Thursday, November 7, 2024

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

 


 

ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब काळात तुर्की शाह्यान्च्या ताब्यात गेलेली सत्ता पुन्हा हिंदू शाह्यांच्या ताब्यात आलीकल्लार नामक मंत्र्याने काबुलच्या तूर्की शहाला पदच्युत करत हिंदू शाहीची पुन्हा स्थापना केली होती. पण हिंदू शाही पुढे फार काळ टिकू शकली नाही. कल्लारला  काबुल गमवावे लागले आणि शेवटी गांधारमधील उद्भांडपुरा येथे राजधानी बनवावी लागली. नंतरच्या काळात हिंदू शाही गांधार प्रांतात प्रबळ राहिली असली तरी दक्षिण अफगानिस्तानावरील तिचे वर्चस्व संपुष्टात आलेले होते. दहाव्या शतकात अफगाणिस्तान राजकीय उलथापालथीन्नी ग्रस्त झालेला होता. तत्कालीन काश्मिरी राणी सुगंधा हिने संभवता: ९०३ मध्ये तिने प्रभाकरदेव याच्या अधिपत्याखाली उद्भांडपूरवर स्वारी करायला लावली  आणि शाही सत्ता कमलवर्मनकडे सोपवली.

      या काळात गझनी येथेही हिंदू शाही राज्य करत होती. पण येथील लाविक नामक हिंदू राजालाही तुर्कांनी पराभूत केले आणि तुर्की सस्ता पुन्हा स्थापित केली. दक्षिणेतील हिंदू शाह्यांमुळे अफगाणिस्तानाचे संपूर्ण इस्लामीकरण इतरत्र झाले तसे झपाट्याने होऊ शकले नाही असे इतिहासकार मानतात. जवळपास २०० वर्ष हिंदू शाह्यांनी अब्बासिदांना कडवा प्रतिकार केला. राजकीय अस्थिरता राहिली असली तरी स्वातंत्र्य अंशत: का होईना अनेक काळ उपभोगता आले. क्ल्लार (८४३) ते भिमपाल (१०२६) हा हिंदू शाह्यान्चा काळ अफगानिस्तानाच्या इतिहासात लक्षणीय आहे. यांच्यामुळे अरबांच्या अब्बासीद खलीफातीला भारतावर आक्रमण करण्याची संधीच मिळाली नाही कारण अफगाणी शाह्यांनी त्यांना रोखून धरले.

 

झाबुलीस्तान येथील गझनी येथे जन्मलेल्या महम्मद तुर्कांचा गुलाम असलेल्या सबुक्तीगीन या सेनाधिका-याचा पुत्र होता. तो महत्वाकांक्षी होता. त्याने आपल्या भावाविरुद्ध उठाव करून गझनीचे राज्य मिळवले. ९९८ पासून त्याने लष्करी मोहिमा काढायला सुरुवात केली. ९९९ मध्ये त्याने अफगाणिस्तानवरील सप्फारीद घराण्याच्या सत्तेचा अंतही घडवत बल्ख सहित संपूर्ण अफगानिस्तान ताब्यात आणला. त्याने १००२ मध्ये तुर्की शाहीचा राजा जयपालचा पेशावरजवळ पराभव केला आणि भारतावरील आक्रमणे पुन्हा सुरु झाली. जयपालच्या पराभवानंतर पेशावरपर्यन्तचा प्रांत त्याच्या ताब्यात आला. त्यानंतर त्याने उत्तर भारतावर धनप्राप्तीसाठी अनेक स्वा-या केल्या. पंजाब त्याच्या राज्याला जोडून घेतला. काश्मीरवरचे त्याचे आक्रमण मात्र तत्कालीन दिद्दाराणीने कडवा प्रतिकार केल्याने यशस्वी झाले नाही. ती हयात असेपर्यन गझनीच्या मोहम्मदाला काश्मीर घेता आले नाही. नंतर काश्मीरमध्ये लोहारा घराण्याचे राज्य आले. या घराण्याच्या राजा संग्रामराजानेही त्याचे आक्रमण परतवून लावले व काश्मीर वाचवले असे कल्हनाने राजतरंगिणीमध्ये नोंदवले आहे.

 

पण गझनीच्या मोहम्मदच्या सैन्यात अफगाणिस्तान व वायव्य भारतातील असंख्य हिंदू सैनिक आणि अनेक सेनानीही होते. त्याने सन ९९९ मध्ये त्याच्याविरुद्ध उठाव करणा-या तुर्की बंडखोरांचे बंड तिलक नामक हिंदु सेनापतीला आधिपत्य देवून त्याच्या नेतृत्वाखाली चिरडले असे अबू--बाह्यकी या पर्शियन इतिहासकाराने “तारिक-इ-बाह्यकी” या ग्रंथात नोंदवलेले आहे. त्यामुळे मोहम्मदाच्या भारतावरील स्वा-या या धर्मांधतेतून झाल्या नसून अफगाणिस्तानात उपलब्ध नसलेल्या धनाच्या प्राप्तीसाठी होत्या जे त्याला आपले सैन्य पोसण्यासाठी लागत होते असे जे अनेक इतिहासकार म्हणतात त्यात तथ्य असल्याचे दिसते.

