आमचे डोळे फुटलेले आहेत
कानात लाव्हा भरला आहे
आमचे डोळे फुटलेले आहेत
कानात लाव्हा भरला आहे
मानवी इतिहासात असे अनेकदा झाले आहे की काही शोधांनी सुरुवातीला अत्यंत गारुड गाजवले. त्याच वेळेस हे शोध भीतीदायक आहेत असेही निक्षून सांगणारे वाढले. काळानुसार शोधातील जे उपयुक्त आहे तेवढे लोकांनी स्वीकारले. ते शोध एवढे अंगवळणी पडत गेले की ते अभिनव शोध आहेत असे वाटणेही बंद झाले आणि त्या शोधांबद्दलची भीतीही कोठल्या कोठे विरून गेली. यंत्रांचा शोध हा एक असाच टप्पा होता. दहा माणसांचे काम अधिक अचूकतेने एक यंत्र करू लागल्यानंतर मानवी श्रम आणि कौशल्यांचे काय होणार हा असाच एक भयदायक प्रश्न जगात उसळला होता. महात्मा गांधीही यंत्रयुगाचे विरोधक होते हे सर्वश्रुत आहे. त्यामागील नैतिक धारणा व निर्माण होणाऱ्या नैतिक समस्या या अशा विचारवंतांच्या चिंतनाचा आणि चिंतेचा मुख्य गाभा होता. त्यांनी वर्तवलेल्या नैतिक शक्यता बऱ्याच प्रमाणात सत्यात उतरल्या असल्या तरी फार भयदायक आहे किंवा त्यामुळे काहीतरी विपरीत घडते आहे असे बव्हंशी जगाला वाटले नाही. उलट ते यंत्रांनी निर्माण केलेल्या वस्तूंच्या वापराकडे एवढे झपाट्याने वळाले की हाताने बनवलेल्या वस्तू ते केवळ शोभेखातर किंवा गतकाळाच्या स्मरणरंजनात रमण्यासाठी करू लागले.
आज एआयची जी धास्ती दाखवली जाते तिचेही असेच होईल यात शंका नाही. तसेही एआयने अनेक माध्यमांतून जगाच्या नकळत ताबा घेतलेलाच आहे. अवाढव्य प्रमाणातील माहितीचा साठा परस्पर जमा केला जातो आहे. त्याचाच वापर करत एआयची अनेक साधने बाजारात येत आहेत. त्याचा वापर करणारेही अगणित आहेत. पण एआयच्या मर्यादा लक्षात येऊ लागल्याने त्या साधनांचा उपयोग करणारे सामान्य लोक मात्र आता हळूहळू त्यापासून दूरही जात आहेत. अर्थात ही एआयची बाल्यावस्था आहे, ती वेगाने प्रगल्भ होत जाईल आणि अधिक अचूक होत मानवी जीवनातील अनेक क्षेत्रे ते कब्जात घेत जाईल असा आशावाद व भयवाद जोपासणारे मात्र अधिक आहेत हेही खरे.
उत्पादन पद्धती, उत्पादन डिझाईन पद्धती मुळात गणिती असल्याने त्यातील
एआयचा वापर अधिक अचूकतेने मोठ्या प्रमाणावर होत जाईल. १९९८ साली मी माझ्या
वाशिंग्टन सॉफ्टवेअर्स लि. या कंपनीमार्फत मेकॅनिकल
डिझाईन्सची दहा सॉफ्टवेअर उत्पादने बाजारात आणली होती. सेंट्रीफ्यूगल फॅन्स ते प्रेशर
व्हेसल्सचे यांत्रिक आराखडे त्यामार्फत अक्षरश: सेकंदात आणि बिनचूक मिळत. हे सॉफ्टवेअर
वापरणारा स्वत: तंत्रज्ञ असण्याची आवश्यकता नव्हती. जी डिझाईन्स करायला एरवी काही
तास ते आठवडे लागणाऱ्या आणि किमान एक ते अधिकाधिक पंधरा अनुभवी मेकॅनिकल डिझाईन
तंत्रज्ञांची आवश्यकता असलेल्या डिझाईनचे काम काही सेकंदात व्हावे आणि तेही
तांत्रिक दृष्ट्या, कोणतीही मानवी चूक न होऊ देता याचे त्यावेळेस अभियांत्रिकी तंत्रज्ञांनाही
आश्चर्य वाटत होते. यामूळे कुशल तंत्रज्ञांची गरजच संपेल या भीतीमुळे अनेक
तंत्रज्ञांनीच ही उत्पादने नाकारली. खरे तर भारतातील एआयची सुरुवात या
उत्पादनांपासून झाली. पण भारतीय लोक नेहमीच आपल्याच ज्ञानाला अव्हेरण्यात आघाडीवर
असतात. ही उत्पादने त्यामुळे त्या काळात बाजारात फार मोठा जम बसवू शकली नाहीत. पण
तांत्रिक अचूकतेसाठी अशा प्रकारच्या ए.आय. उत्पादनांची नेहमीच आवश्यकता राहील. तीच
गोष्ट प्रक्रिया उद्योगांची. एकूण प्रक्रियेवर नियंत्रण ठेवत, क्षणोक्षणी
प्रक्रियेत जाणारा कच्चा माल व प्रक्रीये दरम्यानचे असंख्य गुंतागुंतीचे रासायनिक,
उष्मागतिकी पॅरामीटर्स एकाच वेळेस अचूकतेने सांभाळत अपेक्षित दर्जाचे अंतिम
उत्पादन निर्माण व्हावे यासाठी ए.आय. निश्चितच उपयुक्त आहे व या क्षेत्रातील
त्याचा वापरही वेगाने वाढत आहे. गणिती क्रिया यंत्र व उत्पादनांना उपयुक्त असल्या
तरी मानवी जीवन मात्र गणितापारचे आहे. ते तर्काच्या सीमांपार जाणारे आहे. दिलेल्या
गणिती पद्धतीने उत्पादने अधिक अचूकपणे बनवता येणे शक्य झाले तरी वेगळ्याच नवीन
उत्पादनाची किंवा प्रक्रिया पद्धतीची संरचना अशा कृत्रिम बुद्धिमत्तेला बनवता येणे
शक्य नाही. त्यामुळे मानवी हस्तक्षेप व ज्ञानप्रक्रियेत भर घालण्याचे कार्य
माणसालाच करत राहावे लागणार आहे.
सामान्य मानवी जीवनात
एआयने काही उपयुक्तता निश्चितच दिल्या असल्या तरी उपयुक्त काय हे ठरवण्याचे कार्य
माणसालाच करावे लागते. चॅट-जीपीटी सारखी साधने आजही आणि भविष्यातही तारतम्यानेच
वापरावी लागतील. मुळात प्रश्न कोणता विचारायचा आहे, कोणती माहिती हवी आहे, का हवी
आहे, दिलेली माहिती बरोबर आहे की चुक हे ठरवत त्यातून नेमके कोणते आकलन करून
घ्यायचे आहे हे ठरवणारी शेवटी व्यक्तीच असेल. म्हणजेच या साधनांचा वापर कसा करायचा
हे मानवी बुद्धीच ठरवणार आहे. विचार करणारे संगणक येतील असे अनेकांना वाटत असले
तरी विचार कसा करायचा याचे कोडींग शेवटी मनुष्याच करणार असल्याने आणि कोणत्याही
प्रश्नाला अगणित कोन असल्याने आणि व्यक्तीपरत्वे काय महत्वाचे हे ठरवता येणे शक्य
नसल्याने शेवटी किती संभावनांचा समावेश या प्रणालींत करता येईल यावर मर्यादा आहेत.
आणि हे एक ‘निर्विकार’ साधन आहे. त्याला नैतिकता, विवेक आणि कल्पकता अशा मानवी
बाजूंचा स्वभान असणारा पैलूच नसल्याने हे फक्त मानवाला सहायक ठरणारे, त्याच्या
कार्यक्षमतेत वाढ करणारे एक उपयुक्त सांगकामे सहायक एवढेच राहणार आहे.
भविष्यात आजचे बीट सिस्टमचे
संगणक जाऊन किमान ३६ क्युबीट्सचे क्वांटम (सूक्ष्मयामिकी) प्रणालीवर चालणारे संगणक
येण्याची शक्यता आहे. त्या दिशेने वेगाने प्रयत्न होतही आहेत. असे संगणक अचाट
शक्तीचे व आज कोणतीही प्रणाली हाताळू शकते त्यापेक्षा शेकडो पटीने वेगवान व आज
सोडवता येतात त्याहीपेक्षा किचकट समस्या लीलया हाताळू शकतील अशा प्रणाल्या त्यामुळे
अस्तित्वात येवू शकतील. खरे तर आजचे संगणक त्यामुळे बाद होतील आणि नवीनच अजब-गजब
तंत्रज्ञान मानवी जगाला प्रभावित करत जाईल. हे झाल्यावरचे जग कसे असेल याचा मासला
मी माझ्या “भविष्य नावाचा इतिहास” या कादंबरीत दाखवला आहेच. पण वास्तवात पाहिले तर
हा क्वांटम तंत्रज्ञांनाकडे जाणारा प्रवास प्रदीर्घ आहे. याचे कारण म्हणजे परमाणुच्या
सूक्ष्म स्तरावर आजच्या भौतिकीचे नियम मुळात लागू पडत नाहीत. किंबहुना सूक्ष्म
स्तरावरील भौतिकी घटनांचे आकलन आजची शास्त्राला पुरेशा प्रमाणात झालेले नाही. त्या
अर्थाने मुळात सूक्ष्मयामिकी अद्याप तरी बाल्यावस्थेत आहे. आणि जोवर ती मानवी
आकलनात येत नाही तोवर त्यावर आधारित कोणतीही प्रणाली बनवता येणे अशक्य आहे आणि
कृत्रिम बुद्धीमत्ता हे कार्य कदापि करू शकत नाही हे आता सर्वांच्याच लक्षात आलेले
आहे.
थोडक्यात उद्याचे जग
आरंभीच्या गारुडातून बाहेर येत स्वत:चीच बुद्धी वापरू लागेल अशीच शक्यता जास्त
आहे.
-संजय सोनवणी
“पारंपारिक विचार, सिद्धांत आणि जगण्याच्या पद्धतीला आव्हान देत नवे विचार सकारात्मक परिवर्तनाच्या भावनेने जे मांडतात त्यांनाच विद्रोही म्हटले जाते. आपल्याकडील विद्रोही म्हणवणारे लोक मात्र विशिष्ट जाती धर्माला शिव्या देण्याला आणि निंदा करत राहण्याला विद्रोह मानतात. जे नवविचारांचे सैद्धांतिक सृजन करत समाज बदलवण्याला प्राधान्य देत नाहीत. त्यांना विद्रोही मानणे अथवा अशा लोकांनी स्वत:ला विद्रोही समजणे हेच मुळात विद्रोहाचा अर्थ न समजल्याचे लक्षण आहे. महाराष्ट्रातील विद्रोह कधीच मेला आहे.” ही पोस्ट मी फेसबुकवर पाच डिसेंबर २०२४ रोजी टाकली होती. त्यावर बरीच साधक बाधक चर्चा झाली. काही लेखकांशी प्रत्यक्ष भेटीतही चर्चा झाली. अर्थात या चर्चेचे निमित्त होते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे. त्याचा आणि मी लिहिलेल्या पोस्टच्या मुख्य हेतूशी त्यांचा काही संबंध नव्हता. तरीही या विषयावर विद्रोही साहित्य संमेलनाच्या निमित्ताने व्यापक विचार व्हावा अशी अपेक्षा व्यक्त झाल्याने येथे विद्रोही साहित्य सम्मेलनाचाही विचार करणे क्रमप्राप्त आहे.
गेला काही काळ जेथे अ. भा. मरठी साहित्य संमेलन
असेल तेथे समोरच विद्रोही मराठी साहित्य संमेलन भरवण्याची प्रथा पडलेली आहे. “अखिल
भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मांडवात ज्यांना प्रवेश मिळालेला नसतो अशीच
मंडळी विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या मांडवात जातात” अशीही टीका यात सहभागी
होणाऱ्या लेखकांवर होत आलेली आहे. दिल्लीत होणाऱ्या अ. भा. मराठी साहित्य
संमेलनाच्या बाबतीत विद्रोही साहित्य संमेलनाचे आयोजक एवढ्या दूर जाणे कसे परवडेल या विवंचनेत
गोंधळलेले दिसले. अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे या वेळचे आयोजक सरहदचे संजय नहार
यांनी मात्र अत्यंत वेगळी भूमिका घेतली. दिल्लीतील साहुत्य संमेलनात मराठीतील सारे
‘आवाज’ प्रतिध्वनित व्हावे म्हणून त्यांनी मराठी साहित्य संमेलनाच्या मांडवातच
अथवा शेजारीच जागा उपलब्ध करून देण्याची तयारी दाखवली. तसे लिखित पत्रही दिले, पण विद्रोही
सांस्कृतिक चळवळीच्या पदाधिकाऱ्यानी त्या पत्राला सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. “आम्ही
अ. भा. साहित्य संमेलनाविरुद्ध असल्याने तुमच्याच मांडवात आम्ही कसे येणार?” अशा
स्वरूपाचा प्रश्नही विचारला गेला.
१९९९ साली बाबुराव बागुल या प्रख्यात
साहित्यिकाच्या अध्यक्षतेखाली धारावी येथे पहिले विद्रोही साहित्य संमेलन भरले
होते. तेव्हापासून या संमेलनाची परंपरा जवळपास अव्याहत आहे असे म्हटले तरी चालेल. महात्मा
जोतीराव फुले यांनी पुणे येथे १८७८ साली झालेल्या पहिल्या ग्रंथकार सभेचे अध्यक्ष
न्या. म. गो. रानडे यांनी दिलेल्या निमंत्रणाला उत्तर देतांना “तुमच्या
ग्रंथांमध्ये अखिल मानवांचे हित होईल याचे बीज नाही. हे उंटावरून शेळ्या हाकणाऱ्या
घालमोडया दादांचे संमेलन आहे.” असे म्हणून या संमेलनास जाण्याचे नाकारले. हे पत्र
हेच विद्रोही साहित्य संमेलनाची प्रेरणा बनले असे चळवळीतील मंडळी मानते. अर्थात
त्यांना म. फुले यांच्या वरील विधानाचा सखोल अर्थ कधी नीट कळाला आहे असे जाणवत
नाही. अखिल मानवांचे हित हा मुद्दा सर्वात महत्वाचा आहे व त्यापासून नुसते
विद्रोहीच नव्हे तर अ. भा. साहित्य संमेलनानेही तो डोक्यावर घेत आपली भूमिका
व्यापक करण्याची आवश्यकता होती पण ते दुर्दैवाने अद्याप झालेले दिसून येत नाही. या
अर्थाने पाहिले तर दोन्ही संमेलने घालमोडया दादांची आहेत असे म्हणायला प्रत्यवाय
नाही.
