Thursday, March 6, 2025

माणूस जिवंत करण्यासाठी!

 आमचे डोळे फुटलेले आहेत

कानात लाव्हा भरला आहे

कोणत्या ज्वालामुखीवर आम्ही बसलो आहोत

हे कळेना व्हावे एवढे बौद्धिक बधीर आम्ही झालो आहोत

पिशाच्चे नंगानाच करत आहेत चारी बाजूंनी

राज्यकर्ते आणि राज्यकर्ते होऊ पाहणाऱ्या

हैवानांचा हैवानांशी संघर्ष

आम्हाला मनोरंजक वाटतो आहे

त्यातच आम्ही आमच्या वांझ मनोरंजनांची

आणि झगड्याची सोय लावत

एकमेकांचा जीव घेण्यासाठी

आतुर झालो आहोत....

वेदनांमध्ये क्रूर आनंद घेण्यात आम्हाला तृप्तता वाटू लागलीय

आणि

स्मशानांतली धग आम्हाला अपार शांती देऊ लागलीय...

ही कोणती अभद्र शांती उपभोगतोय आम्ही?

हा कोणता नृशंस आनंद प्रिय वाटतोय आम्हाला?

अरे, जिवंत करा तुमचे फुटलेले डोळे

आणि करा साफ

लाव्हा भरलेले कान

आणि जरा बघा कोणता विनाश चालून येतोय

आणि जरा ऐका

विझत चाललेल्या आत्म्यांचे अखेरचे आक्रोश...

अरे उठून सज्ज व्हा या हैवानांचा

नाश करण्यासाठी

माणूस जिवंत करण्यासाठी!


-संजय सोनवणी

ए.आय.चे भविष्यकालीन जगावर काय परिणाम होतील?


 


मानवी इतिहासात असे अनेकदा झाले आहे की काही शोधांनी सुरुवातीला अत्यंत गारुड गाजवले. त्याच वेळेस हे शोध भीतीदायक आहेत असेही निक्षून सांगणारे वाढले. काळानुसार शोधातील जे उपयुक्त आहे तेवढे लोकांनी स्वीकारले. ते शोध एवढे अंगवळणी पडत गेले की ते अभिनव शोध आहेत असे वाटणेही बंद झाले आणि त्या शोधांबद्दलची भीतीही कोठल्या कोठे विरून गेली. यंत्रांचा शोध हा एक असाच टप्पा होता. दहा माणसांचे काम अधिक अचूकतेने एक यंत्र करू लागल्यानंतर मानवी श्रम आणि कौशल्यांचे काय होणार हा असाच एक भयदायक प्रश्न जगात  उसळला होता. महात्मा गांधीही यंत्रयुगाचे विरोधक होते हे सर्वश्रुत आहे. त्यामागील नैतिक धारणा व निर्माण होणाऱ्या नैतिक समस्या या अशा विचारवंतांच्या चिंतनाचा आणि चिंतेचा मुख्य गाभा होता. त्यांनी वर्तवलेल्या नैतिक शक्यता बऱ्याच प्रमाणात सत्यात उतरल्या असल्या तरी फार भयदायक आहे किंवा त्यामुळे काहीतरी विपरीत घडते आहे असे बव्हंशी जगाला वाटले नाही. उलट ते यंत्रांनी निर्माण केलेल्या वस्तूंच्या वापराकडे एवढे झपाट्याने वळाले की हाताने बनवलेल्या वस्तू ते केवळ शोभेखातर किंवा गतकाळाच्या स्मरणरंजनात रमण्यासाठी करू लागले.

