Thursday, February 1, 2024

पहिले ज्ञात स्थलांतर वैदिक आर्यांचे!

 


भारतीय उपखंडात पुरातन काळापासून स्थलांतरे होत आली असली तरी पहिले ज्ञात आणि अनेकार्थाने सर्वात अधिक प्रभावी ठरलेले स्थलांतर म्हणजे वैदिक आर्यांचे स्थलांतर. आर्यवंश सिद्धांत युरोपियन विद्वानांनी जन्माला घातला तेव्हा आर्य हा अत्यंत बुद्धिशाली व सुसंस्कृत वंश असून तो मध्य आशियातून भारत ते युरोपपर्यंत आक्रमणांच्या सहाय्याने पसरला व आपली भाषा व संस्कृती पराजीतांवर लादली असा जागतिक समज होता. पुढे आक्रमण नव्हे तरी अनेक टप्प्यात स्थलांतरे झाली असा या सिद्धांतात बदल झाला. आता आर्य हा एक वंश ही संकल्पना मागे पडली आहे. त्याऐवजी इंडो-युरोपियन गटाच्या मूळ भाषा बोलणा-यांचे स्थलांतर व त्या भाषांचा प्रसार हा सिद्धांत उदयाला आलेला आहे. आता भाषा-गट सिद्धांतालाही आव्हान दिले जात असून समान भाषा निर्माण व्हायला कोणाचे स्थलांतर अथवा आक्रमण होण्याची आवश्यकता नसते तर समान भूगर्भीय व भू-रासायनिक संरचना असलेल्या भूभागांत समान मुळाच्या वाटू शकतील अशा भाषा नैसर्गिक मनोवैद्न्यानिक संरचनेतील साम्यामुळे निर्माण होऊ शकतात असे प्रतिपादन पुढे येते आहे. त्यामुळे उत्तर भारतातील भाषा या इंडो-युरोपियान्ब आर्यांच्या स्थलांतराने अथवा आक्रमणाने निर्माण झाल्या हे मत चुकीचे ठरते.

काही वैदिक आर्यांना अफगाणिस्तानमधील सरस्वती (हरहवैती) नदीचा प्रदेश सोडून हिंदुकुश ओलांडत भारतात कसे यावे लागले याचीही स्मृती शतपथ ब्राह्मणात (श. ब्रा. १.४.१, १४-१७) येते. या कथेनुसार सरस्वती नदीच्या काठावर राहणा-या विदेघ माथव या राजाने वा टोळीप्रमुखाने गौतम राहुगन या पुरोहिताच्या नेतृत्वाखाली टोळीसह आपला भूभाग सोडून पूर्वेकडे प्रस्थान केले व उत्तरगिरी (हिंदुकुश) पर्वतातून उगम पावना-या सदानीरा नामक नदीच्या काठावर वस्ती केली. हा भाग निर्मनुष्य व दलदलीचा होता. या कथेवरून स्पष्ट होणारी बाब अशी कि हे कोणत्याही प्रकारचे आक्रमण नव्हते. बहुसंख्येचे स्थलांतरही नव्हते. मग ते असे रातोरात एकाएकी आपला भूभाग सोडून का निघाले याचे उत्तर शतपथ ब्राह्मणाने दिले नसले तरी या प्रश्नाचे उत्तर अहुर माझ्द्याचा, म्हणजेच झरथुस्ट्र धर्माच्या विस्तारात आहे. अहुर म्हणजेच असुर. ऋग्वेद किंवा पुराणांत येणारी देव-असुरांची युद्धे देव (वैदिक) धर्म व असुर (झरथुस्ट्र) धर्मात झालेल्या युद्धांचीच प्रतीके आहेत. देव-असुर युद्धात शेवटी असुर जिंकले आणि त्याचेही पुरावे सुदैवाने झरथुस्ट्र धर्माच्या विस्तारावरून आपल्याला मिळतात.

