Tuesday, January 21, 2025

जनानखान्यांचे अद्भुत विश्व!

 

जनानखाना, ज्याला अंत:पूर, राणीवसा किंवा हरम असेही म्हटले जाते त्याबाबत समाजामध्ये अनेक समजुती प्रचलित आहेत. शत्रूच्या जिंकलेल्या स्त्रीयांना जनानखान्यामध्ये टाकले जात असल्याच्या समजुतीने जनानखाना या समाजव्यवस्थेतील एका गूढ व्यवस्थेला तिरस्कारानेही पाहिले जात असे हेही आपल्याला माहित आहे. अंत:पूर हा शब्द समान अर्थाचा असला तरी तो मात्र सोज्वळ वाटत असल्याचेही आपल्याला दिसते. जनानखाने जिंवा हरम हे मुस्लिमांचे असल्याने व त्यांनी जिंकलेल्या हिंदू राजांची संख्या जास्त असल्याने या हरलेल्या हिंदू राजांच्या बायका, पोरी ते त्यांच्या परिवारातील स्त्रिया जनानखान्यात टाकल्या जात असत आणि त्यांच्यावर अनन्वित लैंगिक अत्याचार केले जात असत अशी बव्हंशी मान्यता असल्याने या संस्थेकडे तिरस्काराने पाहिले जाते असे आपल्याला साधारणपणे म्हणता येईल. पण या समजुतीपार जाऊन पाहिले तर वेगळेच दर्शन घडेल आणि प्राचीन काळापासून ते मध्ययुगापर्यंत या संस्थेने जवळपास जगभर राज्य केल्याचे आपल्या लक्षात येईल. वैदिक व हिंदू हेही ही संस्था “अंत:पूर” या नावाखाली चालवत होते याची वर्णने आपल्याला रामायण-महाभारतात तर मिळतातच पण कौटिल्याच्या अर्थशास्त्रातही या व्यवस्थेचे निर्देश मिळतात.  राजघराणी असोत, पुरोहित असोत कि त्यांचे अनुकरण करणारे आणि स्वत:ला वरिष्ठ समजणारे समाजघटक असोत, प्रतिष्ठेसाठी आणि स्त्रियांवरील अधिकार जतन करण्यासाठी ही व्यवस्था पाळली असल्याचे आपल्याला सर्वत्र दिसेल. जनानखान्यांतील घटनांवर अनेक काल्पनिक कथा – कादंब-याही लिहिल्या गेलेल्या आहेत.

या व्यवस्थेचा आढावा घेण्याआधी अंत:पूर या वैदिक/हिंदू व्यवस्थेवर आपण एक नजर टाकू. त्यानंतर मुस्लिमांचे आणि विशेष करून मोगलांचे जनानखाने ही व्यवस्था नेमकी काय होती, त्यातील स्त्रियांचे जगणे कसे होते, कट-कारस्थानांचे ते केंद्रही कसे बने इत्यादीची आपण सविस्तर चर्चा करू. मोगल जनानखान्यांची सविस्तर चर्चा अशासाठी कि त्याबद्दल समकालीन इतिहासकारांनी सविस्तर लिहुन ठेवले आहे. तसे मात्र हिंदू रजवाडे-सरदार यांच्या राणीवसा किंवा जनानखान्यांबाबत तेवढे  लिहिलेले दिसत नाही. किंबहुना हिंदू राजे आणि सरदारही अनेक विवाह तर करतच असत पण अनेक अंगवस्त्रेही ठेवत असत. या स्त्रियांची व्यवस्था खास सुरक्षित भागात असे  आणि तेही कटाक्षाने या स्त्रीयांना शक्य तेवढ्या बंदोबस्तात ठेवत असत. पण त्याबाबत मात्र फारसे लेखन झालेले नाही. त्याचा केवळ पुसटश्या संदर्भावरून अंदाज बांधावा लागतो. असे असले तरी अंत:पूर, रानीवसे किंवा जनानखान्यातील किरकोळ फरक सोडता भेद दिसून येत नाही. कारण मुख्य हेतू घराण्यातील स्त्रीयांना आणि मुलींना समाजापासून, कुदृष्टीपासून दूर ठेवत सन्मान जपणे हा तर असेः पण या स्त्रियांनी परपुरुषाकडे आकृष्ट होऊन लैंगिक वा प्रेमसंबंधात गुरफटू नये हाही एक उद्देश असे. सर्वसामान्यही माजघराचा वापर तेवढ्यासाठीच करत असत हेही आपल्याला दिसते. एनकेन प्रकारेन स्त्रीयांना बंदिस्त करून टाकणे हाच या प्रथेचा उद्देश्य होता. असे म्हणतात कि जनानखाने स्त्रियांच्या मूकअश्रू आणि वेदनांचे भंडार आहेत यातही अतिशयोक्ती नसली तरी बुद्धीमान आणि काही कुटील स्त्रियांनी त्या बंदिस्तपणावरही मात करत इतिहास घडवला असल्याचे आपल्याला दिसून येते.

