Saturday, February 7, 2015

रोमांचकारी संघर्षाचा प्रवास

 Feb 8, 2015, 12.20AM IST
book2
- सागर भंडारे

अद्भुतरम्य कादंबरी हा साहित्यप्रकार तसा मराठी साहित्याला नवा नाहीये. पण दुर्दैवाने मराठी साहित्यात शशी भागवत यांच्या व्यतिरिक्त या कादंबरीप्रकारात फारसे काम लेखकांकडून झालेले नाही. या पार्श्वभूमीवर संजय सोनवणी लिखित 'हिरण्यदुर्ग' ही अद्भुतरम्य कादंबरी आहेच, पण त्या प्रकारात मानदंड ठरावी, अशी आहे. कारण आतापर्यंतच्या अद्भुतरम्य कादंब‍ऱ्या भारतीय रुपातल्या असल्या, तरी बहुतेकांचे कथासूत्र बव्हंशी विदेशी व क्वचित इतर भाषांतील कादंब‍ऱ्यांवरुन घेतलेले होते. म्हणूनच कथानकाचा सांगाडा व जडणघडण संपूर्णपणे मराठी असलेली 'हिरण्यदुर्ग' ही मराठीतील पहिली अद्भुतरम्य कादंबरी म्हणायली हवी.

सातवाहनांचा गौरवशाली काळ हा खरेतर महाराष्ट्राच्या व आपल्या देशाच्या इतिहासाचाही मानदंड असायला हवा होता. पण यावर दुर्दैवाने आपल्या संशोधक वा इतिहासकारांकडून म्हणावी तशी भरीव कामगिरी झाली नाही. स्वतः लेखक संजय सोनवणी हे इतिहास संशोधकही असल्याने सातवाहनांच्या काळाची पार्श्वभूमी 'हिरण्यदुर्ग' या कादंबरीसाठी वापरुन त्यांनी एक प्रकारे वाचकांसाठी महाराष्ट्राच्या सातवाहन राजांच्या वैभवशाली इतिहासाची कवाडेच जणू उघडून दिली आहेत.

'हिरण्यदुर्ग' या कादंबरीत असे काय आहे की ज्यासाठी वाचक पुस्तकाला चिकटून राहतो? अद्भुत, वीर, रौद्र, बीभत्स, भय, रोमांच, थरार, शौर्य, प्रेम, वासना, थरकाप, हिडिस, घृणा, प्रेरणा, चेतना, आशा, निराशा, जय, पराजय, सुष्ट, दुष्ट, हिंसा, अहिंसा, संहार, प्रतिकार, अशा कित्येक प्रकारच्या मनोभावनांचा परिचय वाचकांना 'हिरण्यदुर्ग' ही अद्भुतरम्य कादंबरी करुन देते. कादंबरीचे नाव 'हिरण्यदुर्ग' असल्यामुळे हिरण्यदुर्ग या कादंबरीत केंद्रस्थानी असणार हे उघड आहे. तरीही कादंबरीची सुरुवात होते, ती सिंहभद्र आणि केतुमाल या दोन आगंतुक प्रवाशांबरोबर. हे दोन्ही प्रवासी वाट चुकून सूर्य मावळल्यानंतर हिरण्यदुर्गाच्या परिसरात येतात आणि त्यांचे खूप आदरपूर्वक स्वागत होते. प्रवासाने थकलेले हे दोघे प्रवासी हिरण्यदुर्गाची श्रीमंती पाहत सुग्रास भोजन करुन मदनमंजि‍ऱ्यांच्या गोड सहवासात रात्री गाढ झोपी जातात. सकाळी दोघे जागे होतात आणि पूर्णपणे हादरतात ते उध्वस्त भिंती... गच्च झुडपांचे रान... ढासळलेले बुरुज ...असा दुर्ग पाहून. काय असते हिरण्यदुर्गाचे हे भयंकर रहस्य? पुढे हिरण्यदुर्गाच्या कक्षेतून बाहेर पडून सिंहभद्र आणि केतुमाल हे प्रवास करु लागतात. वाटेत एक गूढ जटाधारी भेटून त्यांना आसरा देतो. त्याच्या साहाय्याने एका गुप्त गुहेच्या मार्गाने दुस‍ऱ्या बाजूने ते दोघे बाहेर येतात. या दरम्यान धनगरांकडून मिळालेली धक्कादायक वागणूक वाचकांना आश्चर्याच्या गर्तेत ढकलते. खुद्द सिंहभद्रदेखील त्या वागणुकीने चक्रावतो. जसजसा त्या निष्पाप व मोकळ्या मनाच्या धनगरांच्या सहवासात राहून सिंहभद्र गोष्टी ऐकत जातो तसतसा त्याला आश्चर्याचा धक्काच बसतो. स्वतःच्या आजच्या अस्तित्वाची पाळेमुळे शेकडो वर्षांपूर्वीच्या भयंकर संग्रामात दडलेली आहेत, हे जाणून स्वतः सिंहभद्र आणि पर्यायाने केतुमाल दोघांचाही थरकाप उडतो.

