Sunday, October 23, 2016

हिंदू आणि हिंदुस्तान?

मी जन्माने हिंदू आहे. म्हणजे माझ्या जन्मदाखल्यावर तसे नोंदले गेले आहे. केवळ हिंदूच नाही तर जात व पोटजातही नोंदली गेली आहे. मी हिंदू आहे कारण माझ्या आईवडिलांच्या दाखल्यावर तसेच नोंदले गेलेले आहे. ज्यांचे असे दाखलेच नाहीत ते इतरही असेच समजतात व ते कोणत्या अन्य धर्माचे नाहीत म्हणून हिंदू आहेत. जाती-पोटजातीबद्दल मात्र त्यांना ठाम खात्री आहे जेवढी धर्माबाबत नाही. शिवाय कोणी शैव, कोणी वैष्णव, कोणी नाथपंथी, कोणी दत्त संप्रदायी, कोणी लिंगायत तर कोणी महानुभाव. काहीजण तर एकाच वेळीस दोन-तीन पंथांचेही असतात. देशभर पहायला जावे तर चित्र इतके व्यामिश्र आणि जटिल होत जाते कि स्वत:च्या हिंदुपणाकडेही एकतर तो शंकेने पाहिल किंवा यातच कशी मौज आहे हे तो जगाला सांगेल. याचे कारण असेही आहे कि मुळात हिंदू धर्माची अशी व्याख्याच नाही. एक कोणता मान्य ग्रंथही नाही, पण मान्य ग्रंथ असलेले पंथ मात्र भरपुर आहेत. हिंदू धर्माला धर्मसंस्थापकही नसले तरी पंथ संस्थापक मात्र अनेक आहेत. मग ज्याला आपण हिंदू धर्म असे म्हनतो तो अनेक धर्मांचा विस्कळित समुदाय आहे काय हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. मी हिंदू आहे म्हणजे नेमके काय आहे हे ठामपणे सांगता येईल अशी स्थिती एके काळी नव्हती व एका लेखात तर मी हिंदू का नाही यावरच विवेचन केले होते.

हिंदू धर्माची व्याख्या करण्याचे प्रयत्न झालेलेच नाहित असेही नाही. पण एकही व्याख्या हिंदुपणा (Hinduness) म्हणजे नेमके काय हे सांगू शकलेली नाही. शेवटी सावरकरांनी हिंदुस्तानात राहणारे व तिला पुण्यभू मानणारे ते सर्वच हिंदू होत अशी व्याख्या केली. या व्याख्येनुसार बौद्ध, जैन व शिखही हिंदुच ठरत असल्याने अर्थात त्यांनी ही व्याख्या मान्यच केली नाही. त्यांना हिंदू म्हनवून घेण्यात काहीएक रस नाही हे उघड आहे. शिवाय ही व्याख्या प्रादेशिक आहे, धर्म या मुलतत्वाची ओळख करून देणारी हे व्याख्या नाही. पण याचा अर्थ धर्मच नसतो असेही नाही. मग व्याख्या का होऊ शकत नाही? धर्मसंस्थापक आणि धर्मग्रंथ असणे हेच धर्माचे अव्यवच्छेदक लक्षण आहे कि काय?

हिंदू शब्द हा मुस्लिमांनी दिला असा एक गैरसमज आहे. हिंदू शब्द आढळतो तो सर्वात, ऋग्वेदाइतक्याच प्राचीन असलेल्या अवेस्त्यात. अवेस्तन (जुनी पारशी) स चा उच्चार ह असा केला जातो. सिंधू नदीला अवेस्त्यात हिंदवे, हिंदू असे संबोधत. सरस्वती व शरयू नदीला ते अनुक्रमे हरहवैती व हरोयू नदी म्हणत. अवेस्त्यातील सरस्वती व शरयु या नद्या अफगाणिस्तानातील असून त्या आजही तेथे वाहत आहेत.) सप्तसिंधूला ते हप्तहिंदू असे म्हणत. त्या प्रदेशातील लोक त्यांच्या दृष्टीने हिंदू लोक. प्राचीन काळात अनेक दुरचे जनसमुदाय त्यांच्या प्रांतातून वाहणा-या नद्या अथवा पर्वतांच्या नांवाने ओळखले जात. सप्तसिंधू म्हणजे आजचा पाकिस्तान व पंजाब-हरियाणाचा काही भाग. त्यापलीकडील भुप्रदेश त्यांच्या माहितीतही नव्हता. दक्षीण भारत तर फार दुरची गोष्ट झाली. अलेक्झांडरचे एक मोठे आक्रमण. ग्रीक भाषेत स चा ई होतो. त्या ग्रीकांनी याच प्रदेशाला इंडिका असे संबोधले. ते आक्रमण या प्रदेशाशीच अडखळले. त्यांना मगध, तेथील सम्राट नंद वगैरे ऐकून माहित असले तरी जेथे भारत संपतो तेथेच पृथ्वीही संपते असा त्यांचा समज होता.

