Saturday, February 18, 2023

मराठी भाषा अभिजातच!


 

 


 

मराठी भाषा संस्कृतोद्भव आहे असे मानण्याचा प्रघात असल्यानेच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळू शकलेला नाही. पण वास्तव काय आहे हे तपासून पहायला हवे.

 

महाराष्ट्राचे पहिले ज्ञात राजघराणे म्हणजे सातवाहन. सातवाहनांचा काळ महाराष्ट्रच नव्हे तर राष्ट्रीय इतिहासाच्या दृष्टीनेही फार अर्थपूर्ण आहे. सातवाहनांनी सनपूर्व २३० ते इसवी सनाच्या २३० असे ४६० वर्ष राज्य केले. एवढा प्रदिर्घ काळ राज्य केले एवढ्यापुरतेच या राजवंशाचे महत्व नाही तर धार्मिक, सामाजिक आणि साहित्यसंस्कृतीच्या क्षेत्रातही या घराण्याचे प्रत्यक्ष योगदान आहे. किंबहुना आजच्या महाराष्ट्राचा पाया सातवाहनांनी घातला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

 

सातवाहन हे प्राकृत भाषेचे आश्रयदाते होते व त्यांनी राजस्त्रीयांनाही प्राकृतातच बोलण्याचा नियम घातला होता असे वा. वि. मिराशी म्हणतात. याचाच अर्थ अन्य कोणतीतरी (संस्कृत वा अन्य) भाषा अस्तित्वात असल्याचा ते अस्पष्ट संकेत देतात परंतु त्यासाठी प्रमाण मात्र देत नाहीत. कथासरित्सागरातील सातवाहन राजाच्या एका पत्नीला संस्कृत येत होते व तिने चिडवल्यामुळे सातवाहन राजा संस्कृत शिकला अशी एक कथा गुणाढ्याच्या संदर्भात येते. पण कथासरित्सागरातीक्ल हा कथापीठ लंबक मुळचा गुणाढ्याचा नाही. तो उतरकाळात (नवव्या शतकानंतर) गुणाढ्याने पैशाची भाषेत बृहत्कथा का रचली याचे स्पष्टिकरण देण्यासाठी बनवली हे उघड आहे. सातवाहन साम्राज्यात सन २०० च्या आसपास एकच मिश्र-संस्कृत (हायब्रीड) शिलालेख मिळतो आणि तोही सातवाहन राणी व शक नृपती रुद्रदामनची कन्या हिचा आहे.  रुद्रदामननेच गिरनार येथे कोरवलेला सन १६५ मधील  संस्कृत शिलालेख सोडला तर तत्पूर्वीच्या काळात देशभरातील सर्व शिलालेख व नाण्यांवरील मजकूर प्राकृत भाषेतच लिहिलेले आहेत. अगदी वैदिक संस्कृतीचे पुनरुज्जीवन करणारा म्हणून ओळखला जाणारा पुष्यमित्र श्रुंग व त्याच्या वंशजाचेही शिलालेख प्राकृतातच आहेत.

 

शिवाय मिराशी आपल्या "सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप" या ग्रंथात म्हणतात कि "सातवाहन आणि क्षत्रपांच्या काळात समाजाच्या उच्च थरांतील लोकांमधेही संस्कृत भाषा प्रचारात नव्हती." एका बलाढ्य राजघराण्याच्या नाण्यांवरील मजकूर आणि शिलालेख ते तत्कालिन साहित्य प्राकृतातच असावे हे संस्कृतविदांना खटकणारे होते. वा. वि. मिराशी इसपू पहिल्या शतकातील नाणेघाट लेखाबद्दल म्हणतात, ".....पण त्या श्रौत यज्ञांचे वर्णन असलेला लेख मात्र संस्कृत भाषेतील नसून प्राकृत भाषेत आहे. किंबहुना, एकाही सातवाहन राजाचा एकही लेख संस्कृतात नाही ही आश्चर्याची गोष्ट आहे...." जी भाषा अस्तित्वातच नाही ती प्रचारात कशी असेल? त्या भाषेत लेख कसे असू शकतील?

