Friday, October 25, 2024

काश्मीरचा सम्राट ललितादित्य!

 


अरबांना भारतातून हुसकावून लावण्यात काश्मीरचा सम्राट ललितादित्य आणि कनौजचा राजा यशोवर्मा यांनी उघडलेली संयुक्त आघाडी कारणीभूत झाली. आधी ल्लीतादित्याने सिंध व बलुचिस्तानमधील लोकांना अरबांना कसलाही कर देऊ नये असे प्रयत्न सुरु केले. त्यामुळे अरबांच्या आर्थिक नाड्या आवळल्या जाऊ लागल्या. कासीमचा मृत्यू पूर्वीच झालेला होता आणि आता खलिफा आपल्या राज्यपालांमार्फत तेथील कारभार हाकत होता. जुनैद या राज्यपालाचा मृत्यू झाल्यावर तामीम नावाचा राज्यपाल नेमला गेला. त्याने येताच दडपशाहीचे धोरण स्वीकारले. तामीम आपली व्यापारी व लष्करी ठाणी सांभाळून अन्यत्र आक्रमणे करू लागला. मग मात्र ललितादित्याने अरबांविरुद्ध सर्वकष आघाडी उघडली. त्यासाठी यशोवर्मन या कनौजच्या राजाचीही मदत घेतली.
अरब आणि या दोन्ही देशी सत्तांत एवढे भयंकर युद्ध झाले कि तामीमला आपली ठाणी खाली करत पळ काढावा लागला. अरबांचा नाश करत सारे व्यापारी मार्ग आपल्याच हाती आणण्यासाठी एकट्या ललितादित्याने तामीमचा पाठलाग चालू ठेवला. त्याने खैबर खिंडीतून पाठलाग करत अफगानिस्तांच्या भूमीवर तामीमच्या सैन्याचा बिमोड तर केलाच पण तामीमही त्या युद्धात ठार झाला. या युद्धाची तीव्रता एवढी भयंकर होती की या युद्धातून वाचलेले अरब पुन्हा हिंदकडे परतायला नकार देवू लागले एवढे त्यांनी ललितादित्याची धास्ती घेतली.
अफगाणिस्तानातील काबुल व झाबुल येथील राजवटी काश्मीरच्या पूर्वापार मित्र होत्या. त्यांनीहे अरबांचा प्रतिकार केला असला तरी त्यांना मात्र यश मिळाले नव्हते. कोरियन प्रवासी हुएचो याच्या नोंदींनुसार झाबुलीस्तान आणि काबुल-गांधारचे शासक तोखारीस्तानमधुन तेथे स्थलांतरीत झालेले तुर्क होते. तेथील राजा तेगीन खोरासान शहा आणि राजा झिबील यांना ललितादित्याने अप्द्स्थ न करता आपले मांडलिक करून घेतले आणि त्यांचेही सैन्य सोबत घेत काबुल-बामियान मार्गे बल्ख आणि तोखारीस्तानवर (आजचा तुर्कस्थान) स्वारी केली. तेथील अरबी ठाणी उखडून काढली. व्यापारी मार्गांवर आपले वर्चस्व स्थापीत केले आणि अरबांच्या दहशतीमुळे अज्ञातवासात पळून गेलेल्या राजा कुल्तू तोन तार्दुला पुन्हा सत्तेवर आणले व आपला मांडलिक केले. या बदल्यात राजा तार्दूने आपली कन्या ईशानदेवी (हे मूळ नावाचे संस्कृतीकरण आहे) ललितादित्याला विवाहात दिली. तुर्की सेनानी चंकून हा ललितादित्याच्या सेनापतीपदावर नेमला गेला व मध्य आशियायी युद्धतंत्राचा समावेश काश्मिरी सेनेत झाला. त्याचा मुलगा ईशानचंद्र हा ईशानदेवीसमवेत ललितादित्याला सामील झाला. या नातेसंबंधामुळे काश्मिरी कलाशैलीवरही मध्य आशियायी तंत्राचा मोठा प्रभाव पडला. तोखारीस्तानवरील ललितादित्याचा विजय एवढा गाजला कि काश्मीरमध्ये या विजयाची स्मृती साजरी करणारा उत्सव अकराव्या शतकापर्यंत साजरा केला जात होता. अल्बी रुनीने आपल्या किताब अल हिंद या ग्रंथात म्हटले आहे कि राज मुत्ताइ (मुक्तापीड) याने तुर्कांवर मिळवलेल्या विजयाप्रित्यर्थ दरवर्षी एक उत्सव साजरा करत असत.
