"राम जितका चांगला होता तितकाच रावण चांगला होता
किंवा
रावण वाईट होता तितकाच राम वाईट होता
असं म्हणणं = तटस्थता !!!!
ही तटस्थतेची नवी समाजमान्य व्याख्या आहे का आजकाल?" -डा विश्वंभर चौधरी.
डा. विश्वंभर चौधरींनी कळीची विधाने करुन वरील प्रश्न उपस्थित केला आहे आणि त्यावर चर्चा होण्याची गरज आजच्या परिप्रेक्षात आहेच. तटस्थता म्हणजे नेमके काय? "राम जितका चांगला होता तितकाच रावण चांगला होता." असे साळसुद विधान करुन सुटका होऊ शकत नाही हे उघड आहे. शिवाय असे उत्तर कोणालाही रुचणार नाही. राम चांगला आणि रावण वाईट अशी समाजमनाची साधारण धारणा आहे. सामान्य माणसाला चिकित्सेची गरज पडत नाही. तो परंपरागत श्रद्धेलाच आपल्या धारणा बनवतो. पण चिकित्सेचे वावडे असणारा वर्ग आपली सुटका करुन घेण्यासाठी दोघेही चांगले किंवा दोघेही वाईट होते असे विधान करून जाऊ शकतो.
राम जितका चांगला होता तितकाच रावणही चांगला होता हे विधान चिकित्सा केली तर खरे आहेच असेही आपल्या लक्षात येईल. पण रामाचे चांगले असणे हे वेगळ्या परिप्रेक्षात आणि रावणाचे चांगले असणे वेगळ्या परिप्रेक्षात. दोघांच्या चांगलेपणात समानता असू शकत नाही. शिवाय दोघांच्या न्युनाधिक्यत्वही वेगवेगळे असेल. "रावण वाईट होता तितकाच राम वाईट होता" या विधानाचेही तसेच आहे. समजा राम चांगला आहे तर आगळीक प्रथम त्याच्याकडून झाली आहे. त्याने शुर्पनखेला काही कारण नसता नुसते अवमानितच नाही तर विद्रुप केले आहे. केवळ संगाची अथवा विवाहाची कामना करणा-या एका मुक्त स्त्रीशी असे वर्तन करणे दुष्टपणाचे, स्त्रीत्वाच्या अवमानाचे उदाहरण मानता येईल. रावणाने बंधू या नात्याने या घटनेचा सुड घेण्यासाठी सीतेलाच पळवले. हाही बदला घेण्याचा प्रशस्त मार्ग नाही. कारण त्याच्या बहिणीचा अपमान राम-लक्ष्मणाने केला होता. या दोहोंशी सुडासाठी अथवा त्यांना धडा शिकवण्यासाठी युद्ध करण्याचा प्रशस्त मार्ग त्याने निवडण्याऐवजी सीतेला, म्हणजे एका स्त्रीलाच पळवण्याचा मार्ग निवडला. रावणाने सीतेचा सांभाळ कसलीही बळजोरी न करता केला असला तरी त्या घटनेने सीतेचे संपुर्ण जीवनच होरपळून निघाले आहे. शुर्पनखा विद्रूप झाल्याने तिचेही जीवन तसेच होरपळले गेले असणार. म्हणजे स्त्रीवादाच्या अंगाने वा विवेक अथवा नीतिने पाहिले तर दोन्ही पुरुष सारखेच वाईट ठरतात. तरीही दोहोंच्या वाईटपणाला वेगवेगळ्या किनारी आहेत. त्यांच्या वर्तनाला वेगवेगळ्या संस्कृत्यांच्या पार्श्वभुम्या आहेत.
राम-रावण युद्धात राम जिंकला. समजा उलट झाले असते तर चांगल्या-वाईटाच्या सामाजिक व्याख्याही बदलल्या असत्या. शुर्पनखेच्या दु:खाभोवतीच मग महाकाव्य फिरत राहिले असते व रावण महानायक ठरला असता. जर-तर ला अर्थ नसला तरी रावणच चांगला होता असे मानणारा मोठा प्रवाह आहे आणि दस-याला रावणदहन करणाराही मोठा प्रवाह आहे. यालाही दोन्ही विचार असलेल्यांच्या सांस्कृतिक पार्श्वभुम्या वेगळ्या आहेत हे महत्वाचे कारण आहे. त्यामुळे दोन्ही चांगले होते वा दोघेही सारखेच वाईट होते असे सरसकट विधान करता येत नाही. यामुळे मुख्य प्रश्नातून सुटका होत नाही.
