Monday, January 8, 2024

शाकाहार आणि मांसाहार

 

वनस्पतीला एकेंद्रिय जीव मानून ही जीवहत्या केली तरी चालेल ही जीवनावश्यक पळवाट झाली. जैन शास्त्राने असे म्हटलेले नाही. जैनांच्या आगम ग्रंथात आचारांग सूत्र सर्वात पहिला आगम आहे. त्यात म्हटलेले आहे-

मनुष्य जसा जन्म घेतो तसेच वनस्पतीही जन्म घेते.

मनुष्याची वाढ होते तशीच वनस्पतीचीही वाढ होते.

मनुष्य जसा चेतनायुक्त आहे तशीच वनस्पतीही चेतनायुक्त आहे.

मनुष्य जसा घायाळ झाल्यावर म्लान होतो तसेच वनस्पतीही आघात झाल्यावर म्लान होते.

मनुष्य आहार करतो तशीच वनस्पतीही आहार करते.

मनुष्य जसा अनित्य आहे तशीच वनस्पतीही अनित्य आहे.

मनुष्य अशाश्वत आहे तशीच वनस्पतीही अशाश्वत आहे.

वनस्पतीची हिंसा मोह आहे, मृत्यू आहे, नरक आहे.

जो कोणी वनस्पतीवर शस्त्र चालवतो तो कटू फळे भोगतो, पण जो ज्ञानी वनस्पतीला उपद्रव पोचवत नाही तो ख-या अर्थाने हिंसा-त्यागी मुनी बनतो.

(आचारांग सूत्र, प्रथम अध्याय, पाचवा उद्देषक सूत्र ४५, ४६ व ४७)

 जैन धर्मातील अन्नावरचे कठोर निर्बंध हे साधूची दीक्षा घेणा-या जैनांसाठी होते, संसारी लोकांसाठी नाही. फलाहार हा उत्कृष्ठ आहार मानला गेला होता. वनस्पतींचा अन्नासाठी उपयोग ही अपवादात्मक बाब होती. जगण्यासाठी किमान आहार आवश्यक आहे आणि तो आवश्यक तेवढाच करावा यावर जोर होता. आहार हे कर्मकांड नसून अहिंसेकडे जाणारा एक मार्ग होता. अरण्यातील हिंत्र प्राण्यांचा उपसर्ग तर अनेकदा पोचायचा. अशा वेळीस जैन साधूंना अपवादात्मक हिंसेची अनुमती होती. छेदसुत्रातील माहितीनुसार अटवी (कोकण भाग) येथून साधुन्च्गा एक संघ जात होता. येथे जंगली प्राण्यांचे भय आहे हे कळाल्यामुळे त्यांनी एका सुरक्षित ठिकाणी थांबायचा निर्णय घेतला. रात्री एक सहस्त्रयोधी साधू पहा-यास थांबला. रात्री त्याला एका वाघ झेप घेत येताना दिसला तर त्याने काठीचा प्रहार केला. दुस-याने व तिस-यानेही वेगबेगळ्या दिशांनी हल्ले केल्यावर त्यानीही तसेच केले. सकाळ झाली तेंव्हा त्यांना तीन वाघ मरून पडलेले दिसले. आचार्यांनी म्हटले आहे कि अविरोध हाच साधूचा गुण आहे खरा पण विपरीत स्थितीत विरोधाला अथवा प्रतिकाराला दोष मानने गैर आहे. जैन साधू वर्षावास सोडल्यास सतत भ्रमणशिल असल्याने व त्या काळात मानवी वस्त्या कमी व अरण्ये जास्त असल्याने अशा विपदा नेहमीच येत त्यामुळे ही सुट दिली गेली होती असे म्हणता येते. अनेक नि:संतान राजे एखाद्या तरुण साधूकडूनच आपल्या राणीच्या पोटी पुत्र व्हावा अशे कामना करत. साधूला नम्रपणे बोलावून धमकी दिली जायची कि राण्यांचा भोग घे अन्यथा प्राणांना मुकशील. अशा वेलीस कामभावना न ठेवता रत झाला तरी तो साधू व्रतभंग करत नाही असे आचार्यांनी म्हटले आहे. (बृहतकल्पभाष्य व निशीथचुर्णीपीठिका)