कौटिल्याने अर्थशास्त्रात नमूद केल्याप्रमाणे आपल्याला हिंदू/वैदिक राजांच्या अंत:पुराची कल्पना येते. राजमहालात राजस्त्रीयांसाठी, राजकन्यांसाठी आणि राजपुत्रांसाठी वेगळे कक्ष असावेत आणि राजाचे शयनगृह स्वतंत्र आणि संरक्षित असले पाहिजे असे कौटिल्य म्हणतो. अंत:पुरातील स्त्रियांनी बाहेरच्या जगाशी संबंध ठेवता कामा नये असेही निर्देश तो देतो. अंत:पुराचे रक्षक स्त्रिया, तृतीय पंथी (हिजडे, क्लीब, किन्नर), बुटके किंवा कुबडे असले पाहिजेत. राजाच्या स्नानापासून ते वेष करेपर्यंत स्त्री सेविकांनी कशी काळजी घ्यायला पाहिजे आणि त्या कशा निवडल्या पाहिजेत याचे विवेचन करून कौटिल्य म्हणतो कि अंत:पुरात कोणतेही शस्त्र किंवा विषारी वस्तू येणार नाहीत याची काळजी राजाने घ्यायला हवी. याच अध्यायात कौटिल्य म्हणतो कि राण्यांनी किंवा नजीकच्या नातेवाईकांनी राजाचा खून केल्याची उदाहरणे आहेत. उदा. भद्राश्व नावाचा राजा राणीच्या महालात असताना तेथे बिछान्याखाली लपून बसलेल्या राजाच्याच भावाने खून केला होता. करुश नामक राजाचा खून अंत:पुरातच त्याच्या मुलाने केला होता तर अनेक राण्यांनीच आपल्या पतीचा खून विष घालून केला होता. राणीकडून कसलाही धोका नाही याची विश्वासू सेविकांकडून खात्री करून घेतल्याशिवाय राजाने कोणत्याही राणीच्या शयनगृहात जाता कामा नये. राजाने आपल्या कोनात्याही राणीला कोणी तपस्वी, जादुगार किवा बाहेरच्या स्त्रीयांनाही भेटू देऊ नये. अंत:पुरातील राणीच्या (आणि स्वत:च्या सेवेसाठी) ठेवलेल्या स्त्रिया (दासी-बटकीणी) या नेहमीच स्वच्छ आणि उत्तम वेशभूषा करणा-या असल्या पाहिजेत. वयाच्या ८० वर्ष उलटलेल्या स्त्री-पुरुष सेवकांनी  अंत:पुरातील स्त्रिया व राजस्त्रियांची निष्ठा वारंवार तपासून पाहिली पाहिजे. असे बरेच नियम सांगून कौटिल्य म्हणतो कि राणीशी जर कोणी अनैतिक संबंध ठेवतो आहे असे लक्षात आले तर त्याची शिक्षा म्हणजे त्याला उकळत्या पाण्यात बुडवून मारणे. (अर्थशास्त्र- १.२०-२१)

कौटिल्याने हे कायदे अथवा नियम बनवले ते इसवी सन तिस-या शतकातील जेही वैदिक सामाजिक वास्तव होते त्याला अनुलक्षून हे उघड आहे. कायदे काल्पनिक अपराध किंवा वर्तनाबद्दल निर्माण होत नाहीत. राजा किंवा कर्तबगार पुरुषाचे शत्रू अनेकदा घरातूनच निर्माण होत असत हेही एक जगभरचे वास्तव आहे. त्यामागे स्त्रियांच्या चिरडल्या गेलेल्या आकांक्षा आणि स्वप्ने नाहीत असे म्हणता येणे अवघड आहे. अंत:पुरात काय काय कारस्थाने घडली याची अनेक उदाहरणे रामायण आणि महाभारताने तसेच अनेक पौराणिक कथांनी आपल्यासमोर ठेवलेले आहेच. असे असले तरी अंत:पुरातील स्त्रीयांचे जगणे, त्यांच्या व्यथावेदना प्राकृत साहित्य वगळता ऐतिहासिक लेखनातून फारशा उजेडात आलेल्या दिसत नाहीत. हिंदू समाज स्त्रियांबद्दल अधिक उदार असल्याने राजस्त्रिया असोत कि सामान्य स्त्रिया, त्यांना सामाजिक स्वातंत्र्य मिळत असेल याचे दर्शन आपल्याला तरंगवइ किंवा लिलावइसारख्या मराठी प्राकृतातील प्रेमाख्यानांतून मिळते. कौटिल्य मुख्यता: वैदिक अंत:पूर संकल्पनेबद्दल बोलत असल्याने स्वाभाविकच त्याच्या लेखनात स्त्रीयांना दुय्यमस्थान आहे आणि टोळीजीवनातून आलेल्या धर्मांबाबत ते स्वाभाविक आहे.  पण जनाखान्यासारखीच अंत:पूर ही वैदिक संस्था भारतात अस्तित्वात होती आणि पुढील चर्चा पाहता दोन्हीतील गुण-दोष यात विशेष फरक नव्हता हे वास्तव आपल्या लक्षात येईल. कित्तेक कटकारस्थाने, प्रेमप्रकरणे, हत्या, सत्तेच्या उलथापालथीची नाट्ये या तथाकथित बंदिस्त जागी घडली असतील याची कल्पनाही आपल्याला येणे शक्य नाही. आणि दोन्ही प्रथांचा उगम स्त्रीविषयकच्या स्वामित्वभावात आणि त्यांना केवळ भोगवस्तू मानण्याची प्रवृत्तीत आहे हे आपल्या लक्षात येईल.

 हरम अथवा जनानखाना

हरम म्हणजे असे राखीव क्षेत्र जेथे बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला प्रवेश वर्जित असेल. हरममध्ये विवाहित स्त्रिया, विधवा, दासी, नर्तकी, गायिका, धर्मशिक्षिका, रक्षिका व तृतीयपंथी रक्षक व अधिकारी यांचा समावेश असे. बाहेरच्या व्यक्तींना (विशेषता: पुरुषांना) तेथे प्रवेश निषिद्ध असे. स्त्रिया मनात येईल तेव्हा बाहेर जाऊ शकत नसत आणि अनुमतीने गेल्या तरी त्यांना बाहेर पडतांना पडदा अनिवार्य असे. पालखी किंवा हत्तीवारीत पडदेबंद अंबारीत त्या बसत. जनानखान्यात त्यांचे आयुष्य हे आरामदायक असे. त्यांच्या सुखसोयींची दर्जाप्रमाणे विपुल व्यवस्था असे. जनानखाण्यातील स्त्रीयांना दर्जाप्रमाणे स्वतंत्र महाल दिले जात. ते सुशोभित असत. जनानखान्याचा भाग मुळात स्वतंत्र निर्माण केला जात असे जेथे बागाही असत. मोगल हरममध्ये स्त्रियांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक खाती असत.  त्यांना भोजन शाही बावर्चीखान्यातून पुरवले जाई. शाही खजान्यातून यासाठी पैसे पुरवले जात. उपलब्ध नोंदीनुसार मोगल बादशहांच्या हरमच्या भोजन व्यवस्थेसाठी रोज एक हजार रुपये खर्च केले जात. विविध देशातील स्वयंपाकी बावर्चीखान्यात तैनात असत अशी माहिती अबूल फजल देतो. बादशहाही राजधानीत असेल तेव्हा आपले भोजन हरममध्येच करत असत. पाणी आणि मद्यादी पेये पुरवण्यासाठीही खास खाते निर्माण केलेले असे. त्यांना किमती वस्त्रे व अलंकारांचीही ददात नसे. हरमला लागुनच बाजार, शाळा, खेळाची मैदाने आणि मेवा-मिठाईची दुकानेही असत. या सर्वांची व्यवस्था कठोर नियमांनी चालवली जाई. सम्राटाची आई किंवा लाडकी बेगम जनानखान्याच्या व्यवस्थेत सर्वोच्च स्थानी असे तर सम्राटाच्या रखेल्या या दुय्यम स्थानावर असत. अर्थात सेविका आणि हिजडे हे कनिष्ठ स्थानावर असले तरी काही हिजड्यांनी बादशहावरही आपला प्रभाव टाकून राजकीय वर्चस्व स्थापित केले असल्याचे आपल्याला दिसते. बादशाहा जननखान्यात येई तेव्हा त्याच्या भोवती नपुसक रक्षकांचे कडे असे. 

