अरब आणि भारतात सिंधूकाळापासून व्यापारी संबंध होते. त्यामुळे झालेली सांस्कृतिक देवान-घेवान हे इतिहासातील एक सुवर्णपर्व आहे. मात्र इस्लामच्या उदयानंतर अरबी मुस्लीम अधिक आक्रमक झाले. विस्तारवादाचे धोरण त्यांनी स्वीकारले आणि वैभवाचा राजमार्ग म्हणून त्यांनीही व्यापारी मार्गांवर स्वामित्र्व आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरु केले. सर्वात आधी इजिप्त पादाक्रांत केल्यावर ते पूर्वेकडे वळाले आणि त्यांनी बल्ख प्रांतावर स्वामित्व प्रस्थापित केले. त्यानंतर ते भारताकडे वळणार हे निश्चित होते पण त्यावेळी आताच्या अफगानिस्त्यानमध्ये असलेल्या तुर्क शाही सत्ता प्रबळ होत्या. भारतात उतरायचे तर आधी त्यांना नेस्तनाबूत करणे गरजेचे असले तरी ते एवढे सोपे नव्हते.
भारतावर अरब आक्रमण सुरु झाले ते इसवी सन ७१० ते ७११ च्या दरम्यान. मोहम्मद बिन कासिम हा तसा वयाने लहानच असलेला अरब सेनापती या स्वारीचे नेतूत्व करत होता. या स्वारीचे तत्कालीक कारण सांगितले जाते की बलुचीस्थानातील मकरान किनारपट्टीवर स्थायिक असलेली मीड जमात अरबांच्या समुद्री व्यापारात अडथळे आणत होती तसेच समुद्री चाचेगिरीही करत होती. अरबी व्यापा-यांना त्यामुळे देबल, कच्छ आणि काठेवाडच्या बंदरांतून व्यापार करणे अवघड झाले होते. सिंध प्रांत हा त्याकाळात छोट्या मोठ्या टोळ्यांनी व्यापलेला व तसा तुलनेने कंगाल प्रदेश होता. त्यांच्याही उपद्रवांमुळे अरबांचे महत्वाचे व्यापारी मार्ग संकटात सापडले होते. खूष्कीचा मार्ग खैबर खिंडीतुन जात होता. त्यावर नियंत्रण आणण्याचे अरबांचे आधीचे प्रयत्न अयशस्वी झाले होते.
पण याच काळात श्रीलंका ते अरबस्तान प्रवास करणारी आठ जहाजे वादळात सापडून भरकटली आणि देबलच्या किना-याच्या दिशेने वाहत आली. हे देबल बंदर सध्याच्या कराचीजवळचे मनोरा किंवा थाता हे स्थान असावे असा तज्ञांचा अंदाज आहे. या जहाजांत श्रीलंकेच्या राजाने अरब अमीर हज्जाजसाठी पाठवलेल्या मौल्यवान भेटवस्तू तर होत्याच पण काबाला जाणा-या यात्रेकरु महिला व अमीराला भेट म्हणून पाठवलेले अबीसीनियन गुलामही होते. अरबस्तानकडे निघालेली ही जहाजे देबलच्या समुद्री लुटारुंनी हल्ला करुन आपल्या ताब्यात घेतली आणि मुल्यवान वस्तु लुटुन इतरांना कैद केले. काही मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले. जे कैद झाले त्यांना पैसे देवून स्वातंत्र्य विकत घ्यायला सांगण्यात आले आणि देबलच्या तुरुंगात कैदेत ठेवले.
पण जे तुरुंगातून पळून जाण्यात यशस्वी झाले ते अमीर हज्जाजकडे गेले आणि मुस्लिम स्त्रीयांना कसे कैदेत टाकण्यात आले आहे याचे हृदयद्रावक वर्णन केले. ह्ज्जाजला हे ऐकून संताप आला आणि सिंधवर स्वारी करण्यासाठी त्याने खलिफाकडे परवानगी मागीतली. पण आधी खलिफाने टाळाटाळ केली कारण सिंध प्रान्तापर्यंत सैन्य घेऊन पोहोचणे मुश्कील आहे याची त्याला जाणीव होती.
