Friday, March 3, 2023

“अंगविज्जा”- कुशाणकालीन समाजव्यवस्थेचे दर्शन!



आजच्या मराठीच्या उगमस्त्रोतांचा विचार करतांना भाषाविदांनी आजवर माहाराष्ट्री प्राकृतातील शिलालेख व हाल सातवाहनाच्या गाथा सप्तशतीला मानाचे स्थान दिलेले आहे. पण कुशाण काळातील पहिल्या ते दुस-या शतकादरम्यान अज्ञात लेखकाकडून लिहिल्या गेलेल्या साठ अध्यायी "अंगविज्जा" (अंगविद्या) या माहाराष्ट्री प्राकृतातील गद्य ग्रंथाकडे कसे दुर्लक्ष केले हे समजत नाही. पण त्या काळातील समाजजीवनाची एवढी इत्यंभूत माहिती देणारा अन्य कोणताही ग्रंथ आज अस्तित्वात नाही. आजच्या मराठीचा स्त्रोत म्हणूनही या ग्रंथाचे मोल अपरंपार आहे. या ग्रंथामुळे आपला समाजेतिहास नव्याने उलगडतो आणि अनेक कुटप्रश्नांवर प्रकाश टाकतो हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. या ग्रंथातील भविष्यकथनाला वगळत आपण या ग्रंथात दिसणा-या समाज/धर्म जीवनाची चर्चा करणे अधिक योग्य व उद्बोधक राहील.


अंगविज्जावरून प्रतीत होणारी सर्वात महत्वाची बाब म्हणजे जन्माधारित जातीव्यवस्था कुशाणकाळापर्यंतही जन्माला आलेली नव्हती. ग्रंथकार असंख्य व्यवसायांची कोशाप्रमाणे जंत्रीच देतोपण त्यांना "जात" हा शब्द कोठेही वापरत नाही. जातिसंस्थेच्या अभ्यासकांनी याची नोंद घेतली पाहिजे. अंगविज्जेत "गृहपती" या संज्ञेने हिंदू धरातील (वैदिक ज्यांना शुद्र म्हणत त्या) प्रतिष्ठितांची ओळख मिळते. दिक्षा अथवा संन्यास घेतलेल्या बौद्धांना मुंडक म्हणत तर जैनांना समन (श्रमण) म्हणत. तिसरा धर्म म्हणजे आर्य. या आर्य धर्मात (आज ज्याला आपण वैदिक धर्म म्हणतो) ब्राह्मणक्षत्रीय व वैश्य यांचा समावेश होता. चवथा मोठा धर्म-समूह म्हणजे म्लेंच्छ. या म्लेंच्छात ग्रंथकाराने शूद्रयवनशककुशाणक्षत्रपादि लोकांचे धर्म सामाविष्ट केलेले आहेत. थोडक्यात जे वैदिक अथवा श्रमण. मुंडक नाहीत त्यांना शूद्र अथवा म्लेंच्छ संबोधायची तेंव्हाचीही परंपरा होती. पतंजलीच्या महाभाष्यातही अगदी हीच मांडणी आहे. एवढेच नव्हे तर मनुस्मृतीही काही ठिकाणी म्लेंच्छांतर्गत जे वैदिक नाहीत त्या सर्वांचा समावेश करते. म्हणजेच वैदिक धर्म हा बौद्धजैन व शुद्रांच्या धर्मापेक्षा वेगळा व स्वतंत्र होता याचा वेगळा स्वतंत्र पुरावा "अंगविज्जा" देतो. म्लेंच्छ या शब्दाने दचकून जायचे कारण नाहीम्लेंच्छ हा शब्द मुळच्या मेलुहा अथवा मेलुक्खा या शब्दाचा वैदिक भाषेतील अपभ्रंश आहे हे ए. एच. दानी व बी. के. थापर यांनी दाखवून दिले आहे. मेलुहा हे भारताचेच प्राचीन नांव होय.