थोडक्यात जैन साधुसाठी असणारे नियमही शिथिल करण्यात येत. इतिहासात संप्रतिपासून अनेक जैन सम्राट झाले. त्यांनी युद्धे केलीत. त्यात अर्थातच हिंसाचार झालेला आहे. पण त्यासाठी कोणीही त्यांना धर्माचे नियम तोडतो म्हणून दोष दिलेला नाही. कारण व्यवहारात काय शक्य आहे आणि काय नाही याचा विचार केला गेलेला होता. पण पुढे कीन तत्वज्ञान हे कर्मकांड व आहारशास्त्राच्या रुपात सर्व जैनांवर लादले गेले. बरे, आपण खात नाहेत ते ठीक आहे, पण इतरांकडूनही तशीच अपेक्षा ठेवणे हे मात्र गैर आहे अशीच सर्वत्र भावना आहे.

राम शाकाहारी होता कि मांसाहारी याबाबतही आजकाल वाद घातला जात आहे. जैन रामाय्नारील राम व रावण हे दोघेही शाकाहारी आहेत तर वाल्मिकी रामायणातील राम (व सीताही) मांसाहारी आहेत. मुलातील राम नेमका कोणता आहारी होता हे आपल्याला अज्ञात आहे. पण रामायणात खालिल उल्लेख येतात.

इदं मेध्यमिदं स्वादु नष्टप्तमिदमग्निना।

एवमस्ते स धर्मात्मा सीतया सह राघवः।।2.96.2।।              

अर्थात- धर्मात्मा राम, ज्याचे मन सीतेला अर्पण होते तो म्हणाला कि हे सीते, हे ताजे चविष्ट मांस अग्नीवर भाजले आहे.

सुराघटसहस्रेण मांसभूतौदनेन च। यक्ष्ये त्वं प्रयता देवी पुरीं पुनरूपागता।।2.52.89।।

अर्थात- हे देवी, अयोध्येला परत आल्यानंतर मी सहस्त्र मद्यघट आणि मांसाजे भोजन तुला अर्पण करेन.

 थोडक्यात वाल्मिकीने आपल्या वैदिक धर्मविचारानुसार रामाचे भोजन कल्पिले आहे असे दिसून येईल. प्रत्यक्षात रामाचा आहार हा कधी चर्चेचा, वादाचा विषय बनला नव्हता, पण आता तो तसा व्हावा ही चिंतेची बाब आहे.

 अलीकडे अंडी-मांसाहार याचा तिरस्कारच नव्हे तर त्यावर बंदी आणण्याचा आग्रह कोणत्या अहिंसेत मोडतो? हा मानसिक हिंसेचा प्रकार (जैन शास्त्रानुसारच) नाही काय? वनस्पती शास्त्राचा प्राचीन काळी एवढा अभ्यास जैनांएवढा कोणीही केलेला नाही. सर जगदीशचंद्र बोस यांनी विज्ञानाच्या पातळीवरही वनस्पती सजीव असते हे सिद्ध करून दाखवले आहे. भाजीपाला खाणे (शाकाहारी) हे त्या वनस्पतीशी लगटून असलेल्या अनंत जीवाणूचाही नाश करते. ती हिंसाच आहे. ही हिंसा चालेल आणि ती चालणार नाही याला तात्विक दांभिकता म्हणतात. किंवा तत्वज्ञान समजलेलेच नसता तत्वद्न्यानाचे ढोल बडवणे म्हणतात. जैनांनी अशा दाम्भिकान्ना जैन मानणे सोडून द्यायला हवे.

जैनांनी शाकाहार स्वीकारलेला आहे तो जगण्याचे किमान निकड पुरवण्यासाठी. नाहीतर दगड-धोंडे असे ख-या अर्थाने निर्जीव खाउन जगावे लागेल जे शक्य नाही. पण शाकाहार म्हणजे जीवहत्या नाही या म्हणण्याला जैन तत्वज्ञान आणि आजचे विज्ञानही समर्थन देत नाही. जैनांनी आपला शाकाहार अवश्य जपावा, पण इतरांवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करणे हा जैन शास्त्रानुसार मोठा हिंसाचार असेल.

जैन तत्वद्न्यानाकडे जगातील विद्वान आकर्षित होत असताना मध्येच असले अतिरेकी प्रचार करणे, दबाव आणणे यामुळे जैन धर्माचे मुख्य तत्वज्ञान झाकोळून जाईल हे लक्षात घेतले गेले पाहिजे.

-संजय सोनवणी

 

No comments:

Post a Comment

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...