Monday, February 26, 2024

मराठी भाषेचे प्राचीनत्व!

 मराठी भाषेचे प्राचीनत्व!

-संजय सोनवणी

 

लिखित पुराव्यांनुसार मराठी भाषेचा इतिहास किमान २२०० वर्ष जुना जातो. प्राचीन माहाराष्ट्री प्राकृताचीच विकसित होत आलेली अवस्था म्हणजे आजची आपण बोलतो-लिहितो ती मराठी. वररुचीने या आद्य माहाराष्ट्री प्राकृताचे व्याकरण इसपू २००च्या आसपासच लिहिले होते, याचा अर्थ त्याआधीही कैक शतके ही भाषा बोलीभाषा म्हणून प्रचलित होती. इसपू पहिल्या शतकातील नाणेघाट, पाले आणि लोहगड येथील शिलालेख या प्राचीन मराठीचे लिखित रूप दर्शवतात. महाराष्ट्रात जैन धर्म किती प्राचीन काळातच पोचला होता याचेही पाले व लोहगड येथील शिलालेख निदर्शक आहेत. यानंतर सातवाहन काळातील बौद्ध विहारांतील असंख्य शिलालेख आज उपलब्ध आहेत. मराठी भाषेतील साहित्य, काव्य आणि महाकाव्यांचा इतिहासही इतकाच मागे जातो. हाल सातवाहन राजाने संकलित केलेल्या ७०० गाथांचा समावेश असलेले गाथा सप्तशती तर आज काव्यरसिकांना चांगलेच माहित आहे. पण आद्य रामकाव्य हेही माहाराष्ट्री प्राकृतातच लिहिले गेले होते तर वाल्मीकीचे रामायण इसवी सनाच्या तिस-या शतकानंतर लिहिले गेले. आद्य रामकाव्य लिहिण्याचा मान प्राचीन मराठीकडे जातो याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. हे आद्य रामकाव्य म्हणजे पउमचरीय. हे लिहिले विमल सुरी यांनी इसवी सन ४ मध्ये, म्हणजे जैन तीर्थंकर महावीर यांच्या निर्वाणानंतर ५३० वर्ष पूर्ण झाल्यानंतर. आपल्या काव्यातच विमल सुरी यांनी हे वर्ष दिले आहे. यातील रामकथेचे मुलस्त्रोत हे पूर्णतया स्वतंत्र असून जैन जीवनदृष्टीचा या काव्यावर फार मोठा प्रभाव आहे. याच काळातील अंगाविज्जा हा तत्कालीन समाजजीवन व संस्कृतीचे दर्शन घडवणारा माहाराष्ट्री प्राकृतातील ग्रंथ लिहिला गेला. चवथ्या शतकातील संघदास गणी यांनीही वासुदेव हिंडी हे महाकाव्य लिहिले. माहाराष्ट्री प्राकृतावर जैन साहित्यिकांचे मोठे ऋण आहे त्यांनी माहाराष्ट्री प्राकृतात अपार ग्रंथसंपदा लिहिली, परंतु त्यांचे योगदान आजचे मराठी भाषक विसरल्यासारखे दिसते. याशिवायही माहाराश्त्री प्राकृतात विपुल म्हणता येईल अशी रचना झालेली आहे. पण आपला भाषाभिमान बेतास बात असल्याने आपले या साहित्याकडे म्हणावे तसे लक्ष गेलेले नाही हेही दुर्दैवी आहे.

संस्कृतमधून मराठी भाषेचा उगम झाला हे जुने मत आता मान्य होणार नाही एवढे सज्जड पुरावे उपलब्ध आहेत. संकरीत संस्कृतातील एकमेव मिळणारा प्राचीन पुरावा म्हणजे इसवी सन १६० चा राजा रुद्रदामनचा शिलालेख. त्याआधी संस्कृत भाषेचे अस्तित्व दाखवणारा एकही शिलालेखीय अथवा नाणकीय पुरावा उपलब्ध नाही. माहाराष्ट्री प्राकृताचे शिलालेखीय पुरावे मात्र त्यापेक्षा प्राचीन तर आहेतच पण विपुल प्रमाणात आहेत. मराठी हीच महाराष्ट्राची आद्य भाषा होती, स्वतंत्र होती व आहे ही मराठी माणसाला अभिमानाची बाब वाटायला हवी. आणि त्यासाठी अनेक पुरावे आहेत. वैदिक भाषा आणि संस्कृत भाषा या एकच मानण्याच्या प्रवृत्तीतून हा गैरसमज जोपासला गेला त्यामुळे आज मराठी ही दुय्यम भाषा आहे असा समज निर्माण झाला. खरे तर वैदिक भाषेवरही प्राकृत भाषांचा मोठा प्रभाव आहे हे अनेक विद्वानांनी साधार सिद्ध केले आहे.

