Monday, September 30, 2024

आद्य महिला सामाजिक क्रांतीकारक: संत सोयराबाई


 

 

गावकुसाबाहेरील अस्पृश्यतेचा शाप भोगत हीन-दीन परिस्थितीत जगुनही आपली अभिव्यक्ती त्या काळाच्या आध्यात्मिक ज्ञानाच्या आणि समजुतींच्या परिप्रेक्षात जिवंत ठेवणारी संत सोयराबाई या स्त्रीमुक्तीच्या भावनांचा महाराष्ट्रातील आद्य आविष्कार आहे असे म्हटले तर त्यात काहीही वावगे होणार नाही. संत नामदेवांनी वारकरी संप्रदायाचा पाया घातला. जनाबाईसारख्या निराश्रित मुलीला संत वर्तुळात आणून आद्य सामाजिक क्रांती केली. तिला अभिव्यक्तीची प्रेरणा दिली. तिच्या अभंगातून स्त्रियांची वेदना आणि मुक्तीची आस प्रथमच अभिव्यक्त झाली. चोखा मेळा आणि सोयराबाईलाही संतश्रेष्ठ नामदेवमहाराजांपासून प्रेरणा मिळाली कि ती उपजत प्रेरणा होती आणि त्यांनी नामदेवांना आदर्श मानत आपली अभिव्यक्ती केली याबाबत कोणतेही ठाम विधान करता येत नसले तरी त्या सर्व उपेक्षित व शोषित समाजघटकांत त्या काळात आपल्या व्यथा वेदना मांडायची आणि महाराष्ट्राचे आराध्य श्री विठ्ठलाकडे त्या स्थितीबद्दल गा-हाणे घालायची हतबल अवस्था त्या काळात कशी टोकाला गेलेली असेल आणि त्या वेदना व्यक्त करण्यासाठी आपल्या सृजनाच्या प्रेरणा कशा अभंगरुपात व्यक्त करण्याची आस निर्माण झाली असेल याची आपण कल्पना करू शकतो.

कल्पना करावी लागते याचे कारण म्हणजे भारतात राजकीय इतिहास लेखनाचीच विशेष परंपरा नव्हती, तर सामाजिक इतिहास कोठून मिळनार? जो इतिहास उपलब्ध आहे तो बव्हंशी मित्थकथा, कालविपर्यास आणि त्रोटक स्वरुपाचा आहे. अनेकदा जेही काही उपलब्ध आहे त्यातही विसंगतीच जास्त आहेत. जेथे राजकीय इतिहासच धड समजायची मारामार तर सामाजिक व आर्थिक इतिहासाचे काय अस्तित्व असणार? त्यामुळे आपल्या आजच्या सामाजिक परिस्थितीतील गुण-दोष याचा ऐतिहासिक परिप्रेक्षातून अभ्यास करणे स्वाभाविकपणेच कठीण जाते.

उदाहणार्थ संत चोखा मेळा आणि त्यांची पत्नी संत सोयराबाई मुळचे कोठले याबद्दलचा वाद अद्याप मिटलेला नाही. महिपती म्हणतो की चोखा मेळ्याचा जन्म पंढरपूर येथील तर काही विद्वानांच्या मते तो बुलढाणा जिल्ह्यातील मेहूनपुरा येथील. सोयराबाई नेमक्या कोठल्या आणि त्यांचा विवाह चोखा मेळ्याशी कधी आणि कोठे झाला याची विश्वासार्ह माहिती मिळणे तर दुरापास्तच आहे. असे असले तरी हे संतद्वय पश्चिम महाराष्ट्रात नक्कीच जन्माला आले नव्हते एवढे मात्र आपण निश्चयाने म्हणू शकतो. संत ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे संतपदाला पोचली असली तरी त्यांच्या संतत्वाच्या प्रेरणा आणि त्यांची सांस्कृतिक पार्श्वभूमी वेगळी असल्याने अर्थात त्यांची अभिव्यक्तीही वेगळ्या पद्धतीची होती. त्यांनाही त्यांच्या धर्मातील जाचक नियमांचा त्रास झाला असला तरी त्याची तीव्रताही वेगळ्या स्वरूपाची होती. अन्य संतांची पार्श्वभूमी आणि त्यांची पार्श्वभूमी यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. त्यामुळे अनेकदा त्यांना संतमंडळाचा प्रमुख मानले जाते ते अनैतिहासिक आहे हे मी येथे आवर्जून नमूद करून ठेवतो.