तोखारीस्थान अशा रीतीने आपल्या अंमलाखाली आणल्यानंतर ललितादित्य मध्य आशियातील समरकंद येथे ससैन्य पोचला आणि तेथूनही अरबांना हुसकावून लावले. आता त्याचे लक्ष गिलगीट-बाल्टीस्तानवर होते. तेथून तिबेटी वर्चस्व हटवणे आवश्यक होते. त्यामुळे त्याने अतिशय दुर्गम असलेल्या हुंझा खो-यातून जाणा-या व्यापारी मार्गावरून थेट गिलगीटमध्ये आपले सैन्य घुसवले. त्थील तिबेटी सेना परास्त करून तेथील पटोला शाही राजाला मांडलिक बनवून बाल्टीस्तानकडे मोहरा वळवला. तेथे तिबेटी सैन्याशी झंझावाती युद्ध करून तेथून त्यांना पळ काढायला भाग पाडले. ललितादित्य तेथून परत सरळ काश्मीरला परतु शकत होता, पण त्याने तसे केले नाही. पळणा-या तिबेटी सैन्याचा पाठलाग करत थेट कारगील गाठले. झोजिला खिंडीचे रक्षण करण्यासाठी तिबेटने मोठे सैन्य ठेवलेले होते. तेथेही धमासान युद्ध झाले. मग ललितादित्याने लेहावर धडक मारत तेथून जाणारे तीन व्यापारी मार्ग स्वत:च्या नियंत्रणात तर आणलेच पण लदाख काश्मीरला जोडला. झोजिला खिंडीच्या मार्गाने तो श्रीनगरला परत आला. म्हणजे पश्चिमेकडील खैबर खिंडीतून जात पूर्वेकडून परत येत एक अवाढव्य भाग आपल्या राज्याला जोडत व्यापारी मार्गावर स्वामित्व प्रस्थापित करणारा हा सम्राट अशोकानंतरचा एकमेव भारतीय सम्राट.
ललितादित्याला व्यापारी मार्गांचे महत्व पुरेपूर समजले होते. ललितादित्याच्या या विजयांमुळे अरब अस्वस्थ तर झालेच होते पण तिबेटही संतप्त झाला होता. दोन्ही सत्ता आता एकत्र येत ललितादित्याविरुद्ध आघाडी उघडायची शक्यता होती. त्यामुळे ललितादित्याने ७३३ मध्ये चीनला एक शिष्टमंडळ पाठवले. त्यात ललितादित्याने संदेश दिला होता कि “आपण स्वबळावर पाचही व्यापारी मार्ग स्वतंत्र केले असून येथे आता कायमस्वरूपी रक्षणाची आवश्यकता आहे. चीनने कायमस्वरूपी लष्करी तळ स्थापन केला तर काश्मीर सर्वतोपरी मदत करेल.” पण अंतर्गत संघर्षात अडकलेल्या चीनने त्याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे तिबेटशी पुन्हा ललितादित्याला युद्ध करावे लागले.
चीनने ७३७ नंतर कोरियन सेनानी ली लिन्फू याच्या नेतृत्वाखाली काही लष्करी हालचाली सुरु केल्या पण त्यांना फारसे यश मिळाले नाही. तिबेटनेही गिलगीटशी आपले संबंध पुन्हा प्रस्थापित करावेत यासाठी गिलगिटमधील सुशिलिझी या तिबेटसमर्थक पुढा-याला ख्रि-मा-लोद ही राजकन्याही विवाहात दिली. पण ललितादित्याच्या ठाम लष्करी धोरणामुळे हाही मार्ग फसला.
ललितादित्याने व्यापारी मार्गांवरील स्वामित्वातून येणा-या धनाचा सदुपयोग करत काश्मीरमध्ये अवाढव्य निर्माण कार्ये केली. यात प्रामुख्याने परिहासपूर हे नवे राजधानीचे नगर आणि मार्तंड मंदिराचे बांधकाम आजही भुरळ घालते. निर्माणकार्ये केल्यानंतर ललितादित्याने अर्धा भारत जिंकत आपले लक्ष पुन्हा मध्य आशियाकडे वळवले. चीन-तिबेटमधून होणारा सर्व व्यापार आपल्या स्वामित्वाखाली यावा अशी त्याची इच्छा होती. सोबत मोठे सैन्य घेऊन ललितादित्याने लेहवरून सासेर-ला मार्गाने जात हिमालयीन पर्वतराजी ओलांडत तारीम खो-यातील तक्लमाकनच्या पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या अवाढव्य थंड वाळवंटात प्रवेश केला. त्याने बहुदा खोतानही जिंकले. पण गोबीच्या वाळवंटाकडे विजयी प्रवास करत असताना दिशा चुकल्याने म्हणा कि प्राकृतिक कारणाने, ललितादित्य व त्याचे सैन्य त्या अवाढव्य वाळवंटात गायब झाले. त्यांचे पुढे काय झाले हे कोणासही माहित नाही. या महान सम्राटाचा अंत एक रहस्यच बनून बसला.
व्यापारी मार्गांवरील स्वामित्व मिळवणारा, बाहेरही साम्राज्यविस्तार करणारा आणि प्राप्त धनातून असंख्य निर्माणकार्ये करणारा दुसरा सम्राट नंतर झाला नाही. अरबांना काही दशके तरी धाकाखाली ठेवत गिलगीट, बाल्टीस्तान आणि लदाख भारताला जोडणे हे त्याचे महान ऐतिहासिक कार्य. तिबेटचे दोनदा पराभव करत चीनशीही मुत्सद्देगीरीत मात देणारा हा वीर योद्धा. त्याचा शेवटही मध्य आशियातील मोहिमेदरम्यानच झाला. पण भारताबाहेर पडत अन्य प्रदेश पादाक्रांत करणारा हा सम्राट.
- संजय सोनवणी

No comments:

Post a Comment

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...