विद्रोह ही एक व्यापक संकल्पना आहे. गतकाळात जे
झाले ते तसेच्या तसे पुढे चालवत राहतात वा तसा प्रयत्न करतात वा तेच चांगले होते
असे मानतात ते प्रतिगामी असतात तर जे सतत स्वत:त आर्थिक, वैचारिक, सांस्कृतिक बदल
घडवून आणतात त्यांना पुरोगामी म्हणतात. हे बदल कसे होत आहेत, त्यात अडथळे नेमके
कोणते येत आहेत आणि कसा समाज घडवावा वाटतो याचे चित्रण करण्याचे काम व वर्तमान व
भविष्यवेधी चिंतन-विश्लेषन करण्याचे काम विचारवंत करत असतात. त्यांना आपण पुरोगामी
साहित्यिक व विचारवंत म्हणू शकतो. अखिल मानवजातीचे हित हाच सर्वांच्या चिंतनाचा,
आचार-व्यवहाराचा पाया असला पाहिजे हे तर जागतिक मान्य वास्तव आहे. अर्थात त्यासाठी
स्वत:त आमुलाग्र बदल घडवण्याची आणि अत्यंत संवेदनशिलतेने जगाकडे पाहण्याची
आवश्यकता असते. मागील विचारवंत/साहित्य्यिक यांच्या आकलनात, सिद्धांतात,
जीवनविचारांनाही आव्हान देत नव्या अभिनव कृती निर्माण करत अधिक व्यापक जीवन कवेत
घेतात ते किंवा समाजविषयक पुढे नाणारे सिद्धांत व विचार जे मांडतात त्यांना
विद्रोही लेखक-विचारवंत म्हणता येईल. हे अ. भा. साहित्य संमेलनालाही लागू पडते.
परंतु वास्तव काय आहे?
विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या कार्यकर्त्यांचेही
म्हणणे आहे की ही चळवळ जीवनाच्या सर्व क्षेत्रात समतावादी साहित्य-संस्कृती आणि
विचारधारेचा पुरस्कार करते. परंतु म. फुले यांचे ग्रंथकार सभेला लिहिलेल्या
पत्रापासून “प्रेरणा” घेत आजतागायत विद्रोही म्हणवणाऱ्या सहित्यिक-विचारवंतांची
काय अवस्था आहे? त्यांचे विचार-साहित्य आणि त्यांचे वास्तवातील वर्तन यात किती
साम्य आहे? अपवाद सोडले तर आपल्या हाती या निकषांवर चर्चा केल्यानंतर निराशाच हाती
येईल. अखिल मानवांचे हित व्हावे असे तुमच्या ग्रंथांत काय आहे हा प्रश्न आजच्याही
अखिल भारतीय संमेलनात सामील होणाऱ्या लेखक-कवींना विचारता येईल आणि त्याचे उत्तर
आजही कोणाकडे आहे असे दिसत नाही.
समतावाद हा अत्त्यंत सुंदर शब्द आहे हे मान्य
होण्यास प्रत्यवाय नसावा. पण हा समतावाद केवळ जातीवर आधारित आपला गोतावळा गोळा करत
असेल तर त्यांना समतावादी कसे म्हणता येईल? की एखाद्या वर्गाला, जातीला किंवा
धर्माला आपल्या वंचनेचे कारण मानत त्यावर सातत्याने अनाभ्यासी टीका करत वर्तमानात
आणि भविष्यात समता अस्तित्वात आणण्यासाठी आणि भविष्यातील समाज कसा असावा यावर
अर्थशास्त्रीय, समाजशास्त्रीय अंगानेही विचार करत नवी मांडणी करता येत नसेल किंवा
आजवर करता आली नसेल तर त्याला ‘विद्रोह’ हा शब्द कसा वापरता येईल. हे वंचित राहू
इच्छिणाऱ्या वंचितांचेच संमेलन आहे असे का म्हणता येणार नाही?
शाहू, फुले आंबेडकर हे विद्रोही व पुरोगामी
म्हणवणाऱ्या मंडळीचे आराध्य आहे व त्यांच्याच विचारांचे अनुसरण करत ही मंडळी चालत
असते. किंबहुना शाहू-फुले-आंबेडकरांचे हे पुरोगामी राज्य आहे असेही वारंवार, अगदी
राजकीय पटलावरूनही उद्घोषित होत असते. महाराष्ट्रात सामाजिक चळवळी नव्या नाहीत.
असे असूनही सामाजिक वास्तव मात्र वेगळे आहे आणि आज तर ते पार बदललेले आहे हे
वास्तव स्वीकारायची आणि जबाबदारी घ्यायची यांची तयारी आहे काय? समाजातील अगदी
जातीभेद मोडण्याचीही क्रांती यांना करता आली नाही. किंबहुना अगदी जातीअंताच्या
चळवळी करणार्यांच्या सभांतील वक्त्यांची आधी जात सांगितली जाते. हे कसले जातीअंत
करण्याचे लक्षण आहे? जाते सोडा, पोटजातीन्चेही निर्मुलन ही मंडळी करण्यात घोर
अपयशी ठरली आहे. मुळात विद्रोहाचा आधारच जर जात-धर्म असेल तर दुसरे काय होणार?
महात्मा फुलेंनी व नंतर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजव्यवस्थेसाठी अर्थ-सिद्धांत
बनवत वंचित समाजसापेक्ष मांडणी केली होती. शाहू महाराजांनीही शेतकी आणि औद्योगिक क्षेत्रात
प्रत्यक्ष क्रांती केली. आर्थिक उन्नती हा मानवाच्या सांस्कृतिक स्वातंत्र्याच्या
उद्गारास कारण ठरतो हे सर्वच शा.फु.आ. उद्घोष करणारे विसरून गेले. खरे तर शाहू,
फुले आणि आम्बेडकरांच्या पुढे या मंडळीने एकही पाउल टाकले नाही, उलट मागे मागेच
सरकत जात आपले नैतिक स्वास्थ हरपून बसल्याचे दिसून येईल. असे असतांना सर्व समाज
शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा (म्हणजे समतावादी, अर्थवादी आणि भविष्यवादी)
बनेल आणि या तिघांचे नाव घेतले तर आपल्या मागे येईल असा खुळचट विचार जन्माला येउच
कसा शकतो.
हे कधी झाले असते? जर या चळवळीतील सामाविष्ट
घटकांनी या तिघांना सोयीचे तेवढे न स्वीकारता त्यांच्या विचारांत आधुनिक
परिप्रेक्षात भर घालून म. फुले म्हणाले त्याप्रमाणे अखिल मानवहिताची भूमिका घेत
नवी साहित्य संस्कृती आणि समाज संस्कृती घडवण्यासाठी आपले विचार व लेखण्या
झिजवल्या असत्या तर! केवळ अखिल भारतीय साहित्य संमेलन समाजातील एकाच विशिष्ट
घटकाचे प्रतिनिधित्व करते, ते आपल्याला स्थान देत नाही म्हणून जर विद्रोही साहित्य
संमेलन भरवले जात असेल तर मुळात हेतूच दांभिक असल्याने सामाजिक परिवर्तनात ते काही
मोलाचा वाटा उचलू शकले असे आजवर तरी दिसले नाही. हे महात्मा फुलेंच्या अपेक्षेच्या
विपरीत नाही काय? विद्रोही म्हणवणारे ग्रंथकार उदंड झाले...पखालींचे भारवाही झाले
एवढेच काय ते म्हणता येईल.
समाजात विद्रोहाची आवश्यकता असतेच. विद्रोह हा
कोणत्या जाती-धर्म वा वंशाचा कोणत्यातरी अन्य जाती-धर्म किंवा वंशाविरुद्ध नसतो.
विद्रोह आधी स्वत:विरुद्ध, आणि नंतर समाजातील जेही काही अनिष्ट आहे, कालसुसंगत वा
प्रागतिक नाही त्याविरुद्ध असतो. विद्रोहाची संकल्पनाच जातीनिष्ठ करून टाकली गेल्याने
काय अनर्थ झाला आहे हे कोणाच्या लक्षात येईल तो सुदिन.
आणि “प्रस्थापितांच्या, पुरुषवर्चस्ववादी,
ब्राह्मणी, भांडवली. विषमतावादी सांस्कृतिक विचारांचा विषारी प्रचार-प्रसार
करणाऱ्या संस्था, संघटना व संमेलनाच्या विरोधात भूमिका घेण्याचा फुले-आंबेडकरांचा
संदेश मानून आपण विचार व संघटीत कृती केली पाहिजे.” असे आमीन शेख (राज्य
कार्यकारिणी सदस्य, विद्रोही सांस्कृतिक चळवळ) हे २०२३ च्या वर्धा साहित्य
संमेलनाच्या पार्श्वभूमीवरील एका लेखात म्हणतात. त्यांच्या विवेचनातील प्रत्त्येक
मुद्द्यावर स्वतंत्र तात्विक्ज प्रतिवाद करता येईल, पण पुरुषवर्चस्वतावाद किंवा
भांडवली व विषमतावादी व्यवस्था जर ब्राह्मणी (म्हणजेच वैदिक) संस्कृतीची उपज असेल
तर ती इतरांनी कशी स्वीकारली आणि आजही ती तशीच्या तशी का आहे, त्याविरुद्ध
स्वसमाजात कोणत्या समतावादी नव्या विचारप्रेरणा रुजवल्या हाही प्रश्न विचारता
येईल. किंबहुना जी स्थिती ओढवली आहे तिचे ऐतिहासिक समाजशास्त्रीय विवेचन तरी केले
आहे काय हा प्रश्नही विचारता येईल. आणि भांडवली म्हणायचे तर मुळात जातीच
व्यवसायांतून निर्माण झाल्या, आपत्तीच्या
काळात व्यवसाय सुरक्षित राहावेत, स्पर्धा होऊ नये म्हणून जाती बंदिस्त केल्या
गेल्या. ही भांडवलशाही नव्हती काय? भांडवली व्यवस्थेविरुद्ध बोलायला
साम्यवाद्यांना आवडते हे गृहीत धरले तरी साम्यवादाचे एकाधिकार भांडवली व्यवस्थेतच
अंतत: रुपांतर होते हे साम्यवाद्यांच्या लक्षात येत नाही काय आणि अशी एकाधिकारशाही
(म्हणजेच सरकारी) असलेली भांडवलशाही त्यांना स्वीकारार्ह आहे काय? साम्यवाद मानवी
स्वातंत्र्याचे अपहरण करणारा सर्वात दुष्ट घटक आहे यावर त्यांनी कधी विचार केला
आहे काय?
थोडक्यात विद्रोहीन्ना मुळात विद्रोहाची व्याख्या
काय आहे हे समजावून घ्यावे लागेल. स्वत:च्या तत्वज्ञानाची सखोल मांडणी करावी लागेल
आणि दिशा ठरवावी लागेल. अन्यथा त्याला केवळ विरोधासाठी विरोध असे रूप प्राप्त होईल
आणि ते तसे होतही आहे.
अ. भा.
साहित्य संमेलन
वरील विवेचनाचा अर्थ असा मुळीच नाही कि अ. भा.
मराठी साहित्य संमेलन व त्यात सहभागी होणारे साहित्यिक मराठी समाजाच्या साहित्यिक
जाणीवा वाढवण्यासाठी आणि वाचकांना विचार प्रगल्भ करण्यासाठी कितपत उपयुक्त ठरले
आहे असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर नकारार्थी येईल. गेली ९७ वर्षे सतत भरत
असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने वाचक व नवे साहित्यिक घडवणे,
काळानुसार बदलणाऱ्या साहित्यिक प्रेरणांचे अवगाहन करत आधुनिक काळातील बदलत
असलेल्या अभिव्यक्तीच्या साधनांनाही पारंपारिक साहित्य प्रवाहात सामाविष्ट करून
घेणे अशी कामे तर कधीच हातात घेतली नाहीत. संमेलनाला केवळ उत्सवी व दिखाऊ रूप
राहिले. तात्विक-साहित्यिक वाद-विवाद होत व्यापक विचारमंथन होण्याऐवजी हा परस्परांचे
उणे-दुणे काढण्याचा सोहोळा बनला. आजवरची साहित्य संमेलने अपवाद वगळता साहित्यबाह्य
कारणांमुळेच गाजलेली आहेत. समाजापुढे नव्या साहित्य संकल्पना मांडण्याऐवजी
गतकाळाच्या नावाखाली स्व-गुणगान गात बसण्याची कुप्रथाच यामुळे सुरु झाली. सामाजिक
प्रश्नांशी आपले काही देणे-घेणे आहे याचे भान तर कधीच आले नाही. आले तर ते केवळ
ठरावांपुरते बासनात बांधून ठेवण्यासाठी.
मराठी साहित्य संस्कृतीचे बनलेले एक अविच्छिन्न
लक्षण म्हणजे त्यातील जातीयवाद! या बाबतीत विद्रोही आणि अ.भा.म.सा.सं. हातात हात
घालून चालतात असेच चित्र दिसून येईल. अखिल भारतीय साहित्य संमेलन कोणत्याही
विचारप्रभावात होऊ नये अशी अपेक्षा असली तरी तसे होत असते. कारण मुळातच साहित्यिक
या जातीय वा प्रतिगामी विचारप्रभावांचे बळी असतात असेही साधारणपणे दिसून येईल. जातीयवाद
लेखकांच्या विविध कंपुंत जसा आहे तसाच तो समीक्षकांमद्ध्येही आहे. किंबहुना
कोणत्याही साहित्यिकाची साहित्य समीक्षा करतांना अथवा करायला लावतांना त्यामागे
जातीय संदर्भ नाहीत असे क्वचितच घडते. अनेक उत्तमोत्तम साहित्यिक केवळ जातीय पाठबळ
नसल्याने अथवा कोणा कंपुंत सामील न झाल्याने हयातीतच साहित्यबहिष्कृत झाले आहेत हे
आपण मराठी साहित्याचा इतिहास पाहिला तर लक्षात येईल. साहित्यिकच मुळात बव्हंशी
जातीय प्रेरणांनी ग्रसित असल्याने त्याचे प्रतिबिंब जसे त्याच्या साहित्यात पडते
तसेच या सर्व साहित्यिकांच्या साहित्य संमेलनांवरही पडणे स्वाभाविक आहे. अखिल
भारतीय साहित्य मराठी साहित्य संमेलनावर "हे संमेलन ब्राह्मणी आहे..."
