पुरातत्त्वशास्त्रातील अग्रगण्य संस्था असणाऱ्या पुण्यातील डेक्कन कॉलेजमधील पुरातत्त्वशास्त्रज्ञ गेल्या काही वर्षांपासून हरियाणातील राखीगढी इथे उत्खनन-संशोधन करत आहेत. या उत्खननातून बाहेर येणाऱ्या पुराव्यांमधून जुनी गृहितकं बदलून अनेक माहिती चुकीच्या पद्धतीने नव्याने समोर येत आहे. भारतीयांच्या मुळाचा प्रश्न सुटला आहे असे वातावरण त्यातून निर्माण झाले. या दाव्यांना "सेल' आणि "सायन्स' या प्रतिष्ठित नियतकालिकांत प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधांचा आधार घेतला गेला आहे. मात्र मूळ शोधनिबंध न वाचताच पुरातत्त्वशास्त्राचा सांस्कृतिक राजकारणासाठी कसा उपयोग केला जातो यावरची ही सखोल आणि अभ्यासपूर्ण रोखठोक मते...
"आर्य मूळचे भारतातलेच... आर्य आक्रमण सिद्धांत चुकीचा... हडप्पा संस्कृतीचे लोक संस्कृत भाषा बोलत... त्यांची संस्कृती वैदिक होती... आजच्या भारतीयांमध्येही तीच जनुके झिरपत आलेली असून या लोकांची आनुवांशिकी स्वतंत्र आहे. परकीयांचा त्यावर नगण्य प्रभाव आहे,' असे दावे डेक्कन कॉलेजचे कुलगुरू व हरियाणाच्या राखीगढी येथील उत्खननाचे प्रमुख डॉ. वसंत शिंदे यांनी केले. ते सर्व भारतातील वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केले आणि खळबळ माजली. भारतीयांच्या मुळाचा प्रश्न सुटला आहे असे वातावरण त्यातून निर्माण झाले. या दाव्यांना "सेल' आणि "सायन्स' या प्रतिष्ठित नियतकालिकांत प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधांचा आधार घेतला गेलेला होता आणि या दोन्ही शोधनिबंधांचे डॉ. शिंदे हे प्रमुख सहलेखक असल्याने हे दावे सत्यच आहे असा आभास निर्माण होणे स्वाभाविक होते. मूळ लेख सहसा जनसामान्य वाचण्याच्या भानगडीत पडत नसल्याने या विधानांमागचे संघप्रणीत सांस्कृतिक सहज पुढे नेता येणे शक्य झाले. पण आपण वस्तुस्थिती तपासून पाहिली पाहिजे. पुरातत्त्वशास्त्राचा सांस्कृतिक राजकारणासाठी उपयोग करणे गैर असले तरी असे झाले आहे हे दुर्दैव आहे.
पहिली बाब म्हणजे "आर्य' हा शब्दच मुळात दोन्ही शोधनिबंधांमध्ये वापरलेला गेलेला नाही तर इंडो-युरोपियन भाषा बोलणारे पूर्व युरोपातील 'स्टेपे' येथील भटके पशुपालक हा शब्द वापरला गेलेला आहे. त्यांचे इराणमार्गे स्थलांतर इसपू दोन हजार ते एक हजार या काळात सुरू झाले व ते कधीतरी नंतरच्या टप्प्यात पण इसपू एक हजारच्या आधी भारतात आले. नंतरच्या उत्तर भारतीय रहिवाशांमध्ये (म्हणजे आजच्या) इराणी व स्टेपे भागातील भटक्या पशुपालकांच्या जनुकप्रवाहाचे प्रमाण जास्त (म्हणजे अधिकाधिक ३०%) आहे. इंडो-युरोपियन भाषा त्यांनीच आपल्या सोबत आणल्या असाव्यात व त्यांचा उत्तर भारतात प्रसार झाला. राखीगढी येथील स्त्रीचा सांगाडा आहे तो इसपू २६०० मधला. म्हणजे आजपासून ४६०० वर्षे जुना. त्या सांगाड्यातील जनुकांत मात्र स्टेपे जनुकप्रवाहाचे अस्तित्व नाही. इराणी जनुकांचे प्रमाण नगण्य स्वरूपात आहे, पण सिंधू संस्कृतीच्या व्यापारामुळे या प्रदेशाशी येणाऱ्या नित्य संबंधांमुळे हा जनुकप्रवाह किंचित झिरपला असावा असे निष्कर्ष काढले असून एकाच सांगाड्यातून मिळालेल्या जनुकांमधून काढला गेलेला निष्कर्ष परिपूर्ण असणार नाही. यासाठी अधिक नमुन्यांना शोधून त्यांच्याही जनुकांचा सिक्वेन्स लावला पाहिजे, अशीही सूचना शोधनिबंधात केलेली आहे.