आज एआयची जी धास्ती दाखवली जाते तिचेही असेच होईल यात शंका नाही. तसेही एआयने अनेक माध्यमांतून जगाच्या नकळत ताबा घेतलेलाच आहे. अवाढव्य प्रमाणातील माहितीचा साठा परस्पर जमा केला जातो आहे. त्याचाच वापर करत एआयची अनेक साधने बाजारात येत आहेत. त्याचा वापर करणारेही अगणित आहेत. पण एआयच्या मर्यादा लक्षात येऊ लागल्याने त्या साधनांचा उपयोग करणारे सामान्य लोक मात्र आता हळूहळू त्यापासून दूरही जात आहेत. अर्थात ही एआयची बाल्यावस्था आहे, ती वेगाने प्रगल्भ होत जाईल आणि अधिक अचूक होत मानवी जीवनातील अनेक क्षेत्रे ते कब्जात घेत जाईल असा आशावाद व भयवाद जोपासणारे मात्र अधिक आहेत हेही खरे.

उत्पादन पद्धती, उत्पादन डिझाईन पद्धती मुळात गणिती असल्याने त्यातील एआयचा वापर अधिक अचूकतेने मोठ्या प्रमाणावर होत जाईल. १९९८ साली मी माझ्या वाशिंग्टन सॉफ्टवेअर्स लि. या कंपनीमार्फत मेकॅनिकल डिझाईन्सची दहा सॉफ्टवेअर उत्पादने बाजारात आणली होती. सेंट्रीफ्यूगल फॅन्स ते प्रेशर व्हेसल्सचे यांत्रिक आराखडे त्यामार्फत अक्षरश: सेकंदात आणि बिनचूक मिळत. हे सॉफ्टवेअर वापरणारा स्वत: तंत्रज्ञ असण्याची आवश्यकता नव्हती. जी डिझाईन्स करायला एरवी काही तास ते आठवडे लागणाऱ्या आणि किमान एक ते अधिकाधिक पंधरा अनुभवी मेकॅनिकल डिझाईन तंत्रज्ञांची आवश्यकता असलेल्या डिझाईनचे काम काही सेकंदात व्हावे आणि तेही तांत्रिक दृष्ट्या, कोणतीही मानवी चूक न होऊ देता याचे त्यावेळेस अभियांत्रिकी तंत्रज्ञांनाही आश्चर्य वाटत होते. यामूळे कुशल तंत्रज्ञांची गरजच संपेल या भीतीमुळे अनेक तंत्रज्ञांनीच ही उत्पादने नाकारली. खरे तर भारतातील एआयची सुरुवात या उत्पादनांपासून झाली. पण भारतीय लोक नेहमीच आपल्याच ज्ञानाला अव्हेरण्यात आघाडीवर असतात. ही उत्पादने त्यामुळे त्या काळात बाजारात फार मोठा जम बसवू शकली नाहीत. पण तांत्रिक अचूकतेसाठी अशा प्रकारच्या ए.आय. उत्पादनांची नेहमीच आवश्यकता राहील. तीच गोष्ट प्रक्रिया उद्योगांची. एकूण प्रक्रियेवर नियंत्रण ठेवत, क्षणोक्षणी प्रक्रियेत जाणारा कच्चा माल व प्रक्रीये दरम्यानचे असंख्य गुंतागुंतीचे रासायनिक, उष्मागतिकी पॅरामीटर्स एकाच वेळेस अचूकतेने सांभाळत अपेक्षित दर्जाचे अंतिम उत्पादन निर्माण व्हावे यासाठी ए.आय. निश्चितच उपयुक्त आहे व या क्षेत्रातील त्याचा वापरही वेगाने वाढत आहे. गणिती क्रिया यंत्र व उत्पादनांना उपयुक्त असल्या तरी मानवी जीवन मात्र गणितापारचे आहे. ते तर्काच्या सीमांपार जाणारे आहे. दिलेल्या गणिती पद्धतीने उत्पादने अधिक अचूकपणे बनवता येणे शक्य झाले तरी वेगळ्याच नवीन उत्पादनाची किंवा प्रक्रिया पद्धतीची संरचना अशा कृत्रिम बुद्धिमत्तेला बनवता येणे शक्य नाही. त्यामुळे मानवी हस्तक्षेप व ज्ञानप्रक्रियेत भर घालण्याचे कार्य माणसालाच करत राहावे लागणार आहे.

