Sunday, January 10, 2021

राष्ट्रनिर्माती पुण्यश्लोक अहिल्या

 

“पुण्यश्लोक अहिल्याबाई” ही हिंदी महामालिका सोनी टीव्हीवर चार जानेवारीपासून प्रदर्शित व्हायला सुरुवात झाली आहे. राष्ट्रनिर्माती असलेल्या एका प्रजाहितदक्ष शासिकेवरील या मालिकेचे मोल सर्वार्थाने मोठे आहे. अठराव्या शतकातील सर्वश्रेष्ठ प्रशासिका या शब्दात ब्रिटीश पार्लमेंटने ज्यांचा गौरव केला होता त्त्या अहिल्याबाई होळकरांवरील ही मालिका म्हणजे त्यांच्याप्रती दाखवली गेलेली कृतज्ञता तर आहेच पण त्यांच्या महान कार्याची आठवण आजच्या पिढीला करून देण्याचे कार्य या मालिकेमुळे होणार आहे. अहिल्यादेवीन्च्या कार्याचे अनेक अज्ञात पैलू उलगडले जाणार आहेत.

 अहिल्यादेवींची प्रतिमा म्हणजे हातात पिंड घेतलेली एक साध्वी एवढीच बनली कारण चित्रकार-शिल्पकारांनी तशाच स्वरूपात त्यांना पेश केले. इतिहासात सखोल जाण्याची नावड असलेल्या या देशानेही तीच त्यांची एकमेव प्रतिमा आहे असा ग्रह करून घेतला. त्यामुळे एक महान शिवभक्त, असंख्य मंदिरांचे निर्माण व जीर्णोद्धार करणारी अठराव्या शतकातील एक श्रद्धाळू राज्यकर्ती असा एकांगी समज दृढ होत गेला. हा समज चुकीचा नव्हता पण त्यांच्या त्यामागील प्रेरणा चर्चेत आल्या नाहीत. त्यामुळे राष्ट्रनिर्माती हे सार्थ बिरूद लोकांत पोहोचले नाही.

आणि त्याहीपलीकडे त्या एक कुशल योद्धा होत्या, राजानितीद्न्य होत्या, राज्याचा आर्थिक पाया सुदृढ केल्याखेरीज प्रजेचे हित होणार नाही हे उमगलेल्या अठराव्या शतकातील एकमेव द्रष्ट्या आणि कृतीशील राज्यकर्ती होत्या, स्त्री व जनहिताचे कायदे करणा-या एकमेव शासिका होत्या हे असे आणि इतरही अनेक पैलू जनतेसमोर आणले गेले नव्हते. ते या मालिकेमुळे जगासमोर येणार आहेत.

१७३३ मध्ये अहिल्यादेवीन्चा विवाह थोरले सुभेदार मल्हारराव होळकर यांचे सुपुत्र खंडेराव यांच्याशी झाला. खंडेराव १७४५ पासून सातत्याने राजपुताना आणि दिल्लीच्या मोहिमांवर असत. जयपूर आणि बुंदी येथील वारसाहक्क विवाद युद्ध करून सोडवले. दोआबातील अनेक युद्धात सहभाग घेतला. दिल्लीच्या पातशाहीच्या रक्षणाचा करार झाल्यानंतर त्यांना दिल्लीच्या रक्षणासाठी नियुक्त केले गेले. १७५३ मध्ये सुरजमल जाट यांनी दिल्लीवर आक्रमण केल्यावर खंडेराव होळकरांनी  फिरोजशहा कोटला येथे त्याचा दारुण पराभव केला व त्याला पिटाळून लावले. बादशहाने जाटाचा पाठलाग करायचे सुचवले. त्यासाठी खंडेराव यांची मिन्नतवारी केली.. पण पित्याच्या आदेशाशिवाय आपण दिल्ली सोडू शकत नाही असे खंडेराव यांनी उत्तर दिले. बादशहाने त्यांना आपले ऐकायला लावण्यासाठी खिल्लत देण्याचा प्रयत्न केला. खंडेराव यांणी बादशहाला तलवार आपल्या कमरेला बांधायला सागितले. तसे केले तर बादशहाला वाकावे लागले असते. त्यामुळे बादशहाची पंचाईत झाली. खंडेराव खिल्लत न स्वीकारता निघून गेले. पण जाटाच्या कारवाया वाढल्यावर मल्हाररावांनी खंडेरावला जाटाचा बिमोड करण्याची आज्ञा दिली. खंडेराव अवघे दोन हजार सैन्य घेऊन निघाले. जाटाचा प्रदेश उध्वस्त केला. घाबरलेला जाट कुम्भेरीच्या किल्ल्यात दडून बसला. तेथेच कुम्भेरीचा जगप्रसिद्ध वेढा सुरु झाला. या किल्ल्याची तटबंदी उध्वस्त करण्याच्या प्रयातात खंडेराव यांना तोफगोळा लागला. एका वीर सेनानीचा त्यात मृत्यू झाला. अहिल्याबाई सती जायला निघाल्या होत्या पण मल्हाररावांनी आर्त टाहो फोडत, “आता तूच माझी खंडेराव...राज्याला तुझी गरज आहे.” अशी विनवणी केली. अहिल्याबाइंनी सती जाण्याचा विचार रद्द केला.