 

इस्पुचे पहिले ते दुसरे शतक या काळात प्राकृत भाषेतून हळूहळू शब्द संस्कारित होतांना दिसत असली तरी गाभा प्राकृतचाच आहे. सातवाहनकालीन शिलालेखांत हा प्रवास टिपता येतो. म्हणजेच संस्कृत भाषा इसवी सनाच्या पहिल्या शतकात विकसीत होऊ पाहत होती...ती अस्तित्वात नव्हती.

 

सातवाहन काळात उत्तर भारताप्रमाणे फक्त सामान्यांचीच नव्हे तर राजभाषाही प्राकृत होती. सातवाहनांच्या चारशे साठ वर्षांच्या कारकिर्दीतील सर्व नाण्यांवरील मजकुर प्राकृत भाषेतील आहे. सर्व शिलालेख प्राकृत भाषेतील आहेत. पण या प्राकृत भाषेत क्रमशा: झालेली परिवर्तनेही आपल्याला दिसुन येतात. याला आपण भाषिक उत्क्रांती म्हणतो. आणि एवढ्या प्रदिर्घ काळात ती तशी होणे स्वाभाविक आहे. कोणत्याही जीवंत भाषेचा तो एक महत्वाचा निकष असतो.

वररुचीने माहाराष्ट्री प्राकृताचे "प्राकृत प्रकाश" हे व्याकरण लिहिले. प्रत्यक्षात आपल्याला वररुचीचे मूळ व्याकरण उपलब्ध नसून भामहाने केलेला त्या व्याकरणाची सहाव्या शतकातील संस्कृत अनुवाद/टीका उपलब्ध आहे. माहाराष्ट्री प्राकृत हे सर्वश्रेष्ठ मानले जात होते. शौरसेनी, मागधी ई. प्राकृत भाषांचे व्याकरण देतांना "शेष माहाराष्ट्रीवत" असे वररुची म्हणतो. प्रत्यक्षात प्राकृत शब्द हा मुळचा "पाअड" (प्रकट) या शब्दाचे संस्कृतीकरण आहे. त्यामुळे आपण सोयीसाठी "प्राकृत" हा शब्द वापरत असलो तरी तो ‘पाअड’ भाषानिदर्शक आहे हे लक्षात ठेवले पाहिजे.

 

माहाराष्ट्री प्राकृत अथवा पाअड श्रेष्ठ का मानली जात होती? कवि दंडी तिला "प्रकृष्टं प्राकृत" म्हणजे उत्कृष्ठ प्राकृत म्हणतो. काव्यरचना माहाराष्ट्री प्राक्रुतातच करावी असा आग्रह धरला जात असे. (साहित्यदर्पण) याचे उत्तर सातवाहनांच्या प्रदिर्घ स्थिर सत्ताकाळामुळे त्या भाषेत मौलिक ग्रंथरचना होत राहिली या वास्तवात आहे. स्थिर शासनाच्या अंमलाखाली कला-संस्कृती बहरत असते आणि सातवाहनांमुळे महाराष्ट्रात नेमके तेच झाले.

 

