हलिमाबी कुरेशी
श्रीनगरच्या लाल चौकात गणेशोत्सव साजरा केला जातो, वाचून अनोखं वाटतंय ना? पण हे खरं आहे.
काश्मीर म्हटलं की तणाव, पोलीस, लष्कर हे चित्र नेहमी समोर येतं. पण काश्मीरच्या लाल चौकात अतिशय भक्तिभावाने गणपती बाप्पाची स्थापना केली जाते. दहा दिवस अतिशय आनंदोत्सवात गणेशोत्सव साजरा केला जातो.
या उत्सवात काश्मिरी मुस्लीम, पंडित, शीख, बंगाली आणि मराठी माणसांचा मोठा सहभाग असतो. लाल चौकात असलेल्या पंचमुखी मारुती मंदिरात गणेशोत्सवात गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. गेल्या 37 वर्षांपेक्षा जास्त कालावधी पासून ही परंपरा असल्याची माहिती श्रीनगरचे अमित वांछो देतात.
गणपती उत्सव हा प्रामुख्याने महाराष्ट्रातील महत्त्वाचा उत्सव मानला जातो. मग श्रीनगरमध्ये गणेशोत्सव कसा असा प्रश्न आपल्या पडणं साहजिकच आहे.
सांगलीतील सूवर्णकारांचा पुढाकार
सांगली जिल्ह्यातले सोने -चांदीच्या दागिन्यांचे कारागीर गेल्या साठ वर्षांपासून श्रीनगरमध्ये व्यवसायानिमित्त राहतात. लाल चौकातील हरिसिंग हायस्ट्रीटजवळ मोठी सराफ पेठ( ज्वेलरी मार्केट) आहे. याच मार्केटमध्ये मराठी कारागीर सोनं रिफायनींगचं काम करतात.
श्रीनगरसहित संपूर्ण जम्मू काश्मीरमध्ये जवळजवळ शंभर महाराष्ट्रीयन कुटुंब राहतात. त्यांनीच लाल चौकातल्या हनुमान मंदिरात गणेशोत्सव साजरा करण्याची सुरुवात झाली. गणपती म्हणजे विघ्न दूर करणारा, सुख शांती देणारा, त्यामुळे काश्मीरमध्ये गणपतीचं आगमन आनंद देणारं, चेतना निर्माण करणारं असल्याची भावना अमित वान्छो व्यक्त करतात.
सराफ पेठेतील बहुतांश कारागीर हे सांगली, माण, खटाव, कडेगाव ,पलूस, सांगोला या तालुक्यांमधले आहेत. हे कारागीर वर्षभर काम करतात हिवाळ्यात डिसेंबरअखेरीस महाराष्ट्रात परत येत असतात. यंदा मात्र 370 कलम रद्द झाल्यानंतर अनेक कारागीर वेळेआधीच महाराष्ट्रात परतले.
त्यात सांगलीतील परतलेले कारागीर अतिवृष्टी मुळे संपर्कात नव्हते. अनेकजण पुरात अडकले होते. तसंच काश्मीरमध्ये संपर्क बंद होता. त्यामुळे कोणाचाच संपर्क होत नव्हता.
पुण्यातून गेली गणेशमूर्ती
अशा स्थितीमुळे यंदा गणपतीची स्थापना होईल की नाही अशी शंका श्रीनगरमध्ये होती. कारण दरवर्षी मूर्ती महाराष्ट्रातून आणली जायची. यंदा ही परंपरा खंडित होईल की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती.
श्रीनगरमधील सामाजिक कार्यकर्त्यांनी पुण्यातील सरहद संस्थेच्या संजय नहार यांच्याशी संपर्क साधला. संजय नहार यांनी मूर्ती महाराष्ट्रातून पाठवण्याच ठरवलं. पुण्यातील बाबू गेणू गणपती मंडळाने ही मूर्ती दिली. सामाजिक कार्यकर्ते काश्मीरचे अभ्यासक संजय सोनवणी यांनी ही मूर्ती श्रीनगरला पोहोचवली.
"लाल चौकाची जी प्रतिमा तयार करण्यात आलीय, ते पाहता लाल चौकातील गणेशोत्सव म्हणजे सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय ऐक्याचं प्रतिक आहे," अशी भावना सरहदचे संस्थापक संजय नहार यांनी व्यक्त केली.
"मराठी माणसं लाल चौकात राहणं आणि तिथल्या सामाजिक जीवनाशी एकरूप होणं ,सध्याच्या परिस्थितीत मोठी गोष्ट आहे, त्यामुळे या गणेशोत्सवात खंड पडू नये या भावनेतून मूर्ती काश्मीरला पाठवली गेली," असं सोनवणी सांगतात.
संजय सोनवणी रविवारी रात्री मूर्ती घेऊन काश्मीरमध्ये पोहोचले.
"मूर्ती आल्याने सर्वांना आनंद झाला. अजून काही मराठी कुटुंब तिथे थांबली असून संपर्क साधता येत नसल्याने त्यांना त्रास होत आहे," असं संजय सोनवणी यांनी सांगितल.
"सध्या काश्मिरी पंडित 'पन' हा पार्वती देवीचा सण साजरा करतात, पार्वतीने गणपतीला जन्म दिला म्हणून पार्वतीची पूजा केली जाते,आणि यंदा गणपती उत्सव देखील याच काळात आल्याने मोठा उत्सव साजरा केला जातोय," सोनवणी यांनी सांगितलं.
दत्तात्रय सूर्यवंशी गेल्या 16 वर्षांपासून श्रीनगरमधील गणेशोत्सवात सहभागी होत आहेत. "जवळजवळ 200 पेक्षा जास्त मराठी माणसं जम्मू काश्मीरमध्ये वास्तव्यास आहेत. 370 कलम रद्द केल्यामुळे आता मार्केट बंद आहे. यामुळे आम्ही परत आलो, भीतीने नाही," सूर्यवंशी सांगत होते.
"इतक्या वर्षांच नातं आहे काश्मिरींशी. मी स्वतः 16 वर्षांपासून गणेशोत्सव पाहतोय, तिथले काश्मिरी मुस्लीम, पंडित, शीख तसंच बंगाली कारागीर गणेशोत्सवात सहभागी होतात. तिथले लोक खूप चांगले आहेत, इतक्या वर्षांपासून जातोय तिथे सर्वाशी आपुलकीचं नातं आहे," दत्तात्रय सूर्यवंशी गहिवरून बोलत होते.
मराठी माणूस गेल्या साठ वर्षांपासून श्रीनगर बरोबर जम्मू काश्मीरमध्ये राहतोय. त्यांच्या मुलांचं शिक्षण देखील काश्मीरमध्येच होत आहे. दहावी नंतरचं शिक्षण महाराष्ट्रात घेतल जातं.
अनेक मराठी कारागिरांना उर्दू बरोबर काश्मिरी भाषा देखील येते. गणेशोत्सवात महाप्रसाद केला जातो. मराठी माणसं वर्गणी काढून गणपती बसवायचे, यंदा मराठी माणसं नसल्याने काश्मिरी मुस्लीम, पंडित, शीख पुढाकार घेऊन गणेशोत्सव साजरा करत आहेत.
No comments:
Post a Comment