पर्शियन व ग्रीकांमुळे हिंदू अथवा इंडिका हे नांव जगभर पसरले व ते प्रदेशनाम म्हणून चिकटले तसेच देशातील लोकांचे नांव म्हणूनही. ग्रीकांपुर्वी भारतात आले ते काही वैदिक आर्य. ते स्थायिक झाले ते कुरु-पांचाल-मत्स्य व शौरसेन प्रदेशात. त्याच भागातील लोक हे जगात आदर्श आहेत असे मनुस्मृतीही उच्चरवाने सांगते. याच प्रदेशाला "आर्यावर्त" हे नांव त्यांनी दिले जे अगदी सतराव्या-अठराव्या शतकापर्यंत ब्रह्मावर्त नांवानिशी प्रचलित होते. ब्रह्मावर्त हा शब्दही मुळचा मनुस्मृतीतीलच. आर्यावर्त अथवा ब्रह्मावर्त हाच त्यांच्या दृष्टीने देश होता. वैदिक मंडळीला त्या पारचे प्रदेश प्रत्यक्ष माहित नव्हते. विंध्याच्या पार दक्षीणेला काय आहे आणि कोण राहते हेही माहित नव्हते. आर्यावर्ताचा थोडका भाग हाच त्यांचा भुगोल. त्यापार राहणारे ते वैधर्मीय असल्याने सरसकट शूद्र. "शुद्रांच्या राज्यात निवास करू नये" अशी आज्ञा त्यामुळेच मनुने दिली कारण अपरिचित व वेगळ्या धर्माचे लोक उपद्रव देतील याची त्यांना भिती होतीच. थोडक्यात आजच्या भारतात :"आर्यावर्त" नांवाचा, एका विशिष्ट धर्म-संस्कृतीचा देश एके काळी होता. त्या देशात राहणारे स्वत:ला अत्यंत श्रेष्ठ म्हणत असत. मनुच म्हणतो, कुरू, मत्स्य, पांचाल आणि शौरसेन हे प्रदेश ब्रह्मर्षींचे म्हणून ओळखले जातात. या प्रदेशात जन्मलेल्या ब्राह्मणांपासून पृथ्वीवरील अन्यांनी शिकावे. (म. २.१९-२०)

म्हणजे तत्कालीन विदेशी भारताला हिंदवे अथवा इंडिका म्हणत असले तरी भारतातील एका छोट्या भुभागाचे देशनांव आर्यावर्त अथवा ब्रह्मावर्त असे होते. याच काळात भारतात पुर्वेकडे बालेय देश (बळीराजाच्या पुत्रांनी राज्य केलेला) जसा होता तसाच द्राविड देशही होता. या सर्वांची संस्कृती व धर्म वेगवेगळा होता. ते एकमेकांशी संघर्ष करत, हार जिती चालुच रहात. हा अखंड देश (राष्ट्रभावना म्हणून) व अखंड संस्कृती म्हणून तेंव्हाही नव्हता व आजही नाही.

