Saturday, January 23, 2021

आधी संस्कृत की प्राकृत?...एक भाषिक संघर्ष!

 


 

भाषा हे कोणत्याही संस्कृतीचे अविभाज्य असे अंग असते. प्रत्येक संस्कृतीला आपली भाषा श्रेष्ठ आहे असे वाटणे सांस्कृतिक अहंकाराचा एक मानवी भाग मानला तरी अगदी आधुनिक काळातही भाषेला वर्चस्ववादाचे हत्यार म्हणून निरलसपणे वापरले जात असल्याचे आपण पाहतो. या वर्चास्ववादापासून युरोपियनाही मुक्त राहिले नाहीत आणि काही भारतीय समाजघटकही. संस्कृत हीच आद्य भाषा आहे, तिच्यापासूनच आजच्या इंडो-युरोपियन किंवा आर्य भाषा निर्माण झाल्या हा सिद्धांत गेली पावनेदोनशे वर्ष प्रचलित करण्यात आलेला आहे. भारतातील प्राकृत भाषाही संस्कृतमधूनच निघाल्या म्हणून त्या मिडल इंडो-युरोपीयन भाषा आहेत असे म्हटले जाते. साहजिकच आजच्या बोलीभाषा दुय्यम तर ठरतातच त्यांचे जनकत्व आर्यांकडे दिले जाते. थोडक्यात आजची भारतीय संस्कृती आर्य प्रभावित असून त्यात अनार्यांचा वाटा (म्हणजेच हिंदुंचा वाटा) अगदीच नगण्य आहे असे जतावन्याचा प्रयत्न करून भाषिक वर्चस्वतावाद निर्माण केला गेला आहे हे आपल्या लक्षात येईल.

     खरे तर हा सिद्धांत जन्माला घातला गेला तो ब्रिटीशांना येथे “आर्य” (म्हणजेच भारतातील वैदिक धर्मीय) जमातींशी सख्य करून राज्य चालवणे सोपे जावे म्हणून. त्यात ते ब-याच प्रमाणात यशस्वीही झाले. पण हिटलरमुळे आर्य शब्द बदनाम झाल्याने युरोपियनांनी आपले सांस्कृतिक वर्चस्व टिकवण्यासाठी आर्य शब्द वगळत “इंडो-युरोपियन भाषा सिद्धांत” असे नामांतर करत मुळचा आर्य सिद्धांत मात्र कायम ठेवला. त्याचे भाषिक दुष्परिणाम असे झाले की बहुंख्य लोकांमध्ये भाषिक न्यूनगंड निर्माण झाला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा न मिळण्यामागे मराठी संस्कृतोद्भव आहे, मुळची स्वतंत्र भाषा नाही या सिद्धांताचा प्रभाव हेच कारण आहे.

पण वास्तव काय आहे? इतिहासाची मोडतोड करत केवळ वर्चस्ववादासाठी शेंडा-बुडुख नसलेले सिद्धांत जन्माला घालणे हा अनेक युरोपियन  विद्वानांचा जसा उद्योग आहे तसाच येथील स्वत:ला आर्य समजणा-या वैदिक धर्मियांचाही अवाढव्य  उद्योग आहे.

पण वास्तव असे आहे की संस्कृत ही जशी मुळची भाषा नाही तसेच वेदही जगातील आद्य धार्मिक वाड्मय नाही. वेदांची निर्मिती इसपू १५०० मध्ये झाली असे मानले जाते. त्याहीपुर्वीचे इसपू २४०० मधील पिर्यमिडमद्ध्ये कोरलेले "पि-यमिड टेक्स्ट"  (Pyramid Texts) हे सर्वात प्राचीन व लिखित स्वरुपात असलेले धार्मिक साहित्य आहे. पारशी धर्माचा “अवेस्ता” या ग्रंथातील गाथा हा भाग ऋग्वेदापेक्षा प्राचीन असल्याचे मायकेल वित्झेल यांनी सिद्ध केलेले आहे. बरे, ऋग्वेदाची भाषाही स्वतंत्र नसून तिच्यावर अवेस्ताच्या भाषेचा जसा प्रभाव आहे तसाच तो प्राकृत भाषा आणि व्याकरणाचाचाही प्रभाव आहे. बरे, संस्कृत भाषा आणि वैदिक भाषा या दोन अत्यंत वेगळ्या भाषा आहेत हेही येथे लक्षात घ्यावे लागते.

