Thursday, December 19, 2024

शेरशहा सुरी: एक कुशल प्रशासक

 


शेरशहा सुरीने हुमायूनचा पराभव केला आणि त्याला भारताबाहेर हाकलले. दिल्लीत आता कोणी शासक उरला नसल्याने शेरशहाने स्वत:ला दिल्लीचा सम्राट घोषित केले.

शेरशहा हा मुळचा अफगाणिस्तानातील. त्याचे मुळचे नाव फरीदखान. शेरशहा ही त्याची पदवी होती. त्याचे वडील हसन हे रोहवरून नोकरीच्या शोधात भारतात आले. बिहार प्रांतात त्यांनी ससराम आणि खावासपूर तांडा हे परगणे मिळवले. पण फरीदला सावत्र आईचा जाच सहन करावा लागला. शेवटी तो आग्र्याला गेला आणि लोदी घराण्याचा आश्रय घेतला.  दौलतखान लोदीने सुलतानाचे मन वळवल्यामुळे त्याला वडिलांचे परगणे देण्याचे फर्मान सुलतानाने काढले. पण सावत्र भावाने त्याला विरोध केल्याने त्याने बिहारच्या सुलतान मुहम्मदाची चाकरी पत्करली. पुढे १५२७ मध्ये शेरशहा बाबराकडे गेला. बाबराला त्याने अनेक युद्धांत मदत केली व विजय मिळवले. पण पुढे अफगाण मुस्लीम आणि बाबर (तुर्की मुस्लीम) यांच्यात संघर्ष सुरु झाल्याने त्याने पुन्हा अफगानांची बाजू घेतली. पुढे त्याने अनेक अमीर विधवा आणि निपुत्रिक स्त्रियांशी विवाह करून संपत्ती वाढवली. हुमायूनने लोदी घराण्याला सत्ता सोडण्याचे आवाहन केले. मुहम्मद लोदीने ते नाकारले व युद्धाची तयारी केली. शेरशहाला युद्धात सहभागी होण्याचे निमंत्रणही पाठवले. पण शेरशहा पोचण्याआधीच हुमायूनने गोमती नदीकाठी झालेल्या युद्धात लोदिचा भीषण पराभव केला आणि शेरशहाला त्याच्या ताब्यातील गंगाकाठचा चुनार किल्ला मोगलांहाती सोपवण्याची मागणी केली. शेरशहा बधत नाही हे पाहून हुमायूनने त्याच्यावर स्वारी केली खरी पण त्याच वेळीस गुजरातमध्ये उठाव झाल्यामुळे हुमायूनला वेढा उठवून तिकडे कूच करणे भाग पडले. त्यामुळे शेरशहाचे बिहार व बंगालच्या काही भागावर वर्चस्व निर्माण झाले. नैसर्गिक साधनसंपत्तीने संपन्न असलेले बिहार आणि बंगाल मोगाल्क साम्राज्याला जोडून घ्यायचे हुमायूनचे स्वप्न होते. त्याने त्यासाठी खूप प्रयत्न केले. शेरशहा आणि हुमायून यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आणि शेवटी शेरशहाने हुमायुनशी केलेल्या दोन मोठ्या युद्धात त्याचा पराभव केला आणि त्याला भारत सोडायला भाग पाडले.

शेरशहा १५४० ते १५४५ एवढ्या अल्पकाळापुरता दिल्लीचा बादशाहा बनला असला तरी त्याने ज्या प्रशासकीय, महसुली आणि आर्थ्यिक सुधारणा घडवून आणल्या त्यामुळे त्याचे नाव भारतीय इतिहासात अजरामर आहे. तो धडाडीचा योद्धा तर होताच पण त्याने सैन्यातही मोठे फेरबदल घडवून आणले. पुढे त्याने केलेल्या सुधारणा ब्रिटीशकाळापर्यंत टिकून राहिल्या हे त्याचे मोठेच कौशल्य आहे.