 

अफगाणिस्तान ताब्यात आल्यानंतर त्याच्या भारतावर स्वा-या सुरु झाल्या. ज्य्पालाने आपल्या आधेच्या पराभवाचा बदला घेण्यासाठी पुन्हा गझनीच्या मोहम्मदाशी युद्ध केले. पण त्याचा पुन्हा पराजय झाला आणि त्याने आत्मघात करून घेतला. नंतर त्याचा मुलगा आनंद्पाल सत्तेवर आला. त्यानेही इतर शाह्यांशी युते करून मोहम्मदाला रोखण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही. सन १०१८ मध्ये त्याने मथुरेवर आक्रमण केले. तेथील राजा चंद्र्पालाची त्याने हत्या केली. मथुरेची अमाप लुट करण्यात आली. सन १०२५ मध्ये त्याने सोमनाथवर स्वारी केली. तेथील राजा भीम (पहिला) पळून गेला. सोमनाथाचे मंदिर उद्वस्त केले गेले. सोमनाथ मंदिर व्यापारी वेरावळच्या लगतच असल्याने तेथेही त्याला अमाप लुट मिळाली. सोमनाथवर स्वारी करताना त्याने वाळवंटाचा मार्ग निवडला होता. कारण वाटेत आपल्याला कोणी अडवू नये अशी त्याचे इच्छा होती. पण यामुळे त्याचे बरेच सैन्य ब्भूक आणि तहानेने मारले गेले होते.

 

गझनीच्या मोहम्मदाने भारतातील नगरकोट, ठानेसर, मथुरा, कनौज, सोमनाथ आणि ग्वाल्हेरपर्यंतचे प्रांत जिंकून घेतले. भारतातून त्याने अमाप लुट मिळवली. गझनीच्या महम्मदाच्या हयातीत त्याने आपले राज्य कैस्पियन समुद्र ते समरकंदपर्यंत पसरवले होते. त्याच्या काळात गझनी हे पर्शियन साहित्याचे मुख्य केंद्र बनले. शाहनामा सारखे अद्वितीय इतिहास-काव्य लिहिणारा फिरदौसी त्याचाच आश्रित होता. सन १०१७ मधील त्याच्या गंगेच्या खो-यातील स्वा-यांमुळे अल्बीरुनी या इतिहासकाराला “तारीख-ए-हिंद” हा महत्वाचा ग्रंथ लिहिण्याची प्रेरणा मिळाली. त्याच्या काळात अफगाणिस्तानमध्ये गणित, औषधी, धर्म इ. विषयांवर अध्ययन करण्यासाठी अनेक विद्यापीठे स्थापन करण्यात आली. गझनीच्या मोहम्मदाचे राज्य हे अफगानिस्तानच्या इतिहासाला कलाटणी देणारे ठरले.

 

गझनविद साम्राज्य एकूण १५७ वर्ष टिकले. पुढे सेल्जूक तुर्कांनी गझनीचे साम्राज्य कुरतडायला सुरुवात केली. सन ११५० मध्ये घोरी घराण्याने गझनीचा पाडाव केला आणि आपली सत्ता पसरवायला सुरुवात केली. घोरी हे मध्य अफगानिस्तानातल्या घोर प्रांतातले. त्यांना आधी गझनी राजवटीने १०११ मध्ये हरवले होते. याच ताजिक वंशाच्या घराण्याने अफगाणिस्तानात घोर परगण्यात सर्वप्रथम मशिदी बांधायला सुरुवात केली. या घराण्याच्या मोहम्मद घोरीने ११८६ मध्ये लाहोर जिंकून गझनी साम्राज्याचा समूळ अस्त केला व नवे घोरी युग सुरु केले.

 

घोरी साम्राज्य उत्कर्ष काळात खोरासानपासून बंगालपर्यंत पसरले होते. १२०६ मध्ये मुझ-अल्दिन घोरीची तो नमाज पढत असतांना खोखर टोळीवाल्यांनी झेलम नदीच्या काठी २२ घाव घालून हत्या केली आणि या साम्राज्याला ग्रहण लागले.  १२१५ मध्ये ख्वार्जेम शहाने या साम्राज्याचा अस्त केला. घोरी साम्राज्याच्या मोहम्मदने भारतावर स्वारी करून प्रुथ्वीराज चौहानला पराजित करून दिल्लीवरही सत्ता गाजवली असल्याने उत्तर भारतात पर्शियन भाषा आणि संस्कृतीचा प्रवेश झाला असे मानले जाते. त्याच्यानंतर दिल्लीची सत्ता कुतुबुद्दीन ऐबक या घोरीच्या सेनीनीच्या हाती गेली. किंबहुना या घराण्यानेच मुस्लीम सत्तेचा भारतातील पुढील मार्ग सुकर केला असे मानले जाते.

 

घोरी घराण्याची अफगानिस्तानामधील सत्ता लोकप्रिय नव्हती याचे कारण म्हणजे त्यांनी लादलेले जबरदस्त कर. उत्पन्नाचे मार्ग वाढवन्यासाठी व आपल्या बलाढ्य सेनेला पोसण्यासाठी त्याने आपली लष्करी शक्ती समृद्ध भारताकडे वळवली अन्यथा त्याचेच सैन्य बंड करून उठण्याची शक्यता होती असे इतिहासकार मानतात.

 

-संजय सोनवणी

No comments:

Post a Comment

शेरशहा सुरी: एक कुशल प्रशासक

  शेरशहा सुरीने हुमायूनचा पराभव केला आणि त्याला भारताबाहेर हाकलले. दिल्लीत आता कोणी शासक उरला नसल्याने शेरशहाने स्वत:ला दिल्लीचा सम्राट घोषि...