दुसरी बाब हिंदुस्तानाची. हे फार उत्तरकालीन नांव आहे. ते तसे असले तरी अगदी मध्ययुगापर्यंत (सतराव्या अठराव्या शतकापर्यंत) फक्त उत्तर भारतासाठी वापरले जात असे. नर्मदेपारचा अथवा विंध्यापारचा हिंदुस्तान व त्याखालील दक्षीणेचा भाग दक्खन म्हणूनच संबोधला जात असे. तत्कालीन पत्रे व बखरी चाळल्या तरी ही बाब स्पष्ट होते. थोडक्यात जे "हिंदुस्तान" समर्थक आहेत त्यांना हा इतिहास व प्रत्यक्ष पुरावे मान्य होतात काय? थोडक्यात हिंदुस्तान म्हणजे उत्तर भारत व नर्मदेखालचा प्रदेश "दक्खन" अशी भारताची प्रादेशिक वाटणी अगदी अलीकडेपर्यंत होती. म्हणजेच "हिंदुस्तान" हा प्रादेशिक अर्थानेही मुळात अस्तित्वात नाही. कारण ब्रिटिश अंमलकाळात भारताला "इंडिया" हे नांव कायम झाले, हिंदुस्तान नाही. दोन्ही शब्दांच्या अर्थात फरक नसला तरी "इंडिया" हे नांव ब्रिटिशांनी त्यांच्या अंमलाखालील प्रदेशाला प्रशासनिक सोयीसाठी दिले हेही लक्षात घ्यावे लागते. गव्हर्नर अथवा व्हाईसरोयच्या अंमलाखालील प्रदेश तो इंडिया व उर्वरीत संस्थानिकांची राज्ये अशी ती वाटणी होती. म्हणूनच स्वातंत्र्यानंतर इंग्रजांनी भारतीय संस्थानिकांना इंडियात सामील व्हायची अथवा स्वतंत्र राष्ट्र म्हणून रहायची पर्यायी योजना दिली होती हे येथे विसरता येत नाही.

त्यामुळे आज आपण हिंदुस्तान असे ज्याला म्हणतो तो कोठे आहे? प्रादेशिक व्याख्येच्या अंगाने जावे तर तो अस्तित्वात नाही. भारतात आर्य-अनार्य या अनैतिहासिक वादाने जेंव्हा कळस गाठला तेंव्हा दक्षीण भारताने स्वतंत्र "द्रविडस्तानाची" मागणी केली होती. कारण उत्तर आर्यांचा तर दक्षीण द्रविडांचा असा तो युक्तिवाद होता. यात हिंदुस्तान कोठे होता? आजही काश्मिर ते पुर्वोत्तर राज्ये फूटुन स्वतंत्र अथवा स्वायत्त होऊ इच्छितात हेही वास्तव आहे.

हिंदुस्तान म्हणजे हिंदु लोक बहुसंखेने राहतात तो प्रदेश असे आज सर्वसाधारणपणे मानले जाते. हिंदू हे नदी व त्या प्रदेशात राहणा-या लोकांचे नांव मागे पडत ते आज एका धर्माचे नांव बनले आहे. मुळात ते हिंदू समजणा-या लोकांनी का व कोणत्या परिस्थितीत आणि नेमके कधी स्विकारले याचे पुर्ण समाधान करेल असे उत्तर आपल्याकडे नाही. किंबहुना इतरांनी दिलेले नांव स्विकारणारा यच्चयावत विश्वात एकही दुसरा एकही धर्म नाही.  धर्मग्रंथांकडे पाहिले तर त्यात येणारी नांवे ही वैदिक (अथवा सनातन धर्म) व पौराणिक वा आगमिक धर्म अशी नांवे येतात. म्हणजे दोन्ही एकाच धर्माचे आहेत असे धर्मशास्त्रांनाच मान्य नाही. दोन्ही धर्माचे धर्मविधी कसे वेगळे करायचे याचे निर्देशच धर्मशास्त्रांत आहेत. आगमिक तंत्रोक्त शिवप्रधान धर्म हा सिंधूकाळापासून चालत आला आहे असा सर्वच विद्वानांचा निर्वाळा असला तरी दुर्दैवाने तंत्रशास्त्रावर लिहिलेल्या अगणित ग्रंथांचा आजवर संगतवार अभ्यासच झालेला नाही. तंत्रशास्त्रावर लिहिले गेलेले हजारो ग्रंथ असून त्यांची हस्तलिखिते पुरातत्व विभागांकडे व सांप्रदयिक मठांत पडून आहेत. वैदिक साहित्याचा जेवढा अभ्यास झाला व होतोही आहे तेवढाच काय त्याच्या अल्पांशानेही तंत्रशास्त्रांचा झाला नाही हे वास्तव आहे. तंत्रशास्त्रांना आगम (आधीचे) तर वैदिक साहित्यला "निगम" (नंतरचे) असे म्हणण्याचा प्रघात आहे. तांत्रिक धर्माला आगमिक धर्म म्हटले जाते. तंत्रांच्या शाखाही खूप आहेत. आगमिक धर्मग्रंथ वेदांना मान्यता देत नाही. सुफलताविधी हा तंत्रांचा पाया असून शिवलिंग, मातृदेवता, वृषभादि प्रजननशक्तीशी संबंध असलेली दैवते तंत्रशास्त्रात प्राधान्याने येतात. तंत्रांचा उगम सिंधुकाळात आहे असे डा. सुधाकर देशमुख आपल्या "मध्ययुगीन धर्मसंकल्पनांचा विकास : तंत्र, योग आणि भक्ती" या ग्रंथात साधार दाखवून देतात. उत्खननांत तसे पुरावेही विपूल प्रमाणात सापडलेले आहेत. नाथ पंथही तांत्रिकच जो वेद व चातुर्वर्ण्य मानत नव्हता. सांख्य, वैशेषिक तत्वज्ञानही तंत्रशास्त्रांवर आधारित आहे. पण वैदिक आणि आगमिक धर्मांना एकत्र समजण्याची चूक झाल्याने हिंदू धर्माची व्याख्या होऊ शकली नाही हे वास्तव आहे. हे दोन धर्म स्वतंत्र गृहित धरले तरच व्याख्या अत्यंत सुलभतेने होऊ शकतात. पण उत्तरकाळात तशा मांडणीतले सातत्य राहिले नाही पण व्यवहारात मात्र हा भेद कायमच राहिला.