मोहंमदशाह रंगीला या मोगल बादशहाच्या जनानखान्याच्या मुख्य रक्षक असलेल्या जावेदखान या हिजड्याने आपल्या हेरगिरीच्या आणि पराक्रमाच्या बळावर एवढे सामर्थ्य प्राप्त केले होते कि त्याने शेवटी सफदरजंग या पातशाहीच्या वजीराला आव्हान दिले होते आणि वजीरपदावर आपला दावा ठोकला होता. राजमाता उधमबाई त्याच्या उत्कर्शामागे होती असेही म्हटले जाते. उधमबाई ही नर्तकी होती पण मोहंमदशाह रंगीलाने तिच्याशी विवाह केला होता. त्याचा मृत्यू १७४८ साली अचानक आजारी पडून झाला. त्याच्या मृत्युनंतर अह्मद्शहा पातशहा बनला आणि जावेदखानचा राजकीय उत्कर्ष सुरु झाला. उधमबाईच्या दबावामुळे त्याला नबाबबहादूर हे पूर्वी कोणाला न मिळालेली पदवी तर मिळालीच पण सहा हजाराची मनसबदारीही मिळाली. त्याची मनमानीही सुरु झाले. वजीर सफदरजंगाशी पंगा घेतल्याने त्याची परिणती अशी झाली कि ६ सप्टेंबर १७५२ रोजी त्याला चर्चेसाठी बोलावून त्याचा खून करण्यात आला आणि त्याचे प्रेत यमुनातीरी फेकून देण्यात आले. मोहंमद शहाच्या अचानक आजारी पडण्यामागे त्याचा किती हात होता हे आज आपल्याला माहित नसले तरी जनानखान्यात चालत असणा-या कटकारस्थाने आणि प्रेमप्रकरणांचा राजकारणावर किती प्रभाव पडे याचे दिग्दर्शन यातून होईल जावेदखान आणि उधमबाई यांच्यातील प्रेमसंबंधाची चर्चा अनेक काळ दिल्लीत होत राहिली होती असे इतिहासकार जदुनाथ सरकार लिहितात.

जनानखान्यात फक्त स्त्रिया राहत नसत. गर्भवतींची प्रसृतीही येथेच केली जाई. पुरुष अपत्ये वयात येईपर्यंत येथेच वाढत. मनुचीच्या म्हणण्याप्रमाणे बादशहाच्या जनानखान्यात अक्षरश: हजारो स्त्रिया असत. त्यात अनेक वंशांच्या मुस्लीम स्त्रिया तर असतच पण राजपूत आणि ख्रिश्चन स्त्रियाही असत. बाबर आणि हुमायूनचा जनानखाना तुलनेने छोटाच म्हणावा लागेल कारण अकबराच्या जनानखान्यात पाच हजार स्त्रिया होत्या. जहांगीर, शाहजहान आणि औरंगजेबचा जनानखानाही असाच मोठा होता. याचे कारण या सम्राटांनी विस्तृत प्रदेश जिंकून तर घेतलेच पण जिंकलेल्या सत्तांशी राजकीय संबंध ठेवण्यासाठी कधी खुशीने किंवा कधी दबावाने त्यांच्या कन्यांना आपल्या जनानखान्यात स्थान दिल्याने ही संख्या वाढणे स्वाभाविक होते.

भारतात सम्राट अकबराने हरम व्यवस्थेला संस्थात्मक दर्जा दिला असे मानले जाते. त्यानेच जनानखान्यातील स्त्रिया, नर्तकी, दासी, महिला अथवा ख्वाजा (हिजडे-तृतीय पंथी) यांची कर्तव्ये आणि वेतन याबाबत रीतसर आखणी केली. पण ही व्यवस्था त्याहीपेक्षा प्राचीन आहे. गुलबदन बेगम या हुमायूनच्या बहिणीने लिहिलेल्या ‘हुमायूननामा’ या चरित्रपर ग्रंथात हरम (जनानखाना) व्यवस्थेचे व्यापक रूप आपल्याला दिसून येते. या व्यवस्थेत बादशहाची व्यक्तिगत सुरक्षा जशी महत्वाची होती तेवढीच, किंवा त्यापेक्षा जास्त, जनानखान्यातील स्त्रियांनी परपुरुषांच्या संपर्कात येऊ नये यासाठी होती. आणि असे सर्व कडेकोट बंदोबस्त असले तरी काहीतरी क्लुप्ती शोधून बाहेरचे पुरुष आणले जात तर काही प्रेमापोटी आत येत. असे कोणी आगंतुक सापडले तर त्याला तेथीलच भूमिगत फाशीघरात फाशी देवून मारले जाई व त्याचे प्रेत बाहेर फेकले जाई. याबद्दल एक कथा अशी आहे कि औरंगजेबाची छोटी बहिण रोषणआरा बाहेरच्या एका तरुणाच्या प्रेमात पडली. तिने जनानखान्यातील रक्षक हिजड्यांना पैसे देऊन वश करून घेतले आणि त्याला गुप्तपणे हरममध्ये आणले. काही दिवस त्याच्यासोबत काढल्यावर तिने आपल्या दासींना त्याला हरमबाहेर घेऊन जायला सांगितले, पण दासी घाबरल्या आणि त्याला एका अंधारी खोलीत सोडून पळून गेल्या, सकाळी त्याला कैद केले गेले. तो तरुण खोटे बोलला कि तो तटाच्या भिंतीवर चढून शाही महालाकडे जाणार होता. औरंगजेबाने त्याला म्हंटले कि तू जसा आला तसा त्याच मार्गाने परत जा. तो तरुण परत जाऊ लागला पण जसा तो तटावर आला तसे त्याला हिजड्यांनी साठ फुट उंचीवरून खाली फेकून दिले. त्यात त्याचा अंत झाला.