त्या काळात देवतांमध्ये शिवउमा. वैश्रवण (यक्षाधिपती कुबेर)यक्षगंधर्ववासुदेवसंकर्षणस्कंदकुमारविशाख इत्यादिंची जनसामान्य पूजा करत असे. त्यांची मंदिरेही असत. तीर्थंकरांची मंदिरे बनण्याची मात्र सुरुवात झालेली दिसत नाही. गिरिपूजा हे एक जैनांचे तत्कालीन महत्वाचे अंग दिसते. त्यांचे गिरिमह नामक सणही असत व त्यात सर्वच भाग घेत असे अंगविज्जावरुन दिसते.  काही लोक इंद्रवरूणयम यांचीही उपासना करीतपण ही वैदिक दैवते तोवर दुय्यम झालेली दिसतात. आज जशी ग्रामदैवते आहेत तसेच नगरांचेही यापैकीच एखादे नगरदैवत असे. काही पारशी व ग्रीक देवतांचीही पूजा कुशाण राजवटीमुळे सुरु झालेली दिसते. अनाहिता (पारशी)ऐरादित्ती (अफ्रोडायटी-ग्रीक देवता) यात नांव घेण्यासारख्या आहेत. कनिष्काच्या राबटक शिलालेखातील अभिवादनात इंद्र-वरुणादि अशी एकही वैदिक दैवते येत नाहीत पण उमाकुमारविशाख ही नांवे तर येतातच पण कुशाणांच्या बव्हंशी नाण्यांवर नंदीसहितची शिवप्रतिमाही आहे. काही नाण्यांवर बुद्धाच्याही प्रतीमा आहेत. यावरून वैदिक धर्माला कनिष्काने राजाश्रय दिला नव्हता असे दिसते. अंगविज्जातही यज्ञाचे येणारे अगदीच तुरळक उल्लेख पाहता हा धर्म तेंव्हा अत्यंत मर्यादित लोकांत सीमित होता समाजावर त्याचा विशेष प्रभावही नव्हता असे दिसते.

त्या काळात मातृकांचीही पूजा होत होती. महत्वाचे म्हणजे असूर-असूरकन्याराक्षस-राक्षसीयक्ष-यक्षीणीनाग-नागीणगिरीदेवता यांचीही पूजा होत असे. धनिक व्यापा-यांत वैश्रवणाची पूजा चालत असे. दिवाळीत नंतरही दिर्घकाळ लक्ष्मीपूजन नव्हे तर वैश्रवण (कुबेर) पूजनच होत असे तर दिवाळीला यक्षरात्री म्हणत असत. यक्षअसूरराक्षसनाग आदि प्राचीन संस्कृतीचे पुजनाच्या रुपात लोकांकडून आदरात्मक भान ठेवले गेल्याचे दिसते. वैदिकेतर सर्व धर्मात या दैवतांना कमी-अधिक प्रमाणात महत्वाचे स्थान दिल्याचे दिसते. असूरपिशाच्चनाग आदिंना देवयोनीत गणले गेलेले आहे. त्यांच्यावर आधारित व्यक्तीनामेही ठेवली जात. पुराणांनी नंतर जरी असूरराक्षसादिंना बदनाम केले असले तरी कुशाणकाळात तशी स्थिती नव्हती

 

अंगविज्जाच्या ग्रंथकर्त्याने त्याच्या काळातील व्यवहारात असलेल्या व्यक्तीनामांची सुची दिली आहे व ती समाजेतिहासाच्या अभ्यासासाठी अत्यंत उपयुक्त आहे. कुशाणकालीन शिलालेखांतही काही नावे तशीच्या तशीच मिळतात हेही येथे उल्लेखनीय आहे.