थोडक्यात हिंदू हे नाव घेण्यापुर्वी वैदिक धर्म व आगमिक धर्म हे स्वतंत्र आहेत याचे भान जनसमुदायांना होते. धार्मिक कर्मकांडांबाबत आजही स्पष्ट आहेत. त्यांच्यात परस्पर संघर्ष जसा होता तसेच काही समन्वयाचेही प्रयत्न झाले. शैव-वैष्णव यांच्यातील टोकाचा संघर्ष आणि हरी-हर ऐक्याचे प्रयत्न हे आपल्याला माहितच आहेत. असे असले तरी दोन वेगळ्या धर्मातील सीमारेषा मात्र पुसली गेली नाही. त्यामुळेच हिंदू म्हणवून घेणा-या समाजांतील आंतरविरोध कधी शमलाही नाही. अनेक वादांच्या रुपाने हा संघर्ष वर्तमानातही जीवित आहे.

म्हणजेच, जेंव्हा हिंदू हा शब्द समोर येतो तेंव्हा परस्परविरोधी धर्मांचे, एकमेकांशी एकजीव न झालेले कडबोळे समोर येते. त्यामुळे अनेक पातळ्यावरचा संघर्ष विद्यमान आहे. हिंदुत्ववादी संघटना नेमक्या कोणत्या धर्माचे प्रतिनिधित्व करतात हे तपासायला गेले तर ते वैदिक धर्माचेच प्रतिनिधित्व करत आगमिक धर्मियांना वैदिकाश्रयी बनवण्याच्या प्रयत्नांत असतात असे दिसते. त्यामुळेच की काय हिंदुत्ववादी संघटनांना बहुसंख्य हिंदुंचा पाठिंबा नाही. उलट त्यांना प्रखर विरोध करणारे अन्य धर्मिय नाहीत प्रखर विरोध करणारे आगमिकच आहेत हे लक्षात येईल.

हीच बाब हिंदुस्तानची. हिंदुस्तान म्हणजे आसेतुहिमाचल प्रदेश असे आपण समजतो. या समजाला इतिहासाचा आधार नाही हे आपण वर पाहिलेच आहे. नव्या समजानुसार अखंड हिंदुस्तान हे अनेक संघटनांचे स्वप्न आहे हेही आपल्याला माहित आहे. त्यासाठी वेदांपासून ते रामायण-महाभारताची उदाहरणे दिली जातात. हिंदुंच्या गौरवशाली इतिहासाची नवनिर्मित मांडणी केली जाते. सावरकर, गोळवलकर गुरुजी ते दीनदयाळ उपाध्याय धर्माधिष्ठित हिंदू राष्ट्राचा कसा उद्घोष करत होते व त्यांचे अनुयायी आजही कसे करतात हे रोज दिसणारे चित्र आहे. पण हिंदू राष्ट्राची संकल्पना ही वैदिक राष्ट्र संकल्पना असून हिंदुस्तान नव्हे तर भारताला "वैदिकस्तान" बनवायचे आहे कि काय अशीच या मंडळीची हिंदु राष्ट्र संकल्पना आहे. म्हणजे ही मंडळी वेदांनाच भारतीय संस्कृतीचा मुलस्त्रोत मानतात. चातुर्वर्ण्याची मांडणी किती शास्त्रशुद्ध आहे हेही गळी उतरवत असतात. स्त्रीयांनी चुल-मुल पहावे हा सिद्धांत कोणत्या ना कोणत्या मार्गाने ठसवू पाहतात. सिंधू संस्कृतीचे निर्माते "वैदिक आर्य" होते हे सिद्ध करण्याची तर अहमहिका सुरु आहेच. खरे तर त्यांनी सिंधू संस्कृतीला हिंदू संस्कृती म्हणायला काही प्रत्यवाय नव्हता कारण मुळात हिंदू हे नावच सिंधुवरुन आलेले आहे. पण जेथे जेथे सांस्कृतिक वर्चस्वाचा संबंध असतो तेथे वैदिक महिमान गायले जाते. आगमिक शास्त्रे वेदपुर्व असुनही त्यांना मात्र साधे विचारातही घेतले जात नाही. त्यामुळे त्यांना "हिंदू भारत" अभिप्रेत आहे कि "वैदिक भारत" हा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे व मला तर तो नक्कीच पडतो.

