Friday, October 4, 2024

अभिजात मराठी

  



 

मराठी भाषा अभिजात आहे की नाही याची चर्चा आपल्याला सोळाव्या शतकापासूनच सुरु झालेली दिसते. “संस्कृत भाषा देवांनी निर्माण केली, मग काय प्राकृत भाषा (म्हणजे माहाराष्ट्री प्राकृत) काय चोरांनी निर्माण केली?” हा प्रश्न  अत्यंत उद्वेगाने संत एकनाथ यांनी विचारला होता. मराठी भाषा स्वतंत्र नसून संस्कृतपासून निर्माण झाली हा दुराग्रह भाषाविद्वानांनीही धरला. एकोणीसाव्या शतकात आर्य आक्रमण सिद्धांतामुळे भारतातील बहुतेक भाषा या संस्कृतोद्भव आहेत व एतद्देशियांना आक्रमक आर्यांची भाषा न पेलल्यामुळे सामान्य लोकांत अपभ्रष्ट संस्कृत म्हणून प्राकृत बोलीभाषा निर्माण झाल्या असा अ-भाषाशास्त्रीय सिद्धांत पुढे आला. भाषाशास्त्राची मांडणी करताना प्राकृत भाषांना मिडल-इंडो-युरोपियन अशी संज्ञा बहाल करत प्राकृत भाषांना दुय्यम स्थान दिले गेले. भाषांचा प्रवाह हा प्राथमिक ओबड-धोबडतेकडून कालौघात सांस्कृतिक परिवर्तनासोबत परिष्कृततेकडे वाटचाल करतो आणि भाषा ही त्या त्या प्रदेशाच्या भुवैशिष्ट्यांमुळे निर्माण होणा-या सामुहिक मानसशास्त्राची उपज असते हे निखळ प्रादेशिक भाषाशास्त्रीय सत्य आर्य आक्रमण सिद्धांत डोक्यावर घेणा-या विद्वानांच्या लक्षात आले नाही. उलट भाषांचा उपयोग सांस्कृतिक दहशतवादासाठी होऊ लागला. संस्कृत ही देवभाषा असून बाकी संस्कृतच्या अपत्यभाषा आहेत हे असत्य लोकांवर बिंबवण्यात भाषिक वर्चास्वतवादी लोक यशस्वी झाले. यामुळे भाषिक न्यूनगंड निर्माण झाला आणि सामाजिक मानसशास्त्र दुय्यम झाले.

आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारने बहाल केला आहे. मराठी सोबतच बंगाली, आसामी, पाली आणि प्राकृत भाषेलाही अभिजात दर्जा दिला गेला आहे. याचेही विश्लेशन गरजेचे असले तरी आपण आधी अभिजात भाषा म्हणजे काय आणि मराठी अभिजात का यावर विचार करूयात.

जीही भाषा स्वतंत्र आहे, कोणात्याही बाह्य प्रभावाखाली तिची निर्मिती झालेली नाही, ज्या भाषेत किमान दीड हर्जार वर्षांपासून लिखित पुरावे उपलब्ध आहेत आणि ज्या भाषेचा प्रवाह सातत्यपूर्ण राहिलेला असून जी मौलिक साहित्य परंपरा दाखवते ती भाषा अभिजात होय.

आजची मराठी भाषा प्राचीन ‘महरठी पाईय’ असे तत्कालीन मराठीत म्हणवणा-या भाषेचा सलग प्रवाह आहे. या शब्दाचे कृत्रिम संस्क्रुत रूप माहाराष्ट्री प्राकृत असे केले गेले. मराठी शब्दांच्या कृत्रिम संस्कृतकरणाचा अट्टाहास मध्ययुगात मोठ्या प्रमाणात बळावल्याने अनेक सांस्कृतिक बाबीही झाकोळल्या गेल्या आहेत. उदाहणार्थ सालाहन किंवा सातवाहन या शब्दाचे केलेले शालिवाहन हे संस्कृत रूप. यामुळे शक संवत्सराची स्थापना करणारे शालिवाहन कोण हा प्रश्न दीर्घ काळ अनुत्तरीत राहिला होता हा इतिहास आहे. असे अनेक गोंधळ या भाषिक अपप्रवृत्तीमुळे झालेले आहेत ज्याचे निराकरण अद्याप व्हायचे आहे.