असा आरोप पुर्वीपासुन होत आला आहे. म्हणजे अध्यक्ष जरी कोणत्याही जातीचा असला (खरे
तर ठरावीकच जातींचे) तरी एकुणातच संमेलनावर ज्या विषयांचा व चर्चकांचा प्रभाव राहत
आला आहे हे पाहता या आरोपाला पुष्टीच मिळत आली आहे. अगदी पूर्वी होत असलेल्या संमेलनाध्यक्षाच्या
निवडणुकीतही उमेदवाराची "जात" हाही एक घटक छुपेपणाने कार्यरत असायचा हे
गुपित राहिलेले नव्हते. आता केवळ सहानुभुती वा आपण जातीयवादी नाही हे दाखवण्यासाठी
अधुन मधुन दलित वा मुस्लिम लेखकाची अध्यक्षपदी निवड घडवून आणने किंवा नेमणे या
आरोपातून कशी सुटका करायची हेही ठरवावे लागेल.
किंबहुना मराठी साहित्याची ब्राह्मणी, मराठा, ओबीसी
व दलित अशी जातीय विभागणी झालेली आहे. मराठा समाजही त्यांचे साहित्य संमेलन
स्वतंत्र आयोजित करतो. ओबीसींचेही आता, दुबळे
असले तरी, स्वतंत्र
साहित्य संमेलन भरु लागले आहे. ओबीसींतील काही मोठ्या जातीही साहित्य संमेलन घेत
आल्या आहेत. फारशा चर्चेत राहिले नसले तरी आगरी समाजाचे साहित्य संमेलन गेली १५-१६
वर्ष भरत आले आहे. मुस्लिम, गुराखी
व आदिवासींचीही साहित्यसंमेलने होतात....यामागील सामाजिक व साहित्य प्रेरणा
नेमक्या कोणत्या याचा अभ्यास कधी होईल?
बरे, हे काम करणे अखिल भारतीय मराठी साहित्य
संमेलनाचे नाही हे महामंडळाचे म्हणणे मान्य केले तरी प्रश्न हा राहतोच की किमान
अशा व्यापक समाज-साहित्यिक प्रश्नांवर विचारमंथन घडून येईल असे परिसंवाद तरी ठेवता
येतील की नाही? आज जागतिकीकरणाने झपाट्याने जी सामाजिक उलथापालथ होते आहे तिचे प्रतिबिंब साहित्य
संमेलनात पडणार तरी आहे की नाही? किंबहुना साहित्यिक तरी त्यात पुढाकार घेत आहेत
काय?
स्वसंतुष्टता
ही साहित्यिकांची प्रवृत्ती का बनते आहे? खरे
म्हणजे अपवाद वगळता मराठी साहित्य ही खरेच सुमारांची जत्रा बनली आहे.
आंतरराष्ट्रीय सोडा, राष्ट्रीय पातळीवरही मराठी
लेखक अभावानेच तळपले आहेत. कारण यांची साहित्य दृष्टी वैश्विक नाही. यांच्या
जीवनप्रेरणा मुक्त नाहीत. मानवी दु:खाचा, त्याच्या
अविरत संघर्षाचा तळगर्भ पकडत त्यातून वैश्विक कलाकृती निर्माण करण्याची प्रतिभा
त्यांच्या ठायी नाही. राजकारण व समाजकारण यावर प्रखर भाष्य करत समाजाला नवी दिशा, विचार व तत्त्वज्ञान देता
येईल, अशी मुळात यांच्यात तशी क्षमता
आहे असेच दिसत नाही. त्यामुळे समाजमनावर आज या साहित्यिकांचा कसलाही व्यापक प्रभाव
नाही.
साहित्य संमेलन म्हणजे आपल्या जीवन विषयकच्या
धारणांचा जागर असतो. समग्र मानवी जगण्याचे चित्रण करत मनुष्याला त्याचा आरसा दाखवत
भविष्याचे दिशादिग्दर्शन करणे हा साहित्याचा मुख्य हेतू असतो. हेतुशिवाय लिहिले
गेलेले साहित्यही अप्रत्यक्षरित्या हेच हेतुबद्ध कार्य करत असते. त्यामुळे
साहित्याचे प्रयोजन काय हा प्रश्न तसा निरर्थकच ठरतो. प्रत्येक लेखकाचे साहित्य हे
त्या लेखकाचे समाजविषयकचे, स्वत:बद्दलचे आकलन याचा कलात्मक
आविष्कार स्वरुपात असल्याने त्यातच त्याचे साहित्य विषयकचे प्रयोजन स्वयंसिद्ध
असते. त्याचा दर्जा काय हे वाचक आणि समीक्षक ठरवतील, पण
प्रत्येक साहित्यकृतीचे व साहित्त्यिकाचे लेखनकार्य सूप्त अथवा जागृत स्वरुपात
काही ना काही प्रयोजन घेऊनच होत असते. असे असले तरी आज मराठी साहित्याचे प्रयोजन
आजच्या सहित्यातून काय दिसते हे पाहिले तर एकुणच साहित्यिकांच्या आकलन-मर्यादांची
प्रकर्षाने जाणीव होते हे मान्य करावेच लागेल.
थोडक्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनही
दोषांपासून अलिप्त नाही. या संमेलनांतून काहीतरी भरीव निष्पन्न झाले आहे असा या
संमेलनांचाही इतिहास नाही. मराठी साहित्य संस्कृती खुरडत चालली आहे याचे कारण
नेमके यात आहे. म. फुले यांचे विधान अखिल भारतीय साहित्य साम्मेल्नानेही
गांभीर्याने घेतले पाहिजे. सर्वांचे हित होईल असे आमच्या साहित्यात अद्यापही काहीच
का येत नाही, तेही पुराणपंथीच का राहते आहे? भविष्यवेधी साहित्यिक उद्गार
आमच्याकडे क्वचितच का उठतात? वर्तमान आमच्या साहित्यिकांच्या कवेत का येत नाही?
आम,ही आजही काही विशिष्ट व्यक्तींचे साहित्यिक देव्हारे उभे करून ते म्हणजेच
साहित्यिक आणि त्यांनी लिहिले तेच साहित्य असे स्वत:च्या सोयीचे मापदंड का उभे करत
आहोत? जी. ए. कुलकर्णी यांनी सांगीतलेल्या
एका बोधकथेचा मतितार्थ असा होता...”आम्ही विशिष्ट झाडाची उंची हाच मापदंड बनवून
त्यापेक्षा उंच झाडांचे शेंडे छाटून टाकण्यातच धन्यता मानतो.”
माझ्या मते अखिल भारतीय साहित्य संमेलनही असेच
करत आहे. बदलाची गरज आहे. परिवर्तन हा सृष्टीचा मुख्य गुणधर्म असेल तर नक्कीच.
विद्रोही आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनही नाव सृजनाचा प्रोत्साहक घटक
बनणार नसेल तर ती राहिली काय किंवा न राहिली काय, वाचकांना काय फरक पडतो.
दिल्ली येथे होत असलेले साहित्य संमेलन अनेक
बाबीत बदल घडवून आणू शकते. विद्रोही साहित्य संमेलनाला स्वत: खुले निमंत्रण देऊन
संजय नहार यांनी चांगला पायंडा पाडला होता. या निमंत्रणाचा स्वीकार झाला असता तर
साहित्य क्षेत्रात एक नवी वाट बनू शकली असती, पण तसे हा लेख लिहीपर्यंत तरी झालेले
नाही. हे संमेलन दिल्लीत होणार असल्याने याचे एक वेगळे महत्व आहे. किमान येथेतरी
साहित्यिक स्वमग्नतेच्या भूमिकेतून बाहेर पडत वैश्विक जरी नाही होऊ शकले तरी किमान
राष्ट्रीय दृष्टीचे होतील ही अपेक्षा!
-संजय सोनवणी
गेल्या काही दशकांत जगातील अधिकाधिक लोकांची बुद्धी घटते आहे, बुद्धीचे विषम वितरण गतिमान झालेले आहे असे दिसते. ज्याप्रमाणे संपत्ती मुठभर लोकांकडे केंद्रित होत आहे त्याच प्रमाणे बुद्धीचेही संकलन मर्यादित लोकांकडे होऊ लागलेले आहे आणि ही प्रक्रिया गतिमान झालेली आहे. ज्याप्रमाणे अधिकाधिक लोकांच्या संपत्तीला वित्तसंस्थांच्या मार्फत मोठीमोठी कर्जे घेऊन वा समभाग किंवा कर्जरोखे याचे वितरण करत एकाच कोणत्या ना कोणत्या कॉर्पोरेशनमध्ये भांडवल गोळा करत त्यावर आधारित उद्योगांवर जगातील आर्थिक गाडा चाललेला आहे त्याच प्रमाणे हीच कॉर्पोरेशन्स व सरकारेही विखुरलेल्या बुद्धिमत्तेचे एआयसारख्या साधनांमार्फत एकत्रीकरण करत त्याचा प्रभावी वापर करत जनतेवरच ज्ञान-स्वामित्व गाजवण्याचा उद्योग करत आहेत असे आज आपल्याला दिसून येईल. तुम्ही म्हणाल, भांडवलाचे एकत्रीकरण करता येईल, पण बुद्धिमत्तेचे भांडवलशाही किंवा मक्तेदारी कशी निर्माण होणार?
खरे तर हे आपण अनेक उदाहरणातून पाहू शकतो. पण कृत्रिम बुद्धीमत्तेचेच एक उदाहरण घेऊयात. साधन कोणतेही असो, त्याचा पाया असंख्य माणसांनी निर्माण केलेल्या माहिती आणि ज्ञानाने निर्माण झालेला आहे. त्यात सुसंगती आणत त्यातल्या त्यात मुद्देसूद पद्धतीने सादर करण्याचे तंत्रही असंख्य तंत्रज्ञांनी विकसित केलेले आहे व ते भविष्यातही अजून कोणते नवे तंत्रज्ञान येईपर्यंत करत राहणार आहेत. पण हे तंत्रज्ञ समग्र प्रकल्पातील एखाद्या तुकड्यावर कार्य करत असतात. समग्र चित्र पुन्हा मोजक्या लोकांच्या हातात असते. तेच हे तुकड्या तुकड्याने असंख्य तंत्रज्ञाकडून विकसित केले गेलेले घटक एकत्र जुळवत अंतिम उत्पादन तयार करत असतात. पुन्हा हेच तंत्रज्ञान सामान्य लोकांसमोर ठेवत असतात. कारखान्यातील उत्पादन पद्धती ते अंतिम उत्पादनासाठी आवश्यक मशीन लर्निंगसारखी साधने ही उत्पादन केंद्रित असल्याने त्यांचा सामान्य लोकांना थेट उपयोग होत नसला तरी या बुद्धीमत्तेचा उत्पादनकेंद्रीत उपयोग असला तरी केंत्याचा उपयोग उद्योगांना होऊन एकुणातील उत्पादन क्षमता व दर्जा वाढवण्याचा उपयोग उद्योगांना होतो तसाच तो सामान्य माणसांनाही अप्रत्यक्षरित्या होणार असतो. ही कृत्रिम बुद्धीमत्ता विकसित करणारे मानवच असतात. पण तेही त्या सर्व उत्पादन प्रक्रियेतील तज्ञ नसल्याने व त्याची आवश्यकता नसल्याने अनेकांची वेगवेगळ्या क्षेत्रातील बुद्धी त्या कृत्रिम बुद्धीमत्तेच्या निर्मितीसाठी खर्च होत असते. म्हणजेच एक साधन निर्माण करण्यासाठी अनेकांची बुद्धी एकत्र आलेली असते. पण प्रत्येकाने वापरलेली बुद्धी ही एका विशिष्ठ पद्धतीच्या साच्यात वापरावी लागत असल्याने त्यात सहभागी तज्ञही साचेबद्ध होत जातात. पण बुद्धीच्या एकत्रीक्ररणाची साचेबद्ध प्रक्रिया सुरूच राहते. साधनाचे उद्देश्य बदलले की प्रक्रिया बदलायची आवश्यकता निर्माण होते. ती प्रक्रिया ठरवणारे घटक मर्यादित असतात. पण त्या साधनाच्या असंख्य घटकांवर काम करणार्यांची संख्या मात्र सहसा कमी होत नाही. सोपे कोडींग लिहिणाऱ्या प्रणाल्या आज अस्तित्वात असल्या तरी साधन (टूल्स) चे उद्देश्य ठरवत त्याचा आराखडा करत त्यांचे शिस्तबद्ध विकास करण्यासाठी वितरण करत अंतिम परिणाम जसा कल्पिला होता तसाच निर्माण होण्यासाठी आपोआप कोडींग करणारे साधन आज तरी मानवी प्रतिभेच्या कक्षात आलेले नाही. त्यामुळे सध्याची कृत्रिम बुद्धीमत्ता मानवालंबी आहे आणि कृत्रिम बुद्धिमत्तेत मानवी बुद्धीचे केंद्रीकरण होते आहे. आणि ही साधने वापरणारे घटक पुन्हा मर्यादित आहेत. आर्थिक भांडवलाप्रमाणे बुद्धीचे एकत्रीकरण करणे आणि तिचा समग्र कार्यासाठी वापर करण्याच्या दिशेने सुरु असलेली ही वाटचाल आहे. यातून ज्ञानाचीही मक्तेदारी निर्माण होणे स्वाभाविक आहे. पण हे “उपयुक्त” ज्ञान आहे. हे उपयुक्त ज्ञान असणारे मर्यादित परिप्रेक्षात जीवनमान उंचावू शकतात. पण ते आपले ज्ञानात्मक भांडवल विकून. या ज्ञानाची उपयुक्तता संपली की भविष्यात मुळात व्यक्तीला ज्ञानाची आवश्यकताच राहणार नाही कारण ते ज्ञान आपसूक पुरवणारे साधन हाताशी उपलब्ध असेल.
