पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्या आसपास सायरसचा मृत्यू झाल्याने त्याचे पुढील विस्तार करण्याचे धोरण अर्धवट राहिले. त्याच्या मृत्युनंतर काही काळाने दारियस (पहिला) बंड करून सत्तेवर आला. त्याने सत्तेत जम बसवल्यानंतर इसपू पाचशे अठरामध्ये सायरसचे अपूर्ण राहिलेले विस्ताराचे काम सुरु केले. पर्शियन सेना झेलम नदीपर्यंत, म्हणजे आजच्या पंजाबपर्यंत, पुढे घुसल्या आणि तेथवर अकेमेनिड साम्राज्याचा विस्तार झाला.
त्यावेळी भारताच्या पंजाब ते गांधारपर्यंतच्या भागात शिबी, अहिर, शुद्र, दरद, तक्षकसारख्या अनेक जमातींची अनेक स्वतंत्र पण छोटी राज्ये होती. या जमाती-जमातींत कधी मैत्रीचे तर कधी शत्रुत्वाचे संबंध असत. सुपीक प्रदेश असल्याने धनसंपत्तीही मुबलक होती. जमातीची लोकसंख्या मर्यादित असल्याने व जमातवाद हा मानसिकतेवर राज्य करणारा प्रबळ घटक असल्याने राज्यविस्तार हा कोणाचाही हेतू नसे. हे चित्र त्या काळात देशात सर्वत्र होते. उत्तर व पूर्व भारतात याच काळात बुद्ध-महावीर यांसारखे धर्मसंस्थापक उदयाला आले. तेव्हाचे बौद्ध व जैन साहित्य आपण पाहिले तर तेव्हाही उत्तरेत शाक्य, मल्ल, लिच्छवी, अंग, वंग, कुरु, पांचाल, मत्स्य, शूरसेन इ. बहुतेक राज्य ही जमात-राज्यच होती हे आपल्या लक्षात येईल. मगधच्या बिंबीसाराचे राज्य त्यातल्या त्यात मोठे होते आणि त्याने महावीर व गौतम बुद्धाला उदार आश्रय दिला होता. असे असले तरी साम्राज्यनिर्मिती असे व्यापक ध्येय भारतात सुरु झाले ते नंद सम्राटांमुळे आणि त्यावर कळस चढवला तो सम्राट चंद्रगुप्ताने. पण त्यालाही ग्रीक आक्रमणाची पार्श्वभूमी होती. पश्चिमोत्तर भारतात मात्र जमात-राज्यांची प्रथा दीर्घकाळ टिकून राहिल्याने सायरस व दारियससारख्या विस्तारवादी आणि महत्वाकांक्षी सम्राटांना ही संधी वाटली असल्यास आश्चर्य नाही. शिवाय या भागातील उत्पादन, व्यापार यामुळे आलेली समृद्धी त्यांना जास्त आकर्षित करणार हे उघड होते आणि तसेच झालेही.
हिंदूकुश आणि ब्राहुई पर्वतरांगांनी पूर्व पर्शिया (किंवा इराण) हा भाग भारतापासून भौगोलिक दृष्ट्या तोडलेला तर आहेच पण या भागातील पर्वतमय दुर्गमतेने आणि विषम हवामानाने या भागाला तसे कंगालच ठेवले होते. या भागात टोळ्यांचेच राज्य राहिले आहे. सन १७४७ मध्ये मोहम्मदशहा अब्दालीने हा भाग अफगाणिस्तान नाव देत स्वतंत्र केला आणि अफगाणिस्तान (प्राचीन इराणचा भाग) स्वतंत्र केला. त्यासाठी त्याला अफगाणिस्तानचा ‘राष्ट्रपिता’ असे म्हटले जाते. सायरस व दारियसच्या काळात अफगाणिस्तानची स्थिती नेमकी काय होती हेही आपण पाहिले तर भारतीय राजे या भागात घुसण्यास का उत्सुक नसायचे हे आपल्या लक्षात येईल. त्यावेळेस खुश्कीचाच मार्ग व्यापारासाठी वापरला जात असल्याने पूर्व व पश्चिम आशियाला जाणारे व्यापारी मार्ग याच भागातून जात. बाल्ख-कंदाहार हे व्यापारी मार्गांचे जंक्शन असल्यामुळे ही शहरे भरभराटीला आली असली तरी स्थानिक उत्पादन मात्र नगण्य असे. सिंधू संस्कृतीतील व्यापा-यांनी कंदाहार प्रांतात मुंदीगाक आणि आमु दरिया नदीच्या खो-यात शोतुर्गाई ही शहरे वसवली ती कच्च्या मालाची सुलभ आयात व्हावी यासाठी, पण या भागात सत्ता वसवावी असे वाटावे असे कररुपी उत्पन्न मात्र कमी असल्याने सत्ताधा-यांकडून तसे प्रयत्न झालेले दिसत नाही. पण बोलन आणि खैबर खिंडीतून पश्चिम व मध्य आशियातून भारतात स्थलांतरे व आक्रमणे होण्याची प्रक्रिया मात्र कायम राहिली. पण या भागात सायरसच्या आधी दीर्घकाळ सत्ता स्थापित करण्यात मात्र कोणी यशस्वी झाल्याचे दिसत नाही. सायरसने मात्र ही परंपरा बदलली आणि आपल्या साम्राज्याचा एक भाग म्हणून सिंधू नदीपर्यंत सत्ता विस्तारली व पहिल्या दारियसने ती सीमा अजून पुढे झेलम नदीपर्यंत विस्तारली. थोडक्यात भारतातील एक सुपीक व समृद्ध भाग पर्शियन साम्राज्याचा भाग बनला. स्थानिक सत्ता सायरस व नंतर दारियस आणि त्याच्या वंशजांचे मांडलिक म्हणून काम करत असल्या तरी खरी सत्ता चाले ती अकेमेनिड सम्राटांनी नेमलेल्या क्षत्रपांमार्फत.
