कमी श्रमात अधिकाधिक धन जमा करण्यासाठी
अनैतिक मार्गांचा वापर केला जातो तेंव्हा त्याला आर्थिक गुन्हेगारी म्हटली जाते.
त्यासाठी सत्ता, सामाजिक स्थान किंवा निव्वळ गुन्हेगारी स्वरूपाच्या कल्पकतेचा
वापर केला जातो. असे लोक मुळात अनैतिक मार्गाने श्रीमंत झालेले असल्याने ते आपल्या
या लबाडीने प्राप्त केलेल्या धनाचा वापर करून आधीच भ्रष्ट असलेल्या व्यवस्थेतीत
लोकांना विकत घेऊन कायद्याच्या कक्षेबाहेर राहण्यात यश मिळवून उजळ माथ्याने सुखनैव
मिरवत असतात. ज्यांना हे विशेष कौशल्य साधलेले नसते अथवा राजसत्तेमध्ये ज्यांचे
लांगेबांधे नसतात असेच लोक शक्यतो पकडले जातात. त्यांच्यावर खटलेही चालतात. खटले
चालले तरी शिक्षा खूपच थोडक्यांना होते. अनेक तर विदेशात पळून जाऊन आपली मत्ता आणि
प्राण वाचवतात. त्यामुळे अनेक श्रीमंत लबाड मार्गानेच श्रीमंत झालेले आहेत हे
माहित असूनही श्रीमंतीची आस असणारे त्यांनाच आदर्श माणू लागतात. यातून एक लबाडांची
अर्थसंस्कृती निर्माण होऊ लागते. मुळात या लबाड श्रीमंतांनी निर्मिती शून्य किंवा
अत्यल्प प्रमाणात केली असल्याने देशाची अर्थव्यवस्था पोकळ होत जाते. उरतो तो कधीही
कोसळू शकेल असा डोलारा!
श्रीमंती हे प्रत्येकाचे साध्य असले तरी श्रीमंत कसे व्हायचे हे अनेकांना समजत नाही.
उपलब्ध संसाधने व कल्पकता व कौशल्य याचा सुरेख मेळ घालून नवनिर्मिती करत, त्यांचे
सुयोग्य विपणन करत लाभ मिळवत राहत यथावकाश श्रीमंत होणे हा इष्ट मार्ग झाला. पण
यात कष्ट असतात. संयम व धैर्याची परीक्षा लागते. धोके पत्करावे लागतात. पण
निर्मितीक्षमतेतून विकास हे ध्येय असणारे हे धोके, कष्ट संयमाने पत्करतात कारण
त्यांचा स्वत:वर आणि आपले उत्पादन अथवा सेवांवर प्रचंड विश्वास असतो. बहुसंख्य लोक
या मार्गाने यश संपादन करत राहतात. पण त्यांचा विकास दर लबाड
व्यावसायिक/उद्योजकांपेक्षा तुलनेने कमीच राहतो. पण असेच उद्योजक/व्यावसयिक नैतिक
तर असतातच पण अर्थव्यवस्थेचा खरा आधारस्तंभ असतात. पण लबाडांच्या आदर्शांमुळे अशा
नितीमानांमध्येही काही अपप्रवृत्ती शिरकाव करतात व तेही काही प्रमाणात का होईना
अनैतिक मार्गांचा अवलंब करतात असेही आपण पाहतो. यातून एकुनातीलच अर्थव्यवस्थेचे
पोखरने सुरु तर होतेच पण ग्राहक जो कोणत्याही उद्योग/व्यवसायाचा पाया आहे
त्याच्याशीही प्रतारणा केली जाते. कोणतीही अर्थव्यवस्था सबल व्हायची असेल तर आपली
आदर्शे प्रत्येक नव अथवा विद्यमान व्यावसायिकांनी फार काळजीपूर्वक ठरवली पाहिजेत
ती यासाठीच. प्रेरक व्याख्याने देणारे याबाबत सहसा बोलत नाहीत कारण त्यांचेही
ज्ञान तोकडे असते. लोकांना भावनिक आणि चमकदार वाक्ये फेकून पेटवून उठवणे हेच
त्यांचे ध्येय असते त्यामुळे तेही नकळत अशी चुकीची आदर्शे प्रस्थापित करायला मदतच
करत राहतात.
आर्थिक गुन्हेगारी हा काही नवा प्रकार नाही.
लबाड प्रवृत्तींचा इतिहास मानव अस्तित्वात आला तेंव्हापासूनच सुरु होतो. मानव
स्थिर समाजात आला तरी त्याच्या या मुलभूत सवयीपासून अलिप्त राहू शकला नाही. एकपत
धन असलेला दुप्पट धनाची तर दुप्पट धन असलेला चौपट धनाचे अपेक्षा बाळगतो हे
औपनिषदिक विधान मानवी प्रवृत्तीवर बोट ठेवते. भारतात बनावट हुंड्या, नाणी, वजनमापे,
पशुंचा खरा दर्जा, कर वाचवन्यासाठी हिशोबातील हेराफेरी, अपहार इत्यादी असंख्य
आर्थिक गुन्हे पूर्वापार चालत आले आहेत. कौटल्याच्या अर्थशास्त्रात आणि प्राकृत
साधनांमध्ये अशा अनेक प्रकारच्या आर्थिक गुन्ह्यांची नोंद आहे. एवढेच नव्हे तर
प्रत्येक राजाने आर्थिक गुन्ह्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात
याचेही निर्देश दिलेले आहेत. फसवणुकीच्या मार्गांमध्ये बदल झाला असला तरी या
प्रवृत्तीत आजही फरक पडला आहे असे नाही.