त्यामुळे कोण चांगले व कोण वाईट हे ठरवतांना सर्व संदर्भचौकटींच्या परिप्रेक्षात विचार करावा लागतो. चिकित्सा करावी लागते व उत्तर शोधावे लागते. उत्तरे सर्वांची सारखी येतील असे नाही पण ती मग सरसकट नसतील. हेही खरे आणि तेही खरे असला बुळेवाद कसा चालेल? परंतू आपण वर्तमान जीवनात या बुळेवादाचे प्रतिबिंब पडलेले सहज पाहू शकतो, कारण मोठा वर्ग सामाजिक/राजकीय परिप्रेक्षात बोलतांना तेही वाईट होते तितकेच हेही वाईट होते असे विधान करत शहामृगी पवित्रा घेत वाळूत तोंड खुपसून बसतांना आपण पाहतो.
"ही तटस्थतेची नवी समाजमान्य व्याख्या आहे का आजकाल?" हा शेवटचा डा. चौधरींचा प्रश्न या संदर्भात पहावा लागतो. तटस्थ चिकित्सा आणि राम-रावणाच्या संदर्भातील विधाने यात फरक आहे. ही विधाने बुळेवादाची लक्षणे आहेत. आणि जर ही अशी तटस्थता ही जर समाजाची मान्य व्याख्या होऊ पहात असेल आणि संदर्भचौकटी व वेगवेगळी ब-या-वाईटाची परिमाने न पाहता नरो वा कुंजरो वा सारखी विधाने येत असतील तर अशी तटस्थता जास्त धोकेदायक नाही काय?
चांगले किंवा वाईट अशी काळ्या-पांढ-या रंगात सामाजिक/राजकीय घटनांची वाटणी करता येत नाही. सर्वस्वी वाईट अथवा सर्वस्वी चांगले असे काही असू शकत नाही. पण त्याची तटस्थ चिकित्सा करणे व मग मत बनवणे हे निरोगी मनाचे लक्षण आहे. ही चिकित्सा करतांना काळाच्या संदर्भचौकटीही पहाव्युआ लागतात. आजच्या नीतिच्या परिप्रेक्षात राम-रावणाची चिकित्सा करायची नसते तर त्यांचा काळ, त्यांच्या संस्कृत्या व अपरिहार्यपणे आलेल्या विचारधारा यांचाही विचार करावा लागतो. पण आपल्याला ही अशी सवय नाही. त्यामुळे सामाजिक/राजकीय संघर्ष अज्ञानाधारित होत मग दिशाहीन होतो. बहुतेक संघटना, मग त्या सामाजिक असोत, सांस्कृतिक असोत कि राजकीय अथवा धार्मिक, या दिशाहीन संघर्षात फसलेल्या आहेत. त्यामुळे आजच्या परिप्रेक्षात काय चांगले व काय वाइट याची निवड करण्याची क्षमता गमावून बसल्या आहेत. सामान्यांना तर असे काही झाले आहे कि "महाज्वर" चढलेला असावा. कोणाची बाजू घ्यायची हा प्रश्न नसून त्या बाजुची आपण दुसरीही बाजू विचारात घेत चिकित्सा करुन निर्णय घेतला आहे काय हा आहे. आणि मला वाटते यात बहुसंख्य नापास होतील.
आणि त्याहीपुढे जाऊन बुळेवादी "हाही चांगला-तोही चांगला" किंवा त्याविरुद्ध बोलत स्वत:ची सोडवणूक करत बुळेवाद जपतात हेही घातक...किंबहुना जास्तच घातक आहे. तटस्थतेची ही व्याख्या समाजात बनली असेल तर आपण सावध व्हायला हवे!
121Sanjay Kshirsagar, Vikas Lawande and 119 others
42 comments
6 shares
Share
No comments:
Post a Comment