पण या घटनेनंतर देबल येथील मीड-बलोच समुद्री चाच्यांनी आफ्रिकेत जिहादमध्ये मेलेल्या मुस्लिम सैनिकांच्या स्त्रीया वाहून नेणा-या जहाजालाही लुटून त्यातील प्रवास करणा-या स्त्रीया-मुलांना कैद केले. सिंधचा राजा दाहिरच्या देबल प्रताप राय या सामंताच्या ताब्यातील तुरुंगात या अरब स्त्रीया तसेच पकडले गेलेले अरब व्यापारी व कामगारांना कैद करून ठेवले गेले होते. पण या तुरुंगातून नाहीद नांवाच्या महिलेने निसटण्यात यश मिळवले. परत गेल्यावर तिने उम्मायद खिलाफतीच्या बसरा येथील अमीर अल हज्जाजला पत्र लिहिले. हज्जाजला हे पत्र मिळाल्यावर त्याने दाहिरला पत्र लिहून खंडणीच्या मोबदल्यात सर्व अरब कैद्यांची सुटका करण्याची मागणी केली. पण दाहिरने "आपले या कैद्यांवर नियंत्रण नाही त्यामुळे मी त्यांची मुक्तता करण्यास असमर्थ आहे." असे उलट कळवुन अरब सत्तेची बोळवण केली.
त्यावेळीस लेमान बिन अब्द अल मलिक या खलिफाच्या नेतृत्वाखाली उम्मायद खलिफात शक्तीशाली बनलेली होती. अरबांच्या दृष्टीने कैद्यांच्या मुक्ततेपेक्षा व्यापारी मार्ग आणि अर्थकारण सुरक्षित ठेवण्यासाठी लुटारुंची भरमार असलेल्या बंदरांना सुरक्षित करणे आवश्यक झाले होते. त्याच वेळीस आपल्या खलिफातीच्या प्रांतांतुन पळून जाणा-या बंडखोरांचाही बंदोबस्त करणे आवश्यक झाले होते. शिवाय दाहिरचा सस्सनादी बंडखोरांना असलेला लष्करी पाठिंबाही तोडायचा होता. मुस्लिम विस्तारवाद त्याशिवाय राबवता येणार नव्हता.
या घटनांमुळे अरब आक्रमण निश्चित झाले असे मानले जाते. श्रीलंकेहून निघालेल्या जहाजांतील कैदी व दाहिरच्या कैदेतून पलायन केलेल्या स्त्रीचे पत्र एक कारण ठरले एवढेच.
सन ७१० मध्ये मोहम्मद कासिमच्या नेतृत्वाखाली अरबी सेना सिंधच्या दिशेने वाटचाल करु लागल्या. मोहम्मद बिन कासिम हा त्यावेळेस वयाने फारच तरुण असला तरी तो हज्जाजचा जावई होता. या आक्रमणाचा हेतू इस्लामचा प्रचार हा नव्हता तर समुद्री चाचेगिरीला आळा घालणे, महत्वाची व्यापारी बंदरे ताब्यात घेणे आणि व्यापारातील अडथळे दूर करने हा मुख्य हेतू होता. त्याच बरोबर कैदेत पडलेल्या मुस्लिम स्त्रीयांनाही सोडवणे हेही काम होतेच. हे आक्रमण जरी सिंधवर होणार असले तरी कासिमला वाटेतील अन्य प्रांतही जिंकून घ्यावे लागणार होते. काबुल-झाबुल व हेल्मंड आणि अरंघाब खो-यात तसेच बलोचीस्तानातही (मकरान) तेंव्हा हिंदू व बौद्ध शाह्यांच्या टोळीसत्ता/गणसत्ता होत्या. त्यांच्या सीमा तत्कालीन विस्तारित काश्मिर राज्याशी जोडलेल्या होत्या. त्यामुळे काश्मिरलाही या आक्रमणाची झळ पोहोचणार हे नक्की झाले होते.