संस्कृत भाषा अन्य सर्व भारतीय भाषांपेक्षा प्राचीन आहे काय? या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर आहे की नाही. संस्कृत  भाषेचा जन्म इसपू पहिले शतक ते इसवी सनाचे दुसरे शतक या तीनशे वर्षांच्या काळात प्राकृत भाषांवर संस्कार करत क्रमश: झाला. याचे पुरावे आपल्याला प्राचीन नाण्यांवरील व शिलालेखातील भाषेतून मिळतात. वेदांची भाषा आणि संस्कृत भाषा एकच असाही थोर गैरसमज समाजात आहे., वास्तव हे आहे की या दोन्ही भाषा सर्वस्वी भिन्न आहेत. पाणिनी आपल्या अष्टाध्यायी या व्याकरणात वैदिक भाषेचा उल्लेख ‘छांदस’ असा करतो तर संस्कृतचा उल्लेख फक्त ‘भाषा’ असा करतो. वैदिक भाषा संकरीत असून त्यात अवेस्त्याची प्राचीन पर्शियन  भाषा आणि प्राचीन प्राकृत भाषांचा संकर झालेला आहे. एवढेच काय, संस्कृत भाषाही प्राकृत भाषांवर संस्कार करत कृत्रिमरित्या तयार करण्यात आलेली आहे.

या संदर्भात जे. ब्लॉख यांनी १९१४ साली लिहिलेल्या फॉर्मेशन ऑफ मराठी लँग्वेजया पुस्तकात फार महत्त्वाची निरीक्षणे नोंदवलेली आहेत. थोडक्यात ती अशी : ऋग्वेदाच्या प्राचीन संपादकांनी अन्य बोलीभाषांना आत्मसात करत अथवा त्यापासून उधारी करत ऋग्वेदाची वैशिष्ट्यपूर्ण भाषा घडवली आहे. (पृ.२) मराठी ही सरळ महाराष्ट्री प्राकृताशी नाते सांगते. अन्य प्राकृत भाषांचा प्रभाव नगण्य आहे. मराठीचे ध्वनिशास्त्र गुंतागुंतीचे व अन्य आर्यभाषांपेक्षा स्वतंत्र आहे. (पृ ४५), अनेक प्राकृत घाट संस्कृतात घुसले आहेत. संस्कृत ही स्वतंत्र भाषा नसून मिश्र भाषा आहे. (पृ. ४८) हेमचंद्र ज्यांना अपभ्रंश भाषा म्हणतो त्या भाषांचा मराठीशी काहीही संबंध नाही तर मराठीचा संबंध थेट प्राचीन माहाराष्ट्री प्राकृताशीच आहे. (पृ. ३०-३१) प्राकृत म्हणजेच महाराष्ट्री प्राकृत. शौरसेनी, मागधी, अर्धमागधी वगैरे अन्य प्राकृत भाषा दुय्यम आहेत. मराठीचा पाया स्थानिक वैशिष्ट्यपूर्ण प्राचीन बोलींचा आहे जो अन्य भाषांत समांतरपणे आढळत नाही. (पृ.३२) सातवाहन काळात स्थानिक प्राकृत राजभाषा व साहित्यभाषा बनली व तिला वैभव आले. भारतातील कोणतीही भाषा कोणावर लादली गेल्याचे भाषाशास्त्रीय उदाहरण मिळत नाही. (पृ. ४४). मी येथे ब्लॉख यांनी दिलेली अत्यंत थोडकी उदाहरणे घेतली आहेत, पण ती मराठी भाषेच्या स्वतंत्र वास्तवावर प्रकाश टाकण्यास पुरेशी आहेत.


