Saturday, September 7, 2019

यंदा श्रीनगरमध्ये लाल चौकात अशी झाली बाप्पाची स्थापना!


image.png

श्रीनगरमध्ये लाल चौकात असलेल्या पंचमुखी हनुमान मंदिरात गणेशोत्सवाची गेली ३७ वर्ष सुरु असलेली परंपरा यंदा खंडित होण्याची शक्यता निर्माण झाली होती. लाल चौकाच्या परिसरातील सोनारांच्या दुकानांत कारागीर म्हणून सांगली-मिरज भागातील मराठी बांधव तेथे गेली अनेक दशके स्थिर झालेले होते. दरवर्षी सांगली-मिरजमधुन गणपतीची मूर्ती पाठवण्यात येत होती. पण यंदा ऑगस्ट रोजी घटनेचे कलम ३७० रद्द करण्यात आले संभाव्य असंतोषावर नियंत्रण ठेवता यावे म्हणून एक अभूतपुर्व परिस्थिती काश्मीरमद्ध्ये निर्माण झाली. संचारबंदी आणि मोबाईलसह सर्व इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्या. काश्मीरबाहेरच्या नागरिकांना परत जायला सांगण्यात आले. त्यामुळे लाल चौक परिसरातील बव्हंशी मराठी माणसं गावाकडे परतली. त्यात सांगली भागातील पुराने अनवस्था ओढवली. त्यात काश्मीर खो-यात खरोखर काय घडते आहे हेही कळायचे मार्ग बंद झाल्याने श्रीनगरला यंदा गणेशमुर्ती पाठवता येणार नाहे हे स्पष्ट झाले. श्रीनगरमधील सामाजिक कार्यकर्ते डॉ. अमित वांच्छू यांच्या ही परिस्थिती लक्षात येताच त्यांनी पुण्यातील सरहद या काश्मीरशी जोडल्या गेलेल्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार यांच्याशी कसाबसा संपर्क साधला. संजय नहारांनी हुतात्मा बाबू गेनू गणपती मंडळाच्या बाळासाहेब मारणेंचे सहकार्य मिळवले. गणेश श्रीनगरला निघायला सज्ज झाले. पण मूर्ती घेऊन जाणार कोण? काश्मीरमधील सद्यस्थितीबाबत वावड्याच जास्त उडत असल्याने भयाची एक लाट आहेच. शेवटी संजय नहारांनी मला सर्व स्थिती सांगितली. या स्थितीत परंपरा खंडित होऊ नये अशी माझीही भावना असल्याने मी त्याच दिवशी एक किरकोळ अपघातात सारे अंग शेकुन निघालेले असुनही लगेच निघायला तयार झालो. बाबू गेणू मंडळाकडून गणेश मूर्ती ताब्यात घेऊन दोन तासांत रात्री बारा वाजता विमानतळावर पोहोचलो.

गणेशमूर्ती शाडूची असल्याने तिला नाजूकपणेच हाताळावे लागणार होते. एयरपोर्टवरील कर्मचा-यांनी उत्तम सहकार्य केले आणि मुर्ती मांडीवर घेऊन प्रवास करण्याची परवानगी दिली. दिल्लीपर्यंत हे ठी होते. पण दिल्ली-श्रीनगर फ्लाईट्मध्ये हेच सहकार्य मिळेल काय याची साशंकता होती. कारण बव्हंशी मुस्लिम प्रवाशी. पण शेजारी बसलेल्या सद्गृहस्थांनी या बॉक्समध्ये गणेशमूर्ती आहे हे समजताच अत्यंत प्रेमाने माझ्याशी वार्तालाप केला. मला वेदना होत आहेत हे लक्षात येताच त्याने ती मूर्ती आपल्या मांडीवर घेतली आणि मला आराम करायला सांगितले. श्रीनगर विमानतळावर ट्रॉलीपर्यंत तोच मूर्ती घेऊन आला आणि माझ्यासोबत त्याचे सामान घेऊन त्ळाबाहेर आला. अमित वांच्छू मला घ्यायला आलेलेच होते. मूर्ती कारमध्ये ठेवेपर्यंत तो सोबतच राहिला. त्या सद्गृहस्थाचे नाव होते मोहंमद आस्लम.

काश्मीरचे लोक प्रेमळ आणि आतिथ्यशील आहेत हा माझा अनुभव १९९६ पासूनचा. पण या बदलेल्या स्थितीत काश्मीरींचा क्षोभ, संशयाचे वातावरण आणि अस्वस्थतेमुळे त्यांची प्रतिक्रिया पुर्वी होती तशीच राहील याची खात्री नव्हती. पण या साशंकतेला पहिला तडा या सद्गृहस्थाने दिला. श्रीनगरमध्ये चौज्का-चौकात निमलष्करी दलांचे जवान, सर्व दुकाने बंद. रस्त्यांवर तुरळक वाहने आणि पायी चालणारे नागरिक. सार्वजनिक वाहतून व्यवस्थाही बंद. एखाददुसरा हातगाडीवर फळे किंवा भाज्या विकणारा. एखाददुसराच ग्राहक. एकीकडे सरकारी आदेश आणि त्याविरुद्ध निघणारे हुर्रियतसारख्या फुटीरतावादींचे फतवे. या कात्रीत सापडलेले दुकानदार धोका पत्करायला नको म्हणून शक्यतो दुकाने बंदच ठेवतात आणि काही लोक शटर अर्धे उघडून  जमेल तेवढी विक्री करतात हे चित्र. कार्यालयांतही मोजकीच उपस्थिती. संपर्काची साधनेच नसल्याने बंदी असल्यासारखी अवस्था. अशा वातावरणात गणेशाची स्थापना कशी होईल आणि किती लोक येतील ही साशंकता.

