Monday, November 14, 2016

ज्ञान म्हणजे काय? (५)

माहितीतून ज्ञान येते कि उत्स्फुर्त कल्पनाशक्तीने अचानक सुचवलेल्या एखाद्या संकल्पनेमुळे विशिष्ट-ज्ञानाकडे जायचा प्रवास सुरु होतो? माहितीतून येणा-या ज्ञानात स्वत:च्या प्रतिभेची भर घातल्या खेरीज ती माहिती म्हणजे एक प्रकारचा सचलेला माहितीचा अस्ताव्यस्त ढीग होय. त्या माहितीला सुसंगत क्रमात घेत त्याचे विश्लेशन करत त्या माहितीला एका तर्कसीमेपर्यंत नेता आले तर माहितीचे विशिष्ट ज्ञानात रुपांतर झाले असे म्हणता येईल. ही तर्कसीमा ही त्या व्यक्तीचा वकूब ठरवेल हेही तेवढेच खरे. कारण तर्क संपला असे एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत घडले तरी तो म्हणजे तर्काचाही अंत नाही. तर्क त्याहीपुढे जाऊ शकतो व ही प्रक्रियाही सतत सुरु राहणे ज्ञानाच्या विश्वात गरजेचे असते.

मी नीतिशास्त्रावर लिहितांना उत्स्फुर्ततावादाचा पुरस्कार केला होता. प्रत्येक माणसात उत्स्फुर्तपणे घोंगावणा-या स्वतंत्र कल्पनांचा गोंगाट असतोच. त्यातील कोणती उपयुक्त व कोणती अनुपयुक्त हे सर्वांना ठरवता येतेच असे नाही. तसेच अशा उत्स्फुर्त संकल्पना धुसर असल्याने त्या स्मृतीत दिर्घकाळ राहतील असेही नाही. उत्स्फुर्तपणे सुचलेल्या संकल्पनांवर बाह्य घटकाचा प्रभाव नसतोच असे नाही. अनेक संकल्पना अव्यवहार्य वाटल्याने अनेकजण सुचताच तशाच सोडुनही दिल्या जातात. काही लोक मात्र संकल्पनांचा उपयुक्ततेचा विचार न करता पाठपुरावा करतात व त्यातून एखादा सिद्धांत, कविता, साहित्यकृती अथवा शोध निर्माण करतात. नाविण्याचा जन्म उत्स्फुर्ततावादातून होतो. हा उत्स्फुर्ततावाद माहित्यांचे संकलन करतांनाही अचानक जागा होऊ शकतो व एखाद्या घटनेचे नवे अन्वयार्थ व्यक्तीला लागतात. त्यातून नवनिर्मिती घडू शकते.

जी संकल्पना सुचते ती अव्यवहार्य असतेच असे नाही. अनेक संकल्पना काळापुढच्या असल्याने त्या आजच्या वर्तमानात अव्यवहार्य वाटल्या तरी त्या अनुपयुक्त आहेत असेही म्हणता येत नाही. अनेक संकल्पना बाळबोध असतात हेही खरे. पण त्यामुळे चिंतीत होण्याचे कारण नाही. प्रत्येक संकल्पनेचे स्वत:चे असे महत्व असतेच. त्या संकल्पना प्रत्यक्ष प्रयोग केल्यानंतर बाद होऊ शकतात. त्या निरर्थक आहेत असे दिसू शकते. तरीही त्या महत्वाच्याच असतात कारण कोणत्या संकल्पना टाकवू आहेत हे त्याशिवाय कळत नाहीत. शिवाय आजच्या प्रयोगांतून टाकावू वाटलेल्या संकल्पना वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या परिस्थितीत प्रयोग केल्याने वास्तवात येणारच नाहीत असे नाही. ज्यूल्स व्हर्नने आपल्या वैज्ञानिक कादंब-यांत मांडलेल्या संकल्पना नंतर प्रत्यक्षात, वेगळ्या पद्धतीने, अधिक शास्त्रुशुद्धतेने प्रत्यक्षात अस्तित्वात आल्या हा इतिहास आहे. अकल्पनीय, प्रसंगी हास्यास्पद वाटणा-या संकल्पनांचेही असेच असते.

संकल्पनेच्या बीजाशिवाय प्रत्यक्ष वृक्ष वाढणार नाही हे तर आहेच. माणसाला संकल्पना सुचतात, अचानक काहीतरी सुचून जाते ही प्रक्रिया नेमकी का आणि कशी घडते हे अद्याप उलगडायचे आहे. मानवी मनात अमर्याद असलेली कुतुहलाची सुप्त शक्ती त्यामागे काम करत असू शकते. भवतालही या प्रक्रियेत हातभार लावू शकतो. संकल्पनांचे प्रकार अनंत आहेत असे म्हटले तरी चालेल. त्यावर मर्यादाही अनंत आहेत हेही खरे. मनातील पुर्वग्रह, एखाद्या तत्वाच्या प्रेमात पडणे अथवा त्याचाच सुप्त अथवा जागृत प्रभाव व्यक्तीच्या मनावर असणे या अनेकदा मर्यादा बनून जातात व त्या आज आपण मान्य केलेल्या अगदी शास्त्र सिद्धांतांवरही असतात. आजही आपण विश्वाचा विचार सापेक्षवादी चौकटीत करतो पण निरपेक्षवादी (जेथे चौकटच नसेल) स्थितीतील विश्व कसे असू शकेल येथवर आपली मजल गेली नाही. मी विश्वरचनेचा सिद्धांत मांडतांना निरपेक्षवादाचा विचार केला आहे, पण अजून तरी माझे म्हणने काहींना (म्हणजे ज्यांनी वाचले आहे त्यातील) स्विकारणीय नाही.  ते तसे कदाचित असेलही, पण हाही एक विचार आहे व तो अर्धवट सोडून देणे योग्य नाही असे मला वाटते. अनेक सिद्धांतांचा मृत्यू अशा वातावरणामुळे झाला आहे हेही आपण पाहू शकतो.

आव्हानच दिले जाऊ शकत नाही असे कोणतेही सिद्धांत असू शकत नाहीत. एकाच उपलब्ध संदर्भचौकटीत ते निर्विवाद वाटले तरी अन्य संदर्भचौकटींत ते तसे असतीलच असे नाही. इतिहासाचेही वेगळ्या प्रकारे असेच असते. समजा उद्या सिंधू लिपी निर्विवाद वाचली गेली (एखादा रोझेटा स्टोन सापडल्याने) तर आज त्या संस्कृतीबाबतचे आजवरच्या सर्व विद्वानांचे आकलन ढासळून टाकू शकते. एखादी अजून पुरातन संस्कृती परिसरातच अथवा अन्यत्र उजेडात येऊ शकते. अनेक कोडी सोडवत नवीन कोडी उभी राहू शकतात. थोडक्यात ही प्रक्रिया निरंतर आहे.

त्यामुळे विशिष्ट-ज्ञानाचा प्रवासही त्या विशिष्टतेच्या मर्यादेत पुर्ण होऊ शकत नाही. मग ज्ञान म्हणता येईल असे मुलतत्व कोठे राहते?

 मग ज्ञानाचा काही अंतिम थांबा आहे काय? असल्यास तो नेमका कोनता? सर्व विशिष्ट-ज्ञानांचे ध्येय एकच असले तर असा Grand Unified Knowledge चा एकच एक असा टप्पा असु शकतो काय आणि असल्यास त्याची काही रुपरेषा तरी आज आपल्याला गवसू शकते काय हे प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.

आपल्याला विचार करतच रहावा लागेल. 

No comments:

Post a Comment

भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!

  पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...