बर्नियर व मनुचीने वैद्य म्हणून जनानखान्याला भेटी दिल्या आहेत व त्यांनी जे पाहिले त्याचे वर्णन करून ठेवले आहे. त्यावरून जनानखान्यातील विलासी जीवनाची आपल्याला कल्पना येते.  

हरममधील स्त्रीयांना बव्हंशी जीवन हरमच्या सीमांच्या आतच घालवावे लागे त्यामुळे त्यांच्या वेळ घालवण्यासाठी मनोरंजनाच्या अनेक व्यवस्था करून दिल्या जात असत. त्या वेळ घालवायच्या त्या आपले सौंदर्य सजवण्यावर तर संगीत ऐकणे वा नृत्य पाहणे यात किंवा मजेशीर खेळ खेळण्यात. त्यांना वाचायला पुस्तकेही उपलब्ध करून दिली जात. आजारी स्त्रीयांना बिमारखान्यात पाठवले जाई. हरममधील स्त्रियांनी बरेच लेखनही केलेले आहे. गुलबदन बेगम (हुमायूनची बहीण) हिने लिहिलेले हुमायूननामा हे पुस्तक प्रसिद्ध आहेच. पण साधारणपणे मोगल स्त्रियांचे आयुष्य बादशहाच्या जीवनाशी बांधलेले असे. बादशहाची आपल्यावरील मर्जी कशी वाढेल यासाठी सतत सुप्त स्पर्धा सुरु असे. राजकीय महत्व आणि आर्थिक लाभ यामागील महत्वाचे कारण असे. अनेक बेगमा व्यापार करत. त्यांच्या जहागिरी सांभाळत. काही तर विदेश व्यापारही करत. त्यातून मिळणा-या धनावर त्यांचाच अधिकार असल्याने त्यांची त्यासाठी अर्थातच मोठी चढाओढ चालू असे. आपापसातील मत्सराला त्यामुळे उधाण येत असले तरी ते उघड करण्यास मात्र बंदी होती. बादशहाला गादीचा वारस सर्वात आधी देण्याची चढाओढ सुरु असे कारण अशा बेगमेला किंवा राणीला सर्वाधिक महत्व प्राप्त होत असे. यामुळे एखादी सवत सर्वात आधी गरोदर आहे हे लक्षात आले कि तिचा काही काही-न-काही औषध नकळत देऊन गर्भपात घडवन्याचीही अनेक प्रकाराने घडत, वैदू/हकीम मंडळी सज्जड मोबदल्यात ही कामे करतही. त्यामुळे वरकरणी खेळकर वातावरण असले तरी सा-या एकमेकांकडे संशयाने पाहत आणि होता होईल तेवढी सावधगिरी बाळगत. त्या अर्थाने जनानखाण्यातील जीवन कितीही विलासी व खेळकर वाटले तरी प्रत्यक्षात ते जीवाच्या भीतीच्या सावटाखाली असे.

एखादीला अपत्यच नसल्यास तिच्याकडे हीन दृष्टीने पाहिले जाणे स्वाभाविक असले तरी अशा अपत्यहीन स्त्रीयांना अन्य प्रतिष्ठित घराण्यातील स्त्रीच्या अपत्याचे संगोपन करण्याचे समाधान मात्र मिळू दिले जात असे. उदा. महम बेगम ही बाबरची लाडकी बेगम होती. तिने हुमायूनला जन्म दिल्यानंतर तिची चर अपत्ये पाठोपाठ वारली, तेव्हा तिच्याकडे अन्य बेगम, दिलदार बेगमची, हिंदाल आणि गुलबदन ही अपत्ये संगोपनासाठी सोपवण्यात आली. अकबराची पहिली बायको रुकय्या सुलतान बेगम ही अपत्यहीन होती. त्यामुळे तिला राजपुत्र सलीमचा पहिला पुत्र खुर्रम हा संगोपनासाठी सोपवला गेला होता व तिने त्याला प्रचंड प्रेमाने वाढवले असे जहांगीर आपल्या आठवणींत लिहितो. अशी अनेक उदाहरणे मोगल घराण्यात दाखवता येतील.

