Sunday, February 26, 2023

ज्ञानभाषा मराठी: कधी आणि कशी?



ज्ञानभाषा मराठी: कधी आणि कशी?

मराठी भाषा किती प्राचीन आहे याचा उहापोह अनेकदा होत असतो. प्रत्यक्ष शिलालेखीय पुरावे पाहिले तर सर्वात जुने शिलालेख नाणेघाट, लोहगडवाडी आणि पाले येथे मिळालेले आहेत. नाणेघाट शिलालेख सातवाहन घराण्यातील नायानिकेने कोरवलेला असून तो सर्वात मोठा आहे. या लेखांचा काळ हा इसवीसनपूर्व दुसरे ते पहिले शतक असा ठरवण्यात आलेला आहे. सातवाहनांनी महाराष्ट्रावर इसपू २२० ते इसवी सन २३० असे किमान साडेचारशे वर्ष राज्य केले. या काळातील सर्व शिलालेख माहाराष्ट्री प्राकृतात आहेत. एवढेच नव्हे तर त्यांच्या नाण्यांवरील मजकूरही प्राकृतात आहेत. इसवी सनपूर्व पहिल्या शतकात लिहिला गेलेला व हाल सातवाहनाने संपादित केलेला गाहा सतसई (गाथा सप्तशती) हा अमोलिक काव्यसंग्रह माहाराष्ट्री (म्हणजे आजच्या मराठी) चे संस्कृतीक वैभव आहे. वररुचीचे माहाराष्ट्री प्राकृताचे व्याकरण इसपु २०० मधील. यानंतर इसवी सनाच्या पहिल्या शतकात लिहिला गेलेला अंगविज्जा हा गद्य ग्रंथ तत्कालीन सामाजिक व धर्मस्थितीवर प्रकाश टाकतो. म्हणजे लिखित व शिलालेखीय पुराव्यांनुसार २२०० वर्षांपूर्वी माहाराष्ट्री प्राकृत ग्रंथ व राजभाषा बनलेली होती हे सिद्ध होते. ती त्याही पूर्वी किमान एक हजार वर्ष बोलण्यात होती याचे अनुमान आपल्याला करता येते. हीच माहाराष्ट्री कालौघात परिवर्तने स्वीकारत आपल्यापर्यंत आज पोहोचलेली आहे.

 

मराठी भाषा संस्कृतोद्भव आहे असा मराठी भाषकांनी जपलेला एक भ्रम आहे. याचे कारण असे कि संस्कृत भाषेतील पहिला शिलालेख मिळतो तो इसवी सनाच्या दुस-या शतकातील. तत्पूर्वी भारतात मिळणारे सर्व लेखन हे विविध प्राकृत भाषांमधील आहेत. संस्कृतचे अस्तित्व दाखवता येईल असा एकही पुरावा मिळालेला नाही. शिवाय हा संस्कृत शिलालेख आहे शक नृपती रुद्रदामनचा. इसवी सनाच्या तिस-या शतकानंतर मात्र संस्कृत शिलालेखांची संख्या वाढत गेल्याचे दिसते. याचे कारण असे कि संस्कृत भाषा इसपूचे पहिले शतक ते दुसरे शतक या काळात ग्रांथिक कारणासाठी प्राकृतातून विकसित केली जात होती व तिचे विकसन झाल्यानंतर ती ग्रंथलेखनाची भाषा बनली. संस्कृतमधील सर्व शब्द हे मूळ प्राकृत शब्दांमध्ये किंचित ध्वनीबदल करून साधले गेलेले आहेत. जसे प्राकृत दुलह संस्कृत मध्ये दुर्लभ बनले. वुंदचे वृंद बनले. अशी अगणित उदाहरणे देता येतील. याचा अर्थ एवढाच कि संस्कृत भाषा ही प्राकृतोद्भाव आहे. उलटे झालेले नाहे कारण तो क्रम ऐतिहासिक पुराव्यांवर टिकत नाही.

