संभाजीराजे म्हणजे साक्षात मृत्युवरही मात करणारे वीरपुरूष! घनघोर जंगलात असलेल्या, दर्याखोर्यांनी वेढलेल्या संगमेश्वर या सुरक्षित ठिकाणी त्यांना अटक झाली आणि त्यांचा मृत्युकडचा प्रवास सुरू झाला. मोगलांची अचानक पडलेली धाड, राजांना व कवी कलशाला झालेली अटक आणि पुढील 39 दिवसातील प्रवास वाचताना वाचक भारावून जातात.
‘झपाटलेपण’ हे तर लेखक संजय सोनवणी यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अविभाज्य अंग. वाचकही ही कादंबरी वाचताना झपाटून जातात. शिर्क्यांची खोड मोडून राजे संगमेश्वरला आले होते. संगमेश्वर दुर्गम आहे, दर्याखोर्यात आणि अरण्यात वेढलेले आहे, म्हणूनच नव्हे तर येथे येणारे मार्ग पूर्ण सुरक्षित केले गेलेले आहेत म्हणून सारेजण निगुतीत होते. मात्र स्वराज्याच्या शत्रुंनी, रायगडावरील मुत्सद्यांनी, काही घरभेद्यांनी कटकारस्थाने केली आणि कवी कलशासह संभाजीराजांना अटक झाली. सोनवणी लिहितात, ‘मानवी विश्वासाला सीमा असतात. स्वप्नातही कल्पना येणार नाही अशी आकस्मित संकटे माणसावर येतात. क्षणार्धात होत्याचे नव्हते होते.
संभाजीराजे म्हणजे आजवर अनवरत संघर्षांच्या तांडवांना छाताडावर झेलत स्थिरचित्त राहणारा साक्षात सह्याद्रीचा पहाड! पण दुष्टबुद्धीचे लोक विरोधात एकत्र आले की पहाडांनाही गलितगात्र व्हावे लागते हा मानवी जगाचा नियम! तो चिरकालिक नियम बनावा हे मानवजातीचे दुर्भाग्यच नव्हे काय?’ संभाजीराजांना अटक झाल्यानंतरही त्यांना सुटकेची आशा वाटत असते. त्यांच्या सहकार्यांवर त्यांचा विश्वास होता. कात्रज, शिरवळ, सातारा कुठूनतरी आपले शूरवीर मराठे चाल करून येतील, शत्रुचा नायनाट करून आपल्या बेड्या काढून टाकतील असे त्यांना वाटत राहते. मराठ्याच्या राजाला अत्यंत अपमानास्पदरित्या फरफटत नेले जाते; मात्र कुणीही मराठे त्यांना सोडवायला येत नाहीत. हातापायात बेड्या, चेहर्यावर पट्टी बांधलेली... संभाजीराजांना कुठे नेत आहेत हेही त्यांना ठाऊक नसते! या मानसिकतेतही त्यांची असहाय्यता, अगतिकता, उफाळून येणारा संताप, ठणकणार्या वेदना, आप्तस्वकियांकडून झालेली फसगत, त्यातूनच आलेली बेफिकीरी, मृत्युला दिलेले आव्हान असा सारा आशावादाकडून हतबलतेकडचा झालेला प्रवास वाचताना वाचकांच्या अंगावरही शहारे येतात. त्यांचे रक्त तापू लागते. मराठ्यांनीच ‘मराठा’ राजाची केलेली फसवणूक मांडणारा ‘काळाकुट्ट इतिहास’ आजच्या मराठ्यांनी जरूर वाचला पाहिजे. आपण मृत्युंजयी संभाजीराजांचे वारसदार आहोत की तेव्हाच्या गद्दार आणि ‘घरबुडव्या’ मराठ्यांचे वारस आहोत हे आता तपासून पाहिले पाहिजे. कटकारस्थाने रचत संभाजीराजांना मृत्युच्या दरीत ढकलणारे ब्राह्मण नव्हे तर तत्कालीन मराठेच होते हे सत्य या कादंबरीद्वारे अधोरेखित होते.
संगमेश्वरातून बाहेर पडल्यानंतर संभाजीराजे कवी कलशाला उद्देशून वाचकांशी संवाद साधतात. ओघवती भाषाशैली आणि जेधे शकावली, साकी मुस्तैदखान (मासिरे आलमगिरी), ईश्वरदास नागर (फुतहाते आलमगिरी) असे अस्सल संदर्भ देत संजय सोनवणी यांनी ही कलाकृती फुलवली आहे. त्यासाठी त्यांनी आत्मनिवेदनात्मक शैली वापरल्याने संभाजीराजे त्यांच्या आयुष्यातील अनेक रहस्ये उलगडून दाखवतात. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचे स्वराज्य, संभाजीराजांच्या बालपणीच्या आठवणी, महाराजांची आग्रा भेट, महाराजांच्या सुचनेनुसारच त्यांच्या विरोधातही केलेल्या लढाया, सत्तालोलूपांनी आखलेली आणि दुर्दैवाने तडीस गेलेले डावपेच, औरंगजेब, मोगल यांना दिलेल्या झुंजी, संभाजीराजांच्या अटकेनंतर राजारामाचा झालेला राज्याभिषेक, येसूबाईंच्या आठवणी हे सारे मुळातून वाचण्यासारखे आहे. खुद्द संभाजीराजे असहाय्यपणे ही सारी परिस्थिती वाचकांसमोर मांडतात असेच ही कादंबरी वाचताना वाटते.