हे झाले मूळ शोधनिबंधांत काय आहे याचा सारांश. या लेखांचे सहलेखक जगमान्य बहुशाखीय विद्वान आहेत. या सारांशावरून लक्षात येईल की, वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेल्या दाव्यांत आणि शोधनिबंधातील निष्कर्षात यत्किंचितही साम्य नाही. आर्य इथलेच, सरस्वती नदी म्हणजे घग्गर नदी, वेदरचना येथेच झाली वगैरे दावे रा. स्व. संघप्रणीत विद्वान गेली अनेक दशके करत आलेले आहेत. गेल्या शतकाच्या सुरुवातीला आक्रमक आर्यांनीच सिंधू संस्कृती उद्ध्वस्त केली असे मत प्रचलित होते. पण त्यामुळे आक्रमक आर्य विरुद्ध द्रविड असा एक सांस्कृतिक, अनेकदा हिंसकही झालेला संघर्ष पेटला, तर दुसरीकडे मूलनिवासीवादही जन्माला आला. त्यामुळे स्वत:ला वैदिक आर्य समजणारे, सांस्कृतिक वर्चस्वतावाद जपणारे वैदिक धर्मीय अस्वस्थ झाले आणि आपण मूळचे इथलेच हे सांगायला सुरुवात केली. हे प्रकरण इथेच थांबले नाही तर सिंधू संस्कृतीचे निर्माते वैदिक आर्यच असेही रेटून सांगायला सुरुवात केली. म्हणजे विध्वंसकर्ते ते थेट निर्माते असली कोलांटउडी घेतली गेली. त्यासाठी काही पुरातत्त्वीय पुराव्यांशी छेडछाड करण्यातही त्यांनी मागेपुढे पाहिले नाही.
सिंधू संस्कृतीच्या अवशेषांत वैदिकांना प्रिय असलेल्या घोड्यांचे अवशेष मिळालेले नव्हते. त्यामुळे सिंधू संस्कृती वैदिकांचीच आहे असे ठरवायला अडचण येऊ लागल्यानंतर एन. एस. राजाराम व एन. झा या लेखकद्वयाने सिंधू संस्कृतीला घोडा माहीत होता हे दाखवण्यासाठी एका बैलाचे चिन्ह असलेल्या मुद्रेच्या छायाचित्रावर संगणकीय छेडछाड (forgery) केली व बैलाच्या प्रतिमेला चक्क घोड्यात बदलवले. हा प्रकार हार्वर्डचे इंडोलोजिस्ट मायकेल विट्झेल आणि त्यांचे सहयोगी स्टीव्ह फार्मर यांनी फ्रंटलाइनमध्ये (ऑक्टोबर २०००) लेख लिहून उजेडात आणला. आर्य वंश आणि वैदिक संस्कृती याची संघमोहिनी अचाट आहे. आता तर जनुकीय शास्त्राचा असाच उपयोग केला गेला आहे. डॉ. शिंदेंच्या वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेल्या दाव्यांवरून ते केवळ संघप्रिय सिद्धांतांचीच री ओढत आहेत हे स्पष्टच आहे. पण खुद्द ज्या शोधनिबंधांचे जे स्वत: सहलेखक आहेत ते शोधनिबंध त्याच्याच दाव्यांची पुष्टी करत नाहीत हे उघड आहे. याला आपण सांस्कृतिक राजकारण व वर्चस्वतावादासाठी शास्त्राची हत्या असेही म्हटले तर वावगे होणार नाही.
पहिली बाब अशी आहे की, कोणाच्याही जनुकांवरून त्या व्यक्तीची भाषा, अाध्यात्मिक संस्कृती समजत नाही तर तो केवळ तर्क असतो. तर्क हे वास्तव असतेच असे नाही. स्टेपेमधील भटके पशुपालक इंडो-युरोपियन भाषांचे निर्माते होते यालाच कसलाही पुरावा नाही. ऋग्वेद व पारशी धर्माचा धर्मग्रंथ अवेस्त्यात भाषा, धर्मकल्पना, देव-देवता, याज्ञिक कर्मकांड यात अतोनात साम्य आहे. एकाच भुप्रदेशात, म्हणजे इराणमध्ये या दोन्ही धर्मांची एकाच काळात निर्मिती झाली हे उघड आहे, कारण ऋग्वेदातील नोढस गौतम हा ऋषी अवेस्त्यात समकालीन म्हणून वावरतो तर खुद्द जरथुष्ट्र ऋग्वेदात वावरतो. हे लिखित पुरावे आहेत व या दोन्ही धर्मांची निर्मिती इसपू १५०० च्या मागे जावू शकत नाही, असे सर्वच (संघी सोडून) विद्वानांचे मत आहे. इसपू १५०० मध्ये सिंधू संस्कृतीचा प्राकृतिक कारणाने ऱ्हास होऊन गेला होता. त्यामुळे सिंधू संस्कृतीची निर्मिती वैदिक आर्यांची हा दावा फोल आहे, असा दावा डॉ. शिंदे सहलेखक असलेल्या शोधनिबंधांतही केला गेलेला नाही.
