Sunday, February 7, 2021

आर्य हे आक्रमक, स्थलांतरित कि शरणार्थी?

 



मध्य आशियातील गवताळ प्रदेशातून आर्य वंशाच्या पराक्रमी आणि सांस्कृतिक दृष्ट्या पुढारलेल्या लोकांनी गटागटाने बाहेर पडत भारत ते युरोप असा अवाढव्य मुलुख व्यापला, त्यांनी स्थानिकांवर विजय मिळवून त्यांच्यावर आपली पुरा-इंडो-युरोपियन भाषा व संस्कृती लादली असा सिद्धांत गेली पावनेदोनशे वर्ष जागतिक पातळीवर नुसत्या चर्चेत नाही तर त्या सिद्धांताने हिटलरसारख्या कृरकर्म्यालाही जन्माला घातले आहे. त्यानंतर आर्य हा शब्द “वंश” म्हणून वापरायचे बंद झाले असले तरी आर्यभाषागट सिद्धांत या नावाने तो आजही चर्चेत असतो. संस्कृत भाषेचे जन्मदाते आर्य असून भारतातील (व आशिया ते युरोपमधील) भाषा या आर्यभाषा प्रभावीत आहेत असे हिरीरीने सांगण्याचा प्रयत्न केला जातो. या सिद्धांतात आक्रमण, स्थलांतर असे अनेक बदल केले गेले असले तरी मुळ सिद्धांत कि आर्य हेच सर्व संस्कृतीचे जन्मदाते आहेत कथनात मात्र बदल केला जात नाही. फार फार तर आर्यांनी स्थानिकांवर सत्ता गाजवणे सोपे जावे यासाठी त्यांच्याकडून काही सांस्कृतिक उधा-या केल्या असे सांगितले जाते. उदा. अनार्यांचा सहवास उपयुक्त वाटला म्हणून एतद्देशियान्चा शिव आर्यांनी स्वीकारला व त्याला पावन करून घेतले असे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी आपल्या “वैदिक संस्कृतीचा विकास” या ग्रंथात म्हटले आहे.

खरे तर आर्य या टोळीपरत्वे अर्थ बदलत्या सज्ञेखाली वावरणारे अनेक गट मध्य आशियात होते हे सत्य आहे. ते अवेस्ता आणि ऋग्वेद या ग्रंथात येणा-या असंख्य उल्लेखांवरून स्पष्टही होते. याच भागातील किमान ४० टोळ्यांचा उल्लेख दोन्ही ग्रंथात येतो. शत्रू टोळ्यांना ते अनार्य घोषित करत. उदा दाशराद्न्य युद्धात जेंव्हा ऋग्वेदातील महत्वाची पुरू टोळी शत्रू गटात गेली तेंव्हा तिची संभावना अयज्जू (यज्ञ न करणारे) व अनार्य म्हणून केली गेली. झरथुस्ट्र तर एकाच वेळीस स्वत:ला दस्यूही म्हणे आणि आर्यही. म्हणजे प्रत्येक टोळी अथवा धर्माने आर्य, अनार्य, दास-अस्यु या संज्ञा वेगवेगळ्या अर्थाने वापरल्या असे दिसून येईल.

आजकाल संघपुरस्कृत विद्वान वैदिक धर्माचे निर्माते भारतीय मुळाचेच आहेत असे सांगण्याचा हिरीरीने प्रयत्न करत असतात. सिंधू संस्कृतीचे निर्मातेही वैदिक आर्यच असे प्रतिपादन करून आपले सांस्कृतिक वर्चस्व कायम ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. पण त्याला खुद्द ऋग्वेद व त्याच्याच समकालीन लिहिला गेलेला अवेस्ता कसलेही समर्थन पुरवत नाहीत. याचे कारण म्हणजे अवेस्ता आणि ऋग्वेदात येणारा भूगोल समान असून टोळ्यांची नावेही समान आहेत. आर्य, परशु, पार्थ, तुरीया (तुर्वसा) पख्त, भलानस यासारख्या टोळ्यांचे प्रदेश आपण अरिया, पर्शिया, पार्थिया, तुराण, पख्तुनीस्तान, बोलन खिंडीचा प्रदेश या नावावरून सहज ओळखू शकतो. याचाच अर्थ ऋग्वेद व अवेस्त्याचा भूगोल हा मध्य आशिया आणि आजचा अफगाणिस्तान आहे. ऋग्वेदात जशी सरस्वती आहे तशीच ती अवेस्त्यानेही हरेवेती या नावाने उल्लेखलेली आहे. ही नदी आजही सिस्तान खो-यातून वाहते व तिचे आधुनिक नाव हेलमंड आहे.