भाषातद्न्य जे. ब्लोख म्हणतात की ऋग्वेदातील दहावे मंडल वगळता उर्वरित भागाचा अभ्यास केला असता असे लक्षात येते कि त्यावर अनेक भाषिक संस्करणे झालेली आहेत. ऋग्वेदाच्या संपादकांनी अन्य धार्मिक साहित्याच्या भाषेला व बोलीभाषांना काही प्रमाणात तरी आपलेसे केलेले दिसते. अशा भाषिक उधारीची अनेक उदाहरणे ऋग्वेदात आहेत.

प्राकृत भाषांतील अनेक शब्द व प्रत्यय संस्कृतपेक्षा वैदिक भाषांशी अधिक मेळ खातात. प्राकृत जर संस्कृत भाषेतून उत्पन्न झाली असती तर असे झाले नसते. वैदिक भाषा व प्राकृत भाषा पुरातन प्राकृतातुनच उत्पन्न झाल्या असाव्यात कारण त्याशिवाय असे साम्य आढळून आले नसते. वैदिक भाषेत ऋकाराऐवजी उकार, (वृंदऐवजी वुंद) अनेक ठिकाणी होणारा वर्णलोप (उदा. दुर्लभ ऐवजी दुलह) इत्यादि. वैदिक भाषा ही संस्कृताशी समकक्ष नसून प्राकृताशी समकक्ष अथवा प्राकृतसमान आहे असे हरगोविंददास टी. सेठ सप्रमाण दाखवून देतात.

वैदिक आर्य भारतात आल्यानंतर अन्य युरोपियन भाषांत नसलेले पण प्राकृतात असलेले मूर्धन्य ध्वनी वैदिक भाषेत घुसले. वैदिक भाषा हीच मुळात भारतात आल्यावर एक संकरीत भाषा बनली. एवढेच नव्हे तर ऋग्वेदाच्या अनेक संपादकांनी वेळोवेळी त्यावर अनेक संस्कार केले. अगदी पाणीनीला उपलब्ध असलेले वेद आणि आज असलेले वेद यातही बराच फरक आहे, म्हणजे संपादनाचे काम नंतरही सुरूच राहिले असे माधव देशपांडे यांनी सप्रमाण दाखवून दिले आहे. पाठांतराने वेद हजारो वर्ष जसेच्या तसे जतन केले या मतात कसलेही तथ्य नसून ती केवळ एक अंधश्रद्धा आहे हे उघड आहे.

संस्कृत भाषा इसपू २०० ते इसवी सनाच्या दुस-या शतकापर्यंत प्राकृतांतूनच ग्रांथिक कारणासाठी विकसित करण्यात आली याचे अनेक ग्रांथिक, नाणकीय व शिलालेखीय पुरावे उपलब्ध आहेत. इसवी सनाच्या दुस-या शतकातील राजा रुद्रदामनचा शिलालेख हा पहिला संस्कृतच्या अस्तित्वाचा पुरावा असून त्याआधी ना संस्कृतचा किंवा ना वैदिक भाषेचा कसलाही लिखित पुरावा उपलब्ध. अगदी वैदिक यज्ञ केल्याबाबतचे जे दोन शिलालेख उपलब्ध आहेत तेही प्राकृतात आहेत, संस्कृत अथवा वैदिक भाषेत नव्हेत. संस्कृतचे अभिमानी व इतिहास संशोधक  वा. वि. मिराशी नाणेघाट लेखाबद्दल म्हणतात, ".....पण त्या श्रौत यज्ञांचे वर्णन असलेला लेख मात्र संस्कृत भाषेतील नसून प्राकृत भाषेत आहे. किंबहुनाएकाही सातवाहन राजाचा एकही लेख संस्कृतात नाही ही आश्चर्याची गोष्ट आहे...." 