शोधनिबंधातील निष्कर्षांचा अर्थ असा लावता येतो की, सिंधू संस्कृतीचे निर्माते येथीलच होते. त्यांच्या जनुकप्रवाहात किमान इसपू २००० पर्यंत कसलेही बाह्य प्रादुर्भाव झालेले आढळत नाही. येथील कृषी संस्कृतीही स्वतंत्ररीत्या विकसित झाली आणि त्यातूनच सुफलनतायुक्त शैवप्रधान धर्माचा उदय झाला. इसपू २६०० मधील स्त्रीच्या सांगाड्यात ही स्टेपेची जनुके मिळून येत नाहीत. कारण तेव्हा हे लोक युरोपातून इराणमध्येही आलेले नव्हते. डेव्हिड राइश यांच्या मते त्या काळात सिंधू संस्कृतीची भाषा इंडो-इराणी पूर्व व स्वतंत्र होती. इराणी जनुकप्रवाह इसपू २००० नंतरच स्टेपेच्या जनुकांनी प्रभावित व्हायला सुरुवात झाली. स्टेपेच्या लोकांचा धर्म कोणता होता याचा अद्याप उलगडा झालेला नाही आणि ते का स्थलांतरित झाले याचे सबळ उत्तर अद्याप गवसलेले नाही. शिवाय स्टेपेतील लोक स्टेपेमध्ये जगाच्या कोणत्या भागातून आले होते हेही आपल्याला आज तरी माहीत नाही.
पण ते लोक इसपू २००० नंतर इराणमध्ये आले व स्थायिक झाले. त्यांची पुढे भारतात प्रवेशण्याची प्रक्रिया सन १५०० नंतर सुरू झाली. तोवर त्यांच्याही जनुकांत इराणी जनुकांचा संसर्ग झालेला होता. मिश्र जनुकांचे काही वैदिक धर्मीय इराणी लोक इसपू १२०० नंतर भारतात आपला धर्म घेऊन आले व धर्मप्रचाराच्या माध्यमाने काही घटकांत तो धर्म पसरवला. भारतात इराणमार्गे येणारे सर्वच वैदिक धर्मीय असू शकत नव्हते. कारण इराणमध्येच तेव्हा वैदिक, अहूर माझ्दा व वेगळ्या देवता पुजणाऱ्यांचे अनेक धर्म होते. त्यांच्यात धर्मबदल व धर्मसंघर्ष ही नित्याची बाब होती. याचे पुरावे ऋग्वेद व अवेस्त्यातच येतात. त्यातीलही काही टोळ्यांनी भारतात प्रवेश केला असणार हे उघड आहे. त्यामुळे भारतीयांत इराण-स्टेपेची जनुके आली ती केवळ वैदिक आर्यांची होती हे मतही योग्य नाही, भारतात या भागांतून स्थलांतर-आक्रमणे होण्याची परंपरा शक-कुशाण काळापर्यंत चालू असलेली आपल्याला ज्ञात इतिहासावरूनच दिसते.
खरे म्हणजे माणूस आपली पाळेमुळे शोधण्यासाठी खूप सजग असतो आणि त्यात वावगेही काही नाही. नवनव्या पुराव्यांनी आधीच्या समजुती बदलत राहतात. पण ही प्रक्रिया निकोप असावी लागते. जनुकीय शास्त्र या प्रक्रियेत मदत करणारे असले तरी ते परिपूर्ण आहे असा दावा करता कामा नये. कारण अजून पुरातन सांगाडे प्रकाशात आले व त्यांचे निष्कर्ष वेगळे निघाले तर आधीचे नि:ष्कर्ष बाद होऊन तोही शोधाचा एक टप्पा समजून पुढे जावे लागेल. शास्त्र असेच पुढे जात असते.
पुरातत्त्वविदांनी आपल्या शोधांतील निष्कर्षांशी प्रामाणिक असले पाहिजे ही अपेक्षा असते. पण डॉ. शिंदेंनी शोधनिबंधांत एक आणि जनतेला सांगायला मात्र आपली संघ अथवा कोणाच्याही मताने प्रभावित भलतेच दावे करावेत हे सर्वस्वी गैर आहे. त्यांनी अद्यापही माध्यमात प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या दाव्यांना नाकारलेले नाही किंवा ते दावे मागेही घेतलेले नाहीत यावरून शास्त्राची केवढी अप्रतिष्ठा होते आहे हे लक्षात यावे. सांस्कृतिक श्रेष्ठत्वतावादातून हा प्रकार घडत आला आहे हे उघड आहे. वाचकांनी सेल' आणि सायन्स'मधील मूळ शोधनिबंध वाचले पाहिजेत, मगच असल्या पोकळ दाव्यांवर विश्वास ठेवायचा की नाही हे ठरवले पाहिजे.
(Published in Divya Marathi, Rasik supplement)