सध्याचा काळ हा वैचारिक दुष्काळाचा काळ मानला जातो. जे विचारवंत सध्या अस्तित्वात आहेत ते जुन्याच विचारांच्या व्युहात गोल गोल फिरताना दिसतात आणि त्यांनाही पुढे न नेता उलट गढूळ करण्याच्या प्रयत्नात लागलेले दिसतात. त्यामुळे की काय किंवा वैचारिक अनारोग्याची कोरोनासारखी साथ आलीय म्हणून की काय आजचे समाजजीवनही उथळ विचारांवर आरुढ झालेले आहे. त्यात समाजमाध्यमांमुळे सहज अभिव्यक्तीची संधी मिळत असल्यामुळे झटपट विचारवंत होणेही सोपे झाले आहे आणि यातुनच अविचार्यांची झुंडशाही फोफावत असल्याचे चित्र आपल्याला दिसते; पण त्यावरही विचार करत मार्ग काढण्याची प्रवृती कोणात राहिली नसल्याने वैचारिकतेचाच समूळ र्हास होतो आहे हे आपण लक्षात घ्यायला हवे. समाजात जर काही न्यून असेल तर त्याचे मुख्य कारण प्रगल्भ, अग्रगामी आणि बहुआयामी परिवर्तनवादी विचारांचे सहअस्तित्व यांचा अभाव असणे हे असते.
परंतु आपल्याकडे मुळातच वैचारिक दुष्काळ असलेल्या काळात घनश्याम पाटील या तरुण संपादकाचे नुकतेच प्रकाशित झालेले ‘दरवळ’ हे पुस्तक एखादी का होईना वैचारिक सर आल्याचा दिलासा देते. विविध लेखांतून विचारांना प्रवृत्त करते. अविचारावर कोरडे ओढते. गतकाळातील स्वामी विवेकानंदांसारख्या महनीय व्यक्तींबाबत आदर दाखवताना त्यांच्यापासून नेमके काय विचारमूल्य घ्यायचे हे सांगत ते पुढे काय या प्रश्नाला भिडतात आणि नवी विचारवाट निर्माण करण्यासाठी सज्ज होतात. ‘दरवळ’ पुस्तकातील पंचवीस लेखांपैकी बव्हंशी लेख हे सामजिक तळमळीतुन अगदी आतून आलेले आणि नवविचारांच्या पालवीने फुलारले गेलेत.
समाजमाध्यमांच्या विस्फोटामुळे प्रतिक्रियावादाला उधाण आलेले आहे हे आपण पाहतो. ट्रोल केले जाणे हे आता सामान्य लेखकांबाबतही होऊ लागलेले आहे. प्रत्येक दुर्दैवी घटनेत आधी पिडिताची जात पाहणे ही विकृती सार्वत्रिक झाली आहे. त्यावरही पाटील विवेचन करतात. ते तरुण आहेत. शैली अनेकदा आक्रमक होते पण त्यामागील कळकळही सहज लक्षात येत असल्याने कोणालाही राग येणार नाही. स्वत: प्रकाशक असूनही ते ‘साहित्यिक दहशतवाद’ या मराठीत गेल्या दोनेक दशकांत उद्भवलेल्या अपप्रकारावरही तुटुन पडतात आणि ‘साहित्यिक जीवनव्रती निर्माण व्हावेत’ या लेखातुन ते साहित्यिकांसाठीच काही मार्गदर्शक तत्त्वे सांगतात.
पुण्यात नाटककार राम गणेश गडकरी यांचा पुतळा उखडून विटंबित करण्यात आला. मी तेव्हा या प्रकाराला माध्यमांतून-भाषणांतून ‘तालीबानी’च म्हटले होते. मागे एकदा वारकर्यांनी ‘संतसूर्य तुकाराम’ या कादंबरीवरुन ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादवांना साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड होऊनही त्यांना संमेलनालाच उपस्थित राहू दिले नव्हते. ती कादंबरीही मागे घ्यायला लावली होती. साहित्यिक कलाकृतींची चिकित्सा, समीक्षा करण्याचे वा ते वाचण्या-न वाचण्याचे स्वातंत्र्य लोकाना उपलब्ध असताना जेव्हा असे प्रकार घडतात ते आमचा वैचारिक इंडेक्स किती ढासळलेला आहे याची चुणूक दर्शवतात. यादव प्रकरणात भलेभले मराठी सारस्वत मूग गिळुन बसले होते. तेव्हा फक्त मी आणि पाटील यांच्यासारखे मोजके अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या महत्तेबद्दल बोलत वारकर्यांच्या तालीबानी वर्तनाचा निषेध केला होता. राम गणेश गडकरींनाही जातीय कोंदणात अडकावण्याचा प्रयत्न झाला.