मोगल सम्राट आपल्या आयांचा (सख्खी आणि सावत्र) खूप सन्मान करत असत असे बाबरनामा आणि हुमायूननामावरून दिसते. अबुल फजलने लिहिलेय कि एकदा सम्राट अकबरची आई लाहोर ते आग्रा असा प्रवास करत होती तेव्हा अकबरानेही तिच्या सोबत नुसता प्रवास केला नाही तर तिच्या पालखीलाही वाहायचे काम केले. त्यांनी एखाद्या वास्तूचे बांधकाम करायचे ठरवले तरी बादशाहा त्याला विरोध न करता शक्य तेवढी मदतच करत असत. गुलबदन बेगम आपल्या हुमायूननाम्यात बादशहाच्या आया, आत्या, बहिणी, यांना किती प्रेम दिले जात होते याचे भावपूर्ण वर्णन केले आहे. बाबरची सर्वाधिक श्रद्धा होती ती त्याची थोरली बहिण ख्वानजादा बेगमवर. ख्वानजादानेही भावासाठी अनेक संकटे झेलली. टोळी जीवनातून हे तुर्कीक मोगल आलेले असल्याने परिवार हा त्यांच्या सर्वात अधिक आस्थेचा विषय होता. हरममध्ये त्याच आस्थेचे पालन केले जात असे. म्हणजे, स्त्रीयांना समाजात दुय्यम स्थान असले तरी मोगल पातशहा सर्वोच्च सन्मानाचे स्थान देत. त्यांच्या सर्व इच्छा पुरवल्या जात. उदा. शहाजहानचे आपली थोरली मुलगी जहानआरा हिच्यावरील प्रेम जसे इतिहासप्रसिद्ध आहे तसेच औरंगजेबाचे झेबुन्निसावरचे. अर्थात झेबुन्निसा आपल्या बागी पुत्र अकबराच्या बंडात सामील आहे हे कळताच त्याने तिला निर्दयपणे कैदेत टाकून दिले.  झेबुन्निसाही उत्कृष्ठ कवी होती.

हरममधील कर्मचारी वर्गाला त्यांची कर्तव्ये आधीच निश्चित करून दिली जात असत. या कर्मचा-यांना त्यांच्या हुद्द्यानुसार मासिक दोन रुपये ते एक हजार रुपये एवढे वेतन दिले जाई. अर्थात त्यांच्यावर कडक बंधने असत. त्यांच्यात हेरही असून ते ती माहिती बादशहापर्यंत पोचवायचे काम करत असत. जनानखाने हे कटकारस्थानांचे अनेकदा केंद्र असल्याने ही व्यवस्था करणे बादशहाला अत्यावश्यक वाटणे स्वाभाविक आहे.

मोगल राजवटीच्या प्रभावामुळे हिंदू संस्थानिक व सरदारही आपल्या अंत:पुराची व्यवस्था मोगल शैलीत करू लागले. किंबहुना जनानखाना केवढा यावरून प्रतिष्ठा ठरत असल्याने राजकीय हितसंबंधाच्या नावाखाली अनेक विवाह करणे व जनानखान्यात रखेल्यांची संख्या वाढवत नेणे अनेक राजांना अभिमानास्पद वाटू लागले होते. मोगल बादशहाप्रमाणे ते युद्धावरही जातांना आपला जनानखाना किंवा राणीवसा सोबत घेऊन जाणे ही जशी प्रतिष्ठेची बाब बनली. प्रिय राण्यांना मोगल बादशहा किंवा सरदारांप्रमाणे जहागिरी देणे, उत्पन्नासाठी गावे नेमून देणे हे प्रकार तर सर्रास होते. अनेक राण्यांनी/बेगमांनी आपली संपत्ती या मार्गाने वाढवलेली आहे. उदाहणार्थ सुरत या सर्वात श्रीमंत बंदराचे उत्पन्न बादशहा शहाजहानने आपली कन्या जहांआराला पानसुपारीच्या खर्चासाठी नेमून दिलेले होते असे मनुची सांगतो. तो पुढे म्हणतो कि बेगमांना रोखीच्या स्वरूपातही बक्षिसी मिळे. लुटीतील बहुमुल्य दागगदागिनेही भेटीत दिले जात असत. गुलबदन बेगम सांगते कि बाबराने जेव्हा इब्राहीम लोदीचा पराभव करून आपाप लुट मिळवली तेव्हा त्याने ख्वाजा किलन बेगमार्फत आपल्या हरममधल्या प्रत्येक महिलेला बहुमुल्य वस्तू पाठवल्या होत्या. विशेष समारोहात बेगामांवर भेटवस्तूंची वर्षा करण्यात अकबरही मागे नव्हता. शहाजहानने मुमताज महलला एका प्रसंगी दोन लाख अशरफी आणि सहा लाख रुपये भेटीत दिल्याचीही नोंद आहे. जहांगीरने जनानखान्यातील स्त्रीयांना त्यांच्या दर्जानुसार त्यांचे वेतन तर वाढवले होतेच पण सर्वात जास्त जहागी-या नूरजहान बेगमला दिल्या होत्या. आपल्या नाझीरामार्फत या बेगमा जहागीरीची व्यवस्था बघत असत. वारसा हक्काच्या लढाईत आपल्याला मदत केली म्हणून औरंगजेबाणे आपली बहिण रोषनआरा बेगमला पाच लाख रूपये भेट दिले होते. थोडक्यात बेगमा आणि आवडत्या दासींवर पैसे उधळले जात ते त्यांना खुश ठेवण्यासाठी. याशिवाय विदेशी व्यापारी आणि स्थानिक व परसत्तांचे वकीलही बेगमासाठीही भेटवस्तू देत असत. बादशहाच्या सर्वात जवळची जी बेगम असे ती अर्थात सर्वात धनाढ्य असे.

त्यामुळे काही शाही स्त्रियांनी अनेक मकबरे, बागा, सराया, आणि महालांची उभारणी केली तसेच दान-धर्मावरही खर्च केले.  त्यांचा व्यक्तिगतही नोकरवर्ग असे. त्या हाजच्या यात्राही करत असत. जनानखान्यातील रजपूत स्त्रियाही त्यांचा हिंदू धर्म पाळत असत. सन साजरे करत असत. त्यात सर्व स्त्रिया सहभागी होत असत. गुलबदन बेगम ही बैरामखानाचे विधवा आणि अकबराची बेगम सलीमा सुलतानासोबत हाजला गेली होती असे तिने लिहून ठेवलेले आहे. जवळपास सर्वच मोगल स्त्रियांनी हाजच्या यात्रा केलेल्या आहेत. शिवाय अजमेरसारख्या स्थानिक धार्मिक स्थलांनाही भेट देण्यास त्या जात असत. जनानखाण्यातील या गर्भश्रीमंत महिला व्यापारातही भाग घेत असत. मरियम उल जमानी (उर्फ जोधाबाई किंवा हरखाबाई) , नूरजहान, जहांआरा बेगम या त्यात मोठा आयात-निर्यात व्यापार करण्यासाठी प्रसिद्ध आहेत.  त्या शाली, किमती वस्त्रे, गालिचे, अलंकार इत्यादीचा व्यापार करत असत. अर्थात त्यातूनही त्यांना मोठा फायदा होत असे. ही प्रथा जवळपास सर्वच राजघराण्यांनी पाळलेली दिसते. उदा. विजापूरची बडी बेगमही राजापुरच्या बंदरातून अरब देशांशी व्यापार करीत असे. अकबराची बेगम मरियम इल जमानीच्या मालकीचेच “राहीमी” या नावाचे जहाजही होते!

