Thursday, November 21, 2024

तैमुरलंग आणि बाबर

 





चंगेझझानाच्या रूपाने मंगोलांनी एकंदरीत आशिया खंडातील बव्हंशी भागाची पुरती वाट लावली. अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था अस्ताव्यस्त झाली. हा सांस्कृतिक आघातही होता. भारत त्याच्या आक्रमणापासून वाचला असला तरी पुढे तैमूरलंगच्या रूपाने भारतावर अजून एक संकट कोसळले.

तैमुरलंग हा तिमुरीद साम्राज्याचा संस्थापक. याचे साम्राज्य मध्य आशिया, पश्चिम आशिया व दक्षिण आशियापर्यंत पसरले होते. याचा पिता तुर्गाई बरलस हा तुर्कांचा नेता होता. आमु आणि सर दरिया नदीच्या दोआबात याचा जन्म झाला. अत्यंत महत्वाकांक्षी असलेल्या तैमुरलंगचे स्वत: लंगडा असूनही आदर्श होते अलेक्झांडर आणि चेंगीझखान. सन १३६९ मध्ये समरकंदच्या मनोल शासकाचा मृत्यू होताच त्याने तेथे सत्ता काबीज करून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. हा अत्यंत क्रूर स्वभावाचा होता. त्याने झपाट्याने आपले हातपाय पसरवायला सुरुवात केली. १३८७ पर्यंत त्याने अझरबैजान, अफगाणिस्तान आणि पर्शिया आपल्या स्वामित्वाखाली आणला. नंतर भारतातील वैभवाचा मोह पडून त्याने भारतावर स्वारी केली. दिल्लीपर्यंत येतांना तो लोकांच्या कत्तली करताच आला. प्रेतांचे ढीग उभारले. दिल्ली तेव्हा तुघलक सल्तनतीच्या अंमलाखाली होती. तो येत आहे हे समजताच तत्कालीन सुलतान महमूदखान दिल्ली सोडून पळून गेला. दिल्ली तेव्हा जगातील श्रीमंत शहर होते. ते तैमुरलंगाने पुरते धुवून काढले.
तो दिल्लीत लुटालुटीचा कार्यक्रम करत असतांनाच अफवा पसरली की त्याचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे स्थानिक लोकांनी दंगल करून तैमुरच्या सैन्यावर हल्ले चढवायला सुरुवात केली. संतप्त तैमुरने कत्तलीचा आदेश दिला. एक लाखाहून अधिक माणसे मारली गेली आणि त्यांच्या मुंडक्यांचे मिनार बनवले गेले. दिल्ली शहर सडक्या-कुजक्या प्रेतांनी भरले. त्यामुळे रोगराईही पसरली आणि त्यातही लाखो लोक मारले गेले.
भारतातून परत जातांना त्याने येथील असंख्य कारागीरही आपल्यासोबत नेले आणि त्यांचा उपयोग करून समरकंद येथे असंख्य इमारतींची निर्मिती केली. जामा मशीद त्यातीलच एक वास्तू होय. हाही स्वत:ला चंगेझखानाचा वंशज समजत असे. रक्तसंबंधाने नसेलही कदाचित, पण विध्वन्सकतेत आणि कृरतेत तो चंगेझखानाचा वारस शोभेल असाच होता.
याच्याच काळात जवळपास संपूर्ण अफगाणिस्तान मुस्लीम झाला असला म्हणून त्यांचेही नष्टचर्य संपले नाही. तैमुरलंग हा विध्वंसक होता, निर्माता नव्हे. त्याचे साम्राज्य प्रचंड विस्तारलेले असले तरी त्याने समाजहिताची कार्ये कोठेही केलेली नाहीत त्यामुळे तो केवळ उझबेकीस्थानात राष्ट्रीय नायक बनू शकला. इतरत्र मात्र त्याचा तिरस्कारच आढळून येतो. भारतात मोगल सत्तेची पायाभरणी करणारा बाबर त्याचाच वंशज होय.
तैमुरच्या मुलाने, शाहरुखने आपली राजधानी हेरातला हलवली. हेरात हे त्याच्या काळात अर्थ व सांस्कृतिक दृष्ट्या भरभराटीला आले. असे म्हणतात कि मध्य आशिया आणि पर्शियन संस्कृतीचा मिलाफ अफगाणिस्तानात त्याच्या काळात झाला जी पुढे अफगानिस्तानच्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग बनली. एका अर्थाने शाहरुखने अफगानिस्तनचा प्रबोधनकाळ आणला. पुढे शंभर वर्षांनी बाबराने हेरातला भेट दिली होती. तो लिहितो कि, “संपूर्ण विश्वात हेरातएवढे सुंदर शहर नाही.” पंधराव्या शतकात तिमुरीदांचा लय झाल्यानंतर पश्चिम अफगाणिस्तान पुन्हा साफाविद घराण्याच्या अंमलाखाली गेले व पुन्हा पर्शियन संस्कृतीचे वर्चस्व स्थापन झाले. हे परिवर्तन विलक्षण आहे.