चोखामेळा व सोयराबाई ज्या काळात झाले तो काळ आपण तपासून पाहुयात. चोखा मेळा व त्यांच्या परिवाराला संतत्वाच्या वाटेवर नेण्यात संतशिरोमणी नामदेव महाराजांचा मोलाचा हात होता हे सर्वांनी एकमुखाने मान्य केले आहे. याच काळात संत गोरोबां-सावतां माळी, संत जनाबाई, कान्होपात्रा, यासारखे अठरापगड समाजातील संतही झाले. तेराव्या शतकाचा उत्तरार्ध ते चवदावे शतक हा या संतांचा काळ होय असे सामान्यता: मानले जाते. या संतांनी पंढरीच्या, वैदिकेतर परंपरेतील  व तशा अप्रसिद्ध देवतेला, म्हणजे श्री विठ्ठलाला समतेचे आराध्य म्हणून स्विकारले.

 तेराव्या-चवदाव्या शतकातच ही संतांची मांदियाळी उदयाला का आली असावी? अशा कोणत्या प्रेरणा माहाराष्ट्राच्या मातीत एकाएकी निर्माण झाल्या कि ज्यामुळे संतांना सामाजिक चळवळ विठ्ठलभक्तीच्या माध्यमातून उभी करावी वाटली हा प्रश्न विचारात घेण्यासारखा आहे. त्यावेळीस यादवांचे साम्राज्य लयाला जाण्याच्या वाटेवर होते. राजसत्तेतील पडझड व वादळे संतांना मोहवू शकली नाहीत पण सामाजिक स्थितीतील झालेली वादळे मात्र त्यांना समूळ हलवून गेली आणि त्यांच्या अभिव्यक्तीचा उद्रेक होऊ लागला असे मात्र निश्चयाने म्हणता येते. आणि या उद्रेकाचा स्पष्ट संकेत आपल्याला संत सोयराबाईच्या आज उपलब्ध असलेल्या शंभराच्या आत अभंगांवरूनही लक्षात येते.

या काळात महाराष्ट्र दैवतशरण झाला होता अशी तक्रार काही विद्वान करतात. माझ्या मते ही केवळ दैवतशरणता नव्हती तर आपल्या आराध्य दैवताच्या माध्यमातून आपला सामाजिक आक्रोश व्यक्त करण्याची एक आगळीवेगळी पद्धत संतांनी शोधून काढली होती. श्रीविठ्ठलाला त्यांनी आपल्या अंत:करणात उद्रेकणा-या सामाजिक भावनांचे आणि सामाजिक परिस्थितीमुळे सोसाव्या लागणा-या व्यक्तीगत यातनांचे प्रतीक बनवले आणि त्याला उद्देशून आपल्या असंतोषाची अभिव्यक्ती केली. त्यांच्यावर अर्थातच तत्कालीन वैदिक व वैदिकेतर धर्माच्या संघर्षाची अटळ छाप होती. कर्मविपाक सिद्धांत, जातीव्यवस्थेची बंधनात्मक अपरिहार्यता त्या प्रभावांत त्यांनी स्वीकारून टाकलेली होती. पण याचा अर्थ असा नाही की ती व्यवस्था त्यांना मनोमन मान्य होती. वैदिक धर्मसंस्थेने यादवकाळात मोठे वर्चस्व मिळवण्यात यश मिळवले होते आणि वैदिकीकरण झालेल्या पुराणकथा ऐकून त्यांच्या मनोभूमिकेवर परिणाम होत धर्माच्या नेमक्या मतांबद्दल संभ्रम निर्माण होये स्वाभाविक होते. नेमका खरा धर्म कोणता हा प्रश्नही निर्माण होणे स्वाभाविक होते.

