Thursday, September 12, 2024

हुणांचे आक्रमण: क्रूर काळाचा उदय!


 


आपण आशिया खंडातील एका अशांत आणि अस्वस्थ काळाबद्दल येथे चर्चा करत आहोत. मध्य आशियातील हुण टोळ्यांनी त्या काळात आशियाभर उच्छाद मांडला होता. या टोळ्या मध्य आशियात मंगोलियातून विस्थापित झाल्या असल्या तरी त्यांच्या नावाच्या उत्पत्तीचे समाधानकारक स्पष्टीकरण अद्याप शोधता आलेले नाही. पण या टोळ्यांनी अगदी रोमन साम्राज्यालाही त्यांनी अटील्ला नावाच्या युद्धखोर नेत्याच्या पुढाकाराखाली धडका दिल्या होत्या. युरोपमध्येही त्यांनी आपले पाय पसरले होते. सस्सानीद साम्राज्य कोसळण्यामागेही त्यांचाच हातभार होता. अटील्ला ज्या हुण टोळीत जन्माला आला होता ती भटकी असल्याने पार युरोपातही पोचली होती. हे लोक कुशल तिरंदाज आणि उत्तम घोडेस्वार होते. त्यांनी आधी गोथिक साम्राज्यावरही हल्ले केले. त्यामुळे संपूर्ण युरोप दहशतीच्या छायेखाली आला. बलाढ्य रोमन सम्राटही त्याला खंडणी देण्यास बाध्य झाले होते.  इतिहासात कुपप्रसिद्ध असलेल्या अटील्लाचा सन ४५३ मध्ये अचानक मृत्यू झाला आणि युरोप व आशियाने सुटकेचा श्वास सोडला. या काळात हुणांच्या दुस-या टोळीने पश्चिमोत्तर भारतातही सत्ता स्थापित केलेली होती. त्यांचे गुप्त साम्राज्याशी संघर्ष सुरु होते. किंबहुना गुप्त सम्राज्याचा अंत व्हायला हुण आक्रमणे कारणीभूत ठरली असे म्हटले तरी त्यात काही वावगे नाही. अर्थात या आक्रमणाचा स्पष्ट इतिहास भारतात दुर्दैवाने उपलब्ध नाही. काही शिलालेख आणि कल्हणाने लिहिलेल्या राजतरंगीणीत हा थोडाफार इतिहास आला आहे. खरे तर भारतातील संपूर्ण राजकीय व सामाजिक व्यवस्था विस्कळीत करणा-या या आक्रमणाची सविस्तर माहिती उपलब्ध नसावी हे एक दुर्दैवच म्हणावे लागेल.

सन ४९३ मध्ये तोरमान या हुणाचे भारतावर आक्रमण झाले. त्याने आधीच्या बस्तान मांडून बसलेल्या हुणाना हुसकावून लावले आणि पश्चिमोत्तर भारतात पंजाबपर्यंत आपली सत्ता स्थापन केली. त्यानंतर त्याने उत्तर व मध्य भारतही जिंकून घेतला असे एरण शिलालेखावरून दिसते. सांजेली शिलालेखावरून त्याने माळवा व गुजरात जिंकल्याचेही म्हटले आहे. काश्मीरही त्याने जिंकून घेतला होता. गुप्त सम्राट भानुगुप्ताचाही सन ५१० मध्ये त्याने पराभव केला आणि गुप्त साम्राज्याला शेवटचे ग्रहण लागले. शेवटी प्रकाशधर्मा या औलीकर घराण्याच्या राजाने एका संयुक्त लष्करी अभियानात तोरमानाचा पराभव केला असे रिस्थल शिलालेखात नमूद करण्यात आले आहे. पण या पराभवामुळे त्याची सत्ता संपली नाही तर त्याचा मुलगा मिहीरगुल हा सत्तेवर आला.

तोरमानाने राजाधिराज ही पदवी धारण केली होती असे त्याच्या नाण्यांवरून व शिलालेखांवरून लक्षात येते. त्याने अनेक बुद्धिस्ट स्तुपानाही मदत केली. त्याचा मुलगा मिहीरगुल मात्र कट्टर शिवभक्त होता. तोरमानाची सत्ता स्थिर राहिली असण्याची शक्यता कमी आहे कारण स्थानिक सरंजामदार त्याच्याविरुद्ध अनेकदा बंड करत असत. हुण मुळचेच क्रूर असल्याने प्रजेवर त्यांनी अनन्वित अत्याचार केले असण्याचीही तेवढीच शक्यता आहे. या काळात गुप्त साम्राज्याचा पाश्चात्य जगाशी असलेला व्यापारही संकटात सापडला. महत्वाचे व्यापारी मार्ग त्यांच्या कब्जात गेले, पण व्यापाराचे सुनियोजित व्यवस्थापन करणे तोरमानास जमले नाही. त्यामुळे देशातील उत्पादक आणि व्यापारीही संकटात सापडले. गुप्त सम्राटांनी स्वताच्या चुकीने उत्पादक व व्यापा-यांच्या श्रेणीसंस्थेचे अध:पतन घडवायला सुरुवात केलीच होती. तोरमानाच्या काळात या अर्थव्यवस्थेतील महत्वाच्या संस्था विस्कळीत होऊ लागल्या.

