Thursday, January 23, 2025

कृत्रिम बुद्धिमत्तेने निर्माण केलेले भय किती खरे?

 



मानवी इतिहासात पूर्ण क्रांती घडवणारे अत्यंत महत्वाचे शोध लागले आहेत. शेतीच्या शोधाने मानवी जीवनात क्रांतीकारी बदल घडवला होता. भटका समाज त्यामुळे स्थिर होऊ लागला. पण हा बदल पचवणे ज्यांना अन्नाच्या शोधासाठी भटकंती करायची हजारो वर्ष सवय होती त्यांना केवढे जड गेले असणार याची आपण कल्पना करू शकतो. पण बदल न स्वीकाणारे मागे फेकले जातात. शेतीमुळे मानवी संस्कृती बहरली. कोणतेही नवे तंत्रज्ञान आपल्यासोबत काही साईड इफेक्ट्सही आणत असते. शेतीमुळे अतिरिक्त उत्पादनाचे काय करायचे हा प्रश्न जसा उपस्थित झाला व त्यातून व्यापाराचा शोध लावला गेला असला तरी अतिरिक्त शेतीउत्पादन साठवण्याच्या पद्धतीमुळे अनेक नव्या रोगांचा जन्म झाला. या रोगांसाठी प्रतिकारक्षमता विकसित होण्यास अनेक पिढ्या गेल्या, यात कोट्यावधी लोकांचे मृत्यूही झाले. व्यापारामुळे रोगरायाही दूर दूर पर्यंत पसरवण्यास हातभार लागला. ज्या जनजाती या शेतीप्रधान मानवापासून दूर राहून आदिम जीवन जगत होत्या त्या जेंव्हाही या कृषीमानवाच्या साहचर्यात गेल्या तेंव्हा ते या जीवाणू-विषाणूशी कधी लढलेच नसल्यामुळे त्यांचे शिरकाण झाले. ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका खंडात युरोपियन गेले तेच ही "जैविक अस्त्रे" सोबत घेऊन आणि जरी त्यांची स्वत:ची प्रतिकार शक्ती नैसर्गिक दृष्ट्या तयार झालेली असली तरी तेथील मूळ रहिवाशांचे तसे नव्हते. त्यामुळे एकार्थाने हा वंशसंहारच होता. त्याच वेळीस मानवी भाषेत बहुरंगी भर पडत गेली. दैवत संकल्पना ते नितीतत्वांमध्ये अमुलाग्र बदल झाला. ही मोठी उलथापालथ होती. 


त्यानंतर लागलेला क्रांतीकारी शोध म्हणजे यंत्रांचा. यंत्रयुगाने पारंपारिक व्यवसाय-धंद्यांची वाताहत केली. यंत्रयुगाला विरोध करणारे मानवशास्त्रज्ञही वाढले आणि ते शाश्वत जीवनपद्धतीचा पुरस्कार करू लागले. अशाही लोकांनी अपार प्रसिद्धी मिळवली असली तरी यंत्रयुगाने मानवी जीवनाला व्यापून टाकले. अर्थव्यवस्थेचे नियम बदलले. या युगाला आनुषंगिक नवी नितीशास्त्रे जन्माला आली. जगण्याच्या पद्धती बदलल्या. एका धावेमाःगुण दुसर्या अधिक जीवघेण्या दहावी सुरु झाल्या. पण यंत्रयुग टाळता आले नाही कारत त्यात तोट्यांपेक्षा फायदेच अधिक होते. जगणे अधिक सोयीस्कर झाले. अर्थात विषमतेचाही विस्फोट झाला. ती कशे टाळता येईल याविषयी चिंतन झाले असले तरी ते सरकारी पातळीवरील उपाययोजना एवढ्यापुरतेच मार्त्याडीत राहिले. जीवनाचे प्रश्न बदलले. नंतर संगणक युग आले. त्यानेही भीतीची लाट निर्माण केली. रोजगार जातील या भीतीने मानवजाताच गळाठून गेली. पण तसे झाले नाही. उलट लाखो नव्या नोकऱ्या जन्माला आल्या. पुन्हा समाजजीवनात नवी उलथापालथ झाली. मानवी नाते संबंध बदलू लागले. जग जवळ येऊ लागले पण मानवी मने मात्र दूर गेली असे या स्थितीचे वर्णन केले जाते. 


आणि आता कृत्रिम बुद्धीमत्ता (ए.आय) आणि यंत्रमानव (रोबोटिक्स) तंत्रज्ञानाने जगातील असंख्य लोकांची झोप उडवलेली आहे. ही नवी क्रांती आहे असे मानले जाते. उद्याच्या जागातील सामाजिक आणि अर्थजीवनावर याचे काय विपरीत परिणाम होणार आहेत हे सांगू पाहणा-या विचारवंतांची दाटी सध्या वाढलेली दिसते. अलीकडेच लंडन येथे कृत्रिम बुद्धीमत्तेच्या संदर्भात शिखर परिषद झाली व दोन दिवसाच्या चर्चेनंतर ए.आय. मध्ये गंभीर, विनाशक आणि नुकसानदायक अशा अनेक गोष्टी आहेत ज्या जाणीवपूर्वक अथवा अजाणतेपणे उपस्थित होऊ शकतात कारण कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानात अशा अपायकारक संभावना आहेत असे घोषित केले गेले. या घोषणापत्रावर अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, चीनसारख्या अठ्ठाविस देशांनी सह्या केल्या असून नवीन निर्बंधांना तयार करून लागू करण्याबाबत सहमती दर्शवलेली आहे.