मल्हारराव अहिल्याबाईंचे ख-या अर्थाने गुरु, मार्गदर्शक बनले. राजनीतीच्या कार्यात निपुण बनवले. त्या शस्त्रनिपुण तर होत्याच. मल्हारराव सतत वेगवेगळ्या युद्धमोहिमांवर असत. त्यांना रसद पुरवण्याची जबाबदारी अहिल्याबाईंवर होती. या कामात गोहदच्या सुभेदाराने अडथळा आणणे सुरु केले तर अहिल्याबाइंनी त्याच्यावर स्वारी केली. तेथील किल्ला उध्वस्त करून त्याचा पराजय केला आणि दिल्लीकडे जाणारा राजमार्ग सुरक्षित केला. माळव्याचा कारभार त्यांच्या हाती आला. इंदोर हे एक छोटे खेडे. त्याला एका व्यापारी राजधानीत बदलवले.

या काळातील त्यांचे महत्वाचे कार्य म्हणजे त्यांनी महिलांना लष्करी प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. ही भारतातीलच नव्हे तर जगातील पहिली स्त्रीमुक्तीची उद्घोषणा होती. त्या नुसते प्रशिक्षण देऊन थांबल्या नाहीत तर पाचशे महिलांचे सैन्य खडे केले. राघोबादादा पेशव्याला अहिल्याबाई सडेतोड प्रतुत्तर देत माघार घ्यायला लावू शकल्या त्या आपल्या या लष्करी सामर्थ्याचा बळावर.

पुढे मल्हाररावांचा मृत्यू झाला. त्यांचा एकुलता पुत्र मालेराव याचाही दुर्दैवी मृत्यू झाला. अहिल्याबाई डिसेंबर १७६७ मध्ये गादीवर आल्या. एक महिला शासक बनणे सनातन्यांना पसंत नव्हते. पण अहिल्याबाई खंबीरपने सर्व कट कारस्थानांना पुरून उरल्या. आणि माळव्याच्या इतिहासातील एक दैदिप्यमान कालखंड सुरु झाला.

कोणाच्या हातून काही काढून घेतले तर त्याला पर्यायही दिला पाहिजे हे सूत्र अहिल्यादेवींनी घालून दिले. भिल्ल समाज त्याकालात यात्रेकरुंना लुटून उपजीविका चालवत. अहिल्यादेवींनी त्यांचे मन वळवून त्यांच्यावरच यात्रेकरुंच्या रक्षणाची जबाबदारी सोपवत यात्रेकरुंकडुन भिलकवडी नावाचा कर घ्यायची परवानगी दिली. एवढेच नव्हे तर त्यांना कसायला जमीनीही दिल्या. हुंडा प्रथेवर त्यांनी बंदी तर आणलीच पण त्या काळातील निपुत्रिक विधवा स्र्त्रीयांच्या विरोधातील कायदे रद्द केले. अहिल्यादेवींचे प्रशासन हे राजकेंद्री नसून समाजकेंद्री होते. समाजातील सर्व घटकांना समान न्याय हे त्यांचे वैशिष्ट्य होते. अहिल्यादेवींनी आपल्या राज्यात कररचना सौम्य व समानतेच्या तत्वावर ठेवली होती. इंग्रजांनी त्यांचे शासन देशात सुस्थापित झाल्यानंतर अहिल्यादेवींच्या कररचनेचा आधार घेतच आपली कररचना केली.