या दोन्ही धर्मात अग्नी हाच केंद्रबिंदू असून पारशी धर्माचा यस्न आणि वैदिक धर्माच्या यज्ञात कर्मकांडात्मक काही फरक असला तरी मूळ गाभ्यात काही फरक नाही. नोढस गौतम हा ऋग्वैदिक ऋषी पारशी धर्माचा संस्थापक झरथुस्ट्राशी विवाद करायला गेला होता हा उल्लेख अवेस्त्यात आला आहे. या दोन धर्मात (व अन्यही टोळीधर्मांत) वर्चस्वासाठी संघर्ष होतेच. झरथुस्ट्राचा धर्म असुरकेंद्रित असल्याने ऋग्वेदात जे देव-असुर संघर्षाचे उल्लेख येतात ते या दोन धर्मातील संघर्षांचे रुपकमय विवरण होय असे विद्वान मानतात.  

झरथुस्ट्री धर्माला आधी विश्तास्पासारखा राजा आश्रयदाता म्हणून मिळाल्याने धर्माची वाढ होत गेली. हा राजाही ईश्ताश्व या नावाने ऋग्वेदात अवतरतो. इतकेच काय झरथुस्ट्राचा अंत अग्नीमंदिरात जळून झाला या घटनेचा उल्लेखही तीनदा ऋग्वेदात आला आहे.

अवेस्त्याची भाषा आणि ऋग्वेदाची भाषाही बरेच साम्य दाखवते. पुढे भारतात आल्यावर येथील प्राकृत भाषांचा संस्कार होऊन एक वेगळीच संकरीत भाषा निर्माण झाली. मागील लेखात याबाबत आपण चर्चा केलेलीच आहे. भाषिक, भौगोलिक व ऐतिहासिक घटनांमधील साम्ये पाहता वैदिक धर्माचा जन्म भारतात झाला असल्याची सुतराम शक्यता नाही हे उघड आहे. मग हा धर्म आणि त्या धर्माचे मुळ लोक भारतात कसे आले? आक्रमक म्हणून कि शरणार्थी म्हणून? या दोन प्रश्नांवर आपल्याला थोडक्यात विचार करायचा आहे.

त्या काळात कोणतेही धर्म वाढत ते राजाश्रयाने किंवा युद्धात विजय मिळवून आपला धर्म लादल्यामुळे. दाशराद्न्य युद्धाचा मुळ हेतूही धर्मप्रसार होता. या युद्धात वैदिक सुदास राजा विजयी झाला असला तरी वैदिक धर्माला मात्र नंतरच्या काळात उतरती कळा लागली. द्रुह्यु, पर्शु आणि पुरु टोळ्या एके काळी वैदिक धर्माचे सहायक होते. नंतर त्यांनी वैदिक धर्माचा त्याग केला. नंतरच्या ऋग्वेद आणि वैदिक साहित्यातून यातील टोळ्यांचे उल्लेख गायब झाल्याचे तर दिसतातच पण खुद्द पुरुंबाबतही अनादरच व्यक्त करण्यात आला आहे. सुदासाच्या काळात वैदिक धर्माचा –हास झाल्याने नंतरच्या वैदिक साहित्यातून त्याचीही उचलबांगडी करण्यात आली. मनुस्मृती तर त्याला तिरस्काराने “शुद्र” (म्हणजे अनार्य) म्हणते. या युद्धानंतर वैदिकांवर एवढी अवनती कोसळली कि नंतरच्या काळात वैदिक ऋषींना ज्या पणींचा द्वेष केला त्यांच्याकडुनच दाने स्विकारायची वेळ आलेली दानस्तुतींवरुन दिसते. 