साडेअकरा वाजता आम्ही लाल चौकात पोहोचलो. तेथे तर कडकडित बंद. झेलमच्या काठावरच पंचमुखी हनुमानाचे भव्य मंदिर. खरे तर हे मंदिर म्हणजे अनेक छोट्या मंदिरांचा समूह. म्हणजे साईबाबा, शिव ते राम-लक्ष्मणाचेही मंदिर या मंदिरातच. मुख्य मंदिर अर्थात हनुमंताचे. काळ्या पाषाणातील  ही मुर्ती...शक्यतो अन्यत्र पहायला मिळनारी. मंदिरात काही भावीक होते. मंदिराचे मूख्य महंत कामेश्वरनाथांनी आमचे अत्यंत उत्साहाने स्वागत केले. शेवटी गणेशोत्सवाची परंपरा अबाधित राहणार याचाच सर्वांना आनंद. लाल चौकासारख्या संवेदनश्वील ठिकाणच्या मंदिराला कधी अतिरेक्यांचा उपद्रव झाला होता काय हे विचारल्यावर ते हसून म्हणाले की येथे हनुमंताला पीर मानत त्याची पूजा करणारे असंख्य मुस्लिम आहेत. येथे आजतागायत एकदाही कसला उपद्रव झालेला नाही. काश्मीरमधील इस्लाम सुफी तत्वज्ञानावर चालतो आणि तो वेगळा आहे हे मला माहित होतेच.

गणपतीचे प्रतिष्ठापना करायची तर फुले, हार हवेतच. पण सारे बंद. हार आणायचे कोठून? मग दाऊद हकीम आणि अजहरने युक्ती लढवली. थोड्या वेळात येतो सांगून ते बाहेर पडले. उगवले परत ते दीड तासांनी. पिशवीत गुलाबाची फुले घेऊनच. मंदिरात बसून त्यांनीच हार ओवला. फुले आणली कोठून हा प्रश्न मलाही पडलेला. अमितने विचारल्यावर त्यांनी सांगितले, दोन-तीन घरांसमोरील बागांतून तोडून आनलीत. म्हटलं धन्य आहे.

तोवर जम्मु-काश्मीरचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सचीव श्री. पांडुरंग पोळे वेळ काढून आले होते. मग गणेश प्रतिष्ठापनेची सुरुवात झाली. मूर्ती आलीय ही वार्ता कळताच श्रीनगरमधील काही मंदिरांचे महंतही येऊन पोहोचले होते. भाविकांची गर्दी व्हायला सुरुवात झालेली होती. काश्मीरी पद्धतीने पूजा सुरु झाली. त्याच दिवशी "पन" नावाचा माता पार्वतीने गणेशाला निर्माण केल्याचा काश्मिरी सण. काश्मिरी शक पंचांगानुसार दोन्ही तिथी यंदा एकाच दिवशी आलेल्या. त्यामुळे आनंद-उत्साहाला उधान आलेले. यात काश्मीरी पंडित, वेगवेगळ्या प्रांतातील हिंदू बांधव, शीख आणि मुस्लिम सहभागी. मी म्हणालो...ही महाराष्ट्राने काश्मीरींना दिलेली प्रेम आणि सद्भावाची भेट. आणि काश्मीरी प्रथेनुसार प्रत्येक भाविकाच्या मनगटावर स्नेहाचा धागा बांधला जातो. हा एक वेगळाच अनुभव.

अशा रितीने श्रीगणेशाची संस्थापना होऊन दहा दिवसांच्या गणेशोत्सवाची सुरुवात झाली. संपुर्ण काश्मीरमध्ये मुस्लिम गणेश मुर्ती बसवू देत नाहीत आणि या वातावरणात तर नाहीच नाही या खोडसाळ समजुतीला छेद दिला गेला. लाल चौकात तर गणपती बसतच नाही कारण मुस्लिम बसवू देत नाही हेही एक धादांत असत्य. तेथे गेली सदतीस वर्ष नित्यनेमाने गणेशस्थापना होत आली आहे. यंदा केवळ बदललेल्या परिस्थितीमुळे गणेशस्थापना होण्याचा धोका निर्माण झाला होता. पण माणसे जोडणारे संजय नहार आणि राष्ट्रीय बांधीलकी जपणा-या हुतात्मा बाबू गेनू गणेश मंडळामुळे तेथील परंपरा अबाधित राहिली.

या उत्सवातच गेली सोळा वर्ष सहभागी होणारे दत्तात्रेय सुर्यवंशी आता महाराष्ट्रात आलेले आहेत. ते म्हणाले. "या गणेशोत्सवात काश्मिरी मुस्लीम, पंडित, शिख तसेच बंगाली इतर राज्यातील करागीरही सहभाग घेत आले आहेत. तेथील नागरिक खूप चांगले आहेत. आमचे सर्वांशी आपुलकीचे नाते आहे." काश्मीरमधील ही गंणेशस्थापना तेही एका विशिष्ठ स्थितीत व्हावी आणि तीही एवढ्या आनंददायी वातावरणात ही बाब महत्वाची घटना आहे. काश्मीरी नागरिकांबद्दल सोयीस्कर समज-गैरसमज बाळगणे अन्यायकारक आहे. एकतेचा हा संदेश सर्वांनी नीट समजाऊन घेतला पाहिजे.

-संजय सोनवणी

(published in daily Samna, Utsav supplement)






































No comments:

Post a Comment

जनानखान्यांचे अद्भुत विश्व!

  जनानखाना, ज्याला अंत:पूर, राणीवसा किंवा हरम असेही म्हटले जाते त्याबाबत समाजामध्ये अनेक समजुती प्रचलित आहेत. शत्रूच्या जिंकलेल्या स्त्रीय...