अकेमेनिड साम्राज्याचा मुख्य धर्म झरथूस्त्री (पारशी) हाच राहिला. हा धर्म ख्रिस्ती धर्माच्या उदयापूर्वी जगात सर्वात मोठा धर्म बनला तो अकिमेनिड सम्राटांच्या काळात. कारण हे साम्राज्य झेलम नदीपासून ते पार इजिप्तपर्यंत पसरले होते. पश्चिम इराणमध्ये सापडलेल्या दारियसच्या बेहिस्तून शिलालेखात त्याच्या विशाल साम्राज्यात मोडणा-या सर्व प्रदेशांची नावे खोदलेली आहेत. दारियस (पहिला)च्या काळात अवेस्ता प्रथमच गायीच्या चामड्यावर लिप्यांकित करण्यात आला. भारताच्या पश्चिमोत्तर भागात (अगदी तक्षशिलेतही) या धर्माने चांगले पाय रोवले होते आणि याचे वर्णन अलेक्झांडरच्या भारत आक्रमणासंदर्भात माहिती देत असतांना डायोडोरस या इतिहासकाराने करून ठेवलेले आहे. राजाचा जो धर्म तो प्रजेचाही धर्म बनून जातो तो असा. एवढ्या मोठ्या साम्राज्याचे प्रशासन सांभाळण्यासाठी या सम्राटांनी नवी व्यवस्था बनवली. पर्शियन भाषेला राजव्यवहारात महत्व आले. व्यापारवृद्धी हा त्याचा प्रधान उद्देश असल्याचे त्याने कार्यांद्राचा स्कायल्याक्स या ग्रीक दर्यावर्द्याला सिंधू नदीचे सर्वेक्षण करून या नदीतून सुएजच्या द्वीपकल्पापर्यंत जहाजे हाकारण्याच्या मार्ग शोधण्यासाठी नियुक्त केले होते यावरून दिसते. हिरोडोटसने दिलेल्या माहितीनुसार या नदी व समुद्रमार्गे स्कायल्याक्स इजिप्तमध्ये गेला व त्यानंतरच दारियसने भारतातील आपला साम्राज्यविस्तार करून सिंधू नदीच्या दक्षिण भागातल्या जमातीवरही आधिपत्य मिळवले व सागरी व्यापार आपल्या ताब्यात आणला.
दारियसचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या वारसांनीही भारताचा दारियसने जिंकून घेतलेला भारतीय भाग आपल्या ताब्यात ठेवला असला तरी इसपू ३३० मध्ये मेसोडोनियाचा अलेक्झांडरच्या वादळापुढे अकेमेनिड साम्राज्य कोलमडून पडले व नष्ट झाले. त्यावेळेस दारियस (तिसरा) सत्तेवर होता. भारतीय भागावरील त्याची पकड गेलेली असून अनेक मांडलिक राजे स्वतंत्र झालेले दिसतात ते पुन्हा अलेक्झांडरचे मांडलिक होण्यासाठी. तिस-या दारियसच्या काळातही अनेक भारतीय सैनिक व सेनानी पर्शियन साम्राज्याच्या सेनेत होते असेही इतिहासावरून दिसते. आताच्या कुर्दीस्तानमधील अराबेला येथे अलेक्झांडरच्या सैन्याशी पर्शियनांचे युद्ध झाले. या युद्धातील पराजयाने पर्शियन साम्राज्याचा अस्त केला. या युद्धात दारियस (तिसरा)च्या बाजूने भारतीयांचे हत्तीदळ उपस्थित होते असे ग्रीक इतिहासकार नोंदवतात.
शेवटच्या काळात विस्कळीत झाली असली तरी जवळपास दोनशे वर्ष पंजाब-सिंध-गिलगीट-बाल्टीस्तान या विस्तृत भागावर पर्शियन सत्ता आपली पकड ठेऊन होती. या काळाने भारतीय कला, भाषा, वास्तुरचना, लेण्याची व शिलालेख खोदण्याची कला भारताला दिली, पण भारतीयांच्या मानसिकतेवरही विपरीत परिणाम केला. त्यामुळे पाठोपाठ ग्रीक आक्रमण झाल्यानंतर त्यांनाही विशेष प्रतिरोध झाला नाही.
-संजय सोनवणी
No comments:
Post a Comment