संभाजीराजांचे भावविश्व साकारण्यात संजय सोनवणी पूर्णपणे यशस्वी ठरले आहेत. संवादी भाषा, विषयाची अभ्यासपूर्ण मांडणी, संतोष घोंगडे या तितक्याच मनस्वी कलाकाराच्या कुंचल्यातून साकारलेले जबरदस्त मुखपृष्ठ, सुबक आणि आकर्षक छपाई हेही या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. संभाजीराजे मावळ्यांना उद्देशून म्हणतात, ‘‘अरे या... लढा मर्दाप्रमाणे! आमची पर्वा नका करू! पर्वा करा आबासाहेबांनी तुम्हाला मिळवून दिलेल्या स्वातंत्र्याची! आम्ही मेलो तर राजारामाला गादीवर बसवा... औरंग्याला नष्ट करा... दिल्लीवर सत्ता गाजवा! या आभाळातून आम्ही कवतुकाने तुमचे सोहळे पाहू! अरे देह नश्वर आहे! गडबडून जाऊ नका. एक संभा पडला तर या मातीतून लाखो संभा पैदा होतील. होय... ही आमची महाराष्ट्रभूमी आहे!’’ मात्र महाराजांचा हा आशावाद सपशेल खोटा ठरतो. वेदनांच्या काळडोहात लोटणारे क्षण त्यांना अस्वस्थ करतात. वाचकही ते वाचून सुन्न होतात. संभाजीराजे जिवंत असताना राजारामांचा झालेला राज्याभिषेक त्यांच्या भावनांना साद घालतो. ‘आम्ही मुक्त असू, स्वराज्याचे पाईक असू’ हा आशावाद संपवतो. राजांना साखळदंडात बांधून बळजबरीने ओढत नेले जाते. त्यांच्या काळजाच्या चिंध्या होतात. वेदनांचा कल्लोळ उसळतो. त्यांच्या अंगावर विदुषकी कपडे घातले जातात. त्यांचा अपमान करण्याची एकही संधी सोडली जात नाही. त्यांना उंटावर बसवून, नगारे वाजवत धिंड काढली जाते. बघ्यांची गर्दी जमते. लोक हसतात, चित्कारतात. एका राजाला गुलामाप्रमाणे वागणूक दिली जाते. मृत्यू अटळ आहे हे समोर दिसू लागते. तरीही त्यांना सोडवण्याचे कोणतेही प्रयत्न होत नाहीत. डोळ्यांसमोर फक्त आणि फक्त अंधारच असतो.
‘‘संभा, उद्या सकाळी तुझे हात-पाय तोडून मग मस्तक छाटायची आज्ञा आलमगिरांनी दिली आहे. तुझा मित्र कलशालाही हीच सजा फर्मावण्यात आली आहे’’ असे त्यांना सांगण्यात येते. तेव्हा उद्विग्नपणे संभाजीराजे म्हणतात, ‘‘मरणा... ये लवकर. स्वागत आहे तुझे! पण लक्षात ठेव... आम्ही मृत्युंजय आहोत. जिवंतपणे कैकदा मेलो आम्ही. कधी आप्तांच्या हातून, कधी घरभेद्यांच्या हातून. आताचा हा मृत्यू म्हणजे आमच्या मृत्युवृक्षाला आलेले अंतिम फळ. आम्ही आनंदी आहोत कारण आम्ही तुझ्यावरही जीत मिळवणार आहोत.’’
संजय सोनवणी हे इतिहास संशोधक आहेत. त्यांची जवळपास 85 पुस्तके प्रकाशित आहेत. अमेरिकेतील ‘व्हाईट हाऊस’मध्ये ‘रेफरन्स बुक’ म्हणून ज्यांची पुस्तके ठेवलीत असे ते एकमेव मराठी लेखक आहे. त्यांच्या कादंबर्यानी इतिहास घडवला. भल्याभल्या इतिहासकारांना हजारो पानात जे मांडता आले नाही ते ‘मी मृत्युंजय मी संभाजी’ या कादंबरीत त्यांनी केवळ सव्वाशे पानात मांडले आहे. एका जाज्ज्वलनतेजस राजाची शोकांतिका त्यांनी अत्यंत प्रभावी शैलीत मांडली आहे. भाषेच्या पातळीवर हे पुस्तक सामान्यात सामान्य वाचकालाही वाचावेसे वाटेल. इतिहासापासून प्रेरणा घेतानाच संभाजीराजांसारख्या महापुरूषाची झालेली उपेक्षा, अवहेलना, फितुरी हे सारे समजून घेतले पाहिजे. केवळ संभाजीराजांचे नाव घेऊन ‘बी’च काय कोणत्याही ‘ग्रेड’चे राजकारण करणे म्हणजे मराठ्यांची फसवणुकच आहे. इतिहासापासून काही बोध घेण्याऐवजी आजही तोच प्रकार खुल्लमखुल्ला सुरू आहे. कृतघ्नतेची परिसिमा ओलांडणार्यांचे बुरखे सोनवणी यांनी या कादंबरीत टरटरा फाडले आहेत. मृत्युला आव्हान देऊन पराक्रमाची परंपरा तेवत ठेवणारी आणि प्रत्येक मराठी माणसात नवचैतन्याचे स्फूल्लिंग पेटवणारी संजय सोनवणी यांची ही कादंबरी प्रत्येकाने वाचलीच पाहिजे. पाने - 125, मूल्य - 140
प्रकाशन - प्राजक्त प्रकाशन, पुणे (9890956695)
- घनश्याम पाटील,
संपादक, 'चपराक', पुणे ७०५७२९२०९२