Tuesday, August 26, 2014

खरे मराठी साहित्य...
"खरे मराठी साहित्य अजून यायचेच असून आजवरचे मराठी साहित्य म्हणजे "जेमतेम साहित्य" आहे. साहित्य म्हणजे समाजमनाचा, त्याच्या वर्तमानाचा, भुतकालीन सावटाचा आणि त्यातून निर्माण होणा-या आशा-आकांक्षांचा आरसा असेल तर अपवादात्मग भाग सोडला तर मराठीत सार्वकालिक म्हणता येईल असे साहित्य नाही.

"मराठी साहित्यिक हा अनुभवांच्या स्वनिर्मित मर्यादांच्या चौकटीत अडकवून घेत, ना स्वत:साठी ना वाचकांसाठी लिहित जात प्रसिद्धी आणि पारितोषिके याच त्याच्या जर साहित्यप्रेरणा असतील तर मराठीचे साहित्य हे खपत नाही, वाचले जात नाही या तक्रारी निरर्थक होऊन जातात.

"महाराष्ट्र हा प्राचीन काळापासून ते आजतागायत धार्मिक, वैचारिक, सामाजीक चळवळींनी गजबजलेला आहे. त्याचे प्रतिबिंब/विश्लेषन अथवा त्या त्या चळवळी व त्या त्या काळचे सामाजिक मानसशास्त्र कोणत्याही कादंबरीत येत नाही. जे चित्रण आहे ते वरकरणी व वाचकशरण असेच आहे. परंपरावाद्यांनी पुराणकथांतील व इतिहासातील पात्रांचे पुनरुज्जीवनवादी भांडवल केले तर विद्रोहवाद्यांनी त्या पात्रांचे निखळ द्वेषपूर्ण चित्रण केले. यात पात्रे व समाज कोठे होता? अशाने ज्याला आपण "निखळ साहित्य" म्हणू ते कोठे राहते?

"आणि यातून समाजजीवनाला सुदृढ विचारी बनवायची परंपरा निर्माण होते काय? याचे उत्तर आहे आम्ही साहित्यातून भरीव असे काहीही देवू शकलो नाही. त्यामुळे अलीकडच्या सर्वच सामाजिक चळवळीही साहित्यबंधापासून पुरत्या अलिप्त आहेत. त्यांना तत्वज्ञान देतील असे बळ साहित्यिकांत नाही. ते नाही तर नाही, त्यांचे यथास्थित चित्रणही साहित्यात होत नाही.

"जातीअंत हे आदर्श मानले तर चळवळीच जातींत विखुरल्या आहेत. छोटे-मोठे नेते जातींतच आपले अस्तित्व शोधत आहेत. साहित्यिकही त्याला अपवाद नाहीत. आपल्याच जातीच्या चौकडीत साहित्यिक म्हनून मिरवण्यात जर साहित्यिक धन्यता मानत असतील व इतरांकडे उपहासाने पाहत असतील तर साहित्य आणि साहित्यिकाला अर्थ काय राहिला? "दलित" हा शब्द बाबासाहेबांच्या "Broken Man" सिद्धांताशी जवळ जात दलित या संज्ञेत सर्व पुर्वास्पृष्य, आदिवासी, भटके-विमूक्त व श्रमिक-मजूरही आहेत अशी ती व्यापक संज्ञा होती. परंतू ती बरोबर एकाच जातीच्या मर्यादेत साहित्य व तत्वज्ञान म्हणूनही विसावली आहे. त्यामुळे दलित चळवळही भरकटली आहे. नव्या काळाला सुसंगत असे तत्वज्ञान व तसे साहित्य निर्माण करण्यात घोर अपयश आले आहे."सध्या दिखावू चळवळ्यांपेक्षा समाजाच्या मनातच जी सूप्त चळवळ सतत चालू असते ती लिहिली जात नाही, रस्त्यावर सहसा येत नाही, पण तीच खरे बदल घडवते. त्या चळवळीला अजून वैचारिक अधिष्ठाण साहित्यिकांना देता येत नाही हे त्यांचे दुर्दैव!"

"जागतिकीकरणामुळे नातेसंबंधांची फेरआखणी होत आहे. नवे तानतणाव निर्माण होत आहेत. निराधार व वृद्धांसाठी आश्रम वाढत आहेत. पती-पत्नी, भाऊ-बहीण, पिता-माता-पूत्र या नात्यांचे संदर्भ बदलत चालले आहेत. आर्थिक, सामाजिक आणि राजकीय संदर्भही झपाट्याने बदलत आहेत. पण आमचा लेखक कोठेतरी हरवला आहे. आम्हाला लेखकाचाच शोध आहे."


( भांडुप (पूर्व) येथे (24/8/14) झालेल्या साहित्य संगीतीतील "आजचे समाज वास्तव-साहित्य आणि चळवळ" या परिसंवादात बोलतांना मी. सोबत माझे मित्र, सा. विवेकचे संपादक रवींद्र गोळे..या संगीतीचे आयोजक. नेटके आयोजन, प्रगल्भ श्रोते यामुळे सहभाग घेतल्याचे खरेच समाधान मिळाले.)