विवाह अथवा निकाह केल्यावर पत्नीबरोबर सेविकाही दासी म्हणून दिल्या जात. या दासी एक प्रकारे भोगदासीच असत. त्यांना पत्नीचा दर्जा मिळत नसला तरी पत्नीखालोखाल त्यांचे स्थान असे. जनानखान्यातील दासीला ‘कनीज’ असे संबोधत. त्यांच्या संततीला वैध अपत्यासारखीच वागणूक मिळत असली तरी पैतृक अधिकार मात्र मिळत नसत. हिंदू सरदार व राजांचे अनेक दासीपुत्र महाराष्ट्राच्या इतिहासातही अवतरले आहेत. फर्जंद नामांत असलेले अनेक दासीपुत्र इतिहासात प्रसिद्धही आहेत. अकबराचे मुराद आणि द्नियाल हे कनीजपुत्रही इतिहासात प्रसिद्ध आहेत. असे असले तरी या दासी अथवा कनीज वा बंदी आपल्या धन्याशी एकनिष्ठ असतच असे नाही. उदा उदेपुरी महल ही दारा शुकोहची दासी असली तरी ती नंतर औरंगजेबाकडे राजीखुशीने गेली. पण दुसरी दासी मात्र दाराची हत्या होऊनही आणि दबाव येउनही औरंगजेबाकडे गेली नाही.

युद्धात जिंकलेल्या शत्रूच्या बायका रखेल्या वा दासी म्हणूनच ठेवल्या जात नसत. काही वेळा त्यांच्याशी विवाहही केले गेल्याची उदाहरणे आहेत. एखाद्या अंतर्गत शत्रूला मारले तारे त्याच्या एखाद्या बायकोशी विवाह केला जात असे.  उदाहणार्थ बैरामखान हा सम्राट हुमायूनचा मित्र आणि अकबराचा वजीर होता. आपल्याविरुद्ध कट केला आहे या संशयाने अकबराने त्याची हज यात्रेच्या वाटेवर असताना हत्या घडवून आणली आणि नंतर त्याची बायको सलीमा सुलतान बेगमशी निकाह केला.

राजकीय सौदेबाजीतून होत असलेले निकाहही खूप असत. अकबराने अजमेरच्या राजा भारमलची मुलगी जोधाबाई हिच्याशी निकाह करून तिला मरियम-उझ-झमानी असे नाव दिले. त्याने बिकानेर, जैसलमेर आणि मारवारच्या राजघराण्यातील मुलींशीही निकाह केला होता. जहांगीरही हिंदू मुलींशी विवाह करण्यात मागे नव्हता. त्याने अंबरच्या राजाची मुलगी मनबाई, व अन्य चार राजपूत राजांच्या कन्यांशी विवाह केले. जवळपास सर्वच मोगल सम्राटांनी ही परंपरा जपली.

याव्यतिरिक्त जनानखान्यातील दासींशीही राजपुत्र ते सम्राटांची प्रेमप्रकरणेही होत असत. औरंगजेबाला जेव्हा दक्षिणेचा सुभेदार बनवण्यात आले तेव्हा त्याच्या मावशीच्या घरची हिराबाई उर्फ जैनाबादी ही दासी त्याला दिसली. ती सुंदर तर होतीच पण नृत्य-गायनात कुशल होती. औरंगजेब तिच्या प्रेमात पडला. तो प्रेमात चूर असल्याने त्याचे कर्तव्याकडे दुर्लक्ष होऊ लागले. औरंगजेबाचा भाऊ दारा शुकोहने शहाजहानकडे तक्रार केली. दौलताबाद येथे हिराबाईचा नंतर खून करण्यात आला. या खुनामागे कोण असणार यचा अंदाज येऊ शकतो. औरंगजेब हिराबाईच्या वियोगाने एवढा सैरभैर झाला कि त्याच्या वर्तनातच फरक पडला, तो अबोल आणि सर्वच गोष्टीबाबत उदासीन झाला. आणि असा तर्क करण्यास वाव आहे कि औरंगजेब तिला कधीच विसरला नाही पण तिच्या मृत्यूमुळे तो सनकी बनला असे अनेक इतिहासकार मानतात. दार शुकोहच्या हत्येमागे औरंगजेबाच्या मनात त्याच्याबद्दलचा हाही तिरस्कार असू शकेल.

जनानखान्यात असलेल्या राजस्त्रिया व दासीव्यतिरिक्त महत्वाच घटक म्हणजे नृत्यांगना, गायिका, रक्षिका, आणि सेविका म्हणजे गुलाम स्त्रिया. गुलाम स्त्रीया सोडल्या तर अन्य स्त्रियांची मात्र जनानखान्यात प्रतिष्ठा असे. रक्षक वर्गातील स्त्रिया आणि खोजे हे तर सर्वात महत्वाचे घटक. जनानखान्यातील स्त्रीयांना गुपचूप पुरुष पुरवण्यापासून अंतर्गत कटकारस्थानात त्यांचा सहभाग असल्याने अगदी राण्याही त्यांना वचकून असत.  असे असले तरी अनेक सेविकांनी राजस्त्रियांची (बेगमांची) जीवावर उदार होऊन मनोभावे सेवा केल्याचे गुलबदन बेगमने नोंदवून ठेवले आहे. 