हिंदूबहुल व त्यांच्या वर्चस्वाखाली असलेला आसेतुहिमाचल प्रदेश म्हणजे हिंदुस्तान ही नवी मांडणी आहे. या भुभागाला जो पुण्यभू समजतो तो हिंदू अशी सावरकरांची व्याख्या आहे. यातून भारतात निर्माण न झालेले धर्म गृहित धरलेले नाहीत. प्रखर राष्ट्रवादासाठी ही व्याख्या वरकरणी ठीक वाटली तरी यात अन्य धर्मियांना दुय्यम नागरिकत्व बहाल करणे, त्यांना कोनताही विशेषाधिकार न देणे हे अध्याहृत आहे. हिंदुस्तान हे आज तरी "धर्मराज्य" नाही. समजा ते बनले तरी धर्मराज्य असल्याने कोणत्या धर्माच्या कोणत्या धर्मग्रंथांवर आधारित असेल? आगमिक धर्म जातीभेद/वर्णव्यवस्था मानत नाही तसेच  ते  वेदांनाही मानत नाही. वैदिक धर्माचे मुलाधार वेद व स्मृत्या आहेत. त्यातील समाजरचनेचे सिद्धांत मुळात विषमतामुलक आहेत हे वेगळे सांगायची गरज नाही व त्यात वर्चस्व कोणत्या वर्णाचे असनार हे तर सुर्यप्रकाशाएवढे लख्ख आहे. अशा स्थितीत भारतात धर्मराज्य आनण्याचा प्रयत्न भारतीय समाज व प्रदेश विखंडित करणारा ठरेल. मग यात हिंदुस्तान कोठे असेल?

तर हिंदू आणि हिंदुस्तान या संकल्पनांतच मुळात एवढा गोंधळ आहे ज्याचे निराकरण एवढ्यात होण्याची शक्यता नाही. सध्या हिंदु धर्माची व्याख्याच नकारात्मक बनलेली आहे. जो अन्य कोणत्याही धर्माचा नाही तो हिंदू अशी ती व्याख्या आहे, प्रत्यक्षात त्याचा परंपरागत धर्म आगमिक असो कि वैदिक. असे परस्परविरोधी आचार-विचार, धर्मसंकल्पना, कर्मकांडे असलेले समाज एका छत्राखाली कसे येणार? काही वेळ समजा दिशाभूल करुन ते शक्यही होईल पण त्याला मर्यादा आहेत.

अखंड हिंदुस्तान ही एक लाडकी संकल्पना आहे. अफगाणिस्तानसह भारत व्हावा असे ते एक स्वप्न आहे. अर्थात ते दिवास्वप्न आहे हे उघड आहे. मुळात भारत एक राष्ट्र म्हणून कधीच अस्तित्वात नव्हता. राष्ट्राची संकल्पना हीच मुळात फ्रेंच राज्यक्रांतीची देणगी आहे. आज जो भारत आहे तो ब्रिटिश इंडिया आहे हे वास्तव पचवायला जड जात असले तरी ते नाकारताही येत नाही. ब्रिटिश इंडिया नसता तर पुर्वोत्तर राज्ये, लेह-लडाख व दक्षीणही स्वतंत्र भारतात नसती. वंश, भाषा,  इतिहास या सर्वच स्तरांवर या प्रदेशांत पराकोटीचा फरक आहे. या प्रांतांतच फुटीरतावादाची कारस्थाने हिंसक पद्धतीने चालतात. त्यांना काश्मिरसह आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी आजही किती यातायात करावी लागते हे पाहिले तर पाकिस्तान, बांगला, ब्रह्मदेश व अफगाणिस्तानसहचा "हिंदुस्तान" करु हे स्वप्न खयाली पुलावासारखे आहे.

