Thursday, October 21, 2021

मोहम्मद पैगंबरांचे विवाह!

 मोहम्मद पैगंबरांच्या अनेक विवाहांबद्दल अधून मधून चर्चा होत असते. प्रथम हे लक्षात घ्यावे लागते कि अरब हे कबिला जीवनातील होते आणि बव्हंशी कबिले इस्लाम-पुर्व काळात आपापसात लढयांमद्ध्ये गर्क असत. वाळवंटी प्रदेशामुळे अन्नधान्याचे उत्पादन कमी असल्याने मांसाहारावरच अधिक भर होता. माणसाच्या खाद्यप्रथा, वस्त्र संस्कृती व धर्मसंस्कृतीवर ज्या पद्धतीने जीवनयापन करावे लागते त्याचा मोठा पगडा असतो. या सामाजिक संस्कृतीकडे तेथील भौगोलिक परिस्थितीच्याच चौकटीत पहावे लागते.

पैगंबरांनी आयुष्यात एकुण तेरा विवाह केले. काही सुत्रांच्यानुसार ही संख्या १६ आहे. याखेरीज त्यांच्या दासीही होत्या अशी मान्यता आहे. त्यांची पहिली पत्नी खदिजा ही त्यांच्यापेक्षा वयाने २० वर्ष मोठी होती. ती विधवा होती. श्रीमंत होती. विवाहानंतर उभयतांना ६ अपत्ये झाली. त्यामुळे खदिजा ही पैगंबरांपेक्षा जास्त वयस्कर नसावी असे काही विद्वान मानतात. पैगंबरांना सुरुवातीच्या काळात तिने मोठी मदत केली. ती व्यावसायिक व्यवस्थापनात कुशल होती. पैगंबरांना कुराण स्फुरू लागले व त्यांना विरोध सुरु झाला त्या काळात खदिजा त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली. खदिजाच्या मृत्युपर्यंत पैगंबरांनी दुसरा विवाह केला नाही. या काळात ते मक्केतच होते. हा काळ त्यांच्या दृष्टीने संघर्षपुर्ण होता.
अरब टोळ्यांत निरंतर असनारा अंतर्गत संघर्ष संपवायचा असेल तर त्यांच्यात एकवाक्यता आणने गरजेचे होते. प्रत्येक टोळीची स्वतंत्र पाषाणदैवते होती व ती सर्व मक्का येथे स्थानापन्न होती.
मदिनेला हिजरत केल्यानंतर पैगंबरांनी सावदा या इस्लाम स्विकारलेल्या व त्यामुळे त्रास व कष्ट स्विकाराव्या लागणा-या मुलीशी विवाह केला. ९ वर्षेय अयेशाशी नंतर पाठोपठ विवाह केला. आयेशा ही अबु बक्रची मुलगी होती आणि अबुही इस्लाम सर्वप्रथम स्विकारण-यांपैकी होता. या काळात इस्लाम स्विकारलेले लोक कमी होते. आयेशाचा विवाह आधी एका गैर-इस्लामियाशी ठरलाही होता. पण अबु बक्रच्या विनंतीनुसार त्यांनी तिच्याशी विवाह केला. आयेशा अल्पवयीन होती व तिच्याशी विवाह केल्याबद्दल पैगंबरांवर आरोप केला जातो. पण अरब मुली लवकर वयात येत आणि लग्न ठरल्त्यानंतर दोन वर्षांनी प्रत्यक्ष विवाह झाला.
खदिजाप्रमानेच इस्लामच्या प्रसारात आयेशाचा मोठा वाटा आहे. ती विद्वान तर होतीच पण पैगंबरांच्य देहांतानंतर जवळपास ४४ वर्ष इस्लामच्या प्रसारात घालवली. हदिथमधील बरेच लेखन तिचे मानले जाते.
आयेशानंतर पैगंबरांनी अनेक विवाह केले. ते बव्हंशी मक्केतील युद्धात झालेल्या विधवांशी. या बहुविवाहांमागे अनेक कारणे दिली जातात.
१) विविध टोळ्यांशी रक्तसंबंध जुळवत त्यांचा विरोध सौम्य करणे.
२) विधवांबाबतचे त्यांचे अनुकंपेचे धोरण.
३) इस्लामचा प्रसार.
काहीही असले तरी पैगंबरांनी आपल्या पहिल्या पत्नीच्या मृत्युपर्यंत दुसरा विवाह केला नाही हे एक वास्तव आहे. अरबांत बहुपत्नीकत्व (भारतात होते तसेच) ही सर्वसाधारण बाब होती. अल्पवयीन मुलीशी विवाह (जे भारतातही विपुलतेने होत) नवीन नव्हते. सुरुवातीच्या काळात इस्लामियांची संख्या कमी असल्याने मुली द्यायच्या कोनाला हाही प्रश्न उपस्थित झाला असेल.
इस्लामच्या निर्मितीला आणि त्या धर्मश्रद्धांना तत्कालीन समाजस्थिती आणि जेथे हा धर्म स्थापन झाला त्याचा भुगोल विचारात घ्यावा लागतो. पैगंबरांनी धर्माच्य नांवाखाली आपापसात लढणा-या अरबांत ऐक्य साधले. इस्लाम नंतर झपाट्याने पसरला. पण अरबी भुगोल आणि त्यानुसार असणा-या खाद्य आणि इतर वेषभुषेसहितच्या प्रथाही अन्य भागांतील भुगोलांचा विचार न करता अंधपणे लादल्या गेल्या अथवा धर्माच्या नांवाखाली स्विकारल्या गेल्या. अरबस्तानातील वाळुची वादळे, उष्मा यामुळे पुरुषांना तोंड झाकणारा सफा व पायघोळ वेष आवश्यक होता तसाच स्त्रीयांना बुरखा. अन्यत्र मात्र हा वेष हेच इस्लामचे प्रतीक ठरवले गेले. तत्कालीन गरजा या सर्वत्र व सार्वकालिक व अपरिवर्तनीय बनवल्या गेल्या. अन्य प्रांतांतील धर्मांतरित मुस्लिमांनी यावर फार गांभिर्याने विचार केलेला दिसत नाही. आंधळा परंपरावाद हा सर्वच धर्मियांना दिर्घकाळात अडाणी, अप्रागतिक आणि कर्मठ बनवत नेतो. पैगंबरांनी त्यांच्या काळापुढे जाऊन आपले त्या परिस्थितीत पुरोगामीत्व दाखवले.
नंतर धर्मात क्रांती घडवण्याचे प्रयत्न झाले नाहीत असे नाही. इजिप्तचे अध्यक्ष सिसि यांनी याच वर्षी इस्लाम जागतिक हिंसेचा प्रमुख स्त्रोत बनत आहे व ते टाळण्यासाठी धर्मग्रंथांचे नव्याने अर्थ लावले गेले पाहिजेत असे म्हटले होते. पण आयसिस दुसरीकडे याच धर्मक्रांतीच्या नांवाखाली मुलतत्ववादाकडे गेली आहे. अन्यत्र इस्लाम हा अजुनही रुढीवादी म्हणुनच ओळखला जातो. धर्म ज्या काळात, जेथे, ज्या परिस्थीतीत निर्माण झाला त्या स्थित्या आज अस्तित्वात नाहीत, त्यामुळे आपापल्या प्रदेशाच्या निकडीनुसार त्यात बदल घडवायला हवा हे इमाम-मुल्लांना व सर्वसामान्य मुस्लिमांनाही समजायला हवे.

No comments:

Post a Comment

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...