खुद्द ऋग्वेदात अनेक प्राकृत प्रयोग आलेले आहेत. किंबहुना प्राकृत आणि अवेस्तन शब्दांचेच सुलभ ध्वनीबदल करीत वैदिक संस्कृत व नंतरचे संस्कृत बनले आहे. अहुरऐवजी असुर, मिथ्रऐवजी मित्र अशी अवेस्तन शब्दांचे ध्वनीबदल केल्याची असंख्य उदाहरणे देता येतील. इंद्रऐवजी इंद, वृंद ऐवजी वुंद असे मूळचे प्राकृत प्रयोग ऋग्वेदात जसेच्या तसेच राहिलेले आहेत. व्याकरणाचा पायाही प्राकृतच असल्याचे अनेक उदाहरणांवरून आढळून येते. उदा. देवास:, सत्यास: ऐवजी देवा:, सत्या: इ. खरे तर ऋग्वेदाची भाषा अवेस्तन (प्राचीन पर्शियन) आणि भारतातील स्थानिक प्राकृत यांचे मिश्रण आहे. एवढेच नव्हे तर ऋग्वेदातील ६% शब्द द्रविड व मुंड भाषेतून वैदिक छांदस भाषेत उधार घेतलेले आहेत. भाषांचा उगम” या माझ्या पुस्तकात मी संस्कृत भाषा इसपू पहिले शतक ते इसवी सनाचे दुसरे शतक या काळात कशी क्रमश: विकसित होत गेली हे ग्रांथिक, शिलालेखीय व नाणकशास्त्रीय पुराव्यांवरून साधार दाखवले आहे. त्या दृष्टीने संस्कृत हीच आधुनिक भाषा ठरत असून प्राचीन प्राकृत भाषांवर संस्कार करत ही नवी भाषा बनवलेली आहे. परंतु ती आधुनिक असूनही तिला अभिजात दर्जा आणि ज्यापासून ती बनली त्या महाराष्ट्री प्राकृताला व त्या भाषेची थेट वंशज असलेल्या मराठीला मात्र आजवर अभिजात दर्जा नाकारणे हे कर्मदरिद्रीपणाचेच नव्हे तर भाषाशास्त्रीय दृष्टिकोनही नसल्याचे निदर्शक होते.