धर्मराज्य वर्तमान युगात यशस्वी होऊ शकत नाही. मग धर्म कोणताही असो. आजचा काळ हा वैश्विकीकरणाचा आहे. लोकशाहीचा आहे. इहवादाचा आहे, धर्मवादाचा नाही. राज्याने फक्त इहवादी प्रगतीकडे लक्ष ठेवावे व केवळ तशीच धोरणे राबवावीत हे यात अनुस्युत आहे. धर्म ही बाब व्यक्तीच्या अखत्यारीतील आहे. दुस-यांना त्रास अथवा उपद्रव होणार नाही या बेताने व्यक्तीने कोणताही धर्म/परंपरा पाळायला राज्याची हरकत नाही. कोणताही धर्म मानायचा नसेल तर तसेही करायला मोकळीक आहे. व्यक्ती स्वातंत्र्य ही जागतिक समुदायाने मानवतेचे महनीय मूल्य म्हणून स्विकारलेली ही बाब आहे. धर्मराज्यात या बाबी येत नाहीत. धर्मराज्य हेच मुळात व्यक्तीस्वातंत्र्याचा आणि म्हणुनच विकासाचा संकोच करणारी बाब ठरते. ईसिस, तालिबान जगात तिरस्करणीय झालेत कारण ते धर्मराज्य आणु इच्छितात व त्यासाठी क्रौर्याची पातळी ओलांडतात. पाकिस्तानची अवस्था आज काय आहे हे आपण पाहतोच आहोत. देश म्हणून हा भुभाग आजही सामर्थ्याने उभा राहू शकलेला नाही. तिरस्काराच्या आणि हिंसेच्या पायावर कोणाचीही प्रगती होत नाही हा जागतिक इतिहास आहे. मानवी स्वातंत्र्याचे अपहरण म्हणजे राष्ट्राच्या आत्म्याचेच अपहरण हे आम्हा भारतियांना समजून घ्यायला हवे व आज आहे त्यापेक्षा अधिक स्वातंत्र्य आमच्या नागरिकांना कसे मिळेल यासाठी प्रयत्नरत रहायला हवे.

हिंदू हा धर्म आणि हिंदुस्तान म्हणजे हिंदू धर्मियांच्या वर्चस्वाखालील प्रदेश हेच चित्र हिंदू आणि हिंदुस्तान म्हटले कि डोळ्यासमोर उभे राहते. हे असे चित्र उभे होणे योग्य नाही असे मला वाटते. भारतीय नागरिक म्हणून परंपरांचे मिथ्या ओझे झुगारत मानवी जगातील एक आदर्श बनत शाश्वत ऐहिक व बौद्धिक प्रगती साधत एक नवी वैश्विक संस्कृती बनवत जगाला आदर्शभूत व अनुकरणीय असा हा देश व्हावा व असे मला वाटते. धर्म, धर्मराज्य व धर्माचे प्रादेशिकीकरण भारताला मुळीच हितकारक नाही हे आपल्याला समजावून घ्यावे लागेल. आपण पहिलेही भारतीय आणि शेवटीही भारतीयच हेच काय ते मनावर ठसवावे लागेल.

परंतू जेंव्हा हिंदुत्ववादाच्या नांवाखाली वैदिक वर्चस्वतावाद थोपवला जातो तेंव्हा त्या वादाचे सत्यस्वरुप समजावुन घेंणेही तेवढेच आवश्यक बनून जाते. तो आपल्या समाजव्यक्तित्वाचा प्रश्न बनतो. अर्थात स्व-अस्तित्वाचे आकलन हे केवळ आत्मभान येण्यासाठी  व ताठ मानेने जगता येण्यासाठी हवे, द्वेषासाठी नको हे ओघाने आलेच!

7 comments:

