Sunday, January 4, 2015

धर्म:तारक कि मारक?


१) धर्माबाबत भारतात गेली सात महिने ज्या पद्धतीने वादळी विधाने केली जात आहेत ती पाहता या देशात धर्माखेरीज अन्य प्रश्न शिल्लक नसावेत असे वाटू लागते. धर्म म्हणजे काय हे माहित नसतांना धर्माची चर्चा व्हावी हे त्याहुनही विशेष.

२) पुरातन काळी माणुस टोळ्यांनी राही. अन्न व शिकारीच्या शोधात तो भटकत असे. निसर्गातील अनाकलनीय घडामोडी, असुरक्षा व भय या जाणीवांतून त्याने सुष्ट आणि दुष्ट शक्तींची आपापल्या कल्पनांप्रमाणे विभागणी केली. काही टोळ्यांसाठी जे दुष्ट होते ते काही टोळ्यांसाठी सृष्ट होते. उदा. झरथुष्ट्राच्या धर्मात असूर पुजनीय तर वैदिकांच्या धर्मात असूर अपुजनीय-दुष्ट. देवतांचा व दानवांचा जन्म त्या कल्पनांतुन झाला. वर्चस्वाचे लढे पुरातन आहेत, त्यातुन देवता व नैतिक संकल्पना पसरवण्याचे/लादण्याचे प्रयत्न झाले आहेत. त्यातुन हिंसाचारही घडला आहे.

३) जगात पुरातन काळी अनेक बलाढ्य संस्कृत्या अस्तित्वात आल्या. अस्सीरियन/इजिप्शियन या महत्वाच्या संस्कृत्या. त्यांचेही देव होते, धर्म होते. पण या संस्कृत्या नष्ट झाल्या. त्यांचे देव त्या संस्कृत्या वाचवु शकल्या नाहीत. ्म्हणजे देव हा सर्वशक्तीमान असतो हे सत्य नाही. ती सदाचरणासाठी एक नैतिक बळ म्हणून चांगली संकल्पना असली तरी तिला प्रत्यक्ष असा कसलाही आधार नाही.

४) धर्मामुळे जगभर जेवढी हिंसा झाली आहे तेवढी राजकीय युद्धांत झालेली नाही. किंबहुना धर्म हा बहुतेक युद्धांत कळीचा मुद्दा होता व आहे. ज्यु विरुद्ध इजिप्शियन, नंतर ज्यु विरुद्ध ख्रिस्ती आणि नंतर इस्लामच्या जन्मानंतर ज्यु-ख्रिस्ती-इस्लाम अशा वर्चस्वाच्या तिरंगी रक्तरंजित सामन्याची सुरुवात झाली. क्रुसेडस्ने त्यात भरच पडली. आता मुस्लिम विरुद्ध मुस्लिम अशीही भर पडली आहे. हे धर्म कृषीसंस्कृतीतुन निर्माण झालेले नाहीत, स्वाभाविकच टोळी (कबिला) जीवनाचे असणारे वेगळेच आक्रमक तत्वज्ञान त्यात आहे. वैदिक धर्मही टोळीजीवनातुन निर्माण झाल्याने त्यातही युद्धखोरपणा, आक्रमकता याचे तत्वज्ञान आहे. पण अहिंसक तत्वज्ञानाचे गायन करणारे धर्मही हिंसक/दहशतवादी बनु शकतात हे म्यानमारमधील घटनांनी सिद्ध केलेले आहे.

५) भारतीय धर्म हे कृषी संस्कृतीचे, स्थिर संस्कृतीचे आहेत. सुफलताविधी, सृजन हा त्यामुळेच येथील धर्माचा भाग आहे. सारे सणही कृषी संस्कृतीशी निगडित आहेत ते यामुळेच. थोडक्यात धर्म म्हणजे त्या त्या समाजाच्या मानसिकतेचे प्रतीक व त्याला बळ देणारे तत्वज्ञान. प्रत्येक धर्म आपला धर्म श्रेष्ठ आणि पुरातन हे सांगतो. या श्रेष्ठतावादाच्या संघर्षात "माणुस" मात्र दुर्लक्षित राहिला आहे. धर्म हेच अधर्म बनत आहेत.