त्यामुळे संस्कृत भाषा अपभ्रंश स्वरूपात येऊन प्राकृत (पाअड) भाषा बनल्या हे इंडो-युरोपीय भाषा सिद्धांत मांडणाऱ्या या पाश्चात्त्य व एतद्देशीय संस्कृतनिष्ठ विद्वानांचे मत टिकत नाही. उलट मूळ प्राकृत शब्दांचेच उच्चारसुलभीकरण करीत संस्कृत विकसित होत गेली हे बुद्धिस्ट हायब्रीड संस्कृत ग्रंथ, शिलालेखीय ते नाण्यांवरील भाषेतून सिद्ध होते. महाराष्ट्री प्राकृतात हालाचा गाथा सतसईहा अनमोल काव्यसंग्रह जसा उपलब्ध आहे तसेच अंगविज्जाहा तत्कालीन समाजजीवनावर प्रकाश टाकणारा इसवी सनाच्या पहिल्या शतकातील गद्य ग्रंथही उपलब्ध आहे. या भाषेतील शब्द व व्याकरण पूर्णतया स्वतंत्र असून ते संस्कृताचे रूपांतरण नव्हे. समजा तसे असते तर या प्राकृत शब्दांआधीचा त्यांच्या मूळ संस्कृत स्वरूपाचा लिखित अथवा शिलालेखीय पुरावा अस्तित्वात असला असता. पण अगदी वैदिक धर्माचे आश्रयदाते असलेल्या शुंग काळातील शिलालेखही स्वच्छ प्राकृतात आहेत. गाथा सप्तशतीचे संपादक स. आ. जोगळेकरांनाही सातवाहनांनी केलेल्या यज्ञांचे वर्णन प्राकृतात कसे, हा प्रश्न पडला होता व त्यांनी या ग्रंथाच्या प्रस्तावनेत तो नमूदही केला. शुंगांच्याही अश्वमेध यज्ञाचे वर्णन प्राकृतात आहे. मुळात जी भाषाच अस्तित्वात नव्हती त्या संस्कृत भाषेत त्यांचे वर्णन कसे करणार? आणि मग संस्कृत शब्दांचे अपभ्रंश म्हणजे प्राकृत असा अर्थ पुराव्यांच्या अभावात कसा काढता येईल? संस्कृत भाषा व तिचे पाणिनीकृत व्याकरण गुप्तकाळात सिद्ध झाले. तिसऱ्या शतकानंतर मात्र आधी द्वैभाषिक (प्राकृत लेख व त्याचा संस्कृतमधील अनुवाद) व नंतर संस्कृत शिलालेख/ताम्रपटांचा विस्फोट झालेला दिसतो हे येथे लक्षात घ्यायला पाहिजे. असंख्य प्राकृत ग्रंथांची भाषांतरे अथवा छाया याच काळात झाल्या. गुणाढ्याच्या बृहत्कथेचेच काय पण प्राकृतप्रकाश(मूळ नाव- पाअड लख्खन सुत्त) या वररुचिकृत प्राकृत व्याकरणाचाही भामहकृत संस्कृत अनुवाद झाला. याचे कारण संस्कृत ही ग्रंथव्यवहाराची मुख्य भाषा बनली असली तरी प्राकृतातही समांतरपणे विपुल ग्रंथनिर्मिती होतच राहिली, त्यामुळे प्राकृत व्याकरणाचाही अभ्यास गरजेचा बनला.

 

मराठीचे आज उपलब्ध असलेले आद्य व्याकरण इसवी सनापूर्वी दुस-या शतकातच लिहिले गेले, म्हणजेच मराठी भाषा त्याच काळात प्रगल्भ झालेली होती. ती बोलण्या-लिहिण्यात त्याच्याही खूप पूर्वीपासून असणार हा अंदाज आपण सहज बांधू शकतो. मराठी भाषेत रामकथेवरील विमल सुरीकृत आद्य महाकाव्य ‘पउमचरीय” इसवी सनाच्या पहिल्या शतकातच लिहिले गेले. याच काळातील हाल सातवाहनाने संपादित केलेली गाहा सतसई, नंतरच्या कालखंडात लिहिले गेलेले अंगविज्जा, लिलावइ, वासुदेव हिंडी, समराइच्च कहा, महाकाव्य गौडवहो सारखे असंख्य ग्रंथ हे मराठीचे वैभव आहेत. तेराव्या शतकानंतर उदयाला आलेले संतसाहित्य हे मराठी भाषेच्या विकासातील कळस आहे.  जिवंत भाषेप्रमाणे आपली मराठी कालौघात विकसित होत आजच्या स्वरुपापर्यंत पोचली आहे. बावीसशे वर्षांपूर्वीच्या सातवाहन कालीन मराठीतील असंख्य शब्द आजही आपल्या नित्य बोलण्यात असतात ही बाब भाषेच्या सातत्याचे फार मोठे लक्षण आहे.

