर्म भारतात नाममात्र उरला होता तर जैन धर्मीय तडजोडी करत आपले अस्तित्व कसेबसे टिकवून ठेवत राहिले. आधी जैन धर्माला समर्थन देणारे यादव घराणेही वैदिकाश्रयी झाले आणि नंतर आपले अस्तित्व हरपून बसले. राजाश्रयासाठी वैदिक धर्मियांनी अनेक क्लुप्ती वापरल्या. क्षत्रीय वर्णाचे वाढवलेले अतोनात स्तोम त्यांच्या कामी आले व ते राजांना पौराणिक कोणत्यातरी वंशाशी जोडत क्षत्रियत्व बहाल करू लागले. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अशीच गोष्ट घडली हे सारे जाणतात. या अश्या क्लुप्त्यामुळे त्यांना राजाश्रय व राजाची सल्लागारपदे मिळवणे सोपे गेले. यामुळे देशात समतेचे तत्वही धुळीला मिळाले.

‘मध्ययुगीन धर्मसंकल्पनांचा विकास: तंत्रयोग आणि भक्ती’ या ग्रंथात डॉ. सुधाकर देशमुख म्हणतात कि,
"समाज जेव्हा जेव्हा स्वत:ला असुरक्षित असल्याचे अनुभवतोतेव्हा तेव्हा तो मूलतत्ववादाकडे वळतो. दहाव्या शतकानंतर जवळजवळ १४ व्या ते १५ व्या शतकापर्यंत भारतात वैदिक धर्मीयांनी पुन्हा एकदा आपला धर्म शुद्ध रहावा म्हणून वर्णाश्रमधर्मयज्ञविधी आणि कर्मकांड यांचे तसेच वैदिक श्रुती आणि स्मृती यांचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न केला. ...... वैदिक स्मृतींवर अनेकांनी टीका लिहिल्या,.....या निबंधकारांनी मूलतत्ववादाकडे प्रवास केल्याने तंत्र आणि नाथपंथ यांच्यामुळे जी स्वातंत्र्य आणि समतेची झुळूक जाणवत होतीतीही लुप्त झाली." दहाव्या शतकानंतर व्यावासायाधीश्ठीत सैल जातीसंस्था कठोर बनली ती वैदिक अनुकरणातूनच.

खरे तर मनुस्मृती हिंदूंसाठी लिहिली गेलेली नव्हतीच किंवा तिचे पालन करणे हिंदू धर्मियांवर कधीही बंधनकारक नव्हते. या स्मृतीने धर्माची केलेली व्याख्या "वेदस्मृतीस्वधर्मीय सज्जनांचा आचार आणि स्वत:च्या आत्म्याचे समाधान या चतुर्विध बाबी साध्य करतो तो धर्म" अशी आहे. (मनू: २:१२). वेद हा या धर्माचा प्रमुख आधार असल्याने त्याला आपण "वैदिक धर्म" असे म्हटले जाते. त्याच वेळीस वेदांशी कसलाही संबंध नसलेल्यांचा मूर्तीपुजकांचाही ही धर्म होताच ज्याचा मनुस्मृती निषेध करते. मनुस्मृतीत वारंवार वेदविरोधी तत्वज्ञाने व आचारसंहिता याबाबत विरोध दाखवला आहेच. शिवशक्तीप्रधान धर्म व समण धर्म अगदी वेदांचीही निर्मिती झाली नव्हती त्या काळापासूनम्हणजे सिंधू काळापासूनभारतात अस्तित्वात होता हे प्रत्यक्ष पुराव्यांनीच सिद्ध झाले आहे. असे असतांना संपुर्ण भारतियांचे ऐहिक व पारलौकिक नियमन ही स्मृती कशी करेल?

वैदिक मनुस्मृती हिंदुंवर लागु होती म्हणावे तर मध्ययुगातच अहिल्याबाईताराराणी अशा विधवा महिला सत्ताधारी तर होतातच पण महादजी शिंदेंच्या विधवांच्या रुपाने त्या वारसा हक्काची युद्धेही लढतांना दिसतात आणि काही केल्या त्यांचे वर्तन "स्मृती"मान्य नाही. सातवाहन ते तत्कालीन असंख्य राजे हे वैदिकांच्या दृष्टीने शूद्रच होते. पण नायनिकासारख्या नागवंशीय राणीने स्वत:ची नाणी पाडली जे मनुस्मृतीचा अंमल हिंदुंवर असता तर अशक्यच होते. एवढेच नव्हे तर गाथा सप्तशतीत २८ महिलांची काव्ये ग्रथित आहेतहेही झाले नसते. नंतरच्या महिला संत आणि राज्यकर्त्याही घडल्या नसत्या. मनुस्मृती किंवा अन्य स्मृत्या हिंदुंवर लागू नव्हत्या कारण हिंदूंनी त्या मान्य करण्याचा प्रश्नच नव्हता. तरीही मनुस्मृती हिंदुंवर लागू केली गेली ती ब्रिटीश काळात. हिंदू कायदे बनवतांना वारेन हेस्टीगने भारतीय समाजव्यवस्थेबद्दलाच्या घोर अज्ञानाने ब्राह्मण पंडितांच्या सांगण्यावरून मनुस्मृतीचा आधार घेत हिंदू कायदे बनवले. हा सांस्कृतिक व धार्मिक अनर्थच होता. पण राजाश्रय काय करू शकतो हे या उदाहरणामुळे प्रकर्षाने लक्षात यावे. एरवी अगदी पेशवेही राज्य करत असताना हिंदुंवर मनुस्मृती लागू नव्हती याची शेकडो उदाहरणे इतिहासात मिळतात. ब्रिटीश काळाने मात्र हा अनर्थ केला आणि त्याची परिणती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या मनुस्मृती दहनात झाली.

 

देशातील आजचे बहुतेक वैदिक धर्मीय मुळचे येथलेच असून त्यांतील बहुसंख्यांनी इतिहासकाळात, विशेषता: गुप्त काळात, धर्मांतर केले आहे. वैदिक धर्मात स्थान मिळवण्यासाठी अनेकदा खोटारडेपणाही केलेला आहे हे जी.एस.घुर्येसारख्या विद्वानानेही दाखवून दिले आहे. या धर्मांतराची कारणे होती जगणे विनासायास सोपे करणे, दाने व अग्रहार प्राप्त करणे आणि राजसत्तेच्या आश्रयाने लोकांवर नियंत्रण ठेवणे. आजही हे कार्य होत नाही असे म्हणणे फार धाडसाचे होईल. अफगाणिस्तानमध्ये उदयाला आलेला हा धर्म धर्मांतरांनी पसरला आणि भारतीय सास्न्कृतीक संरचनेवर मोठा प्रभाव टाकू शकला याचे सविस्तर वर्णन मी माझ्या “हिंदू आणि वैदिक धर्माचा इतिहास” व “हिंदू धर्म” या पुस्तकांत केलेला आहेच. ब्रिटीश काळापर्यंत स्वत:ला हिंदू न मानणारे वैदिक धर्मीय स्वत:ला हिंदू म्हणवू लागले. त्यातून झालेला गोंधळ तर अजूनही संपलेला नाही. त्याचे निराकरण सुसंस्कृत आणि प्रगल्भ समाज भविष्यात करेल अशी आशा आहे. परंतु मुलानिवासीवादी वैदिक आर्यांना परकीय समजून जे हल्ले करतात तेही निषेधार्ह आहेत हे मी आवर्जून नमूद करू इच्छितो.

 

-संजय सोनवणी

 

No comments:

Post a Comment

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...