बल्ख (ब्याक्ट्रिया) प्रांतावर अरबांनी आधीच सत्ता स्थापित केली असल्याने लगतच्याच तोखारीस्थानसमोरही आता अरबांचे संकट उभे ठाकले होते. अरबांच्या वसाहतीही तेथे पुर्वापार होत्याच. या प्रांताच्या सीमा चीनशी जोडल्या गेल्या होत्या आणि चीनचा बव्हंशी व्यापार या मार्गाने होत होता. चीनच्या व्यापारी हितसंबंधांना त्यामुळे धोका उत्पन्न झालेला होता. अरब संकट हे त्या अर्थाने सर्व आशियावरचे संकट होते.
दुर्दैवाने अफगाणिस्तानातील या आक्रमणाच्या वेळच्या स्थितीच्या तत्कालीन नोंदी फारशा मिळत नाहीत. शिवाय मोहम्मद बिन कासिम सिंध प्रांतात समुद्र मार्गाने आला की खुष्कीच्या मार्गाने याबाबतही एकमत नाही. पण चचनाम्यावरुन असे दिसते की कासिम इराणमार्गेच निघाला. काही सैन्य त्याला नंतर समुद्रमार्गे येऊन देबल (देवल) बंदराजवळ मिळाले असेही म्हटले जाते. तो खुष्कीच्याच मार्गाने आला असेल तर खैबर खिंडीऐवजी बोलन खिंडीतुन आला असण्याची अधिक शक्यता आहे कारण हाच मार्ग बलोचीस्थानमधुन येतो व मकरान प्रांताला येऊन मिळतो. कासिमच्या भारतातील हालचालीसुद्धा मकरान भागापासून सुरु झालेल्या दिसतात. त्याला या मार्गातील बलोचीस्तान प्रांतातील जाट सैनिकही मिळाले होते. त्यामुळे तो बोलन खिंडीतून आला असला तरी स्वाभाविकपणे सध्याच्या अफगाणिस्तानमधील काबुलिस्तान प्रांताच्या दक्षीणेस असलेल्या झाबुलीस्तानमधून मार्गक्रमण करत बोलन खिंडीतून सिंध प्रांतात उतरला असा निष्कर्ष काढावा लागतो.
झाबुलीस्तान हे एक प्रबळ राज्य होते. या प्रांताला मोहमद कासिमची किती झळ पोहोचली याच्या ऐतिहासिक नोंदी मिळत नसल्या तरी काही उपद्रव तरी नक्कीच झाला असणार हे काश्मीरचा सम्राट चंद्रापीडाने केलेल्या हालचालींनुसार दिसते कारण काबुलीस्तान, झाबुलीस्तान व काश्मिर यांच्यात राजनैतीक संबंध खूप आधीपासुनच प्रस्थापित झालेले होते. झाबुलीस्तानने आपले राजकीय महत्व कासिमच्या आक्रमणानंतर पुन्हा प्रस्थापित केले असल्याचेही चीन दरबारातील नोंदींनुसार दिसते. चंद्रापीदामुळे कासीमला काश्मीरमध्ये घुसता आले नसले तरी कासीमने अरोर येथे झालेल्या युद्धात राजा दाहीरचा पराभव करून त्याला ठार मारले आणि अरबी कैद्यांना सोडवण्यात यश मिळवले. सिंध-मकरान प्रान्तात अरबांचे बस्तान बसले पण फार काळ टिकणार नव्हते. तो रोमहर्षक इतिहास पुढील भागात!
-संजय सोनवणी