कोणतेही नवे तंत्रज्ञान आले कि त्याच्या दुरुपयोगाबद्दल शंका घेऊन त्याला घाबरून जाणे हे आपल्या जगाला नवे नाही. समाजविघातक प्रवृत्तींची जगात वानवा नाही हे तर अजून एक दुर्दैवी वास्तव आहे. दहशतवादी संघटनाही या तंत्रज्ञानाचा वापर करून विनाशक गोष्टी करवू शकतात. विकृतबुद्धी लोक ए.आय. वापरून बनावट व्हिडिओ बनवून बेमालूमपणे ते खरेच आहेत असे वाटतील या पद्धतीने प्रसारित करून कोणालाही बदनाम करू शकतात. सायबर गुन्हेगारी कृत्रिम बुद्धीमत्तेचा आधार घेऊन आर्थिक ते खाजगी माहितीचा अपहार करू शकतात. आधीही हे होतच होते पण आता त्याचा वेग वाढेल अशी चिन्हेही दिसू लागलेली आहेत. कृत्रिम बुद्धीमत्ता खरे तर अजून बाल्यावस्थेत आहे, पण तिच्यात प्रतिक्षणी वेगाने सुधारणा केली जाते आहे. कृत्रिम बुद्धीमत्तेचे वरील तोटे जरी असले तरी कामाच्या व निर्णयक्षमतेच्या वेगात व अचूक हाताळणीच्या बाबतीत ए. आय. अत्यंत यशस्वी ठरत असल्याने ते बलाढ्य कॉर्पोरेटसाठी आणि साध्यासोप्या दैनंदिन सोयींसाठी सर्वसामान्यांना फायद्याचे ठरते आहे हेही एक वास्तव आहे.


मनुष्य ज्या गोष्टींना सरावलेला असतो अशाच वैचारिक पर्यावरणात राहणे पसंत करतो. नवे ज्ञान हे जुने परिचित पर्यावरण नष्ट करत असल्याने त्याची भिती वाटणेही स्वाभाविक आहे. त्या भीतीत फार काही वावगे असते असेही नाही. नव्या ज्ञानाला जग नेहमीच घाबरते तर चतुर लोक त्याचा आधी फायदा घेऊन प्रगती करतात. आता “माणसाचे काय?” हा गंभीर प्रश्न जगभर चर्चेत नेहमीच येत असतो. आता तर कृत्रिम बुद्धीमत्ता आणि रोबोटिक्स माणसाला आव्हान द्यायला उभे ठाकलेले आहेत. उद्या आताचे बीट सिस्टमचे संगणक जाऊन क्वांटम प्रणालीवर चालणारे संगणक येतील तेंव्हा त्यांच्या अचाट क्षमतेमुळे आताचे संगणक बाद होऊन नवी अतिशक्तीशाली प्रणाली येईल तेव्हाही आज होते आहे तशीच चर्चा हिरीरीने केली जाईल. सामाजिक आणि नैतिक प्रश्न उठवले जातील यात शंका नाही.

पण मानवी प्रवृत्ती हीच नवेनवे शोध घेण्याची आहे. त्याचे कुतूहल त्याला स्वस्थ बसू देत नाही. आज आहे त्यापेक्षा नवे, वेगळे आणि अधिक क्षमतेचे कसे निर्माण करायचे हा ध्यास त्याला नैसर्गिकपणे जडलेला आहे. जुनी नीती रद्दबातल ठरवून नवी नीतीमुल्ये जन्माला घालणेही त्यातच आले. 


माणसाला अधिकाधिक प्रगत, प्रगल्भ आणि कल्पक बनवणे हे प्रत्येक नव्या तंत्रद्न्यानाचे उद्दिष्ट असते. मानवी जीवन सुखकर व्हावे व साधी दैनंदिन कामे करण्यात वेळ न घालवता अधिकाधिक सर्जनशील कार्याकडे मानव जातीला कसे वळवता येईल हे पाहणे तंत्रज्ञानाचे ध्येय असते. आताची कृत्रिम बुद्धीमत्ता नेमकी काय आहे आणि मग तिचे भविष्य काय असणार आहे याचा विचार आपण पुढील लेखात करूयात. हे तंत्रज्ञान माणसाला खरेच घातक ठरणार आहे काय? तिच्यात असलेली सामर्थ्ये आणि मर्यादा यावर चर्चा करूयात. 


-संजय सोनवणी

1 comment:

  1. Call Me 9754809848 aapko apne Website Ko acha Professional Design karana hai to call me

    ReplyDelete

कृत्रिम बुद्धिमत्तेने निर्माण केलेले भय किती खरे?

  मानवी इतिहासात पूर्ण क्रांती घडवणारे अत्यंत महत्वाचे शोध लागले आहेत. शेतीच्या शोधाने मानवी जीवनात क्रांतीकारी बदल घडवला होता. भटका समाज त्...