शेरशहा पातशहा बनला त्याआधी त्याला बिहार व बंगालमधील शासक या नात्याने राज्यकारभाराचा चांगलाच अनुभव होता. त्याने सुधारणांची सुरुवात केली होती तीच मुळात बंगालमधून. बादशहा बनल्यानंतर त्याने त्या सुधारणा व्यापक भागावर लागू केल्या.  १५४१ मध्ये बंगाल ताब्यात घेतल्यानंतर शेरशहाने बंगालचे वाटणी ४७ प्रांतात केली व प्रत्येक प्रांतावर एक प्रशासकीय अधिकारी (शिकदार) नेमला तसेच गावाचे आधिपत्य मुख्तार या केंद्रीय शासनाने नेमलेल्या प्रमुखाकडे देण्यात आले. यासाठी शेरशहाने अफगाणिस्तानातून असंख्य लोकांना निमंत्रित केले आणि अनेकांना सैन्यात सामील करून घेतले तर प्रशासनिक पदेही त्यांनाच वाटली. त्यामुळे भारतातील अफगाणी मुस्लिमांचे प्रमाणही वाढले कारण हीच पद्धत साम्राज्यात सर्वत्र राबवली गेली. अर्थात पदांची व परगण्याची नावे व त्यावरील अधिकार्यांची पदनामे पुढे बदलली.

आज आपण ज्या अर्थी रुपया हा शब्द वापरतो या चलनाचे जनकत्व शेरशहाकडे जाते. त्याच्या आधी केवळ चांदीच्या नाण्याला रुपया म्हणण्याची प्रथा होती. तांब्याची नाणी पैसा या मूल्याशी निगडीत होती. सोन्याच्या नाण्यांना मोहरा हा शब्दही त्यानेच प्रचलित केला. त्रिधातूंच्या सहाय्याने पाडलेल्या व विशिष्ट मुल्य असलेल्या नाण्यांना रुपया म्हणण्याची प्रथा त्यानेच सुरु केली. आज र्प्या हे चलन भारत तसेच नेपाल, श्रीलंका आदि देशांतही वापरले जाते.

सैन्यातही त्याने शिस्त आणली. सैनिकी गुणांना प्राधान्य दिले. सामाजिक न्यायाबद्दलही तो प्रसिद्ध आहे. न्यायालये काझी चाल्वर तर दिवाणी दावे स्वत: शेरशहा चालवत असे. हिंदू आपले विवाद पंचायतीत सोडवत असत. पण गुन्हेगारी खटल्यांतून कोणालाही जात-धर्म किंवा प्रशासकीय अथवा सैनिकी पद या आधारावर सुटका मिळत नसे. स्वत: शेरशहाणे वरिष्ठ अधिकार्यांना कठोर शिक्षा फर्मावल्यामुळे एक न्यायी बादशाहा म्हणून त्याची कीर्ती त्याच्या हयातीतच निर्माण झाली होती.

व्यापारात वृद्धी व्हावी म्हणून बंगाल ते काबुल येथवर जाणार्या उत्तरापथ या महामार्गाची मध्ययुगात पुरती दुर्दशा उडालेली होती. शेरशहाने या महामार्गाची पूर्ण दुरुस्ती केली. झाडे लावली तसेच व्यापार्यांच्या मुक्कामासाठी सराया निर्माण केल्या. वाटेत ठराविक अंतराने विहिरी खोदल्या तसेच जुन्या होत्या त्या वापरात आणल्या. त्यामुळे व्यापाराला गती येऊ लागली. टपाल व्यवस्था सुरळीत व सुरक्षित करण्याचे कामही त्याने जोमाने पुढे नेले. व्यापार वाढवण्यासाठी त्याने कररचनाही सौम्य केली. देशात येणार्या मालावर व विकल्या जाणाऱ्या मालावर तेवढे कर ठेवले, बाकी कर रद्द करण्यात आले. त्यामुळे देशांतर्गत आणि आयात-निर्यात व्यापार सुलभ होऊ लागला.

ग्रीक, पर्शियन, शक, तुर्की आणि अफगाण शासकांचे हे पर्व अनेक शतके राहिले असले तरी बव्हंशी युद्धे मुस्लीम विरुद्ध मुस्लीम अशीच राहिलेली असल्याचे आपल्याला दिसते. इस्लाम शासनकाळात खुश्रुखान हा अल्पकाळासाठी  दिल्लीचा बादशाहा बनला होता. (सन १३२०). हा मुळचा गुजराती व दलित समाजातून वर आलेला. अकबराच्या सुरुवातीच्या काळात हेमू या हिंदू वीरानेही काही काळासाठी का होईना दिल्लीहून राज्य केले. पण सर्वच सम्राट हे मुळात सत्ता हेच आपले ध्येय मानत राहिले. ग्रीक, पर्शियन आक्रमक परत गेले पण शक ते मोगल या देशातच राहिले. अपवाद तैमुरलंग, नादिरशहा आणि अब्दालीचा. या तिघांनी भारताची अमाप लुट केली. भारतात निर्मितीचा कोणताही वारसा त्यांनी सोडला नाही.  बाकी मात्र या देशातच राहिले आणि या देशाच्या समाजजीवनात बऱ्यापैकी मिसळून गेले.