६) माणसाला धर्माने काहीही दिलेले नाही. जे दिले आहे ते विज्ञानाने व विकासवादाने दिले आहे. तेथे मग न्युटन ख्रिस्ती होता, आईन्स्टाईन ज्यु होता, मध्ययुगातील शेकडो ते अलीकडचे फारुक-उल-अबाझ असे अनेक शास्त्रज्ञ मुस्लिम होते. ते विज्ञान धर्मांचे नव्हे तर मानवतेचे होते. मग धर्म राहिले कोठे? धर्मांनी माणसाला जे दिले नाही ते विज्ञानाने दिले व आज त्याचाच उपयोग करत धर्मांध लोक आपली वर्चस्वतावादी तत्वज्ञानांना, मिथ्या-विज्ञानांना पसरवण्यासाठी वापरत आहेत. भारतातील वैदिक धर्मीय हिंदू नांवाखाली हा उद्योग अहर्निशपणे करत आले आहेत. आता तर त्यात दिवसेंदिवस उन्मादी भर पडत आहे. त्यामुळे बहुजनांत न्युनगंड वाढवला जातो. आपल्याच धर्म/देवता याबाबत संभ्रम निर्माण केला जातो आणि धर्माच्या दास्यातच रहावे असाही नकळत संदेश दिला जातो. परमेश्वर नाही पण ती एक संकल्पना आहे. तिच्यावर प्रेम अवश्य करा, पण त्यासाठी हे बुवा-बापू ते मंदिरांची गरज काय याचाही विचार करा.आताच तुम्ही सरस्वतीपुजन केले. मुळात ही तुमची देवता नाही. विद्येचे देवता असलाच तर गणेश आहे. आणि खरे दैवत मानायचे तर बहुजनांसाठी ते सावित्रीमाई आणि म. फुले आहेत. प्रतीके सारीच चांगली असली तरी वर्चस्वतावादासाठी निर्माण केली गेलेली प्रतीके नाकारायला शिकले पाहिजे.

७) धर्म तारक आहे कि मारक? धर्म हा मुळात माणसाने नीतिमान होण्यासाठी निर्माण केला गेलेला एक मार्ग आहे. जोवर माणुसकीचा कळवळा आहे तोवर धर्म आहे, मग त्याला काहीही नांव द्या. तुकोबारायांनी "जे का रंजले-गांजले-त्याशी म्हणे जो आपुले..." म्हणून ठेवलय तेच ख-या धर्मांचे सार आहे. याप्रमाणे जगत राहिलो तर धर्म नक्कीच तारक ठरेल. आणि याविरुद्ध गेलात तर मग मुळात तेथे धर्मच राहत नसल्याने धर्म मारक ठरेल. शेवटी धरमातील लोक कसे वागतात-विचार करतात त्यावर धर्म चांगला कि वाईट हे ठरते. तुम्ही स्वत: कोण आहात हे शोधा...मग धर्म उपयुक्त कि अनुपयुक्त याचे उत्तर तुम्हाला मिळेल.

(काल माळेवाडी, श्रीरामपुर येथे "धर्म:तारक कि मारक" या व्याख्यानातील महत्वाचे मुद्दे.)


4 comments:

  1. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, विठ्ठल रामजी शिंदे, न्या. रानडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गाडगेबाबा या सर्वांनी कठोर धर्मचिकित्सा करूनही धर्मभावनेलाच नकार का दिला नाही? आढळते ते असे की या सर्वांनी धर्माचा विचार आस्थेने व शोध घेण्याच्या बुद्धीने केला. त्यामधून त्यांनी समाजविन्मुख धर्म समाजसन्मुख केला. ईश्वरकेंदी धर्म मानवकेंदी केला. आज मात्र धर्माचे भ्रष्टीकरण व साधनीकरण होण्याचे भय वाढते आहे.

    .............

    धर्माभिमानाला जास्तीत जास्त तीव्रता व धर्मविचाराला ओहोटी असे महाराष्ट्रातले आजचे स्वरूप आहे. संतांनी धर्मभावना नैतिकतेकडे वळवली. ती आता धर्मांधतेकडे वळवली जात आहे. शिवाय हा सर्व अब्जावधी रुपयांचा व्यवसाय झाला आहे. धर्मभावनेचे बाजारीकरण, विकृतीकरण आणि राजकारण करणे चालू आहे.

    अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ प्रत्यक्ष कृतीच्या क्षेत्रात असल्याने आणि या विचाराचा संबंध हरघडी धर्माशी येत असल्याने धर्मचिकित्सा अपरिहार्य बनते. याच भावनेतून शनि शिंगणापूर येथील शनी देवाच्या चौथऱ्यावर महिलांना असलेली प्रवेशबंदी उठवावी यासाठी इ. स. २००० साली समितीने सत्याग्रह केला. या कल्पनेला भाजप व शिवसेना या पक्षांनी व त्यांच्या सर्व आघाड्यांनी टोकाचा विरोध केला. हजार सत्याग्रहींना अवघ्या ५० पावलांत अटक झाली. त्यामध्ये एन.डी. पाटील, श्रीराम लागू, बाबा आढाव, पुष्पा भावे अशा दिग्गजांचा समावेश होता. यामुळेच नंतर शनि शिंगणापूर व अंबाबाईच्या गाभाऱ्यातील महिलांचा प्रवेश यावर समितीने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. ती आता सुनावणीच्या अंतिम टप्प्यावर आहे.