  1. अतिशय उच्च्‍ा दर्जाचा लेख. हिंदू म्हणवणाऱ्यांना आणि हिंदू नसणाऱ्या इतरही धर्म मार्गाचा कटटर /वेडपट/स्वसोयीचा अर्थ लावणाऱ्या लोकांना विचार करायला लावणारा असा लेख आहे. क्रमबध्द नियोजित उत्तम मांडणी कुठेही शब्दांचा/भावनेचा अतिरेक होवू न देता व्यवस्थित बॅलन्स केला आहे. धार्मिक मुलतत्वाच्या आधारावर जगात थैमान सुरु आहे. पण भारतीय उपखंडाच्या स्थानामुळे भारतातील/हिंदूस्थानातील लोकांची वेगवेगळया परिस्थितीमुळे निर्माण झालेली विचारी,उदारमतवादी समन्वयमुलक दृष्टी पाहता जगातील सर्वच संस्कृतीचे येथे मिलन/समन्वय येथे सुरुच राहील. त्यात्या गोष्टींचा प्रभाव पिढीगणीक वेगवेगळया मार्गांनी अनुसरला जाईल.भारतातील विविधतेतील मजा आकर्षकता सामंजस्य खा्दय संस्कृती निसर्ग तसेच मानवी जीवनावरील भाष्यांची समन्वयता तसेच आधुनिक युगाबरोबरच्या विज्ञान तंत्रज्ञानाचा/भाषांचा अपरिहार्यपणे केलेला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष केलेला स्वीकार नक्कीच भारताला समृध्द करेल. अर्थात वेगवेगळे वाद हे एकमेकांवर प्रेशरग्रुप म्हणूनही राजकीय सामाजिकदृष्टया प्रचलित राहतील तसेच आवश्यक असून अतिरेक नसेल तर ते उत्तम सार्वजनिक नियंत्रणाचे साधन ठरू शकेल. आभारी.

    ReplyDelete
  2. हिंदू धर्म म्हणजे नेमके काय? त्याची सर्वात योग्य व्याख्या कोणती? विशिष्ट संस्थापक-धर्मग्रंथ आणि एकसमान आचारसंहिता नसलेली जीवनपद्धती धर्म होऊ शकते का?
    सुरुवातीला व्याखेआधी तिची पार्श्वभूमी मांडावी लागेल. बऱ्याच वैज्ञानिक आणि इतर जड-भौतिक गोष्टींचीसुद्धा नेमकेपणाने व्याख्या मांडणे शक्य नसते. अशा गोष्टींना सैद्धांतिक (Theoretical Scientific Terms) असे म्हणतात. उदा. Entropy, Enthalpy (याचे मराठीसंस्करण उपलब्ध झाले नाही) इत्यादी विज्ञानशाखेसंबंधित व्यक्तींना ही गोष्ट चटकन समजू शकेल. बाकीच्यांनी ती समजावून घेण्याचा किमान प्रयत्न करावा. तर अशा सैद्धांतिक गोष्टींची व्याख्या करण्याऐवजी त्यांचे विस्तृत वर्णन करावे लागते. हे वर्णन स्थल-काल-व्यक्ती-स्थितीसापेक्ष (वेगवेगळे) (Relative) असते, मात्र विवक्षित सैद्धांतिक गोष्ट नेहमीच निरपेक्ष (समान) (Absolute) असते. ‘हिंदू धर्म’ ही सुद्धा एक सैद्धांतिक गोष्ट आहे, याची नेमकेपणाने व्याख्या करणे शक्य नाही, नेहमी विस्तृत वर्णनच करावे लागते तरीही तो अस्तित्वात आहे यात तिळमात्र शंका नाही.या विधानाची स्पुष्टी सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निकालात वारंवार ‘हिंदू’ या शब्दाची स्वीकृती, भारतीय राज्यघटनेतील दंडविधान आणि इतर भागात जेथे जेथे धर्मावर आधारित स्वतंत्र तरतुदी आहेत तेथे तेथे ‘हिंदू धर्मा’चा केलेला स्वतंत्र उल्लेख आणि प्रशासकीय कामकाजात धर्म या रकान्यात ‘हिंदू’ या शब्दाला मान्यता याबाबीतून होते. ज्यांचा ‘हिंदू धर्मा’च्या अस्तित्वावर अविश्वास आहे त्यांना एकूणच सर्वोच्च न्यायालयाचे निकाल, भारतीय राज्यघटना आणि प्रशासन व्यवस्थेवर विश्वास नाही असे म्हणावे लागेल.
    हिंदू धर्माचे विस्तृत वर्णन (माझ्या संकल्पनेनुसार)- प्राचीनकाळी जेव्हा विविध धर्मांचे स्वतंत्र अस्तित्व नव्हते, अनेकविध उपासना पद्धती, आचरणसंहिता होत्या ज्यातूनच पुढे अब्राहामिक-वैदिक-माया-इराणी-पुर्वाशियायी-मेसोपोटेमियान-आफ्रिकन जमातींचेधर्म वगैरे विविध परंपरा स्वतंत्रपणे उदयास आल्या त्या प्राचीन जीवनपद्धतीचे अवशेष म्हणजे हिंदू धर्म. हिंदू धर्म निर्मितीपासून अनेक स्थित्यांतरांना समोर गेला आहे, विविध जमाती-टोळ्या-पंथ-धर्म यांच्या परंपरा व देवता यात काळानुरूप समाविष्ट होत गेल्याने त्याला विशिष्ट संस्थापक-धर्मग्रंथ आणि एकसमान आचारसंहिता नाही हे सत्य असले तरी अनेक लोकांनी तत्वतः मान्यता दिलेला धर्म म्हणून त्याचे अस्तित्व निसंशयपणे आहे. थोडक्यात जो स्वतःला हिंदू म्हणवून घेतो तो हिंदू.