या सर्व आक्रमकांनी जरी भारताला समाज-सांस्कृतिक क्षती पोचवली असली, काही सम्राट अन्यायी वागले असतील, काही धर्मांधही असले तरी त्यांना काही ना काही प्रमाणात या देशातील सांस्कृतिक घटक स्वीकारावेच लागले. कारण सत्ताचालन त्याशिवाय शक्य होत नाही. त्यांनी या देशात अजरामर वास्तूही निर्माण केल्या. समाज जीवनावर अमिट ठसा सोडणारी बरी वाईट कृत्येही केली. त्यातूनच आजचा भारतीय समाज आकाराला आला आहे. या देशाची एक विशिष्ट मानसिकता बनायला प्राचीन कालापासून भारतात झालेले हे सांस्कृतिक अभिसरणही जबाबदार आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

-संजय सोनवणी

 



Wednesday, December 4, 2024

सिंधू संस्कृतीची मालकी!

 सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आक्रमण सिद्धांताची पार्श्वभूमी होती. नंतर ऋग्वेदात मुंड भाषेतीळही काही शब्द आहेत याचा आधार घेऊन ही मुंडाची संस्कृती असावी असा अंदाज बांधणारी अनेक पुस्तके आदिवासी संशोधकांनी लिहिली. गेल्या काही वर्षात बौद्धही अधिकार सांगू लागले आहेत. तत्पूर्वी जैनांनीही आपला अधिकार सांगणे सुरु केले होते. वैदिकांचा तर हा उद्योग विशेषता: १९७० नंतर सुरु झाला आणि आता तर त्याचा वेग जास्तच वाढला आहे. पण सिंधू संस्कृतीतील एकही वैशिष्ट्य ऋग्वेदाने नोंदलेले नसल्याने हे दावे अंतरराष्ट्रीय पातळीवर फेटाळले गेले आहेत.

पण वास्तवे वेगळीच आहेत. priest king चा अंगावर जे वस्त्र आहे ते बेलबुट्टीदार आहे. अशी वस्त्रे घालण्याची परंपरा बौद्ध अथवा जैन धर्मात कधीही नव्हती. योगी स्वरूपातील मुद्रा आदीशिवाच्या आहेत असे मत जगातील बहुतेक (देशी आणि पाश्चात्य) संशोधकांनी मांडले आहे कारण अन्य मुद्रांवर वृषभ, त्रिशूल, शिकारी (किरात) ही आदिम शिवरूपे तर आहेतच पण काही मुद्रांवर देवीस्वरूपातील चित्रण आहे. कालीबंगन येथे आपण आज पुजतो तसेच शिवलिंग सापडले आहे. थोडक्यात आदिम लोकधर्म (ज्याला आपण आज हिंदू म्हणतो) त्यातीलच प्रतिमा मिळतात. गणेशाचेही आद्य रूप मुखवटा स्वरूपात मिळालेले आहे. या सन्स्क्रुती४च्या समांतर समन विचारही त्या काळात जन्माला आलेले असू शकतात. सिंधू संस्कृतीच्या वैभवशाली स्थितीत वैभवाचा लोभ ठेवल्याने निर्माण होणाऱ्या दुष्परिणामांची दखल घेत विरक्ती आलेले विचारवंत आपापला विचारव्यूह जन्माला घालू शाल्क्तात. पण सिंधू संस्कृती ही प्राधान्याने उत्पादक व व्यापारी तसेच शेतकऱ्याची संस्कृती होती, विरक्त साधूपुरुषांची नव्हे हे लक्षात घेतले पाहिजे.

बौद्ध धर्म अस्तित्वात आला तो सनपूर्व सहाशे मध्ये. जैन धर्म त्यापेक्षा प्राचीन आहे पण त्याची निर्मिती झाली ती मगध प्रांतात. सिंधू संस्कृतीची स्थळे आणि मगध यात शेकडो मैलांचे अंतर आहे. शिवाय या प्रांतात झालेल्या उत्खननांत सिंधू शैलीतील मुद्रा अथवा प्रतिमा मिळालेल्या नाहीत हेसुद्धा येथे लक्षणीय आहे.