तोरमानानंतर त्याचा मुलगा मिहीरगुल सत्तेवर आला. शाकल (आताचे सियालकोट) येथून तो आपला राज्यकारभार पाहू लागला. सातव्या शतकात भारतात आलेला चीनी प्रवाशी ह्यु-एन-त्संग म्हणतो की आधी मिहीरगुलाचा कल बौद्ध धर्माकडे होता. तो शूर तर होताच पण त्याने शेजारच्या शत्रूंना चिरडून टाकले होते. त्याने बौद्ध विहारांकडे बौद्ध धर्माची शिकवण मिळवण्यासाठी एखादा शिक्षक आपल्याकडे पाठवावा अशी विनंती केली होती पण एकाही बौद्ध विहाराने त्याची ही मागणी मान्य न केल्याने तो बौद्धांचा कट्टर विरोधक बनला आणि विरोधी धर्माची संगत धरली. तो कट्टर शैव बनला. त्याने बौद्ध विहार नष्ट करायला सुरुवात केली आणि अनेक ठिकाणी शिवालये उभारली. बौद्ध साहित्यातही त्याचा उल्लेख क्रूरकर्मा म्हणूनच येतो. राजतरंगिणीमध्येही कल्हण मिहीरगुलचे वर्णन क्रूर म्हणूनच करतो. त्याने श्रीनगर येथे मिहीरेश्वर हे शिवमंदिर निर्माण केले तर होलदा प्रांतात मिहिरपूर नामक शहरही स्थापन केले. त्याने गांधार प्रांतातील ब्राह्मणांनाही अग्रहार दिले आणि सत्तर वर्ष सत्ता गाजवल्यानंतर त्याने स्वत:ला अग्नीत प्रवेश करून जाळून घेतले असेही कल्हण म्हणतो. तो मिहीरगुलाच्या क्रौर्याचे काही प्रमाणात समर्थनही करताना दिसतो. त्याचे कारण कदाचित असेही असू शकेल की त्याची क्रूरता ही त्याला होणारा विरोध दडपून टाकण्यासाठी जन्माला आलेली असावी असे कल्हणाचे मत बनले असावे.  पण निश्चित ऐतिहासिक पुराव्याचा अभावात याबद्दल ठाम विधान करता येणे अवघड आहे.

मिहीरगुलाच्या नाण्यांवर शिवप्रतिमेचे अंकन केलेले आढळते. मिहीरगुलास प्रत्यक्ष भेटलेल्या सॉंग युन या चीनी प्रवाशाच्या मते तो कोणत्याही धर्ममताचा समर्थक नव्हता. त्यानेच म्हटल्याप्रमाणे स्थानिक लोकांना तो मुळीच आवडत नसे कारण सततच्या युद्धांमुळे आणि शोषणामुळे लोक त्रस्त झालेले होते. त्याचे गुप्त सम्राट नरसिंहगुप्त बालादित्याशी झालेल्या एका युद्धात त्याचा पराजय झाला होता आणि त्याला जिवंत पकडण्यात आले होते. बालादित्याने त्याला देहदंडाची शिक्षाही त्याने फर्मावली होती. पण बालादित्याच्या आईने हस्तक्षेप केला आणि बालादित्याला तिच्या दबावाखाली मिहीरगुलास कैदेत ठेवावे लागले. दरम्यान सागल या त्याच्या राजधानीत उठाव झाला. मगधाच्या तुरुंगातून सुटका झाल्यानंतर अथवा तो पळून गेल्यानंतर काश्मीरमध्ये गेला आणि तेथे उठाव करून काश्मीरचे राज्य हस्तगत केले आणि पुन्हा आपले साम्राज्य वाढवले असेही काही ऐतिहासीक संदर्भ सांगतात. पण हे फार काळ टिकणार नव्हते. त्याचा अचानक मृत्यू झाला. कल्हणाच्या मते त्याने स्वत:ला जिवंत जाळून घेतले. त्याच्या मृत्यूमुळे बौद्ध हर्षभरित झाले आणि घोषित केले की तो अनंत यातना भोगण्यासाठी नरकात जाईल.

ऐतिहासिक पुरावे पुरेसे उपलब्ध नसले तरी हुणांच्या राज्याने भारतात मोठे परिवर्तन घडवले हे मात्र खरे. ग्रीक इतिहासकार व प्रवाशी या श्वेत हुणांना भारताचे स्वामी समजत असत इतका त्यांचा दरारा होता. धार्मिक बाबतीत मिहीरगुलाने केलेल्या बौद्धांवरील अत्याचारांमुळे काश्मीर व पश्चिमोत्तर भारतातील बौद्ध धर्माला आहोटी लागू लागली.  तो जैन धर्माचाही कट्टर विरोधक होता असे तत्कालीन जैन ग्रंथांतही नमूद आहे. किंबहुना हुणांची सत्ता संपली आणि भारतातील सर्वच धर्मात एक मोठे परिवर्तन होऊन त्यात सुसंगती आणण्याचे प्रयत्न सुरु झाले. गुप्त साम्राज्याचा अंत हेही या बदलांमागचे एक कारण होते.

 

-संजय सोनवणी 

No comments:

Post a Comment

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...