मध्ययुगात स्त्रियांची स्थिती नेमकी काय होती हा प्रश्न अजून महत्वाचा आहे. याबद्दल अनेक विद्वानांचे मतभेदही आहेत. वैदिक धर्मव्यवस्थेतील स्त्रियांचे स्थान आणि लोकधर्मातील स्त्रियांचे स्थान यात खूप अंतर होते हे वास्तव आधुनिक विद्वान लक्षात घ्यायला विसरतात. लोकधर्मात (ज्याला आपण आता हिंदू म्हणतो ज्यात आता वैदिक धर्मीयही घुसखोरी करून बसले आहेत) तो पुरातन काळापासून स्त्री-पुरुष समतेचे तत्व जपत आलेला आहे तसे मात्र वैदिक धर्मियांचे नाही. वैदिक धर्म हा मुळात विषमतेच्या तत्वांवर आधारित आहे. पण त्याची लागण सुरु झाल्याने त्यातील अनिष्ट तत्वे लोकधर्मातही पाझरली हे अमान्य करण्यात अर्थ नाही. आणि त्यामुळेच त्या काळात अपवाद वगळता सर्वच स्त्री-संत लोकधर्मातूनच उदयाला आल्या हे वास्तवही नजरेआड टाकता येणार नाही. तसे मात्र वैदिक धर्मियांच्या बाबतीत दिसून येत नाही. हा एक चर्चेत न आलेला महत्वाचा धार्मिक आणि म्हणूनच सामाजिक मुद्दाही आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

संत सोयराबाइंनी अभंग लिहिले. त्यांची शब्दकळा विलक्षण आहे. त्या वेळेस बहुजन स्त्रियांनाच काय पण पुरुषांनाही शिक्षणाची अनुमती नव्हती असा काही लोकांचा लाडका तर्क आहे पण प्रत्यक्षात तसे असल्याचे दिसत नाही.  वारकरी चळवळ ही फक्त भक्ती चळवळ होती आणि तिचा सामाजिक वैचारिकतेशी संबंध नव्हता असेही मत अनेक विद्वान व्यक्त करतात. पण ते विसरतात की प्रत्येक काळातील अभिव्यक्ती त्या त्या काळाच्या मर्यादा लक्षात घेऊन होत असते. आजची मुल्ये किंवा विचारव्यवस्था गतकाळावर लादने अनेकदा शहाणपणाचे ठरत नाही.

संत सोयराबाई या स्त्रीमुक्तीचा आद्य उद्गार होत्या यात कसलाही संशय राहत नाही कारण त्यांनी आपल्या अनेक अभंगांतून भक्तिमार्गाची कास धरता धरता ज्या काळात असे उच्चाराने सुद्धा अशक्य होते त्या काळात अनेक स्त्रीप्रश्नांना वाचा फोडलेली दिसते.

देहासी विटाळ म्हणती सकळ
आत्मा तो निर्मळ शुदध बुद्ध
देहीचा विटाळ देहीच जन्मला
सोवळा तो झाला कवण धर्म

वानगीदाखल हाच अभंग पहा. यात सोयराबाइंनी केवळ अस्पृश्यतेच्या विटाळाबाबत भाष्य केलेले नाही तर स्त्रीच्या तथाकथित विटाळावरही भेदक भाष्य केले आहे. कोणत्याही तत्वज्ञानाचे मूळ हे शुद्धा-शुद्धतेवर वाढत नसते. पावित्र्याचा संकल्पना या अपवित्र लोकांनीच निर्माण करून ठेवलेल्या असतात. तत्वज्ञानाचा मूळ धर्मच जर निरपेक्ष तटस्थता असेल तर शुद्ध-अशुद्ध, पवित्र-अपवित्र अशा संकल्पनाच बाद ठरतात. आणि हे वैश्विक सत्य सोयराबाई या अभंगात सांगतात. हे बंड होते. तत्कालीन (आणि आजही) प्रचलित विचारसृष्टीला हादरवणारे होते यात शंका नसावी.