    एवढ्यात 'अगा नवल वर्तले' याप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राम कदम यांनी विधानसभेत अंबाबाईच्या देवळात महिलांना प्रवेश मिळण्याची मागणी केली आणि नंतर दोनच दिवसांत भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष सहकाऱ्यांना घेऊन मंदिराच्या गाभाऱ्यात घुसल्या देखील. यामागे प्रसिद्धीचा भाग आहेच, पण स्त्री-पुरुष समतेच्या आग्रहाची तात्त्विक झालरही त्याला आहे. परंतु ही घटना अधिक गांभीर्याने पाहावयास हवी, ती व्यापक व साक्षेपी धर्मचिकित्सेच्या अंगाने.

    असा एक प्रश्न सहजच विचारता येण्यासारखा आहे की महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, विठ्ठल रामजी शिंदे, न्या. रानडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गाडगेबाबा या सर्वांनी कठोर धर्मचिकित्सा करूनही धर्मभावनेलाच नकार का दिला नाही? आढळते ते असे की या सर्वांनी धर्माचा विचार आस्थेने व शोध घेण्याच्या बुद्धीने केला. त्यामधून त्यांनी समाजविन्मुख धर्म समाजसन्मुख केला. परलोकवादी धर्म इहलोकवादी केला. ईश्वरकेंदी धर्म मानवकेंदी केला. धर्माचे भ्रष्टीकरण व साधनीकरण होण्याचे भय वाढते आहे.

    ReplyDelete
  2. महाराष्ट्रातील आजच्या प्रबोधनातून हा प्रश्न जवळजवळ रद्दबातल झाला आहे. धर्म निरपेक्षतेच्या अंगाने तो उपस्थित करण्याचा प्रयत्न केला तरी धर्माचे अघोषित प्रवक्ते त्याला तीव्र व हिंसक विरोध करतात, असा अंनिसचा अनुभव आहे. 'समाजाचे धारण करतो तो धर्म' ही आदर्श धर्माची व्याख्या झाली. जगात असा आदर्श धर्म कुठेही नाही. पण प्रत्येक धर्म स्वत:ला आदर्श मानतो. समाजाचे कल्याण कशामुळे होते? ते प्रत्यक्षात होते की नाही हे प्रत्येक धर्म स्वत: ठरवत असतो. आमचा धर्म धारणा करणाराच आहे असा प्रत्येक धर्माचा ठाम सिद्धांत असल्याने धर्माने धारणा होते की नाही हे प्रत्येक धर्म स्वत: ठरवत असतो. धर्माने धारणा होते की नाही ही शंका उपस्थित करणे धर्मदोहाचे लक्षण ठरते. धर्मासंबंधातील वादाचा खरा मुद्दा आदर्श धर्म कसा असावा हे सांगणे नाही; तर धर्म आदर्श नसल्यास तसे ठरवावे कोणी आणि ते बदलावे कोणी हा आहे. कोणताच धर्म असे अधामिर्क व धर्मदोही प्रश्ान् उपस्थित करू देणार नाही. भारताची राज्यघटना आज समाजाची धारणा करते. म्हणून राज्यघटनेला धर्मग्रंथ मानण्यास व त्यातील आदेशाला धर्म मानण्यास कोणताही धामिर्क तयार होत नाही. अंधश्रद्धा निर्मूलन समिती विधायक धर्मचिकित्सा करू इच्छिते; परंतु धर्माचा पगडा असलेल्या फार मोठ्या जनसमूहाला ही धर्मचिकित्सा म्हणजे धर्मद्रोह वाटतो.

    व्यवहारात जी धार्मिकता असते त्यात प्रथा, रूढी, कर्मकांडे, उपासना, पुरोहितशाही व अहिंसा, सत्य, अपरिग्रह व याच बरोबर समाज व्यवस्थेचे नियमन असे सर्वकाही असते. असे 'धर्मपण' व्यक्ती माणसात समाजमानसात एकवट मुरलेले असते. हा समाज धर्मनिरपेक्ष पद्धतीने घडवताना धर्माच्याच नावाने बळकट झालेल्या रूढी-परंपरा सर्वच धर्मांत प्रगतीला अडथळे ठरतात. चुकीच्या मार्गाने समाजाला नेतात. कोल्हापूर येथील महालक्ष्मीच्या मस्तकावर नागलिंगयोनी असावी असे मूळ धर्मशास्त्र सांगते. त्यामुळे मूर्तीची पूजा महिलांना नाकारली जाते असे पुजारी सांगतात हे आक्षेपार्ह मानून तेथे सत्याग्रह झाला हे चांगलेच झाले. पण मग मुलगीही दानपात्र वस्तू समजून मोठ्या हौसेने कन्यादान केले जाते, स्वत:च्या पोटात मूल वाढवणाऱ्या आईला वैध्यव्यामुळे तो (चुकीचा) हक्कही नाकारला जातो, हळदी कुंकवात विधवेला अघोषित मज्जाव असतो आणि शुभकार्यात तिचे पांढरे पाऊल न पडेल याची दक्षता घेतली जाते, या सर्वच बाबीनाही सक्रिय विरोध करणे आवश्यक आहे. हे तर उघड धर्मभंजन ठरेल.