मुळात कृत्रिम बुद्द्धीमत्तेचा उद्देशच माणसांना विचारक्षम करणे हा आहे काय की कृत्रिम बुद्धीमत्तेच्या जोरावर एकुणातील ज्ञानाला व त्याच्या विकासाला सीमित करण्याचा हेतू त्यामागे आहे? कृत्रिम बुद्धीमत्ता एक प्रकारे ज्ञानाची मक्तेदारी निर्माण करण्याच्या उद्देशाने तर निर्माण करण्याचा प्रयत्न होत नाहीय ना यावरही गंभीर विचार करण्याची गरज आहे. भांडवलाचे एकत्रीकरण आणि ज्ञानाचे एकत्रीकरण यात तसा फरक नाही. पण ज्ञानपरंपरेचे बहुमुखी विकसन यामुळे थांबण्याचा जो धोका आहे त्यावर मात्र विचार केला गेला पाहिजे. स्वत: कसलेही विशेष कष्ट न घेता बसल्या जागी एका क्षणात कोणालाही “ज्ञानवंत” बनवू शकणारी ही कृत्रिम बुद्धिमत्तेची साधने एकुणातील मानवाने आजवर केलेल्या ज्ञानाच्या प्रगतीतील मोठा अडसर बनू लागली असतील तर ती माणसाच्या मुलभूत आळशी प्रवृतीमुळे असे म्हटले तरी फारसे आश्चर्य वाटून घेण्याची गरज नाही.
आपले जीवन सोपे व्हावे यासाठीच आदिम काळापासून माणसाने अनेक शोध लावले. दैनंदिन कष्टाच्या कामापासून मुक्ती मिळून जास्त व्यापक कार्ये करता यावीत यासाठी त्याने शोध लावले. सुखसुविधा निर्माण केल्या. त्यात भांडवलशाहीची बीजे असली तरी त्याचे प्रमाण सर्वभक्षी नव्हते. पण वर्तमानात मक्तेदारीयुक्त भांडवलशाही आल्यामुळे आणि तिचा हेतू मानवी बुद्धीचा विकास हे नसल्याने बुद्धीही एक उत्पादन (कमोडीटी) मानत तिलाही मक्तेदारीमध्ये बदलवले जाणार असेल तर मात्र मानवजातीने चिंता करावी अशी स्थिती आहे.
मी नुकताच एका कॉलेजच्या रिसर्च पेपर्सच्या प्रेझेन्टेशन कार्यक्रमाला हजेरी लावली. जवळपास सर्वच विद्यार्थ्यांनी आपले रिसर्च पेपर्स व प्रेझेन्टेशंस चॅट-जीपीटीतून उचललेले होते. त्यात जे आहे ते सर्वच बरोबर आहे असा त्यांचा ठाम विश्वास असावा कारण त्याने पुरवलेल्या रचेनेतील ढोबळ चुकाही त्यांनी दुरुस्त करण्याचे बौद्धिक कष्ट घेतलेले नव्हते. हे सार्वत्रिक असावे असे दिसते. मी गेल्या लेखात म्हटले होते की कृत्रिम बुद्धीमत्ता हे सांगकाम्या मदतनिसासारखे आहे. त्याला स्वत:चे डोके नाही. विश्लेषन क्षमता नाही. त्यात अगणित लोकांनी दिलेल्या माहितीला स्वत:चे डोके न वापरता त्यातल्या त्यात दिलेल्या पद्धतीने मांडण्याचे कौशल्य असले तरी ते शेवटी कृत्रिम साधन आहे. प्रत्येकाने आपापली बुद्धी वापरत त्याचा कितपत उपयोग करून घ्यायचा हे ठरवले पाहिजे. पण तसे होत नाही. हा वेग वाढला तर बौध्दिक मक्तेदारी निर्माण होईल व तशी ती होतही आहे. ही मक्तेदारी समग्र मानव जातीची बौद्धिक अधोगती करत नेत आहे. यातून बौद्धिक साम्राज्यवाद निर्माण होण्याचा धोका आहे आणि तो राजकीय, आर्थिक साम्राज्यवादापेक्षा अधिक विनाशक असणार आहे. स्वबुद्धीविकासासाठी मदतनिस म्हणून ही साधने वापरणे वेगळे आणि बुद्धीच्या बाबतीत परावलंबी होणे वेगळे.
-संजय सोनवणी
चीनच्या डीपसीकने अलीकडेच जगभर कसा हादरा दिला याचे वृत्त सर्वांनीच वाचले असेल. त्यावर चर्चाही केल्या असतील. भारतही आपने स्वत:चे ए.आय. बनवणार असल्याच्याही बातम्या आपण वाचल्या असतील. यंदाच्याच अर्थसंकल्पात भारत सरकारने कृत्रिम बुद्धीमत्तेच्या अभ्यासासाठी पाचशे कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. एकीकडे कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे हाहा:कार उडेल, मानवाचे स्थान धोक्यात येईल अशी भीतीदायक भाकिते वर्तवली जात असतानाच दुसरीकडे अवाढव्य कॉर्पोरेट्स ते सरकारे कृत्रिम बुद्धीमत्तेतील आपली गुंतवणूक वाढवत नेत आहेत असे चित्र आपल्याला दिसते. भविष्यात हा वेग कमी होण्याची चिन्हे दिसत नसली तरी एकुणातच कृत्रिम बुद्धिमत्तेचे केले गेलेले चित्रण आणि वास्तवातील ए.आय. यात अजूनही खूप मोठी दरी असल्याने एकुणातच या क्षेत्रातील गुंतवणूक भविष्यात याच गतीने होत राहील की ती घटत जाईल याबाबत जागतिक अर्थतज्ञ साशंक आहेत. असे का व्हावे यामागे काही कारणे आहेत.
चॅटजीपीटी आणि डीपसीकमध्ये
नेमके काय अंतर आहे हेही या निमित्ताने लक्षात येवू लागले आहे. उदा. चीनचे
हितसंबंध ज्यात गुंतलेले आहेत अशा प्रश्नांबाबतची उत्तरे डीपसीक चीनधार्जिण्या
पद्धतीने देते. तसे चॅट जीपीटीबाबत अमेरिकाधार्जिणी उत्तरे मिळतात असा उघड आरोप अद्याप
कोणी केला नसला तरी तसे नसेलच असे खात्रीलायकरीत्या विधान करता येणार नाही. याचे
मुख्य कारण म्हणजे ज्या प्रकारच्या आणि ‘निवडक’ माहितीचा साठा कृत्रिम
बुद्धिमत्तेला पुरवला जातो त्यावर आधारित अशीच उत्तरे ही टूल्स पुरवत असतात.
स्वत:चे काही वापरण्याची सोय सध्याच्या तरी तंत्रज्ञानात नाही. प्रचंड माहितीचे दिलेल्या
गणिती पद्धतीने वेगात विश्लेषण करून निर्णय घेण्यास उपयुक्त माहिती समोर ठेवणे अथवा
वारंवारिता असलेल्या कृती करणे या कामात कृत्रिम बुद्धीमत्ता/रोबोटिक्स बऱ्यापैकी यशस्वी
होते आहे. पण कृत्रिम बुद्धीमत्ता समग्र नाही तर प्रत्येक क्षेत्रात त्या कामाची उद्दिष्टे
निश्चित करून तुकड्या-तुकड्यात तयार केली जाणारी प्रणाली आहे.
मानवी मेंदूत मज्जातंतूंचे
जाळे (न्यूरल नेटवर्क) असते जे वेगाने बहुस्तरीय विश्लेषण करून निर्णय घेते
त्याप्रमाणेच संगणकीय पद्धतीने ते व्हावे म्हणून “न्यूरल नेटवर्क” ही संज्ञा
जशीच्या तशी राबवण्याची कल्पना यामागे आहे. पण यात माहितीचा जोही संच पूरवावा
लागतो तो माणसांना. त्यात चुका होऊ शकतात आणि त्याच चुका मग प्रणाली करत राहणार.
त्यात वारंवार सुधारणा कराव्या लागतात, आदेश बदलत रहावे लागतात. पण हे स्वत:च विकसित
करण्यासाठी जी “प्रज्ञा” आवश्यक असते ती संगणकीय प्रणालीत नसते. त्यामुळे कृत्रिम
बुद्धीमत्ता मानवावलंबित होऊन जाते.
एकाच प्रकारचे काम
सातत्याने करावे लागत असेल, जेथे वेगवेगळ्या स्थिती निर्माण होऊन कार्यपद्धतीत बदल
करावा लागत नसेल अशा सांगकाम्या म्हणता येतील अशा कार्यांसाठी कृत्रिम बुद्धीमत्ता
किंवा मर्यादित हेतूने बनवलेले यंत्रमानव उपयुक्त ठरतात हे खरे. माणसाला पर्याय
म्हणून कृत्रिम बुद्धीमत्ता कधी उभी राहील काय या प्रश्नाचे उत्तर अनेकांनी
विज्ञान कादंबऱ्या-कथा ते चित्रपटांत शोधण्याचा प्रयत्न झाला आहे. सैद्धांतिक
पातळीवरही यावर खूप काम झाले आहे आणि होत राहणार आहे. भविष्यात यात कधीकाळी यश मिळेल
की नाही यासाठी आपण काही मुद्द्यांवर चर्चा करूयात.
मनुष्य हा जीवप्रणालीतील सजीव हिस्सा आहे. पृथ्वी सोडता अजून विश्वात मानव आहे की नाही याबाबत साशंकता असली तरी तो शोधही अविरत सुरु आहे. मनुष्याचे मुलभूत वैशिष्ट्य म्हणजे तो विचार करतो. त्याला संवेदना आहेत. त्याच्यात अंतर्स्फुर्ती आहे. तो स्वत:च आपले उद्दिष्ट ठरवू शकतो किंवा भवतालातून ते निवडू शकतो. तो स्वप्ने पाहतो. तो बिकट स्थितीतही वरकरणी अतार्किक वाटले तरी तसे निर्णय घेऊन स्वत:ला सुरक्षित ठेवू शकतो. तो स्वत:लाच स्वत: विकसित किंवा अध:पतित करत नेवू शकतो. प्रत्येकाच्या स्वभाव प्रेरणा वेगळ्या असून प्रत्येकाची शिकण्याची पद्धत एकजिनसी नसून बहुजिनसी आहे. तो इतिहासाचे, पुरातत्वीय पुराव्यांचे वेगवेगळे आकलन आणि विश्लेषण करू शकतो. त्यामुळेच प्राचीन संस्कृतींचे प्रत्येक इतिहासकाराचे आकलन आणि विश्लेषण भिन्न आहे. एकाच प्रकारच्या दृश्यातूनही वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असतात. उदा. एखादे नवे स्थान पाहिले तर कोणाला चित्र काढावेसे वाटेल, कोणाला कविता ‘सुचेल’, कोणाच्या मनात तात्विक विचार येतील तर कोणाच्या मनात उदासीनता जन्माला येईल किंवा कोणाला गावे असेही वाटू शकेल. . प्रतिक्रिया एवढ्याच मर्यादित राहत नाहीत तर त्या अगणित प्रकारच्या संभावनांनी व्यापलेल्या असतात. माणूस इतिहास, वर्तमान आणि नजीकचे किंवा दूरचे भविष्य या बाबतीत शिकलेल्या, शिकवलेल्या, वाचलेल्या अथवा ऐकलेल्या विवेचनाला जसेच्या तसे स्वीकारत नाही तर त्याला स्वत:चे काहीतरी जोडत असतो. अगदी ईश्वर ही संकल्पना घेतली व ती बव्हंशी जगमान्य असली तरी प्रत्येकाच्या ईश्वरविषयक संकल्पना समान असल्याचे आढळून येणार नाही. मुळात मनुष्य हे जैविक उत्पादन असल्याने व मानवी मेंदूत दहा अब्जांपेक्षा अधिक न्यूरॉन्स आहेत. मुळात मानवी मेंदू कसे कार्य करतो हे अद्याप कोडेच राहिलेले आहे. अगदी भाषेच्या संदर्भातही मेंदूतील नेमके कोणते केंद्रक काम करते आणि कसे करते हेच माणसाला अद्याप उलगडले नसल्याने भाषेच्या जन्माचा आणि भाषा शिकण्याच्या कौशल्याची कार्यप्रणाली नेमकी कशी घडते हे अद्याप आपल्याला निश्चयाने माहित नाही.
या अल्प पार्श्वभूमीवर सध्याची कृत्रिम बुद्धीमत्ता बाल्यावस्थेतही नाही असे म्हणावे लागेल. स्वयंप्रेरणेने विचार करू शकणारे, संवेदना, अंतर्स्फुर्ती असू शकेल असे ए.आय. निर्माण होऊ शकेल काय? नवीन विचार, स्वप्ने पाहणे जमू शकेल काय? तो स्वत:च विशिष्ट उद्देश्य निर्माण करून स्वत:लाच त्या दिशेने विकसित करणारे कोडींग करू शकतो काय? कारण विकासासाठी दृष्टी लागते, दिशा लागते. या जैव प्रेरणा आहेत. त्या यांत्रिक अथवा कृत्रिम नसतात. तिला (सांगितले नसेल तर) विविध पर्यायांतून एकाची तारतम्याने विचार करून निवड करता येणेही शक्य नाही.
आजतरी ए.आय. माणसाचा सांगकाम्या चाकर आहे व ए.आय.चे प्रत्येक साधन (टूल) विशिष्ट हेतूंनी विकसित केलेले आहे. मुळात माहिती कशी पुरवली गेलेली आहे त्याप्रमाणेच ते वर्तन करेल. त्याला ‘स्व-आकलन-संवेदना’ हा गुणधर्म नसल्याने आकलन-निर्णय व त्याचे परिणाम याबाबत ए.आय. उदासीन असते. त्यात सध्याचे ए.आय. तुकड्या-तुकड्यात आणि मर्यादित हेतुकेंद्रीत आहे. त्याच्यात केली जाणारी अवाढव्य गुंतवणूक आणि परतावा यातील गुणोत्तराचा आज एक प्रश्न बनलेला आहे. अशा स्थितीत पुढची वाटचाल कशी होईल? माणसालाच रिप्लेस करणारी समग्र कृत्रिम बुद्धीमत्ता कधी अस्तित्वात येईल काय यावर आपण पुढील लेखात विचार करू.