 जनानखान्याची व्यवस्था बादशहा, राजे अथवा सरदार-अमीरांनी कितीही काटेकोर ठेवली असली आणि त्याच्या उदात्त कहाण्याही असल्या तरी या व्यवस्थेला काळी बाजू फार मोठी आहे. जनानखाने सत्तेचे मुख्य केंद्र नसले तरी सत्तेच्या उलथा-पालथीमागे रानीवसे (अंत:पूर) ते जनानखान्यांनी मोठी भूमिका पार पाडली आहे. त्याचे ऐतिहासिक विश्लेषण माहितीच्या अभावामुळे अद्याप फारसे झाले नसले तरी हा एक इतिहास घडवणारा महत्वाचा घटक होता यात शंका नाही. कारण जनानखाना ही एक संस्था होती. अंत:पूर किंवा राणीवसे ही भारतीय संस्था होती. दोन्ही व्यवस्था तशा अत्यंत वेगळ्या समाजव्यवस्थेतून निर्माण झालेल्या असल्या तरी तिचे भले-बुरे परिणाम राज्यव्यवस्थेवर आणि म्हणूनच समाजव्यवस्थेवर होणे अपरिहार्य होते. आपल्या राण्यांना आणि राजघराण्यातील स्त्रीसदस्यांना एका संरक्षित जागेत ठेवणे यामागे त्यांच्या रक्षणाचा जसा हेतू होता तसाच त्यांनी “परपुरुषांच्या नादी लागू नये” म्हणूनही बंदिस्त जागेत ठेवण्याचा होता. त्यांना आरामदायक जीवन उपलब्ध करून देणे ही राजा, सरदार ते बादशहाची गरज होती अन्यथा वेगळ्याच कटकटी सुरु झाल्या असत्या. पण विश्वातली कोणतीही व्यवस्था परिपूर्ण नसते आणि त्याचे मुख्य कारण म्हणजे व्यवस्था मानवांनी बनवली असली तरी ती मानवाकडूनच चालवली जाते. मानवी भाव-भावना, मानवी प्रवृत्ती याचा आणि व्यवस्थेचा संघर्ष उडणे त्यामुळे स्वाभाविक बनून जाते. इतिहास कधी मूक आक्रोश टिपत नाही. तो नैसर्गिक भावनांचा उद्रेक टिपत नाही. तो फक्त घटना लिहितो तोही अत्यंत रुक्ष पद्धतीने.

एक तर राजा वा सम्राटाच्या पत्नी आणि दासीची संख्याच मोठी असल्याने नवरा किंवा शौहर प्रत्येकीच्या वाट्याला येणार तरी किती? नैसर्गिक कामभावनांचे दमन होणार तरी कसे? अनेक स्त्रिया हिजड्यांकरवी अनैसर्गिक पद्धतीने वासनापूर्ती करण्याचा प्रयत्न करत. जनानखान्यात काकडी, गाजर किंवा तत्सम फळभाज्या नेता येण्यावर बंदी होती तीही त्यामुळेच. स्त्रीयांना कामोत्तेजक पदार्थ पुरवण्यावरही सर्रास बंदी होती. अनेक बंधने असली तरी त्या बाहेरून पुरुष आत आणता यावा यासाठी त्या अनेक युक्त्या शोधून काढत. हिजडे त्यासाठी दाम मोजून एजंट म्हणून वापरले जात. काही स्त्रिया समलिंगी संबंधातून कामभावनांचे दमन करून घेत. मनुची सांगतो कि शाहजहानच्या मुली जहांआरा आणि रोषणआरा या एकमेकांच्या प्रेमात होत्या. प्रेमाची नैसर्गिक उर्मीही त्यांना गुप्त प्रेमी शोधायला भाग पाडी. जहांआराने एका तरुणाशी सुत जुळवून त्याला जनानखान्यात गुप्तपणे आणायची व्यवस्था केलेली होती. बर्नियार सांगतो कि अशा त्यांच्या मिलनवेळेस बादशाहा जहांगीर अचानक तेथे आला. तो तरुण लपायला जागा मिळेना म्हणून न्हाणीघरासाठी पाणी गरम करायला वापरल्या जाणा-या त्यावेळेस थंड असलेल्या भट्टीत लपला. शाहजहानने आपल्या मुलीशी काहीच घडले नसल्यासारखे दाखवत गप्पा मारल्या आणि जातांना तिला स्नान करण्याची सुचना देऊन तेथील एका हिजड्याला भट्टी पेटवण्यास सांगितले. जहांआरा बिचारी काय बोलणार? हिजड्याने भट्टीत लाकडे सरकावत ती पेटवून दिली. जहांगीर त्या तरुणाचा कोळसा होईपर्यंत तेथेच थांबला. मनुची आणि बर्नियर, दोघेही सांगतात कि जहांआराची बहीण रोशनआरानेही दोन तरुणांशी अशाच प्रकारे सुत जुळवले होते. औरंगजेबाच्या लक्षात हे प्रकरण आले. त्याने त्या तरुणांना काहीच केले नाही पण देखरेखीसाठी ठेवलेल्या रक्षक हिजड्यांना मात्र देहदंड दिला. मोगल जनानखान्याच्या इतिहासात अशा अनेक गोष्टी घडलेल्या आहेत आणि मनुष्यस्वभाव पाहता स्त्रियांनी जे काही वासनापूर्तीसाठी केले ते दोषार्ह आहे असे म्हणता येत नाही.

मोगल स्त्रिया बाहेर पडत त्या अंबारीतून किंवा पालखीतून. जातांना त्या पर्द्यात असल्या तरी त्यांचे नजर एखाद्या देखण्या तरुणांवर जाई. वासना दाबून असल्याने अश दर्शनाने त्या उचंबळून येत. त्या तरुणाचा पत्ता शोधून त्याची भेट घालण्यात दासी अथवा हिजडे मोलाची मदत करीत. हिंदू अंत:पुरातही असेच घडत असे याच्या असंख्य कथा प्राकृत व संस्कृत साहित्यात आलेल्या आहेत. हिजड्यांची जनानखान्यातील हुकुमत वाढे ती त्यांना माहित असलेल्या गुपितांमुळेही.