कुशाणकालीन नाण्यांबद्दल "अंगविज्जा" अत्यंत महत्वाची माहिती पुरवतो. कुशाणांच्या काही नाण्यांवर नना देवीची प्रतिमा असल्याने त्यांना नाणक म्हणत. आज आपण त्यालाच नाणे म्हणतो. त्या काळात कार्षापण चलनाला "पुराण" म्हणू लागले होते. कुशाणाधिपती हुविष्काच्या पुण्यशाला लेखात ११०० पुराण नाण्यांची देणगी दिल्याचा उल्लेख आहे.  कुशाणांनी प्रचलित केलेले दीनारही तेंव्हा चलनात होते. या दीनारांचा उल्लेख मनुस्मृतीतही येतो. छोट्या नाण्यांना मासकअर्धमासकररय मासक म्हणत असत असेही दिसते. चलनाची विविधता पाहता हा काळ आर्थिक दृष्ट्या सुबत्तेचा होता. वस्त्रअलंकारमद्याचे अनेक प्रकारपानगृहेव्यापारी नौकांची वर्णने यावरूनही त्या सुबत्तेची कल्पना येते. अंगविज्जाने दिलेल्या नौकांचे काही प्रकार पेरीप्लसच्या  (सन ७८) प्रवासवर्णनातही येतात. नौकांची ही नांवे नंतरच्या काळात दिसून येत नसल्यामुळे अंगविज्जाचे लेखन कुशाणकाळातच झाले या निष्कर्षाला अधिक बळ मिळते.   

अंगविज्जात येणारा समाज हा मनमोकळा आहे. स्त्रीयांचे स्थान समाजात उच्चीचेच होते. समाज श्रेणींच्या माध्यमातून आपापले व्यवसाय चालवतांना दिसतो. पेयपानाबद्दलही विधीनिषेध नव्हते. गाथा सप्तशतीतही असाच मोकळा ढाकळा समाज आपल्याला दिसतो. बौद्ध धर्मही या काळत सुस्थापित होता हे स्तुपांच्या वर्णनावरून दिसते. हा राजकीय ग्रंथ नसल्याने समाजव्यवस्थेची भरपूर माहिती या ग्रंथात येत असली तरी राजव्यवस्थेबाबत माहिती येत नाही. असे असले तरी समाजावर फारशी राजबंधने नव्हती. नागरिक जेवढ्या प्रकारांच्या वाहनांचा उपयोग करत त्यांचीच संख्या पाहिली तर एकंदरीत समाज संपन्न होता याची साक्ष पटते.

अंगविज्जा हा जैन धर्मियाने लिहिलेला ग्रंथ असुनही त्याने विषयाच्या अनुषंगाने सगळ्यांच्याच स्थितीची चर्चा केली आहे. या ग्रंथाचा हेतू धर्मप्रचार नव्हता. आरंभीच्या अध्यायात सिद्ध व जिनांना अभिवादन करण्याशिवाय ग्रंथकाराने कोठेही जैन धर्माचा पुरस्कार येत नाही. खरे तर अंगविद्या शास्त्राला जैन व बौद्धांनी त्याज्जच मानले. तरीही अत्यंत आकर्षणातून हा ग्रंथ लिहिला गेला असल्याने अन्य जैनबौद्ध व वैदिक ग्रंथांत जो धार्मिक अभिनिवेष दिसतो त्याचा स्पर्शही या ग्रंथाला झालेला नाही. हा या विषयावरील टिकून राहिलेला एकमेव ग्रंथ. प्राकृत टेक्स्ट सोसायटीने १९५७ साली मुनी पुण्यविजय तथा श्री आत्मारामजी महाराज यांनी या ग्रंथाच्या अनेक हस्तलिखित प्रती मिळवत तो प्रसिद्ध केला. हा ग्रंथ त्र्ययस्थाने लिहिलेला असल्याने यातील माहिती ही ऐतिहासिक सत्याजवळ जाणारी आहे. आपला इतिहास नव्याने संशोधित करण्याची केवढी गरज आहे हे हाच ग्रंथ दाखवून देतो. त्यासाठी सर्वच प्राकृत भाषांतील पुरातन ग्रंथ मिळवत त्याचे तटस्थ परिशिलन केले पाहिजे एवढे भान जरी "अंगविज्जा"मुळे आले तरी पुरेसे आहे.

-
संजय सोनवणी

(Published in Navshakti)


तत्वज्ञानातील अनुत्तरीत प्रश्न आणि मानवी भविष्य

  ईश्वर आहे की नाही, चेतना म्हणजे काय, विश्वाला काही अर्थ आहे की नाही, मुक्त इच्छा अस्तित्वात असते की नाही, वास्तवाचे खरे स्वरूप का...