Monday, February 20, 2023

असूरवेद

 " #असूरवेद "

❤️🌿✨


















वेद म्हणजे काय तर, वेद म्हणजे ज्ञानाच भंडार !
-----------------------------------*-----------------------------------
पुस्तकाचं नुसतं शीर्षक पाहून पुस्तकाच्या शैलीबद्दल कोणीही गैरसमज करून घेऊ शकतो. साहजिकच आहे ते.
तुम्हाला जर विचारलं की, एकूण वेद किती आहेत ? तर तुम्हा सगळ्यांचं हमखास उत्तर ४ हेच असणार. हो ना ! कारण आपण सगळेच जण आत्तापर्यंत आर्यांच्या सामवेद, यजुर्वेद, ऋग्वेद, अथर्ववेद हेच ४ वेद बद्दल ऐकत आणि वाचत आलो आहोत.
कधी कोणाच्या मनात हा प्रश्न उपस्थित नाही झाला का, की खरंच वेद हे फक्त ४ च आहेत का किंवा ४ च होते का ?
तर एकुण वेद हे ४ नसून, ८ होते !
उर्वरित अनार्यांची ४ वेद म्हणजेच सर्पवेद, गंधर्ववेद, असूरवेद, पिशाच्चवेद ही होय. अनार्यांची ही ४ वेद आर्यांच्या ४ वेदांच्याही आधीची आहेत असं मानलं जातं. परंतु त्या काळात आर्य आणि अनार्य यांच्यामध्ये झालेल्या युद्धांमुळे ही उर्वरित अनार्यांची ४ वेद विस्मृतीत गेले, की कालौघात ते नष्ट करण्यात आले, की दडपण्यात आले याचं उत्तर तुम्हाला या पुस्तकात समजेल.
ही उर्वरित अनार्यांची ४ वेद खरंच अस्तित्वात होती का, आणि हे ४ वेद खरचं नष्ट झाली की मुद्दाम नष्ट करण्यात आली ? आणि जर नष्ट केलं असेल तर कोणी, का आणि कशासाठी नष्ट केली असावी ?
-----------------------------------*-----------------------------------
पैशाच्ची भाषेत लिहिलेलं एक महत्त्वाचं हस्तलिखित औरंगाबाद येथील सुरेश जोशी नावाच्या एका प्रसिध्द इतिहास संशोधकाच्या हाती लागतं. काही अंशी त्यांना त्यामागचं ज्ञान ही अवगत होतंच. त्यांना संपूर्ण जगाला या महत्त्वाच्या शोधाबद्दल सांगायचे ही असते परंतु, ही माहिती त्यांच्याकडून जगासमोर येण्याआधीच धार्मिक संघटनांकडून त्यांची हत्या होते. त्यांच्या मृत्यूसोबत ते महत्त्वाचं हस्तलिखित ही गायब होऊन जातं. यादरम्यान त्यांची मुलगी सायली जोशी ही वैष्णविझमच्या phd च्या अभ्यासासाठी त्याच्या संशोधनासाठी पंढरपूरला आलेली असते. तिथेच तिची ओळख बौद्धिक धर्माच्या गौतम कांबळे नामक संशोधकासोबत होते. या कथेत पंढरपूर बद्दल अनेक विचार मांडले आहेत, जे वाचुन मलाच खूप नवल वाटतं होतं कारण काही गोष्टी खरंच खूप धक्कादायक आहेत. ज्याबद्दल आपल्याला आत्तापर्यंत फारसं काही माहितीच नव्हतं.
दरम्यान पोलिसांचा तपास सुरू होतो. तपासादरम्यान सुरेश जोशींवर मूर्ती तस्कराचा आरोप केला जातो, कारण त्यांच्या घरातून असूर वरून नावाची एक मूर्ती गायब झालेली असते आणि मूर्ती तस्करामुळेच त्यांचा खून केला गेला असावा असा निकष काढला जातो. वडिलांवर केल्या गेलेल्या या सर्व आरोपांना त्यांची मुलगी सायली जोशी धुडकावून लावते. सायली आणि गौतम या दोघांनाही धार्मिक संघटनांकडून धोका असतो. परंतु कशालाही न जुमानता ती गौतमच्या मदतीने वडिलांच्या मृत्यूचा आणि त्या हस्तलिखित चा तपास सुरू ठेवते.
दरम्यान अनेक घटना घडतात. सुरेश जोशींचा एक मुलगा परदेशी अमेरिकेत रहात असतो. वडीलांच्या मृत्यूबाबत समजल्यानंतर तो भारतात येण्यासाठी निघतो. या प्रवासामध्येच त्याच्यावर देखील प्राणघातक हल्ला होतो. दुसरा मुलगा भरतातच असतो, पण तो ही हृदयविकाराच्या झटक्याने क्रिटिकल होतो व रुग्णालयातच दाखल असतो. सायली जेव्हा पंढरपूर मध्ये असते तेव्हा तिचा आणि गौतम चा जो संवाद होतो त्यातून अनेक प्रश्न आपल्या डोक्यात घर करून राहतात. जसे, पंढरपूरला पंढरपूर हे नावं विठ्ठला मुळे मिळालेलं असतं की पुंडलिक मुळे ? पुंडलिक नेमका कोण होता ? पुंडलिक च्या समाधी मध्ये शिवलिंग का म्हणून आहे ? सूर असुर म्हणजे नक्की काय ? कैक प्रश्न आहेत..
-----------------------------------*-----------------------------------
हे सर्व वाचून तुमच्या मनात नक्कीच असंख्य प्रश्न निर्माण झाले असतील. असं जरी असलं तरी मला कथेचं अजिबात स्पाॅयलर देयचं नाहिये. तुमच्या असंख्य प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या कादंबरीतच वाचून मिळतील. तसेच हे पुस्तक तुम्हाला सखोल विचार करण्यास ही नक्कीच भाग पाडेल. जसं की, पुरातत्त्व विद्या बद्दल तसेच आपल्या ग्रंथाचं मुल स्वरूप जाणून घेण्याची जिज्ञासा तुमच्यात तयार होईल. या उर्वरित अनार्यांच्या ४ वेदांप्रमाणेच आणखीन कितीतरी ग्रंथ त्या काळी अस्तित्वात असतील ज्यांचा नाश केला गेला असेल. तो का, कोणी आणि कशासाठी केला असेल ?
काही जणांना हे पुस्तक ब्राह्मणविरोधी किंवा तथाकथित हिंदुत्ववादी पुस्तक वाटू शकतं. पण असं अजिबात नाहिये. लेखकाने हि कादंबरी लिहिण्यासाठी अनेक खऱ्या, अस्तित्वात असलेल्या संदर्भ ग्रंथाचा आधार घेतलेला आहे. आपल्या सर्वांना नक्कीच इतिहास माहीत असतो पण त्याबद्दल संपूर्णपणे सखोल माहीत नसते. आपल्याला जेवढं पण काही माहीत असतं ते कमी जास्त प्रमाणात किंवा तुकड्यांच्या स्वरूपात माहीत असतं.
आपल्या इतिहासाला आणखीन एका नवीन दृष्टिकोनातून पाहण्यासाठी प्रत्येकाने हे पुस्तकं जरुर वाचावं.
-----------------------------------*-----------------------------------
-डॉ.अक्षया पवार.👩‍⚕️✍️

No comments:

Post a Comment

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...