इतिहासात कोणत्याही सत्ता अमपट्टा घेऊन जन्माला येत नसतात. पंधराव्या शतकापर्यंत तिमुरीद साम्राज्यही विखंडीत झाले. उझबेकीनी मोहम्मद शायबानीच्या नेतृत्वाखाली समरकंद आणि हेरात जिंकून घेतले आणि बुखारा येथे बुखारा खानात स्थापन केली.
सन १५०४ मध्ये बाबरने काबुल येथे स्वतंत्रपणे मोघल सत्ता स्थापन केली. या सत्तेला मोघल सत्ता म्हटले जात असले तरी तुर्की-चगताई बाबराने ही सत्ता तिमुरीदांकडून व त्यांचाच वंशज म्हणून प्राप्त केली होती. चंगेझखानाचा वंशज असल्याचा दावा करत असला तरी तैमुर हा मुळचा उझबेकी असल्याने आणि त्यांनी तुर्की संस्कृतीचा अनुनय केला असल्याने खरे तर मोगल सत्ता हे नामकरण अनैतिहासिक आहे. पण इतिहासातच अनेकदा अनैतिहासिक दावे घुसडले जातात आणि तेच सत्यही मानले जातात याचे हे एक उदाहरण म्हणता येईल. प्रत्येक राजसत्ता आपले मुळ हे कोणत्यातरी प्रसिद्ध ऐतिहासिक व्यक्ती अथवा वंशात शोधते ही एक जागतिक प्रवृत्ती आहे. भारतही त्यात मागे नाही.
थोडक्यात अफगाणिस्तान पुन्हा वेगवेगळ्या सत्तांत विभागला गेला. बाबराचा इतिहासही अफगाणिस्तान आणि भारताच्याही दृष्टीने महत्वाचा आहे. किंबहुना प्रदीर्घ काळ भारत आणि अफगाणिस्तानचा इतिहास जवळपास हातात हात घालून आपल्याला चालतांना दिसतो.
झहिर-अल-दिन मुहम्मद बाबराची कारकीर्द त्याचे जन्मठिकाण फरगना येथुनच सुरु झाली. १४९४ मध्ये तो फरगनातील अक्षीकेन्ट येथे राजधानी करुन सत्ता चालवु लागला तेव्हा तो केवळ १२ वर्षांचा होता. सुरुवातीलाच त्याला बंडाचा सामना करावा लागला पण त्याने अवघ्या दोन वर्षांत समरकंद जिंकून घेतले. सन १५०४ मध्ये काबुल जिंकून त्याने अफगाणिस्तानमध्येही पाय रोवले. पण या डोंगराळ मुलुखातुन त्याला हवे तेवढे उत्पन्न मिळेना. त्याने हेरातच्या सुलतानाशी युती करुन उझबेकीन्शी युद्ध सुरु केले. त्यात पराभव झाल्याने त्याला फरघना आणि समरकंदही गमवावे लागले आणि उझबेकी सैन्याचा पाठलाग चुकवण्यासाठी आणि आश्रय घेण्यासाठी आणि धनासाठी त्यानेही भारतावर लक्ष केंद्रित केले.
त्याने अगदी अल्प सैन्यासह इब्राहिम लोदीचा पानिपतच्या पहिल्या युद्धात पराभव करुन भारतात मुघल (तुर्की) साम्राज्याची पायाभरणी केली. भारतात त्याने अनेक युद्धे केली. त्याची मुख्य राजधानी मात्र काबुल हीच राहिली. पुढे त्याने कंदाहारही त्याने जिंकून घेतले. समरकंद पुन्हा जिंकून घेण्यासाठी त्याने केलेल्या युद्धांत मात्र त्याला अपयश आले. भारतातील राजधानी त्याने आग्रा हीच ठेवली.
शांततेच्या काळात बाबरने आपल्या साहित्य-संगीत व कलाविषयक आवडी जोपासल्या. तो स्वत: उत्क्रुष्ठ कवीही होता. त्याचे “बाबरनामा” हे आत्मचरित्रही प्रसिद्ध आहे. काबुल येथे असतानाच त्याला दारु व अफुचेही व्यसन लागले. त्याचा आग्रा येथे १५३० साली नशेतच पायऱ्या घसरून पडल्याने मृत्यू झाला. तेव्हा तो ४७ वर्षाचा होता. भारतात हिंदुत्ववाद्यांनी बाबराचे चित्रण अत्यन्त एकतर्फी केले असले तरी तो धर्मांध म्हणता येईल असा नव्हता. शिख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांची त्याने स्वत:हून घेतलेली भेट व त्यांच्याप्रती दाखवलेला आदर हाही एक इतिहासातील अध्याय आहे.
त्याचे प्रेत त्याच्या इच्छेनुसार काबुलला नेवून पुन्हा दफन करन्यात आले. त्याच्यानंतर त्याचा मुलगा हुमायुन तख्तावर बसला. पण त्याला शेरशहा सुरीने भारताबाहेर पळुन जायला भाग पाडले. शेरशहा सुरी हा बिहारमध्ये सत्ता स्थापन केलेला अफगाणी पठान होता. हाही इतिहास रंजक आहे.
-संजय सोनवणी


No comments:

Post a Comment

शेरशहा सुरी: एक कुशल प्रशासक

  शेरशहा सुरीने हुमायूनचा पराभव केला आणि त्याला भारताबाहेर हाकलले. दिल्लीत आता कोणी शासक उरला नसल्याने शेरशहाने स्वत:ला दिल्लीचा सम्राट घोषि...