-संजय सोनवणी
मानवी इतिहासात पूर्ण क्रांती घडवणारे अत्यंत महत्वाचे शोध लागले आहेत. शेतीच्या शोधाने मानवी जीवनात क्रांतीकारी बदल घडवला होता. भटका समाज त्यामुळे स्थिर होऊ लागला. पण हा बदल पचवणे ज्यांना अन्नाच्या शोधासाठी भटकंती करायची हजारो वर्ष सवय होती त्यांना केवढे जड गेले असणार याची आपण कल्पना करू शकतो. पण बदल न स्वीकाणारे मागे फेकले जातात. शेतीमुळे मानवी संस्कृती बहरली. कोणतेही नवे तंत्रज्ञान आपल्यासोबत काही साईड इफेक्ट्सही आणत असते. शेतीमुळे अतिरिक्त उत्पादनाचे काय करायचे हा प्रश्न जसा उपस्थित झाला व त्यातून व्यापाराचा शोध लावला गेला असला तरी अतिरिक्त शेतीउत्पादन साठवण्याच्या पद्धतीमुळे अनेक नव्या रोगांचा जन्म झाला. या रोगांसाठी प्रतिकारक्षमता विकसित होण्यास अनेक पिढ्या गेल्या, यात कोट्यावधी लोकांचे मृत्यूही झाले. व्यापारामुळे रोगरायाही दूर दूर पर्यंत पसरवण्यास हातभार लागला. ज्या जनजाती या शेतीप्रधान मानवापासून दूर राहून आदिम जीवन जगत होत्या त्या जेंव्हाही या कृषीमानवाच्या साहचर्यात गेल्या तेंव्हा ते या जीवाणू-विषाणूशी कधी लढलेच नसल्यामुळे त्यांचे शिरकाण झाले. ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका खंडात युरोपियन गेले तेच ही "जैविक अस्त्रे" सोबत घेऊन आणि जरी त्यांची स्वत:ची प्रतिकार शक्ती नैसर्गिक दृष्ट्या तयार झालेली असली तरी तेथील मूळ रहिवाशांचे तसे नव्हते. त्यामुळे एकार्थाने हा वंशसंहारच होता. त्याच वेळीस मानवी भाषेत बहुरंगी भर पडत गेली. दैवत संकल्पना ते नितीतत्वांमध्ये अमुलाग्र बदल झाला. ही मोठी उलथापालथ होती.
त्यानंतर लागलेला क्रांतीकारी शोध म्हणजे यंत्रांचा. यंत्रयुगाने पारंपारिक व्यवसाय-धंद्यांची वाताहत केली. यंत्रयुगाला विरोध करणारे मानवशास्त्रज्ञही वाढले आणि ते शाश्वत जीवनपद्धतीचा पुरस्कार करू लागले. अशाही लोकांनी अपार प्रसिद्धी मिळवली असली तरी यंत्रयुगाने मानवी जीवनाला व्यापून टाकले. अर्थव्यवस्थेचे नियम बदलले. या युगाला आनुषंगिक नवी नितीशास्त्रे जन्माला आली. जगण्याच्या पद्धती बदलल्या. एका धावेमाःगुण दुसर्या अधिक जीवघेण्या दहावी सुरु झाल्या. पण यंत्रयुग टाळता आले नाही कारत त्यात तोट्यांपेक्षा फायदेच अधिक होते. जगणे अधिक सोयीस्कर झाले. अर्थात विषमतेचाही विस्फोट झाला. ती कशे टाळता येईल याविषयी चिंतन झाले असले तरी ते सरकारी पातळीवरील उपाययोजना एवढ्यापुरतेच मार्त्याडीत राहिले. जीवनाचे प्रश्न बदलले. नंतर संगणक युग आले. त्यानेही भीतीची लाट निर्माण केली. रोजगार जातील या भीतीने मानवजाताच गळाठून गेली. पण तसे झाले नाही. उलट लाखो नव्या नोकऱ्या जन्माला आल्या. पुन्हा समाजजीवनात नवी उलथापालथ झाली. मानवी नाते संबंध बदलू लागले. जग जवळ येऊ लागले पण मानवी मने मात्र दूर गेली असे या स्थितीचे वर्णन केले जाते.
आणि आता कृत्रिम बुद्धीमत्ता (ए.आय) आणि यंत्रमानव (रोबोटिक्स) तंत्रज्ञानाने जगातील असंख्य लोकांची झोप उडवलेली आहे. ही नवी क्रांती आहे असे मानले जाते. उद्याच्या जागातील सामाजिक आणि अर्थजीवनावर याचे काय विपरीत परिणाम होणार आहेत हे सांगू पाहणा-या विचारवंतांची दाटी सध्या वाढलेली दिसते. अलीकडेच लंडन येथे कृत्रिम बुद्धीमत्तेच्या संदर्भात शिखर परिषद झाली व दोन दिवसाच्या चर्चेनंतर ए.आय. मध्ये गंभीर, विनाशक आणि नुकसानदायक अशा अनेक गोष्टी आहेत ज्या जाणीवपूर्वक अथवा अजाणतेपणे उपस्थित होऊ शकतात कारण कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानात अशा अपायकारक संभावना आहेत असे घोषित केले गेले. या घोषणापत्रावर अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, चीनसारख्या अठ्ठाविस देशांनी सह्या केल्या असून नवीन निर्बंधांना तयार करून लागू करण्याबाबत सहमती दर्शवलेली आहे.
कोणतेही नवे तंत्रज्ञान आले कि त्याच्या दुरुपयोगाबद्दल शंका घेऊन त्याला घाबरून जाणे हे आपल्या जगाला नवे नाही. समाजविघातक प्रवृत्तींची जगात वानवा नाही हे तर अजून एक दुर्दैवी वास्तव आहे. दहशतवादी संघटनाही या तंत्रज्ञानाचा वापर करून विनाशक गोष्टी करवू शकतात. विकृतबुद्धी लोक ए.आय. वापरून बनावट व्हिडिओ बनवून बेमालूमपणे ते खरेच आहेत असे वाटतील या पद्धतीने प्रसारित करून कोणालाही बदनाम करू शकतात. सायबर गुन्हेगारी कृत्रिम बुद्धीमत्तेचा आधार घेऊन आर्थिक ते खाजगी माहितीचा अपहार करू शकतात. आधीही हे होतच होते पण आता त्याचा वेग वाढेल अशी चिन्हेही दिसू लागलेली आहेत. कृत्रिम बुद्धीमत्ता खरे तर अजून बाल्यावस्थेत आहे, पण तिच्यात प्रतिक्षणी वेगाने सुधारणा केली जाते आहे. कृत्रिम बुद्धीमत्तेचे वरील तोटे जरी असले तरी कामाच्या व निर्णयक्षमतेच्या वेगात व अचूक हाताळणीच्या बाबतीत ए. आय. अत्यंत यशस्वी ठरत असल्याने ते बलाढ्य कॉर्पोरेटसाठी आणि साध्यासोप्या दैनंदिन सोयींसाठी सर्वसामान्यांना फायद्याचे ठरते आहे हेही एक वास्तव आहे.
मनुष्य ज्या गोष्टींना सरावलेला असतो अशाच वैचारिक पर्यावरणात राहणे पसंत करतो. नवे ज्ञान हे जुने परिचित पर्यावरण नष्ट करत असल्याने त्याची भिती वाटणेही स्वाभाविक आहे. त्या भीतीत फार काही वावगे असते असेही नाही. नव्या ज्ञानाला जग नेहमीच घाबरते तर चतुर लोक त्याचा आधी फायदा घेऊन प्रगती करतात. आता “माणसाचे काय?” हा गंभीर प्रश्न जगभर चर्चेत नेहमीच येत असतो. आता तर कृत्रिम बुद्धीमत्ता आणि रोबोटिक्स माणसाला आव्हान द्यायला उभे ठाकलेले आहेत. उद्या आताचे बीट सिस्टमचे संगणक जाऊन क्वांटम प्रणालीवर चालणारे संगणक येतील तेंव्हा त्यांच्या अचाट क्षमतेमुळे आताचे संगणक बाद होऊन नवी अतिशक्तीशाली प्रणाली येईल तेव्हाही आज होते आहे तशीच चर्चा हिरीरीने केली जाईल. सामाजिक आणि नैतिक प्रश्न उठवले जातील यात शंका नाही.
पण मानवी प्रवृत्ती हीच नवेनवे शोध घेण्याची आहे. त्याचे कुतूहल त्याला स्वस्थ बसू देत नाही. आज आहे त्यापेक्षा नवे, वेगळे आणि अधिक क्षमतेचे कसे निर्माण करायचे हा ध्यास त्याला नैसर्गिकपणे जडलेला आहे. जुनी नीती रद्दबातल ठरवून नवी नीतीमुल्ये जन्माला घालणेही त्यातच आले.
माणसाला अधिकाधिक प्रगत, प्रगल्भ आणि कल्पक बनवणे हे प्रत्येक नव्या तंत्रद्न्यानाचे उद्दिष्ट असते. मानवी जीवन सुखकर व्हावे व साधी दैनंदिन कामे करण्यात वेळ न घालवता अधिकाधिक सर्जनशील कार्याकडे मानव जातीला कसे वळवता येईल हे पाहणे तंत्रज्ञानाचे ध्येय असते. आताची कृत्रिम बुद्धीमत्ता नेमकी काय आहे आणि मग तिचे भविष्य काय असणार आहे याचा विचार आपण पुढील लेखात करूयात. हे तंत्रज्ञान माणसाला खरेच घातक ठरणार आहे काय? तिच्यात असलेली सामर्थ्ये आणि मर्यादा यावर चर्चा करूयात.
-संजय सोनवणी
जनानखाना, ज्याला अंत:पूर, राणीवसा किंवा हरम असेही म्हटले जाते त्याबाबत समाजामध्ये अनेक समजुती प्रचलित आहेत. शत्रूच्या जिंकलेल्या स्त्रीयांना जनानखान्यामध्ये टाकले जात असल्याच्या समजुतीने जनानखाना या समाजव्यवस्थेतील एका गूढ व्यवस्थेला तिरस्कारानेही पाहिले जात असे हेही आपल्याला माहित आहे. अंत:पूर हा शब्द समान अर्थाचा असला तरी तो मात्र सोज्वळ वाटत असल्याचेही आपल्याला दिसते. जनानखाने जिंवा हरम हे मुस्लिमांचे असल्याने व त्यांनी जिंकलेल्या हिंदू राजांची संख्या जास्त असल्याने या हरलेल्या हिंदू राजांच्या बायका, पोरी ते त्यांच्या परिवारातील स्त्रिया जनानखान्यात टाकल्या जात असत आणि त्यांच्यावर अनन्वित लैंगिक अत्याचार केले जात असत अशी बव्हंशी मान्यता असल्याने या संस्थेकडे तिरस्काराने पाहिले जाते असे आपल्याला साधारणपणे म्हणता येईल. पण या समजुतीपार जाऊन पाहिले तर वेगळेच दर्शन घडेल आणि प्राचीन काळापासून ते मध्ययुगापर्यंत या संस्थेने जवळपास जगभर राज्य केल्याचे आपल्या लक्षात येईल. वैदिक व हिंदू हेही ही संस्था “अंत:पूर” या नावाखाली चालवत होते याची वर्णने आपल्याला रामायण-महाभारतात तर मिळतातच पण कौटिल्याच्या अर्थशास्त्रातही या व्यवस्थेचे निर्देश मिळतात. राजघराणी असोत, पुरोहित असोत कि त्यांचे अनुकरण करणारे आणि स्वत:ला वरिष्ठ समजणारे समाजघटक असोत, प्रतिष्ठेसाठी आणि स्त्रियांवरील अधिकार जतन करण्यासाठी ही व्यवस्था पाळली असल्याचे आपल्याला सर्वत्र दिसेल. जनानखान्यांतील घटनांवर अनेक काल्पनिक कथा – कादंब-याही लिहिल्या गेलेल्या आहेत.
या व्यवस्थेचा आढावा घेण्याआधी अंत:पूर या वैदिक/हिंदू व्यवस्थेवर आपण एक नजर टाकू. त्यानंतर मुस्लिमांचे आणि विशेष करून मोगलांचे जनानखाने ही व्यवस्था नेमकी काय होती, त्यातील स्त्रियांचे जगणे कसे होते, कट-कारस्थानांचे ते केंद्रही कसे बने इत्यादीची आपण सविस्तर चर्चा करू. मोगल जनानखान्यांची सविस्तर चर्चा अशासाठी कि त्याबद्दल समकालीन इतिहासकारांनी सविस्तर लिहुन ठेवले आहे. तसे मात्र हिंदू रजवाडे-सरदार यांच्या राणीवसा किंवा जनानखान्यांबाबत तेवढे लिहिलेले दिसत नाही. किंबहुना हिंदू राजे आणि सरदारही अनेक विवाह तर करतच असत पण अनेक अंगवस्त्रेही ठेवत असत. या स्त्रियांची व्यवस्था खास सुरक्षित भागात असे आणि तेही कटाक्षाने या स्त्रीयांना शक्य तेवढ्या बंदोबस्तात ठेवत असत. पण त्याबाबत मात्र फारसे लेखन झालेले नाही. त्याचा केवळ पुसटश्या संदर्भावरून अंदाज बांधावा लागतो. असे असले तरी अंत:पूर, रानीवसे किंवा जनानखान्यातील किरकोळ फरक सोडता भेद दिसून येत नाही. कारण मुख्य हेतू घराण्यातील स्त्रीयांना आणि मुलींना समाजापासून, कुदृष्टीपासून दूर ठेवत सन्मान जपणे हा तर असेः पण या स्त्रियांनी परपुरुषाकडे आकृष्ट होऊन लैंगिक वा प्रेमसंबंधात गुरफटू नये हाही एक उद्देश असे. सर्वसामान्यही माजघराचा वापर तेवढ्यासाठीच करत असत हेही आपल्याला दिसते. एनकेन प्रकारेन स्त्रीयांना बंदिस्त करून टाकणे हाच या प्रथेचा उद्देश्य होता. असे म्हणतात कि जनानखाने स्त्रियांच्या मूकअश्रू आणि वेदनांचे भंडार आहेत यातही अतिशयोक्ती नसली तरी बुद्धीमान आणि काही कुटील स्त्रियांनी त्या बंदिस्तपणावरही मात करत इतिहास घडवला असल्याचे आपल्याला दिसून येते.
