चीनच्या डीपसीकने अलीकडेच जगभर कसा हादरा दिला याचे वृत्त सर्वांनीच वाचले असेल. त्यावर चर्चाही केल्या असतील. भारतही आपने स्वत:चे ए.आय. बनवणार असल्याच्याही बातम्या आपण वाचल्या असतील. यंदाच्याच अर्थसंकल्पात भारत सरकारने कृत्रिम बुद्धीमत्तेच्या अभ्यासासाठी पाचशे कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. एकीकडे कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे हाहा:कार उडेल, मानवाचे स्थान धोक्यात येईल अशी भीतीदायक भाकिते वर्तवली जात असतानाच दुसरीकडे अवाढव्य कॉर्पोरेट्स ते सरकारे कृत्रिम बुद्धीमत्तेतील आपली गुंतवणूक वाढवत नेत आहेत असे चित्र आपल्याला दिसते. भविष्यात हा वेग कमी होण्याची चिन्हे दिसत नसली तरी एकुणातच कृत्रिम बुद्धिमत्तेचे केले गेलेले चित्रण आणि वास्तवातील ए.आय. यात अजूनही खूप मोठी दरी असल्याने एकुणातच या क्षेत्रातील गुंतवणूक भविष्यात याच गतीने होत राहील की ती घटत जाईल याबाबत जागतिक अर्थतज्ञ साशंक आहेत. असे का व्हावे यामागे काही कारणे आहेत.
चॅटजीपीटी आणि डीपसीकमध्ये
नेमके काय अंतर आहे हेही या निमित्ताने लक्षात येवू लागले आहे. उदा. चीनचे
हितसंबंध ज्यात गुंतलेले आहेत अशा प्रश्नांबाबतची उत्तरे डीपसीक चीनधार्जिण्या
पद्धतीने देते. तसे चॅट जीपीटीबाबत अमेरिकाधार्जिणी उत्तरे मिळतात असा उघड आरोप अद्याप
कोणी केला नसला तरी तसे नसेलच असे खात्रीलायकरीत्या विधान करता येणार नाही. याचे
मुख्य कारण म्हणजे ज्या प्रकारच्या आणि ‘निवडक’ माहितीचा साठा कृत्रिम
बुद्धिमत्तेला पुरवला जातो त्यावर आधारित अशीच उत्तरे ही टूल्स पुरवत असतात.
स्वत:चे काही वापरण्याची सोय सध्याच्या तरी तंत्रज्ञानात नाही. प्रचंड माहितीचे दिलेल्या
गणिती पद्धतीने वेगात विश्लेषण करून निर्णय घेण्यास उपयुक्त माहिती समोर ठेवणे अथवा
वारंवारिता असलेल्या कृती करणे या कामात कृत्रिम बुद्धीमत्ता/रोबोटिक्स बऱ्यापैकी यशस्वी
होते आहे. पण कृत्रिम बुद्धीमत्ता समग्र नाही तर प्रत्येक क्षेत्रात त्या कामाची उद्दिष्टे
निश्चित करून तुकड्या-तुकड्यात तयार केली जाणारी प्रणाली आहे.
मानवी मेंदूत मज्जातंतूंचे
जाळे (न्यूरल नेटवर्क) असते जे वेगाने बहुस्तरीय विश्लेषण करून निर्णय घेते
त्याप्रमाणेच संगणकीय पद्धतीने ते व्हावे म्हणून “न्यूरल नेटवर्क” ही संज्ञा
जशीच्या तशी राबवण्याची कल्पना यामागे आहे. पण यात माहितीचा जोही संच पूरवावा
लागतो तो माणसांना. त्यात चुका होऊ शकतात आणि त्याच चुका मग प्रणाली करत राहणार.
त्यात वारंवार सुधारणा कराव्या लागतात, आदेश बदलत रहावे लागतात. पण हे स्वत:च विकसित
करण्यासाठी जी “प्रज्ञा” आवश्यक असते ती संगणकीय प्रणालीत नसते. त्यामुळे कृत्रिम
बुद्धीमत्ता मानवावलंबित होऊन जाते.
एकाच प्रकारचे काम
सातत्याने करावे लागत असेल, जेथे वेगवेगळ्या स्थिती निर्माण होऊन कार्यपद्धतीत बदल
करावा लागत नसेल अशा सांगकाम्या म्हणता येतील अशा कार्यांसाठी कृत्रिम बुद्धीमत्ता
किंवा मर्यादित हेतूने बनवलेले यंत्रमानव उपयुक्त ठरतात हे खरे. माणसाला पर्याय
म्हणून कृत्रिम बुद्धीमत्ता कधी उभी राहील काय या प्रश्नाचे उत्तर अनेकांनी
विज्ञान कादंबऱ्या-कथा ते चित्रपटांत शोधण्याचा प्रयत्न झाला आहे. सैद्धांतिक
पातळीवरही यावर खूप काम झाले आहे आणि होत राहणार आहे. भविष्यात यात कधीकाळी यश मिळेल
की नाही यासाठी आपण काही मुद्द्यांवर चर्चा करूयात.