सामान्य मानवी जीवनात एआयने काही उपयुक्तता निश्चितच दिल्या असल्या तरी उपयुक्त काय हे ठरवण्याचे कार्य माणसालाच करावे लागते. चॅट-जीपीटी सारखी साधने आजही आणि भविष्यातही तारतम्यानेच वापरावी लागतील. मुळात प्रश्न कोणता विचारायचा आहे, कोणती माहिती हवी आहे, का हवी आहे, दिलेली माहिती बरोबर आहे की चुक हे ठरवत त्यातून नेमके कोणते आकलन करून घ्यायचे आहे हे ठरवणारी शेवटी व्यक्तीच असेल. म्हणजेच या साधनांचा वापर कसा करायचा हे मानवी बुद्धीच ठरवणार आहे. विचार करणारे संगणक येतील असे अनेकांना वाटत असले तरी विचार कसा करायचा याचे कोडींग शेवटी मनुष्याच करणार असल्याने आणि कोणत्याही प्रश्नाला अगणित कोन असल्याने आणि व्यक्तीपरत्वे काय महत्वाचे हे ठरवता येणे शक्य नसल्याने शेवटी किती संभावनांचा समावेश या प्रणालींत करता येईल यावर मर्यादा आहेत. आणि हे एक ‘निर्विकार’ साधन आहे. त्याला नैतिकता, विवेक आणि कल्पकता अशा मानवी बाजूंचा स्वभान असणारा पैलूच नसल्याने हे फक्त मानवाला सहायक ठरणारे, त्याच्या कार्यक्षमतेत वाढ करणारे एक उपयुक्त सांगकामे सहायक एवढेच राहणार आहे.

भविष्यात आजचे बीट सिस्टमचे संगणक जाऊन किमान ३६ क्युबीट्सचे क्वांटम (सूक्ष्मयामिकी) प्रणालीवर चालणारे संगणक येण्याची शक्यता आहे. त्या दिशेने वेगाने प्रयत्न होतही आहेत. असे संगणक अचाट शक्तीचे व आज कोणतीही प्रणाली हाताळू शकते त्यापेक्षा शेकडो पटीने वेगवान व आज सोडवता येतात त्याहीपेक्षा किचकट समस्या लीलया हाताळू शकतील अशा प्रणाल्या त्यामुळे अस्तित्वात येवू शकतील. खरे तर आजचे संगणक त्यामुळे बाद होतील आणि नवीनच अजब-गजब तंत्रज्ञान मानवी जगाला प्रभावित करत जाईल. हे झाल्यावरचे जग कसे असेल याचा मासला मी माझ्या “भविष्य नावाचा इतिहास” या कादंबरीत दाखवला आहेच. पण वास्तवात पाहिले तर हा क्वांटम तंत्रज्ञांनाकडे जाणारा प्रवास प्रदीर्घ आहे. याचे कारण म्हणजे परमाणुच्या सूक्ष्म स्तरावर आजच्या भौतिकीचे नियम मुळात लागू पडत नाहीत. किंबहुना सूक्ष्म स्तरावरील भौतिकी घटनांचे आकलन आजची शास्त्राला पुरेशा प्रमाणात झालेले नाही. त्या अर्थाने मुळात सूक्ष्मयामिकी अद्याप तरी बाल्यावस्थेत आहे. आणि जोवर ती मानवी आकलनात येत नाही तोवर त्यावर आधारित कोणतीही प्रणाली बनवता येणे अशक्य आहे आणि कृत्रिम बुद्धीमत्ता हे कार्य कदापि करू शकत नाही हे आता सर्वांच्याच लक्षात आलेले आहे.

थोडक्यात उद्याचे जग आरंभीच्या गारुडातून बाहेर येत स्वत:चीच बुद्धी वापरू लागेल अशीच शक्यता जास्त आहे.

 

-संजय सोनवणी 

माणूस जिवंत करण्यासाठी!

  आमचे डोळे फुटलेले आहेत कानात लाव्हा भरला आहे कोणत्या ज्वालामुखीवर आम्ही बसलो आहोत हे कळेना व्हावे एवढे बौद्धिक बधीर आम्ही झालो आहोत पिशाच्...