अवेस्त्यातील भूगोल हा उत्तर अफगाणिस्तानचा आहे तर झामयाद यष्ट मध्ये येणारा अधिकचा भूगोल दक्षिण अफगाणिस्तानचा आहे आणि याच प्रांतातुन हेल्मंड (सरस्वती) नदी वाहते. तिच्या जलक्षेत्राची सखोल माहिती यात येते. ही नदी हमाऊन (ऋ. समुद्र) या तळ्यात विसर्जित होते. याशिवाय या नदीच्या परिसरात असलेले पर्वत व अन्य प्रदेशांचीही माहिती यात येते. हिंदुकुश पर्वत मध्याला, बाजुलाच एरिया, मार्जियाना, ड्रांगियाना आणि भारत-इराण सीमेवरील गांधारपर्यंत हा भुगोल यात आलेला आहे. याचाच अर्थ असा की झामयाद यस्टच्या काळात झरथुस्ट्री धर्माने दक्षीण अफगाणिस्तानवरही, म्हणजेच वैदिकांच्या मुळ आश्रयस्थानावरही वर्चस्व मिळवले होते, या वर्चस्वामुळे वैदिक धर्मीयांची अवस्था बिकट होणे स्वाभाविक होते. काही वैदिक टोळ्यांनी धर्मांतरही केले असण्याची वा अन्यत्र पळून गेले असण्याची शक्यता आहे. विदेघ माथवने मात्र सिंधू नदीच्या खो-यात येणे पसंत केले आणि शतपथ ब्राह्मणातील कथा हेच आपल्याला सांकेतीकपणे सांगते. म्हणजेच ही मंडळी झरथुस्ट्री धर्माच्या लोकांपासुन लपून-छ्पून अफगाणिस्तानातुन निघून गांधार (हिंदुकुश) ओलांडत भारतात आली हे यावरून सूचित होते. कोणत्याही धर्माच्या आक्रमणानंतर अथवा छळानंतर धार्मिकांनी केलेली अनेक स्थलांतरे इतिहासाने नोंदवून ठेवलेली आहेत. पण असुरांकडून पराभव झाला याचे शल्य वैदिक धर्मियांना एवढे डाचत राहिले कि पुढे भारतात आल्यावरही जे जे राजे त्यांच्या धर्माच्या विरोधात होते त्यांना सरसकट “असुर” म्हणायची त्यांनी सुरुवात केली. वैदिक धर्मियांच्या सतत प्रचाराने हा शब्द एवढा विस्तृत पसरला कि या शब्दाचे मूलस्थान लोकांच्या स्मरणातून गेले. जोही वैदिक धर्माच्या विरोधी असेल तो असुर हे समीकरण समाजमनावर ठसवण्यात वैदिक कालौघात ब-यापैकी यशस्वी झाले. खरे तर असुर हे भारताचे निवासी नव्हते किंवा त्या धर्माचेही नव्हते. असुर म्हणजे अहुर माझ्दा धर्माचे लोक. म्हणजे आज ज्यांना आपण पारशी धर्माचे म्हणतो ते. कालौघात सद्न्या कसे रूप बदलत जातात याचा इतिहास पहायला गेलो कि अनेक धक्कादायक बाबी सामो-या येतात त्या अशा.  

विदेघ माथवच्या नेतृत्वाखाली हे पहिले दीड-दोन हजार लोकांचे ऐतिहासिक स्थलांतर घडले. दलदलीच्या प्रदेशात त्यांना पहिला मुक्काम ठेवावा लागला याचा अर्थ स्थानिक लोक आपले कसे स्वागत करतील ही भीतीही असणे स्वाभाविक आहे, पण त्यांना शेवटी संपर्कात यावे लागलेच. आणि ही जमात होती सुद्द. जिला वैदिक भाषेत ‘शुद्र’ असे रूप मिळाले. सिंधू नदीच्या खो-यातील याच भागातील वास्तव्याच्या काळात वैदिक धर्मियांनी वेदांची पुनर्रचना केली. ब्राह्मण ग्रंथ लिहायची सुरुवातही याच भागात झाली. यज्ञसंस्थेची काटेकोर आखणीही येथेच केली गेली. सरासरी दोनेकशे वर्ष वैदिक धर्मीय शुद्रांच्याच राज्यात राहिले असे एकंदरीत दिसते. भारतीय उपखंडाच्या व्याप्तीचा आणि तेथे राहणा-या अन्य जमातींचा अंदाज त्यांना तोवर आलेलाच नव्हता. त्यामुळे दोन गोष्टी झाल्या. भारतात सर्वत्र शुद्र जमात पसरलेली आहे असा त्यांचा समज झाला. त्यामुळे ऋग्वेदाच्या पुरुषसुक्तमध्ये चवथा जागतिक समाज म्हणून त्यांनी वैदिक समाजांसोबतच शुद्रांचाही समावेश केला. यजुर्वदही. शूद्रार्यावसृज्येताम”  (यजुर्वेद १४/३०) म्हणजे "शूद्र व आर्य यांना निर्माण करण्यात आले." अशीच नोंद करतो. आर्य व शुद्र हे दोन वेगळे समाज आहेत व त्यांची निर्मिती स्वतंत्रपणे झालेली आहे याचे स्पष्ट भान वैदिकांना होते. एवढेच नव्हे तर आपण शरणार्थी आहोत व शूद्रांच्या मेहरबानीवर येथे राहू शकलो यासाठी यजुर्वेदात शुद्रांच्या कल्याणासाठीही प्रार्थना करण्यात आलेल्या आहेत. (यजुर्वेद १८.४८, २०.१७, २६.२) याचाच अर्थ असा कि शरणार्थी म्हणून आलेल्या वैदिक आर्यांचे संबंध शुद्र जमातीशी अत्यंत सलोख्याचे राहिले. त्यांच्या हितासाठी त्यांनी अनेक यज्ञयागही केले. शूद्र जमातीनेही त्यांचे स्वागतच केले. असे असूनही पुढे असुर शब्दाप्रमाणेच शुद्र शब्दही वैदिकांनी का आणि कसा बदनाम केला याचा इतिहासही रंजक आहे. स्थलांतरीत एखाद्या देशाच्या संस्कृतीचेच वर्चस्वशाली घटक बनले हे आपल्या लक्षात येईल.

-संजय सोनवणी  

No comments:

Post a Comment

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...