कौटिल्याने अर्थशास्त्रात नमूद केल्याप्रमाणे आपल्याला हिंदू/वैदिक राजांच्या अंत:पुराची कल्पना येते. राजमहालात राजस्त्रीयांसाठी, राजकन्यांसाठी आणि राजपुत्रांसाठी वेगळे कक्ष असावेत आणि राजाचे शयनगृह स्वतंत्र आणि संरक्षित असले पाहिजे असे कौटिल्य म्हणतो. अंत:पुरातील स्त्रियांनी बाहेरच्या जगाशी संबंध ठेवता कामा नये असेही निर्देश तो देतो. अंत:पुराचे रक्षक स्त्रिया, तृतीय पंथी (हिजडे, क्लीब, किन्नर), बुटके किंवा कुबडे असले पाहिजेत. राजाच्या स्नानापासून ते वेष करेपर्यंत स्त्री सेविकांनी कशी काळजी घ्यायला पाहिजे आणि त्या कशा निवडल्या पाहिजेत याचे विवेचन करून कौटिल्य म्हणतो कि अंत:पुरात कोणतेही शस्त्र किंवा विषारी वस्तू येणार नाहीत याची काळजी राजाने घ्यायला हवी. याच अध्यायात कौटिल्य म्हणतो कि राण्यांनी किंवा नजीकच्या नातेवाईकांनी राजाचा खून केल्याची उदाहरणे आहेत. उदा. भद्राश्व नावाचा राजा राणीच्या महालात असताना तेथे बिछान्याखाली लपून बसलेल्या राजाच्याच भावाने खून केला होता. करुश नामक राजाचा खून अंत:पुरातच त्याच्या मुलाने केला होता तर अनेक राण्यांनीच आपल्या पतीचा खून विष घालून केला होता. राणीकडून कसलाही धोका नाही याची विश्वासू सेविकांकडून खात्री करून घेतल्याशिवाय राजाने कोणत्याही राणीच्या शयनगृहात जाता कामा नये. राजाने आपल्या कोनात्याही राणीला कोणी तपस्वी, जादुगार किवा बाहेरच्या स्त्रीयांनाही भेटू देऊ नये. अंत:पुरातील राणीच्या (आणि स्वत:च्या सेवेसाठी) ठेवलेल्या स्त्रिया (दासी-बटकीणी) या नेहमीच स्वच्छ आणि उत्तम वेशभूषा करणा-या असल्या पाहिजेत. वयाच्या ८० वर्ष उलटलेल्या स्त्री-पुरुष सेवकांनी अंत:पुरातील स्त्रिया व राजस्त्रियांची निष्ठा वारंवार तपासून पाहिली पाहिजे. असे बरेच नियम सांगून कौटिल्य म्हणतो कि राणीशी जर कोणी अनैतिक संबंध ठेवतो आहे असे लक्षात आले तर त्याची शिक्षा म्हणजे त्याला उकळत्या पाण्यात बुडवून मारणे. (अर्थशास्त्र- १.२०-२१)
कौटिल्याने हे कायदे अथवा नियम बनवले ते इसवी सन तिस-या शतकातील जेही वैदिक सामाजिक वास्तव होते त्याला अनुलक्षून हे उघड आहे. कायदे काल्पनिक अपराध किंवा वर्तनाबद्दल निर्माण होत नाहीत. राजा किंवा कर्तबगार पुरुषाचे शत्रू अनेकदा घरातूनच निर्माण होत असत हेही एक जगभरचे वास्तव आहे. त्यामागे स्त्रियांच्या चिरडल्या गेलेल्या आकांक्षा आणि स्वप्ने नाहीत असे म्हणता येणे अवघड आहे. अंत:पुरात काय काय कारस्थाने घडली याची अनेक उदाहरणे रामायण आणि महाभारताने तसेच अनेक पौराणिक कथांनी आपल्यासमोर ठेवलेले आहेच. असे असले तरी अंत:पुरातील स्त्रीयांचे जगणे, त्यांच्या व्यथावेदना प्राकृत साहित्य वगळता ऐतिहासिक लेखनातून फारशा उजेडात आलेल्या दिसत नाहीत. हिंदू समाज स्त्रियांबद्दल अधिक उदार असल्याने राजस्त्रिया असोत कि सामान्य स्त्रिया, त्यांना सामाजिक स्वातंत्र्य मिळत असेल याचे दर्शन आपल्याला तरंगवइ किंवा लिलावइसारख्या मराठी प्राकृतातील प्रेमाख्यानांतून मिळते. कौटिल्य मुख्यता: वैदिक अंत:पूर संकल्पनेबद्दल बोलत असल्याने स्वाभाविकच त्याच्या लेखनात स्त्रीयांना दुय्यमस्थान आहे आणि टोळीजीवनातून आलेल्या धर्मांबाबत ते स्वाभाविक आहे. पण जनाखान्यासारखीच अंत:पूर ही वैदिक संस्था भारतात अस्तित्वात होती आणि पुढील चर्चा पाहता दोन्हीतील गुण-दोष यात विशेष फरक नव्हता हे वास्तव आपल्या लक्षात येईल. कित्तेक कटकारस्थाने, प्रेमप्रकरणे, हत्या, सत्तेच्या उलथापालथीची नाट्ये या तथाकथित बंदिस्त जागी घडली असतील याची कल्पनाही आपल्याला येणे शक्य नाही. आणि दोन्ही प्रथांचा उगम स्त्रीविषयकच्या स्वामित्वभावात आणि त्यांना केवळ भोगवस्तू मानण्याची प्रवृत्तीत आहे हे आपल्या लक्षात येईल.
हरम म्हणजे असे
राखीव क्षेत्र जेथे बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला प्रवेश वर्जित असेल. हरममध्ये
विवाहित स्त्रिया, विधवा, दासी, नर्तकी, गायिका, धर्मशिक्षिका, रक्षिका व
तृतीयपंथी रक्षक व अधिकारी यांचा समावेश असे. बाहेरच्या व्यक्तींना (विशेषता:
पुरुषांना) तेथे प्रवेश निषिद्ध असे. स्त्रिया मनात येईल तेव्हा बाहेर जाऊ शकत नसत
आणि अनुमतीने गेल्या तरी त्यांना बाहेर पडतांना पडदा अनिवार्य असे. पालखी किंवा
हत्तीवारीत पडदेबंद अंबारीत त्या बसत. जनानखान्यात त्यांचे आयुष्य हे आरामदायक
असे. त्यांच्या सुखसोयींची दर्जाप्रमाणे विपुल व्यवस्था असे. जनानखाण्यातील
स्त्रीयांना दर्जाप्रमाणे स्वतंत्र महाल दिले जात. ते सुशोभित असत. जनानखान्याचा
भाग मुळात स्वतंत्र निर्माण केला जात असे जेथे बागाही असत. मोगल हरममध्ये
स्त्रियांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक खाती असत. त्यांना भोजन शाही बावर्चीखान्यातून पुरवले
जाई. शाही खजान्यातून यासाठी पैसे पुरवले जात. उपलब्ध नोंदीनुसार मोगल बादशहांच्या
हरमच्या भोजन व्यवस्थेसाठी रोज एक हजार रुपये खर्च केले जात. विविध देशातील
स्वयंपाकी बावर्चीखान्यात तैनात असत अशी माहिती अबूल फजल देतो. बादशहाही राजधानीत
असेल तेव्हा आपले भोजन हरममध्येच करत असत. पाणी आणि मद्यादी पेये पुरवण्यासाठीही
खास खाते निर्माण केलेले असे. त्यांना किमती वस्त्रे व अलंकारांचीही ददात नसे. हरमला
लागुनच बाजार, शाळा, खेळाची मैदाने आणि मेवा-मिठाईची दुकानेही असत. या सर्वांची
व्यवस्था कठोर नियमांनी चालवली जाई. सम्राटाची आई किंवा लाडकी बेगम जनानखान्याच्या
व्यवस्थेत सर्वोच्च स्थानी असे तर सम्राटाच्या रखेल्या या दुय्यम स्थानावर असत. अर्थात
सेविका आणि हिजडे हे कनिष्ठ स्थानावर असले तरी काही हिजड्यांनी बादशहावरही आपला
प्रभाव टाकून राजकीय वर्चस्व स्थापित केले असल्याचे आपल्याला दिसते. बादशाहा
जननखान्यात येई तेव्हा त्याच्या भोवती नपुसक रक्षकांचे कडे असे.
मोहंमदशाह रंगीला या
मोगल बादशहाच्या जनानखान्याच्या मुख्य रक्षक असलेल्या जावेदखान या हिजड्याने
आपल्या हेरगिरीच्या आणि पराक्रमाच्या बळावर एवढे सामर्थ्य प्राप्त केले होते कि
त्याने शेवटी सफदरजंग या पातशाहीच्या वजीराला आव्हान दिले होते आणि वजीरपदावर आपला
दावा ठोकला होता. राजमाता उधमबाई त्याच्या उत्कर्शामागे होती असेही म्हटले जाते. उधमबाई
ही नर्तकी होती पण मोहंमदशाह रंगीलाने तिच्याशी विवाह केला होता. त्याचा मृत्यू
१७४८ साली अचानक आजारी पडून झाला. त्याच्या मृत्युनंतर अह्मद्शहा पातशहा बनला आणि
जावेदखानचा राजकीय उत्कर्ष सुरु झाला. उधमबाईच्या दबावामुळे त्याला नबाबबहादूर हे
पूर्वी कोणाला न मिळालेली पदवी तर मिळालीच पण सहा हजाराची मनसबदारीही मिळाली.
त्याची मनमानीही सुरु झाले. वजीर सफदरजंगाशी पंगा घेतल्याने त्याची परिणती अशी
झाली कि ६ सप्टेंबर १७५२ रोजी त्याला चर्चेसाठी बोलावून त्याचा खून करण्यात आला
आणि त्याचे प्रेत यमुनातीरी फेकून देण्यात आले. मोहंमद शहाच्या अचानक आजारी
पडण्यामागे त्याचा किती हात होता हे आज आपल्याला माहित नसले तरी जनानखान्यात चालत
असणा-या कटकारस्थाने आणि प्रेमप्रकरणांचा राजकारणावर किती प्रभाव पडे याचे
दिग्दर्शन यातून होईल जावेदखान आणि उधमबाई यांच्यातील प्रेमसंबंधाची चर्चा अनेक
काळ दिल्लीत होत राहिली होती असे इतिहासकार जदुनाथ सरकार लिहितात.
जनानखान्यात फक्त स्त्रिया
राहत नसत. गर्भवतींची प्रसृतीही येथेच केली जाई. पुरुष अपत्ये वयात येईपर्यंत
येथेच वाढत. मनुचीच्या म्हणण्याप्रमाणे बादशहाच्या जनानखान्यात अक्षरश: हजारो
स्त्रिया असत. त्यात अनेक वंशांच्या मुस्लीम स्त्रिया तर असतच पण राजपूत आणि
ख्रिश्चन स्त्रियाही असत. बाबर आणि हुमायूनचा जनानखाना तुलनेने छोटाच म्हणावा
लागेल कारण अकबराच्या जनानखान्यात पाच हजार स्त्रिया होत्या. जहांगीर, शाहजहान आणि
औरंगजेबचा जनानखानाही असाच मोठा होता. याचे कारण या सम्राटांनी विस्तृत प्रदेश
जिंकून तर घेतलेच पण जिंकलेल्या सत्तांशी राजकीय संबंध ठेवण्यासाठी कधी खुशीने
किंवा कधी दबावाने त्यांच्या कन्यांना आपल्या जनानखान्यात स्थान दिल्याने ही
संख्या वाढणे स्वाभाविक होते.
भारतात सम्राट अकबराने
हरम व्यवस्थेला संस्थात्मक दर्जा दिला असे मानले जाते. त्यानेच जनानखान्यातील
स्त्रिया, नर्तकी, दासी, महिला अथवा ख्वाजा (हिजडे-तृतीय पंथी) यांची कर्तव्ये आणि
वेतन याबाबत रीतसर आखणी केली. पण ही व्यवस्था त्याहीपेक्षा प्राचीन आहे. गुलबदन
बेगम या हुमायूनच्या बहिणीने लिहिलेल्या ‘हुमायूननामा’ या चरित्रपर ग्रंथात हरम
(जनानखाना) व्यवस्थेचे व्यापक रूप आपल्याला दिसून येते. या व्यवस्थेत बादशहाची
व्यक्तिगत सुरक्षा जशी महत्वाची होती तेवढीच, किंवा त्यापेक्षा जास्त, जनानखान्यातील
स्त्रियांनी परपुरुषांच्या संपर्कात येऊ नये यासाठी होती. आणि असे सर्व कडेकोट
बंदोबस्त असले तरी काहीतरी क्लुप्ती शोधून बाहेरचे पुरुष आणले जात तर काही
प्रेमापोटी आत येत. असे कोणी आगंतुक सापडले तर त्याला तेथीलच भूमिगत फाशीघरात फाशी
देवून मारले जाई व त्याचे प्रेत बाहेर फेकले जाई. याबद्दल एक कथा अशी आहे कि
औरंगजेबाची छोटी बहिण रोषणआरा बाहेरच्या एका तरुणाच्या प्रेमात पडली. तिने जनानखान्यातील
रक्षक हिजड्यांना पैसे देऊन वश करून घेतले आणि त्याला गुप्तपणे हरममध्ये आणले.
काही दिवस त्याच्यासोबत काढल्यावर तिने आपल्या दासींना त्याला हरमबाहेर घेऊन जायला
सांगितले, पण दासी घाबरल्या आणि त्याला एका अंधारी खोलीत सोडून पळून गेल्या, सकाळी
त्याला कैद केले गेले. तो तरुण खोटे बोलला कि तो तटाच्या भिंतीवर चढून शाही
महालाकडे जाणार होता. औरंगजेबाने त्याला म्हंटले कि तू जसा आला तसा त्याच मार्गाने
परत जा. तो तरुण परत जाऊ लागला पण जसा तो तटावर आला तसे त्याला हिजड्यांनी साठ फुट
उंचीवरून खाली फेकून दिले. त्यात त्याचा अंत झाला.