 

संस्कृतचा उदय झाल्यानंतरही माहाराष्ट्री प्राकृतात असंख्य ग्रंथांची निर्मिती होतच राहिली. रावणवहो, गौडवहो, लीलावई,  विमलसूरिकृत पउमचिरिय अशी अजरामर महाकाव्ये जशी लिहिली गेली तशीच अगणित खंडकाव्ये, आख्याने व अद्भुतरम्य कथाही लिहिल्या गेल्या. आजची मराठी घडवण्यात तत्कालीन जैन विद्वानांचे योगदानही अमुल्य असेच आहे. हीच माहाराष्ट्री प्राकृत तेराव्या शतकापर्यंत ज्ञानदेव-नामदेवाच्या मराठीत परिवर्तीत होत पुढे बखरींच्या भाषेत बदलली. कालौघात परिवर्तने स्वीकारत विकासशील राहणे हे कोणत्याही जिवंत भाषेचे लक्षण असते. अवघ्या शंभर वर्षांपूर्वीची मराठी आणि आजची मराठी यात तुलना केली तरी हे वास्तव लक्षात येईल.

 

मराठी भाषा हा महाराष्ट्रीतील जनतेचा सांस्कृतिक उद्गार आहे. मराठी भाषेतच ६२ पेक्षा अधिक प्रादेशिक बोलीभाषा आहेत. त्यातील शब्दकळा अनोखी व अर्थगर्भ असूनही आम्ही आज बोलीभाषांना तुच्छ लेखात त्या त्या बोली बोलणा-यांना न्यूनगंडात ढकलत एक घोर सामाजिक अन्याय करत असतो याचे आपल्याला भान नाही. शासकीय मराठी तर बव्हंशी संस्कृताळलेली असल्याने ती समजावून घ्यायला इंग्रजीचाच आधार घ्यावा लागतो.  प्रमाणभाषेचा डंका पिटणारे अशास्त्रीय लोक दुसरीकडून वेगळेच आक्रमण करत असतात. जगात कोणतीही भाषा प्रमाण नसते. इंग्रजी घेतली तरी ब्रिटीश इंग्रजी, अमेरिकन इंग्रजी, आफ्रिकान्स इंग्रजी ते आता भारतीय इंग्रजी असे प्रादेशिक भेद आहेत पण त्यांना कोणी त्यासाठी अमुकच प्रकारच्या इंग्रजीत लिहा असा आग्रह कोणी धरत नाही. पण हे स्तोम आपल्या भाषेतच का यावर जेवढा विचार व्हायला हवा तेवढाही होत नाही.

 

मराठी ज्ञानभाषा होऊ शकते काय हा उद्दाम प्रश्न अनेकदा काही लोक विचारात असतात. इंग्रजी मान्य भाषा होण्यापूर्वी तीही गावढ्याची भाषा म्हणूनच ओळखली जात होती आणि समाजातील वरिष्ठ लोक फ्रेंच किंवा ल्याटिन भाषेत बोलण्यात आणि शिकण्यात धन्यता मानत असत. प्रबोधनकाळात इंग्रजीत अवाढव्य ग्रंथ निर्मिती तर झालीच पण जिज्ञासू लेखक-संशोधाकांनी जगभराच्या ग्रंथांचे इंग्रजीत भाषांतर करून घेतले व प्रदीर्घ अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिल्या. त्यामुळे ब्रिटीश लोकाचे ज्ञानविश्व विस्तारले. इंग्रजी भाषा ही मोठ्या प्रमाणात जागतिक भाषा बनू लागली कारण तीच्यात उपलब्ध असलेले जागतिक साहित्य. इंग्रजीने जगभरच्या भाषांमधून अगणित शब्द स्वीकारले व पचवले आणि त्या त्या शब्दांचा अर्थविस्तार करत इंग्रजी भाषेला एक अर्थगर्भता प्राप्त करून दिली.