योग हा निसंशय वेदपूर्व आहे, पण त्याची निर्मिती लोकधर्म आणि त्यातूनच निर्माण झालेल्या समन संस्कृतीने केलेली आहे. जैन धर्मीय आद्य तीर्थंकर ऋषभनाथांना योगाच्या निर्मितीचे श्रेय देतात तर हिंदू शिवाला. पुरातन बाबीबद्दल हवे ते इष्ट वाटणारे दावे करता येतात हे एक वास्तव आहे. पण समन संस्कृती ही विविध तात्विक विचारधारांची संस्कृती होती व सर्व जीवांना समान मानने हा त्यांच्यातील समानतेचा एक धागा होता. पण प्रत्येकाचे ईश्वर, मोक्ष, साधनामार्ग, सामाजिक जीवन, सन्यास याविषयीचे विचार स्वतंत्र होते. बौद्ध, जैन व आजीवक धर्म त्यामुळेच पृथक आहेत. पुढे आजीवक धर्म नष्ट झाला तर जैन व बौद्धांत अनेक शाखा निर्माण झाल्या कारण त्यांचीही आपल्या धर्ममतांबद्दल एकवाक्यता राहिली नाही. आजचे नवबौद्ध नेमक्या कोणत्या शाखेचे आहेत, म्हणजे हीनयान, महायान, वज्रयान, की अन्य हे त्यांनाही सांगता येईल असे वाटत नाही.

शिवाबद्दल म्हणाल तर जैनांचे आद्य तीर्थंकर ऋषभनाथ यांच्या निर्वाणानंतर तेथे शिव आपल्या पत्नीसह उपस्थित झाले असा स्पष्ट उल्लेख जंबूदद्दीवपन्नती या प्राचीन जैन ग्रंथात येतो. म्हणजे शिव संकल्पनेचे पुर्वास्तीत्व जैनान्नाही मान्य होते.  पुरातत्वीय पुराव्यानुसार बाघोर येथे सनपूर्व ९००० मधील पूजनात असलेली योनी प्रतिमा मिळाली आहे तर त्याच काळातील लिंग महाराष्ट्रात मिळाले आहे. जननक्रियेला दैवी रूप देत ही पूजा स्वतंत्र रुपाने होत होती आणि नंतर सनपूर्व २९०० मध्ये स्त्री आणि पुरुष लिंगाचे एकत्रीकरण करण्यात आले. शिव-उमा यांना मनुष्यच नव्हे तर अखिल विश्वाचे जन्मदाते मानले जाऊ लागले. प्राचीन मानवाच्या दृष्टीने हे स्वाभाविक होते.

समन विचारधारा ही कोणा एकाचीच मालकी नाही. जैनांनी आपले तत्वज्ञान स्वतंत्र रूपाने विकसित करत नेले. त्यात कालौघात अनेक भर पडत गेली व तत्वज्ञानाचा विकासही होत राहिला. त्यातही वैचारिक भेद निर्माण झाल्याने दोन मुख्य पंथ निर्माण झाले हा इतिहास आहे. बौद्धांनी पूर्वबौद्ध ही संकल्पना विकसित केली ती इसवी सनाच्या पहिल्या शतकाच्या आसपास. पण ऐतिहासिक दृष्ट्या या संकल्पनेला पाठबळ देणारा एकही पुरावा नाही. बौद्ध धर्म्नाने समन संस्कृतीतील काही विचार स्वीकारले तर काही नाकारत स्वतंत्र विचार दिले या दृष्टीने गौतम बुद्धाचे महत्व निर्विवाद आहे. पण सरळ सिंधू संस्कृतीचे जन्मदाते म्हणवणे हा सत्याचा अपलाप आहे एवढेच.

-संजय सोनवणी 

“पउमचरिय”: रामकथेवरील आद्य महाकाव्य

          भारतीयांवरील रामकथेची मोहिनी अचाट आहे. रामकथेचे मूळ नेमक्या कोणत्या स्त्रोतात आहे हे शोधण्याचाही प्रयत्न झाला आहे. परंपरेने वाल्...