 जे. ब्लॉख यांनी १९१४ साली लिहिलेल्या फॉर्मेशन ऑफ मराठी लँग्वेज’ या पुस्तकात फार महत्त्वाची निरीक्षणे नोंदवलेली आहेत. थोडक्यात ती अशी : ऋग्वेदाच्या प्राचीन संपादकांनी अन्य बोलीभाषांना आत्मसात करत अथवा त्यापासून उधारी करत ऋग्वेदाची वैशिष्ट्यपूर्ण भाषा घडवली आहे. (पृ.२) मराठी ही सरळ महाराष्ट्री प्राकृताशी नाते सांगते. अन्य प्राकृत भाषांचा प्रभाव नगण्य आहे. मराठीचे ध्वनिशास्त्र गुंतागुंतीचे व अन्य आर्यभाषांपेक्षा स्वतंत्र आहे. (पृ ४५)अनेक प्राकृत घाट संस्कृतात घुसले आहेत. संस्कृत ही स्वतंत्र भाषा नसून मिश्र भाषा आहे. (पृ. ४८) हेमचंद्र ज्यांना अपभ्रंश भाषा म्हणतो त्या भाषांचा मराठीशी काहीही संबंध नाही तर मराठीचा संबंध थेट प्राचीन प्राकृताशीच आहे. (पृ. ३०-३१) प्राकृत म्हणजेच महाराष्ट्री प्राकृत. शौरसेनीमागधीअर्धमागधी वगैरे अन्य प्राकृत भाषा दुय्यम आहेत. मराठीचा पाया स्थानिक वैशिष्ट्यपूर्ण प्राचीन बोलींचा आहे जो अन्य भाषांत समांतरपणे आढळत नाही. (पृ.३२) सातवाहन काळात स्थानिक प्राकृत राजभाषा व साहित्यभाषा बनली व तिला वैभव आले. भारतातील कोणतीही भाषा कोणावर लादली गेल्याचे भाषाशास्त्रीय उदाहरण मिळत नाही. (पृ. ४४). मी येथे ब्लॉख यांनी दिलेली अत्यंत थोडकी उदाहरणे घेतली आहेतपण ती मराठी भाषेच्या स्वतंत्र वास्तवावर प्रकाश टाकण्यास पुरेशी आहेत. माहाराष्ट्री प्राकृत भाषा तिस-या शतकात मध्य आशियातील निया शहरापर्यंत पोहोचली होती, तेथिल राजादेश लिहिलेल्या लाकडी पाट्या सापडल्या असून त्यात “महानुराया लिहती” सारख्या आजही मराठी भाषेत प्रचलित असलेली वाक्ये मिळून येतात. यावरून प्राचीन काळी झालेला मराठीचा प्रसार आपल्या लक्षात येतो.

खुद्द ऋग्वेदात अनेक प्राकृत प्रयोग आलेले आहेत. किंबहुना प्राकृत आणि अवेस्तन शब्दांचेच सुलभ ध्वनीबदल करीत वैदिक संस्कृत व नंतरचे संस्कृत बनले आहे. अहुरऐवजी असुरमिथ्रऐवजी मित्र अशी अवेस्तन शब्दांचे ध्वनीबदल केल्याची असंख्य उदाहरणे देता येतील. इंद्रऐवजी इंदवृंद ऐवजी वुंद असे मूळचे प्राकृत प्रयोग ऋग्वेदात जसेच्या तसेच राहिलेले आहेत. व्याकरणाचा पायाही प्राकृतच असल्याचे अनेक उदाहरणांवरून आढळून येते. उदा. देवास:सत्यास: ऐवजी देवा:सत्या: इ. खरे तर ऋग्वेदाची भाषा अवेस्तन (प्राचीन पर्शियन) आणि भारतातील स्थानिक प्राकृत यांचे मिश्रण आहे. एवढेच नव्हे तर ऋग्वेदातील ६% शब्द द्रविड व मुंड भाषेतून वैदिक संस्कृतात उधार घेतलेले आहेत. भाषेचा उगम’ या माझ्या पुस्तकात मी संस्कृत भाषा इसपू पहिले शतक ते इसवी सनाचे दुसरे शतक या काळात कशी क्रमश: विकसित होत गेली हे ग्रांथिकशिलालेखीय व नाणकशास्त्रीय पुराव्यांवरून साधार दाखवले आहे. त्या दृष्टीने संस्कृत हीच आधुनिक भाषा ठरत असून प्राचीन प्राकृत भाषांवर संस्कार करत ही नवी भाषा बनवलेली आहे. मूळ प्राकृत शब्दांचेच उच्चारसुलभीकरण करीत संस्कृत विकसित होत गेली हे बुद्धिस्ट हायब्रीड संस्कृत ग्रंथशिलालेखीय ते नाण्यांवरील भाषेतून सिद्ध होते, परंतु ती आधुनिक असूनही तिला अभिजात दर्जा आणि ज्यापासून ती बनली त्या महाराष्ट्री प्राकृताला व त्या भाषेची थेट वंशज असलेल्या मराठीला मात्र अभिजात दर्जा नाकारणे हे कर्मदरिद्रीपणाचेच नव्हे तर भाषाशास्त्रीय दृष्टिकोनही नसल्याचे निदर्शक आहे.