औंरंगजेबाचा भाऊ दारा शुकोहलाही केवळ धर्माच्या चौकटीत ढकलत त्याला शक्यतो अज्ञातातच ठेवण्याची प्रवृत्ती नवी नाही. शेख महंमदासारखे संतकवी दुर्लक्षित तर राहतातच पण समर्थ रामदासांची हिंदू-मुस्लिम ऐक्याची महती सांगणारी मुसलमानी अष्टकेही विस्मृतीत ढकलली जातात कारण रामदासांना बहाल केलेल्या हिंदुत्त्ववादी प्रतिमेशी ते विसंगत आहेत. ही साहित्यिक, कवी, संतांशी प्रतारणा आहे याचे भान मात्र कोणाला नसते. ‘दरवळ’मधील ‘ही तर मेकॉलेचीच अवलाद!’ या लेखात गडकरी पुतळा विटंबनाच्या निमित्ताने महाराष्ट्रात काही जातीय कट्टरतावादी संघटनांच्या असल्या समाजविघातक कृत्यांवर कोरडे ओढलेले आहेत.
‘राहिले’लं राहूच द्या!’ या लेखातुन घनश्याम पाटील यांच्या मराठवाड्यातील किल्लारी या भूकंपग्रस्त भागातून येऊनही कमी वयात केलेल्या संघर्षाची हृद्य कथा येते पण त्यात जी उमेद, आकांक्षा आणि साहित्यात काहीतरी नवे करेल ही जी उमेद दिसते तिला तोड नाही. किंबहुना पाटील असे कसे घडले याचे मानसशास्त्रीय विवेचन त्यातून सहज करता येते. पुस्तकातील काही लेख हे खरे तर लेखाचे विषय नसून त्यावर हीच भूमिका कायम ठेवत सैद्धांतिक मांडणी करणारी स्वतंत्र पुस्तके होऊ शकतील असे आहेत. साहित्यिक, सांस्कृतिक, वैचारिक आणि प्रतिक्रियावाद्यांचा दहशतवाद हा एक असा विषय होऊ शकतो. ही प्रवृत्ती आता धोक्याची पातळी ओलांडून चुकली आहे. त्याचे सखोल विवेचन होणे आवश्यक आहे.
घनश्याम पाटील यांचा एक दृष्टीकोन आहे. प्रत्येक लेखकाचा दृष्टीकोन त्याचे समाज-सांस्कृतिक पर्यावरण आणि स्वत:चे आकलन यातून विकसित होत असतो. साहजिकच त्यात त्याचे स्वपण डोकावतेच. अनेक लेखक या स्वचा हात सोडून कोणा तथाकथित महान विचारवंत-लेखक-कवींच्या प्रभावाखाली येतात आणि स्व-विचारांची हत्या करतात हे अलाहिदा पण हे लेखन घनश्याम पाटील यांच्या स्व वर कोणाचाही प्रभाव नाही ही बाब ठळक करते. राहिला प्रश्न त्यांनी घेतलेल्या दृष्टीकोनाचा. तो वेगळा असला तरी समाजाप्रती असलेल्या आस्थेतुन, कळवळ्यातुन आला आहे आणि मुळात त्यांची शैलीच संवादात्मक असल्याने ती थेट भिडते. यातील विचारांना विरोध करायचा असेल तर तो तेवढ्याच वैचारिकतेतुन करावा लागेल. सर्व वाचकांनी आपापल्या परीने या पुस्तकातील वैचारिक दिशादिग्दर्शनाची आपापल्या मगदुराप्रमाणे मीमांसा करत पुढील वाटचाल ठरवावी अशी अपेक्षा आहे.
आम्हाला सर्वच वाईटाचा विरोध करावा लागेल. सर्वच गोष्टींचे विश्लेषण तटस्थपणे करावे लागेल. नाहीतर ब्रिगेडने हल्ले केले, तोडफोड केली तर ते तालीबानी आणि एम. एफ. हुसेनच्या चित्रांची नासधुस करणारे बजरंगदलीय संस्कृती रक्षक असले सरधोपट सापेक्ष आकलन करुन आम्हाला चालणार नाही आणि नेमका हाच आशय ‘दरवळ’मधून आला आहे. खरे तर ही आमच्याच दुतोंडी प्रवृत्तीला एक चपराक आहे. त्याच वेळेस तरुण आपल्या समाजाच्या इतिहास, वर्तमान आणि भविष्याकडे कोणत्या दृष्टीने पाहत आहेत याचाही हा एक आरसा आहे जो तथाकथित ज्येष्ठांच्या डोळ्यांत अंजन घालणारा आहे.
दरवळ
लेखक - घनश्याम पाटील
प्रकाशन - चपराक, पुणे (7057292092)
पाने - 128, मूल्य - 200
मुखपृष्ठ - संतोष घोंगडे
लेखक - घनश्याम पाटील
प्रकाशन - चपराक, पुणे (7057292092)
पाने - 128, मूल्य - 200
मुखपृष्ठ - संतोष घोंगडे
-संजय सोनवणी