प्राकृत भाषेचा व्याकरणकार वररुची नेमका कधी झाला याबाबत विद्वानांत बरेच मतभेद आहेत. हालाची "गाथा सतसइ" वररुचीचे नियम कटाक्षाने पाळते. व्यंजनांचे द्वित्व व त्यांचा लोप हे वररुचीच्या माहाराष्ट्री प्राकृताच्या व्याकरणातील महत्वाचा नियम होय. गाथा सप्तशतीतील रचना हा नियम पाळतात. हाल हा सातवाहन वंशातील अठरावा राजा होय. तो गौतमीपुत्र सातकर्णीच्या पुर्वी सहाव्या (किंवा पाचव्या) पिढीत होऊन गेला अशी मान्यता आहे. गौतमीपूत्र सातकर्णी इसवी सनाचा पहिल्या शतकात होऊन गेला. सरासरी इसवी सनाच्या साठ साली त्याचे राज्यारोहन झाले असा तर्क आहे. तो काही वर्ष मागे-पुढे होऊ शकतो हे गृहित धरले तरी हाल सातवाहन इसपु च्या पहिल्या शतकातील उत्तरार्धात झाला असे अनुमान करता येते. म्हणजे इसपूच्या पहिल्या शतकात हालाने गाथा संग्रह सुरु केला हे आपल्याला निश्चयाने म्हणता येते. वररुचीचे व्याकरण या काळात कवि-साहित्यकारांत प्रचलित झाले होते हे वररुचीच्या व्याकरणाचे नियम गाथा सत्तसई व अन्य ग्रंथ पाळतात त्यावरुन सिद्ध होते. कोणतेही व्याकरण प्रचलित व्हायला तत्कालीन प्रचार-प्रसारावरील मर्यादा लक्षात घेता किमान शंभरेक वर्ष लागु शकतात. म्हणजेच प्राकृत प्रकाशकार वररुची हा इसवी सनापुर्वीचा दुस-या शतकातील किंवा तत्पुर्वीचा असावा असा तर्क बांधता येतो. इतिहासात अनेक वररुची नांवाच्या व्यक्ति झाल्या आहेत, पण पाअड भाषांचे व्याकरण रचणारा वररुची ही स्वतंत्र व्यक्ति होय.

 

असे असले तरी शिलालेखीय प्राकृतात मात्र वररुचीच्या व्याकरणाचा द्विस्तर व्यंजन लोप या नियमाचा वापर केला गेलेला नाही. शिलालेखीय गद्य भाषा आणि ग्रांथिक काव्य-भाषा यांतील भेदामुळे गद्यात व्याकरणीय नियम कटाक्षाने पाळले न जाणे स्वाभाविक आहे.

 

तत्कालीन प्राकृतात येणारे बहुतेक शब्द उच्चारबदल होत का होईना आजही वापरात आहेत. संस्कृत भाषेत सर्वच प्राकृत शब्द संस्कारित न केले गेल्याने अशा शब्दांना देशीम्हणण्याचा प्रघात असला तरी संस्कृतमधील सर्वच शब्द मुळचे प्राकृतच आहेत. व्याकरण मात्र अत्यंत तर्कनिष्ठ आणि अर्थबदल न होऊ देणारे असल्याने ग्रंथांसाठीच ही भाषा विकसित केली गेली हे स्पष्ट आहे. ती बोलीभाषा किंवा मातृभाषा कधीही नव्हती असे भाषातद्न्य माधव देशपांडेही स्पष्ट करतात. आणि प्राकृतमधून संस्कृतचा विकास कोण्याएका मानवी समुहाने केला नसून त्या विकासात बौद्ध, जैन आणि तांत्रिक विद्वानांनीही मोठा हातभार लावला हे सनपूर्व २०० पासून मिळणा-या बुद्धिष्ट आणि जैन ग्रंथातील भाषिक उत्क्रांतीमुळे स्पष्ट होते.

 

आजची मराठी ही माहाराष्ट्री प्राकृतातूनच विकसित होत आलेली आहे. ती संस्कृतोद्भव असण्याचा प्रश्नच येत नाही कारण संस्कृत भाषेचा ती आधी अस्तित्वात होती हे दाखवणारा एकही पुरावा नाही. तरीही मराठी भाषेचे मातृत्व अज्ञानाने फार नंतर जन्माला आलेल्या संस्कृतला दिले जाते आणि मराठी भाषेचे अभिजातत्व नाकारले जाते हे खरेच दुर्दैव होय!

 -संजय सोनवणी

No comments:

Post a Comment

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...