    धर्माची चिकित्सा सुरू झाली की पुरोहितशाही तपासावी लागतेच. परमेश्वराला जेजे काही द्यावयाचे ते पुरोहितामार्फत देण्यात येते. व्यवहारात पुरोहितच त्याचा उपभोग घेतो अशी ही दलाल व्यवस्था आहे. पुरोहित स्वत:चे घट्ट हितसंबंध तयार करतात. महिलांना महालक्ष्मीच्या गाभाऱ्यात प्रवेश नाकारणारे तेथील पुजारी स्वत:च्या घरातील स्त्रियांना पूजेची मुभा देतात त्यावेळी या पुरोहितशाहीच्या ढोंगाचे दर्शन होते.

    सर्व धर्मांत ज्याला खरा धर्म म्हणतात त्यात सर्व बाबींचे पवित्र, अपवित्र व लौकिक अशा तीन गटांत वगीर्करण केलेले असते. उदा. धर्म ग्रंथ, मंदिर, पुरोहित हे पवित्र. प्रेत, रजस्वला स्त्री अपवित्र. भाजीपाला, कागद या लौकिक वस्तू. पावित्र्याच्या संकल्पनेमुळे वस्तूंच्या बाबतीत अंधश्रद्धेवर आधारलेली एक विषमता तयार होते. या विषमतेवर आघात करावयाचा तर अशी स्पष्ट भूमिका घ्यावयास हवी की पावित्र्याची संकल्पना व नीतिमूल्ये यांच्यामध्ये अंतर असते. समाज-धारणेसाठी पावित्र्याच्या संकल्पनेची आवश्यकता नाही. नीतिमूल्ये मात्र समाजधारणेला आवश्यक असतात. अर्थात समाजातील नीतिमूल्ये नीतीच्या नावाने कोणाचे अन्यायी हितसंबंध जपत असतील, कोणाला श्रेष्ठ वा कनिष्ठ ठरवीत असतील; तर ती नीतिमूल्ये ताज्यच मानावी लागतील.

    ReplyDelete
  3. भारतातील हिंदू धर्मांध संघटना स्थानिक स्वरूपाचे दहशतवादी हल्ल्यांचे कारस्थान करीत आहेत. त्यायोगे भारतात हिंदू दहशतवाद फोफावत चालला आहे, असा इशारा अमेरिकेच्या "सीआरएस' संस्थेने एका अहवालाद्वारे दिला. महाराष्ट्रातील मालेगाव आणि समझोता एक्‍स्प्रेसमधील बॉंबस्फोटांतून हिंदू दहशतवादाचा चेहरा उघड झाल्याचे त्यात म्हटले आहे.

    अमेरिकी कॉंग्रेसच्या संशोधन सेवेने (कॉंग्रेशनल रिसर्च सर्व्हिस) भारतावरील आपला अहवाल नुकताच सादर केला आहे. अमेरिकी कॉंग्रेसच्या सदस्यांसाठी "सीआरएस' ठराविक कालावधीनंतर वेगवेगळ्या विषयांवर संशोधन करून अहवाल सादर करीत असते. भारतावरील 94 पानी अहवालाची एक प्रत फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्ट या संघटनेने खुली केली आहे. त्यामध्ये ही माहिती उघड झाली आहे.

    "भारतातील हिंदू दहशतवाद हा नवा आणि वादग्रस्त विषय आहे. बॉंबस्फोटप्रकरणी एका लेफ्टनंट कर्नलसह नऊ जणांना अटक झाली होती. त्यांचे संबंध हिंदुत्ववादी पक्षाशी आहेत. हिंदू दहशतवादामुळे भारताच्या धर्मनिरपेक्षतेला मोठे आव्हान निर्माण होत आहे,' असे तपशील अमेरिकी कॉंग्रेस समितीच्या या अहवालात देण्यात आले आहेत.

    ReplyDelete

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...