विपरीत सामाजिक अवस्थेमुळे संत चोखा मेळ्याच्या परिवारावर किती आपत्ती आल्या असतील याची आपण कल्पना करू शकतो. परकीय आक्रमण झाले की समाजातील सर्वात खालच्या थरावर जास्त विदारक परिणाम होत असतात हे एक वैश्विक सत्य आहे. अशा वेळेस परिस्थितीशरण होणेही स्वाभाविक आहे. माणसाचे सैरभैर होऊन जाणेही स्वाभाविक आहे. परिस्थितीशी आपण लढू शकत नाही यातून हतबलता येणे हा मानवी मनोविश्वाचा एक अटळ भाग आहे. संत सोयराबाई एका अभंगामध्ये ही हतबलता एका वैश्विक स्तरावर नेऊन ठेवतात. त्या उद्रेकून म्हणतात,

‘आमची तो दशा विपरित झाली
कोण आम्हा घाली पोटामध्ये
आमचं पालन करील बा कोण
तुजविण जाण दुजे आता’

राजसत्ता आपल्या हिताची नाही, सामाजिक बंधने तर आपली मगरमिठी सोडायला तयार नाहीत आणि यामुळे सामाजिक घुसमट होते आहे. हे गा-हाणे श्रीविठ्ठलापुरते मर्यादित नाही तर समाजरुपी विठ्ठलाला घातलेले आहे. समाजच सामाजिक समस्या सोडवू शकतो हे त्रिकालाबाधित सत्य सोयराबाइंनी या अभंगातून स्पष्टपणे सांगितले आहे. खरे तर ही एका सामाजिक क्रांतीचे आवाहन होते. समाजच समाजाचे पालन करू शकतो हे प्राचीन वैदिकेतर तत्वज्ञान यातून प्रकट झालेले आहे. त्या विठ्ठलाच्या माध्यमातून समाजाला खडसावत आहेत, विनवण्या करत आहेत हे लक्षात घेतले पाहिजे. किंबहुना संत नामदेवांपासून सर्व वैदिकेतर संतांच्या अभंगांचे परिशीलन केले तर हे लक्षात येईल कि श्रीविठ्ठलाच्या माध्यमातून त्यांनी समाजाचीच भक्ती केली आणि समाजालाच खडसावले. त्याच्यावर नितांत प्रेमही केले आणि त्याचे दोषही दाखवले. एरवी आराध्य देवाचे दोष दाखवण्याचे धाडस कोण करेल? आणि त्याचे प्रतिबिंब त्यांच्याच खालील अभंगात दिसून येईल.

‘कां बा उदार मज केले कोण म्हणे तुम्हा भले
आम्ही बैसलोसे दारी दे दे म्हणोनी मागतो हरि
घेऊन बैसलासे बहुतांचे गोड कैसे तुम्हा वाटे
ही नीत नव्हे बरी म्हणे चोखियाची महारी’

समाज कधी कधी चुकीच्या लोकांना डोक्यावर घेतो. महनीय रूप देत त्यांच्या भजनी लागतो. त्यांचे एका अर्थाने डोकेच फिरलेले असते. असा काळ समाजाला एका व्यामोहात नेतो. ज्या काळात सोयराबाई झाल्या त्या काळात नेमकी हीच दयनीय अवस्था होती. समाज शासनकर्ते आणि धर्मनेते यांच्या दारी हतबल होऊन बसला होता पण या नियमनकर्त्यांना ती हतबलता दिसत नव्हती. त्यांच्या बाजूचे होते त्यांचेच म्हणणे त्यांना गोड वाटत होते. पण सोयराबाई निक्षून सांगतात ‘ही नीत नव्हे बरी’. शासनकर्ता असो की देव, त्याने सर्वांचेच ऐकले पाहिजे असे सांगणा-या सोयराबाई या आजच्या लोकशाहीच्या आदर्श मूल्यांच्या तेराव्या शतकातील प्रवर्तक होत यात शंका बाळगण्याचे कारण नाही. याचा आपल्याला आजही अभिमान वाटला पाहिजे.