मराठी भाषा ही प्राचीन काळापासून साहित्य व्यवहाराची भाषा राहिलेली आहे. स्त्रियांनीही या भाषेत काव्यलेखन केलेले आहे. एकट्या गाथा सप्तशतीमध्ये २८ कवयित्रीनी आपले काव्य-योगदान दिलेले आहे. ही सातवाहनकाळापासून राजभाषाही राहिलेली आहे. संस्कृतअभिमानी मानतात तशी ही ग्राम्य लोकांची भाषा असती तर असे झाले नसते. विमल सुरीन्च्या आद्य महाकाव्यात येणारी नुसती रामकथाच नव्हे तर त्यात येणारे समाजजीवनही वास्तवपूर्ण आहे. वासुदेव हिंडी तर जगातील अतिप्राचीन प्रवासवर्णन असल्याचे मत पाश्चात्य अभ्यासकांनीही व्यक्त केले आहे. प्राचीन महाराष्ट्री प्राकृत विकसित होत, कालौघात बदल स्वीकारत मुकुंदराज-ज्ञानेश्वरांच्या माराठीपर्यंत आले. शिवकालीन पत्रव्यवहारातील मराठी, तुकोबारायांच्या अभंगातील मराठी इंग्रजकाळात आधुनिकतेचा स्पर्श होत अजून बदलत आजच्या जागतिकीकरणाच्या काळातील भाषेपर्यंत आलेली आहे. प्राचीन मराठीतील असंख्य शब्द आजही आपल्या नित्य बोलण्यात असतात. आणि हे शब्द संस्कृतात सापडून येत नाहीत हे विशेष. जी भाषा जिवंत असते तीच कालानुसार परिवर्तने स्वीकारत असते. नवीन शब्द शोधणे वा अन्य भाषांतून उधार घेणे, अभिव्यक्तीचे व्याकरण बदलणे आणि नव्या जोमाने व्यक्त होण्यातून भाषेचा आणि त्या सोबतच मानवी संस्कृतीचाही विकास करणे हे जिवंत भाषांचे वैशिष्ट्य असते आणि मराठी या निकषावर पूर्णपणे टिकते. मराठी ही एक जिवंत भाषा आहे. तिला आज पुन्हा एकदा ज्ञानभाषा बनवण्याची तेवढीच आवश्यकता आहे. मराठीचा नव्याने जागर करत तिला पुन्हा प्राचीन वैभव प्राप्त करून देण्याची आपली जबाबदारी आहे.


वररुचीने प्राकृतात रचलेल्या पाअड-लख्खन-सुत्तहे प्राकृत (पाअड) भाषांचे व्याकरण सांगणारे मुळ पुस्तक आज उपलब्ध नाही. आज आहे ते भामहाने लिहिलेली या ग्रंथकाराची संस्कृत भाषेतील टीका जिला स्वत: भामहानेच मनोरमा अथवा चंद्रिकाअसे नाव दिलेले आहे. यात प्राकृताचे नियम संस्कृतमध्ये सांगितलेले आहेत.

संस्कृतमधूनच प्राकृत निघाली असती तर तिचे व्याकरण संस्कृतमध्येही अनुवादित करत त्यावर स्पष्टीकरण देणारी टीका लिहायचे कारण नव्हते.

भामहाने या व्याकरणावर टीका (भाष्य) संस्कृतमध्ये लिहायचे कारण म्हणजे प्राकृत ग्रंथ समजावून घ्यायचे तर त्या भाषेचे व्याकरण माहित व्हावे म्हणून! संस्कृतमधून प्राकृत भाषा निघाल्या असत्या तर हा उपद्व्याप संस्कृत भाषिक विद्वानांना करावा लागला नसता.

असे असतांनाही मराठी अभिजात भाषा व्हावी असे वाटणा-या विद्वानांनी भामहरचित प्राकृत प्रकाशमूळ वररुची रचित प्राकृत व्याकरण ग्रंथावरची टीका आहे, वररुचीचा मुळ ग्रंथ नाही याचे भान ठेवलेले दिसत नाही. किंबहुना हे त्यांना आजही समजलेले नाही. त्यामुळे त्यांची अभिजात मराठीची आक्रंदने व्यर्थच जाणार हे उघड आहे!

-संजय सोनवणी


-संजय सोनवणी 


1 comment:

  1. सोनवणी सर, मराठी भाषेवर कन्नड किंवा तमीळ वा अन्य भाषेचाही परिणाम/उत्पत्ती याबाबतही कृपया स्पष्ट करावे. कारण या भाषेच्या तुलनेत मराठी किती जुनी आहे किंवा कसे, याचेही विवेचन अपेक्षित आहे. शिलालेख स्पष्ट करतांना बौध्द शिलालेख वा इतर हे ही कृपया स्पष्ट करावे. कारण लेणी वा शिलालेख यात प्राकृत वा पाली किंवा अर्ध मागधी आहेत , शिल्पकला जसे लेणी वा अन्य ठिकाणी गॉथिक वा अन्य शैली याबाबतही कृपया आगामी लेखांत मार्गदर्शन अपेक्षित आहे. प्राकृत हे तर महाराष्ट नावाच्याही अगोदर असावे. त्याचीही जडण घडण /सुसंगती आपणाकडून उपलब्ध झाली तर उत्तमच राहील.

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...