राज्यातील व्यापार उदीम बाढावा यासाठी त्यांनी भरपूर कष्ट घेतले. महेश्वरला वीणकरांना स्थायिक करून त्यांनी वस्त्रोद्योगाला प्रोत्साहन दिले. ते इतके यशस्वी ठरले की माहेश्वरी साड्या व अन्य वस्त्रे भारतीय बाजारपेठ व्यापून उरले. आजही ती ख्याती पुसलेली नाही. इंग्रजांबद्दल अहिल्यादेवींचे मत आणि धोरण दूरदृष्टीचे होते. १७७७ साली पेशव्याला लिहिलेल्या पत्रात त्या म्हणतात, इग्रज गोडबोल्या आणि अस्वलासारखा धूर्त आहे. त्याच्याशी संग करू नका. तो गुदगुल्या करुन मारेल. अस्वलाला ठार मारायचे तर त्याचा तोंडावरच आघात करावा लागतो."

सत्तेवर आल्यानंतर त्यांनी महत्वाचे कार्य हाती घेतले व ते म्हणजे देश जोडण्याचे. त्यांना राष्ट्रनिर्माती म्हटले जाते ते त्यामुळेच. अहिल्यादेवींनी देशभर केलेली निर्माण कार्ये आजही प्रेरक आहेत. खरे तर शेकडो राज्यकर्त्यांत वाटल्या गेलेल्या भारत देशाला त्यांनी मंदिरे, घाट, रस्ते, धर्मशाळा आणि बारवांच्या माध्यमातून जोडण्याचे अचाट कार्य केले. आपल्या संस्थानाच्या बाहेर पाहण्याची तत्कालीन राज्यकर्त्यांची प्रवृत्ती नसतांनाही त्यांनी फक्त आपल्या होळकर संस्थानाचा विचार न करता सोमनाथ ते केदारनाथ आणि दक्षीणेत पार रामेश्वरमपर्यंतच्या भुभागांत आपली निर्माण कार्ये केली. त्याबद्दल त्यांचा आजही सन्मान केला जातो व त्यांना त्यासाठी "राष्ट्रमाता" असेही म्हटले जाते. परंतू इतिहासकारांच्या नजरेतून सुटलेला भाग म्हणजे बहुसंख्य प्रदेशांतील राज्यकर्ते मुस्लिम असतांनाही अहिल्याबाईंनी त्यांच्या राज्यात हिंदू मंदिरे उभारायच्या परवानग्या कशा मिळवल्या हा. यातील काही मंदिरे इस्लामी आक्रमकांनी उध्वस्त केलेली होती. त्यानिकटच अहिल्यादेवींनी काही मंदिरे उभारली आहेत. त्यावेळीसही राज्यकर्ते मुस्लिमच होते. केवळ धनाच्या जोरावर व दानशुरता व धार्मिकता आहे या बळावर ही मंदिरे उभारणे अत्यंत अशक्य असेच कार्य होते हे उघड आहे.

आपल्या शासनकाळात त्यांनी एका महिलेचे शासन कोण स्वीकारतो असे उद्दामपणे म्हणाना-या रामू-याच्या जहागीरदारावर स्वत: स्वारी करत त्याला यमसदनाला धाडले आणि या कृत्याने पुणे दरबारही विस्मीत झाला. “ही फक्त साध्वी नव्हे...ही तर रणरागिणी...” या शब्दात नाना फडणविसानी त्यांचा गौरव केला.

अहिल्याबांच्या थोर व्यक्तित्वाचे असंख्य पैलू आहेत. या मालिकेमुळे ते रोज समोर येत राहतील. दशमी प्रोडक्शनने या मालिकेची अत्यंत भव्य-दिव्य स्वरूपात निर्मिती केली आहे. ही मालिका जेवढी अहिल्याबाईंची आहे तेवढीच त्याना घडवणा-या थोर मल्हाररावांची आणि त्यांच्या युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या राजनीती आणि युद्धनिपुण खंडेराव यांची आहे. एक राष्ट्र निर्माण करणारी, स्त्रीयांना आत्मभान देणारी आणि प्रसंगी शस्त्रही उचलणारी अशी दुसरी महिला या देशात झाली नाही. ही मालिका आजच्या पिढ्यांना आत्मभान देणारी आहे. यत संघर्ष, शोकांतिका आणि रणगर्जनाही असल्याने ती भावनिक आणि चित्तथरारक आहे. ही मालिका सर्वांनी पाहणे आवश्यक आहे ते यामुळेच!

-संजय सोनवणी

No comments:

Post a Comment

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...