पाश्चात्य जगही या लबाड्यांपासून कसे अलिप्त
राहणार? बायबलमध्ये असे काही आर्थिक गुन्हे उल्लेखले गेले आहेत. पहिला ज्ञात आर्थिक
गुन्हा नोंदला गेला आहे तो सनपूर्व तिस-या शतकातील आहे. ही फसवणूक ग्रीसमध्ये
झाली. हेगेस्त्रातोस नावाच्या एका ग्रीक व्यापा-याने आपल्या जहाजाचा विमा तर
काढलाच पण ज्या मालाचे वाहतूक करणार तो विकत घेण्यासाठी मोठे कर्जही काढले. माल
विकला गेल्यानंतर कर्ज फेडण्याचे त्याने लेखी वचनही दिले. हेगेस्त्रातोसने जहाजात
कसलाही माल न भरता जहाज हाकारले. ती बोट बुडवून इन्शुरन्सचे पैसे घेणे आणि
ज्याच्याकडून माल विकत घेण्यासाठी कर्ज घेतले ते पैसेही बुडवणे हा त्याचा उद्देश
होता. समुद्रात गेक्ल्यावर त्याने बोट बुडवायचा उद्योग सुरु केला. आपल्या
क्र्यूसोबत पळून जाण्याचा प्रयत्न करत असता त्याचाही बुडून मृत्यू झाला. त्याचा
गुन्हा उघडकीला आला तो असा. रोम मध्ये इसवी सन १९३ मध्ये तर अजब आर्थिक गुन्हा
झाला. रोमन सम्राट पर्टीनाक्स याचा खून केला तो त्याच्या प्रेटोरिअन गार्डस
नावाच्या अंगरक्षक दलाने. खून केल्यावर या दलाने अजब नटवरलाली शक्कल लढवली.
त्यांनी रोमन साम्राज्यच १ अब्ज पौंडांना विकायला काढले. ज्युलिआनुस नामक तत्कालीन
धनाढ्याने रोमन साम्राज्याची ही किंमत मान्य केली आणि ती देवून रोमन साम्राज्य
विकत घेतलेही! अर्थात त्याला कोणीही
सम्राट म्हणून मान्यता दिले नाही. उलट गृहयुद्ध सुरु झाले. हे अंगरक्षक दल ठार
मारले गेले. पण चार्ल्स पोन्झी वगैरे अलीकडच्या काळातील आर्थिक गुन्हेगार या अंगरक्षक
दलाच्या पुढे किरकोळ म्हणावे लागतील.
लोकांचा मोह, स्वार्थ व कमी श्रमात अशक्य ते
साध्य करण्यासाठी घेतलेली जीवघेणी दौडही अशा अपराध्यांना जन्म देते. अधिक
व्याजाच्या आमिषाला बळी पडून असंख्य लोक आपले पैसे शेवटी गमावत असतात. खरे तर
त्यांचे फसवणूक करणारा जेवढा अपराधी तेवढेच अपराधी हे अधिक व्याज किंवा अवास्तव मोबदल्याच्या
अपेक्षेने अयोग्य ठिकाणी गुंतवणून करणारे असतात. अशा लोकांमुळे अनेक प्रामाणिक
उद्योजकही अडचणीत आणले जातात किंवा आलेले आहेत हेही आपण अनेक उदाहरणांतून पाहू
शकतो. रास्त मार्गाने अधिकाधिक मिळू शकते
त्यापेक्षा अधिकचे मोह बाळगून केलेले कोणतेही आर्थिक कृत्य हे आर्थिक गुन्हेगारी
स्वरूपाचे असते हेही लोकांनी लक्षात ठेवले पाहिजे, पण दुर्दैवाने नेमके तेच
प्रबोधन होत नाही. अधिक लाभासाठी फसवणूक करणारे आणि फसवून घेणारे नैतिक दृष्ट्या
समान स्तरावरचे असतात हेच काय ते खरे.
श्रीमंत तर व्हायचे पण नेमके कसे याचेच
मुलभूत ज्ञान असणे आवश्यक ठरते ते यामुळेच. कायद्याचा कचाट्यापासून दूर राहिलेले
आणि समाजात श्रीमंतीच्या जोरावर प्रतिष्ठा प्राप्त करून बसलेले आणि कायद्यालाही
आव्हान देत त्यांना वाकवणारे जेंव्हा समाजाचे आदर्श बनतात तेंव्हा देशाच्या
अर्थव्यवस्थेचे अध:पतन होणार हे निश्चित असते. खरी अर्थव्यवस्था मुल्यवर्धित
उत्पादने, सेवा आणि त्यांच्या
व्यापारामुळे साकारत असते. आपल्या आजच्या अर्थव्यवस्थेकडे नजर टाकली तर त्यात वास्तविकता
केवढी आणि फुगवलेली आकडेवारी केवढे याची जाणीव होऊ शकेल. भारतात २०२१ च्या आर्थिक
वर्षात केवळ सरकारी बँकांच्या फसवणूकीचे
नोंदले गेलेले गुन्हे होते ८३,६३८. म्हणजे दिवसाला २२९ फसवणुकीची प्रकाराने. यात १
लाख ३८ हजार र्कामाचा अपहार केला गेला. यातील १% रक्कमही वसूल होऊ शकली नाही. खाजगी
बँका आणि अन्य क्षेत्रातील फसवणूक किती लक्ष कोटीपर्यंत जाईल याचे कल्पना करूनच
भोवळ येईल. छोट्या छोट्या प्रमाणात लबाड्या करून आपले उत्पन्न वाढवणारे तर आज
अगणित झालेले आहेत.
मुळातच अर्थप्रेरणा
लबाड असतील, अनैतिक असतील तर विनाश अटळ असतो हेच काय ते खरे!
-संजय सोनवणी
No comments:
Post a Comment