पुढे कादंबरीतील खलपुरुष पुलोम्याच्या सर्व शक्ती जागृत होतात आणि तो प्रकटतो. पुलोमा अवतीर्ण झालाय आणि सिंहभद्र अजूनही स्वतःच्या अस्तित्वाची पाळेमुळे शोधतो आहे. अशा विपरीत अवस्थेत भयंकर रणसंग्रामाला सुरुवात होते. असंख्य लोहपीसांचा वर्षाव करणारा लोहपक्षी, त्याच्याशी लढणारा सिंहभद्राच्या आज्ञेतील त्रिशूळ. सिंहभद्राच्या शक्ती जागृत होण्याअगोदरच त्याला नष्ट करण्याच्या हेतूने अवाढव्य पर्वतच्या पर्वत उध्वस्त करणारा पुलोमा. पाताळगंगेचे रहस्य, विनाशकारी परिस्थितीत तेर नगरीतील सर्पांच्या राजाकडे सुरक्षित ठेवलेले गूढ आणि रहस्यमयी बाड. ते बाड मिळून सिंहभद्राच्या शक्ती जागृत होण्याअगोदरच पुलोम्याने नागांच्या राणीला आपल्या सापळ्यात अडकवून बाड नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न. बाडाच्या रक्षणासाठी झटणा‍ऱ्या शक्तीश्री महाराजांना आलेले अपयश. अशातच गोंधळलेल्या सिंहभद्राच्या आयुष्यात देवसेनेचा अचानक झालेला प्रवेश. पुलोम्याला देवसेनेचा पडलेला मोह. अशा अनेक धक्क्यांमागून धक्के देणारे हे अद्भुतरम्य कथानक वाचकाची उत्कंठा शेवटच्या पानापर्यंत ताणून धरण्यात यशस्वी ठरते.

सिंहभद्र कोण असतो? देवसेना कोण असते? पुलोमा कसा अवतरतो? सिंहभद्राला जागे करु शकणारे बाड नष्ट होते का? त्यात काय असते? लोहपक्ष्याशी त्रिशूळ कसा लढतो? त्रिशूळ सिंहभद्राच्याच आज्ञेत का असतो? हिरण्यदुर्गाचे रहस्य काय असते? हिरण्यदुर्गाच्या पोटात असे काय रहस्य दडले असते की सर्वशक्तिमान पुलोमाही त्यात प्रवेश करु शकत नसतो? सिंहभद्राला त्याच्या शक्तींचे भान येते का? युद्धात कोण जिंकतो? पुलोमा की सिंहभद्र? तेर नगरीतील सर्प सातवाहनांच्या चरणी वाहिलेली आपली जन्मोजन्मीची निष्ठा पाळतात का? पाताळगंगेचे रहस्य काय असते? सातवाहनांच्या राजांची सिंहभद्र आणि पुलोमाच्या संघर्षात काय भूमिका असते? सातवाहन ते बाड एवढे का जपत असतात? शक्तिश्री राजाची कन्या देवसेनेचे एक रहस्य काय असते? कुबड्या कोण असतो? त्याचे रहस्यमय वागणे शेवटी कसे उकलते? कोण असतो हिरण्यदुर्गाचा खरा स्वामी? धर्मपाल आणि महाधम्मरक्ख (बौद्ध भिक्खू) सिंहभद्राला कोणती मदत करतात? शक्तीश्रीमहाराजांचे एकनिष्ठ सेवक आमोदक आणि गंगाधर बाडासाठी शेवटपर्यंत कसे झुंझतात? हिरण्यदुर्गाच्या परिसराचे रहस्य उकलते का? मरुगण नेमके कोण असतात? ते कोठून आलेले असतात? त्यांचा सिंहभद्राशी काय संबंध असतो? अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे पानोपानी उत्कंठा ताणून धरणा‍ऱ्या 'हिरण्यदुर्ग' या अद्भुतरम्य कादंबरीत मिळतात.

अद्भुतरम्य कादंबरी मध्ये धक्कातंत्र प्रभावीपणे वापरणे, हे अतिशय कौशल्याचे काम असते आणि त्यात 'हिरण्यदुर्ग' कादंबरीचे लेखक संजय सोनवणी यशस्वी झालेले आहेत. ही कादंबरी वाचताना वाचकाला पानोपानी धक्के बसतात. जेव्हा वाचक भानावर येतो तेव्हा लक्षात येते की आपली कादंबरी वाचून पूर्ण झालेली आहे. हेच 'हिरण्यदुर्ग'चे अद्भुत यश आहे. वाचकाला अजून काय हवे असते? 'हिरण्यदुर्ग' वाचून पूर्ण झाल्यावर वाचकाच्या मनात उरतो तो एका थरारक व रोमांचकारी प्रवासाचा आनंद. ......... हिरण्यदुर्ग लेखक : संजय सोनवणी मुखपृष्ठ : राजेंद्र गिरधारी प्रकाशक : प्राजक्त प्रकाशन, पुणे पृष्ठं : ३५२ किंमत : ३५० रु.

 (महाराष्ट्र टाईम्समद्ध्ये)

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/46157310.cms

3 comments:

  1. Nice criticism !!! Thanks Sagar Bhandare.

    ReplyDelete
  2. धन्यवाद विकास. जागेच्या अभावी "हिरण्यदुर्ग"चे पूर्ण परिक्षण छापून आले नव्हते. माझ्या ब्लॉगवर ते परिक्षण जसेच्या तसे दिले आहे

    http://pustakveda.blogspot.in/2015/02/blog-post_10.html

    ReplyDelete
  3. मुद्रण दोषामुळे पानोपानी रसभंग होत राहतो. शेवटचा संघर्ष लवकर उरकून टाकल्या सारखा वाटला ...बाकी कादंबरी उत्तम जमलेली आहे.

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...