बर्नियर व मनुचीने
वैद्य म्हणून जनानखान्याला भेटी दिल्या आहेत व त्यांनी जे पाहिले त्याचे वर्णन
करून ठेवले आहे. त्यावरून जनानखान्यातील विलासी जीवनाची आपल्याला कल्पना
येते.
हरममधील स्त्रीयांना बव्हंशी जीवन हरमच्या सीमांच्या आतच घालवावे लागे त्यामुळे त्यांच्या वेळ घालवण्यासाठी मनोरंजनाच्या अनेक व्यवस्था करून दिल्या जात असत. त्या वेळ घालवायच्या त्या आपले सौंदर्य सजवण्यावर तर संगीत ऐकणे वा नृत्य पाहणे यात किंवा मजेशीर खेळ खेळण्यात. त्यांना वाचायला पुस्तकेही उपलब्ध करून दिली जात. आजारी स्त्रीयांना बिमारखान्यात पाठवले जाई. हरममधील स्त्रियांनी बरेच लेखनही केलेले आहे. गुलबदन बेगम (हुमायूनची बहीण) हिने लिहिलेले हुमायूननामा हे पुस्तक प्रसिद्ध आहेच. पण साधारणपणे मोगल स्त्रियांचे आयुष्य बादशहाच्या जीवनाशी बांधलेले असे. बादशहाची आपल्यावरील मर्जी कशी वाढेल यासाठी सतत सुप्त स्पर्धा सुरु असे. राजकीय महत्व आणि आर्थिक लाभ यामागील महत्वाचे कारण असे. अनेक बेगमा व्यापार करत. त्यांच्या जहागिरी सांभाळत. काही तर विदेश व्यापारही करत. त्यातून मिळणा-या धनावर त्यांचाच अधिकार असल्याने त्यांची त्यासाठी अर्थातच मोठी चढाओढ चालू असे. आपापसातील मत्सराला त्यामुळे उधाण येत असले तरी ते उघड करण्यास मात्र बंदी होती. बादशहाला गादीचा वारस सर्वात आधी देण्याची चढाओढ सुरु असे कारण अशा बेगमेला किंवा राणीला सर्वाधिक महत्व प्राप्त होत असे. यामुळे एखादी सवत सर्वात आधी गरोदर आहे हे लक्षात आले कि तिचा काही काही-न-काही औषध नकळत देऊन गर्भपात घडवन्याचीही अनेक प्रकाराने घडत, वैदू/हकीम मंडळी सज्जड मोबदल्यात ही कामे करतही. त्यामुळे वरकरणी खेळकर वातावरण असले तरी सा-या एकमेकांकडे संशयाने पाहत आणि होता होईल तेवढी सावधगिरी बाळगत. त्या अर्थाने जनानखाण्यातील जीवन कितीही विलासी व खेळकर वाटले तरी प्रत्यक्षात ते जीवाच्या भीतीच्या सावटाखाली असे.
एखादीला अपत्यच
नसल्यास तिच्याकडे हीन दृष्टीने पाहिले जाणे स्वाभाविक असले तरी अशा अपत्यहीन
स्त्रीयांना अन्य प्रतिष्ठित घराण्यातील स्त्रीच्या अपत्याचे संगोपन करण्याचे
समाधान मात्र मिळू दिले जात असे. उदा. महम बेगम ही बाबरची लाडकी बेगम होती. तिने
हुमायूनला जन्म दिल्यानंतर तिची चर अपत्ये पाठोपाठ वारली, तेव्हा तिच्याकडे अन्य
बेगम, दिलदार बेगमची, हिंदाल आणि गुलबदन ही अपत्ये संगोपनासाठी सोपवण्यात आली.
अकबराची पहिली बायको रुकय्या सुलतान बेगम ही अपत्यहीन होती. त्यामुळे तिला
राजपुत्र सलीमचा पहिला पुत्र खुर्रम हा संगोपनासाठी सोपवला गेला होता व तिने
त्याला प्रचंड प्रेमाने वाढवले असे जहांगीर आपल्या आठवणींत लिहितो. अशी अनेक
उदाहरणे मोगल घराण्यात दाखवता येतील.
मोगल सम्राट आपल्या
आयांचा (सख्खी आणि सावत्र) खूप सन्मान करत असत असे बाबरनामा आणि हुमायूननामावरून
दिसते. अबुल फजलने लिहिलेय कि एकदा सम्राट अकबरची आई लाहोर ते आग्रा असा प्रवास
करत होती तेव्हा अकबरानेही तिच्या सोबत नुसता प्रवास केला नाही तर तिच्या
पालखीलाही वाहायचे काम केले. त्यांनी एखाद्या वास्तूचे बांधकाम करायचे ठरवले तरी
बादशाहा त्याला विरोध न करता शक्य तेवढी मदतच करत असत. गुलबदन बेगम आपल्या
हुमायूननाम्यात बादशहाच्या आया, आत्या, बहिणी, यांना किती प्रेम दिले जात होते
याचे भावपूर्ण वर्णन केले आहे. बाबरची सर्वाधिक श्रद्धा होती ती त्याची थोरली बहिण
ख्वानजादा बेगमवर. ख्वानजादानेही भावासाठी अनेक संकटे झेलली. टोळी जीवनातून हे
तुर्कीक मोगल आलेले असल्याने परिवार हा त्यांच्या सर्वात अधिक आस्थेचा विषय होता.
हरममध्ये त्याच आस्थेचे पालन केले जात असे. म्हणजे, स्त्रीयांना समाजात दुय्यम
स्थान असले तरी मोगल पातशहा सर्वोच्च सन्मानाचे स्थान देत. त्यांच्या सर्व इच्छा
पुरवल्या जात. उदा. शहाजहानचे आपली थोरली मुलगी जहानआरा हिच्यावरील प्रेम जसे
इतिहासप्रसिद्ध आहे तसेच औरंगजेबाचे झेबुन्निसावरचे. अर्थात झेबुन्निसा आपल्या
बागी पुत्र अकबराच्या बंडात सामील आहे हे कळताच त्याने तिला निर्दयपणे कैदेत टाकून
दिले. झेबुन्निसाही उत्कृष्ठ कवी होती.
हरममधील कर्मचारी
वर्गाला त्यांची कर्तव्ये आधीच निश्चित करून दिली जात असत. या कर्मचा-यांना
त्यांच्या हुद्द्यानुसार मासिक दोन रुपये ते एक हजार रुपये एवढे वेतन दिले जाई. अर्थात
त्यांच्यावर कडक बंधने असत. त्यांच्यात हेरही असून ते ती माहिती बादशहापर्यंत
पोचवायचे काम करत असत. जनानखाने हे कटकारस्थानांचे अनेकदा केंद्र असल्याने ही
व्यवस्था करणे बादशहाला अत्यावश्यक वाटणे स्वाभाविक आहे.
मोगल राजवटीच्या
प्रभावामुळे हिंदू संस्थानिक व सरदारही आपल्या अंत:पुराची व्यवस्था मोगल शैलीत करू
लागले. किंबहुना जनानखाना केवढा यावरून प्रतिष्ठा ठरत असल्याने राजकीय
हितसंबंधाच्या नावाखाली अनेक विवाह करणे व जनानखान्यात रखेल्यांची संख्या वाढवत
नेणे अनेक राजांना अभिमानास्पद वाटू लागले होते. मोगल बादशहाप्रमाणे ते युद्धावरही
जातांना आपला जनानखाना किंवा राणीवसा सोबत घेऊन जाणे ही जशी प्रतिष्ठेची बाब बनली.
प्रिय राण्यांना मोगल बादशहा किंवा सरदारांप्रमाणे जहागिरी देणे, उत्पन्नासाठी
गावे नेमून देणे हे प्रकार तर सर्रास होते. अनेक राण्यांनी/बेगमांनी आपली संपत्ती
या मार्गाने वाढवलेली आहे. उदाहणार्थ सुरत या सर्वात श्रीमंत बंदराचे उत्पन्न बादशहा
शहाजहानने आपली कन्या जहांआराला पानसुपारीच्या खर्चासाठी नेमून दिलेले होते असे
मनुची सांगतो. तो पुढे म्हणतो कि बेगमांना रोखीच्या स्वरूपातही बक्षिसी मिळे.
लुटीतील बहुमुल्य दागगदागिनेही भेटीत दिले जात असत. गुलबदन बेगम सांगते कि बाबराने
जेव्हा इब्राहीम लोदीचा पराभव करून आपाप लुट मिळवली तेव्हा त्याने ख्वाजा किलन
बेगमार्फत आपल्या हरममधल्या प्रत्येक महिलेला बहुमुल्य वस्तू पाठवल्या होत्या.
विशेष समारोहात बेगामांवर भेटवस्तूंची वर्षा करण्यात अकबरही मागे नव्हता. शहाजहानने
मुमताज महलला एका प्रसंगी दोन लाख अशरफी आणि सहा लाख रुपये भेटीत दिल्याचीही नोंद
आहे. जहांगीरने जनानखान्यातील स्त्रीयांना त्यांच्या दर्जानुसार त्यांचे वेतन तर
वाढवले होतेच पण सर्वात जास्त जहागी-या नूरजहान बेगमला दिल्या होत्या. आपल्या
नाझीरामार्फत या बेगमा जहागीरीची व्यवस्था बघत असत. वारसा हक्काच्या लढाईत
आपल्याला मदत केली म्हणून औरंगजेबाणे आपली बहिण रोषनआरा बेगमला पाच लाख रूपये भेट
दिले होते. थोडक्यात बेगमा आणि आवडत्या दासींवर पैसे उधळले जात ते त्यांना खुश
ठेवण्यासाठी. याशिवाय विदेशी व्यापारी आणि स्थानिक व परसत्तांचे वकीलही
बेगमासाठीही भेटवस्तू देत असत. बादशहाच्या सर्वात जवळची जी बेगम असे ती अर्थात
सर्वात धनाढ्य असे.
त्यामुळे काही शाही
स्त्रियांनी अनेक मकबरे, बागा, सराया, आणि महालांची उभारणी केली तसेच
दान-धर्मावरही खर्च केले. त्यांचा
व्यक्तिगतही नोकरवर्ग असे. त्या हाजच्या यात्राही करत असत. जनानखान्यातील रजपूत
स्त्रियाही त्यांचा हिंदू धर्म पाळत असत. सन साजरे करत असत. त्यात सर्व स्त्रिया
सहभागी होत असत. गुलबदन बेगम ही बैरामखानाचे विधवा आणि अकबराची बेगम सलीमा
सुलतानासोबत हाजला गेली होती असे तिने लिहून ठेवलेले आहे. जवळपास सर्वच मोगल
स्त्रियांनी हाजच्या यात्रा केलेल्या आहेत. शिवाय अजमेरसारख्या स्थानिक धार्मिक
स्थलांनाही भेट देण्यास त्या जात असत. जनानखाण्यातील या गर्भश्रीमंत महिला
व्यापारातही भाग घेत असत. मरियम उल जमानी (उर्फ जोधाबाई किंवा हरखाबाई) , नूरजहान,
जहांआरा बेगम या त्यात मोठा आयात-निर्यात व्यापार करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्या शाली, किमती वस्त्रे, गालिचे, अलंकार
इत्यादीचा व्यापार करत असत. अर्थात त्यातूनही त्यांना मोठा फायदा होत असे. ही
प्रथा जवळपास सर्वच राजघराण्यांनी पाळलेली दिसते. उदा. विजापूरची बडी बेगमही
राजापुरच्या बंदरातून अरब देशांशी व्यापार करीत असे. अकबराची बेगम मरियम इल जमानीच्या
मालकीचेच “राहीमी” या नावाचे जहाजही होते!
विवाह अथवा निकाह
केल्यावर पत्नीबरोबर सेविकाही दासी म्हणून दिल्या जात. या दासी एक प्रकारे
भोगदासीच असत. त्यांना पत्नीचा दर्जा मिळत नसला तरी पत्नीखालोखाल त्यांचे स्थान
असे. जनानखान्यातील दासीला ‘कनीज’ असे संबोधत. त्यांच्या संततीला वैध अपत्यासारखीच
वागणूक मिळत असली तरी पैतृक अधिकार मात्र मिळत नसत. हिंदू सरदार व राजांचे अनेक
दासीपुत्र महाराष्ट्राच्या इतिहासातही अवतरले आहेत. फर्जंद नामांत असलेले अनेक
दासीपुत्र इतिहासात प्रसिद्धही आहेत. अकबराचे मुराद आणि द्नियाल हे कनीजपुत्रही
इतिहासात प्रसिद्ध आहेत. असे असले तरी या दासी अथवा कनीज वा बंदी आपल्या धन्याशी
एकनिष्ठ असतच असे नाही. उदा उदेपुरी महल ही दारा शुकोहची दासी असली तरी ती नंतर
औरंगजेबाकडे राजीखुशीने गेली. पण दुसरी दासी मात्र दाराची हत्या होऊनही आणि दबाव
येउनही औरंगजेबाकडे गेली नाही.
युद्धात जिंकलेल्या
शत्रूच्या बायका रखेल्या वा दासी म्हणूनच ठेवल्या जात नसत. काही वेळा त्यांच्याशी
विवाहही केले गेल्याची उदाहरणे आहेत. एखाद्या अंतर्गत शत्रूला मारले तारे त्याच्या
एखाद्या बायकोशी विवाह केला जात असे. उदाहणार्थ बैरामखान हा सम्राट हुमायूनचा मित्र
आणि अकबराचा वजीर होता. आपल्याविरुद्ध कट केला आहे या संशयाने अकबराने त्याची हज
यात्रेच्या वाटेवर असताना हत्या घडवून आणली आणि नंतर त्याची बायको सलीमा सुलतान
बेगमशी निकाह केला.
राजकीय सौदेबाजीतून
होत असलेले निकाहही खूप असत. अकबराने अजमेरच्या राजा भारमलची मुलगी जोधाबाई हिच्याशी
निकाह करून तिला मरियम-उझ-झमानी असे नाव दिले. त्याने बिकानेर, जैसलमेर आणि
मारवारच्या राजघराण्यातील मुलींशीही निकाह केला होता. जहांगीरही हिंदू मुलींशी
विवाह करण्यात मागे नव्हता. त्याने अंबरच्या राजाची मुलगी मनबाई, व अन्य चार
राजपूत राजांच्या कन्यांशी विवाह केले. जवळपास सर्वच मोगल सम्राटांनी ही परंपरा
जपली.