शाश्वत नीतीमूल्यांची सोयराबाइंनी नेहमीच पाठराखण केली. त्यांना व्यक्तीगत जीवनात सुख-दु:खे नव्हती असे नाही. पण त्यांनी त्यांचे भांडवलही कधी केले नाही. शाश्वत क्रांतीकारी व्यक्तींचे हे महत्वाचे लक्षण असते. सोयराबाई किंवा अन्य संतानी विठ्ठल भक्तीला अनुसरुन जेही अभंग लिहिले त्याचे नव्याने परिशीलन केले पाहिजे आणि ते भविष्यातील अभ्यासकांसमोरील एक मोठे आव्हान आहे हे मी येथे विनम्रतेने नमूद करतो.

अवघा रंग एक झाला ।
रंगी रंगला श्रीरंग ॥१॥
मी तूंपण गेलें वायां ।
पाहत पंडरीच्या राया ॥२॥
नाही भेदाचें तें काम ।
पळोनी गेले क्रोध काम ॥३॥
देही असुनी तूं विदेही ।
सदा समाधिस्थ पाही ॥४॥
पाहते पाहणें गेले दुरी ।
म्हणे चोख्याची महारी ॥५॥

या अभंगातून सोयराबाई समाजाच्या समानतेच्या पायावरील एकात्मकतेची ग्वाही देतात. समाजात भेदाभेद का असा प्रश्नही उपस्थित करून त्यावरही उत्तर देतात. त्यांचे तात्विक म्हणणे आहे की भेदाभेद विरहित समाजव्यवस्था हेच सामाजिक दोषांचे निराकरण करु शकणारे महत्वाचे तत्व आहे. देहात असूनही देहविहीन असणे आणि जिवंत असूनही समाधीत, म्हणजे निर्विकल्प अवस्थेत, राहणे हेच मनुष्याचा जीवनाचे इतिकर्तव्य आहे.

तात्विक, सामाजिक आणि समाजकल्याणाचे अंतिम उच्च ध्येय दाखवणा-या संत सोयराबाई या मानवतेच्या उच्च सिद्धान्तांचा उत्कर्ष आहे आणि तेही तेराव्या शतकात. या नवलाला आम्ही जागतिक प्रसिद्धी आली नाही ही आमची कृपणता आहे. आमचे पाप आहे. आमच्या देहाचाच नव्हे तर आमच्या आत्म्याचा विटाळ आजही आम्हाला कसा ग्रासतो आहे याचे हे आक्रंदन आहे.

त्यांचे पती संत चोखा मेळा वेठबिगारीच्या कामावर असतांना मृत्यू पावले. तेव्हा सोयराबाई हयात होत्या का नाही, त्यांनी त्याबाबत काय म्हटले हे आपल्याला आज तरी माहित नाही. पण जोही इतिहास उपलब्ध आहे त्याचे परिशीलन करून मी हेच म्हणेन की संत सोयराबाई महाराष्टाच्या पायतळी तुडवलेल्या आशा-आकांक्षांचा प्रकट आणि आद्य उद्गार होत्या. त्या सामाजिक क्रांतीच्या अग्रदूत होत्या. आज महाराष्ट्राला त्यांचे हे महत्व समजलेले नाही. विशेषता: आजही जाती-धर्मभेदाचे निरंतर वहन करत असलेल्या स्त्रियांना. हे तर अधिकच दुर्दैवी आहे.

पण असो. समाजाच्या अंतिम हितासाठी आक्रोश करणा-याचे हेच भाग्य असते हे आपले दुर्दैव तर आहेच पण त्यामुळे संत सोयराबाईसारख्या आद्य सामाजी क्रांतीकारक दुर्लक्षित राहतात हे त्याहून मोठे दुर्दैव!

 

-संजय सोनवणी 

No comments:

Post a Comment

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...