दुस-या शतकानंतर मात्र संस्कृतमध्ये असंख्य ग्रंथ अवतरू लागले. प्राचीन पुराणे, रामायण, महाभारत या प्राचीन प्राकृत साहित्यात फेरबदल करत त्यांची भेसळयुक्त संस्कृत रुपांतरेही निर्माण झाली. विंटरनित्झ या भाषातद्न्याने यावर विस्तृत संशोधन केले आहे. ही परंपरा पुढेही चालू राहिली. दहाव्या शतकात बहडकहा या प्राकृत ग्रंथाचा अनुवाद काही फेरबदल करून बृहत्कथा या नावाने केला गेला हे तर आपल्याला माहीतच आहे. तिसऱ्या शतकानंतर मात्र आधी द्वैभाषिक (प्राकृत लेख व त्याचा संस्कृतमधील अनुवाद) व नंतर संस्कृत शिलालेख/ताम्रपटांचा विस्फोट झालेला दिसतो हे येथे लक्षात घ्यायला पाहिजे. 

इसपू दुस-या शतकाआधीचा एकही संस्कृत लेख अथवा ती भाषा अस्तित्वात असल्याचा एकही पुरावा उपलब्ध नाही. उलट प्राकृत भाषांतील शिलालेखांची इसपू चारशेपासून रेलचेल दिसते. नाण्यांवरही केवळ प्राकृत मजकूर दिसतो. जैनांनी अर्धमागधी, शौरसेनी आणी माहाराष्ट्री प्राकृतात असंख्य ग्रंथ लिहिले. बौद्धांनी पाली (मागधीचे विकसित रूप) ही आपली धर्मभाषा बनवली. संस्कृत अस्तित्वात आल्यानंतर त्यांनीही संस्कृतचा वापर केला. तत्पूर्वी जी भाषाच अस्तित्वात नाही तिचे पुरावे कसे सापडणार? संस्कृतमध्ये आल्यानंतर मुळची प्राकृत रामायण-महाभारत, पुराणे, कथाग्रंथ नष्ट झाले अथवा सांस्कृतिक वर्चस्ववादासाठी मुळ ग्रंथ नष्ट केले गेले. अनुवाद करतांना मुळ ग्रंथाशी प्रामाणिक न राहणे ही प्रवृत्ती आजही शेष आहे हे मनुस्मृती ते वेदाच्या मराठी अनुवादांवरून लक्षात येते.

थोडक्यात, संस्कृत ही अर्वाचीन भाषा असतांना तिला सर्व प्राकृत भाषांचे जनकत्व देणे हा इतिहासावर अन्याय आहे हे वरील अल्प विवेचनावरून आपल्या लक्षात येईल. ऋग्वेदाची भाषाही संकरीत, म्हणजे पर्शियन आणि प्राकृत यांचे मिश्रण असल्याने तीलाही मूळ भाषा मानता येत नाही. प्राकृत याच सिंधू काळापासून बोलीत व समाजव्यवहारात असलेल्या स्वतंत्रपणे विकसित होत गेलेल्या मूळ भाषा आहेत याचे असंख्य पुराये उपलब्ध असतांना एक अशास्त्रीय भाषिक सिद्धांत जन्माला घालून वैदिक वर्चस्वतावाद जन्माला घातला गेला. संस्कृत देवांपासून झाली मग काय प्राकृत चोरांनी निर्माण केली? असा उद्विग्न सवाल संत एकनाथांनी पूर्वीच केलेला आहेच!

इतिहासाचे विकृतीकरण हा वर्तमानातील इतिहासकारांसमोरील मोठी समस्या आहे कारण त्याचा उपयोग हत्यार म्हणून करणा-या अपप्रवृत्ती अनेक सामाजिक समस्या व संघर्ष उत्पन्न करतात. सध्या भारताचा गेल्या बारा हजार वर्षांचे पुनर्लेखन करण्याचा प्रकल्प केंद्र सरकारने हाती घेतला आहे. त्यामागचे हेतू स्पष्ट केलेले आहेत. इतिहास जेंव्हा सहेतुकपणे लिहिला जातो तेंव्हा तो इतिहास रहात नाही. आणि खोटा इतिहास भ्रामक आत्मानंद देईलही कदाचित पण खरे आत्मभान देणार नाही हे उघड आहे.  प्राकृत आणि संकृत भाषांचा असलेला आणि सांगितला जाणारा इतिहास वेगळा का याचे उत्तरही त्यातच आहे.

-    संजय सोनवणी

 

No comments:

Post a Comment

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...