मनुष्य हा जीवप्रणालीतील सजीव हिस्सा आहे. पृथ्वी सोडता अजून विश्वात मानव आहे की नाही याबाबत साशंकता असली तरी तो शोधही अविरत सुरु आहे. मनुष्याचे मुलभूत वैशिष्ट्य म्हणजे तो विचार करतो. त्याला संवेदना आहेत. त्याच्यात अंतर्स्फुर्ती आहे. तो स्वत:च आपले उद्दिष्ट ठरवू शकतो किंवा भवतालातून ते निवडू शकतो. तो स्वप्ने पाहतो. तो बिकट स्थितीतही वरकरणी अतार्किक वाटले तरी तसे निर्णय घेऊन स्वत:ला सुरक्षित ठेवू शकतो. तो स्वत:लाच स्वत: विकसित किंवा अध:पतित करत नेवू शकतो. प्रत्येकाच्या स्वभाव प्रेरणा वेगळ्या असून प्रत्येकाची शिकण्याची पद्धत एकजिनसी नसून बहुजिनसी आहे. तो इतिहासाचे, पुरातत्वीय पुराव्यांचे वेगवेगळे आकलन आणि विश्लेषण करू शकतो. त्यामुळेच प्राचीन संस्कृतींचे प्रत्येक इतिहासकाराचे आकलन आणि विश्लेषण भिन्न आहे. एकाच प्रकारच्या दृश्यातूनही वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असतात. उदा. एखादे नवे स्थान पाहिले तर कोणाला चित्र काढावेसे वाटेल, कोणाला कविता ‘सुचेल’, कोणाच्या मनात तात्विक विचार येतील तर कोणाच्या मनात उदासीनता जन्माला येईल किंवा कोणाला गावे असेही वाटू शकेल. . प्रतिक्रिया एवढ्याच मर्यादित राहत नाहीत तर त्या अगणित प्रकारच्या संभावनांनी व्यापलेल्या असतात. माणूस इतिहास, वर्तमान आणि नजीकचे किंवा दूरचे भविष्य या बाबतीत शिकलेल्या, शिकवलेल्या, वाचलेल्या अथवा ऐकलेल्या विवेचनाला जसेच्या तसे स्वीकारत नाही तर त्याला स्वत:चे काहीतरी जोडत असतो. अगदी ईश्वर ही संकल्पना घेतली व ती बव्हंशी जगमान्य असली तरी प्रत्येकाच्या ईश्वरविषयक संकल्पना समान असल्याचे आढळून येणार नाही. मुळात मनुष्य हे जैविक उत्पादन असल्याने व मानवी मेंदूत दहा अब्जांपेक्षा अधिक न्यूरॉन्स आहेत. मुळात मानवी मेंदू कसे कार्य करतो हे अद्याप कोडेच राहिलेले आहे. अगदी भाषेच्या संदर्भातही मेंदूतील नेमके कोणते केंद्रक काम करते आणि कसे करते हेच माणसाला अद्याप उलगडले नसल्याने भाषेच्या जन्माचा आणि भाषा शिकण्याच्या कौशल्याची कार्यप्रणाली नेमकी कशी घडते हे अद्याप आपल्याला निश्चयाने माहित नाही.
या अल्प पार्श्वभूमीवर सध्याची कृत्रिम बुद्धीमत्ता बाल्यावस्थेतही नाही असे म्हणावे लागेल. स्वयंप्रेरणेने विचार करू शकणारे, संवेदना, अंतर्स्फुर्ती असू शकेल असे ए.आय. निर्माण होऊ शकेल काय? नवीन विचार, स्वप्ने पाहणे जमू शकेल काय? तो स्वत:च विशिष्ट उद्देश्य निर्माण करून स्वत:लाच त्या दिशेने विकसित करणारे कोडींग करू शकतो काय? कारण विकासासाठी दृष्टी लागते, दिशा लागते. या जैव प्रेरणा आहेत. त्या यांत्रिक अथवा कृत्रिम नसतात. तिला (सांगितले नसेल तर) विविध पर्यायांतून एकाची तारतम्याने विचार करून निवड करता येणेही शक्य नाही.
आजतरी ए.आय. माणसाचा सांगकाम्या चाकर आहे व ए.आय.चे प्रत्येक साधन (टूल) विशिष्ट हेतूंनी विकसित केलेले आहे. मुळात माहिती कशी पुरवली गेलेली आहे त्याप्रमाणेच ते वर्तन करेल. त्याला ‘स्व-आकलन-संवेदना’ हा गुणधर्म नसल्याने आकलन-निर्णय व त्याचे परिणाम याबाबत ए.आय. उदासीन असते. त्यात सध्याचे ए.आय. तुकड्या-तुकड्यात आणि मर्यादित हेतुकेंद्रीत आहे. त्याच्यात केली जाणारी अवाढव्य गुंतवणूक आणि परतावा यातील गुणोत्तराचा आज एक प्रश्न बनलेला आहे. अशा स्थितीत पुढची वाटचाल कशी होईल? माणसालाच रिप्लेस करणारी समग्र कृत्रिम बुद्धीमत्ता कधी अस्तित्वात येईल काय यावर आपण पुढील लेखात विचार करू.
-संजय सोनवणी