 

मराठी अभिजात ठरल्याचे लाभ काय हा एक प्रश्न सातत्याने विचारला जाऊ लागला आहे. मराठी अभिजात ठरणे म्हणजे ती स्वतंत्र भाषा आहे हे अधिकृतरीत्या मान्य होणे. भाषिक न्यूनगंड हा मानवी समुदायाचे मानसिक शोषण करणारा असतो. भाषिक वर्चस्वतावादापासून सुटका होणे आणि आपली भाषा ही आपल्याच पूर्वजांची निर्मिती आहे ही जाणीव वेगळा आत्मविश्वास आणि आत्मसन्मान निर्माण करणारी असते. यामुळे केंद्र सरकार अनुदान देईल, भाषेचा अभ्यास वाढेल, मराठी भाषकांकडे तुच्छतेणे पाहणे कमी होईल अशी अपेक्षा असली तरी शेवटी भाषा ही सामुदायिक निर्मिती असल्यामुळे मराठी भाषेचे वैभव दिगंत वाढवण्यासाठी मराठी भाषकांनाच कंबर कासावी लागणार आहे.

 

केंद्र सरकारने प्राकृत भाषेलाही अभिजात दर्जा दिला आहे हे अनाकलनीय आहे. कारण प्राकृत नावाची कोणतीही भाषा नसून माहाराष्ट्री, शौरसेनी, कशूर, पैशाची, मागधी, अर्धमागधी, गांधारी इ. या पुरातन प्रादेशिक लोकभाषांना एकत्रित रीत्या प्राकृत म्हटले झाते. या भाषा लोकांमधून प्रदेशनिहाय सामुदायिक मानसिकतेतून निर्माण झालेल्या असल्याने त्यांना एकत्रित रीत्या  ‘प्राकृत’ (प्राचीन पाइय अथवा पाअड) असे म्हटले जाते.  मराठी भाषा म्हणजेच माहाराष्ट्री प्राकृत तर बंगाली भाषा ही मागधी व अर्धमागधीचा संकर असलेली प्राकृत. हिंदी भाषा शौरसेनी प्राकृतची वर्तमान अवस्था होय. पाली भाषा ही अर्धमागधीवर संस्कार करत तयार करण्यात आली तर संस्कृत भाषा ही पाली भाषेचीच पुढची, अधिक परिष्कृत अवस्था आहे. पाली भाषेला व मराठी, बंगाली आणि आसामी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला हे उत्तमच, पण प्राकृत नावाची कोणतीही स्वतंत्र भाषा या देशात नसताना तिलाही अभिजात दर्जा दिला आहे. एक तर हा केंद्र सरकारने अज्ञानाने केलेला विनोद आहे अथवा सर्वच प्राकृत भाषांना एकत्रितरित्या अभिजात भाषांचा दर्जा दिलेला आहे. सर्वच प्राकृत भाषांना त्या प्राचीन आणि स्वतंत्र असल्याने अभिजाततेचा दर्जा असायलाच हवा, बंगाली, आसामी वगैरे प्रादेशिक भाषा या प्राचीन प्राकृत भाषांतूनच आलेल्या असल्याने त्या अभिजातच होत यात शंका नाही, पण याबाबत काहीही स्पष्टता नसल्याने या निर्णयात काहीतरी गफलत आहे हे निश्चित. पण अर्थात सरकार वेळ मिळेल आणि राजकीय गरज असेल तर यावर विचार करेल.

 

सध्यातरी मराठी बांधवानी भाषिक न्युनगंडातून सुटका मिळाली याचा आनंद साजरा करून आपली भाषा अजून कशी सशक्त होईल, आपल्या भाषेत कशी अधिकाधिक ज्ञाननिर्मिती होईल याकडे जोमाने लक्ष पुरवावे. आणि शेवटी, अभिजात भाषा म्हणजे अभिजनांची भाषा नव्हे तर जीही भाषा स्वतंत्र असते व जिच्यात किमान दीड-दोन हजार वर्षांचा निरंतर मौलिक साहित्य निर्मितीचा इतिहास असतो तीच भाषा अभिजात भाषा असते आणि मराठी भाषा या निकषांवर टिकली आहे हे सार्वकालिक सत्य आता केंद्र सरकारनेही मान्य केले आहे हे आपल्या दृष्टीने फार महत्वाचे आहे.

 -संजय सोनवणी 

No comments:

Post a Comment

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...