 

पण याच काळात झरथुस्ट्री धर्म मात्र वाढत्या राजाश्रयाने पसरत चालला होता. झामयाद यस्टमध्ये जो भुगोल विस्ताराने आला आहे तो सिस्टन प्रांताचा आहे. याच प्रांतातुन हेल्मंड (सरस्वती) नदी वाहते. तिच्या जलक्षेत्राची सखोल माहिती यात येते. ही नदी हमाऊन (ऋ. समुद्र) या तळ्यात विसर्जित होते. याशिवाय या नदीच्या परिसरात असलेले पर्वत व अन्य प्रदेशांचीही माहिती यात येते. हिंदुकुश पर्वत मध्याला, बाजुलाच अरिया, मार्जियाना, ड्रांगियाना आणि भारत-इराण सीमेवरील गांधारपर्यंत हा भुगोल यात आलेला आहे. याचाच अर्थ असा की झामयाद यस्टच्या काळात झरथुस्ट्री धर्माने दक्षीण अफगाणिस्तानवरही, म्हणजेच वैदिकांच्या मुळ आश्रयस्थानावरही वर्चस्व मिळवले होते त्याशिवाय अन्य अवेस्त्यात न येनारी एवढी सखोल माहिती आली नसती. पुढे झरथुस्ट्री धर्माची व्याप्ती पर्शियापर्यंत झालेली दिसते. 

म्हणजेच वैदिकांचे मुळ स्थानही आता झरथुस्ट्री धर्माने व्यापले होते. अनेकांनी त्या धर्मात प्रवेश केला तर जे वैदिकाभिमानी होते त्यांनी मूळ स्थान सोडायला सुरुवात केली. शतपथ ब्राह्मणाने (श. ब्रा. १.४.१, १४-१७) नोंदवले आहे कि विदेघ माथव या राजाने आपल्या गौतम राहूगण  या पुरोहितासह सरस्वती (हेलमंड) नदी सोबत अग्नी घेऊन सोडली आणि हिंदुकुश पर्वत (उत्तरगिरी) पार करून सिंधू नदीच्या पार हे लोक एका नदीजवळ आले. या नदीच्या पुर्वेला उजाड व दलदलीच्या प्रदेशात त्यांनी वस्ती केली. ही कथा वैदिक धर्मीय भारतात कसे आले याची कथा रूपकात्मक वैदिक शैलीत सांगते. 

सरासरी इसपू बाराशेच्या आसपास ही घटना घडली असे अन्दाजीता येते. वैदिक धर्मीय आपली संस्कृती घेऊन येथे आले ते आक्रमक म्हणून नव्हे तर शरणार्थी म्हणून. नंतर इस्लामी आक्रमणामुळे झरथुस्ट्री धर्माच्या अनुयांनाही जसा भारतात आश्रय घ्यावा लागला तसेच प्राचीन काळी वैदिक धर्मियांबाबत घडले होते आणि त्याचे लिखित पुरावे उपलब्ध आहेत. पण त्याकडे दुर्लक्ष करून वैदिकांना सर्वसमर्थ ठरवण्यासाठी आर्य हा वंश नसतांनाही त्यांना आर्यवंशी ठरवायचा प्रयत्न करत येथील भाषा व संस्कृती ही वैदिकोद्भव आहे असे सांगण्याचा जो प्रयत्न होतो तो इतिहास या सज्ञेचाच अवमान करणारा आहे. यामुळे भारताचे सांस्कृतिक आकलनच दुषित झालेले आहे. हा धर्म भारतात कसा पसरला आणि वैदिक येथे येण्यापूर्वी देशातील धार्मिक व सांस्कृतिक स्थिती काय होती याची चर्चा आपण पुढील लेखात करू.

-संजय सोनवणी

 

No comments:

Post a Comment

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...