याव्यतिरिक्त जनानखान्यातील
दासींशीही राजपुत्र ते सम्राटांची प्रेमप्रकरणेही होत असत. औरंगजेबाला जेव्हा
दक्षिणेचा सुभेदार बनवण्यात आले तेव्हा त्याच्या मावशीच्या घरची हिराबाई उर्फ
जैनाबादी ही दासी त्याला दिसली. ती सुंदर तर होतीच पण नृत्य-गायनात कुशल होती.
औरंगजेब तिच्या प्रेमात पडला. तो प्रेमात चूर असल्याने त्याचे कर्तव्याकडे दुर्लक्ष
होऊ लागले. औरंगजेबाचा भाऊ दारा शुकोहने शहाजहानकडे तक्रार केली. दौलताबाद येथे हिराबाईचा
नंतर खून करण्यात आला. या खुनामागे कोण असणार यचा अंदाज येऊ शकतो. औरंगजेब
हिराबाईच्या वियोगाने एवढा सैरभैर झाला कि त्याच्या वर्तनातच फरक पडला, तो अबोल
आणि सर्वच गोष्टीबाबत उदासीन झाला. आणि असा तर्क करण्यास वाव आहे कि औरंगजेब तिला
कधीच विसरला नाही पण तिच्या मृत्यूमुळे तो सनकी बनला असे अनेक इतिहासकार मानतात. दार
शुकोहच्या हत्येमागे औरंगजेबाच्या मनात त्याच्याबद्दलचा हाही तिरस्कार असू शकेल.
जनानखान्यात
असलेल्या राजस्त्रिया व दासीव्यतिरिक्त महत्वाच घटक म्हणजे नृत्यांगना, गायिका,
रक्षिका, आणि सेविका म्हणजे गुलाम स्त्रिया. गुलाम स्त्रीया सोडल्या तर अन्य
स्त्रियांची मात्र जनानखान्यात प्रतिष्ठा असे. रक्षक वर्गातील स्त्रिया आणि खोजे
हे तर सर्वात महत्वाचे घटक. जनानखान्यातील स्त्रीयांना गुपचूप पुरुष पुरवण्यापासून
अंतर्गत कटकारस्थानात त्यांचा सहभाग असल्याने अगदी राण्याही त्यांना वचकून
असत. असे असले तरी अनेक सेविकांनी
राजस्त्रियांची (बेगमांची) जीवावर उदार होऊन मनोभावे सेवा केल्याचे गुलबदन बेगमने
नोंदवून ठेवले आहे.
जनानखान्याची व्यवस्था बादशहा, राजे अथवा सरदार-अमीरांनी कितीही काटेकोर ठेवली असली आणि त्याच्या उदात्त कहाण्याही असल्या तरी या व्यवस्थेला काळी बाजू फार मोठी आहे. जनानखाने सत्तेचे मुख्य केंद्र नसले तरी सत्तेच्या उलथा-पालथीमागे रानीवसे (अंत:पूर) ते जनानखान्यांनी मोठी भूमिका पार पाडली आहे. त्याचे ऐतिहासिक विश्लेषण माहितीच्या अभावामुळे अद्याप फारसे झाले नसले तरी हा एक इतिहास घडवणारा महत्वाचा घटक होता यात शंका नाही. कारण जनानखाना ही एक संस्था होती. अंत:पूर किंवा राणीवसे ही भारतीय संस्था होती. दोन्ही व्यवस्था तशा अत्यंत वेगळ्या समाजव्यवस्थेतून निर्माण झालेल्या असल्या तरी तिचे भले-बुरे परिणाम राज्यव्यवस्थेवर आणि म्हणूनच समाजव्यवस्थेवर होणे अपरिहार्य होते. आपल्या राण्यांना आणि राजघराण्यातील स्त्रीसदस्यांना एका संरक्षित जागेत ठेवणे यामागे त्यांच्या रक्षणाचा जसा हेतू होता तसाच त्यांनी “परपुरुषांच्या नादी लागू नये” म्हणूनही बंदिस्त जागेत ठेवण्याचा होता. त्यांना आरामदायक जीवन उपलब्ध करून देणे ही राजा, सरदार ते बादशहाची गरज होती अन्यथा वेगळ्याच कटकटी सुरु झाल्या असत्या. पण विश्वातली कोणतीही व्यवस्था परिपूर्ण नसते आणि त्याचे मुख्य कारण म्हणजे व्यवस्था मानवांनी बनवली असली तरी ती मानवाकडूनच चालवली जाते. मानवी भाव-भावना, मानवी प्रवृत्ती याचा आणि व्यवस्थेचा संघर्ष उडणे त्यामुळे स्वाभाविक बनून जाते. इतिहास कधी मूक आक्रोश टिपत नाही. तो नैसर्गिक भावनांचा उद्रेक टिपत नाही. तो फक्त घटना लिहितो तोही अत्यंत रुक्ष पद्धतीने.
एक तर राजा वा
सम्राटाच्या पत्नी आणि दासीची संख्याच मोठी असल्याने नवरा किंवा शौहर
प्रत्येकीच्या वाट्याला येणार तरी किती? नैसर्गिक कामभावनांचे दमन होणार तरी कसे?
अनेक स्त्रिया हिजड्यांकरवी अनैसर्गिक पद्धतीने वासनापूर्ती करण्याचा प्रयत्न करत.
जनानखान्यात काकडी, गाजर किंवा तत्सम फळभाज्या नेता येण्यावर बंदी होती तीही
त्यामुळेच. स्त्रीयांना कामोत्तेजक पदार्थ पुरवण्यावरही सर्रास बंदी होती. अनेक
बंधने असली तरी त्या बाहेरून पुरुष आत आणता यावा यासाठी त्या अनेक युक्त्या शोधून
काढत. हिजडे त्यासाठी दाम मोजून एजंट म्हणून वापरले जात. काही स्त्रिया समलिंगी
संबंधातून कामभावनांचे दमन करून घेत. मनुची सांगतो कि शाहजहानच्या मुली जहांआरा
आणि रोषणआरा या एकमेकांच्या प्रेमात होत्या. प्रेमाची नैसर्गिक उर्मीही त्यांना
गुप्त प्रेमी शोधायला भाग पाडी. जहांआराने एका तरुणाशी सुत जुळवून त्याला
जनानखान्यात गुप्तपणे आणायची व्यवस्था केलेली होती. बर्नियार सांगतो कि अशा
त्यांच्या मिलनवेळेस बादशाहा जहांगीर अचानक तेथे आला. तो तरुण लपायला जागा मिळेना
म्हणून न्हाणीघरासाठी पाणी गरम करायला वापरल्या जाणा-या त्यावेळेस थंड असलेल्या
भट्टीत लपला. शाहजहानने आपल्या मुलीशी काहीच घडले नसल्यासारखे दाखवत गप्पा मारल्या
आणि जातांना तिला स्नान करण्याची सुचना देऊन तेथील एका हिजड्याला भट्टी पेटवण्यास
सांगितले. जहांआरा बिचारी काय बोलणार? हिजड्याने भट्टीत लाकडे सरकावत ती पेटवून
दिली. जहांगीर त्या तरुणाचा कोळसा होईपर्यंत तेथेच थांबला. मनुची आणि बर्नियर,
दोघेही सांगतात कि जहांआराची बहीण रोशनआरानेही दोन तरुणांशी अशाच प्रकारे सुत
जुळवले होते. औरंगजेबाच्या लक्षात हे प्रकरण आले. त्याने त्या तरुणांना काहीच केले
नाही पण देखरेखीसाठी ठेवलेल्या रक्षक हिजड्यांना मात्र देहदंड दिला. मोगल
जनानखान्याच्या इतिहासात अशा अनेक गोष्टी घडलेल्या आहेत आणि मनुष्यस्वभाव पाहता
स्त्रियांनी जे काही वासनापूर्तीसाठी केले ते दोषार्ह आहे असे म्हणता येत नाही.
मोगल स्त्रिया बाहेर
पडत त्या अंबारीतून किंवा पालखीतून. जातांना त्या पर्द्यात असल्या तरी त्यांचे नजर
एखाद्या देखण्या तरुणांवर जाई. वासना दाबून असल्याने अश दर्शनाने त्या उचंबळून
येत. त्या तरुणाचा पत्ता शोधून त्याची भेट घालण्यात दासी अथवा हिजडे मोलाची मदत
करीत. हिंदू अंत:पुरातही असेच घडत असे याच्या असंख्य कथा प्राकृत व संस्कृत
साहित्यात आलेल्या आहेत. हिजड्यांची जनानखान्यातील हुकुमत वाढे ती त्यांना माहित
असलेल्या गुपितांमुळेही.
बर्नियर या
वैद्यकशास्त्र जानना-या फ्रेंच प्रवाशाला एकदा एका शाही स्त्रीची वैद्यकीय तपासणी
करण्यासाठी दिल्ली येथील शाही जनानखान्यात जावे लागले होते. त्याला आत नेले गेले
ते तोंडावर काश्मिरी शाल बांधून. आता काहीही दिसेनासे झालेल्या बर्नियरला एका
तृतीयपंथीयाने हात धरून आत नेले. त्यामुळे
त्याला अपार उत्सुकता असूनसुद्धा जानानखान्याच्या अंतरभागाचे निरीक्षण करता आले
नाही. पण तो म्हणतो की जनानखाण्यातील स्त्रीयांना असंख्य बंधनात राहावे लागे. पडद्याआडून
त्यांना तपासायला त्या आजारी महिलेला स्पर्श जरी केला तरी त्या शहारून उठत. मनुची
म्हणतो कि सर्व स्त्रियांनी चारित्र्यसंपन्न असलेच पाहिजे असा कटाक्ष होता पण त्या
तशाच चारित्र्यसंपन्न प्रत्यक्षात कशा राहणार? किंबहुना जनानखान्याची रचनाही त्याच प्रकारे
केली गेलेली होती. एडवर्ड टेरी नावाचा अभ्यासक म्हणतो कि अगदी जवळच्या पुरुष
नातेवाइकांसोबतही स्त्रिया अन्य कोणाची उपस्थिती असल्याखेरीज बोलू शकत नसत. कोणी
स्त्री व्यभिचार करते आहे हे लक्षात आले तर तिला देहांत प्रायश्चित दिले जात असे.
अनेक शाहजाद्यांनी आपल्या बहीनीन्नाही यामुळे ठार मारलेले आहे.
याचा अर्थ
प्रेमप्रकरणे होतच नसत असे नाही. औरंगजेबाचे हिराबाईसोबत झालेले प्रकरन आपण
पाहिलेच आहे. बाबराचे मासुमा सुलतानासोबतचा निकाह प्रेमातूनच झाला होता. हुमायुनचा
हमीदाबानू बेगमशी झालेला निकाहही प्रेमातूनच झाला होता. हमीदाबानूला प्राप्त
करण्यासाठी त्याने एखाद्या नवथर प्रेमिकाप्रमाणे अनेक उपद्व्याप केले. हमीदा बानू
त्याच्याशी विवाह करण्यास उत्सुक नव्हती कारण तिच्या मते तो एवढ्या उच्च पदावर
होता कि तिची आणि त्याची बरोबरी होऊच शकत नव्हती. पुढे जनानखान्यातील अन्य
स्त्रियांनी तिची समजूत काढल्यावर तिने हुमायूनशी निकाह केला.
जहांगीरचे
नूरजहानवरील प्रेम प्रसिद्धच आहे. पण तो मेहरुन्निसा नामक सुंदरीच्या प्रेमातही
बुडाला होता. अकबराच्या हे लक्षात आल्यावर त्याने तिचे लग्न घियासुद्दिन बेग या
पर्शियन तरुणाशी लावून तिला आपल्या जननखाण्यातून दूर केले. शाहजादा जहांगीर यामुळे
एवढा अस्वस्थ झाला कि स्वत: सम्राट बनल्यावर त्याने मेहरुंनिसाला परत प्राप्त
करण्यासाठी तिच्या नव-याची हत्या करण्याची योजना बनवली होती. तिच्या नव-याच्या
मृत्युनंतर ती परत आग्रा येथे आली असता त्याने तिची सर्व व्यवस्था जातीने पाहिली.
नंतर जहांगीरने १६११मध्ये तिच्याशी रीतसर निकाहही केला. जहांगीरचे अनारकली या
नर्तकीशी झालेले प्रेमप्रकरण तर एक आख्याईका बनुन बसलेले आहे.
जनानखान्यात बादशहा
आणि शाहजाद्यांना असलेल्या प्रवेशामुळे कोणत्या ना कोणत्या बहाण्याने एकमेकांना
पाहिले तरी जाई, पण बाहेरच्या पुरुषाला असे दर्शन दुर्लभ असे, निकाह तर फार दूरची
बाब झाली. तरीही अशी मूक प्रेमप्रकरणेही असंख्य झाली असतील. अंत:पूर काय कि
जनानखाने काय, तेथे राहणा-या स्त्रियांच्या मूक आक्रोशाच्या साक्षी म्हणजे तेथील
निर्जीव भिंती. इतिहासही या आक्रोशाबाबत मुकच राहिलेला आहे. हिंदू अंत:पुरे वा राणीवसेही अशीच वेदनांची
गाथा सांगत असतील. त्यांचे जीवन वरकरणी विलासी वाटले तरी मुख्य बेगमा अथवा
पट्टराण्या सोडून खरे सुख क्वचितच कोणाला मिळाले असेल. आणि असे असले तरी
नूरजहानसारखा राजकीय प्रभावही काही स्त्रियांनी निर्माण केला आणि इतिहासावर छाप
सोडली हेही एक ऐतिहासिक सत्य आहे. बादशाही किंवा राजेशाही संपली तसे जनानखान्याचे
अस्तित्व धूसर होत जात अदृश्य झाले. एका काळ्या जगावर पडदा पडला. असे असले तरी
जगात अजून अनेक धनाढ्य व्यक्ती आपले जनानखाने बाळगून आहेत हेही एक कटू असले तरी
वास्तव आहे.
-संजय सोनवणी
(Published in Media Watch Diwali issue 2024)
आमचे डोळे फुटलेले आहेत कानात लाव्हा भरला आहे कोणत्या ज्वालामुखीवर आम्ही बसलो आहोत हे कळेना व्हावे एवढे बौद्धिक बधीर आम्ही झालो आहोत पिशाच्...