मराठीत प्राचीन काळापासून काव्य, शास्त्र, भूगोल, सौंदर्यशास्त्र, अध्यात्म, तत्वज्ञान, धर्मशास्त्र, व्याकरण इ. विषयांवर विपुल साहित्य लिहिले गेले. आज जवळपास ९०% ग्रंथांचे सुचीकरनही झालेले नाही. आजच्या मराठीत अनुवाद तर दूरच. आपला मराठी विश्वकोश गेली जवळपास ५० वर्ष रखडत रखडत पूर्णत्वाकडे जात आहे. पूर्वी प्रकाशित झालेल्या खंडांतील नोंदी आज कालबाह्य झाल्यात पण त्यांचे नुतनीकरण करून पुन्हा प्रसिद्ध करण्याची बाब दूरच राहिली. आधुनिक विज्ञान ते जागतिक साहित्य मराठीत आणण्याचे एक परंपरा मराठीत होती, पण आता ती केवळ लोकप्रिय साहित्यापुरती मर्यादित झाली आहे. सशक्त बालसाहित्य आणि कुमार साहित्य मराठीत एवढ्या अभावाने आहे कि नवे वाचक तयार करण्याची परंपरा कुंठीत झालेली आहे.

 

मराठी ज्ञानभाषा कधी होऊ शकेल? जेंव्हा विद्यापीठीय पातळीवर होणारी संशोधने सुद्धा मराठीत लिहिली जातील. जागतिक आधुनिक तत्वज्ञान, विज्ञान ते दैनंदिन जीवनाला स्पर्श करणारे उत्तम दर्जाचे लेखन मराठीत विपुल संख्येने उपलब्ध केले जाईल. त्यावर प्रदीर्घ अभ्यासपूर्ण समीक्षा लिहिल्या जातील तेंव्हा! पण आज यात जोखीम पत्करून का होईना कार्य करू इच्छिणारे अभावानेच आहेत. सामाजिक पातळीवर अशा लेखन-अनुवादांना सहाय्य करणा-या संस्थाची तर उणीवच आहे. शिवाय इतिहाससंशोधनेही जाती-धर्मनिष्ठीत बनल्याने त्यात खोट्या अस्मिताचा बडिवारच अधिक. ज्ञान-विज्ञान हे विषय अभावानेच लिहिले जातात व तेही कॉपी-पेस्ट स्वरूपाचे. आणि याचमुळे मराठीचा वाचकही घटत चालला आहे. मराठी शाळा बंद पडत आहेत. मुले अर्धवट इंग्रजी आणि अर्धवट मराठीने ग्रस्त असल्याने त्यांचा बौद्धिक विकासही कोठेतरी अडखळून पडला आहे.

 

मराठी राजभाषा दिनी सर्वांना मायमराठीची आठवण येते. गतकाळातील कवींच्या मराठीप्रेमाची महती गाना-या कवितांची अवतरणे टाकली कि त्यांना तेवढ्यातच धन्यता वाटते. हे बेगडी मराठी प्रेम झाले. ती ज्ञानभाषा व्हायची असेल तर त्या भाषेत तेवढेच सखोल आणि मूलगामी लेखन सातत्याने होत राहिले पाहिजे आणि जागतिक ज्ञान मराठीतच उपलब्ध झाले पाहिजे तर ख-या अर्थाने या प्राचीन भाषेचा गौरव होईल. अन्यथा महाराष्ट्रातील अनेक बोलीभाषा जशा वेगाने –हास पावत चालल्या आहेत तशीच मायमराठीही एक दिवस शेवटचे आचके देईल. पण वि. का. राजवाडे एकदा उद्वेगाने म्हणाले होते तसे, जर मराठीत अजून धुगधुगी असेल तर तिच्यात प्राण भरा. आणि ती मरणारच असेल तर आत्ताच तिचे अंतिम संस्कार करून अंघोळ करा! आपल्याला मराठीत पुन्हा एकदा प्राण भरले पाहिजेत. किमान अडीच हजार वर्षांचा ऐतिहासिक अस्तित्व असलेल्या या भाषेला पुन्हा एकदा वैभवाच्या शिखरावर पोहोचवले पाहिजे!

-संजय सोनवणी 

No comments:

Post a Comment

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...