    ReplyDelete
  3. या लेखामधे आदिम जाती, धर्म व संस्कृतीचा उल्लेख असायला हवा होता असे मला वाटते...

    ReplyDelete
  4. अतिशय सुदर विवेचन सर

    ReplyDelete
  5. Simple practical definition of Hindu=The person who is not Muslim or Christian.
    No need of such heavy,useless delibrrations (

    which is done on the basis of incomplete means and proofs)where one , even the blogger cannot count his forefathers beyond 4/5generations

    ReplyDelete
  6. हिंदू नावाचा कोणताही धर्म अस्तित्वात नाही! हिंदू हा अभिमानाने किंवा गर्वाने मिरविण्याची गोष्ट नसून मोघलांनी मुस्लिम सोडून उर्वरित लोकांना दिलेली शिवी आहे! हिंदू हा 'फारसी' भाषेतील शब्द अगदी अलीकडचा आहे, तो निन्दाजनक असाच आहे!

    हिंदू हा शब्द अपमानजनक आहे व हिंदू धर्म म्हणजे गुलामांचा / पराजितांचा धर्म आहे. थोडे हिंदू शब्दाबद्दलचे मत पाहू. हिंदू शब्द जर सिंधू शब्दाचा अपभ्रंश असेल तर सिंधू नदीच्या खोऱ्यात राहणारे व्यक्ती पंजाबी अथवा सिंधी असे म्हटले जातात, त्यांना हिंदू हे नाव का प्राप्त झालेले नाही? पर्शियन लोकांना सिंधू उच्चारण्यात अडचण येत होती हे प्रमेय आधारहीन व हास्यास्पद आहे. उदा. पर्शियन जे शिया मुस्लिम आहेत ते शिया, सुन्नी व शरियत हे शब्द कसे उच्चारतात? पंजाबी भाषेत बरेच पर्शियन शब्द आहेत ते ज्यांची सुरुवात 'स' किंवा 'श' पासून होते. उदा. सरदार, शहीद, शेर इ. पंजाब हा शब्द सुद्धा पर्शियन शब्द पांच आणि आबा (पाच पाणी) पासून तयार झाला आहे.

    याच बाबीचा पुनरुच्चार मुद्राराक्षस यांनी 'धर्मग्रंथोन्का पुनर्रपाठ' या ग्रंथात याप्रकारे केला, "इतिहासकारोंने कहा की चूंकि फारस के लोग 'स' को 'ह' बोलते थे, इसलिये उन्होंने सिंधू को हिंदू कहा और यहां रहने वालोंको हिंदू कहना सुरू कर दिया. यह विचित्र तर्क था. ईराण के लोग अपनी भाषा को फारसी कहते रहे, फारही कभी नहीं कहा, सुलतान बोलते थे हुलतान नहीं, पर सिंध को उच्चारित नहीं कर शकते थे, यह अविश्वसनीय हैं. विजेता अक्सर विजित समुदाय को निंदनीय मानता हैं और घोषित करता हैं. मुसलमान ने भी भारत को जीतकर यही किया. हर विजेता की तरह वह भी भारत के विजित लोगों को हेच समजता और बताता था. उसने भारत में रहने वालों को इसीलिये हिंदू कहा. फारसी में हिंदू का अर्थ चोर, काला, लूटेरा, गुलाम हैं. ये अर्थ फीरोजुल्लगात नामक विख्यात शब्दकोश में हैं. पर यह विचित्र इत्तफाक है और ऐसा शायद ही किसी दूसरी संस्कृति में हुआ हो कि पराजित कौम ने अपने लिये विजेताओ दवारा प्रयुक्त की गई एक अपमानजनक संज्ञा को गौरव के साथ स्वीकार कर लिया हो. भारत में यह हो गया!"

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...