बर्नियर या वैद्यकशास्त्र जानना-या फ्रेंच प्रवाशाला एकदा एका शाही स्त्रीची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी दिल्ली येथील शाही जनानखान्यात जावे लागले होते. त्याला आत नेले गेले ते तोंडावर काश्मिरी शाल बांधून. आता काहीही दिसेनासे झालेल्या बर्नियरला एका तृतीयपंथीयाने हात धरून आत नेले.  त्यामुळे त्याला अपार उत्सुकता असूनसुद्धा जानानखान्याच्या अंतरभागाचे निरीक्षण करता आले नाही. पण तो म्हणतो की जनानखाण्यातील स्त्रीयांना असंख्य बंधनात राहावे लागे. पडद्याआडून त्यांना तपासायला त्या आजारी महिलेला स्पर्श जरी केला तरी त्या शहारून उठत. मनुची म्हणतो कि सर्व स्त्रियांनी चारित्र्यसंपन्न असलेच पाहिजे असा कटाक्ष होता पण त्या तशाच चारित्र्यसंपन्न प्रत्यक्षात कशा राहणार?  किंबहुना जनानखान्याची रचनाही त्याच प्रकारे केली गेलेली होती. एडवर्ड टेरी नावाचा अभ्यासक म्हणतो कि अगदी जवळच्या पुरुष नातेवाइकांसोबतही स्त्रिया अन्य कोणाची उपस्थिती असल्याखेरीज बोलू शकत नसत. कोणी स्त्री व्यभिचार करते आहे हे लक्षात आले तर तिला देहांत प्रायश्चित दिले जात असे. अनेक शाहजाद्यांनी आपल्या बहीनीन्नाही यामुळे ठार मारलेले आहे.

याचा अर्थ प्रेमप्रकरणे होतच नसत असे नाही. औरंगजेबाचे हिराबाईसोबत झालेले प्रकरन आपण पाहिलेच आहे. बाबराचे मासुमा सुलतानासोबतचा निकाह प्रेमातूनच झाला होता. हुमायुनचा हमीदाबानू बेगमशी झालेला निकाहही प्रेमातूनच झाला होता. हमीदाबानूला प्राप्त करण्यासाठी त्याने एखाद्या नवथर प्रेमिकाप्रमाणे अनेक उपद्व्याप केले. हमीदा बानू त्याच्याशी विवाह करण्यास उत्सुक नव्हती कारण तिच्या मते तो एवढ्या उच्च पदावर होता कि तिची आणि त्याची बरोबरी होऊच शकत नव्हती. पुढे जनानखान्यातील अन्य स्त्रियांनी तिची समजूत काढल्यावर तिने हुमायूनशी निकाह केला.

जहांगीरचे नूरजहानवरील प्रेम प्रसिद्धच आहे. पण तो मेहरुन्निसा नामक सुंदरीच्या प्रेमातही बुडाला होता. अकबराच्या हे लक्षात आल्यावर त्याने तिचे लग्न घियासुद्दिन बेग या पर्शियन तरुणाशी लावून तिला आपल्या जननखाण्यातून दूर केले. शाहजादा जहांगीर यामुळे एवढा अस्वस्थ झाला कि स्वत: सम्राट बनल्यावर त्याने मेहरुंनिसाला परत प्राप्त करण्यासाठी तिच्या नव-याची हत्या करण्याची योजना बनवली होती. तिच्या नव-याच्या मृत्युनंतर ती परत आग्रा येथे आली असता त्याने तिची सर्व व्यवस्था जातीने पाहिली. नंतर जहांगीरने १६११मध्ये तिच्याशी रीतसर निकाहही केला. जहांगीरचे अनारकली या नर्तकीशी झालेले प्रेमप्रकरण तर एक आख्याईका बनुन बसलेले आहे.

जनानखान्यात बादशहा आणि शाहजाद्यांना असलेल्या प्रवेशामुळे कोणत्या ना कोणत्या बहाण्याने एकमेकांना पाहिले तरी जाई, पण बाहेरच्या पुरुषाला असे दर्शन दुर्लभ असे, निकाह तर फार दूरची बाब झाली. तरीही अशी मूक प्रेमप्रकरणेही असंख्य झाली असतील. अंत:पूर काय कि जनानखाने काय, तेथे राहणा-या स्त्रियांच्या मूक आक्रोशाच्या साक्षी म्हणजे तेथील निर्जीव भिंती. इतिहासही या आक्रोशाबाबत मुकच राहिलेला आहे.  हिंदू अंत:पुरे वा राणीवसेही अशीच वेदनांची गाथा सांगत असतील. त्यांचे जीवन वरकरणी विलासी वाटले तरी मुख्य बेगमा अथवा पट्टराण्या सोडून खरे सुख क्वचितच कोणाला मिळाले असेल. आणि असे असले तरी नूरजहानसारखा राजकीय प्रभावही काही स्त्रियांनी निर्माण केला आणि इतिहासावर छाप सोडली हेही एक ऐतिहासिक सत्य आहे. बादशाही किंवा राजेशाही संपली तसे जनानखान्याचे अस्तित्व धूसर होत जात अदृश्य झाले. एका काळ्या जगावर पडदा पडला. असे असले तरी जगात अजून अनेक धनाढ्य व्यक्ती आपले जनानखाने बाळगून आहेत हेही एक कटू असले तरी वास्तव आहे.


-संजय सोनवणी

 (Published in Media Watch Diwali issue 2024)

1 comment:

  1. जनानखान्याचे रक्षण करण्यासाठी लहान मुलांना खोजे बनवल्या जात असे. यांच्यापासून जनानखान्याला धोका नसे. हे खोजे म्हणजेच तृतीय पंथी किंवा हिजडे का? नेमकी कोणती क्रृरता करून त्या लहान मुलांना खोजे बनवल्या जात असे?

    ReplyDelete

जनानखान्यांचे अद्भुत विश्व!

  जनानखाना, ज्याला अंत:पूर, राणीवसा किंवा हरम असेही म्हटले जाते त्याबाबत समाजामध्ये अनेक समजुती प्रचलित आहेत. शत्रूच्या जिंकलेल्या स्त्रीय...